लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान/धर्मात् अर्थश्च कामश्च
प्रकरण : ६
धर्मात् अर्थश्च कामश्च !
जगांतल्या दण्डसत्तांनी आणि विशेषतः चीनच्या दण्डसत्तेने भारताच्या लोकसत्तेला जें आव्हान दिले आहे तें भारताला स्वीकारतां येईल काय, आणि एकंदरच जगातल्या दण्डसत्तांच्या वाढत्या सामर्थ्यापुढे लोकसत्ताक राष्ट्रांना टिकाव धरतां येणें शक्य आहे काय, याचा विचार आपण करीत आहों. या अभ्यासांत भारताची स्थिति अत्यंत निराशाजनक आहे असें आपल्या ध्यानांत आलें. म्हणून त्याची कारणमीमांसा आपण करूं लागलों. ती करीत असतांना मागल्या प्रकरणांत आपल्या नेत्यांनी राष्ट्राच्या उत्कर्षासाठी जें तत्त्वज्ञान स्वीकारले आहे तें अत्यंत भ्रान्त, विपरीत व घातकी असून त्यामुळेच सर्व क्षेत्रांत आपल्याला अपयश येत आहे असा विचार मांडला, प्रत्येक क्षेत्रांत आपण उत्तम योजना आखल्या आहेत. पण त्या योजना सिद्धीस नेण्यासाठी जीं ध्येयवादी, कार्यक्षम, कर्तव्यदक्ष, प्रतिभासंपन्न, दूरदृष्टीचीं, व्यक्तित्वसंपन्न अशी माणसें लागतात तींच येथे नाहींत. आणि तीं नाहींत हा केवळ योगायोग नाही. अशी कर्तबगार माणसे निर्माण होण्यास समाजांत ज्या प्रेरक शक्ति असाव्या लागतात त्याच काँग्रेसच्या तत्त्वज्ञानामुळे नष्ट झाल्या आहेत व होत आहेत. राष्ट्रनिष्ठा ही अर्वाचीन काळांतली एक महान् प्रेरक शक्ति आहे. त्या निष्ठेमुळे माणसें ध्येयवादाने भारून जातात, वेडी होतात आणि मग वाटेल त्या पराक्रमाच्या कोटी करतात. या निष्ठेचें स्वरूप काय आणि काँग्रेसच्या भ्रामक उदात्ततेमुळे, भ्रान्त सात्त्विकतेमुळे व हीन सत्तालोभामुळे तिचा भारतांतून कसा लोप होत चालला आहे हे मागल्या प्रकरणांत सांगितले. आज राष्ट्रनिष्ठेइतक्याच, नव्हे, तिच्यापेक्षा शतपटीने जास्त प्रभावी अशा दुसऱ्या एका प्रेरक शक्तीचा विचार करावयाचा आहे. ती शक्ति म्हणजे धर्म.
धर्म या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. समाजसेवा हाच धर्म असें कोणी म्हणतात. राष्ट्रनिष्ठेलाहि राष्ट्रधर्म म्हणून कोणी गौरवितात. सत्य हा धर्म आहे, परोपकार, दया हा धर्म आहे. हे सर्व अर्थ आपापल्या परीने युक्तच आहेत. पण येथे धर्माचा मूळ अर्थच अभिप्रेत आहे. सर्वशक्तिमान्, सर्वसाक्षी, सर्वज्ञ, शरणागतांचा त्राता, विश्वाचा पालनकर्ता असा जो परमेश्वर त्याच्यावरील श्रद्धा, त्याची भक्ति, त्याची उपासना या अर्थाने धर्म शब्द येथे वापरला आहे. हा धर्म ही मानवी समाजांतील एक अत्यंत मोठी प्रेरक शक्ति आहे. या परमेश्वरनिष्ठेसाठी मानवाने आतापर्यंतच्या इतिहासांत वाटेल तो त्याग केला आहे. वाटेल त्या यातना सोसल्या आहेत. या परमेश्वरभक्तीमुळे माणसांनी संसार सोडला आहे, स्वजन-त्याग केला आहे, धनवित्त यांचा मोह सोडला आहे, प्राणहि अर्पण केले आहेत. तेव्हा आत्यंतिक ध्येयवादाला प्रवृत्त करणारी अशी ही प्रेरणा आहे याबद्दल दुमत होणें शक्य नाही. पण आजच्या या शास्त्रीय युगांत, या विसाव्या शतकांत, सध्याच्या बुद्धिवादी जगांत ही परमेश्वरनिष्ठा राष्ट्राच्या ऐहिक उत्कर्षाच्या दृष्टीने कितपत व कशी उपयोगी पडेल याविषयी मात्र बराच वाद होणें शक्य आहे. त्याच प्रश्नाचा आता विचार करावयाचा आहे.
वर वर्णिलेली धर्मश्रद्धा समाजाच्या ऐहिक उन्नतीला कशी साहाय्यभूत होणार अशी शंका येणें साहजिक आहे. कारण सामान्यतः या धर्मश्रद्धेच्या नांवाशी दोन मोठी वैगुण्यें, दोन मोठे दोष निगडित झालेले असतात. ही धर्मश्रद्धा मनुष्याला संसारविन्मुख करते, ऐहिक प्रपंचाविषयी तिच्यामुळे मनुष्य उदासीन होतो, हा एक दोष; आणि बहुधा ही श्रद्धा सर्वत्र अंधळी आणि त्यामुळेच विज्ञानविरोधी, शब्दप्रामाण्यवादी व दुराग्रही अशी असते, हा दुसर दोष होय. जगाच्या पाठीवरच्या बहुतेक सर्व धर्मांची एके काळीं अशी स्थिति होती यांत शंका नाही. आणि त्यामुळे तेथली धर्मश्रद्धा राष्ट्राच्या प्रगतीला उपकारक तर नव्हेच, पण अनेकदा विघातकहि ठरलेली आहे यांतहि वाद नाही. पण युरोपांत १५-१६ व्या शतकांत ग्रीक विद्येचें जें पुनरुज्जीवन झालें तेव्हापासून तेथील युग पालटले आणि हळूहळू गेल्या तीनचारशे वर्षांत धर्मश्रद्धेतले वरील दोन्ही दोष नष्ट झालेले असून पाश्चात्त्य देशांतली आजची धर्मश्रद्धा ऐहिक उत्कर्षाची एक महाशक्ति होऊन बसली आहे.
हें कार्य मेथॉडिस्ट, क्वेकर, इव्हँजेलिस्ट, जेसुइट, साल्व्हेशन आर्मी इ. जे अनेक धर्मपंथ पश्चिम युरोपांत निर्माण झाले त्यांनी केलें आहे. दीन, दलित, अनाथ, अपंग, बहिष्कृत, पतित, रंजले गांजले यांच्या उद्धारासाठीच धर्माचा अवतार आहे, हें महातत्व वेस्ले, फॉक्स, बूथ, इ. या पंथाच्या प्रवर्तकांनी सांगितले आणि त्याच्या आचारासाठीच हे पंथ स्थापिले. त्यांना अभिप्रेत असलेला हा दलितांचा उद्धार म्हणजे केवळ पारलौकिक उद्धार किंवा मोक्ष नव्हे, तर ऐहिक उद्धार होय. प्रपंचाशिवाय परमार्थ व्यर्थ होय, केवळ अशक्य होय असे त्यांचे मत होतें. म्हणून या दलित बांधवांना प्रथम जीवनांत प्रतिष्ठा प्राप्त करून देणें हें धर्माचे पहिले कार्य होय असें ते मानीत. एलिझाबेथ फ्राय, विल्बर फोर्स यांनी तुरुंग- सुधारणेच्या व गुलाममुक्तीच्या ज्या चळवळी केल्या त्या धर्मप्रेरणेनेच होत. त्या काळांत तुरुंगांतलें जीवन अत्यंत भयानक होतें. अत्यंत थोड्या अवधीत माणूस तेथे पशु होऊन जात असे. तुरुंग सुधारणेची चळवळ अखंड २५/३० वर्षे चालवून एलिझाबेथ फ्राय हिने युरोपांतील लाखो लोकांना या नरकांतून सोडविलें. युरोपांतील धर्मपंथांचे हेच वैशिष्ट्य आहे. ज्या सामाजिक व्यवस्थेमुळे, बंधनामुळे, रुढीमुळे कायद्यामुळे, दीनदलितांचे हाल होत असतील त्या रूढि वा ती बंधनें समूळ नष्ट करून टाकणें हें खरें धर्माचें कार्य आहे असें ते समजतात. आणि तें साध्य करण्यासाठी केवळ उपदेश करून न थांबता ते चळवळी करतात, लोकजागृति करतात, अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी संघटना उभारतात आणि त्यापायी वाटेल ते हाल सोसून अंतीं प्राणत्यागहि करतात. क्वेंकरपंथाने महात्माजींचें सत्याग्रहाचे तत्त्व तीनशे वर्षांपूर्वीच अवलंबिलें होतें. राजे, सरदार, सरंजामदार, अधिकारी, लष्कर यांच्या सत्तेची, सामर्थ्याची कसलीहि पर्वा न करतां त्यांच्या तोंडावर त्यांच्या अपकृत्यांचा ते पाढा वाचीत, त्यांची निर्भर्त्सना करीत आणि यासाठी फटके,तुरुंग, फांशी- वाटेल ते सहन करीत. अन्यायाचा प्रतिकार करण्याचें सामर्थ्य हें मानवी प्रतिष्ठेचे पहिले लक्षण होय. युरोपच्या धर्मपंथांनी दीनदलित लोकांच्या ठायीं तें निर्माण करून समाजाची जी उन्नति केली ती पाहिली म्हणजे धर्म ही समाजोद्धाराची केवढी प्रभावी शक्ति आहे हें सहज उमगेल.
ऐहिक जीवनाची प्रतिष्ठा, या संसारांतील सुबत्ता हे या धर्मपंथांचे पहिले लक्ष्य असतें. हे धर्मसुधारक जेथे जातील तेथे प्रथम लोकांतील अज्ञान, दारिद्रय, रोगराई यांचें निवारण करण्यासाठी प्रयत्न करतात. यासाठी ते शाळा स्थापन करतात, रुग्णालये उभारतात, आणि संस्था निर्माण करून शेकडो कार्यकर्त्यांना ध्येयवादी बनवून दलितोद्धार करतात. या तऱ्हेचें धर्माचरण भारतांत गेल्या हजार वर्षांत अभावानेच दिसतें. पाश्चात्त्यांच्या धर्मबुद्धीला प्रेरणा देणारा ख्रिस्ती धर्माचा आदिग्रंथ जो बायबल त्याच्याप्रमाणेच येथल्या साधुसंतांनीहि समाजोद्धाराचा उपदेश केला होता हें त्यांच्या ग्रंथावरून सहज दिसून येतें. 'जे का रंजले गांजले, त्यांसि म्हणे जो आपुले, तोचि साधु ओळखावा, देव तेथेचि जाणावा ॥ दया करणें जे पुत्रासि, तेचि दासां आणि दासीं ।' हीं श्रीतुकाराममहाराजांची वचनें प्रसिद्धच आहेत. 'मुख्य पूजेचें आयतन प्राणिमात्रा सुखदान,' 'यथासामर्थ्य यथावित्तें, सुख द्यावें प्राणिमात्रांतें !' 'अन्नवस्त्रदान हा स्वधर्म जाण सर्वांचा॥' हा श्रीएकनाथांचा उपदेश अनेकांच्या नित्यपाठांत आहे. पण या वचनांतून समाजसेवेची प्रेरणा कोणी घेतलीच नाही हें भारताचे मोठे दुर्देव होय. दीन, दरिद्री, रोगी, अनाथ, पतित अशा लोकांची दया येथे कोणाला येत नसे असे नाही. पण त्यांना पैसा दोन पैसे द्यावे, त्यांच्या दुःखाचा कांही तात्पुरता परिहार करावा, यापलीकडे येथे कोणाची धर्म बुद्धि गेलीच नाही. कारण असा धर्म करून स्वतःचा मोक्ष साधावयाचा, वैयक्तिक पुण्याची जोड करावयाची एवढीच आमची दृष्टि होती. पण दलितांचा कायमचा उद्धार करावयाचा, त्यांची पशुअवस्था नष्ट करून त्यांच्या जीवनाला प्रतिष्ठा प्राप्त करून द्यावयाची ही धर्मबुद्धि येथे निर्माण झालीच नाही. त्यामुळे ज्या सामाजिक तत्त्वामुळे, बंधनामुळे, रूढीमुळे दैन्य, दारिद्र्य, विषमता, निर्माण होते, मानवाचा अधःपात होतो त्या नष्ट करणें हें जे धर्माचें महान् कार्य तें येथे कोणी केलेंच नाही. याचा अर्थच असा को धर्म ही महाशक्ति भारतांत आज कित्येक शतकें लुप्तावस्थेतच आहे.
