सोनकणीस


 गावापासून दूरदूरवर महादेवाचे भलेमोठे तळे आहे. ऐन उन्हाळ्यातही त्यात पाण्याचे सुख उदंड साठलेले असते . निळ्याशार आकाशाचे लोभस रुपडे डोळ्यात साठविणारे संथ पाणी पहायला मी नेहमीच उत्सुक असते. शिशिरातल्या झांझरदवात न्हालेला , पहाटेच्या धुक्यात लपलेला ओला काठ पापणीत साठवून घ्यायला आवडते ते ऐन आश्विन कार्तिकातं. तळ्यातल्या संथ पाण्यावर तरंग वलये उमटत असावीत, वेल वृक्षाच्या घनदाट सावलीत ,बुंध्याला टेकून वसावे नि डोळे मिटून घ्यावेत. त्या गंधखुळ्या हवेत आपणही स्वप्नगंधा होऊन विरून जावे!
 तळ्याला लगटून केवड्याचे प्रचंड वन आहे . काट्यांनी भरलेल्या या कुरूप काटेरी रानाकडे एरवी कुणाचे फारसे लक्षही जात नाही , मोट्यामोठ्या फडेदार नागासारखी लांबचलांब हिरवी पिवळी काटेरी पाने पहिली की उरात अनामिक भयाची वीज मात्र थरकून जाते. पाय आपोआप चार पावले दुरून चालतात .सुस्तावलेल्या प्रचंड अजगरासारखे हे बन आठ महिने नुस्ते पडून असते. पायतळी सुकलेल्या पानांचा ढीग, अंगावर कोळीष्टकांची जाळी . काटेरी पानांचे वेढे असे हे शुष्क वन पाहिले की गोष्टीतली जख्ख म्हातारी चेटकीण आठवते.
 पण, एक दिवस जादूचा असतो . दक्षिणेच्या दारातून बलदंड मेघांचे सावळे थवे सुसाटत येतात. गरजून बरसून जातात. मृगाच्या स्पर्शांनी या काटेरी वनाला जाग येते . वोचऱ्या काट्यांतून तरल चैतन्याचे पाट याहू लागतात. त्या उन्मादाच्या भरात , गंधवती धरेच्या कणाकणातला सुगंधरस पिऊन केवडा वेहोष होतो. सरता ज्येष्ठ आणि आषाढाच्या ऐनातले ओढाळ पाणी पिऊन सुखावलेल्या पानांच्या मधोमध अपार गंधाची कळी आकारू लागते. पिवळ्याधमक सोनसळी रंगाचे झगमगीत सोनकणीस डोकावू लागते. त्या गर्भरेशमी दडस पानांच्या सात पदरी पडद्यांमधून फुटणाऱ्या गंधलाटा कणाकणांतून लहरू लागतात .
 केवडा म्हटला की घनदाट गंधाची लहर सुरेख पिवळ्या रंगाची, टफेटा कापडाच्या पोताची तरतरीत पाने . आणि पानांच्या दुहेरी कडांनी डोकावणारे तीक्ष्ण काटे आठवतात . शहरातून केवड्याच्या गच्च पाणकणसाची मजा क्वचितच अनुभवायला मिळणार. चार आणे फेकून मिळणारे एखादे पान घ्यायचं नि नाकाला टेकून दीर्घ श्वासात साठवायचे ! वस्स . पण माळ्याच्या दुकानातून विकत घेतलेल्या सोनकणसापेक्षा केतकीबनाचे काटेरी रस्ते तुडवून. हातापायात गेलेल्या काट्यांची सल सोशीत , महत्प्रयासाने खुडून आणलेल्या कणसातले अगदी गाभ्यातले कोवळे पान वेणीवर माळण्यात केवढे सुख असते!दर सोमवारी आम्ही तळ्यातल्या महादेवाकडे जायचोच . केवड्याच्या कणसांसाठी भाऊरायांना लोणी लावावं लागायचं. सगळ्या अटी मान्य कराव्या लागायच्या . भलामोठा टोकर घेऊन आमच्या स्वाऱ्या भर उन्हात ...अर्थात् श्रावणातलं ऊन .. तळ्याकडे जायच्या. कोणी येण्याच्या आत पाचदहा कणसांचा फडशा पाडून आम्ही धूम घराकडे यायचो. केवड्याच्या नादात नागाचे भयही विसरत असू आम्ही. मात्र ही मर्दुमकी घरी सांगण्याची हिंमत नसे. मग आईला कशा नि सारख्याच थापा मारायच्या यावर चर्चा होई. "आई ग,पक्षकार नाही का? मोराण्यांचा.. त्याने दिलीन बघ." अशी लोणकढी थाप. शिवाय,"ए तुला नव्या पद्धतीची वेणी देऊ करून?." अशी-मखलाशी वर करायची!
 पृथ्वीला गंधवती धरा म्हटले आहे. मातीच्या कणाकणांत, साठलेल्या गंधाच्या अत्तरी कुप्या फुलाफुलांतून पानापानांतून मुक्तपणे उधळून देत असते ती. सुगंध तरी किती तऱ्हेचे. जुईकळ्यांचा हळवा आर्त गंध. तर दूरवरूनही भारून टाकणारा केवड्याचा मत्तगंध ! सारेच मधुर आणि हवेहवेसे वाटणारे .
 केवड्याचे एखादेच पान घरात असले, तरी घरभर दरवळत रहाते. वरून हिरव्या, काटेरी पानांनी झाकलेले कणीस उलगडण्याचा मोह तळव्यांत काटे रुतले तरी आवरत नाही. काटेरी पाने दूर केल्यावर, आतल्या गहूरंगी, तकतकीत उभार पानांची एकमेकांत गच्च मिटलेली ओंजळ , गर्भवतीच्या तेजाने झळकणारी. एकटक न्याहाळली तरी नजर निवत नाही. फूल आणि गंध यांची सांगड चटकन जुळते. पण पानांना गंध असतो हे मानायला मन तयारच होत नाही.
