२3 वे ].    बीज.    १९५
-----
प्रकरण २3 वें.
---------------
बीज.
---------------

 आतां आपणांस फळांतील बीजांचा विचार केला पाहिजे. पूर्वी कांहीसा थोडा विचार बीजांविषयी केला आहेच. त्यांचा संबंध विशेषेकरून बीजजनन (Germination) दृष्टीने झाला. ह्याठिकाणीं गर्भीकृत बीजाण्डा (Ovules) पासून कोणत्या घडामोडी होऊन बीजस्वरूप प्राप्त होते, तसेच बीजाण्ड-स्थितीचे बीजस्थितीत कसे स्वरूप बदलत गेले, ह्याचा विचार केला जाईल.

 खरोखर मुख्य बाबतीत बीजाण्ड व बीज ह्यांत फारसा फरक नसतो. अण्डावरील दोन्ही पडदे बीजस्थितीत कायम असतात, अथवा संकुचित होऊन त्याची जाड कवची बनते; जसे अण्डांत पोषक अन्नाचा बलक असतो, त्याप्रमाणे बीजामध्येही अन्नसामुग्री असते. मग ती अन्नसामुग्री गर्भान्तर असो अथवा गर्भबाह्य असो. तसेच त्यावरील छिद्र ( Micropyle ) बीजस्थितीतही असते. ह्या छिद्राचा दोन प्रकारचा उपयोग असतो. ह्या छिद्राचा फायदा घेऊन परागनळी आंत घुसून गर्भकोशांतून ( Embryosac ) गर्भाण्डाकडे जाते. बीजस्थितीमध्ये जेव्हां जनन होऊ लागते, त्यावेळेस आदिमूल (Radicle) जागृत होऊन बाहेर पडते, ते ह्याच छिद्रांतून बाहेर येते. नाळेशी संबंध दाखविणारी खूण बीजांमध्येही असते. बीजांत असणारी बीजदले अथवा बीजांतील गर्भ, तोंच त्यांतील खाली व वर जाणारे प्रथम कोंब हे मात्र बीजाण्डात नसतात, तेथील गर्भकोशांत असणारे गर्भाण्ड गर्भिकृत झाल्यावर ते वाढत वाढत गर्भ, बीजदले तसेच विशिष्ट कोंब उत्पन्न होतात. गर्भकोशांत द्वितीयक केंद्रा ( Secondary nucleus ) पासून अन्नोत्पत्ति होत असते. म्हणूनच ज्याप्रकारचे अण्ड त्याच प्रकारची बीजे बनतात. छिद्र, नाळेची खूण, पडदे वगैरेचा जो संबंध उभा, आडवा, अगर जवळचा जसा असतो तोच संबंध बीजस्थितीत अढळतो. बीजाण्डाचे बाह्य आवरण बीजस्थितीत टणक व कठीण होऊन बीजाची बाह्य कवची बनते. बीजाचे बाह्य आवरण

१९६     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----
नरम, कठीण, खरखरीत, केसाळ व पंखाकृति असते. शेवगा, मोहोगनी, बिगोनिया वगैरेमध्ये बीजास पंखे असल्यामुळे हवेतून एकाजागेपासून दुसऱ्या जागी त्यास जाता येते. मांदार व करवीरवर्गातील बीजास लहानसे झुपकेदार केसाळ आवरण असते. ह्या झुपकेदार केसाच्या साहाय्याने बीजे हवेतून इकडून तिकडे उडू शकतात. लहान मुलांच्या खेळांतील म्हातारी पुष्कळांनी पाहिली असेलच. सूर्यकमळ, झिनिया वगैरे बीजांत ह्याच प्रकारचा केसाळ भाग असतो. हे केसाळ पुंजके पुष्पकोशदर्शक चिन्हे आहेत. त्यांचा बीजाण्डाच्या आवरणाशी संबंध नसतो. कापूस, शेवरी वगैरेमध्यें वीजांभोवती पूर्ण केसाळ आवरण असते, त्या केसाळ रुईपासून पिंजून सूत काढून उत्तम उत्तम कपड़े तयार करितात.