धर्मभावना ही मनुष्याच्या ठायीं समाजसेवेची केवढी उदात्त ध्येयदृष्टि निर्माण करते, हें मिशनऱ्यांची चरित्रे वाचून भारतीयांनी जाणून घेतलें पाहिजे. नुकत्याच दिवंगत झालेल्या श्रीमती इडा स्कडर यांचे उदाहरण पाहा. त्यांचे आजोबा १८१९ साली प्रथम हिंदुस्थानांत आले. एका धनाढ्य अमेरिकन वकिलाचा हा मुलगा. स्वतः नामांकित डॉक्टर ! पण बापाचा रोष पत्करून, पुढचें उज्ज्वल भवितव्य सोडून मिशनरी म्हणून तो भारतांत आला तो जीजसचा संदेश जगभर प्रसृत करावा, धर्मप्रसार करावा या एकाच हेतूने त्याचे सातहि मुलगे डॉक्टर होऊन मिशनरी झाले व भारत हीच त्यांनी आपली कर्मभूमि मानली. त्यांतल्या कनिष्ठ मुलाची इडा ही मुलगी. बालपणापासून भारतांतली रोगराई, अज्ञान, दारिद्र्य ती पाहात होती. आठव्या वर्षी ती अमेरिकेत परत गेली. आणि तेथे पंधरा सोळा वर्षे घालविल्यानंतर आपण मिशनरी व्हावयाचे नाही असें तिने ठरविलें. तेवढ्यांत इकडे आई आजारी पडली म्हणून तिला नेण्यासाठी इडा हिंदुस्थानांत आली. त्या वेळी एका रात्री एक तरुण ब्राह्मण तिच्याकडे आला व बाळंतपणांत बायको अडली आहे, तुम्ही मदतीला चला असे तिला विनवू लागला. पण इडा स्वतः वैद्यकांत अनभिज्ञ असल्यामुळे तिने माझ्या वडिलांना तुम्ही न्या, असें त्या ब्राह्मणास सांगितले. त्याला हे ऐकून धक्काच बसला. सनातन ब्राह्मणाच्या घरांत स्त्रीच्या बाळंतपणासाठी पुरुष डॉक्टर! आणि तोहि म्लेंच्छ! त्यापेक्षा बायको मेली तरी चालेल, असें तो म्हणाला, आणि दुर्दैवाने ती खरोखरच मेली. पण तें दुर्देव येथेच थांबलें नाही. त्या एका रात्री आणखी दोन तरुण मुली याच आपत्तींत सापडून मृत्युमुखी पडल्या, आणि त्यामुळे इडाचें भवितव्य बदलले. स्त्री डॉक्टरांच्या अभावी भारतांतील स्त्रिया अशा मृत्युमुखी पडत आहेत हें पाहून या समाजाची सेवा करणें हें आपल्या मिशनरी आजोबांनी व वडिलांनी स्वीकारलेलें व्रत आपणहि स्वीकारावयाचें अशी त्याच रात्रीं तिने प्रतिज्ञा केली. अमेरिकेला परत जातांच तिने वैद्यकीय विद्यालयांत नांव घातलें आणि सहा वर्षे आयुर्विद्येचा अभ्यास करून ती हिंदुस्थानांत परत आली व पुढील पन्नास वर्षे तिने भारतीय स्त्रियांची सेवा केली. त्या सेवेतच परवा तिने देह ठेवला.
डॉ. इडा स्कडर आणि त्यांचे एकंदर कुटुंब यांचा इतिहास पाहिला म्हणजे धर्म ही केवढी प्रबल शक्ति आहे, व्यक्तीला ध्येयप्रवृत्त करण्यास ती कशी समर्थ आहे आणि आजच्या शास्त्रीय युगांत पाश्चात्य लोक तिची एकनिष्ठेने कशी जोपासना करीत आहेत हें सहज ध्यानांत येते. कोठे अमेरिका, कोठे हिंदुस्थान! अमेरिकेतले जीवन किती संपन्न, सुधारलेलें, सुखी ! भारतांतली जनता किती दीन, दरिद्री, अज्ञानग्रस्त, मोहमूढ ! तिची घरे अस्वच्छ, घाणेरडीं ! अमेरिकेच्या तुलनेने माणसें हेंगाडी, कुरूप ! अंधरूढीच्या प्राबल्यामुळे तीं सर्व हेकट झालेली, दुराग्रही बनलेलीं. अशा या माणसांची सेवा करण्यासाठी तें संपन्न व विलासी जीवन टाकून सर्व आयुष्य खर्ची घालावयाचें, हें चारित्र्य खरोखर असामान्य आहे. डॉ. इडा येथे परत आल्या तेव्हा वेलोरच्या आसपासचे लोक त्यांना घरांत येऊ देण्यासह तयार नव्हते. येऊं दिलें तरी, त्या घरांतल्या बाळंतिणीची सुटका करण्याची गरज त्यांनाच आहे, यांना कांही नाही, असें ते त्यांच्याशी वागत. घरांतल्या बायका विटाळाच्या भीतीने त्यांना कसलीहि मदत करीत नसत. तरीहि इडाबाईंनी आपले सेवाव्रत सोडलें नाही. जीजसचा हाच संदेश आहे अशी त्यांची श्रद्धा होती; आणि रुग्णांना रोगमुक्त करतांना त्या संदेशाची शिकवणहि त्या देत राहिल्या. त्यांच्या सेवेमुळे हळूहळू लोकमत पालटूं लागलें, मग त्यांचे स्वागत होऊं लागलें, त्यांना साह्य मिळू लागले तेव्हा लगेच पुढचे पाऊल टाकून त्यांनी एक वैद्यकीय शाळा व एक रुग्णालय स्थापन केलें. आज वेलोरचें रुग्णालय व विद्यालय यांची जगभर कीर्ति झाली आहे. आणि भारतांतल्या अनेक स्त्रिया व पुरुष- (ज्यांचें जीवन डॉ. इडा स्कडर यांच्या धर्मप्रेरणेच्या अभावी केवळ खातेऱ्यांत गेलें असतें)- मोठ्या प्रतिष्ठेला पोचून, जगांतल्या महाविद्यालयांतून पदव्या घेऊन डॉक्टर होऊन भारताच्या सर्व प्रांतांतील रुग्णालयांत जनतेची सेवा करीत आहेत. त्यांतील अनेक लोक आज ख्रिस्ती झाले आहेत. पण हिंदु धर्म जोपर्यंत ही प्रेरणा देऊं शकत नाही, दीनदलितांच्या ऐहिक उत्कर्षावरच धर्माचा उत्कर्ष अवलंबून आहे हें जोपर्यंत हिंदुसमाज मानीत नाही, हिंदु धर्मांत राहून आपला उत्कर्ष होणार नाही असें जोपर्यंत अस्पृश्य, दीन, दलित, आदिवासी अशा जमातींना वाटत आहे, तोपर्यंत याविषयी कसलीहि तक्रार करण्याचा अधिकार हिंदु समाजाला नाही.
सुखी, संपन्न, विलासी जीवनाचा त्याग करून ख्रिस्ती धर्माचा प्रसार करण्यासाठी जगाच्या पाठीवर आज हजारो युरोपीय मिशनरी भ्रमण करीत आहेत. त्यासाठी वाटेल ते कष्ट व यातना सोशीत आहेत, प्रसंगी प्राणांचें बलिदान करीत आहेत. त्यांच्यावर नेहमी एक आक्षेप घेण्यांत येतो की, त्यांची सेवा वाटते तितकी निरक्षेप नाही. ज्या दलितांची ते सेवा करतात त्यांचें धर्मांतर घडावें असा त्यांचा हेतु असतो. असा त्यांचा हेतु असतो यांत शंकाच नाही. तीच त्यांची मूळ प्रेरणा आहे. आणि ज्या उदात्त धर्मावर आपली श्रद्धा आहे त्यांतील तत्त्वांचा प्रसार जगांत करावा असें ध्येय मनुष्याने डोळयांपुढे ठेविलें तर त्यांत आक्षेपार्ह तरी काय आहे ? त्यांत जेव्हा इतर राजकारणी आणि स्वार्थी लोक शिरतात, आणि राजकीय हेतु त्यांच्या कार्यांत प्रभावी ठरू लागतो त्या वेळीं त्यावर आक्षेप घेणें युक्त होईल; इतकेंच नव्हे तर राष्ट्रहिताच्या दृष्टीने तें अवश्यहि आहे. मागील प्रकरणांत राष्ट्रनिष्ठेचा विचार करतांना भारतांतल्या परकी मिशन यांच्या संबंधी याच दृष्टीने मी लिहिलें आहे; धर्म ही निष्ठा मानवाच्या, समाजाच्या व राष्ट्राच्या उन्नतीला आजच्या काळांतहि किती प्रेरक होऊं शकते याचा विचार आपण करीत आहों. धर्मामुळे जी उदात्त ध्येयवादाची, त्यागाची, तपश्चर्येची, जनसेवेची शिकवण मिळते तिला या दृष्टीने महत्त्व आहे. मिशनऱ्यांच्या मनांत स्वार्थ असला तरी तो राष्ट्रीय स्वार्थ आहे, तो स्वार्थ ते जनसेवा करून, मानवाची प्रतिष्ठा वाढवून, दलितांची उन्नति करून साधतात आणि त्यापायी वाटेल तो त्याग करण्यास सिद्ध असतात हे विसरून चालणार नाही. हा स्वार्थच इतका ध्येयवादी आहे की, त्या जातीचा स्वार्थ त्यांच्या शतांश जरी आज भारतीयांच्या अंगी निर्माण झाला तरी आपल्या सर्व योजना यशस्वी होतील. कारण या धर्मप्रेरणेतून राष्ट्रनिष्ठेच्या प्रेरणेप्रमाणेच समाजाला अवश्य ती कर्तबगार व तपोनिष्ठ माणसें निर्माण होत असतात. आज आपल्या सरकारने आखलेल्या योजनांवरचे जे अधिकारी आहेत त्यांना या योजनांतून दीनदलितांचा योगक्षेम सिद्ध व्हावयाचा आहे, या प्राणिमात्राच्या सुखदानासाठी आहेत, रंजल्यागांजल्यासाठी आहेत, आणि म्हणून त्या यशस्वी करणें हें, श्रीतुकाराम, श्रीएकनाथ यांच्या वचनाप्रमाणे, फार मोठे धर्मकार्य आहे असें जर वाटले, अशी श्रद्धा जर त्यांचे ठायीं निर्माण झाली तर समृद्धि भारताच्या पायाशीं धावत येईल यांत शंका नाही.
युरोपीय मिशनऱ्यांची वर उदाहरणें दिलीं तीं परक्या देशांत जाऊन धर्मप्रचार करणाऱ्यांची दिली. इकडे पूर्वेकडे अशाच लोकांची नांवें आपल्या कानी येतात. पण युरोपच्या इतिहासांत अशा मिशनऱ्यांचाच प्रामुख्याने भरणा आहे असे मुळीच नाही. आपापल्या देशांतल्या दलितांचा उद्धार करण्याचें महान् कार्य आज तीनशे वर्षे ही धर्मप्रेरणा करीत आहे. त्याचीहि कांही उदाहरणें वर दिली आहेत; पण आजच्या घटकेलाहि या निष्ठेने प्रेरित होऊन प्रत्येक देशांत धर्मगुरु केवढें कार्य करीत आहेत हें ध्यानांत यावे म्हणून आणखी कांही उदाहरणें देतों. या धर्मगुरूंच्या कार्याकडेच प्रामुख्याने वाचकांचे लक्ष वेधावें हा ती उदाहरणे देण्यांत हेतु आहे. कारण आपल्या देशांत आपण प्रस्थापित केलेली लोकसत्ता यशस्वी व्हावी यासाठी ध्येयवादी, कार्यक्षम स्त्रीपुरुषांची आपल्याला फार गरज आहे. ही उणीव कशी भरून निघेल याचा मुख्यतः आपण विचार करीत आहों. हिंदुधर्मीयांनी इतर देशांत जाऊन धर्मप्रसार करावा, इतरांचें धर्मांतर घडवून आणावें असें सांगण्याचा किंवा सुचविण्याचाहि हेतु नाही. राष्ट्रनिष्ठेप्रमाणेच धर्मनिष्ठा हीहि उदात्त ध्येयवादाची प्रेरणा माणसाला देते, हें कार्य करण्यास ती आजच्या या विज्ञानयुगांतहि तितकीच समर्थ आहे म्हणून तिची जोपासना आपण केली पाहिजे हें मुख्य प्रतिपाद्य आहे. त्या दृष्टीने पुढील उदाहरणें अत्यंत उद्बोधक ठरतील.
