वाहत्या वाऱ्यासंगे/शारदा, कमला अन स्त्रीमुक्ती वर्पही !

शारदा, कमला ...अन् स्त्रीमुक्ती वर्षही !



 ही शारदा,
 वरी आहेस ना? मी विचारताना माझी नजर तिच्या उंचावलेल्या पोटावर स्थिरावलेली. ती संकोचली नि लाजली.
 हाय की वरी. वरी नसाया काय झालंय? तिच्या शब्दात खोच.
 केव्हा आलीस आईकडे ? माझा प्रश्न
 लई दीस झाले की , लगीन झाल्या झाल्या चार महिने होत्ये सासूपाशी . पंचमीला आले ती हितंच हाय की ! पुन्हा नेलंया कुठे ! आन् नवराबी हितंच हाय कॉलेजात . त्यो हितं आन् मी काय करू तिकडं जाऊन?
 कितवा महिना? हाय सातवा ...
 काय बोलावं हे तिला सुचेना. ती तशीच जमिनीकडे पहात उभी राहिली . पण मनात काहीतरी खदखदत असावे . मूळचा हळदी रंग आता आणखीनच खुललाय, नाकावरचं गोंदण इतकं सुरेख दिसतंय की मोरणी दिसतंय फिकी पडावी . पण डोळ्यांच्या कडा टोपसून आलेल्या . पायावरही सूज असावी. नजर सुन्न खिन्न.
 मोठ्या दवाखान्यात दाखवून आलीस? औषध वगैरे घेतलेस का? आणि वाताचं इंजेक्शन दिलं की नाही ? एक फालतू प्रश्न . खरं तर हा प्रश्न आपोआपच विचारला मी.
 इतका वेळ रोखलेला बांध फुटला नि ती भडाभडा बोलायला लागली. कुटचा दवाखाना नि कुटचं काय? अवं धा महिनं झालं लगीन होऊन पर त्येच्या घरचं कोरभर कापड न्हाई पोलक्याला . पातळ पार चिंधाटून गेलयं. दांड बी घालता यीना. पण कुनाला काय माया यीना माजी. हा हिते ऱ्हानार नि मी जावाभावांजवळ शेतात दिवसभर रावायचं. या लोकांच्या घरी तुकडाबी मिळाया मारामार . लाल मिल्लोची अर्धी भाकर नि चिमुटभर चटनी . कामाचं काई नाई वाटत हो- पर पोटाला पोटभर हवं की नको? अन् त्यात ह्यो कार . मोप पपया खाल्ल्या ,चोरु चोरु खाल्ल्या ,पर काई झालं नाई.
 बाईचं देखणं रूप जीवावर उठतंया . काय सांगावं तुमा लोकानला? दीराची बायकू वाळातीण . आपरीशन केलेलं. त्यो दोन म्हईने भुका . ह्ये हितं लिवायला . एकदा रातीचा काईबाई बोलाया लागला. मी इराकत कराया लागले तर तितंच आडविलं . नगं म्हणाया लागले तर म्हनला तुज्या नवऱ्याला सांगीन , तुझी बायको छिनाल हाय. काय करावं या भोगाला ? सांगा! दुसऱ्या दिशी पंचमीचं निमित्त करून थेट इथं आले ती गेलेच नाई. नवऱ्याला सरकारी पैशे मिळतात . कालरशिपीचे चाळीस नि पाच . त्यातून एकादं धडूतं घ्यावं म्हनलं तर म्हनतो भाऊ रागवल. चार म्हहिनं झालं हितं हाय. तशी त्यांचं समदं करते. खोली झाडते. दोगाबी मित्रांचा सैपाक करते. पानी ... सडा ... सरपण समदं . पर त्याला इतकुशी बी माया येईना. कदींची माय म्हणतीया . बाईकडे जा. एकादं लुगडं नि पोरांचे कपडे आण. बाळातपणात सोय हुईल. परं माझं मनच हुईना .
