वाहत्या वाऱ्यासंगे/मेंदी
मेंदी
काळ्याभोर ढगांनी बहरलेला आषाढ आता ओसरू लागला आहे . मेघांच्या घनघोर गर्जना, विजांचा लखलखाट आणि सहस्रधारांनी ओसंडणारा आवेग, हे सारं आता थंडावलंय. श्रावणाची हसरी खुलावट जागोजाग सजली आहे. एखादी सर हळुवारपणे भुरभुरून जाते. काळीचा शेव भिजतो न भिजतो तोच सुनहरी ऊनाची नॉयलानी घडी निसटून अंगभर उलगडते. त्या कोवळ्या सोनसळीच्या स्पर्शाने मेंदी उगाच लाजते. हिरव्या लेण्याने भरलेले पानतुरे अंगोअंगी थरथरतात.
पाऊसधारात अखंड न्हालेली मेंदी आता ताजीतवानी झाली आहे ..ग्रीष्माच्या तलखीनं पान न पान कोमेजून गेले होते. निर्विकार आभाळाकडे आशेने पहात , उन्हाचे अंगार काटकुळ्या फांद्यांनी रिचवून टाकले . पायतळीची कोरडीठाण माती अन् या वाळक्या काड्या एकमेकींना धीर देत ग्रीष्माचा अंगार मुकाटपणी पिऊन गेल्या. एक दिवस नैर्ऋत्येच्या दारातून हलकीशी झुळूक आली .मेंदीच्या कानाशी लागून गेली, काहीबाही सांगून गेली . मेंदीला खुदकन हसू फुटलं . झुळकीपाठी पाऊस आला . अंगण भिजवून गेला. बावरलेल्या मातीनं मेंदीला घट्ट मिठी घातली. मेंदी काय ते उमजली अन् एक लालजर्द वीज अंगभर लखलखून गेली.
रोहिण्या बरसू लागल्या. मेंदीच्या कुंपणाशी पाण्याचे लोट वाहू लागले. साठू लागले. आकाश भरून येई. सुसाट्याचा वारा दहादिशातून भणभणत धावू लागे. वाऱ्याच्या सैराट तालावर अंग घुसळून नाचणाऱ्या थेंबधारात मेंदी सचैल भिजून जाई. जीवघेणा पाऊस आणि आषाढवाऱ्याच्या धसमुसळ्या अंगलटीत ओढ होती, ओलावा होता.
... आता आषाढाचं पाणी पिऊन तृप्त झालेले पानाचे थवे रात्रंदिवस मनमुक्त झोके घेत बसतात. आषाढ़ मालवतो आहे. श्रावणाची तरळ हवा दिशादिशांत भरून राहिली आहे. श्रावणाचं भान काही न्यारंच! सारं कसं हलकंफूल. दिवस नि दिवस तार लवून कोसळणारी धार नाही की आकाश धरती वेढणारा वाभरा वारा नाही.
क्षणात फुलणाऱ्या आणि क्षणात मिटणाऱ्या थेंबकळ्या, क्षणात हसणारं आणि क्षणात रुसणारं मलमली ऊन. ग्रीष्माच्या चढत्या उन्हाच्या रखरखाटात श्रावण स्वप्नावर मेंदी तगली. आज स्वप्नसजण दारी आला आहे. मेंदीचे रूप. रंग . गंध नव्याने मोहरले आहे .
खरं तर झाडाचं वैभव फुलांच्या बहरात असतं. पण मेंदीचं सारं लावण्य तिच्या इवल्याशा पानड्यांच्या गहिऱ्या रंगात दिमाखानं लहरणाऱ्या शेलाट्या पानतुऱ्यात साठलंय , मोराची मिजास त्याच्या पाचूच्या पिसाऱ्यात. पायाकडे मात्र नजर सुध्दा टाकायची नाही . मेंदीचंही असंच आहे . शेंड्यावर भरगच्च भरलेले हिरवेकंच पिसारे डोळे भरुन पहायचे. पायथ्याच्या हडकुळ्या खोडाकडे मुळांच नजर टाकायची नाही . पण या वाळक्या खोडाचा . हिरव्या दिमाखाला घट्ट आधार आहे हे मात्र विसरायचं नाही!