 स्वर्गीय गंधाचे लेणे ल्यालेला केवडा हा पानांचाच एक प्रकार आहे. खाली बुडाशी अरुंद ,मध्यात रुंदावत, वर निमुळत्या होत गेलेल्या पन्हाळीसारखे दिसणारे केवड्याचे पान दिसते मोठे सुरेख! गोऱ्यापान ओलेतीच्या रेखीव पाठीच्या पन्हाळीसारखे, जणू दोन पाने कलती करून मधोमध जोडली आहेत.
 केतकी आणि नागांचे सख्य कथापुराणांतून सांगितलेले असते . केतकीच्या बनात नागांची वेटोळी दिसतात. कोणी म्हणतात की या साऱ्या भाकडकथा. नागाला गंध येत नाही. घ्राणेंद्रिय त्याला नसतेच. पण एक मात्र खरे, केवड्याच्या पातीचा आतून वळलेला रुंद भाग, पिवळ्याजर्द नागाच्या उभारलेल्या फण्याची उन्मेकून आठवण करून देतो... पानांचे पिवळेपण नितळ नि तकतकीत . श्रावणातल्या तलम , फिक्या उन्हासारखा हळुवार पण तेजस्वी, केतकी रंग पाहिला की जडावल्या पावलांनी भारलेला , गोरापान गर्भालस तेजस्वी मुखडा समोर उभा रहातो.
 केवड्यासारखे गोरेपण असणे भाग्याचे सौंदर्यलक्षण मानतात आपल्याकडे. 'केवड्याच्या पातीसारखी गोरीपान आहे हो सूनबाई !' असे सांगताना सासूबाईंचा आवाज कौतुकाने भरून येतो. शेवंतीचा रंग पिवळाच. पण नको तितका गडद असणारा. झेंडूचा जर्द पिवळा गोंडेदार. पण डोळ्यात खुपणारा, सोनचाफ्या पिवळा रंगमात्र मोहक असतो. पण केवड्याच्या पिवळेपणातले मार्दव त्यात नसते. पानाच्या कडेचे छोटेच पण तीक्ष्ण काटे. तर पात्याचे मधले अंग मऊसूत आणि नितळ असते. या उंची टफेटापोताला नखाएवढी जर चिरी पडली तरी सारी बादशाही शान ती बिघडवून टाकते. चिरेपाशी केवडा काळा पडतो. केवडा सुकला वा काळा पडला तरी त्याचा गंध मात्र रतिभरही कमी होत नाही. तो अक्षयच असतो. वही वा पुस्तकांच्या पानात खूण म्हणून केवड्याचे पाते ठेवले की पुस्तकालाही केवड्याचा गंध येई, पान उघडताच गंधाचे थवे अवतीभोवती उडत.
 केवड्याच्या कणसाच्या मध्यात , पिवळसर मातकट रंगाचा तुरा असतो. त्यात केवड्याची पावडर गच्च भरलेली असते. या तुऱ्यातून पानांची मुळे फुटलेली असतात. पेंढीसारखे मातकट पिवळे तुरे नि बारीक पराग. हा तुरा आपटून खाली सांडणारी पावडर तोंडाला फासण्याचे उद्योग लहानपणी सगळीच करतात. या तुऱ्यांचे छोटेछोटे तुकडे कापड्यात ठेवले तरी कपड्यांना सुरेख सुवास लागतो. शिवाय कसरही लागत नाही.
 केवड्याच्या वेण्या खूप तऱ्हांनी गुंफतात. तिपेडी वेणी, दुपेडी नागमोडी वेणी, खण बांधून कार्डावरं टाचून केलेली वेणी ; सतरा प्रकार ! वेटोळे करून वेणीत खोवले तरी छान दिसते. मला खूप आवडे . रंगापेक्षाही त्याच्या रेंगाळत्या मधुगंधाचे खरे कौतुक.
 मंगळागौरीच्या वा हरितालिकेच्या पूजेची मांडणी करताना केवड्याचे पान फडा काढून डोलणाऱ्या नागासारखे डौलदार दिसते. महादेवाला बेल प्रिय, पण पिंडीवर ठेवलेले केवड्याचे पान पाहून मन प्रसन्न होते . गणपतीबाप्पांना तर केवडा हवाच. गणेशचतुर्थीला एरवी दोन आण्याला मिळणारे पान आठ आण्याला मिळे. पण घ्यावेच लागे. आजोबा होते तोवर दर श्रावण सोमवारी केवडा घरात येत असे . केवडा महागेल या हिशेबाने गौरीगणपतीच्या आधी चार दिवस भलेमोठे सोनकणीस घरात येई. ओल्या फडक्यात नीटपणी गुंडाळून ठेवण्याचे काम आई करी. वेणीत माळायला हवे म्हणून एखादेच पान गुपचूप पळवायचे तरी हिम्मत होत नसे .
 श्रावणातल्या कलत्या दुपारी, उतरत्या उन्हात लकाकणारे सोनकणीस फार लोभस दिसते. मावळतीची मृदुल किरणे शेंड्यावरच्या कणसावर पसरतात नि केवड्याच्या पिवळेपणावर आगळीच लकाकी चढते. अशावेळी पावलं आपोआप तळ्याच्या वाटेने वळतात. हे सारे नजरेत साठवून घेताना मीच सोनकणीस होऊन दरवळत रहाते.

܀܀܀