 कधी कधी गर्भधारणा झाल्यावर जेव्हां बीज वाढू लागते, त्यावेळेस एखादे उप-आवरण छिद्राजवळ वाढते. एरंडीवरील बुडाशी असलेला पांढरा सुजवटा अशाच प्रकारे उत्पन्न होतो. जायपत्रीची उत्पत्ति ह्याच प्रकारचे असते. जायफळावरील बाह्यावरण जास्त वाढून पुढे ते सुटे व मांसल होते, हें मांसल आवरणच जायपत्री बनते. कमळाच्या जातीमध्ये कांहीं बीजावर अशा प्रकारचे बाह्य आवरण वाढून बीजाभोंवतीं एक पिशवी तयार होते.

 बाह्यांगाच्या कमी अधिक टणकपणाप्रमाणे बीजाची जननशक्ति असते. ही जननशक्ति पुष्कळ बीजांत वेगवेगळ्या प्रकारची असते. कांहीं बीजे एक दोन वर्षे राहिली असतां पेरण्यास निरूपयोगी होतात. पण तेच उलट कांही बीजे पन्नास वर्षांची जुनी जरी असली, तथापि त्यांची उगवण्याची चैतन्य शक्ती कमी होत नाही. कांहीं जुनी बीजे पेरण्यास अधिक चांगली समजतात, जसे-काकडी, खिरे, वगैरे. तसेच कांहीं वनस्पतींत जुनीं बीजें निरूपयोगी होतात. जसे-लिंबू, महाळुंग वगैरे. येथे एवढे सांगितले म्हणजे बस्स आहे की, बीजामध्ये कवचीवर हवेचा कोणताही परिणाम न होणारा टणकपणा असला तर ती बीजे जास्त दिवस टिकणारी असतात.

 बीजामध्ये अन्नाचा साठा असतो. ह्या अन्नाचा उपयोग बीज जननांत होतो. ह्याचा उगम बीजाण्डांत होतो. गर्भकोशांत जे द्वितीयक केंद्र मध्यभागी असते, त्यांशी उरलेले पुंतत्व मिलाप पावून तीन केंद्राचे एकीकरण होते. केंद्र
२3 वे ].    बीज.    १९७
-----
द्विधा पावून झपाट्याने वाढत असते. मुख्य गर्भाच्या पुष्टतेकरितां ह्यांत पौष्टिक पेशींची तजवीज होत असते. गर्भ वाढू लागला, म्हणजे ह्यांत तयार होणाऱ्या पेशीचे शोषण होत असते. कांहीं बीजांत तें शोषण पूर्ण होऊन बीजदलें मोठी व मांसल होतात. कांहीं बीजांत मगजाचे शोषण अर्धवट झाल्यामुळे त्याचे आवरण गर्भाभोवती राहते. जसे-एरंडी. एकदल-धान्यवनस्पतीत विशेषेकरून अशा प्रकारची मगजवेष्टित ( Albuminous ), बीजें पुष्कळ असतात. पण द्विदल वर्गामध्ये अन्नशोषण पूर्ण झाल्यामुळे बीजदले पुष्ट होतात. येथे ही गोष्ट विसरता कामा नये की, मगजवेष्टित बीजे उगवू लागली म्हणजे बाहेरील मगज हळू हळू अति शोषिला जाऊन बीजदले मोठी होतात. कसेही असो, मगजाचे अंतःशोषण झाल्याखेरीज जनन होत नसते.

 कधी कधी गर्भकोशासभोवती असलेला पोषक बलक ( nucellus ) सुद्धा बीजस्थितीत शिल्लक राहतो. बहुतकरून तो पोषक बलक गर्भकोश वाढत असतांना संपून जातो; पण कांहीं वेळां अधिक असला तर, बीजस्थितीतही कायम राहतो. जसे-मिरे, मका, वगैरे. मक्यांत पिवळट कठीण मगजाचे वेष्टन असते, ते ह्या शिल्लक राहिलेल्या बलकापासूनच उगम पावते.