मेंदी ऐनात आली आहे . कुंपणापाशी रोज कितीतरी कोवळी पावले थांबतात . पाचूपानड्यांवरुन इवले इवले हात , तरुण अधीर हात फिरतात . पोरीबाळी परकराचे
ओचे भरभरून ताजी पानं घेऊन जातात . रात्र निघून जाते. पहाटेच्यापारी दवात भिजलेली लाल पऱ्याची जर्द विमाने मेंदीच्या कुंपणावरून निघून जातात. मेंदीच्या डोळ्यासमोर येतात लालचुटुक नक्षीदार तळव्यांची असंख्य मोरपिसे. मेंदी मनोमन तृप्त होऊन जाते.
मेंदीची कितीतरी रूपं . तळव्याच्या रेशमी पोतावर दिमाखाने मिरवणारी नखरेल लाल नक्षी . हातभरुन रंगलेली लाली. उगतीच्या आभाळासारखी. वाटलेल्या मेंदीचा हिरवाकंच गोळा, नववधूच्या पावलावर मनगटापर्यंतच्या हातावर रेखलेली ओल्या मेंदीची फुलवंती! पंचमीसाठी माहेरी आलेली गौरी मालण अंगणातल्या मेंदीची पानं अधिऱ्या हातांनी खुडते बाऽरीक वाटलेला मेंदीचा गोळा तळव्यावर, नखावर रचतांना स्वप्नांची पाखर भिरभिरतात. उद्या या केवड्यांच्या पिवळ्याधमक पात्यांवर लालचुंदडी रंगेल, पावलांच्या काठांनी गुलमोहरी साज सजेल. अशा वेळी तिच्या मनात येईल, रानपाखरासारखं उडून जावं , चिरेवंदी वाड्याच्या नजरा चुकवून थेट त्याच्यासमोर हे रंगभरे तळवे धरावेत. काय म्हणेल तो? काय वोलेल तो? रात्र अशीच उडून जाते. गोऱ्या मालिनांच्या पावलांना भान येतं , तव्हा हात रंगून लालेलाल झालेलं असतात. मेंदीत काथाच्या जोडीने गहिऱ्या आठवणींचे ओले रंग मनावर चढलेले असतात.
थेट कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत , नाहीतर द्वारकेपासून जगन्नाथपुरीपर्यंत कुठेही जा. मेंदीनं रंगलेले हात दिसणारच . भारतीय स्त्रीला मेंदीचा भलता सोस . तळव्यावर मेंदी रेखून आणि पायावर नक्षीच्या जयपुरी मुजोड्या मढवून इथेतिथे मिरवण्यात केवढा दिमाख असतो म्हणून सांगू! खेड्यातल्या अडाणी पोरीपासून ते थेट साडीच्या घोळदार निऱ्या सावरीत महाविद्यालयाच्या पायऱ्या चढणाऱ्या कॉलेज कामिनीपर्यंत .
एकदा मी दिल्लीला गेलेली . कनॉट प्लेसच्या परिसरातील राजस्थानी एम्पोरियममध्ये चक्रावून गेलेली . तिथल्या कलाकुसरीत हरवलेली . भान आले तेव्हा एक गोरी ललना . बहुदा स्वीस असावी . मला मेंदीचा कोन दाखवृन, हाताचा तळवा पुढे करून खुणवीत होती. त्यावळी मेंदीचे क्लासेस वगैरे नव्हते. दुकानाच्या कोपऱ्यात जाऊन तिच्या हातावर मी जाळीदार सूर्यफुलांची नक्षी रेखाटली . केवढा आनंद आणि कृतज्ञता तिच्या डोळ्यात, शब्दात हाती ! कितीतरी वर्षे त्या हातांवरून वाहून गेली आहेत . आम्ही एकमकींना पूर्णपणे अपरिचित , तरीही किती जवळच्या . नेहमीच एकमेकींना आटवणाऱ्या !
पहिली सर बरसून गेली की मलाही मेंदीचं खूळ लागतं. मेंदी का एरवी लावायला येत नाही? पण श्रावणातल्या उत्तररात्री रंगणाऱ्या मेंदीचा थाट काही न्याराच. श्रावणातला मेंदी खूप चढते म्हणे ! रंगते नाही , चढते . खरंखोटं मेंदीच जाणे! इतकं मात्र खरंय. माहेरचं लेकुरवाळं अंगण , एकीकडे चहाटळ वहिनींच्या चहाटळ गोष्टी ऐकत , कुणाची तरी चोरटी याद करीत , वहिनीनं चढवलेली मेंदी गहिरी रंगते.
