विज्ञान-प्रणीत समाजरचना/विवाह संस्थेचे भवितव्य
विसावे शतक हे क्रांतीचे शतक आहे. जूनी राज्ये व साम्राज्येच यात उलथून पडत आहेत असे नसून त्या साम्राज्यांपेक्षाही जास्त दृढमूल झालेली तत्त्वे व त्याहीपेक्षा जास्त जुन्या व विश्वमान्य अशा संस्था याही आता ढासळून पडत आहेत. शास्त्रांच्या वाढीमुळे परमेश्वराच्या अस्तित्वावरच गदा आली व त्यामुळे धर्माचे अधिष्ठानच कोसळून काही ठिकाणी पूर्णपणे व इतर ठिकाणी पुष्कळसा धर्माचा उच्छेद झाला आहे व धर्माइतकीच जुनी व कदाचित् त्यापेक्षाही जास्त प्रिय अशी जी विवाहसंस्था तीही त्याच मार्गाने जाणार की काय अशी पुष्कळांना भीती वाटू लागली आहे. कॅल्व्हर्डनचे बँकरप्टसी ऑफ मॅरेज, बेन लिंडसे यांचे रिव्होल्ट ऑफ मॉडर्न यूथ यासारखी पुस्तके वाचली म्हणजे युरोप व अमेरिका या खंडांत विवाहसंस्था किती हीन दशेला पोचली आहे हे ध्यानांत येईल. बर्लिन, बोस्टन, लंडन यांसारख्या शहरांत दर हजारी तीनशे पासून पांचशेपर्यंत मुले बेकायदेशीर असतात. न्यूयार्कमध्ये दरसाल ८०००० गर्भपात होतात; अविवाहित मातांसाठी काढलेली इस्पितळे कोठेच पुरेनाशी झाली आहेत व दर दहा लग्नांमागे दोन किंवा तीन व काही ठिकाणी तर पाचपर्यंत घटस्फोट होतात. ही माहिती तिकडील विवाहसंस्थेचे स्वरूप समजवून देण्यास पुरेशी आहे. रशियामध्ये तर विवाह हा अनवश्यकच झालेला असून कोठलीच संतति विधिबाह्य नाही असे सरकारने ठरवून टाकले आहे. व तेच धोरण अमेरिका व इंग्लंड यांनी स्वीकारावे असे लिंडसे, हॅवलॉक एलिस वगैरे मोठमोठे लेखक सांगत आहेत.
आज हजारो वर्षे चिरस्थायी झालेली ही संस्था एका पाचपन्नास वर्षांच्या अवधीत अगदी रसातळाला जाऊन पोचण्याजोगी अशी काय परिस्थिती उत्पन्न झाली आहे, असा आपणापुढे प्रश्न येऊन पडतो. त्याचा उहापोह एलिस, रसेल वगैरे अनेक पंडितांनी केला आहे. नॅशा- पालमाल मासिकाच्या जानेवारी १९३३ च्या अंकात रसेलने विवाहसंस्था ढासळण्याची सर्व कारणे फार थोडक्यात पण स्पष्टपणे दिली आहेत. (१) स्त्री ही वस्तुरूप टाकून व्यक्तीरूप पावली. (२) तिला आर्थिक स्वातंत्र्य मिळाले. (३) समागम करूनही गर्भसंभव टाळणे विज्ञानाने शक्य करून दिले. (४) घटस्फोट पूर्वीपेक्षा पुष्कळ सोपा झाला. (५) पुरुषाच्या द्रव्यार्जनाची सुरुवात विसाव्या वर्षावरून निघून तिसाव्या वर्षावर गेली व त्यामुळे समागमाची इच्छा व तृप्ती यात अंतर पडले; ही पाच कारणे प्रमखपणे सांगण्यांत येतात. मोटार वगैरे थोडक्या वेळात लांब नेणारी वाहने, धर्मविचाराचे शैथिल्य, हीही कारणे त्यांच्या जोडीला कोणी सांगतात. शिशुसंगोपन व मुलांचे शिक्षण यांची पुष्कळशी जबाबदारी माता- पित्यावरून काढून सरकारने आपल्याकडे घेतली हेही कारण अनेकांनी सांगितले आहे. विवाहसंस्थेला लागलेले हे अनेक सुरुंग असून त्यांच्यामुळे ही शाश्वत वाटणारी इमारत पुढील पाचपन्नास वर्षांत जमीनदोस्त होऊन जाईल असे पुष्कळांचे म्हणणे आहे. स्ट्रिंडबर्ग किंवा रशियांतील मॅडम कोलॉन टाई यांसारख्या काही लोकांना यात वाईट असे काही वाटत नसून ही संस्था व विशेषतः गृहसंस्था नष्ट झालेली उत्तमच, असे त्यांचे मत आहे. तेव्हा त्याप्रमाणे ही संस्था खरोखरच नष्ट होईल की काय, होणे अवश्य आहे की काय, का वर सांगितलेले सुरुंग हे सुरुंग नसून हॅवलॉक एलिस म्हणतो (व्हिदर मनकाइंड. पृ. २१४) त्याप्रमाणे हे त्या संस्थेचे घिरे आहेत, व त्यामुळे ती संस्था कोसळण्याऐवजी जास्तच भक्कम होणार आहे, याचा आपणास प्रस्तुत लेखांत विचार करावयाचा आहे.
