विज्ञान-प्रणीत समाजरचना/गृहसंस्थेचे नवे स्वरूप
मजचि जैं मरण आलें । तें काय करितील स्त्रिया वाळें आसवीं डोळे लोटतीं ॥ अशी खंती पुरुष करतो म्हणून एकनाथमहाराजांनी त्याला मूढगती म्हटले आहे. (एकनाथी भागवत १७।५२४.) पण ही उदाहरणे कशाला ? संसाराची निंदा करण्याचे सुख जिव्हेने भागले नाही असा सत्पुरुषच आपणास सापडणार नाही पण विवाहसंस्थेचे अद्भुत यश यातच आहे की हे ऐकून लोकांनी तर संसार सोडले नाहीतच पण या साधूसंतांनीही ते सोडले नाहीत. आलिप्तपणे का होईना, भोगायचे नाही अशा इच्छेने का होईना ते संसारसुख भोगीतच राहिले. आता लोकांनी संसार सोडले नाहीत तरी ज्ञान विन्मुखता, तर्कशून्यता, कर्तृत्वाबद्दल निराशा इत्यादी अनेक दुर्गण या उपदेशामुळे उत्पन्न झालेच; पण विवाहसंस्था अजिबात ढासळली नाही हे काय थोडे झाले ? तेव्हा वेदान्ताच्या प्राणघातक हल्ल्यातूनही जी संस्था सहीसलामत बाहेर पडली तिला, सर्वस्वी अनुकूल असलेल्या पाश्चात्यांच्या काही तपशिलातल्या सुधारणांनी भय उत्पन्न होईल, अशी भीती बाळगणे अगदीच असमंजसपणांचे होईल.
विवाह आणि गृह या संस्थेवर कितीही जहरी टीका होत असल्या त्यावर कितीही जोराचे हल्ले होत असले तरी त्या ढासळून पडणार नाहीत व पडू नयेत अशीच सर्व विचारी पु षांची इच्छा आहे, हे मागील प्रकरणी आपण पाहिले पण त्याबरोबरच आपल्या असेही ध्यानात आले की या दोन्ही संस्था जर चिरंजीव करावयाच्या असतील तर त्यांच्या स्वरूपात व रचनेत आपणांस आमूलाग्र फरक केला पाहिजे. गेल्या दोन हजार वर्षांत व विशेषतः गेल्या दीडशे वर्षांत समाजाच्या स्थितीत, माणसांच्या मनोभावनात, नैतिक मूल्यात इतके जमीनअस्मान फरक पडले आहेत की जुन्या तत्वावर चालविलेली कोणतीही संस्था या कालात टिकून राहणे अगदी अशक्य आहे.
गृहसंस्थेची पुनर्घटना करण्यास भाग पाडणारी मुख्य गोष्ट म्हणजे स्त्रियांच्या मनात स्वातंत्र्यप्रीतीचा झालेला उदय ही होय. आजपर्यंत जगात स्त्रीला व्यक्ती म्हणून कोणीच ओळखीत नव्हते. मनुष्य जात ही फक्त पुरुषांची आणि ती कायम टिकावी, तिला सुख व्हावे, तिला मोक्ष मिळण्याची सोय व्हावी या हेतूने वापरण्यात येणारे स्त्री हे एक साधन होते. मोक्ष हे अंतिम ध्येय पण ते पुरुषांचे. स्त्री ही त्याच्या आड येणारी वस्तू म्हणून ती टाकून द्यावी. 'स्त्रक्, चंदन, वनितादि भोग' या शब्दरचनेत ही मनोवृत्ती स्पष्ट दिसून येते. स्त्रीला बंधनात ठेवता यावे यासाठी 'ज्ञानानेच मोक्ष मिळतो' हा वज्रलेप सिद्धान्तही बदलून तिला पतिसेवेने मोक्ष मिळेल अशी खात्री देण्यातही शास्त्रज्ञांनी मागे पुढे पाहिले नाही. पहिली बायको मेली तर अग्निहोत्र अडेल म्हणून दुसरी करण्यास हरकत नाही. म्हणजे पुरुषाच्या पुण्यप्राप्तीच्या सोयीसाठी स्त्री आहे. दुसरा नवरा करून स्त्रीला अग्निहोत्र घेण्यास मुळीच परवानगी नव्हती. उत्तरवयातही पुरुषाला विवाह करण्यास परवानगी देऊन त्या स्त्रीला पुनर्विवाहाची बंदी करणे या नियमात तर माणुसकीलाही फाटा दिलेला दिसतो. पुरुषाची शेवटची दहा पाच वर्षे सुखाची जावी यासाठी स्त्रीच्या सर्व जीविताचा नाश करून टाकणारे शास्त्रकार स्त्रीकडे कोणच्या दृष्टीने पहात होते ते सांगण्याची जरूर नाही. दुसऱ्याच्या जीविताचे साधन म्हणून जगणे या अत्यंत हीन कल्पनेची स्त्रीला आता चीड आली आहे व आपले जीवन हेही स्वतंत्रपणे ध्येय असू शकते, आपल्यालाही स्वतंत्र व्यक्तित्व आहे हे जगाला निर्भयपणे सांगून त्यासाठी वाटेल ती दुःखे व हालअपेष्टा सोसण्यास ती तयार झाली आहे.
स्त्री-स्वातंत्र्य, स्त्री-पुरुषांची समता हे वाद उपस्थित झाले तेव्हा प्रथम त्यावर अनेक बाष्कळ, गंभीर, प्रामाणिक, कुत्सित अशा टीका होऊ लागल्या. देह, मन, बुद्धि या सर्व बाबतीत स्त्रीपुरुषांची सामर्थ्ये सारखी आहेत असेच नव्या पक्षाचे म्हणणे आहे, असे कल्पिले जाऊन त्यावर लोक टीका करू लागले पण इतके एकांतिक विधान कोणतीही विचारी स्त्री किंवा पुरुष करणार नाही, हे उघड आहे. साम्यवादाचे महाभोक्ते जे रशियन तेही असे म्हणत नाहीत. स्त्रीला वाटेल त्या क्षेत्रांत काम करण्यास तेथे मोकळीक आहे हे खरे पण वाटेल ते याचा अर्थ विज्ञान सांगेल ते असा आहे. केवळ रूढीला ते अमान्य म्हणून स्त्रीला तेथे बंदी असे नाही. शास्त्रीय युगाचा खरा अर्थ त्यांना समजल्यामुळे डोळे मिटून ज्ञान सांगणारा ऋषी किंवा लांब झगा घालणारा पाद्री या दोघांनाही त्यांनी गुरुपदावरून हाकलून देऊन तेथे विज्ञानाची स्थापना केली आहे. प्रथम नृत्यगायनापासून लष्करापर्यंत सर्व क्षेत्रे त्यांनी स्त्रियांना खुली करून दिली आणि प्रत्येक ठिकाणी वैद्यकीय तपासणी करून दहा दहा वर्षांचे अनुभव जमेस धरून त्यावरून नियम बसविले. गर्भावर, अपत्यावर किंवा स्वतः स्त्रियांच्या आरोग्यावर ज्याने वाईट परिणाम होतो असे दिसेल ते काम- स्त्रीला कायद्याने बंद करण्यात येते. काही किलो मिटरच्यावर वजन उचलणे स्त्रीला सांगावयाचे नाही, स्फोटकद्रव्याच्या कारखान्यात ड्रिलिंग, लोडिंग वगैरे कामे ही त्यांनी करावयाची नाहीत, इत्यादि नियम आहेत. पण गवंडीकाम, मोटार चालविणे, इंजने चालविणे येथपासून वकील, न्यायाधीश किंवा मंत्री होणे ही कामे त्यांना खुली आहेत. यावरून असे दिसेल की स्त्री-पुरुषांची समता ही आंधळया किंवा हेकट दुराग्रही दृष्टीने मुळीच चालविलेली नाही. स्त्रियांना पगारही त्यांच्या कामाप्रमाणेच मिळतो. बरोबरी आहे म्हणून काम कमी असले तरी पगार तितकाच द्यावा असे नाही. तेव्हा असे स्पष्ट दिसते की शरीर, मन, बुद्धी यांच्या सामर्थ्याच्या दृष्टीने विज्ञानाने सांगितलेला प्रत्येक फरक नव्या लोकांना मान्य आहे व त्यान्वये त्यांनी समाजरचनेत भिन्न व्यवस्थाही केली आहे. पण असा फरक असला तरी, म्हणजे स्त्री-पुरुषांच्या कामांच्या क्षेत्रात फरक असला तरी स्त्री-पुरुषांच्या योग्यतेत फरक करावा हे त्यांना मान्य नाही आणि त्यामुळेच स्त्रीचे पारतंत्र्यही त्यांना मान्य नाही.