मेंदीचा शौक उत्तर भारतात जबरदस्त . त्यातल्यात्यात राजस्थानकाठेवाडात तर खूपच . विलक्षण कातीव रेषांची जाळीदार नक्षी हात भरून काढतात या ललना. मेंदीवर कितीतरी गोड गाणी लोकगीते रचलेली आहेत. घोळदार घागरा . त्यावर चंदेरी गोटा आणि टिकल्यांचं जरीकाम माथ्यावर विंदी , विंदीशी थवकलेली पिवळ्या ठिपक्यांची , लाल चुंदडी. हातभर लाखेचा लालम् चुडा. पायातल्या चार वोटांत साखळीच्या विछुड्या आणि रंगभऱ्या साजाला खुलवणारे मेंदीभरले हात हे सारंच कसं लोभसवाणं.
राजस्थानी स्त्रियांचा कोणताही सण असो, मेंदीचा मान पहिला . लग्नाचे वा जेवणाचे आवतण द्यायला जायचे ते हिरव्याकंच मेंदीची खूण घेऊनच , लग्नात नववधूवरांना होमासाठी वसवताना त्यांचे हात मेंदीचा ओला गोळा हातात देऊन जोडून टाकतात . होम संपेपर्यंत मेंदी किती रंगली याची उत्सुकता सर्वांनाच असते. मग, मेंदी रंगली तर संसारही रंगतो म्हणा ! विच्चारी नववधू. कुणाचं लक्ष नाहीसं पाहून तळवा चोरून पहाते ती . मेंदी रंगली तर मनोमन हरखून जाते. आणि रंगली नाही तर?
मेंदी म्हणजे अहेवाचं लेणे , तारुण्याची तरारी. नवेपणाची नवलाई. समर्पणाची गहिरी खूण. मेंदीचे शेलाटे तुरे जणू तारुण्याचे रूप. ताजेतवाने , ताठर अन् तकतकित . धरणीतून शोधून घेतलेले , तिन्ही ऋतूंच्या झोक्यांनी वहरलेले जीवरस , एका रात्रीत त्या रेशमी तळव्यांना समर्पून टाकायचे. त्यांना खुलवायचे. रंगवायचे, आणि हे सार करीत असतांना स्वतः मात्र विरून जायचे. म्हणूनच ही तरुणींना प्यारी, त्याच्या प्रीतीसाठी, कीर्तीसाठी अवघ्या आयुष्याचे उत्सव ! कधी कधी नव्हे तर नेहमीच मनात येते . मंजुश्री , मीना , शोभना यांच्या हातावरची मेंदी रंगली होती ना? की...?
एक मधुर राजस्थानी गीत आहे. नवीनवेली बिनणी बहू घरात आहे . तीजेच्या आदल्या शिंजाऱ्याच्या म्हणजे शृंगाराच्या रात्री मैत्रिणीने किती सुरेख मेंदी रचली हातांवर. कौतुकाने त्याला, भंवरजीला दाखवायला गेली तर हा रुसून फुगलेला . त्याला होत होती मेंदीचीच अडचण! तो बोलेना की नजर वर करून पाहिना. बिनणी संतापली नि थेट सासूकडे आली. आपल्या अरसिक आणि भांडखोर नवऱ्याची कागाळी करू लागली.
थारा बेटा लडोकडा
कुन निरख्यो म्हारा हाथ?
मेहंदी रासणी?...
... तुझा लाडका लेक
भलताच भांडखोर नि अरसिक.
माझ्या मेंदीभरल्या हाताचं..
कोण कौतुक करणार...?
माहेरच्या अंगणातली दहादेशींच्या चिमण्यांची किलबिल अजूनही ताजी आहे. हा सुनहरी श्रावण , ही लालचुटुक मेंदी, धरती आकाशाला कवेत घेणारे उंच उंच हिंदोळे, मोहरलेलं अंगण , सारं उडून जाईल . पण रंगलेली मेंदी आणि तिच्याभोवती दरवळणाऱ्या सायीसारख्या दाट आठवणी उजळत राहतील, सुवासत राहतील, पुढचा श्रावण अंगणात येईपर्यंत ! तळव्यावर पुन्हा एकदा मेंदी रंगेपर्यंत!
܀܀܀