कोणतीही संस्था टिकेल का मोडेल याचा विचार करण्याची सरळ व एकच पद्धत म्हणजे तिच्या आदिहेतूंची चिकित्सा करणे ही होय. ज्या कारणासाठी ती संस्था अस्तित्वांत आली असेल ती कारणे जर अविनाशी असतील व जी कार्ये ती करीत असेल ती अजूनही समाजाला इष्ट असतील, तर ती संस्था टिकेल, किंवा निदान समाज ती टिकवून धरावयाचा प्रयत्न करील हे अगदी उघड आहे. विवाहाच्या बाबतीत अशी कारणे तीन आहेत. समागमाचे सुख मिळविणे, व सुप्रजा निर्माण करणे हे दोन हेतु कोणाच्याही सहज डोळयांपुढे येतील असे आहेत. तिसराही एक हेतू आहे. पण त्याचा पुढे विचार करणे जास्त सोयीचे आहे.
समागमाचे सुख मिळविणे हा विवाहसंस्थेचा हेतु म्हणून सांगितला, हे पाहून जुन्या धार्मिक पंडितांना क्रोध येईल. कोणत्याही तऱ्हेचे शारीरिक सुख मिळविण्याचा प्रयत्न करणे ही मोठी लज्जास्पद व निंद्य गोष्ट आहे अशी आतापर्यंतच्या सर्व धर्ममतांची शिकवण आहे. त्यातल्या त्यात स्त्रीसमागमाचे सुख हे तर अत्यंत निंद्य व पापमय असून त्याची नुसती इच्छा धरणे हे अगदी हीनतेचे धोतक आहे, ते दौर्बल्य आहे, असे सांगण्याची चाल होती. जुन्या अनेक धर्मग्रंथात विवाहाला परवानगी आहे. पण ती प्रजोत्पादनासाठी आहे. विषयसुख हे नाइलाज म्हणून भोगावयाचे. ते टाळता आले तर बरे; पण तसे सर्वांना शक्य नाही म्हणून विकारांना एक वाट करून द्यावयाच्या हेतूने जुने लोक विवाहाला परवानगी देतात. त्यामुळे विषयसुखाची इच्छा धरणे ही एक लाजिरवाणी गोष्ट आहे असे सर्व जण बोलण्यापुरते तरी मानीत असत. अशा प्रकारच्या धोरणामुळे समागमाचे सुख अनुभवणे हा विवाहाच्या प्रधान हेतूंपैकी एक म्हणून मान्य करणे जुन्या काळी कधीच शक्य नव्हते. त्यांच्या मते प्रजा निर्माण करून पितरांच्या ऋणांतून मुक्त होणे, हे एक धार्मिक कर्तव्य असल्यामुळे त्याचे साधन म्हणून पुरुषाने विवाह करावयाचा असतो. त्यामुळे विवाहाचे प्रजोत्पत्ती हे एकमेव ध्येय असले पाहिजे, सुखासाठी समागम करणं हे चूक आहे असे सनातनी लोक सांगतात व जुन्या काळी ते तसेच होते असे सांगून 'प्रजायै गृहमेधिनाम्' हे कालिदासाचे वचन बाणासारखे प्रतिपक्षावर फेकतात.