दक्षिण स्पेनमध्ये कार्डोबा ही विख्यात नगरी आहे. तेथे फादर अल्बिनो यांची १९४५-४६ च्या सुमारास बिशप म्हणून नेमणूक झाली. त्या वेळीं कार्डोबा नगरीला अत्यंत अवकळा आली होती. दोन लाखांपैकी निम्याहून अधिक लोक अत्यंत गलिच्छ घाणेरड्या भागांत राहात. ती घरें पशूंनाहि राहण्यास योग्य नव्हती. रोगराई, गुन्हेगारी आणि अनाचार यांनी ती नगरी सडून गेली होती. भ्रष्टता, लाचलुचपत, सत्तालोभ, हीनस्वार्थ यामुळे नागरिकांना जीवन असह्य झालें होतें. प्रथम फादर अल्बिनो कांही दिवस सर्व नगरीत संचार करीत राहिले. गरिबांचें जिणें, श्रीमंतांचे विलास, त्यांनी निरखून पाहिले आणि मग मनाशी त्यांनी कांही निश्चय केला. फादर फाँट हा एक उत्कृष्ट सहकारी त्यांना मिळाला. त्याला ते म्हणाले, 'अरे, इतक्या दीन, इतक्या गांजलेल्या लोकांपुढे धर्मं प्रवचन कसलें करावयाचें ? भगवंताचे नामसंकीर्तन त्यांना कसें ऐकवावयाचें ? प्रथम आपण त्यांच्या अन्नवस्त्राची, घराची सोय करू. आणि मग त्यांना धर्म शिकवू.' असें म्हणून गांवांतील डॉक्टर, इंजिनियर, वकील, व्यापारी इ. प्रमुख वर्गातील नागरिकांना त्यांनी पाचारण केलें. प्रथम अर्थातच मिळावें तसें या लोकांकडून साह्य मिळाले नाही. पण अल्बिनो त्यांच्या धर्मश्रद्धेला सतत आवाहन करीत राहिले. हें धर्मकार्य आहे, ही परमेश्वराची सेवा आहे असा उपदेश ते करीत राहिले. त्याचा परिणाम होऊन लवकरच हे सर्व लोक कामाला लागले. एक हजार घरे बांधण्याचा फादर अल्बिनो यांचा संकल्प होता. तीन वर्षांत पंधराशे घरें बांधून झाली. यांत नवल वाटण्याजोगें कांही नाही. अजूनहि जगांत सर्वत्र धर्मश्रद्धा प्राचीन काळाइतकीच जिवंत आहे. त्या महाशक्तीचा उपयोग दलितांच्या ऐहिक उत्कर्षासाठी, संपत्तीच्या समविभाजनासाठी, लोकशाहीच्या प्रस्थापनेसाठी करावयाचा, आर्थिक, सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी करावयाचा हें मात्र सर्वत्र घडत नाही. आपल्याकडे आजहि मेहेरबाबा, साईबाबा, नारायणमहाराज, उपासनी महाराज यांच्यावर लोकांची किती भक्ति आहे, त्यांच्यासाठी लोक किती पैसा खर्च करतात हे आपण पाहिले तर लोकांत धर्मभावना किती प्रबल आहे हें ध्यानांत येईल. या भावनेचा ओघ सामाजिक कार्याकडे वळविणारा 'योजक' मात्र येथे दुर्लभ आहे. वैगुण्य आहे तें हें आहे. धर्म हा परमार्थ आहे. धर्म हा वैयक्तिक मोक्ष आहे, धर्म हे परलोकसाधन आहे हाच विचार येथे प्रबळ आहे. वैयक्तिक पुण्याइतकेंच सामाजिक पुण्यहि अत्यंत मोठें धर्मकृत्य आहे हा विचार आपल्या समाजांत अजून दृढमूल होत नाही. ऐहिकाच्या पायावरच परमार्थाची इमारत उभी राहू शकते हा विचार अजून आपल्या मनाची पकड घेत नाही. गेल्या तीनशे वर्षांत युरोपांत जी धर्मक्रान्ति झाली तिचें मात्र स्वरूप असें आहे. फादर अल्बिनो यांचे कार्य हें तिचेंच एक उदाहरण आहे. कार्डोबामध्यें तीन चतुर्थांश लोक दलित होते, अनाथ होते, रंजले गांजले होते. अल्बिनो यांनी स्वतः त्यांना आपलें म्हटलेंच पण नगरीतील वरिष्ठ वर्गातील श्रेष्ठीनाहि तसें म्हणावयास लाविलें. त्यांनी दलितांच्यासाठी अनेक संस्था स्थापिल्या श्रीमंतांकडून जमविलेल्या भांडवलावर सीमेंटचा कारखाना, ट्रकचा व्यवसाय, छापखाना, सुतारकामाचा कारखाना असे अनेक व्यवसाय सुरू करून प्रथम दलितांना सुस्थिति प्राप्त करून दिली आणि हें करता करतांच धर्माचा, जीजसचा संदेशहि दिला. या पद्धतीने धर्मोपदेश केला म्हणूनच तो त्यांच्या चित्तांत दृढमूल झाला. भगवान् वेदव्यास यांनी धर्माची महती सांगतांना हेच धोरण ठेवले आहे. धर्माचे आचरण कां करावें ? तर त्यापासून अर्थ व काम हे प्राप्त होतात म्हणून, असें ते सांगतात. फादर अल्बिनो यांनी हे धर्म रहस्य जाणलें होतें. म्हणून धर्म या महाशक्तीचा त्यांना समाजोद्धारासाठी उपयोग करता आला. त्यांनी जें कार्य केलें त्याला डॉक्टर, वकील, इंजिनियर या मध्यमवर्गीयांचें साह्य झालें, भांडवलदारांचेहि झाले आणि सरकारनेहि अमाप पैसा दिला. पण हे सर्व घटक आधी कार्डोबा या नगरीत होतेच. त्यांना सर्वांना एकत्र आणून कार्यप्रवण केलें तें फादर अल्बिनो यांनी; आणि तें त्यांच्या धर्मभावनेला आवाहन करून.
युरोपांतील बहुतेक सर्व नगरीत आज लोकांच्या धर्मभावनेला आवाहन करून तेथील धर्मोपदेशक दलितांचा, दीन, दरिद्री, अनाथ, अपंग यांचा उद्धार करीत आहेत. त्यांना प्रतिष्ठित, सुखी, संपन्न जीवनाचा लाभ करून देत आहेत. लंडनमधील एक धर्मोपाध्याय जिमी बटरवर्थ यांचे कार्य असेंच आहे. बाराव्या वर्षापासून गिरणीत बारा-पंधरा तास काम करून आईचें व भावंडांचे पालन- पोषण करणारा हा मुलगा. त्या वयांतच आपण उपाध्याय व्हावें ही आकांक्षा त्याच्या मनांत होती म्हणून तो मेथॉडिस्ट पंथाचा सभासद झाला. विसाव्या वर्षी लंडन नगरीच्या सरहद्दीवरील दीनदलित वस्तींतील एका चर्च मध्ये त्याची नेमणूक झाली. असल्या वस्तीत रस्त्यावर हिंडणारी, भटकणारी, उनाड अशी शेकडो मुलें असतात. त्यांच्या आईबापांचें त्यांच्याकडे लक्ष नसतें. लक्ष द्यायला त्यांना वेळ नसतो. त्यामुळे हीं मुलें चोऱ्यामाऱ्या, चाकूमारी, दंगली यांतच वाढत असतात आणि त्यांच्यांतूनच पुढे इरसाल गुंड व मवाली निर्माण होतात. हीं जीं रस्त्यावरची मुलें त्यांना सन्मार्गाला लावून प्रतिष्ठित जीवनांत आणावयाचें हें जिमी बटरवर्थ यांचें पहिल्यापासूनच ध्येय होतें. या चर्चमध्ये येतांच प्रथम त्यांनी या मुलांच्यासाठी एक क्लब काढला; पण तो त्या चर्चमध्ये काढला, आणि घरोघर जाऊन त्याचा प्रचार सुरू केला. आमच्या मुलांना रस्त्यावरून घरांत आणण्याचे कार्य एखादा धर्मोपाध्याय करीत असेल तर त्याला आम्ही वाटेल तें साह्य करूं, असें सर्व पालकांनी त्याला सांगितलें. बटरवर्थ यांनी प्रथम सहा मुलें जमविलीं, थोड्याच दिवसांत सहाची आठ झाली आणि आता सहा हजार मुलें त्या क्लबलँडचे सभासद आहेत.
पण बटरवर्थ यांनी केवळ धर्मोपदेश केला असता, केवळ भजन, नामसंकीर्तन केलें असतें तर हीं मुलें तेथे आली नसती. बटरवर्थ यांनी तेथे पिंगपाँग, बिलियर्ड इत्यादि खेळ सुरू केले, नाट्यसंस्था स्थापिली आणि चित्रकलेचा वर्ग सुरू केला. थोडी प्रगति होतांच ते लंडनमधील विख्यात शिल्पकार सर एडवर्ड मॉफी यांच्याकडे गेले व अशा वस्तीत एक भव्य चर्च बांधावयाचें आहे आणि तें तुम्हीं बांधून दिले पाहिजे असे त्यांनी त्यांना सांगितलें. सर एडवर्ड यांनी तें एकदम मान्य केलें. 'मी असें चर्च बांधीन की, अगदी इरसाल मवाली आला तरी त्याचें मस्तक तेथे नमलेच पाहिजे' असे ते म्हणाले आणि आपली प्रतिज्ञा त्यांनी पुरी केली. आज त्या वस्तीत 'रस्त्यावर' मुलें नाहीत. मग तीं कोठे आहेत ? त्यांनी स्वतःचें पार्लमेण्ट स्थापन केले आहे आणि क्रीडामंत्री, आरोग्यमंत्री, कलामंत्री अशा जागा निर्माण करून त्या सर्व वस्तीचें जीवनच त्यांनी आपल्या वर्चस्वाखाली आणले आहे. त्यांची क्रीडामंदिरें आहेत, रंगमंदिरें आहेत, दवाखाने आहेत, कारखाने आहेत. या क्लबलँडच्या सभासदांतून आज शेकडो व्यापारी, डॉक्टर, इंजिनियर निर्माण झाले आहेत, लंडनची रंगभूमि गाजविणारे नट व रॉयल ॲकॅडमीत स्थान मिळविणारे चित्रकार उदयास आले आहेत. ज्या रस्त्यावरच्या मुलांतून बह्वंशीं गुंड-मवाली निर्माण व्हावयाचे त्यांतूनच हे सुप्रतिष्ठित नागरिक निर्माण होऊन ब्रिटनचें जीवन समृद्ध करीत आहेत.
फादर आंद्रे टालव्हास यांनी पॅरिसमधील वेश्यांच्या उद्धारासाठी चालविलेले कार्य पाहिले म्हणजे युरोपांतील धर्मनिष्ठा किती प्रकारांनी समाजसेवा करीत आहे याची सम्यक् कल्पना येईल. वाममार्गाला गेलेल्या या अभागी तरुण स्त्रियांची मुक्तता करण्याचा प्रयत्न करतांना प्रत्येक क्षणीं मृत्यूला तोंड देतच पुढे जावें लागतें, असा सर्व देशांतल्या समाजसेवकांचा अनुभव आहे. कारण या क्षेत्रांत काम करणारे दलाल केवळ सैतान असतात. त्यांच्या धंद्याच्या आड येणाराचा ते हातोहात निकाल लावतात आणि त्यांच्या हातून निसटू पाहणाऱ्या स्त्रियांचीहि ते अशीच वासलात लावतात; म्हणून या क्षेत्रांत समाजसेवकांना तळहातावर शिर घेऊन प्रवेश करावा लागतो. राष्ट्रनिष्ठेप्रमाणेच धर्मनिष्ठाहि माणसाला ही शक्ति देते. असली कार्ये हा एक प्रकारचा धर्मसंग्रामच आहे. किंबहुना आज कोणतीहि समाजसेवा हा धर्मसंग्राम आहे. दारू, अफू इत्यादि मादक पदार्थ, तरुण मुलांची मनें भ्रष्ट करून टाकणारी हॉरर कॉमिक्ससारखी मासिकें, तरुण मुलींना पळवून त्यांना विकण्याचा व्यापार, या धंद्यांत लोकांनी कोटी- कोटींनी भांडवल गुंतविलेलें असतें, आणि युरोपांत तर आंतरराष्ट्रीय संघटना उभारलेल्या असतात. असल्या भस्मासुरी शक्तीला आव्हान द्यावयाचें म्हणजे एका महाधर्मसंग्रामालाच सिद्ध व्हावयाचें हें सहज कळण्याजोगे आहे, आणि त्यांच्याच तोडीच्या संघटना उभारल्या तरच या संग्रामांत विजय मिळणे शक्य आहे हेंहि ध्यानांत येणें अवघड नाही.
फादर टालव्हास यांनी, या दृष्टीने पाहतां, कौतुकास्पद यश मिळविलें आहे. १९३७ साली पॅरामी या गांवीं ते व्हिकार (धर्मगुरु) होते. एक दिवस मरणोन्मुख झालेल्या एका स्त्रीला शेवटचा धर्मबोध करण्यासाठी त्यांना बोलावण्यांत आलें. ती स्त्री एक वेश्या होती. तिने आपली सर्व कहाणी टालव्हास यांना सांगितली तेव्हा त्यांचे हृदय पिळवटून निघालें आणि या अभागी स्त्रियांच्या उद्धारासाठी सर्वस्व अर्पण करण्याचे त्यांनी ठरविलें. आज 'ला निड' ही त्यांची संस्था हेंच कार्य करीत आहे. तें इतकें यशस्वी होत आहे की, जगांतल्या सर्व देशांतून त्याचा अभ्यास करण्यासाठी लोक येत आहेत. वेश्याव्यवसायांतून सोडवून आणलेल्या किवा तेथून आपण होऊन आलेल्या स्त्रियांची तेथे राहण्याची सोय करण्यांत येते. तेथे डॉक्टर आहेत, परिचारिका आहेत, शिक्षक आहेत, मानसशास्त्रज्ञ आहेत आणि या अभागी स्त्रियांच्या सेवेलाच वाहून घेणाऱ्या अनेक तरुण स्त्रिया आहेत. विशेष म्हणजे हे सर्व लोक स्वयंसेवक आहेत. फादर टालव्हास यांच्या प्रेरणेने ते ही धर्मसेवा करीत आहेत. तेथे आलेल्या स्त्रीला प्रथम रोगमुक्त होण्यासाठी उपचार केले जातात. तिची प्रकृति सुधारल्यावर तिला कांही पोटाचा उद्योग शिकविला जातो. मग पांच सहा महिने तिची एखाद्या संभावित कुटुंबांत राहण्याची सोय केली जाते आणि त्यानंतर तिचें लग्न करून देण्याचीहि खटपट होते. गेल्या दहाबारा वर्षांत अनेक स्त्रिया या रीतीने प्रतिष्ठित जीवनांत स्थिर झाल्या आहेत.