स्त्रीच्या स्वातंत्र्याच्या बाबतीत एक अगदी घोटाळ्याचा प्रश्न नेहमी उपस्थित केला जातो. स्त्री शिकली आणि बुद्धीने पुरुषाच्या बरोबरीची झाली तरी ती पुरुषापेक्षा केव्हाही दुर्बलच रहाणार; आणि हे जोपर्यंत आहे तोपर्यंत तरी तिला स्वातंत्र्य देता येणे शक्य नाही असे काही लोक म्हणतात. येथे पारतंत्र्य आणि रक्षण या दोन शब्दांचा घोटाळा होत आहे. काही झाले तरी स्त्री दुबळी रहाणार हे खरे असल्यामुळे तिला रक्षण हवे हे खरे आहे. पण रक्षण हवे याचा अर्थ पारतंत्र्य आवश्यक आहे असा मुळीच नाही. समाजात फक्त स्त्रियाच दुबळ्या आहेत असे नाही. गेली शे-दोनशे वर्षे सर्व जगभर भांडवलवाले लोक मजुरांना पिळून काढीत आहेत. इंग्लंडमधील कारखान्यात मजुरांचा अमानुष छळ होत असे. तेव्हा तो थांबविण्यासाठी सरकारने कायदे करून मजुरांचे रक्षण केले. पण मजुरांना रक्षणाची जरूरी आहे म्हणून त्यांना पारतंत्र्यही अवश्य आहे असे केव्हाही कोणीही म्हणाले नाही. तेच स्त्रीच्या बाबतीत युक्त आहे. स्त्रियांना लोक पळवून नेतात म्हणून त्यासाठी कडक कायदे करणे, किंवा एकटेदुकटे न हिंडण्याचा त्यांना उपदेश करणे हे योग्य ठरेल. आणि तसे कायदे किंवा तसा उपदेश हा इंग्लंड व अमेरिका या देशांतही चालू आहे. पण तिला रक्षण जरूर आहे म्हणून ती मताधिकाराला लायक नाही, किंवा तिने द्रव्यार्जन करणे युक्त नाही असे मुळीच ठरत नाही. स्वातंत्र्य हवे याचा अर्थ, जेथे मला धोका आहे तेथेही मला जाण्यास परवानगी असावी, असा स्त्रीही कधी आग्रह करीत नाही. पण एवढे मात्र खरे की, समाजाच्या उन्नतीची सर्व काळजी आपल्यालाच आहे, स्त्री अगदी थिल्लर व उथळ आहे. तेव्हा तिला धोका कशापासून आहे हेही आम्ही ठरविणार हा जो पुरुषांचा आग्रह तो स्त्रीने मान्य करणे शक्य नाही. तो मान्य करणे म्हणजेच पारतंत्र्य. मनुस्मृतीत स्त्रियांना पारतंत्र्य सांगितले आहे तेथे त्या शरीराने दुर्बल आहेत, म्हणून सांगितलेले नसून त्या अधम आहेत रूप, वय न पाहता वाटेल त्या पुरुषाशी संगत होतात, कितीही काळजी घेतली तरी व्यभिचार करतात म्हणून त्यांना पारतंत्र्य असावे असे सांगितले आहे. (मनु. ९,१४, १५) केवळ शरीराचे दीर्बल्यच अभिप्रेत असते तर त्यांना वेदमंत्रांचा अधिकार नाही, ब्रह्मचर्चाचा अधिकार नाही असले निर्बंध शास्त्रकारांनी घातले नसते. असो. तर मुख्य प्रश्न स्त्रीला आपण व्यक्ती समजतो का वस्तू समजतो यावर अवलंबून आहे. जुने शास्त्रकार तिच्याकडे वस्तू म्हणून पहात असत पण मनु वगैरे शास्त्रकारांचे स्त्रियांच्या शीलाबद्दलचे वर सांगितलेले मत सर्वस्वी चूक आहे. त्याही एकनिष्ठा, गांभीर्य, कडक मनोनिग्रह, अविरत उद्योग इत्यादि पुरुषी मक्त्याचे गुण वाटेल त्या तीव्रतेने दाखवू शकतात, असा इतिहास निर्वाळा देत असल्यामुळे स्त्रीला रक्षणाची जरूर असली तरी त्यामुळे तिचे स्वातंत्र्य हिराविले पाहिजे हे म्हणणे अगदी अयुक्त आहे. नीच लोक स्त्रिया पळवतात, ते स्त्रियाना वेदमंत्रांचा अधिकार दिला किंवा शिक्षण दिले किंवा मताधिकार दिला तर जास्त प्रमाणावर पळवू लागतील असे मुळीच नाही. उलट स्त्री शिकलेली असली तर पुरुषाप्रमाणेच तिचा जगाचा अनुभव आणि विचारशीलता ही वाढणार असल्यामुळे वाईट लोकांच्या भूलथापा तिला चांगल्या उमगून तिचे रक्षणच जास्त होण्याचा संभव आहे. तेव्हा रक्षण आणि पारतंत्र्य यांचा एकच अर्थ कल्पून स्त्रीचे स्वातंत्र्य हिरावण्यात काहोच अर्थ नाही. स्त्री-पुरुषांच्या भिन्न कार्यक्षेत्रातही हेच म्हणता येईल. ड्रिलिंग किंवा लोडिंग आले नाही, दोन मण वजन उचलता आले नाही म्हणून त्यावरून, आपण विवाह करावा की नाही, पति कोणचा निवडावा, अपत्यसुख भोगावे की नाही, याही बाबतीत आपल्याला स्वातंत्र्य असू नये असला विचित्र न्याय मान्य करण्यास स्त्री तयार नाही. कमालीचे शरीरकष्ट करणारा शूर शिपाई आणि सुखासनावर बसून संशोधन करणारा शास्त्रज्ञ यांची कार्यक्षेत्रे भिन्न असली तरी त्यांच्या योग्यतेत जसा फरक नाही तसाच स्त्री-पुरुषांच्या बाबतीत, त्यांची कार्यक्षेत्रे भिन्न असली तरी फरक नसावा अशी नव्या स्त्रीची मागणी आहे. आणि ती सर्वथा न्याय्य असल्यामुळे ती जमेला धरूनच यापुढची गृहव्यवस्था केली पाहिजे. आणि त्याच दृष्टीने बालविवाह, पुनर्विवाह, प्रेमविवाह, घटस्फोट इत्यादि प्रश्नांचाही विचार केला पाहिजे.
स्त्रीच्या विवाहाचे वय हा प्रश्न अनेक दृष्टीने महत्त्वाचा आहे. स्त्रीपुरुषांची उच्च सुसंस्कृत मैत्री हे जरी विवाहाचे अंतिम ध्येय असले तरी आपत्यांची निर्मिती आणि संगोपन हा काही कमी महत्त्वाचा प्रश्न नाही. समाजाच्या दृष्टीने तर त्यालाच जास्त महत्त्व आहे. तेव्हा स्त्रीच्या मनाचा विकास, पतिपत्नीमधील सलोखा व अपत्यांची सुदृढता या तिहेरी दृष्टीने स्त्रीच्या विवाहसमयीच्या वयाचा विचार केला पाहिजे.