आपल्याकडे जुन्याचा कैवार घेऊन अर्थहीन व ढोंगी बडबड करण्याची जी पद्धत अलीकडे रूढ होत चालली आहे, तिचा हा एक उत्कृष्ट नमुना आहे. पश्चिमेकडच्या अनेक पंडितांनी व तरुणांनी प्रजा (Procreation) हे विवाहाचे एकमेव ध्येय आम्हाला मुळीच मान्य नसून विषयानंद (recreation) हाही एक त्यात हेतू आहे, इतकेच नव्हे तर केवळ विषयानंदाच्या हेतूनेच लग्न करणे हेही पूर्णपणे न्याय्य आहे असे सांगण्यास निर्भयपणे सुरुवात केली आहे. त्याची टर करण्यासाठी काही सनातनी शास्त्री व काही सुशिक्षित हरदास नेहमी टीका करतात की 'प्रजायं गृहमेधिनाम्' हे उदात्त धोरण टाकून 'मजायै गृहमेधिनाम्' हे धोरण अलीकडच्या लोकांनी पत्करले आहे. वास्तविक मौज अशी आहे की, कालिदासाच्या ज्या 'प्रजायै गृहमेधिनाम्' या वाक्यावर या लोकांच्या एवढ्या उड्या आहेत त्याच्याच पुढचे वाक्य जर हे लोक वाचतील तर त्यांची उडी खड्ड्यातच जाईल. पुढच्याच श्लोकात 'यौवने विषयैषिणाम्' असेही कवीने रघुराजाचे वर्णन केले आहे. यावरून केवळ प्रजेच्याच हेतूने रघुराजे लग्न करीत नसून विषयानंद हाही पण त्यांना प्रिय होता असे दिसते. पण एवढ्या एकाच श्लोकाने काय झाले आहे ? विदग्ध वाङमय म्हणून संस्कृतात जो भाग आहे त्यात विवाहाचे सर्व थोर हेतू बाजूस राहून अधम, पाशवी विषयानदच कसा थैमान घालीत आहे, हे कोणाही वाचकाच्या ध्यानात येण्याजोगे आहे. अनेक संस्कृत नाटकात कवींनी ज्यांची चरित्रे गायिली आहेत ते बहुतेक सर्व राजे- चंद्रसूर्य वंशातले धीरोदात्त व सत्त्वशील राजे- 'मजायै' याच धोरणाने चालत असत, असे दिसेल. तेथून ऐतिहासिक कालाकडे दृष्टी टाकली तरी तीच स्थिती दिसते. सर्व मराठी राजे, पेशवे, सरदार, मानकरी मजायै हाच हेतू तोंडाने नसला तरी मनाने खास प्रमुख मानीन होते. सामान्य जनांतही हेच धोरण होते. समागमाचा हेतू प्रजा हाच असला पाहिजे हे धोरण स्त्रियांच्या बाबतीतच फक्त पुरुषांनी ठेवले होते, पुरुषांनी अनेक स्त्रिया करून किंवा अन्य मार्गानेही मजा करण्यास कोणाचीच हरकत नव्हती.
जुन्या व नव्यामध्ये फरक इतकाच आहे की विषयानंद हा एक सुखाचा उत्तम प्रकार असून तो अनुभवण्यात लज्जास्पद काही एक नाही व तो मान- वाच्या कोणच्याही प्रकारच्या उन्नतीच्या आड येत नाही, असे नवे पंडित निर्भयपणे सांगतात व जुने सांगत नाहीत. जुन्यांची कृती मात्र तीच असतें. पण त्यात उजळ माथा नसल्याने विषयसुखाची चर्चा करून ते जास्त कल्याण- कारक, हितप्रद व सुसंस्कृत कसे करावे याची जी नव्यांना चर्चा करता येते, ती मात्र त्यांना शक्य नाही. व त्यामुळे हीन प्रकारचे सुखच फक्त आतापर्यंत ते अनुभवीत आले आहेत.