'टॉक् एच्' या संस्थेचे संस्थापक फादर क्लेटन यांनी तर 'प्रवचनें न करतां धर्मप्रसार करावा' असा आपल्या पंथीयांना आदेश दिलेला आहे. जीजसचा धर्म प्रसृत केला पाहिजे हें त्यांना मान्य आहे. त्यासाठीच त्यांचा सर्व उद्योग आहे. पण 'मानवसेवा' हाच धर्मप्रसाराचा खरा मार्ग होय असें त्यांचे मत आहे. "मेळवूनि षोडशोपचार, प्रतिमा पूजितां साचार, स्वयें सुखावेना शंकर, जेवि चराचर पूजिलिया ॥ मुख्य पूजेचें आयतन, प्राणिमात्रा सुखदान ॥" हा श्रीएकनाथांचा उपदेश त्यांची संस्था तंतोतंत पाळीत आहे लंडनच्या 'ऑल हॉलोज चर्च' या मंदिराचे फादर क्लेटन हे उपाध्याय आहेत, पण त्यांनी स्थापिलेल्या 'टॉक् एच्' या संस्थेच्या शाखा आज वीस देशांत पसरल्या आहेत. नायगेरियामध्ये त्यांनी तेरा लाख रु. खर्च करून महारोग्यांसाठी रुग्णालय काढले आहे. दरबान येथे शंभर खाटा असलेले क्षयरोग्यांचे रुग्णालय स्थापिलें आहे. अनेक ठिकाणी त्यांनी क्रीडांगणें बांधली आहेत. उद्योगशाळा काढल्या आहेत. त्यांच्या प्रत्येक संस्थेत अनेक स्वयसेवक असे असतात की, ते गावांतल्या अनाथ, असहाय, दलित अशा लोकांना कोणतेंहि साह्य करण्यास सारखे सिद्ध असतात. अपंगांना औषध आणून देणें, खुर्चीवरून हिंडविणें, लाकडे फोडून देणें, अंधांना वाचावयास शिकविणे इत्यादि सर्व प्रकारचीं कामें ते करतात. आपल्याला परमेश्वराने या पृथ्वीवर राहावयास जागा दिली आहे, तिचे भाडें आपण भरलें पाहिजे. 'प्राणिमात्रां सुखदान' या रूपाने तें भाडे द्यावे, असा फादर क्लेटन यांचा धर्मसंदेश आहे, आणि त्यांचे हजारो अनुयायी त्या संदेशाचें मनोभावें आचरण करून समाजोद्धार करीत आहेत.
युरोप-अमेरिकेत आज शेकडो संस्था अशा तऱ्हेचे कार्य करीत आहेत आणि म्हणूनच तेथे लोकशाही काही प्रमाणांत तरी यशस्वी होत आहे. समाजांतल्या प्रत्येक व्यक्तीच्या अन्न-वस्त्र-घर-शिक्षण या प्राथमिक गरजा पुरविल्याच पाहिजेत, प्रत्येक व्यक्तीला विकासाची संधि दिलीच पाहिजे हें नव्या लोकशाहीचें ब्रीद आहे. हें कार्य एवढे प्रचंड आहे की, सरकार कितीहि समर्थ व संपन्न झाले तरी त्याच्याकडून तें कधीहि होणें शक्य नाही. त्यासाठी समाजांतील कर्त्या पुरुषांनी आपण होऊन पुढाकार घेऊन शेकडो संस्था स्थापून, समाजबल संघटित करून समाजसेवेचे व्रत घेणाऱ्या स्त्री- पुरुषांच्या सेनाच उभारल्या पाहिजेत. दण्डसत्तांकित देशांत अशा सेना असतातच; पण त्या सरकारच्या सक्तीने, दण्डभयाने काम करीत असतात. मुळीच कामें न करण्यापेक्षा ही गोष्ट शतपटीने चांगली आहे; पण ज्यांना लोकशाही साध्य करावयाची आहे त्यांना मानवी कर्तृत्वाला प्रेरणा देणाऱ्या अन्य शक्तींचा, निष्ठांचा आश्रय केला पाहिजे. राष्ट्रनिष्ठा व धर्मनिष्ठा या त्या शक्ति होत. पाश्चात्त्य राष्ट्र आज जगत आहेत, आपला उत्कर्ष साधीत आहेत, सामर्थ्यसंपन्न होत आहेत तीं या निष्ठांची आराधना करून होत आहेत हे दाखविण्यासाठी विषयाचा एवढा प्रपंच येथवर केला.
वरील विवेचनावरून हें ध्यानांत येईल की, पाश्चात्त्यांनी गेल्या तीनशे वर्षात आपल्या धर्माचे स्वरूप आमुलाग्र पालटून टाकलें आहे. आपापल्या समाजांत त्यांनी फार मोठें धर्मपरिवर्तन घडवून आणले आहे. पूर्वी धर्म हा व्यक्तिनिष्ठ शब्दप्रामाण्यवादी, विज्ञानविरोधी व बह्वंशीं परलोकनिष्ठ असा होता. अशा धर्माने इहलोक तर नाहीच पण परलोकहि साधणार नाही हे तेथील समाजनेत्यांच्या तत्त्ववेत्यांच्या ध्यानी आले आणि त्यांनी धर्मसुधारणेसाठीच धर्मसंग्राम सुरू केला. दीर्घकालच्या या संग्रामामुळे तेथील धर्मपीठांतहि हळूहळू परिवर्तन होऊ लागले आणि आज समाजाच्या उन्नतीला अवश्य असलेल्या धर्माचें प्रवर्तन स्वतः हीं धर्मपीठेच करीत आहेत असे दृश्य आपल्याला दिसूं लागलें आहे. मध्यंतरी एक काळ असा होता की, विज्ञानाच्या आश्चर्यकारक प्रगतीमुळे ईश्वरनिष्ठेची, श्रद्धेची, भक्तिभावनेची समाजाच्या प्रगतीला मुळीच गरज नाही असा एक समज सुशिक्षितांमध्ये रूढ झाला होता. पण आता आइनस्टाईन, ऑलिव्हर लॉज, सर जेम्स जीन यांसारखे मोठमोठे विज्ञानवेत्तेच ईश्वरश्रद्धा ही मानवाच्या प्रगतीला आवश्यक आहे, मानवी जीवनाचें कोडे केवळ बुद्धीने उलगडणें अशक्य आहे, भक्तीशिवाय तरणोपाय नाही असें सांगत आहेत. त्यामुळे धर्माला युरोपांत श्रेष्ठ प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. मात्र आता नवीन उदयाला आलेला धर्म, श्रद्धा, भक्ति यांचा उपदेश करीत असला तरी इहलोकाची उपेक्षा करावी, विज्ञानाला विरोध करावा हे त्याच्या स्वप्नांतहि नाही; उलट इहलोकींचें वैभव, येथली समृद्धि, संपन्नता, अर्थकामांची प्राप्ति हे धर्माचे एक प्राप्तव्यच आहे अशी प्राचीन भारतीय ऋषींप्रमाणेच युरोपातल्या धर्मज्ञांचीहि धारणा आहे; आणि त्यामुळेच आज युरोप, अमेरिकेत धर्मनिष्ठा पूर्ण जागृत झाली असून समाजाला कर्तृत्वाची, या विज्ञान-युगांतहि, प्रेरणा देण्यास ती समर्थ झाली आहे.
या स्वरूपाची धर्मक्रांति भारतांत झाली, धर्म ही आपल्या समाजांत एक जिवंत शक्ति झाली तरच भारताच्या उन्नतीला अवश्य तें कर्तृत्व येथे निर्माण होईल. भारतांत वेदकालांत व पुढे महाभारतकालांत आणि इसवीसनाच्या पहिल्या पाचसहा शतकांत धर्म असाच इहलोकनिष्ठ व प्रवृत्तिपर होता. शंकराचार्यांच्या काळापासून हे सर्व पालटलें असें वाटतें. मोक्ष व संसार, परलोक आणि ऐहिक वैभव यांची फारकत झाली आणि सर्व लोक संन्यासी झाले नाहीत तरी संसाराविषयी, स्त्रीपुत्रांविषयी, ऐहिक वैभवा-विषयी त्यांच्या मनांत उदासीनता, तुच्छता आणि घृणाहि निर्माण होऊन समाजाच्या पराक्रमाचा कणाच मोडून पडला. पुढे संतांच्या कालांतहि समाजाच्या या मनःप्रवृत्तींत फरक पडला नाही. भारतांतल्या सर्व प्रांतांतील संतांनी स्त्रीपुत्र, धनदौलत, राज्यसाम्राज्य यांची कमालीची निंदा केली आहे. त्यामुळे संसारांत राहूनच भक्तियोग साधावा, असा जरी त्यांनी उपदेश केला असला तरी हा संसार अत्यंत तुच्छ आहे, पापमय आहे, त्यांत रमणे कमीपणाचें आहे ही भावना आपल्या समाजांत कायमच राहिली, नव्हे, आणखी दृढमूल झाली. यामुळे धर्म हें केवळ एक मोक्षसाधन झालें. वैयक्तिक पुण्य असें त्याला रूप आलें. सामाजिक संघटनेची, समाजोद्धाराची एक महाशक्ति, एक प्रबल प्रेरणा असें रूप हिंदुधर्माला ब्रिटिश येथे येईपर्यंत आलेच नाही. दलितांच्या योगक्षेमाची चिंता वाहणे, अनाथ, अपंग, उपेक्षित, असहाय यांच्यासाठी संस्था स्थापून त्यांच्या जीविताची प्रतिष्ठा वाढविणें, त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाचा प्रतिकार करणें हें धर्माचें कार्य आहे असें युरोपातल्या प्रमाणे येथे, समर्थ रामदासस्वामी हा एक अपवाद सोडला तर, कोणाला वाटलेच नाही. अन्यायाचा प्रतिकार हे समाजाच्या जिवंतपणाचें पहिले लक्षण होय. युरोपातल्या क्वेकर मेथॉडिस्ट, साल्व्हेशन आर्मी या पंथांनी दलितांना या प्रतिकाराला सिद्ध करून तेथला धर्म जिवंत आणि कार्यक्षम ठेवला. दुर्दैवाने भारतांत धर्माला असें सामाजिक रूप देणारा महात्मा जन्माला आलाच नाही. त्यामुळे मोक्षसाधन हेंच धर्माचें प्रधान रूप होऊन बसले. ऐहिक व्यवहारांत धर्म राहिला तो म्हणजे केवळ कर्मकांड! स्नानसंध्या, सोवळेओवळें, भक्ष्याभक्ष्य, उपासतापास, वाऱ्या, तीर्थयात्रा, टिळेमाळा यालाच लोक त्या काळांत धर्म मानीत असत. हा अत्यंत हीन व अमंगल धर्म होय. संतांनी याची परोपरीने निर्भर्त्सना केली आहे. पण समाज त्या कर्मकांडाला आणि त्याच्याच अनुषंगाने जातिभेद, अस्पृश्यता, यांना आणि शब्दप्रामाण्याला व दैववादाला चिकटून राहिला.
युरोपांत धर्मपंथ स्थापन झाले त्याचप्रमाणे कोपर्निकस, केप्लर, गॅलिलिओ, डाल्टन, न्यूटन, रॉजर बेकन, फ्रॅन्सिस बेकन हे विज्ञानवेत्तेहि निर्माण झाले; आणि धर्मातील शब्दप्रामाण्य, अंधश्रद्धा, दैववाद, विषमता यांशी त्यांनी प्राणपणाने संग्राम केला. त्यामुळे धर्मांतील हीं जळमटें नष्ट होऊन तो शुद्ध झाला, विज्ञानपूत झाला, त्याला सामाजिक रूप आलें. एक सामाजिक शक्ति अशी प्रतिष्ठा त्याला प्राप्त झाली. भारतांत ब्रिटिश येण्यापूर्वी हिंदुधर्माला हें स्वरूप प्राप्त झालें नाही.