 सत्त्व, तेल, सात्विक अन्न, नायट्रोजनयुक्त पोषक द्रव्ये, वगैरे निरनिराळ्या प्रकारची अन्ने बीजामध्ये असतात. ही सर्व द्रव्यें बीजास जनन होत असतां उपयोगी पडतात. गर्भधारणा झाल्यावर वनस्पतींतील सर्व विशिष्ट पोषक द्रव्ये बीजाकडे धावून त्यांत त्यांची सांठवण होते. ह्या ठिकाणी व्यवहारांतील मातृप्रेम दृष्टीस पडते, असे म्हणणे भाग आहे. झाडे आपल्या रोप्यांस उपयोगी पडावी म्हणून कमी अधिक पौष्टिक द्रव्ये आपल्या इतर खर्चातून वगळून बीजांत सांठवितात. पण प्राणिवर्ग धडपड करून वनस्पतींची ही नैसर्गिक तजवीज नाहीशी करतो. एकानें जमवावे व दुसऱ्याने त्याचा उपयोग करावा, अशा प्रकारची स्थित नेहमी अनुभवास येत असते, तोच प्रकार येथेही आढळतो. शिरस, तीळ, खोबरे, भुयमूग, करडे वगैरे बीजांत तेलकट अन्नाची सांठवण असते. गहू, तांदूळ, मका, जव, जांधळे, वगैरे बीजांत सत्त्व आढळते. तालिमखाना, भेंडी, जासवंद, वगैरेमध्ये एक प्रकारचा डिंक ( Mucilage ) असतो. कॉफी, खजूर, सुपारी वगैरेमध्ये अन्न फार कठीण झाले असते, हें 
१९८     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----
कठीण अन्नही सात्विक अन्नापैकीच आहे. डाळीवर्गात व इतर फळांत नायट्रोजनयुक्त पौष्टिक द्रव्ये आढळतात. ही सर्व अन्नें निरनिराळ्या स्थितीत असतात. तथापि बीजाचे जनन होत असतां त्यावर रासायनिक परिणाम होऊन, ती अन्नें विरघळतात. ह्या विरघळलेल्या स्थितीत ती द्रव्ये लवकर पचविली जाऊन संघटनात्मक कार्य घडते. त्यामुळे बीजापासून अंकुर फुटून रोपा वाढू लागतो.

 बीजांतील महत्त्वाचा भाग म्हणजे त्यांतील गर्भ होय, व त्यामुळेच बीजास इतके महत्त्व आले आहे. कारण त्यापासून पुढील रोपा अगर झाड तयार होते. बीजांतील अन्न व कवची इतकी महत्त्वाची नसून मुख्य गर्भास सर्व प्रकारची सोय व्हावी व त्याच्या मार्गात कोणतीही अडचण पडू नये, एतदर्थ त्यांची योजना असते. गर्भ हा खरोखर बालरोपा असून त्यांत रोप्याचे सर्व भाग संकुचित स्थितीत आढळतात. बीजदलें (Coty-ledons ), आदिमूल (Radicle ) व प्रथम खोड (Plumule ) तसेच त्या गर्भास अवश्य लागणारा पोषक मगज, इतक्या वस्तु गर्भात आढळतात. ह्या वरील वस्तूंखेरीज अशी दुसरी वस्तु कोणती आहे की, ती गर्भात नसतां केवळ झाडांतच आढळते. फुले येण्याच्या प्रथमची जी वनस्पतीची स्थिति असते, ती स्थिति गर्भाची असते. फक्त प्रत्येक वस्तु लहान व संकुचित प्रमागांत असते, एवढाच काय तो फरक. बीजदलांच्या संख्येप्रमाणे एकदल, द्विदल अगर बहुदल बीजें समजतात.