विषयसुखाच्या बाबतीतली ही भेकड व अप्रामाणिक वृत्ती नव्यांनी टाकून दिली आहे. व त्यामुळे मानवाच्या सुखात जास्त भर पडण्याचा संभव आहे, यात शंकाच नाही. स्त्रीपुरुषांनी, विशेषतः स्त्रियांनी अतिशय मोहक व वेधक वेषभूषा करावी यात जुन्यांना फार भयंकर पाप वाटे. मुलगी पाहावयास गेल्यावर ते सुंदर मुलगीच निवडतील; पण तिने जास्त सुंदर दिसण्याचा प्रयत्न केला तर मात्र ते रागावतील. या तऱ्हेचे वेडगळ प्रकार यापुढे नव्या धोरणाने बंद होऊन स्त्रीपुरुष परस्परांना जास्त आकर्षक होण्याचा प्रयत्न करतील तर त्यामुळे विवाहबंधनाची दृढता निःसंशय अधिक होईल. विषयानंदाची लज्जास्पदता जाऊन त्याला मान्यतेची मुद्रा मिळाली तर याहीपेक्षा एक मोठा फायदा होईल. स्त्रीपुरुषांमध्ये प्रेम असेल, भावना व विचार यांची समानता असेल तर सामाजिक दृष्ट्या तर अनेक फायदे होतीलच; पण विषयानंदालाही त्यामुळे जास्त उत्कटता व सुसंस्कृतता येईल, ही गोष्ट विषयसुखाला प्राधान्य दिल्याबरोबर लोकांच्या सहज ध्यानात येईल. तीस वर्षांच्या मुलाने आठ वर्षाच्या मुलीशी लग्न करावे, व पतिपत्नीनी दिवसा एकमेकांशी बोलू नये, केवळ रात्रीच त्यांची भेट व्हावी असल्या चाली रूढ असलेल्या समाजात पतिपत्नींच्या समागमाकडे पाहाण्याची दृष्टी किती हीन असली पाहिजे हे काही सांगावयास नको. विषयसुखात केवळ हीन व पाशवी भागच त्यांना माहीत होता. प्रेमाने, भावनांच्या समरसतेने, बरोबरीच्या नात्यामुळे निर्माण होणाऱ्या स्नेहाने, स्त्रीला भोग्य वस्तु न मानता व्यक्ती मानल्यामुळे होणाऱ्या फरकाने, विषयानंदाला किती उत्कटता व श्रेष्ठता येते याची कल्पना जुन्या मताच्या लोकांना कधीच येणे शक्य नाही. आणि हा सर्व विषयसुखाला निंद्य किंवा कमी प्रतीचे मानण्याचा परिणाम आहे.
विषयानंदाच्यातर्फे आणखीही एक गोष्ट सांगण्याजोगी आहे. हे सुख ऐहिक उन्नतीच्या आड तर येत नाहीच; पण पारमार्थिक उन्नतीच्याही ते आड येत नाही. एकनाथ व तुकाराम ही दोन उदाहरणे आपल्यापुढे अगदी स्पष्ट आहेत. 'आत्मा वै पुत्र नामासि । पुत्र झालिया स्त्रियेसी । संग करू नये तियेसी' असे एकनाथांनी सांगितले आहे. तुकारामाने तर बायकापोरांचे एका घाये मडके फोडून टाकण्याचा उपदेश किती वेळा केला असेल विठोबा जाणे. पण वस्तुस्थिती अशी आहे की दुसऱ्याला केलेला उपदेश स्वतः या लोकांनी मुळीच पाळला नाही. हरिपंडित या पुत्रानंतर नाथांना एक कन्या झाली आणि तुकाराम वारले त्या वेळी त्यांची स्त्री गरोदर होती. एरवी याची विचिकित्सा कोणीच केली नसती पण दुसऱ्यांना मडके फोडा म्हणून कडकडून सांगणारे स्वतः काय करतात, असा प्रश्न साहजिकच येतो, असो. स्वतःच्या बाबतीत तुकाराम व एकनाथ यांनी स्वतःचा उपदेश पाळला नाही तरी त्यांना मोक्ष मिळाला हे खरेच आहे. यावरून विषयसुखाची इच्छा मोक्षाच्या आड येत नाही हे स्पष्ट आहे. हे साधुसंत अगदी निर्भमत्वाने भोग घेत होते असेही म्हणता यावयाचे नाही. कारण ते जर मोहातीत असते तर स्वतः कडकडून सांगितलेल्या वचनाविरुद्ध ते वागते ना. यावरून एकच गोष्ट दिसते की विषयसुख हे मोक्षाच्या आड येते असे जरी या साधुसंतांना वाटत होते तरी वस्तुस्थिती तशी नव्हती.