 बाई लगीन झालं नसतं तर होता का जंजाळ ? पर माईला कुटला ईसवास हाय? धरलं लेकरू न की बांधलं दावणीला ...
 तिचे डोळे भरून आलेलं . ती मुक्यानं , नजर नि पायाचा अंगठा जमिनीत रोवीत गच्च उभी रहाते.
 ही माझ्याघरी आली चार वर्षापूर्वी. जेमतेम अकरा वर्षांची असेल. गोरीपान , धरधरीत नाक, हिरवे गोंदण, छोटीला छान सांभाळायची. माझ्याबरोबर थेट पुण्यामुंबईपर्यंत हिंडून आली. कुणीही म्हणे कुणाची गं ? मारवाडी का ब्राह्मण? ही खरी चांभाराची पोर . अगदी सनातनी मारवाडी घरातही घरच्यांच्या पंक्तीत जेवून उठली. पण कुणाला संशय आला नाही. कामातही हिची नेहमी लुडबूड . गॅसवर चपात्या करणं ,मिक्सरवर चटण्या वाटणं ,बटाटेवडे , दहिवडे सगळं हौशीने शिकली. आम्ही घरी नसताना येणाऱ्या पाहुण्यांची कशी आवभगत करायची! कुणाला चहा द्यायचा, कुणाला जेऊ घालायचं याची गणितंही हिला पटापट जमली. एक दिवस तिची माय आली. म्हणू लागली बाई पोर शाणी झालीया, लगीन करावं म्हणते. चौदा वर्षाच्या पोरीचं लग्न. कसंसंच वाटलं. इतकी घाई कशाला? जाऊ द्या चार वर्ष. मग मी सुद्धा पाहीन चांगलासा मुलगा, मी समजावण्याचा प्रयत्न केला.
 अवं जेचा माल त्येच्या पदरात . माझ्यावर ओझं नगं. शाणी पोर घरात ठेवायची म्हंजी पदरात इस्तू बांधून ऱ्हायचं. तिचा ठोक हिशोब .
 शारदाचं लग्न झालं . अवघ्या आठ नऊ महिन्यांपूर्वी . आज माझ्यासमोर शारदा उभी होती. पंधरा वर्षांची. कृश शरीर . पिळवटलेली नजर . उंचावलेले पोट , पोटाचा भार शरीराला पेलवेनासा झालाय. मनाला तर कुठला पेलवणार? पण पोरीच्या मनाचा विचार कोण करणार? का करणार?
कमला
 कमला आलीय डोळे तपासायला , ही माझ्या अगदी दूरच्या नात्यातली. सासरेबुवांनी इथे आणून घातली. सतरंजीवर अवघडून बसलेली. उंचीपुरी, शेलाटी, चेहरा कसा दिसावा ? हातभर घुंगट काढून मान घालून बसलेली ही!
 आमी बाजारात जाऊन येताव. काई बोलणो, जिको बाईसानं बोलो. डागदरसाब थाका ससुरा लागे. ध्यानमा रखजो ...
 सासरेबुवांची सूचना . समजणाऱ्यांनी समजून घ्यावी , ती ओठातल्या ओठात काहीतरी पुटपुटली . शब्दांची खसखस नि पापण्यांची फडफड मला तलम घुंगटाआडूनही जाणवली. तिने पर्स उघडून विसाची नोट समोर टाकली . चप्पला टूटगी म्हारी. सासऱ्यांनी पैसे उचलले . काय करायची चप्पल नि फिप्पल. आजकाल छोऱ्याकी रीतही न्यारी निराली . सासरेबुवा कुरकुरत बाहेर.
 मला उकाडा असह्य झाला. दार लावून मी तरातरा आत आले नि तिचा घुंगट मागे ओढला. नही जी सासूजी. कोई देख्या तो . तिची दीनवाणी विनवणी .