 एकदल बीजाताल गर्भ एका बाजूस असून त्याचे भोंवतीं मगजाचे आवरण असते. कधी कधी द्विदल जातीप्रमाणे मध्यभागी गर्भ असून चौहोंबाजूस मगजांचा साठा असते. पण अशी स्थिति विरळा असते. द्विदलबीजांत गर्भ नेहमी मध्यभागी असून आदिमूल व प्रथम खोड ह्यांचा सांधा दोन्ही बीजदलास चिकटला असतो. बीज छिद्राच्या जवळच आदिमूल असुन त्यांतून ते उगवून बाहेर येते. प्रथम कोंब लहान लहान पानांचा बनला असतो. द्विदल बीज उगवतांना नेहमी मध्यभागी दोन समोरासमोर पानें दृष्टीस पडतात. पण एकदल बीजांत पान एक येऊन ते जणूंं गुंडाळले आहे, असे वाटते.

 विशेषेकरून बीजदले सारख्या आकाराची असतात. कधी कधी त्यांचे कमी अधिक लहान आकार आढळतात. जसे शिंघाडा वगैरे. द्विदल वनस्पतीत

२३ वे ].    बीज.    १९९
-----
आदिमूल अगर प्रथम खोड ह्या दोन्हींपेक्षां बीजदलें नेहमी मोठी व स्पष्ट असतात. बहुतकरून एकदलवनस्पतींत आदिमुल (Radicle ) खोडापेक्षा लहान असून जाड असते. कांद्याच्या बीजांत गर्भ अर्धचंद्राकृति असतो. बहुदलधान्यवनस्पतींत बीजदलें दोन्हीपेक्षा अधिक असतात. जेव्हां गर्भाबाहेर मगजाचे आवरण नसते, त्यावेळेस बीजदले जाड व मांसल होतात. तसेच जेव्हां ते आवरण असते, त्यावेळेस बीजदले पातळ पानांसारखी असतात. बीजदलें देंठविरहित असून त्यांचे किनारे सारखे असतात. अमरवेलाच्या बीजांत बीजदले नसून येथील गर्भ पातळ सुतासारखा व मळसूत्री असतो. खरोखर अमरवेल उच्चवर्गीपैकी द्विदलधान्य-वनस्पतीमध्ये मोडत असून त्यास बीजदले वाढत नाहीत, हा अपवाद आहे. नाहीतर नियमाप्रमाणे येथे दोन बीजदलें असली पाहिजेत.

 येथे ही गोष्ट नमूद करणे जरूर आहे की, जर बीजे मगजवेष्टित असतील, तर त्यांतील गर्भ मगजाच्या लहान मोठ्या आवरणाप्रमाणे लहान मोठा असतो, म्हणजे मगजाचे आवरण लहान व पातळ असेल तर गर्भ ज्यास्त मोठा आढळतो. तसेच ते आवरण मोठे असतांना गर्भ संकुचित व लहान असतो. तृणजातींतील बीजांमध्ये बीजाच्या आकारमानाने मगजाचा साठा मोठा असल्यामुळे त्यांचा गर्भ नेहमी लहान असून एका कोपऱ्यांत असतो. पण उलटपक्षी नेट्लमध्ये गर्भ मोठा असून मगजसांठा पातळ असतो.

 बीजे जमिनीत योग्य परिस्थितीत पेरली असतां उगवून त्यांपासून लहान रोपे तयार होतात; व पुढे त्या रोप्यांवर पुनः बीजे येतात. जमीन, हवा, पाणी व उष्णता इतक्या गोष्टीची बीजजननास आवश्यक जरूरी आहे. पाणी मिळाले असतां बीज फुगून आंतील सजीवतत्त्व जागृत होते. बीजांतील पोषक सत्त्व रूपांतर पावून त्यापासून पूर्वी वर्णन केलेले अंकुर बाहेर पडतात. दिवसेंदिवस तें पोषक सत्त्व कमी होत जाऊन रोप्याची वाढ चांगली होते. पुढे त्यावर पाने, फांद्या वगैरे येतात. शरीरवाढ पूर्ण झाल्यावर हळुहळू फुले येऊ लागतात. फुले फुलून परागपतन परागवाहिनीवर होऊन गर्भधारणा पूर्ण होते. त्यापासून फळे तयार झाल्यावर फळांमध्ये बीजें पोसतात. ह्याप्रमाणे बीजापासून पुनः बीज तयार होऊन झाडांची परंपरा कायम राहते.