यावरून असे दिसून येईल की प्रेम, भावना, विचार यांची समरसता यामुळे सुसंस्कृत होणारा विषयानंद हा विवाहाचा एक प्रधान हेतू आवश्य मानला पाहिजे, पतिपत्नींची एकमेकांबद्दल एकनिष्ठा आणि त्यांच्या नात्याचा शाश्वतपणा या विवाहाच्या मुख्य अटी आहेत आणि केवळ विकारशमन एवढाच हेतू असेल तर त्याला या तऱ्हेच्या विवाहाची मुळीच जरूर नाही. विवाह नसलेल्या समाजांना ते पूर्णपणे शक्य आहे हे कोणत्याही समंजस माणसाच्या तेव्हाच ध्यानात येईल.
सुप्रजेचे उत्पादन हा विवाहाचा दुसरा हेतू सांगितला जातो. पुत्रोत्पत्ती करून पितरांना पाणी मिळण्याची व्यवस्था करून ठेवावयाची. व त्यांच्या ऋणांतून मुक्त व्हावयाचे. अशी यात धार्मिक दृष्टी आहे; पण शास्त्रामध्ये या भोळसर कल्पनेचा विचार करणे शक्य नाही दुसरी दृष्टी समाजाची. उत्कृष्ट प्रजा निर्माण व्हावी व समाज उन्नतीला जावा अशी लोकांची नेहमीच इच्छा असते आणि व्यक्ती ही हरएक प्रकारे समाजाची ऋणी असल्यामुळे प्रजा निर्माण करून समाज टिकविणे व ती सुदृढ व्हावी म्हणून दक्षता बाळगणे हे प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे.
पण जरा खोल विचार केला तर असे दिसून येईल की विवाहसंस्था ज्या स्वरूपात आज आपल्या डोळ्यापुढे आहे, त्याची सुप्रजेच्या निर्मितीला. तितकीशी मुळीच जरूर नाही. इतकेच नव्हे तर सुप्रजेच्या दृष्टीने सध्याच्या विवाहसंस्थेत अनेक दोष आहेत. येथे वाचकांनी गैरसमज करून घेऊ नये. सुप्रजा हा विवाहाचा हेतू असावा याबद्दल वादच नाही. पण तो एकमेव हेतू समाजाने पुढे ठेवला तर सध्या असलेल्या एकनिष्ठा व शाश्वतता ही विवाहबंधने कितपत अवश्य आहेत याचा विचार येथे करावयाचा आहे. जीवनशास्त्रदृष्ट्या विचार केला तर सुप्रजेला यातल्या कशाचीच जरूर नाही. स्त्री ज्या पुरुषांशी संगत होते त्यासारखी ती होते वगैरे जुन्या कल्पना आता चुकीच्या ठरल्या आहेत. कालांतराने स्त्रीने अन्य पुरुषापासून संतती निर्माण करून घेतली तरी त्या संततीवर पहिल्या पुरुषाच्या संभोगाचा काही एक परिणाम होत नाही. त्याचप्रमाणे स्त्रीच्या मानसिक एकनिष्ठेवरही प्रजेचे चांगले वाईटपण मुळी अवलंबून नाही. म्हणजे पुरुष व्यभिचारी असला तरी त्याच्या पुत्राच्या पिंडगत गुणात जसा फरक पडत नाही, तसाच स्त्री