वाहत्या वाऱ्यासंगे/जांभूळ झाडाखाली
जांभूळ झाडाखाली
तुरटलेली जीभ मनातल्या मनात म्हणते, बाई ग ऽ, ही असली जांभळं खाण्यापरीस, शहरातली गाड्यावरची जांभळं किती राजस अन देखणी ! हिरव्या पानांच्या नखरेल महिरपीवर सुबकपणे मांडून ठेवलेली. ती जांभूळरास पहाताना तोंडाला पाणी सुटते. फक्त भाव विचारू नका. चाळीस पेशाला एक जाभूळ. खा किती खायची ती.
आणि इथे? वर जांभळाचे आभाळ. पायाखाली जांभळाची पखरण आणि तरीही आंबटच ! इतक्यात फांदीवर चढलेल्या पोरानं फांदी गदगदा हलवली . आणि त्याने नेमकी टप्पोरी ,जर्द जांभळी जांभळे माझ्या हातावर ठेवली. "धरा बाईसाहेब , जांभळं पारखायला अभ्यास करावा लागतो . त्यासाठी झाडांशी दुरून दोस्ती करून चालत नाही. ही संथा वयाच्या पाचव्या वर्षीच घ्यावी लागते."
खेड्यातल्या बारक्या पोरांनाही रानातल्या जांभळी ,बोरींची चव झाडागणिकच्या वेगळेपणासह माहीत असते. त्यांच्या बहारण्याच्या सवयी, त्यांच्यात रस भरण्याचे दिवस , सारे तोंडपाठ!
आम्ही उभ्या आहात नी नानांचा जांभळ . ही मृग लागताना पणात येऊन रसाळते. तर हिरुकाकांची जांभूळ शाळेत संस्कृतच्या पुस्तकात भेटली होती. जांभूळवनाच्या काठाने वहाणारा तुडुंब झरा . पिकलेली जांभळं त्यात टपटपत नि मग पाण्यातले मासे ... एकटक जांभळाकडे पहात जिभेचं पाणी नि जांभळं वरच्यावर मटकावीत. त्याचा आवाज होई ,
गुलुगुग् गुलुगुग् ... गुलुम् गुलुग् ...
... जंबू फलानि पक्वानि पतन्ति विमले जले
तानि मत्स्यानि खादन्ति गुलुगुग् गुलुगुग् ... गुलुग् गुलुग्॥
माशांना जे रसिकपण लाभले ते आम्हाला का लाभू नये? परदेशातल्या चेरीबहराचे रसभरीत वर्णन आम्ही तोंड भरून करणार . जांभळींचे बहार किंवा पळसफुलांचे नक्षत्रलेणे आमच्या साहित्यिकांनी शब्दात साठवले आहेत. नाही असे नाही . पण आम्ही सामान्य माणसे निसर्गाच्या या रसरंगाच्या उधळणीकडे निवांतपणे ,कौतुकभरल्या नजरेने पहातो का ? बोरांच्या दिवसात रानातल्या बोरीकडे पाहुणचार घ्यायला जायचे कितीजणांच्या मनात येते?
हुर्ड्याची आमंत्रणे कमी व्हायला लागली आहेत. इळाआवसेला, शेजारपाजारची लेकरंबाळं घेऊन रानात जेवायला जाण्याचे कुळाचारही हळूहळू नाहीसे होत आहेत. आणि वोरीची,जांभळीची झाडं तरी कितीशिक शिल्लक आहेत?
नानांच्या शेतातली ही जांभुळही वच्छाच्या हट्टामुळे टिकली. नाहीतर तीही कुणाच्यातरी लाकडाच्या वखारीत जाती !
आमचा जांभुळ अध्याय सुरू असतानाच अनेकजणींची भेट होत होती. कोणी शनवारच्या बाजारात माळवं ,भाजीपाला विकायला घेऊन जाणाऱ्या. तर कोणी शेताकडे लगबगीने निघालेल्या . डोक्यावरचा जड भारा तोलीत माझ्याशी दोन शब्द ओलावून बोलणाऱ्या. मी आपली त्यांना खुळचट आमंत्रण देतेय , या जांभळं खायला. (जसं माझ्या आजोळचंच झाडं !)
"खा तुमीच. शेहर गावच्या मानसांले जांभळाचं कौतिक. खाऊन खाऊन वासनाच मेली वं आमची!" एक.
"वासना मराय काय झालं ग? हर साली जांभळीची चव न्यारी लागती. पन येळ हाय का? अशा जांभळं खात पेंगत राहिलो तर मग झालंच! काम कोन उरकील? त्यो दादाप्पा?" दुसरी.
"ताई , खाऊशी वाटली ना तर चारदोन पदरात टाकतो नि मग म्होरं कोनी नाईसं पाहून तोंडात टाकतो. पोर जिन्नस हाई, तंवरच पोरींची मज्जा असतेया. खेड्यातली पोर एकदाका शानी झाली की समदं संपलं. कसल्या बोरी नि कसल्या जांभळी! त्यांच्या पाठी लागतात काटाळ वाभळी !" तिसरी .