पाश्चात्त्यविद्येच्या प्रसारानंतर येथे धर्माच्या पुनरुज्जीवनाला व धर्मक्रांतीला खरा प्रारंभ झाला, आणि हिंदुधर्माला इहलोकनिष्ठ व सामाजिक रूप प्राप्त होऊं लागलें. या दृष्टीने ब्राह्मसमाज, प्रार्थनासमाज आणि विशेषतः आर्यसमाज यांचे कार्य फार मोठें आहे. आर्यसमाजाने अस्पृश्य, दलित यांना वेदमंत्रांचा अधिकार देऊन अवश्य ती सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त करून दिली आणि याच्याच जोडीला शिक्षणाच्या प्रसाराची मोहीम हाती घेतली. आज सर्व हिंदुस्थानांत आर्यसमाजाची अनेक महाविद्यालये आणि अनेक शाळा आहेत. औद्योगिक व तांत्रिक शिक्षणाच्याहि अनेक संस्था समाजाने स्थापन केल्या आहेत. एकंदर पाहतां धर्माच्या पुनरुज्जीवनाच्या क्षेत्रांत वर सांगितलेले युरोपीय धर्मपंथांचें जें धोरण आहे तशाच प्रकाचें धोरण आर्यसमाजाचें आहे आणि त्यामुळे पंजाबमध्ये त्याच्या उद्योगाला स्पृहणीय असें यशहि प्राप्त झालें आहे. स्वामी विवेकानंदांच्या प्रेरणेने स्थापन झालेली रामकृष्णमठ ही संस्थाहि अशाच प्रकारचें धर्मकार्य करीत आहे, पण भारताचा एकंदर व्याप पाहिला तर हे सर्व प्रयत्न 'दर्यामें खसखस' अशाच प्रमाणाचे आहेत असें वाटतें. लोकमान्य टिळकांच्या गीतारहस्याने फार मोठी मनःक्रांति घडवून आणली हें खरें आहे. धर्माचें पूर्वीचें निवृत्तिपर रूप आता जवळ जवळ नष्ट झाले आहे यांत शंका नाही; पण आज एकंदर भारतीय समाजांत धर्म ही समाजोन्नतीची, ऐहिक उत्कर्षाची प्रेरणा आहे असें दिसत नाही. पाश्चात्य देशांत चर्च हें बहुतेक सर्व खेड्यांत आणि शहरांत धर्मकार्याबरोबरच समाजकार्याचें केंद्र झालेले आहे. गांवांतील अनाथ, अपंग, दलित यांचें तें आश्रयस्थान होऊन बसलेलें आहे, आणि भोवतालच्या समाजांतील लोकांचा योगक्षेम वाहणारी संस्था असे रूप तिला देण्याचे फार जोराचे प्रयत्न तेथे चालू आहेत. भारतांतील धर्मवेत्त्यांनी, धर्माभिमान्यांनी आणि धर्मप्रवर्तकांनी आपल्या धर्मसंस्थांना हें रूप प्राप्त करून दिले तरच आपला धर्म समाजोद्धाराच्या दृष्टीने एक प्रभावी अशी शक्ति ठरेल.
या दृष्टीने पाहतां आजची स्थिति फार निराशाजनक आहे. हिंदुधर्माचें मुख्य पीठ म्हणजे श्रीशंकराचार्यांचे. आपल्याकडे ख्रिस्ती धर्माच्या चर्चसारखी धर्म ही एक संघटित संस्था नाही. तरी पण मुख्य पीठाचा मान संकेताने तरी श्रीशंकराचार्यांना मिळतो. पण वरील पुनरुज्जीवनाच्या दृष्टीने पाहिलें तर आजचे त्या पीठावरचे अधिकारी पुरुष शून्यवत् आहेत. धर्मक्रांति करावी, समाजांतील विषमता नष्ट करावी, दीनदलितांचा कैवार घेऊन उठावें, त्यासाठी संस्था स्थापन कराव्या हें धोरण पीठस्थ अधिकाऱ्यांचें केव्हाच नव्हतें आणि नाही. मागल्या काळांत विद्यारण्यस्वामींनी ऐहिकोन्मुख होऊन स्वराज्य, स्वातंत्र्य, साम्राज्य हे धर्माचेंच कार्य आहे अशी दृष्टि ठेवून प्रयत्नाला प्रारंभ करताच भारताच्या इतिहासालाच कलाटणी मिळाली हें सर्वश्रुत आहे. पण आज ही दृष्टि पीठाची नाही. पीठस्थ अधिकारी चातुर्मास्यामध्ये स्त्री-पुत्र-धन-दौलत हें सर्व क्षणभंगुर आहे हेंच तत्त्वज्ञान सांगत असतात. मात्र गेलीं तीस चाळीस वर्षे या क्षणभंगुर धनदौलतीसाठी पीठस्थ शंकराचार्यांचे प्रीव्ही कौन्सिलपर्यंत व सुप्रीम कोर्टापर्यंत दावे चाललेले आहेतच. पीठाच्या योगक्षेमासाठी धनदौलतीची फार आवश्यकता आहे एवढे त्यांना मान्य झालेलें दिसतें. तशीच आवश्यकता दीनदलितांच्या योगक्षेमासाठी आहे हें त्यांना पटलें तर धर्मक्रांति फार दूर नाही. आज नव्या युगांत समाजांत पीठाबद्दल जुन्या काळाप्रमाणे आदर नाही हें खरें आहे. पण आजच्या श्रीशंकराचार्यांनी पाश्चात्य धर्मसंस्थांप्रमाणे दीन- दलितांच्या उद्धराचें कार्य हातीं घेतलें आणि लोकांपुढे शब्द टाकला तर फादर अल्बिनो, टालव्हास यांच्या शतपटीने यांना कार्य करतां येईल आणि तसें झालें तरच भारतीय लोकसत्ताहि टिकूं शकेल. व्यक्तीची प्रतिष्ठा हा लोकशाहीचा पाया आहे. अस्पृश्य, आदिवासी, पतित, असहाय, अनाथ, यांच्या वस्तीत श्री संचार करू लागले आणि पीठाची सर्व पुण्याई खर्च करून त्यांनी समाजांतील श्रेष्ठींना आवाहन केलें तर ह्या सर्व जनांच्या जीविताला निश्चित प्रतिष्ठा प्राप्त होईल, पण पीठस्थ अधिकारी इकडे वळतील अशी मुळीच आशा नाही.
वारकरी पंथ हा महाराष्ट्रांतला फार मोठा पंथ आहे. रंजले गांजले यांचा उद्धार करण्याची जबाबदारी त्याच्यावर फार मोठी आहे. प्रारंभी जीं संतवचनें दिली आहेत तीं सर्व या पंथांतल्या सर्वश्रेष्ठ पुरुषांचीच आहेत. पण त्या वचनांचा जो सामाजिक अर्थ आहे त्याची गंधवार्ताहि जुन्या आणि नव्या वारकऱ्यांना नाही. अस्पृश्योद्धार हे एकच कार्य वारकऱ्यांनी हातीं घेतलें असतें तर हजारो अस्पृश्य जें धर्मांतर करीत आहेत ते त्यांनी केलें नसतें. वारकरी बह्वंशीं खेड्यापाड्यांतच असतात, आणि खेड्यापाड्यांत अजूनहि अस्पृश्यतेचा फार मोठा जोर आहे. तिचे उच्चाटन झालें नाही तर राहिलेला अस्पृश्य समाजहि असाच धर्मांतर करील हें उघड दिसत आहे. पण वारकरी पंथाला, त्यांतील धुरीणांना याची चिंता नाही. मग आदिवासी, पतित, बेवारशी, अनाथ, वेश्या या वर्गांत शिरून त्यांच्यांत राहून, त्यांच्या सुखदुःखाशी समरस होऊन, त्यांच्या योगक्षेमाची चिंता वाहून त्यांना प्रतिष्ठित जीवनांत स्थिर करण्याच्या कार्याला वारकरी पंथाचे धुरीण वाहून घेतील ही आशा स्वप्नांतहि करतां येत नाही. इतर जुन्या धर्मसंस्थांची व पंथांची हीच कथा आहे, आणि तीच कथा गेल्या पांचपन्नास वर्षांत निर्माण झालेल्या महाराजांच्या संस्थांची आहे. त्या सत्यनारायण करतात, भंडारे करतात, त्यांचे दर्शनांचे कार्यक्रम होतात. पण समाजांतली भोळसट, बावळी, अंध धर्मश्रद्धा नष्ट करावी, धर्माला विज्ञानवादी, बुद्धिवादी बनवावें, आपली धर्मतत्त्वे कमाल मर्यादेपर्यंत विज्ञानपूत करून त्यांचा उपदेश करावा, प्रसार करावा असें धोरण त्यांनी मुळीच अवलंबिलेले नाही. या विचारांचा महाराजांना किंवा त्यांच्या अनुयायांना स्पर्शहि झालेला नसतो. साईमहाराज गेल्यानंतर दहा वर्षेपर्यंत एका सामान्य चतुर गृहस्थाने त्यांचें दर्शन घडवितों असें सांगून हजारो सुशिक्षित अनुयायांना हातोहात फसविलें, त्यांच्याकडून अमाप पैसा उकळला, ही वार्ता नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. हे श्रम व हा पैसा जे का रंजले गांजले त्यांच्यासाठी संस्था उभारण्यांत खर्ची पडला असता तर! पण धर्म हें सामाजिक पुण्य आहे ही दृष्टिच आपल्याला नाही. आपली सर्व धडपड वैयक्तिक पुण्यासाठी आहे.
यानंतर आजच्या हिंदुत्ववादी संस्थांचा विचार हिंदुमहासभा, जनसंघ, वर्णाश्रमस्वराज्य संघ, अशा अनेक संस्था हिंदुधर्म रक्षणाचे ब्रीद मिरवीत आहेत. पण त्या सर्व आज सत्तास्पर्धेच्या राजकारणात उतरल्या आहेत. नगरपालिका, लोकल बोर्डे, विधानसभा या ठिकाणच्या निवडणुका लढविणें यावरच आज या संस्थांची शक्ति खर्च होत आहे. पाश्चात्य मिशनऱ्यांची पाताळयंत्री कारस्थानें या संस्थांनी ओळखली आहेत. त्यावर टीका करून त्यांच्या धर्मप्रसाराला बंदी घालावी अशा मागण्याहि विधानसभेत हे लोक करतात. पण पाश्चात्त्य मिशनरी आज तीनशे वर्षे दीन, बहिष्कृत, असहाय, अनाथ यांच्या उद्धाराचें जें कार्य करीत आहेत तें आपण करावें, अशी वृत्ति या संस्थांची नाही. वास्तविक श्रेष्ठ अर्थाने हेंच खरें राजकारण आहे. कारण वर सांगितल्याप्रमाणे व्यक्तीची प्रतिष्ठा हाच खरा लोकशाहीचा म्हणजेच श्रेष्ठ राजकारणाचा पाया आहे. भारतामध्ये अस्पृश्य, आदिवासी, बहिष्कृत, पतित, दीन, दरिद्री यांचीच संख्या दहाबारा कोटींपर्यंत भरेल. या समाजांतून तत्त्ववेत्ते, इतिहासकार, मुत्सद्दी, राजकारणी, धर्मज्ञ, साहित्यिक, डॉक्टर, वकील, इंजिनियर, संशोधक, शिक्षक, कलाकार, व्यापारी, कारखानदार असे कर्ते पुरुष निर्माण होतील तेव्हाच लोकशाहीची ही प्रचंड जबाबदारी पेलण्याचे सामर्थ्य भारतीय समाजाला प्राप्त होईल. पण या समाजांतील लोकांना जीवनांत प्रतिष्ठा लाभल्यावांचून त्यांच्यांतून असे पुरुष कधीच निर्माण होणार नाहीत. ती प्रतिष्ठा प्राप्त करून देणें हें धर्माचं कार्य आहे, आणि म्हणूनच हिंदुमहासभा, जनसंघ या संस्थांचें तें कार्य आहे. पाश्चात्त्य मिशनरी आफ्रिकेच्या, ब्राझीलच्या, मंगोलियाच्या जंगलांत जातात, हिमालयांत येतात, सातपुड्यांत फिरतात, आणि तेथे मठस्थापना करून भोवतालच्या समाजांत हें कार्य करतात. पण अशा मठांची स्थापना या हिंदुत्ववादी संस्था भारतांतल्या जंगलां -पहाडांत तर राहोच, पण खेड्यांतहि करीत नाहीत. तें त्यांचे उद्दिष्टच नाही. काँग्रेस परधार्जिणी आहे एवढी टीका फक्त त्या करतात. मिशनऱ्यांपासून धोका कसा आहे तें समाजाला त्या सांगतात. पण हा रोग निवारण्याचा जो मूलगामी उपाय- म्हणजे मिशनऱ्यांचेच कार्य आपण करणें- त्याचा अवलंब मात्र त्या करीत नाहीत. कारण त्यांना म्युनिसिपालिटींत निवडून यांवयाचें आहे.