या सर्वदृष्टीने पाहता विवाहसमयी स्त्रीचे वय २० ते २२ व पुरुषाचे २५ ते २७ असावे असे अर्वाचीन शास्त्रज्ञाचे मत आहे. 'दी सेक्शुअल लाइफ ऑफ वूमन' या ग्रंथांत हेनरीक् कीश या पंडिताने प्रश्नाचा फार बारकाईने विचार केला आहे. तो म्हणतो की ऋतुप्राप्ती हे अपत्यक्षमतेचे मुळीच चिन्ह नाही. सुप्रजा निर्माण होईल अशी स्त्रीच्या शरीराची वाढ वीस वर्षांच्या आत होत नाही (पृ. २७, १६६). १५ ते ४५ हा स्त्रीच्या अपत्यनिर्मितीचा काळ आहे. आणि समागम जितका लवकर होईल तितका हा काळ लवकर संपुष्टात येत असल्यामुळे विवाह लवकर होणे हितप्रद नाही. लवकर विवाहित होणाऱ्या स्त्रीची प्रजनन शक्ती कमी होते. पृ. १६८) आणि २० वयाच्या आत निर्माण होणाऱ्या अपत्यांत मृत्यूचे प्रमाणही जास्त असते (पृ. २३५) असे तो म्हणतो. हिंदुस्थानच्या १९३१ च्या सेन्सस रिपोर्टातही असेच सांगितले आहे. त्यांच्या मते लग्न लवकर झाले तर मुले जास्त होतात पण त्यातली मरतात जास्त. उशीरा लग्न केले तर मुले जगण्याचे प्रमाण जास्त पडते. (पृ. २०६) 'काँज्युगल हॅपिनेस' या पुस्तकात डॉ. लोवेनफील्ड यांनीही हेच मत दिले आहे. तो म्हणतो की वीसच्या आधी विवाहित झाल्याने जास्त स्त्रिया मृत्युमुखी पडतात. १४ ते १८ या वर्षात सर्वसाधारणच स्त्रियांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त असते. पण विवाहित स्त्रिया दरहजारी १४ व अविवाहित ८ च मरतात. २० ते २५ या वयात विवाहित व अविवाहित यांच्या मृत्युसंख्या जवळ जवळ सारख्या आहेत. म्हणून वीस वर्षांच्या आत विवाह करू नये (पृ. २९). Sellheim या जर्मन शास्त्रज्ञाचेही मत आपल्यासारखेच असल्याचे लोवेनफील्डने सांगितले आहे (पृ. ३२) व्हॅन डी व्हेल्डे या स्वीडिश शास्त्रज्ञाने फर्टिलिटी अँड स्टरिलिटी इन् मॅरेज या पुस्तकात हेच मत प्रकट केले आहे (पृ . १७५). स्त्रीचे आरोग्य व अपत्याची सुदृढता याखेरीज आणखीही एक मुद्दा या शास्त्रज्ञांनी सांगितला आहे. वीस वर्षाच्या आधी अपत्यासाठी स्त्रीच्या शरीराची जशी वाढ झालेली नसते तशीच मनाचीही झालेली नसते. मातृपदासाठी अवश्य असणारा मनाचा जो विकास व्हावा लागतो तो या वयात मुळीच झालेला नसतो. पंधराव्या सोळाव्या वर्षी मुलीच्या अंगचा हूडपणाही पुरता गेलेला नसतो. आणि तो जाणे इष्टही नसते. (पृ. १६६) हा मुद्दा फारच महत्त्वाचा आहे. १५ ते २० ही चार पांच वर्षे व्यक्तीच्या आयुष्यात फार रम्य अशी असतात. तारुण्याच्या बेफाट वृत्ती येथे जागृत होत असतात. नाना प्रकारची ध्येये मनापुढे तरंगत असतात. आणि पूर्ण उच्छृंखलपणे व अनिर्बंधपणे जीविताकडे पाहाणे याच वयात शक्य असते. या वयात तारुण्याचा खरा मानसिक आनंद व्यक्तीला मिळावयाचा असतो आणि कोणाच्याही प्रकारची शाश्वत स्वरूपाची जबाबदारी यावेळी खांद्यावर आली तर व्यक्ती या अलौकिक सुखाला मुकते. हा केवळ सुखाचाच प्रश्न नाही. अनिर्बंध उच्छृंखलपणा, बेफामपणा हा मनाच्या वाढीला तर आवश्य आहेच, पण शरीरावरही याचे सुपरिणाम होतात. म्हणून या वयात व्यक्तीवर शाश्वत स्वरूपाची कसलीच जबाबदारी नसणे हे फार अवश्य आहे. तारुण्याची ही सुखे, अनिर्बंधतेचा हा आनंद आर्यस्त्रीला आज हजारो वर्षांत कधीच मिळालेला नाही. तो यांपुढे तिला मिळणे न्याय्य व इष्ट आहे. म्हणून या वयात तिच्यावर मातृपद लादणे हे अयुक्त आहे. कीश् लोवेन फील्ड, व्हेल्डे वगैरे शास्त्रज्ञांची मते वर सांगितली. सुप्रसिद्ध पंडित हॅवलॉक एलिस याचेही असेच मत आहे. सॉयकॉलजी ऑफ सेक्स (खंड ४ था आवृत्ति १९३५) या ग्रंथांत जर्मन न्यूरॉलजिस्ट बेयर याचे प्रथम मत देऊन (पृ. ४७८) नंतर आपलेही मत स्त्रीचे वय वीसच्यावर असावे असेच आहे (पृ. ६३४), असे याने म्हटले आहे. पण एलिसच्या ग्रंथांत एक भानगड आहे. वैद्यक- शास्त्रज्ञांचा पुरावा म्हणून त्याने जो दिला आहे तो वीसच्या आतील विवाहाला अनुकूल आहे सोळाव्या वर्षीच्या आतील स्त्रियांची प्रसूति सुखाची होते, त्याची अपत्ये चांगली होतात, असाच शास्त्रीय पुरावा त्याने दिला आहे. पण असे असूनही आपले मत म्हणून देताना त्याने वीसनंतरच स्त्रीला अपत्य व्हावे असे दिले आहे. हे पाहून आपले स्वयंमन्य समाजशास्त्रज्ञ जोशीबुवा त्यांच्यावर फारच संतापले आहेत. एलिसची विद्वत्ता बाहेर काढून ते म्हणतात (हिंदूचे समाज रचनाशास्त्र. पू. ३५७) शास्त्रीय ज्ञानांशी विरोधी वर्तन करण्याचा कोणाही स्त्रीला किंवा पुरुषाला हक्क नाही. सोळाव्या वर्षाच्या आत प्रजा झाली पाहिजे असे शास्त्राने सांगितले की ती झालीच पाहिजे. बुबांची ही शास्त्रावरची श्रद्धा पाहून कोणीही स्त्री किंवा पुरुष त्यांचे कौतुकच करील. कारण साऱ्या पुस्तकात इतकी शास्त्रनिष्ठा त्यांनी कोठेच दाखविलेली नाही. पण वैद्यकीय पुरावा थोडा विरूद्ध असूनही एलिसनने विसाव्या वर्षामधी स्त्रीने लग्न करू नये असे म्हटले आहे त्याचे कारण उघड आहे. मानवी समाजाबद्दल बोलतांना कोणत्याही एकाच शास्त्राचा विचार करून कधी भागत नाही. सेक्स इन सिव्हिलिझेशन या ग्रंथात एका लेखकाने या प्रश्नाचे फार सुरेख विवेचन केले आहे. तो म्हणतो, मानवी शास्त्रांचा फार मोठा दोष म्हणजे असा की एखाद्या प्रश्नाचा विचार करताना एकाच अंगावर जोर देऊन इतर बाजूंचा ती विचार करीत नाहीत. मानसशास्त्र व्यक्तित्वावर सर्व भर देऊन परिस्थितीचा विचारही करीत नाही. अर्थशास्त्र व समाजशास्त्र परिस्थितीवर सर्व भर देऊन मानवाच्या अंतःशक्तींना गौण मानतात. तर्कशास्त्र हे जीवनशक्तीचा विचार करीत नाही आणि जीवनशास्त्र व सुप्रजाशास्त्र ही अगदी हास्यास्पद एकांतिकपणा करतात. ही एकांतिक विचारसरणी हा मानवी शास्त्रामध्ये असलेला फार दोष मोठा आहे (पृ. २४८). जोशीबुवांना हे ज्ञान नाही असे नाही. पण ज्ञानी असून अज्ञानी हीच तर बुबांची मुख्य खुबी आहे. व्यक्तीला जीवित ही मौल्यवान वस्तू वाटली पाहिजे, तिचा वीट येऊन उपयोग नाही. नाहीतर समाजस्वास्थ्य बिघडेल असे शास्त्र त्यांनीच सांगितलं आहे. (पृ. २८२) . तरी पण अध्यात्मिक दृष्ट्या वीट आलाच पाहिजे असेही ते म्हणतात. यावरून शास्त्रांनी काही सांगितले तरी दुसऱ्या काही सोयीसाठी ते अमान्य करणेबुवांना पसंत आहे हे उघडच आहे. असो. मातेचे व मुलाचे आरोग्य, स्त्रीची मानसिक वाढ, इत्यादि सर्व दृष्टींना २०/२१ हेच वय स्त्रीच्या विवाहाला कसे योग्य आहे हे आपण पाहिले. सुप्रसिद्ध पंडित सर फ्रॅन्सिस गाल्टन याचेही मत असेच आहे. लवकर विवाह व्हावा असे त्याचे मत असे. ते कोणी बालविवाहाकडे खेचू नये म्हणून त्याचा शिष्य कार्ल पियर्सन याने खुलासा केला की सुदृढ व सुसंस्कृत स्त्रियांनी २८, २९ या वयापर्यंत विवाह न लांबविता २१, २२ या वयातच विवाह करावा असे गाल्टनचे मत होते (लाईफ अँड लेटर्स ऑफ फ्रान्सिस गाल्टन खंड ३ पृ. २३३).