२००     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----
 ही परंपरा केवळ बीजांकडून राखिली जाते, असे नाही. तर दुसऱ्या अन्यमार्गांनीसुद्धां वंशवर्धन केले जाते. बीजे अगदी लहान असल्यामुळे त्यांपासून झाडे तयार होण्यास कालावधि लागतो, तेव्हां ते टाळण्याकरितां कलमें वगैरे करून झाडांची उत्पत्ति लवकर करण्यांत येते. नैसर्गिक कलमें आपोआप तयार होत असतात. जेथे फुले येऊन बीजोत्पत्ति खात्रीने होईल अशी शंका असते, अशा ठिकाणी नैसर्गिक कलमें होऊन त्या वनस्पतींची वंशपरंपरा कायम राहते. जाई, जुई, मोगरा, स्ट्राबेरी, रताळी, दर्भ, दूर्वा, गवते इत्यादिकांत नैसर्गिक कलमें नेहमी दृष्टीस पडतात. म्हणजे जेथे फुलामध्ये स्त्रीपुरुषसंयोग होऊन बीज तयार होण्यास त्रास असतो, अथवा स्त्रीपुरुषव्यंजक अवयवे येत नाहीत अशा ठिकाणी नैसर्गिक कलमांशिवाय उत्पत्ति कायम राहणार नाही.

 कलमें करण्यांत एक विशेष फायदा असतो. बीजांपासून अस्सल झाड तयार होईल किंवा नाही याचा नियम नसतो. शिवाय वेळ अधिक लागून उत्तम झाड तयार होईल किंवा नाही त्याची शंका जेथे आहे, तेथे कलमें करून फायदा करून घेणे हे उत्तम. कलमांमध्ये मूळ झाडाचे गुण किंचितही कमी न होत जसेच्या तसेच कलमापासून उत्पन्न होणा-या झाडांत कायम राहतात. खरोखर हा फायदा फार महत्त्वाचा समजला पाहिजे. शिवाय वेळ थोडा लागून फळेही लवकर येऊ लागतात. ही गोष्ट खरी कीं, बीजांपासून उत्पन्न होणारी झाडे जितकी वर्षे टिकतात, तितकी वर्षे कलमांची झाडे टिकणार नाहीत. पण मूळ गुणांचा कायमपणा, तसेच लागणारा थोडा काल, ही लक्ष्यांत घेतां कलमांपासून झाडे तयार करणे हे ज्यास्त श्रेयस्कर अाहे. स्त्रीपुरुषतत्वांचा संयोग झाल्यावर बीज तयार होऊन जमिनीत पडून उगवून येण्यास बराच काल लागतो. शिवाय रोपा वाढून फळे लवकर मिळत नाहीत. व्यक्तिमात्र झाडाप्रमाणे फळे येण्यास बराच काळ जावा लागेल. पण कलमांत स्त्रीपुरुषतत्त्वांच्या संयोगाची जरुरी नसून, मूळ झाडांची फांदी अगर फांटा जमिनीत पुरून जमीन ओली राहील अशी व्यवस्था केली म्हणजे त्यापासून रोपा फार जलद तयार होऊन फळेही लवकर येऊ लागतात.

 कलमें करण्याचे निरनिराळे प्रकार असून त्यांच्या वेळाही वेगवेगळ्या आहेत. काही झाडांत थंडी पडू लागली असतां कलमें करितात, व काहीं मध्ये
२३ वे ].    बीज.    २०१
-----
कलमांस पावसाळा हवा असतो. विशेषेकरून जेव्हा झाडांतील रसाचे जोमानें अभिसरण होत असते, अशा वेळेस कलमें उत्तम साधतात, व हीच वेळ त्यांस योग्य असते. फाटे लावणे ( Cutting ), दाबाचें कलम करणे, अगर जडवें बांधणे ( Layering ), फांदीवर फांदी घेणे ( Grafting ), डोळे भरणे { Budding) वगैरे प्रकार कलमांचे आहेत.