अशी ही वर सांगितल्याप्रमाणे निराशाजनक स्थिति आहे. व्यक्तीचा उद्धार करणारी, तिच्या सुप्त गुणांचा विकास करण्याची संधि देणारी संस्था हे स्वरूप अजूनहि हिंदुधर्माला येत नाही. पूर्वी हा धर्म फक्त वैयक्तिक पुण्याची, मोक्षाची जोड करून देत असे. आता त्याच्या नांवाने स्थापन झालेल्या संस्था सत्ताप्राप्तीचें राजकारण खेळत आहेत. गेल्या हजार दीड हजार वर्षांचा हिंदुधर्माचा इतिहास पाहिला तरी मनावर निराशाच येते. पतित, दीन, बहिष्कृत, अनाथ यांना आश्रय द्यावा, त्यांना अन्यायाचा प्रतिकार करण्यास शिकवावें, संघटित करावें, त्यांच्या योगक्षेमाची चिंता वाहावी आणि अशा रीतीने या थोर धर्माचा पाया भक्कम करावा असें येथील धर्मधुरीणांचें धोरण कधीच नव्हतें. त्यांना दूर लोटणें, त्यांचा वाराहि न लागू देणें, त्यांची सावलीहि न घेणें, त्यांचा शब्दहि कानीं न पडूं देणें यांतच धर्माचरण आहे असें त्यांना वाटत असे. ज्ञानेश्वरादि संतांनी हें धोरण बदलण्याचे प्रयत्न केले. परमार्थात त्यांना कांही यशहि आले. सामाजिक व्यवहारांत त्याचा थोडा परिणामहि झाला. पण त्यांच्या वचनांचा जो भरीव सामाजिक अर्थ तो कोणींहि जाणला नाही. मग पाश्चात्त्य मेथॉडिस्ट, क्वेकर इत्यादि पंथीयांप्रमाणे तो प्रत्यक्ष आचरणांत आणणे दूरच राहिलें. त्यामुळे ज्ञानेश्वरांच्या काळी आपल्या समाजांतील शूद्र, अस्पृश्य, भिल्ल, कोळी, कातकरी इत्यादि जमातींची जी स्थिति होती तिच्यांत पुढल्या सहाशे वर्षांत कसलाच फरक पडला नाही. या समाजांतून वर सांगितल्या प्रकारचे कर्तृत्वशाली पुरुष किती निर्माण झाले याचा हिशेब घ्यावा म्हणजे हिंदुधर्माने यांच्यासाठी काय केलें तें सहज कळून येईल. त्या मागल्या काळांतच वरिष्ठ वर्णीयांनी केलेल्या अन्यायाचा प्रतिकार करण्यास, शांततेने प्रतिकार करण्यास क्वेकर पंथाप्रमाणे हिंदुधर्मधुरीणांनी त्यांना शिकविलें असतें, तर आज या जमाती समाजाला आधारभूत झाल्या असत्या आणि हिंदु समाज कर्तृत्वसंपन्न झाला असता; पण ही दृष्टिच येथे नव्हती. असली धर्मक्रान्ति येथे कधी झालीच नाही, आणि दुर्देव असें की आज ही दृष्टि प्राप्त झाली असूनहि तसली धर्मक्रान्ति येथे घडून येत नाही. हें कार्य झेपण्याइतकी धर्मनिष्ठा भारतीयांत नाही असा याचा स्पष्ट अर्थ आहे.
भारतीय जनतेंत धर्मश्रद्धाच नाही, ती लुप्त झाली आहे असा मात्र याचा अर्थ नाही. धर्मश्रद्धा ही कोणत्याहि समाजांतून कधीहि लुप्त होणें शक्य नाही असें माझें निश्चित मत आहे. हिंदु समाज त्याला अपवाद नाही. काशी, रामेश्वर, अयोध्या, द्वारका, पंढरपूर येथे जाणाऱ्या भाविकांची संख्या पाहिली, कुंभमेळ्यासारख्या पर्वणीला सहज तीस-चाळीस लाख यात्रा जमते हें लक्षांत घेतलें, साईमहाराज, नारायणमहाराज, उपासनी, मेहेरबाबा यांचे भक्त कोणत्या वर्गातून येतात हें ध्यानीं घेतलें म्हणजे विसाव्या शतका- विषयीच्या, बुद्धिवादी युगाविषयीच्या, भौतिकवादाच्या प्राबल्याविषयीच्या आपल्या भ्रांतिष्ट कल्पना तत्काळ नष्ट होतील. आपण हें ध्यानांत घेतलें पाहिजे की, विज्ञानाची, मानवी सामर्थ्याची कितीहि प्रगति झाली तरी मानवाचें दुःख शतांशानेहि नष्ट करणें त्याला शक्य होणार नाही. परमेश्वराचें मूळ रूप कसे आहे, तो निर्गुण आहे कीं सगुण आहे, तो अवतार घेतो की नाही, बुद्धीला त्याचे आकलन होईल की नाही हें सांगणें फार कठीण आहे. तें कोडें मानवी बुद्धीला उलगडणार नाही असें तत्त्ववेत्तेच सांगतात. पण असे असले तरी परमेश्वर हा मानवाचा फार मोठा आधार आहे यांत मात्र शंका नाही. हें जग अत्यंत दुःखमय आहे. मनुष्यावर, त्याच्या आप्तजनांवर, त्याच्या संसारावर, पदोपदी अनंत आपत्ति येत असतात. संकटांनी तो अत्यंत जर्जर झालेला असतो. रोगराई, दारिद्र्य, अन्नान्नदशा व मृत्यु या दुःखांनी तो सतत गांजलेला असतो, आणि मानवी भौतिक उपायांनी या आपत्तींना तोंड देणें शक्य नाही हें प्रतिक्षणीं त्याला दिसत असतें. अशा वेळी कोणती तरी दैवी शक्ति- अत्यंत वत्सल, दयाळू, न्यायी व सर्वसमर्थं अशी शक्ति- आपल्याला आश्रय म्हणून असावी अशी मनुष्याची तीव्र, अतिउत्कट इच्छा असते, आणि परमेश्वर अशी शक्ति आहे असें जगांतले सर्वश्रेष्ठ तत्ववेत्ते व धर्मवेत्ते सांगत असल्यामुळे त्याच्यावर मनुष्य साहजिकच श्रद्धा ठेवतो. दुसरेंहि एक कारण आहे. जगांतील दुःखांतून मुक्तता ही जशी मानवाची आर्ती आहे त्याचप्रमाणे मृत्यूनंतरच्या जीवनाची, अमरतेचीहि मानवाला आस आहे. भौतिक देह हा नाशवंत आहे, तो अमर होऊं शकत नाही हें तो जाणतो, पण याच देहांतील आत्मा अमर आहे ही कल्पना, ही श्रद्धा त्याला फार मोठें समाधान प्राप्त करून देते. देहनाश म्हणजे सर्वनाश, मरण म्हणजे पूर्णं विलय, अगदी शून्याकार असें जर मनुष्याला वाटलें तर त्याचें जीवित वैराण होईल, त्याचें वाळवंट होईल. हें जीवित अर्पून, प्राणहि टाकून कांही मिळवावें असें त्याला कधीहि वाटणार नाही. कारण प्राण टाकल्यावर मिळवावयाचें कोणी आणि कोणासाठी ? पुढच्या जन्मीं मींच मिळवावयाचें आणि तें माझ्या आत्म्यासाठी मिळवावयाचें ही श्रद्धा मानवाला ध्येयवादी बनविते. वाटेल त्या त्यागाला, तपश्चर्येला त्याला उद्युक्त करते. ती मानवी जीवनांतून लुप्त झाली तर मानव तपहीन, ध्येयहीन होईल आणि त्यामुळेच तो दुबळा होईल. तेव्हा परमेश्वर माता आहे, संकटहर्ता आहे ही श्रद्धा जशी मानवाच्या मनःस्वास्थ्यासाठी अवश्य आहे तशीच अमरतेची, अनंतत्वाची त्याची आकांक्षा तृप्त करण्यासाठीहि ती अवश्य आहे. ही श्रद्धा हीच धर्मबुद्धि होय.
पण ही श्रद्धा मूळच्या अंधस्थितीत राहू दिली तर, मानवाच्या इतर अनेक सहजप्रवृत्ति मूळच्या असंस्कृत अवस्थेत राहू दिल्या तर जशा अनर्थास कारण होतात, तशीच हीहि होते. अंधश्रद्धेमुळे आतापर्यंत किती व कसे अनर्थ उद्भवले हें स्पष्ट करून सांगण्याची गरज नाही, ते सर्व विश्रुत आहेत. म्हणून ही श्रद्धा शक्य तितकी विज्ञानपूत करून घेणें अवश्य असतें. परमेश्वर किंवा सृष्टीचें मूळ कारण हें सर्वस्वी बुद्धीच्या किंवा विज्ञानाच्या कक्षेत येणें कधीहि शक्य नाही. आज कोणाच्या स्वप्नांतहि ही आशा नाही; पण विवेकाच्या, विज्ञानाच्या अग्नींत घालून ती शक्ति जास्तीत जास्त शुद्ध करून घेणें, तिला अत्यंत उदात्त रूप देणें हें मात्र शक्य व अत्यंत अवश्य आहे. पाश्चात्य राष्ट्रांनी गेल्या तीन चारशे वर्षांत हें केलें आहे. त्यांनी धर्मक्रान्ति केली ती हीच होय, आणि अशा रीतीने जास्तीत जास्त विज्ञानपूत करून घेतलेली श्रद्धा ही मानवाला केवढी ध्येयशक्ति प्राप्त करून देते तें आपण वर पाहिलेच आहे. परमेश्वर आहे की नाही हा प्रश्न येथे सर्वस्वी अप्रस्तुत आहे. ग्रीक इतिहासाचें विवेचन करतांना फिशर या पण्डिताने म्हटले आहे की, मानवाला प्रेरणा मिळते ती मूळ वास्तवापासून किंवा सत्यापासून मिळत नसते, तर त्या वास्तवाविषयी त्याची जी कल्पना असते तिच्यापासून मिळते. भोवतालच्या इतर रानटी जमातींहून आपण वंशतः श्रेष्ठ आहों अशी ग्रीकांची श्रद्धा होती. वास्तविक हें सत्य नव्हते, पण त्यांची तशी श्रद्धा इतकी जबरदस्त होती की, तीच त्यांच्या उत्कर्षाला, अलौकिक वैभवाला कारणीभूत झाली. धर्मश्रद्धेचें असेंच आहे. ती श्रद्धाच मानवाच्या उत्कर्षाला, वैभवाला आजपर्यंत कारणीभूत झालेली आहे. मात्र समाजधारणेसाठी अवश्य असलेल्या या महाशक्तीचा विनियोग समाजधुरीण कसा करतात यावर सर्व अवलंबून आहे.
वर सांगितलेच आहे की, भारताची लोकसत्ता यशस्वी व्हावयाची असेल तर अशा तऱ्हेची धर्मक्रान्ति येथे होणें अवश्य आहे. गेलीं हजार दीड हजार वर्षे तरी आपला धर्म वैयक्तिक व मोक्षवादी असल्यामुळे आपल्या समाजाचा अध:पात झाला आहे. पाश्चात्त्य देशांतील धर्माचें जें नवें स्वरूप आहे त्यांत संघटना आहे, बुद्धिवाद आहे, ज्ञाननिष्ठा आहे आणि प्रयत्नवाद आहे. समाजधारणेला अत्यंत अवश्य असलेल्या या गुणांचा आपल्या समाजांतून मधल्या काळांत अगदी लोप झाला होता. मोक्ष, परलोक हेंच साध्य असल्यामुळे संघटित जीवनाची लोकांना आवश्यकता कधी भासलीच नाही. कारण हजार पांचशे लोक एकत्र येऊन संघटित बल निर्माण करून मोक्ष मिळवावयाचा नसतो. त्यासाठी अवश्य तें धर्माचरण एकट्यानेच करावयाचें असतें, आणि भजन, कीर्तन, मनन-चिंतन हेंच प्रामुख्याने त्या धर्माचरणाचें स्वरूप असल्यामुळे ऐहिक जीवनाला अवश्य तो प्रयत्नवाद त्यांतून जोपासला जात नाही. आपला शेतकरी, कारागीर आणि वारकरी हा आज शेकडो वर्षे दैववादी झाला आहे. त्यामुळे नवें संशोधन करावें, निसर्गावर मात करावी, शेतीच्या, विणकामाच्या, सुतारकामाच्या, लोहारकामाच्या नव्या पद्धति शोधून काढाव्या ही ईर्षाच त्याच्या ठायीं कधी निर्माण झाली नाही, आणि ही ईर्षा नसल्यामुळे दिवसांतून बारा, चौदा, सोळा तास काम करावें ही ऐपतच भारतीयांच्या अंगी कधी आली नाही. आज गरज आहे ती अशा अविश्रांत कष्टाची आहे. जर्मनी, जपान हीं राष्ट्रे महायुद्धानंतर अगदी रसातळाला गेलीं होतीं, पण आठ दहा वर्षांच्या अवधींतच त्यांनी पूर्वीच्या दसपट समृद्धि निर्माण केली आहे. अखंड, अहोरात्र, अविरत कष्ट हेंच त्यांच्या उन्नतीचें रहस्य आहे, याविषयी जगांत दुमत नाही. असे कष्ट भारतीयांच्या रक्तांतच नाहीत. वैयक्तिक, परलोकनिष्ठ, मोक्षवादी धर्मामुळे आपले रक्तच पांगुळले आहे. शेतकऱ्याला दुप्पट जमीन दिली तर कष्ट निम्मे करून तो पहिल्या पातळीवरच राहतो, आणि दिल्लीचा सरकारी अधिकारी वरची श्रेणी मिळतांच ऑफिसांत निम्मा वेळच येतो. दुप्पट ज़मीन, दुप्पट पगार हे येथे दुप्पट श्रमाला प्रेरणा देत नाहीत, तर आळस, निरुद्योग, हीन विलास हे त्यांतून निर्माण होतात. आपले शब्दप्रामाण्य, आपला दैववाद व आपली मोक्षदृष्टि हीं या अनर्थाच्या बुडाशीं आहेत.