आणखी एका महत्त्वाच्या मुद्याचा विचार करावयास हवा. सेक्स इन सिव्हिलिझेशन या ग्रंथात डॉ. हॅमिल्टन यांनी कित्येक विवाहित स्त्रियांना समागमापासून उत्कट रतिसुख मिळत नाही, असे का व्हावे या प्रश्नाचा विचार केला आहे. एकंदर नऊ कारणांचा विचार करून त्यांनी शेवटी असा निकाल दिला की ज्या स्त्रियांच्या मनावर लहानपणी विषयसुख हे निंद्य, नीच प्रकारचे आहे, सभ्य माणसांनी स्त्री-पुरुषांच्या भिन्न देहाचा विचार करणे पाप आहे इत्यादि संस्कार झालेले असतील त्या स्त्रिया वैवाहिक आयुष्यात रतिसुखाला मुकतात. नकळत झालेले हे मनोगंड त्यांच्या सुखाच्या आड येतात. हा विचार करून निबंध संपविताना त्यानी स्त्रीच्या वयाचा विचार केला आहे. तेथे ते म्हणतात की प्रथम समागमाच्या वेळी स्त्रीचे वय कमी असण्याचा रतिसुखावर वाईट परिणाम होत नाही, उलट चांगलाच होतो. पण हे सांगताना लोकांनी विपर्यास करू नये म्हणून त्यांनी परिच्छेदाच्या आरंभीच सांगितले आहे की पुढे दिलेल्या गोष्टीचे फक्त साहचर्य मानावे. त्यात कार्यकारण संबंध आहेच असे नाही. (Let us now consider matters related to the lack of climax, but not necessarily causes of it. पृ. ५७७) याचा स्पष्ट अर्थ असा की रतिसुख न मिळण्याचे खरे कारण म्हणजे लहानपणी मनावर त्याविरुद्ध झालेले संस्कार हेच होत. ते जर नसतील तर वयाचा संबंध रतिसुखाशी फारसा येणार नाही. इतके स्पष्टीकरण स्वतः लेखकाने केले असूनही आमच्या जोशीबुवांनी त्याचा विपर्यास करून त्यात कार्यकारण भाव जोडून दिला आहे (पृ. ३४८).
मॅथू डंकन याचे बाबतीत जोशांनी असाच घोटाळा केला असावा असे वाटते. पंधरा ते वीस हाच आयुष्याचा टप्पा स्त्रीच्या बाबतीत जास्त फलप्रद असतो असे डंकनचे मत म्हणून त्यांनी दिले आहे. (पृ. ३४०) पण डार्विनिझम व रेस प्रोग्रेस या पुस्तकात हेक्रॅफ्ट म्हणतो- Mathew Duncan concludes that women who marry from twenty to twenty four are the most prolific and that, the only period which at all rivals this, is the five years from fifteen to nineteen inclusive (पू: १४४). याचा अर्थ १५ ते २० हाच काळ जास्त फलप्रद असतो असा नसून 'मुख्यतः २० ते २४ हा काळ फलप्रद असतो. व १५ ते १९ हा काळ त्याची बरोबरी करू शकेल' असा आहे.
Diseases of Women या आपल्या ग्रंथात ब्लॅडसटन व जाइलस् या दोघा डॉक्टरांनी मॅथू डंकनच्या आकड्यांचा उताराच दिला आहे. त्यात १५ ते १९ च्या दरम्यान ज्या स्त्रिया लग्न करतात त्यांच्यात वंध्यत्वाचे प्रमाण शेकडा ७.३ असते आणि २० ते २५ च्या दरम्यान लग्न करणाऱ्या स्त्रियात हेच प्रमाण शेकडा शून्य असते' असे डंकनचे मत म्हणून त्यांनी दिले आहे (पृ. ४०७). डंकनचे पुस्तक आज हातात नाही, म्हणून मी नक्की सांगू शकत नाही. पण जोशीबुवांची विनोदी वृत्ती ध्यानात घेतली व वरील दोन उतारे पाहिले म्हणजे बुवांनी घोटाळा केला असावा असेच वाटू लागते.
रतिसुखाच्या बाबतीत आणखीही एक महत्त्वाचा विचार डॉ. हॅमिल्टन यांनी सांगितला आहे (पृ. ५७६). ते म्हणतात- ऋतुप्राप्तीच्या आधी चारपाच वर्षे कामसुखाच्या कल्पनाही मुलीच्या मनात न येणे हे तिच्या वैवाहिक आयुष्यांतील उत्कट रतिसुखाच्या दृष्टीने फार हितावह आहे. या वयात या विषयाची जाणीवही ज्यांना नसते, किंवा यापासून ज्यांना अलिप्त ठेवण्यात येते त्यांना विवाहानंतर रतिसुख जास्त मिळते. ज्या या विषयांचा विचार करतात त्यांना ते मिळत नाही. यावरून या काळात मुलीचा विवाह न करणे तिच्या पुढील रतिसुखाच्या दृष्टीने किती हितावह आहे ते सहज ध्यानात येईल. म्हणजे विवाह पंधरा वर्षांनंतर व्हावा एवढे तरी यावरून निर्विवाद सिद्ध होईल.
लोकसंख्येचा प्रश्न उपस्थित करून प्रौढविवाह व स्त्रीशिक्षण यावर एक मोठाच आक्षेप घेण्यात येत असतो. जी स्त्री शिकत नाही ती पंधराव्या वर्षी प्रजोत्पादनास सुरुवात करते व जी शिकते ती २३ व्या वर्षी करते. म्हणजे स्त्रीशिक्षण नाही तेथे १५ वर्षांनी पिढी बदलणार व आहे तेथे २३ वर्षांनी बदलणार. याचा अर्थ असा की एका शंभर वर्षांच्या अवधीत सुधारलेल्या व न सुधारलेल्या समाजात प्रजेचे प्रमाण २०:८० असे होणार. आणि म्हणून स्त्रीशिक्षण व त्यामुळे येणारा प्रौढ विवाह हा घातक आहे असा हा पक्ष आहे.