 फांटे लागण्यास फांद्या चांगल्या जाड व टणक पसंत करून त्यांची रुंदी सुमारे एक बोटाइतकी ठेवावी. फांट्याची लांबी एक फुटापासून दीड फूट असावी. ज्या फांट्यांवर कळ्या असतील ते फाटे पसंत करावेत. हे फाटे दीड इंच जमिनीत पुरून वरच्या टोकांस शेण लावून ठेवावे. रोज दोन वेळा पाणी देत जावे. त्या कळ्यांमधून नवीन पाने हळू हळू फुटतात, व जमिनीत आगंतुक मुळ्या ( Adventitious roots ) निघतात. मुळ्या फुटल्या म्हणजे रोपा रुजला असे समजावे. अशा रीतीने गुलाब, जासवंदी, कण्हेर, पांढराचाफा, क्रोटन, वगैरेची कलमें करितात.

 फांदी वाकवून, जमिनीत घुसवून त्यावर थोडी माती टाकून दाबून कलम करावें. अशा प्रकारच्या कलमास दाबाचे कलम ( Layering ) म्हणतात. जाई, जुई, लिंबू , क्रोटन वगैरेमध्ये अशी कलमें नेहमी करण्यात येतात. मागे खोडाचे वर्णन करतांना नैसर्गिक दाबाचे कलम कसे होत असते, ह्याविषयी सांगितलेच आहे. फांदीस योग्य परिस्थिति उत्पन्न करून आगंतुक मुळ्या (Adventitious roots) सोडावयास लावणे हे मुख्य तत्त्व अशा कलमांत असते. कित्येक वेळां शैवाल, फांदीवर सांध्यापाशी बांधून, सांध्यावर आडवी खाप करतात. नेहमी दोन वेळा पाण्याची व्यवस्था राखण्यांत येते. आडव्या खापेतून वेगळ्या मुळ्या फुटून त्या शैवाळांत शिरतात. पुढे ती फांदी चाकूनें कापून दुसरे जागी लावण्यात येते. त्या नवीन सुटलेल्या मुळ्या आयत्या जमिनीत शिरून अन्नग्रहण करू लागतात. अशा रीतीने साखरलिंबू, संत्रा, गुलाब, जांभूळ वगैरेमध्ये कलमें पुष्कळ वेळां करितात. फांदी वांकवून जमिनीत पुरणे किंवा फांदीवर कृत्रिम जमिनीसारखी व्यवस्था करणे, ह्या दोन्ही गोष्टी एकच असतात.