आपली धर्मदृष्टि आमूलाग्र बदलल्यावांचून शेकडो वर्षे आपल्या हाडींमांसीं खिळलेले हे दोष नाहीसे होणार नाहीत, आणि ते नाहीसे झाल्यावांचून लोकशाहीला अवश्य तें कर्तृत्व येथे निर्माण होणार नाही. आपण लोकशाहीचे पुरस्कर्ते आहोत, त्यामुळे तर या धर्मक्रान्तीची येथे फारच आवश्यकता आहे. दण्डसत्तांकित देशांची गोष्ट थोडी निराळी आहे. दण्डसत्ता म्हणतांच प्रामुख्याने आज रशिया व चीन हीं राष्ट्र डोळ्यांसमोर येतात. तेथे धर्म ही अफूची गोळी मानली जाते, धर्म हा समाजाचा शत्रु मानला जातो. पण या राष्ट्रांच्या बाबतींत कांही ऐतिहासिक निर्णय करतांना फार जपून विचार केला पाहिजे. धर्मनिष्ठेप्रमाणेच राष्ट्रनिष्ठाहि मार्क्सवादाला निषिद्ध वाटत असे; आणि पहिल्या उत्साहाच्या भरांत रशियांतील धुरीणांनी राष्ट्रनिष्ठेचाहि नायनाट करण्याचा प्रयत्न केला होता. आपापल्या देशांतील सरकारांचा पराभव घडवून आणणें हें कामगारांचे पहिले कर्तव्य होय असें लेनिन म्हणत असे. कामगार मातृभूमि जाणीत नाहीत, असें मार्क्स म्हणाला होता. मार्क्सवादांतील अनेक भ्रम पुढे नाहीसे झाले तसाच हा भ्रमहि नष्ट होऊन आज रशिया व चीन हे दोन्ही देश कट्टर राष्ट्रवादी झाले आहेत. हिंदुस्थानसारख्या इतर देशांतल्या कम्युनिस्टांना स्वदेशद्रोही बनविण्यापुरतीच आंतरराष्ट्रीयता त्यांनी शिल्लक ठेवली आहे. धर्माच्या बाबतींत अजून इतकें परिवर्तन झालेलें नाही हें खरें; पण धर्माचरणाला व धर्मप्रसाराला प्रारंभी जितका कम्युनिस्ट नेत्यांचा विरोध होता तितका आता राहिलेला नाही. त्या प्रारंभीच्या काळांतहि रशियन जनतेची धर्मनिष्ठा अणुमात्र कमी झालेली नव्हती. सिडने वेबने म्हटले आहे की, रशियनांना लेनिन, स्टॅलिन हे पूज्य वाटत; पण मध्ये ख्राइस्ट, एका बाजूला लेनिन व दुसऱ्या बाजूला स्टॅलिन अशी चित्रे लावून ते तिघांची पूजा करीत असत. आता तर घटनेनेच प्रत्येकाला पूर्ण धर्मस्वातंत्र्य दिलेलें आहे. त्या अन्वयें ख्रिस्ती, मुसलमान, ज्यू, बौद्ध सर्वांचे धर्मसंस्कार त्यांच्या त्यांच्या धर्मग्रंथाप्रमाणे होतात, त्यांच्या उपासना त्यांच्या धर्ममंदिरांत चालतात आणि पूर्ण धर्मनिष्ठ, ईश्वरनिष्ठ नागरिकांना आता इतरांप्रमाणेच मताधिकार आहे.
पण महत्त्वाची गोष्ट अशी की, युद्धासारखी आपत्ति आली की, कम्युनिस्ट लोक राष्ट्राच्या याच प्रेरक शक्तीला आवाहन करतात. हिटलरचें आक्रमण येणार असें १९३४-३५ साली दिसूं लागतांच मार्क्सवादाच्या शिळोप्याच्या गप्पा संपल्या व रशियाने राष्ट्रनिष्ठेची जोपासना करण्यास प्रारंभ केला आणि प्रत्यक्ष युद्ध सुरू होतांच कम्युनिस्ट नेत्यांनी जनतेच्या धर्मभावनेला आवाहन करण्यास सुरुवात केली. सर्व जुनीं मंदिरें खुली करण्यांत आली. सहस्रसंख्येने लोक प्रार्थनेला जमूं लागले. मंदिरांत पूजासाहित्य सरकार पुरवू लागलें. पूर्वीच्या काळी धर्मनिष्ठेमुळेच रशियाला मोठमोठे जय मिळाले असें कम्युनिस्ट नेतेहि लिहूं बोलूं लागले. धर्म ही अफूची गोळी कोणी म्हणेल तर त्यालाच आता गोळी बसेल असा मनु पालटला. नोव्हेंबर १९४२ मध्ये सेरेजी व सुलेव्ह या धर्मगुरूंचे स्टॅलिनने जाहीरपणें आशीर्वाद घेतले आणि तें वृत्त प्रवदा पत्रांत छापण्यांत आलें. निरीश्वरवाद, नास्तिक्य हें कम्युनिस्ट पक्षाचें (मार्क्स प्रणीत) प्रिय तत्त्व; पण त्याच्या प्रचारास बंदी घालण्यांत आली. धर्म ही प्रतिगामी शक्ति नसून रशियाने ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यापासून त्याची सारखी प्रगतिच होत आहे असें रशियन सरकारी इतिहासकार आता सांगू लागले. (मॉरिस हिंडस : मदर रशिया) याचा अर्थ असा की, धर्मनिष्ठा ही फार मोठी प्रेरणा आहे, तिच्यावांचून महान् कार्ये मानवाला पार पाडता येणार नाहीत हे सोव्हिएट नेत्यांनी कृतीने तरी मान्य केलें आहे: आज रशिया व त्याचे अंकित देश येथे प्रवास करून येणारे निरीक्षक तर एकमुखाने सांगतात की, तेथील नेत्यांचा तत्त्वतः धर्माला कितीहि विरोध असला तरी जनतेमध्ये धर्मभावना वाढीलाच लागलेली दिसते. धर्मनिष्ठेचा संपूर्ण नाश झाला पाहिजे असें तत्त्वज्ञान मात्र कम्युनिस्ट नेते तोंडाने सांगत असतात. त्यासाठी कोणत्या उपायांचा अवलंब करावा याची चर्चा करण्यासाठी गेल्या चाळीस वर्षांत २५-३० तरी परिषदा झाल्या असतील, पण अजून याविषयी धोरण निश्चित झालेलें नाही. कारण कोणताच उपाय यशस्वी होत नाही, आणि तो होणारहि नाही. कारण जरा आपत्प्रसंग आला की, कम्युनिस्ट नेते धर्मनिष्ठेची स्वतःच जोपासना करतात.
भारताला पुढच्या कांही वर्षांत महाकार्यं साधावयाचें आहे. अतिमहाकार्य, अगदी दुष्कर, अघटित असें कार्य साधावयाचें आहे. स्वातंत्र्यप्राप्ति हे कार्य कांहीच नव्हे इतकें तें ध्येय दुःसाध्य आहे. आपल्याला लोकशाही सिद्ध करावयाची आहे. हें कार्य किती दुर्घट आहे हें आवतीभोवती दृष्टि टाकली तर सहज कळून येईल. गेल्या पंचवीस वर्षांत आशिया खंडांत ज्या लोकसत्ता प्रस्थापित झाल्या त्या आपल्या डोळ्यांदेखत कोलमडून पडत आहेत. ब्रह्मदेश, ईजिप्त, इराक, इंडोनेशिया, पाकिस्तान, तुर्कस्थान येथल्या लोकसत्ता पत्यांचे बंगले कोसळावे तशा कोसळत आहेत. पण येवढ्यानेच हें भागत नाही. ज्या युरोपपासून आपण लोकसत्तेची तत्त्वें घेतली तेथेहि असाच प्रलयकंप चालू आहे. जर्मनी, इटली, पोलंड, झेकोस्लोव्हाकिया येथल्या लोकसत्ता हिटलर-मुसोलिनींनी उधळून दिल्या. आता त्यांच्यावर सोव्हिएट रशियाची काळी छाया पसरली आहे. त्यांतून कोणी थोडा सावरत आहे तो लोकशाही, स्वातंत्र्य, समता, बंधुता यांचें आदिपीठ, यांचें माहेरघर जें फ्रान्स तेथेच लोकशाहीला ग्रहण लागलें आहे. अजून तें खंडग्रास आहे. पण केव्हा खग्रास होईल त्याचा नेम नाही. असा कल्पान्त सर्वत्र दिसत असतांना आपण आपली लोकसत्ता यशस्वी करणारच अशी प्रतिज्ञा केली आहे. लास्कीने आपल्या 'रिफ्लेक्शन्स' या ग्रंथांत इंग्लंडच्या भवितव्याविषयी विवेचन करतांना म्हटले आहे की, "मोठी कार्ये साधण्यासाठी धर्मनिष्ठेसारखी निष्ठाच अवश्य आहे, आणि ती तर आपणांजवळ सध्या नाही." भारताला आज बेकारी नष्ट करावयाची आहे, समृद्धि निर्माण करावयाची आहे, औद्योगिक प्रगति साधावयाची आहे, ४० कोटी लोकांना साक्षर करावयाचें आहे; आळशी, मंद, अंध, अशा लोकांना १२, १४, १६ तास काम करावयास शिकवावयाचें आहे, सहकारी संस्थांचें जाळे विणावयाचें आहे, योजना यशस्वी करावयाच्या आहेत, नद्या अडवावयाच्या आहेत, वाळवंटे भिजवावयाची आहेत, डोंगर फोडावयाचे आहेत, पर्वत उचलावयाचे आहेत, आणि हे सर्व व्यक्तिस्वातंत्र्य न हिरावतां, गोळी न घालता, कॉन्सेन्ट्रेशन कँप न उघडतां साधावयाचें आहे. प्राध्यापक लास्कीप्रमाणेच आपणहि ध्यानीं घेतलें पाहिजे की, "मोठी कार्ये साधण्यासाठी धर्मनिष्ठाच अवश्य आहे "; आणि लोकशाहीला पोषक अशी धर्मनिष्ठा येथे निर्माण व्हावयाची तर वर वणिलेल्या युरोपातल्या धर्मक्रान्तीसारखीच धर्मक्रान्ति भारतांत झाली पाहिजे. धर्माने केवळ मोक्षच मिळतो असें नाही तर श्रेष्ठ, धर्माला अविरोधी असे जे अर्थकाम तेहि प्राप्त होतात हें भारतीयांनी जाणणें हीच ती धर्मक्रान्ति होय.
पण अशी धर्मक्रान्ति येथे कशी घडविणार हा मोठाच प्रश्न आहे. खरे म्हणजे वारकरी संप्रदाय, रामदासी संप्रदाय, शंकराचार्यांचीं पीठे, इतर अनेक संतमहंतांची पीठे, जुन्या देवस्थानांचे, मठांचे अधिकारी यांचें हे काम आहे. गेल्या पन्नास वर्षांत या संस्थांमध्ये नवीन पदवीधर, पाश्चात्त्य विद्या-विभूषित, सुशिक्षित अशा अनेक लोकांचा प्रवेश झाला आहे. त्यांतील कित्येक तेथे मोठ्या अधिकारपदांवर आहेत. पण धर्म हे सामाजिक पुण्य आहे, केवळ मोक्षकार्य नाही, अनाथ, अपंग, बहिष्कृत, पतित, रंजले गांजले यांच्या योगक्षेमासाठी, त्यांच्या ऐहिक उत्कर्षासाठी, त्यांच्यावर होणारे अन्याय दूर करण्यासाठी, आपण संस्था उभारल्या पाहिजेत, त्यांना संघटित केलें पाहिजे, आणि या सेवेंतून श्रीभगवद्गीतेचा, ज्ञानेश्वरांचा, तुकाराम- महाराजांचा संदेश त्यांच्या मनावर ठसविला पाहिजे, अशा तऱ्हेची जाणीव सुद्धा या लोकांना नाही. मग तसे प्रयत्न त्यांच्या हातून होणें लांबच राहिलें. हिंदुमहासभा, जनसंघ, वर्णाश्रमस्वराज्य संघ यांची कहाणी वर सांगितलीच आहे. या तर सर्व अर्वाचीन संस्था आहेत. राष्ट्रसेवेसाठी, ऐहिक उत्कर्षासाठी, अभ्युदयासाठीच त्या निर्माण झाल्या आहेत. माझें तर असें मत आहे की, निवडणुकीचें, सत्तेचें राजकारण पूर्णपणे सोडून देऊन त्यांनी गेल्या तीनशे वर्षांत मेथॉडिस्ट, क्वेकर, साल्व्हेशन आर्मी, इ. ख्रिस्ती धर्म पंथांनी युरोपांत जशी धर्म क्रान्ति घडवून आणली तशी येथे घडवून आणण्याच्या कार्याला वाहून घेतले पाहिजे. समर्थांच्या कार्याचें विवेचन करतांना प्रा. माटे यांनी म्हटले आहे की, रूढ अर्थाने समर्थांनी राजकारण केलें नसेल. पण सर्व राजकारणाचा पाया जो प्रवृत्तिधर्म त्याचा उपदेश त्यांनी केला, जनमनांत त्या दृष्टीने क्रान्ति केली, हेंच त्यांचें खरें राजकारण होय. या दृष्टीने हिंदुत्ववादी संस्थांनी भारतांत जर इष्ट ती धर्मक्रान्ति घडवून आणली तर तें खरें श्रेष्ठ राजकारण होईल.