पण हे विवेचन अगदी चुकीचे आहे. एक तर लवकर झालेली संतती जास्त मृत्युमुखी पडते व मातांचे आरोग्यही त्याने बिघडते असे बऱ्याच डॉक्टरांचे मत असल्याचे वर सांगितलेच आहे. दुसरे असे की, हे जे दोन गट आहेत ते एकाच समाजात असले, म्हणजे यांच्यात मारामारी नसली तर समाजातल्या अमुक एका गटात प्रजा कमी होते याला भिण्याचे काहीच कारण नाही. सांस्कृतिक दृष्ट्या जो जो वर जावे तो तो प्रजोत्पादन शक्ती कमी होते असे एक मत आहेच. पण तेवढ्यासाठी संस्कृतीहीन राहणे हे जसे आपण पत्करीत नाही, तसेच येथे केले पाहिजे. बरे, या दोन गटात मारामारी आहे असे धरले तर काय होईल याचा विचार आपण लोकसंख्येची वाढ व नियमन या प्रकरणात केलाच आहे. युद्धांतले यश हे संख्येवर मुळीच अवलंबून नसून कर्तृत्वावर असते. ब्राह्मण, क्षत्रिय वगैरे मूठभर लोकांनी चार हजार वर्षे हिंदुस्थानवर राज्य केले ते संख्येच्या बळावर नसून अकलेच्या बळावर केलेले आहे. तेव्हा अकलेच्या प्राप्तीसाठी संख्या घटली तरी फारशी हरकत नाही. शिवाय हॅवलोक एलिसचा, मागे एकदा सांगितलेला महत्त्वाचा उपदेशही विसरणे युक्त नाही. समाजातील शांतता व स्थिरता टिकून राहण्याच्या दृष्टीने पिढी लवकर पालटणे हे अगदी अनिष्ट आहे असे तो म्हणतो. (टास्क ऑफ सोशल हायजीन पृ. १५१) या दृष्टीनेही बालविवाह अनिष्ट आहे.
माझ्यामते बालविवाह हा स्त्रीच्या व्यक्तित्वाच्या विकासाच्या आड येतो, एवढाच मुद्दा त्याच्या निषेधास पुरेसा आहे. अपत्याचे संगोपन, गृहव्यवस्था, या दृष्टीने स्त्रीशिक्षण अवश्य आहेच. स्त्री-पुरुषसंबंधविषयक शिक्षण तिच्या रतिसुखाच्या व इतरही अनेक दृष्टीने तिला मिळणे हेही अवश्य आहे. आणि तिच्या मनाच्या वाढीच्या दृष्टीने वाङ्मयीन शिक्षणाचीही आवश्यकता आहे. असे असताना भावी पिढीच्या दृष्टीने तिला या सुखाला मुकविणे म्हणजे तिच्या स्वतःच्या जीविताचा विचार न करण्यासारखे आहे. भावी पिढीची जबाबदारी प्रत्येक स्त्रीपुरुषावर आहे यात शंकाच नाही. पण तेवढ्यासाठी उच्च संस्कृतीचा आनंद सर्वस्वी नष्ट होत असेल तर ती काळजी करणे म्हणजे मूर्खपणाचे आहे. कारण समाज संस्कृतीच्या वरच्या पायरीला जाणे, हे तर समाजाचे ध्येय आहे. आणि समाजात स्त्रिया येतातच. तेव्हा प्रथम त्यांच्या मनोविकासाची काळजी घेणे हे अवश्यच आहे. पण सुदैवाने भावी पिढी आणि स्त्रीशिक्षण यात विरोध येतच नाही. उलट भावीपिढीच्या दृष्टीनेही स्त्रीशिक्षण व प्रौढविवाह अवश्य आहे. तेव्हा प्रजेचा हा मुद्दा अगदीच फोल आहे.
स्त्रीच्या विवाहाच्या वयाचा येथवर विचार केला. पुरुषाच्या विवाहाचे वय २५ असावे असे शास्त्रज्ञांचे मत वर सांगितलेच आहे. यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की, स्त्री व पुरुष यांच्या वयात ५ वर्षांचे तरी अंतर असले पाहिजे. विसाव्या वयाला स्त्रीच्या देहाची व मनाची जी वाढ होते तीच पुरुषामध्ये होण्याला २५ वे वर्ष येते. म्हणून हा फरक असणे जरूर आहे. काहींच्या मते जास्तीत जास्त अंतर दहा वर्षे असण्यास हरकत नाही. पण त्यापेक्षा जास्त अंतर असणे पतिपत्नीचे वैवाहिक सुख आणि पुढील प्रजा या दोन्ही दृष्टीने अनिष्ट आहे. (डॉ. हेनरीक् कीश् पृ. १६२) (डॉ. लोवन फील्ड पृ. २८) यावरून १२ वर्षाची मुलगी व ३० वर्षाचा मुलगा किंवा ८ वर्षाची मुलगी व २४ वर्षाचा मुलगा असावा हे मनूचे मत (मनुस्मृति ९.९४) विज्ञानाला मान्य नाही, एवढे तरी लोकांनी ध्यानात घ्यावयास हवे. धर्म, परलोक, मोक्ष या दृष्टीने मुलगी किती वर्षाची असावी हे सांगणे शक्य नाही. कारण या बाबतीत कोणालाच काही माहीत नसते. आणखीही एक गोष्ट अशी ध्यानात येईल की पुरुषाला तीस-पस्तीस वयानंतर विवाहाला परवानगी ठेवून स्त्रीला पुनर्विवाहाची बंदी ठेवणे हे सुप्रजेच्या दृष्टीने फार घातुक आहे. (कारण त्या पद्धतीने पतिपत्नीच्या वयात फार फरक पडतो.)
पुनर्विवाहाच्या बाबतीत आणखीही एक दोन मुद्यांचा विचार करणे अवश्य आहे. ज्या पुरुषाशी स्त्री समागम करते त्याच्या वीर्याचा परिणाम तिच्यावर कायम राहून पुढे तिने दुसरा पति वरिल्यास त्या प्रजेवर पहिल्याचे परिणाम होतात असा पूर्वी समज होता. यादृग्गूणेन भर्त्रा स्त्री संयुज्येत यथाविधि । तादृग्गुणा सा भवति समुद्रेणेव निम्नगा- (मनु ९-२२) या श्लोकात हेच तात्पर्य असावे असे वाटते. आणि यामुळेचं प्राचीन शास्त्रकारांनी स्त्रीला पुनर्विवाहाची बंदी केली असावी पण एक तर ही कल्पना आता असिद्ध ठरली आहे. इंग्रजीत हिला टेलिगनी असे नाव आहे व टेलिगनी असिद्ध आहे असे आता शास्त्रज्ञांनी मान्य केले आहे. (सायन्स ऑफ लाइफ- हक्सले व वेल्स, पृ. ३१०) मागल्या लोकांचा टेलिगनीवर विश्वास होता म्हणून त्यांनी विधवा पुनर्विवाहास बंदी करणे युक्त होते असे कोणी म्हणेल व त्यात थोडासा सत्यांशही आहे. पण केवळ सुप्रजेच्या दृष्टीने पाहिल्यास अक्षतयोनि स्त्रियांना ही बंदी त्यांनी करावयास नको होती. पण तीही त्यांनी केली आहे. यावरून स्त्रीच्या सुखाचा ते सर्वांगीण विचार करीत नसत हेच दिसते. आणि हे नियम केवळ सुप्रजेच्या दृष्टीनेच केले नव्हते हेही यावरून दिसते. आणि मग मोक्षाच्या दृष्टीने केले असल्यास स्त्रीने पुन्हा लग्न केल्यास तिला मोक्ष मिळणार नाही, व पुरुषाने केले तरी त्याला मिळेल हे त्यांनी कसे ताडले असावे हे नेमके ध्यानात येणे फार कठिण आहे. ते काही असले तरी, स्त्री पुरुषांच्या वयात फार अंतर असणे घातुक आहे, टेलिगनी असिद्ध आहे, आणि स्त्रीला जीवितात सुख लागले तरी चालेल असा नवा दृष्टिकोन आहे, म्हणून पुनर्विवाहाला बंदी करणे युक्त होणार नाही.