 आणखी एक प्रकारचे कलम आहे की, ज्यामध्ये एका झाडाची फांदी दुसऱ्या झाडावर बसवून त्याचा त्या फांदीशी एकजीव करितात. आंबा, लोकॅॅट, 
२०२     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----
फणस वगैरेमध्ये ही कलमें नेहमीं करितात. प्रथम साधी बीजे जमिनीत पेरून त्यांपासून रोपे तयार करावे. रोपे सरासरी एक वर्षाचे झाल्यावर, पावसाळा सुरू झाला म्हणजे ज्या झाडांचे कलम घ्यावयाचे असेल, त्यांवर मुळ्या न दुखवितां, मातीसकट केळीच्या सोपटांत गुंडाळून ते टांगण्याची व्यवस्था करावी. रोपे जमिनींत असतांना तीन तीन महिन्यांत एका जागेपासून दुसरे जागी ते बदलण्याची व्यवस्था करावी. म्हणजे रोप्यांची मुळे जमिनीत फार खोलवर जाणार नाहीत. ज्या फांदीवर तो रोपा टांगला असेल, तिची व रोप्यांची रुंदी सारखी असावी. सकाळी अगर संध्याकाळी दोन्हींच्या फांद्या चाकूने उभ्या चिरून एकमेकांवर सारख्या बसवून त्यांवर माती सारवावी. दोन्ही फांदींतील अंतररस एकजीव करणे हे कलमांतील मुख्य तत्त्व आहे. रोजचे रोज पाणी देणे वगैरे किरकोळ गोष्टींकडे लक्ष्य पुरवीत असावे. कांहीं दिवसांनी रोपट्याच्या कलमांवरील पाने व फांदी कापून टाकावी. कलम घेतलेली फांदी चांगली वाढू लागली म्हणजे मूळ झाडाचा संबंध तोडून टाकावा. ह्या रीतीने तयार केलेली कलमें वाटेल त्या ठिकाणी लावण्यास योग्य होतात. असल्या कलमांत एक फांदी दुसरीवर बसविणे, अथवा एका फांदीचा दुसरी एकजीव करणे, हा मुख्य हेतु असतो. साध्या कलमांत फांदीवर फांदी न बसवतां फांटा जमिनीत लावून त्यापासून रोपा उत्पन्न करणे हा हेतु असतो.  डोळे भरणे हाही एक कलमांतील प्रकार आहे. एका झाडाचा डोळा काढून दुसऱ्या सजातीय झाडांत बसविणे म्हणजे डोळे ( Budding ) भरणे होय. डोळा काढतांना तो न दुखेल अशी खबरदारी घ्यावी. ज्या ठिकाणी तो बसविण्याचा असेल, त्या जागी चाकूने उभे चिरून साल सुटी करावी. त्या चिरेत तो सरळ बसवून ती चीर सोंपटांनी बांधून टाकावी. पंधरा दिवसांनी डोळ्यांतून कोंब वाढू लागतो. मागाहून वरील मूळ फांदीची पाने वगैरे सगळे कापून टाकावे. डोळे भरण्यांत सुद्धां झाड सुधारून त्यास उंची फळे लागावी हाच उद्देश असतो. खरोखर डोळे भरणे, फांदीवर फांदी बसविणे ( Grafting ) ह्या दोहोंत कांहीं फरक नसतो. पाहिल्यांत लहान कळी अगर डोळा उचलून दुसऱ्या फांदीमध्ये बसवावा लागतो, पण डोळा अगर कळी म्हणजे मुग्धदशेतील फांदी होय. तेव्हां मुग्ध फांदी दुसऱ्या फांदीवर पहिल्या कलमांत बसवावी लागते व दुसऱ्यांत पक्की अगर पूर्ण दशेत असलेली
२४ वे ].    पुनरुत्पत्ति.    २०३
-----
फांदी दुसऱ्या फांदीवर बसवून दोन्हींचा एकजीव करावा लागतो. तेव्हां दोन्हींमध्ये फरक कोठे राहिला ?

 कलमांमध्ये फळे लवकर येऊ लागतात ह्याचे कारण असे आहे की, पूर्णावस्थेस पोंचलेल्या फांदीपासून नेहमी कलमें घेतात; त्यामुळे साहजिक पूर्णदशा पावलेल्या पक्व फांदीवर लवकर फुले येऊन फळे तयार होतात. पक्व फांद्यांचा ऋतुकाल अगोदर पूर्ण झाला असते म्हणून त्यावर जननेंद्रिये लवकर येऊ लागतात; अर्थात पुढे गर्भधारणा होऊन फळेही तयार होतात.

 ज्याप्रमाणे झाडांत कलमें करितात, त्याच प्रकारची कलमें पिकांमध्येही आढळतात. बटाटे शेतांत पेरून त्यांपासून बटाट्याची रोपडी नेहमी तयार करण्यांत येतात; ऊस लावावयाचा म्हणजे उसांची कांडी करून शेतांत पेरतात. रताळीही ह्याचप्रमाणे पेरतात. कांदा, लसूण, अळू वगैरेमध्ये हीच स्थिति असते. म्हणजे वरील सर्व ठिकाणी लहान लहान कोंब अथवा कळ्या पेरून त्यापासून दुसरी रोपे तयार करतात; अथवा ही एकप्रकारची विशिष्ट कलमेच होत. येथेही स्त्रीपुरुषतत्त्वांचा संयोग होण्याची जरूरी नसते.

---------------