 सासूजी गेली खड्डयात. घुंगट तुझा नि उकडतंय मला. हे काही धानोरे नाही नि तुझे सासरे पोचलेसुद्धा बाजारत. खुशाल खांद्यावर पदर घेऊन मोकळी होऊन बैस . आता जरा ती मोकळी झाली. अंगभर दागिने, अंगावर अगदी लेटेस्ट साडी. हातात घड्याळ , तरतरीत नाक, लांबट चेहरा, पाणीदार डोळे नि पापण्याची दाट झालर. पण त्यात अपार कारुण्य. डोळे सारखे दुखतात ही तिची तक्रार.
 का गं चुलीचा धूर सोसवेना का? मी हसून विचारले.
 ती पुन्हा गोरीमोरी झाली. गळ्यात हुंदके दाटून आले. अंग थरथरू लागले.
 माझ्या खांद्यावर माथा टेकून ती हमसून रडायला लागली.
 खरं सांगू भाबी ? रडून रडून डोळे विरघळून जाणार आहेत माझे. आंधळी होणार आहे मी. अजून सोळावं पुरं संपलं नाही तर बाईंनी लग्न लावून दिलं. विहिरीत ढकललं असतं तरी सुखानं मेले असते हो. हे जीवन सोसवत नाही मला . मग खूप रडते. खूप रडते.
 कमलचं माहेर बार्शीचं. विधवा आईची एकटी लेक , मॅट्रिकपर्यंत शिकलेली. अडुसष्ट टक्के गुण घेऊन पास झालेली . पण गरीबाची . कल्याण करण्याचा सोसही अनेकांना असतो. त्यात लग्नाची मध्यस्थी करून तर पुण्य मिळतं म्हणे . एक श्रीमंत शेटजींनी धानोऱ्याची सोयरीक आणली. आणि धर्म म्हणून लग्न करून दिले.
 मुलगा सातवी पास झालेला. थोराड अंगाचा, खेडवळ वळणाचा, आईबाप नसलेला . आजोबांच्या लाडात वाढलेला. घरी भरपूर शेती. किराणां दुकानही. सासऱ्याला हवी होती देखणी सून. सासूला हवा होता स्वस्तातला जावई मुरबी मारवाडी समाजात दहा हजाराखाली कोण हुंडा घेणार? शिवाय शेटजींना साधायचा होता पुण्यधर्म . तिघांचाही सोय झाली . लग्नाच्या सौद्यात सोय पाहिली जाते वापाच्या खिशाची . पोरगी घराबाहेर काढायची इतकच तिला महत्त्व.
 कमल धानोऱ्यात आली. सासरे सनातनी. घुंघटाची लांबी इंचाइंचानं माेजणारे. काही वाचायला मिळावं म्हणून ही आसुसायची , एकदा नवयाऱ्याने मासिक आणून दिले 'असली थेरं माहेरी करा. इथे इथल्या रीतीने रहावं लागेल,' अशी समज मिळाली.
 घरी कुणी बाई बोलायला आली तरी सासरा आतबाहेर चकरा मारणार . कुणाला चहा करावा तर कपाटाच्या किल्ल्या सासऱ्याच्या कडोसरीला . नवरा तसा वरा . पण तो दिवसभर रानात आणि दुकानात . रात्रीच भेट. तेव्हाही दुसऱ्याच बोलण्याची घाई . शिवाय आईबापावेगळे लाडात वाढवलेले लेकरू. त्याला दुखवून चालणार नाही हा धाक . कमलच्या हाती उरलंय रडणं . फक्त रडणं, डोळे विरघळेस्तो रडणं.

विमा
 परवा विमा आली होती, तिखट हळद कुटायची का विचारायला. ही डी.एड झाली आहे. लहानपणापासून कामाची सवय. चार घरीधुणीभांडी , दळणकांडं करीत शिकली. वडील लहानपणीच वारलेले . घरी आई ,ही नि दोन वर्षानी धाकटा भाऊ. आई चार घरी धुणंभांडी करायची. विमल पास होत गेली. शिकत गेली. नकळत संसाराची स्वप्नं रंगवत गेली. पण दोन वर्षे झाली डी. एड होऊन. नोकरी नाही. मामा लग्न जमवायचा प्रयत्न करताहेत. पण त्यातही यश नाही. कधी रूप आडवं येतं , तर कधी गरीबी. आज खूप रडली. लोक म्हणतात, तुमची वस्तूही अशीतशीच नि पैसाही लावणार नाही. कसा जमावा सौदा?