प्रेमविवाह हा विवाहाचा नवीनच प्रकार अलिकडे रूढ होत आहे. तो अत्यंत इष्ट आहे यात शंकाच नाही. पण त्या बाबतीत बऱ्याच भ्रामक समजुती रूढ झाल्या आहेत त्यांचा विचार केला पाहिजे. जिचे मी तोंडही पाहिले नाही त्या मुलीशी माझा संसार सुखाने कसा व्हावा, अशा तऱ्हेचा प्रश्न प्रेमविवाहाच्या बाजूने लोक विचारतात. पण यात गृहीत धरलेली कल्पना चूक आहे. कारण पूर्ण परिचयानंतर, मनं एकमेकांवर पूर्णपणे अनुरक्त झाल्यानंतर जरी विवाह केला तरी तो सुखाचा होतोच असे नाही. युरोपांतील बहुतेक सर्व विवाह प्रेमविवाहच होतात. तरी कित्येक वेळा विवाहाच्या दुसऱ्याच दिवशी घटस्फोटासाठी अर्ज झालेले दिसतात. 'ट्रू स्टोरी' या अमेरिकेतील मासिकात बहुतेक सर्व कथा प्रेमाच्याच आहेत. त्या वाचल्या म्हणजे प्रेम ही एक फार विचित्र कल्पना आहे, तिला नियम असा एकही सांगता येणार नाही असे स्पष्ट दिसून येते. विवाहाच्या आधी असलेले प्रेम दोन दिवसात किंवा कित्येक वेळा दहा वर्षांनी सुद्धा नाहीसे होते. तर उलट आरंभी मुलीचे प्रेम नसताना विवाहानंतर हळूहळू प्रेम जडते. पुष्कळ प्रेम जडले असे वाटून विवाह करावा तर काही वर्षांनी असे ध्यानात येते की अरे ते खरे प्रेम नव्हते ती केवळ विषयवासना होती. प्रेमाचे प्रकार हे असे आहेत. पण उलट लहानपणी आईबापांनी लग्ने लावून दिली तर ती सुखाची होतात हेही खरे नाही. म्हणून शेवटी विवाहातील सौख्य हे केवळ नशिबावर अवलंबून आहे हे जेन ऑस्टिनचे म्हणणेच खरे वाटू लागते. पण हे काही असले तरी विवाहाला पतिपत्नीमधील प्रेम अवश्य आहे हे निर्विवाद आहे. आणि ते प्रेम दोन व्यक्ती जितक्या सम संस्कृतीच्या असतील तितके जास्त शक्य आहे हेही खरे आहे. या बाबतीत जुने लोक नेहमी असे विचारतात की आमच्या बायका शिकलेल्या नव्हत्या तरी आमचे काय बिघडले? आमचे संसार सुखाचे झालेच ना? यावर या लोकांना असा प्रश्न विचारता येईल की समजा जातिभेदाचे निर्बंध आपल्याकडे नाहीत, तर अशा स्थितीत कैकाड्याच्या मुलीशी तुम्ही लग्न कराल का? आणि करणार नसाल तर का करणार नाही? हे लोक या प्रश्नाला नेमके उत्तर देऊ शकणार नाहीत. पण आपल्याला देता येईल. ते उत्तर असे की कैकाडीण अशिक्षित असते आणि यांनी निवडलेली मुलगी सुशिक्षित असते. यांच्या ज्या स्वच्छतेच्या कल्पना असतात, त्याच तिच्या असतात आणि कैकाडणीच्या नसतात. रोज अंग धुवावे, वस्त्रे स्वच्छ असावी, केसात उवा नसाव्या या गोष्टी मराठे, ब्राह्मण, प्रभू, इत्यादि उच्च वर्गातल्या मुलींना शिकविलेल्या असतात. त्याचप्रमाणे राम, सीता ही नावे उच्चारली तर ब्राह्मण मुलीला काही बोध होतो तो कैकाडणीला होत नाही. आणि या मुलीला हा बोध होतो म्हणूनच या वरील मंडळींचा संसार तिच्याशी सुखाने होऊ शकतो. स्वच्छता नसेल, राम सीता, रामायण, महाभारत या कल्पनाच माहीत नसतील, शुद्धवाणीचा अभाव असेल. विनयाचे शिक्षण नसेल तर जुन्या लोकांनाही संसारात राम वाटणार नाही. आणि ते त्या वेळी जे उद्गार काढतील त्याची भाषा जरी निराळी असली तरी त्याचा अर्थ हाच असेल की स्त्री सुशिक्षित नाही. त्या वेळी जर कैकाडी जवळ असला तर तो असेच म्हणेल की माझा संसार कोठे वाईट झाला? राम सीता माहीत नसले म्हणून काय बिघडले? केस रोज विंचरले नाहीत म्हणून काय झाले? त्याचा हा प्रश्न जसा वेडगळ तसाच मुलीला कालिदास, शेक्सपियर नाही आला म्हणून काय झाले, केशरचना सुरेख आली नाही म्हणून काय बिघडले हाही प्रश्न वेडगळ आहे. याचा अर्थच असा की आचार विचारांच्या ज्या पायरीवर मी उभा आहे. त्याच पायरीवर माझी पत्नी उभी असावी असे पुरुषाला वाटत असते.
वेस्टर मार्कने आपल्या फ्यूचर ऑफ मॅरेज या ग्रंथात आपले म्हणून नमूद केलेले अनुभव या दृष्टीने मननीय आहेत. तो म्हणतो- पतीच्या बौद्धिक जीवनात स्त्री जेथे सहकार्य करते तो विवाह जितका सुखप्रद होतो तितका इतर कधीच होत नाही. आणि सांस्कृतिक समता हेच या सुखाचे कारण म्हणून त्याने दिले आहे. त्यात असेही सांगितले आहे की कॉलेजमध्ये एकत्र शिकत असलेल्या तरुण-तरुणीमध्ये जे विवाह होतात त्यात सुखी दंपतीचे प्रमाण इतर विवाहापेक्षा पुष्कळच जास्त असते. अमेरिकेतील एकंदर विवाहात दर ७ विवाहात १ घटस्फोट होतो. तर कॉलेजमधून झालेल्या विवाहात ७५ विवाहास १ घटस्फोट असे प्रमाण पडते (पृ. ४१) . या गोष्टीचाही अर्थ असाच की पतिपत्नी समभूमिकेवर असतील तर विवाह जास्त सुखप्रद होतो. सायन्स ऑफ लिव्हिंग या पुस्तकात अलफ्रेड ॲडलर याने हेच मत दिले आहे. तो म्हणतो की पतिपत्नीचे नाते जेव्हा पूर्ण समतेचे असेल तेव्हाच प्रेमाला योग्य मार्ग लागून विवाह सुखाचा होईल.
प्रेमविवाहाला, आणि स्त्रीपुरुषांच्या सांस्कृतिक समतेला शास्त्रज्ञ पाठिंबा देत असले तरी दर्शनी प्रेम, हुरळते प्रेम, शब्दांतीत असलेले असे काही प्रेम याचा ते निषेधच करतात. प्रेम हा विकार असला तरी विचाराच्या सुकाणूवाचून जर तो भरकटू लागला तर विवाहनौका खडकावर आपटण्याचा संभव जास्त आहे असे त्यांचे मत आहे. प्रेमविवाह (Love marriage) आणि विचारपूर्वक केलेला विवाह (marriages of reason) असा फरक करून दुसऱ्या पद्धतीने केलेले विवाह जास्त सुखप्रद होतात असे ब्लॉक् याने आपले मत दिले आहे (Sexual life of our Times पृ. २०४) वेस्ट मार्कचेही मत तेच मत आहे.
या सर्वांचा निष्कर्ष असा की विवाहात आणि विवाहापूर्वी प्रेम हे अत्यंत आवश्यक असले तरी ते आंधळे असून उपयोगी नाही. व्यक्तीचे कुल, शिक्षण, तिचे आचारविचार हे जितके सम असतील तितकी प्रेमाला स्थिरता जास्त येणार असल्यामुळे केवळ दर्शनी प्रेमाकडे लक्ष न देता वरील सर्व गोष्टींकडे लक्ष पुरविले पाहिजे. इतकेच नव्हे तर आरोग्य, सांपत्तिक स्थिती या गोष्टीचाही त्यांत विचार झाला पाहिजे. हा सर्व विचार वधूने किंवा वराने एकट्यानेच करावा असे कोणीच म्हणणार नाही. पण आपले एकमेकांवर प्रेम बसेल का नाही याचा जो काही थोडा अदमास करावयाचा तो त्यांना बराच शक्य असल्यामुळे त्यांना त्यांत प्राधान्य दिले पाहिजे त्यात वादच नाही. त्या वयात ते विकारी असल्यामुळे वाटेल ती निवड करतील हे म्हणणे युक्त वाटत नाही. कारण एक तर ते खरे नसते. आणि दुसरे म्हणजे आईबाप हे कामविकारांनी वाहवलेले नसले तरी इतर अनेक विकारांनी वाहवलेले असतात. हुंड्याच्या आकड्यावर मुलामुलीचा सवदा पटविणारे पुष्कळ आई- बाप आजही आहेत. म्हणून पतिपत्नीनाच स्वतःची निवड करू देणे हे फार इष्ट आहे. प्रेमाची शक्यता त्यात जास्त आहे हे तर खरेच, पण दोघांच्याही व्यक्तित्वाला त्यात अवसर मिळाल्यामुळे त्यात मनाचा विकासही साधत असतो. माझ्यामते तर हाच फायदा सर्वात मोठा असतो प्रेमविवाहाच्या बाबतीत हॅवलॉक एलिसचे मत पुढील प्रमाणे आहे. प्रेमाने ज्या निवडी होतात त्या वाटेल तशा व समाजाला हानिकारक होतात असे नाही, तर उलट हितप्रदच होतात. प्रेम हे आंधळे असते हे तितकेसे खरे नाही. त्यातही काही नियम सापडतात. इतकेच नव्हे तर सुप्रजाशास्त्राने केलेली निवड आणि प्रेमाने केलेली निवड यात फारसा फरक पडणार नाही. (टास्क ऑफ सोशल हायजिन पृ. २०५, २०९). असे खरोखरच असेल तर फारच चांगले आहे.