व्यभिचारी असली तरी पडत नाही. दुसरे असे की, सुप्रजा हाच अंतिम हेतु धरला तर आज जशी सर्व लोकांना विवाहाला परवानगी आहे तशी त्या समाजात मिळणार नाही. वय, आरोग्य, कर्तृत्व इत्यादी गुणांनी प्रजा निर्माण करण्याला योग्य असे शेकडा दहापंधराच स्त्रीपुरुष सापडतील. आणि मग तेवढ्यानाच प्रजोत्पादनाची परवानगी देणे व बाकीच्यांना निरपत्य करून टाकणे हे श्रेयस्कर ठरेल. शिवाय पती कसाही असला तरी स्त्रीने त्याशी एकनिष्ठ राहणे हा धर्माचा उपदेश जीवशास्त्राला कधीच मान्य होणार नाही. कारण सुप्रजेच्या दृष्टीने तो अगदी चुकीचा आहे मातृप्रधान गृहसंस्था ठेवून प्रत्येक वेळी निरनिराळ्या थोर पुरुषांकडून स्त्रीने पुत्रोत्पत्ती करून घ्यावी अशी काही इंग्रज पंडितांनी सुचविलेली व्यवस्था सुप्रजेच्या दृष्टीने मान्य करावी लागेल. यावरून असे दिसेल की केवळ सुप्रजा हीच अंतिम दृष्टी ठेवली तर उत्तम बीज व उत्तम क्षेत्र एवढी एकच दृष्टी ठेवून बाकी सर्व बंधने झुगारून द्यावी लागतील आणि त्या उत्तम शब्दाची व्यवस्था जीवनशास्त्र सांगेल ती धर्म, किंवा नीती सांगेल ती नव्हे.
केवळ विकारशमन, किंवा सुप्रजेची निर्मिती हे एकेक निरनिराळे किंवा दोन्ही मिळूनही विवाहसंस्थेचे अंतिम हेतू होऊ शकत नाहीत असे आतापर्यंतच्या विवेचनावरून दिसून येईल. स्त्रीपुरुषाची एकनिष्ठा आणि संबंधाचा शाश्वतपणा ही ज्या नात्यात प्रधान मानली जातात तो विवाह, ही विवाहाची व्याख्या सर्वमान्य होईल असे वाटते. आणि त्या व्याख्येअन्वये विवाह हा विकार शांत करण्यास किंवा पिंडदृष्ट्या सुप्रजेची निर्मिती करण्यास जरूरच आहे असे नाही; किंबहुना काही बाबतीत विवाह हा सुप्रजेच्या व विकारशमनाच्या आडच येईल असे दिसून येईल. धर्मरक्षण किंवा मोक्षप्राप्ती असे काही आणखी हेतु जुने लोक सांगतील; पण त्याची माहिती कोणालाच नीटशी नसल्यामुळे त्यांचा विचार करणे शक्य नाही. मग नव्या शास्त्रीय दृष्टीला विवाहसंस्थेची जरूर आहे की नाही असा प्रश्न येतो आणि त्याचाच आता आपणाला विचार करावयाचा आहे.
विकारशमनासाठी, किंवा समाज जिला सुप्रजा म्हणेल त्यासाठी जरी विवाहसंस्थेची जरूर नसली तरी यापेक्षाही श्रेष्ठ अशा एका सुखाची मानवी मनाला अपेक्षा असते आणि तिच्यासाठी विवाहाची जरूर आहे.