 "परजातीत लग्न करते का? मी पहाते एखादा होतकरू मुलगा," मी विचारले.
 काही तरी भयंकर आपत्ती कोसळावी असा तिचा चेहरा .
 परजातीत? वाई जितं मारून टाकील मामा. मला सगळं पटतं हो. पण कुणाच्या आधारावर जात तोडू मी? एकादा बिजवर जरी समोर उभा केला तरी माळ घालायची. मी म्हणजे मढं झालंय. चालणारं ...बोलणारं ...तिचे डोळे अगदी भरभरून आले. तिने पटकन डोळे पुसले नि मिरचीचा डबा घेऊन ती निघून गेली . मन अस्वस्थ होतं . पण नुसतंच अस्वस्थ. शेवटी हे अस्वस्थपणही वांझोटंच!

वीणा
 अगदी अचानकपणे वीणा भेटली. जवळजवळ बारा वर्षांनी. मन उधाणून आलं . नवरा मोठ्ठा पगारदार . घरी मिक्सी , फोन , डायनिंग टेवल सगळं . पण ही आपली बारकुळीच. मी आपली भसाभस बोलत होते. पण हिचं बोलणं काहीसं मिटमिटतं. भेटीचा आनंद फक्त चेहऱ्यावर. पण ओठ गच्चच . वीणे, जरा माझा आदर्श घे. फार नाही. थोडा. इतकी कशी गं तू बारकुडी. सुखसुद्धा सोसता येऊ नये?
 नंतर दुसरीकडून कळलं. वीणाचा नवरा खूप दारू पितो. घरात जवळजवळ नसतोच. एरवी वागायला बरा.
 एक दिवस तिचं पत्र हातात पडलं.
 "लिहू नये पण लिहिते. सगळी दृश्य सुखं आहेत. पण मुन्नीचे वडील चिकार पितात. तुला माहीतच आहे माझं माहेर किती सोज्वळ! मोकळं वातावरण होतं तिथे. त्यांचं पिणं मी नाही सहन करू शकत. प्रचंड दुरावा आला आहे आमच्यात. दूर जाऊन मुक्त होण्याची ताकदही माझ्या मध्यमवर्गीय मनात नाही. मुक्त व्हावंसं फार वाटतंय....पण समोर-क्षितिज नाही. आज वाटतंय शिक्षणानं मन .... संस्कार दिले नसते तर फार बरं झालं असतं. निदान ही गुदमर तरी निर्माण झाली नसती."
 तिचं पत्र समोर पडलंय माझ्या. मला आठवतेय दोन वेण्या झुलवित खोखो खेळणारी वीणा.

मी
 तू इथे नसलीस की बोअर होतो बुवा मी. अरे, सुट्टी आहे तोवर ताजं जेऊ घाला आम्हाला. इथेच रहा बुवा तू." तो.
 "ते काही नाही हं. मी बिहारला जाणारेय. सुट्टीतच जमतं सगळं. मग आहेच बांधिलकी." मी.
 "तिथं या दिवसांत लू असते. माणसं पटापट मरतात सन्स्ट्रोकनं. बघ बुवा. आपण काही नाही म्हणत. नाही. पण तुला सोसवेल?" तो.
 "न सोसवायला काय झालंय ऽऽऽऽ?" मी.
 "शहादा, सोमनाथ , यूथ फेस्टिव्हल ...किती हिंडलीस या वर्षात? ए बिहार वगैरे नाही हं. वाटल्यास आईकडे जाऊन ये चार दिवस . आज काय तारीख आहे ? पंचवीस . पुढच्या चार तारखेला नाईट क्रीनवर येतो मी तुला घ्यायला. निघा आजच. बघ किती उदार आहे मी!" तो

܀܀܀