या सर्व विवेचनाचा सारांश असा की स्त्रीपुरुषांतली उत्कट मैत्री हे विवाह संस्थेचे जे ध्येय आहे तिला प्रेम हे अत्यंत अवश्य आहे. पतिपत्नीमध्ये सांस्कृतिक समता जितकी जास्त तितकी प्रेमाची शक्यताही जास्त असते आणि मातृपितृपदाची जबाबदारी ज्यांच्यावर टाकण्यास आपण तयार होतो त्यांच्यावर परस्परांची निवड करण्याची जबाबदारी टाकणे हे मुळीच वाईट नाही. स्त्रीपुरुषांची उत्कट, अनन्य मैत्री हे एक अत्यंत श्रेष्ठ प्रकारचे मानसिक सुख आहे आणि पूर्ण आत्मनिग्रह करूनच ते मिळविणे शक्य असते अनन्यतेची भूक सर्वांनाच असते पण मनाची विशेष वाढ झालेली असल्याखेरीज ते अनुभवण्याची पात्रता व्यक्तीला कधीच येत नाही. 'वूमनस् बेस्ट इयसस' या पुस्तकांत वुल्फ म्हणतो 'एक पत्नी हा विवाहाचा अत्युच्च प्रकार होय. पण या श्रेष्ठ सुखाचा आस्वाद घेण्याइतकी फारच थोड्या व्यक्तींची मानसिक वाढ झालेली असते.' लेखकाचे हे म्हणणे अगदी खरे आहे आणि म्हणून इतर मानसिक सुखाची आवड समाजात वाढविणे हे जसे समाजनेत्यांचे काम आहे तसेच या सुखाची आवड वाढविणे हेही आहे. आपण अनन्य न होता दुसऱ्यानेच फक्त असावे अशा असत् अभिरुचीचेच सामान्यतः लोक असतात. म्हणजे अनन्य निष्ठेची किंमत अनन्य निष्ठेने देण्यास लोक तयार नसतात. ती देण्यास लोक ज्या समाजात जास्त तयार होतील तो समाज जास्त सुखी होईल.
आतापर्यंत जे विवेचन केले ते केवळ शास्त्राकडे दृष्टी ठेवून, उत्तम व्यवस्था कशी असू शकेल. या धोरणाने केले. पण मानवाचे मन, सृष्टीची रचना, आणि सृष्टिकर्ता कोठे असला तर त्याची शक्ती, ही सर्व दोषपूर्ण असल्यामुळे उत्तम म्हणून ठरविलेल्या नियमांना पावलोपावली अपवाद आणि मुरडी घालाव्या लागतात हे कोणाही जाणत्यांच्या ध्यानांत येईल. स्वाभिमान हा सद्गुण फार श्रेष्ठ असे आपण मानतो आणि त्यावाचून जिणे व्यर्थ असेही समजतो. पण व्यवहारात उतरलेल्या कोणाही माणसाचा अनुभव विचारला तर तो असेच सांगतो की स्वाभिमान ठेवून कोठेच चालत नाही. जेथे नमणे अत्यंत दुःसह वाटते तेथेही पावलोपावली नमावे लागते. सत्य भाषण करावे, क्षमावृत्ती असावी इत्यादि नियमांची हीच स्थिती आहे. असत्य हे अपवादात्मक नसून जगाचा तोच नियम होऊन बसलेला दिसतो. आणि स्वाभिमान, सत्यनिष्ठा यांना चिकटून कोणी स्वतःचे नुकसान करून घेऊ लागला तर व्यवहारी लोक त्याला मूर्ख समजतात. स्वाभिमान पराकाष्ठेचा ठेवला तर केवळ व्यवहारी दृष्टीनेच तोटा होतो असे नसून ज्या स्वाभिमानासाठी आपण हाल सोसण्यास तयार होतो तोच उतरत्या स्थितीला लागतो. सृष्टिरचनेची ही अपूर्णता, हा दोष ध्यानात घेऊनच समाजातली कोणचीही संस्था उभारली पाहिजे. आणि विवाहाकडे याच दृष्टीने पाहिले तर घटस्फोटाला कोणचाही समंजस मनुष्य विरोध करणार नाही असे वाटते.
आयुष्याच्या पहिल्या प्रहरात एकमेकांवर अनुरक्त झालेल्या सुदृढ तरुण-तरुणीनी संसार थाटावा, आणि शेवटच्या प्रहरांत दोघानीही एकदमच येथून जावे यापेक्षा जास्त सुंदर, रम्य मनोहर असे काय आहे ? पण या रम्यतेकडून जगाच्या उग्र, कठोर परिस्थितीकडे दृष्टी टाकली तर लगेच यापेक्षा जास्त अशक्य असे काय आहे असा अत्यंत खेदजनक प्रश्न मनापुढे उभा राहतो. या रम्य व्यवस्थेला आपल्या मृत्यूच्या दुर्लंघ्य नियमांनी सृष्टी पहिला तडाखा देते. पण तो तडाखा जेथे नाही तेथेही मानवाचे अपूर्ण मन पावलोपावली अनंत अडचणी निर्माण करून या सुंदर ध्येयाचे वाटोळे करून टाकीत असते. स्त्रीपुरुषांचे स्वाभिमान, एकमेकांवर कितीही निष्ठा असली तरी मधूनच निर्माण होणाऱ्या विवाहबाह्य कामवासनेच्या ऊर्मी, आपल्या घेऱ्यात धरून सर्वस्वाचा विध्वंस करून टाकणारी व्यसने, आणि मानवी स्वभावातले इतर अनंत दुर्गुण, यांनी आरंभी एकमेकांसाठी प्राणत्याग करण्यास तयार असलेल्या पतिपत्नीना पुढे पुढे एकमेकांचा सहवासही दुःसह होऊन जावा अशी भयाण परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे ध्येयदृष्टीला दिसणाऱ्या त्या रम्य दृश्यावरून डोळे ओढून घेऊन या बिकट परिस्थितीतून वाट काढण्यासाठी जरा कमी रम्य अशा दृश्यावर नजर ठेवावी लागते. पत्रिका पहाण्यासारख्या वेडगळ पद्धतीपासून एकमेकांचे स्वभाव अजमावणे, संस्कृतीची समता राखणे, आरोग्यदृष्ट्या तपासणे, आर्थिक स्थिती लक्षात घेणे, इत्यादी शास्त्रमान्य अशा पद्धतीपर्यंत कोणच्याही दृष्टीने कितीही काळजी विवाहाच्या आधी घेतली तरी शेवटपर्यंत विवाहसंबंध सुखप्रद राहतील अशी हमी देताच येत नाही. मानवी स्वभाव आणि सृष्टीतल्या घडामोडी आपल्याला इतक्या अगम्य आहेत. असे असताना सर्वज्ञत्वाचा आव आणून एकदा जडविलेला प्रत्येक विवाहसंबंध आमरण कायम टिकलाच पाहिजे अशी सक्ती करणे हे सर्वथा अयुक्त होय. तसा उपदेश असावा यात वादच नाही. पण जेथे सहवास दुःसह होऊन सुखप्राप्ती होत नसेल तेथे त्यातून सुटण्यास समाजाने मार्ग करून दिला पाहिजे एवढेच दुसऱ्या पक्षाचे म्हणणे आहे
विवाह हा फक्त स्त्रीपुरुषांच्याच सुखाचा प्रश्न नसून अपत्यांच्याही सुखदुःखाचा त्यात विचार होणे अवश्य आहे. म्हणून घटस्फोट मान्य करणे चूक आहे असा एक पक्ष आहे. पण कित्येक वेळा पतिपत्नीचे संबंध इतके विकोपाला गेलेले असतात, किंवा व्यसनामुळे किंवा अन्य कारणामुळे पुरुष इतका राक्षसी झालेला असतो की अपत्यांच्या हितासाठीच घटस्फोट अवश्य होऊन बसतो. आणि हे सर्व लक्षात घेऊनच घटस्फोट सुकर व्हावा असे आजचे सर्व विचारी पुरुष सांगत आहेत. घटस्फोटाचे प्रसंग कमी यावे असे त्यांनाही वाटते. पण कायदा हा त्यावर उपाय नसून शिक्षणाने मनाची संस्कृती वाढविणे हा उपाय आहे. असे त्याचे मत आहे.