एवढ्यात जांभळीची मालकीण वच्छा आली. वच्छा माझी खास मैत्रीण. दोघीजणी या गावात सासुरवाशीणी म्हणून एकाच साली आलो. वच्छी होती तेराचौदाची आणि मी विशीतली.
"या वयनी, खा जांभळं. तुमच्याच शेतातली पन आग्रेव माझा. नाना कुठाईत?" हा म्हणाला. गावची शीव आली की शुद्ध गावरान भाषेत बोलण्याचे ह्याचे खास तंत्र आहे.
"त्ये कुठं असतात गावात? जवा बघावं तवा आंब्याला न्हाईतर लातूरला पळायचं. घरात बायको हायना भक्कम शेताकडे पाह्यला. बाजारचं नाव करून पुरुष पळतात शहरात. घरातल्या लक्ष्म्या हाईतच मागे, घरात नि रानात राबायला." वच्छा फणकाऱ्याने उत्तरली.
खरंच ,बायांनी किती म्हणून राबायचे? चूलसारवण , लेकरांचे हगणेमुतणे , सडाअंगण , खाणेपिणे, जनावरांचे शेण काढा , गवऱ्या थापा , शेतातले खुरपणं आहे तर कधी पेरणी तर कधी सुगीची धावाधाव. लाकूडफाटा गोळा करा . तुरांट्या रचून ठेवा. शेतात दारं धरा . बाजारात माळवं विकायला बाईनंच धावायचं. कारण तेच पैसे तिच्या हातखर्चाचे ...मालकीचे! डाळीसाळी करा. बीजभरणासाठी शेंगा फोडा. वैलामागे हुबे रहा. मळणी करा . उफणणी करा . ही सगळी कामं बाईनंच करायची. या अलिखित करारातील कामं दिवसेंदिवस वाढतच चाललीत. पूर्वी दवाखान्यात तरी लेकराला न्यायचा वाप, आताशा हे कामही बायाच करतात . किती आघाड्यांवर लढायचे बाईने? बदलत्या काळासोवत मोकळ्या आभाळाखाली येण्याऐवजी बाई अधिकाधिक गुदमरत चालली आहे का? मला गढवालमधील बंगाली गावच्या म्हाताऱ्याचे उद्गार आठवतात. "रंडवा होना बड़ा दुर्भाग्य है, सबके लिए. हमारा शास्त्र कुछ भी कहे ... विधुर होणे, पुरुषाआधी बाई मरणं फार वाईट. एकटी बाई सगळा संसार सावरते, चालवते. पण पुरुषाला ते जमत नाही. डब्याचे झाकण उघडावे तसा संसार उघडा पडतो. औरतमे इतनी हिम्मत है ! आदमीमे नही ..."
किती खरे आहेत हे उद्गार ! जरा अवतीभवती डोळे उघडे ठेवून पहा . अशा अनेक एकाकिनी ,नवरे असलेल्या आणि नवरे नसलेल्या दिसतील. फाटक्या पदराचा आडोसा लेकरांना सावली करून देणाऱ्या. त्यांना वाढवणाऱ्या पण ही यातायात करताना त्या मात्र निष्पर्ण वृक्षासारख्या वठून जरठून गेल्या आहेत. जीवनात माणूस म्हणून जगताना , मनात उगवलेल्या इच्छा, आकांक्षा, स्वप्ने , इतक्या निर्मळपणे फेकून द्यायला कोणी शिकवले त्यांना?
धर्माने?
समाजाने?
की त्यांच्यातल्या मातृत्वाने ?
वाऱ्याचा पदर धरून मन तरी किती खुळ्यासारखे झुलतेय?
कुठून कुठवर आले मी!
पण आता मात्र जांभळाची गोडांबी चव जिभेवरून पार उतरून गेली आहे. पावसाची झिमझिम सुरू होत आहे. लगबगत्या पावलांनी मैत्रिणी निघून गेल्या आहेत. मी नि हा त्या रसाळ जांभळीखाली उभे आहोत. थेंबाने तुटणाऱ्या पिक्या जांभळांचा सडा खाली सांडतोय. पहिल्या पावसाने सृष्टी बहाराला येतेय. पावसाच्या असोशी स्पर्शाने शहारून जाणारी धरती . इवलेसे हिरवे रेशमी शहार ... जणू जांभळीच्या झाडाखाली कुणीतरी ढोल वाजवतोय. आमंत्रण देतोय . साद घालतोय. पण या ढोलाच्या नादाने बेभान होण्याच्याही पलीकडे 'ती'चाललीय. कधी हे नाद ऐकू येतील, साद घालतील तिला? तिच्या मुक्या पावलात कधी भरून जाईल ही लय? कुणास ठाऊक!
܀܀܀