भारत हें निधर्मी राष्ट्र आहे. याचा अर्थ इतकाच की, येथले शासन निधर्मी आहे, म्हणजे तें कोणत्याहि एका विशिष्ट धर्माविषयी पक्षपात दाखवीत नाही. खरें पाहतां भारतांतल्या सर्व धर्मीयांच्या धर्मभावनेचा परिपोष करण्याची चिंता वाहणें हें भारताच्या शासनाचें कर्तव्य आहे. पण एकंदर धर्मभावनेविषयी उदासीन राहणें येवढीच आपल्या शासनाची दृष्टि आहे. वास्तविक आर्थिक, सामाजिक व राजकीय क्रान्ति घडवून आणणें हें जसे सरकारचें कर्तव्य आहे त्याचप्रमाणे भारतातल्या सर्व समाजांत धर्मक्रान्तीला चालना देणें हेंहि सरकारचें कर्तव्य आहे. पण सध्याचे सरकार हे कधीहि करणार नाही. कारण मुसलमानांच्या धर्मभावना दुखवतील अशी येथल्या शास्त्यांना भीति आहे. राष्ट्रनिष्ठेची जोपासना करणें हा तर या युगाचा धर्म आहे, पण परधर्मीयांच्या भीतीने- भीति इतकीच कीं, ते निवडणुकीत मतें देणार नाहीत- काँग्रेसच्या नेत्यांना आपल्या महनीय पूर्वपरंपरेचा अभिमान भारतीयांच्या चित्तांत बिंबविण्याचें धाडसहि करवत नाही. मग धर्माचा प्रश्न तर आणखीच नाजूक आहे. तेव्हा हे निवडणूकनिष्ठ लोक मुसलमान, ख्रिस्ती या समाजांत धर्मक्रान्ति घडवून आणण्याचा विचार स्वप्नांतहि करणार नाहीत. निवडणूकनिष्ठेमुळे त्या विधर्मी समाजांत प्रयत्न नाही आणि निधर्मी व्रतामुळे हिंदुसमाजात नाही. असें हें काँग्रेसचें धर्मकारण आहे. खरें पाहतां धर्मप्रचारापासून अलिप्त राहण्याचें धोरण कटाक्षाने संभाळल्यानंतर प्रत्येक समाजांत वर सांगितल्या प्रकारची धर्मक्रान्ति घडवून आणण्यासाठी भारत सरकारने प्रचंड प्रयत्न करणें अवश्य आहे. शब्दप्रामाण्यवादी, केवळ परलोकनिष्ठ, अंध, विज्ञानविरोधी अशी धर्मभावना भारतांत कोणत्याहि समाजांत दृढावून राहिली तरी ती राष्ट्रसंघटनेला व लोकशाहीला घातक ठरल्यावांचून राहणार नाही. रशियाचें धर्म मुळांतच नष्ट करण्याचें धोरण कोणाला पटो वा न पटो पण सोव्हिएट रशियांतील अंध, हेकट, दुराग्रही, राष्ट्रविरोधी, विज्ञानविरोधी धर्मभावना तेथील नेत्यांनी सगळ्याच जमातींतून समूळ खणून काढली आहे यांत शंकाच नाही, आणि यामुळे रशियाचें बळ शतपटीने वाढले आहे याबद्दलहि दुमत होईल असे वाटत नाही. शतकानुशतकें शब्दप्रामाण्यवादी अंध धर्माला कवटाळून असलेल्या जमातीच्या प्रदेशांचे तीस चाळीस वर्षांत औद्योगीकरण करून टाकण्यांत, त्या जमातींना अज्ञानयुगांतून विज्ञानयुगांत ओढून आणण्यांत सोव्हिएट नेत्यांना जें अभूतपूर्व यश आले आहे त्याचें बरेचसें श्रेय त्यांच्या इतर अनेक तत्त्वांप्रमाणे या धर्मकारणालाहि देणें अवश्य आहे. रशियांतील धर्मनाशाच्या प्रयत्नांचा विचार करता एक गोष्ट स्पष्ट दिसून येते की, सोव्हिएट नेते अखिल जनतेची मनःक्रांति घडवून आणण्यासाठी पराकाष्ठेचे प्रयत्न करीत आहेत. धर्मभावना नष्ट करीत असतांना त्या मनांत विज्ञाननिष्ठा रुजविली पाहिजे असा त्यांचा कटाक्ष असतो. १९५७ च्या मेमध्ये 'शास्त्रीय निरीश्वरवादा'ची मॉस्को येथे परिषद भरली होती. तिच्यापुढे झालेलीं भाषणें वाचलीं की, हे अगदी स्पष्ट होईल. 'पाव्हलाव्हचे सिद्धान्त' 'फिजिक्समधील जडवाद व अध्यात्मवाद' 'पृथ्वीवरील जीवोत्पत्ति' 'जीवनशास्त्रांतील द्वंद्व' या तऱ्हेचे निबंध तेथे वाचले गेले, आणि शास्त्रीय ज्ञानाच्या प्रसाराने अंध धर्मश्रद्धा नष्ट करावी या धोरणाचा पुरस्कार केला गेला. कारण जुलमी साधनांनी दडपशाही करून धर्मश्रद्धा कधीच नष्ट होणार नाही हे आता रशियन नेत्यांनी चांगलेच जाणले आहे. त्यामुळे धर्मगुरूंच्या व जनतेच्या धर्मभावना दुखवावयाच्या नाहीत असा सक्त दंडक तेथील शास्त्यांनी घातलेला आहे. विज्ञानावरील ग्रंथ, पत्रके, व्याख्याने, प्रवचनें यांचा पाऊस पाडून जनतेला विज्ञानवादी व बुद्धिवादी बनवावयाचें असें धोरण त्यांनी आता आखलें आहे, यामुळे लोक विज्ञानवादी होत आहेत यांत शंका नाही. पण त्यांची धर्मभावना अणुमात्र कमी होत नाही. १९५४ साली सरकारच्या असें ध्यानांत आले की सरकारी सायन्स ॲकॅडमीतच धर्मनिष्ठ लोक आहेत. एवढेंच नव्हे तर कॉमसोमॉल या कम्युनिस्ट तरुणांच्या संघटनेचे सभासदहि जोराने धर्मभावनेकडे वळत आहेत. ते चर्चमध्ये प्रार्थनेला जातात, आणि विवाहसंस्कार व जातकर्महि चर्चमध्येच करतात. (स्टडी ऑफ यूं. एस्. एस्. आर.- ऑगस्ट १९५७) या सगळ्याचा परिणाम असा होत आहे की, रशियांत धर्मभावना नष्ट होत नाहीं तर ती पश्चिम युरोपांतल्याप्रमाणे विज्ञानपूत, बुद्धिवादी, इहलोकनिष्ठ व सामाजिक पुण्याची चिंता वाहणारी अशी होत आहे. हीच धर्मक्रान्ति भारतांत घडवून आणण्याचे पराकाष्ठेचे प्रयत्न आपल्या सरकारने करणें अवश्य होतें, पण स्वातंत्र्यप्राप्तीनंतर राष्ट्रनिष्ठेच्या जोपासनेची जशी त्याने अक्षम्य हेळसांड केली तशीच धर्मभावनेच्या जोपासनेचीहि केली. दोन्ही बाबतींत कारणपरंपरा मात्र तीच आहे. यामुळे यापुढेहि भारत सरकार असले कांही प्रयत्न करील ही आशा नाही.
पण जुन्या धर्मसंस्थांनी किंवा सरकारने काहीहि प्रयत्न केले नाहीत तरी भारताच्या लोकशाहीची चिंता असणाऱ्या भारतीयांनी या कार्यासाठी नव्या संस्था निर्माण केल्या पाहिजेत. नवे धर्मपंथ स्थापिले पाहिजेत. मेथॉडिस्ट, क्वेकर इ. पंथांचा इतिहास आपण पाहिला तर त्यांनी जरी प्रत्यक्षांत केवळ धर्मक्रान्तीचेंच उद्दिष्ट ठेविलें असले तरी ती क्रान्ति सामाजिक व राजकीय क्रान्तीला पोषक झाली, आणि लक्षावधि दलित जनतेच्या जीवनाला प्रतिष्ठा प्राप्त झाल्याने या क्रान्तीमुळेच युरोपांत लोकशाहीचा पाया घातला गेला हे आपल्या ध्यानांत येईल, आणि भारताची लोकसत्ता समर्थ व बलाढ्य करण्यासाठी येथेहि तशीच कान्ति घडविण्याची प्रेरणा आपल्याला होईल. मोठ्या संस्था स्थापन होण्यास वेळ लागेल, पण त्यासाठी थांबून राहण्याची मुळीच आवश्यकता नाहीं. ज्याला या धर्माची प्रेरणा होईल त्याने आपल्या लहानशा परिसरांत प्रारंभीं सांगितलेल्या अल्बिनो, बटरवर्थ, टालव्हास, फादर क्लेटन यांच्याप्रमाणे धर्ममंदिर उभारून त्यांच्याच पद्धतीने कार्याला प्रारंभ केला पाहिजे. सध्या आपल्या समाजांत धार्मिक जीवन व इतर जीवन यांची फारकत झाली आहे. शिक्षणामध्ये धर्माला अग्रस्थान असावयास पाहिजे. सांस्कृतिक कार्यक्रमांत नव्या धर्माची शिकवण दिली पाहिजे. नव्या मानसशास्त्रज्ञांनी रोगमुक्ततेसाठी धर्मभावनेची, ईशप्रार्थनेची फार आवश्यकता आहे असें सांगितल्यामुळे इंग्लंडमध्ये प्रत्येक रुग्णालयांत आतां धर्मोपाध्यायांची योजना झालेली आहे, म्हणजे त्याहि क्षेत्रांत धर्मसंस्कारांची आवश्यकता आहे; पण इतर धर्मीयांच्या भावना दुखवतील म्हणून आपण सार्वजनिक जीवनांतून धर्माला स्थानभ्रष्ट केलें आहे. यामुळे विज्ञानपूत, बुद्धिवादी, विवेकनिष्ठ अशा धर्मशिक्षणाची आपल्या जनतेची भूक भागविण्याची येथे सोयच नाही. त्यासाठी नव्या धर्मसंस्था लोकांनी उभारणें अवश्य आहे. महाराष्ट्रांतल्या खेडोपाडी श्रीराम, श्रीकृष्ण, श्रीज्ञानेश्वर, श्रीतुकाराम यांचीं मंदिरें उभारण्यांत आली आणि तेथे नव्या पद्धतीने भूतांचे पालन, कंटकांचें निर्दळण, प्राणिमात्रास सुखदान, अनाथांच्या काजा साह्य होणें, ज्यासी अपंगिता नाही त्यासी हृदयीं धरणें या धर्माचा प्रत्यक्ष आचार करण्याचें शिक्षण मिळाले तरच लोकशाहीला अवश्य ती धर्मक्रान्ति येथे घडून येईल. मात्र या नव्या धर्माच्या प्रवचनांत संसार, स्त्रीपुत्र, समृद्धि, लक्ष्मी, ऐहिक वैभव, विज्ञान, बुद्धिवाद, तर्कनिष्ठा, यांची चुकूनसुद्धा हेटाळणी होता कामा नये. या सर्वांचा परिपोष करील व तो भगवंताच्या अधिष्ठानावरून करील अशाच धर्माची आता येथे आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे जातिधर्मनिरपेक्ष सर्व समाजाची सेवा हेंच याचें धोरण असले पाहिजे. 'हें विश्वचि माझे घर' हा श्रीज्ञानेश्वरांचा संदेश प्रत्यक्ष आचरणांत आणणारीं धर्ममंदिरें प्रत्येक खेड्यांत स्थापन झाली तरच अवश्य तो धर्मक्रान्ति येथे घडून येईल. या मंदिरांनी चालविलेली रुग्णालय, क्रीडामंदिरें, शाळा, औद्योगिक केन्द्रे यांत सर्वांना प्रवेश असला, सर्वांचे तेथे स्वागत झालें, त्यांनी सर्वांची सेवा केली आणि मानवधर्माचें उंच ध्येय डोळयांपुढे ठेविलें तर मिशनऱ्यांनी स्थापिलेल्या संस्थांना जगांत सर्वत्र जसें यश आले तसें या मंदिरांनाहि येईल. आपल्या खेड्यांमध्ये सध्या डॉक्टर, वकील, इंजिनियर, बागाइतदार, सहकारी पतपेढ्यांचे व्यवस्थापक असे समाजावर वर्चस्व असणारे अनेक व्यवसायांतले लोक असतात. त्यांनी या बाबतीत पुढाकार घेऊन सामाजिक पुण्याची प्राप्ति करून देणाऱ्या या धर्माच्या प्रसारासाठी संस्था उभारल्या, त्यासाठी स्वतःला वाहून घेतलें तर भारतांत थोडक्या अवधीत फार मोठे धर्मपरिवर्तन घडून येईल आणि रशियाने दण्डसत्तेने जे सामर्थ्य, जे बल प्राप्त करून घेतलें तें भारताला प्राप्त होईल. लोकसत्तेला दण्डसत्तेचे आव्हान आहे तें हेंच आहे. रशियाप्रमाणे विज्ञाननिष्ठा लोकांत बाणली पाहिजे, शब्दप्रामाण्य नष्ट झाले पाहिजे, समाजसेवेचें शिक्षण प्रत्येक तरुणाला मिळालें पाहिजे. राष्ट्रासाठी प्रत्येकाने सर्वस्वत्याग करावा ही भावना नागरिकांत बाणली पाहिजे आणि तसा आचार घडला पाहिजे. रशियाने हें सर्व क्रूर, कठोर अशा दण्डसत्तेच्या साह्याने घडविलें आहे. 'तुम्ही व्यक्तिस्वातंत्र्याचे, अहिंसेचे, लोकशाहीचे अभिमानी म्हणवतां. तर त्या मार्गाने तुम्ही हें करून दाखवा' असें दण्डसत्तेचें लोकसत्तेला आव्हान आहे. वरील प्रकारची धर्मक्रांति आपल्याला घडवितां येते की नाही यावर याचें उत्तर अवलंबून आहे.
+ + +