हिंदुस्थानात अनेक जातीत घटस्फोट रूढ आहे आणि काही वरच्या जातीत तो रूढ नसल्यामुळे त्या आपल्याला या बाबतीत श्रेष्ठ मानतात. एकनिष्ठा, शाश्वतता, आणि तज्जन्य सुख या बाबतीत त्या श्रेष्ठ आहेत हे खरेच आहे; पण घटस्फोटाची परिस्थितीच आपणापुढे नाही असा जो भोळसट मोठेपणा त्यांनी जिवाशी धरला आहे तो चूक आहे. पुरुषांनी या बाबतीत आपली सोय करून घेतलीच आहे. आणि मनूने त्यांना तशी परवानगीही दिली आहे. पती कितीही नीच, व्यसनी असला तरी त्याला देवासमान मानावे असे स्त्रियांना सांगणाऱ्या मनूनेच (५.१५४) स्त्री मर्जीप्रमाणे वागत नसेल, रोगी असेल, किंवा फार काय नुसती जास्त खर्चिक असेल तर पुरुषाने दुसरे लग्न करावे असा उपदेश केला आहे. (९.८०) आणि यामुळे जर ती पहिली स्त्री रागावून निघून गेली तर तिला टाकून द्यावी असा सल्ला दिला आहे. याच्या युक्तायुक्ततेचा विचार जरी केला नाही तरी यावरून एवढे खास दिसते की एकदा जडविलेला विवाहसंबंध आमरण टिकविलाच पाहिजे, तो मोडता येत नाही, असे आर्यांचेही मत नव्हते. मानवाचे अज्ञान व सृष्टिरचनेतली दोषपूर्णता लक्षात घेऊन ध्येयवादाला मुरड घालण्यास आर्यांचीही हरकत नव्हती. फरक एवढाच की दुसरे लग्न करून आपण सुखी झाल्यानंतरही आपल्या पहिल्या स्त्रीने तिच्या माहेरी किंवा अन्यत्र आपल्या नावाने रडत असावे यात आर्य पुरुषाला जी लज्जत आहे ती घटस्फोटवादी पंडितांना नाही. आपल्याशी तिचे जमले नाही तर अन्य पुरुषांशी विवाह करून तिने सुखी होण्यास हरकत नाही असे त्यांना वाटते.
घटस्फोटाचा पश्चिमेकडील इतिहास पाहिला तर तो कायद्याने बंद केला तर कमी होतो, किंवा कायद्याने परवानगी दिली तर जास्त वाढतो असे मुळीच दिसत नाही. आणि घटस्फोट सोपा केल्याने गृहसंस्थेचा नाश तर होणार नाहीच, तर उलट तेथली बजबज नाहीशी होऊन तिला जास्तच गांभीर्य प्राप्त होईल असे हॅवलॉक एलिस व वेस्टरमार्क या दोघां मोठया शास्त्रज्ञांचे मत आहे. (व्हिदर मनकाइंड पृ. २१४) आणि एकांगी घटस्फोटाच्या बाबतींत म्हणजे पुरुषाने स्त्रीला टाकण्याच्या बाबतीत मनूचेही तेच मत असल्यामुळे त्यांत थोडी सुधारणा केली तर सनातन्यांनाही ती मान्य करण्यास हरकत करू नये असे वाटते. पहिल्या स्त्रीला रडवीत ठेवण्यामध्ये जे सुख आहे ते नाहीसे होईल एवढाच तोटा त्यात आहे.
प्रेमविवाह, पुनर्विवाह, घटस्फोट, संतति-नियमन, इत्यादि सुधारणा मान्य करण्यास पुरुष तयार होत नाहीत याचे कारण एकच आहे. स्त्री हा एक नाठाळ प्राणी असून बंधने शिथिल होताच वाटेल तो स्वैराचार करून समाजाच्या घाताला तो प्रवृत्त होईल, असली मनुप्रणीत मतेच त्यांनी अजून धरून ठेवलेली आहेत. समाजाच्या सुखाची काळजी, आणि जबाबदारी फक्त आपल्यालाच आहे असे त्यांना वाटते. पण आज शेकडो वर्षांच्या अनुभवाने ही कल्पना खोटी ठरली आहे. बौद्धिक क्षेत्रात पुरुषाची अल्पही बरोबरी स्त्रीने अजून केली नसली, तरी आत्मनिग्रह, निष्ठा, जबाबदारीची जाणीव आणि उच्च ध्येयासाठी प्राणाहुतीही देण्याइतकी उज्ज्वल तपश्चर्या, इत्यादि अनेक गुण स्त्रियांनी व्यक्त केले आहेत. वास्तविक स्मृतिकालाच्या पूर्वीच रामायण-महाभारतातील इतिहास घडला असल्यामुळे स्मृतिकारांच्या ही गोष्ट लक्षात यावयास हरकत नव्हती. पण अनुभव जमेस न धरता, परिस्थितीकडे न पाहाता या विषयात तरी रूढ कल्पनाच पुन्हा पुन्हा बडबडण्याच्या सनातन चालीमुळे शास्त्रकारांनी ही गोष्ट जमेला धरलीच नाही. पण युरोप अमेरिकेतल्या आजच्या स्वैराचारी समजल्या जाणाऱ्या समाजाकडे जरी दृष्टी टाकली तरी बंधने अत्यंत शिथिल असतानाही वाटेल त्या परिस्थितीत एकनिष्ठ राहणाऱ्या, अलौकिक स्वार्थत्याग करणाच्या, निग्रही अशा अनेक स्त्रिया, संख्येनेही आर्य स्त्रियांशी तुलना होईल इतक्या स्त्रिया, त्या समाजांत निर्माण होतात असे दिसत असल्यामुळे स्त्रीच्या स्वभावाबद्दलचे स्मृतिकारांचे हीन मत आज कोणीही विचारी मनुष्य मान्य करणार नाही आणि त्यामुळे मानवी सुखात भर घालणाऱ्या वरील सुधारणांना तो विरोधही करणार नाही.
स्त्री-स्वातंत्र्य, विवाहाचे वय, विधवाविवाह, प्रेमविवाह, घटस्फोट इत्यादि अनेक प्रश्नांची चर्चा करून शास्त्रज्ञांच्या मताने नव्या गृहसंस्थेचे स्वरूप कसे असावयास हवे आहे ते आपण पाहिले. आणि त्यामुळेच मानवाच्या सुखात भर पडून समाज जास्त बलिष्ठ होईल हेही आपल्या ध्यानात आले. अपत्य संगोपन, स्त्रीचे आर्थिक स्वातंत्र्य, सगोत्र विवाह यांशी संलग्न असलेल्या प्रश्नांची अजून चर्चा करावयाची आहे. ती पुढील प्रकरणी करून हा लांबलेला विषय आटपता घेऊ.
गृहसंस्थेचे नवे स्वरूप