मानवी मनाचा असा एक धर्म आहे की आपल्या व केवळ आपल्याच सुखदुःखाची काळजी घेणारी, केवळ आपल्या एकट्याच्याच उत्कर्षाने हर्ष पावणारी व अपकर्षाने खेद पावणारी आणि आपल्या एकट्याच्याच भावनांशी समरस होणारी अशी कोणी तरी व्यक्ती असावी, यात त्याला पराकाष्ठेचे सुख आहे. मी मेलो तर हजारात एक व्यक्ती कमी झाली, या हिशेबाने समाजाला थोडे तरी दुःख होते हे खरे आहे. पण ती समाजाची पातळ सहानुभूता मला मुळीच सुखदायक होऊ शकत नाही. पण मी मेलो तर आपणही मरावे इतके वाईट वाटण्याजोगं दुःख जिला होईल, अशी जर कोणी व्यक्ती असेल, तरच मला जगण्यामध्ये खरा आनंद होतो; आणि अशी जर व्यक्ती कोणीच नसेल तर मला जीवित नकोसे होते. आपल्यावर कोणाची तरी अनन्यसामान्य भक्ती आहे, ही जाणीव केवळ सुखप्रद आहे इतकेच नव्हे तर मानवाच्या सर्व कर्तृत्वाचे ते उगमस्थान आहे. सर्व समाज माझा आहे, ह्यासाठी मला कष्ट केले पाहिजेत ही भावना हजारातील एखाद्याच मनाला चैतन्यप्रद होत असेल. पण माझ्यासाठी, आणि केवळ माझ्याचसाठी तळमळणारी अशी जी व्यक्ती आहे तिचे कल्याण हा हेतू वाटेल त्याला उद्योगरत करण्याला, इतकेच नव्हे तर प्रसंगी प्राणही देण्यास पुरेसा प्रेरक होऊ शकतो. आपल्यावर अनन्यसामान्य भक्ती करणारी ही व्यक्ती कोणीही असून चालत नाही. पुरुषाला ती व्यक्ती स्त्री असावीशी वाटते व स्त्रीला पुरुष असावीशी वाटते. कारण हॅवलॉक एलिसने एके ठिकाणी म्हटल्याप्रमाणे मनाचे पूर्ण मीलन होऊन दोन जीव अगदी अभिन्न होऊन जाण्यास देहाच्या समागमाची सुद्धा अत्यंत जरूर असते. मनाच्या समागमावाचून शारीरिक संबंध हा उच्च आनंद देऊ शकत नाही, हे जितके खरे आहे, तितकेच मनाच्या पूर्ण मीलनाला शारीरसंबंधाची आवश्यकता आहे हेही खरे आहे. म्हणजे स्त्रीच्या किंवा पुरुषाच्या पार्थिव जडदेहाला पुरुषाच्या किंवा स्त्रीच्या पार्थिव देहाच्या समागमाची जशी भूक असते, तसीच त्यांच्या मनालाही दुसऱ्याच्या मनाच्या समागमाशी भूक असते. आणि मनाची भूक अनन्यसामान्य प्रेमाखेरीच शांत होऊ शकत नाही. मानवाच्या अशा या विशिष्ट मनोधर्मातच विवाहसंस्थेचे बीज आहे.
इस्पितळातील दाई आपली काळजी घेते, यामुळे आपल्याला अल्पसे सुख होते. पण आपल्या इतक्याच आस्थेने ती दुसऱ्या पन्नास माणसांची काळजी घेत असल्यामुळे त्या आस्थेला पाडळपणा येऊन पन्नास माणसात पडलेले असूनही आपणास निर्जन प्रदेशात पडल्यासारखेच वाटते. घरामध्ये याच्या उलट स्थिती असते आणि यामुळेच घराला घरपणा आलेला असतो. यावरून असे दिसून येईल की प्रेमातील अनन्यसामान्यता हेच सर्व सुखाचे उगमस्थान आहे आणि विवाहसंस्था ही त्यासाठीच आवश्यक आहे.
अनन्यसामान्य प्रेमाचे हे तत्त्व काही अर्वाचीन युरोपीय पंडितांना मान्य नाही असे दिसते. या प्रेमाची अपेक्षा असली म्हणजे पतिपत्नींची मने अन्य स्त्री-पुरुषांवर गेली तर त्यांना मत्सर किंवा असूया वाटू लागते. व अशी असूया वाटणे हे रानटीपणाचे द्योतक आहे असे काही लेखकांचे म्हणणे आहे. कारण या असूयेच्या बुडाशी मालमत्ता व स्वामित्व ही कल्पना असते असे ते म्हणतात. म्हणजे स्त्रीचे परपुरुषाकडे मन गेले तर पतीला जो मत्सर वाटतो तो स्त्री ही आपल्या मालकीची वस्तू आहे अशी कल्पना असल्यामुळे वाटतो असे त्याचे मत आहे.
मेन अँड देअर मोटिव्हज् या पुस्तकात (पृ. ११७) फ्लूगेल या पंडिताने म्हटले आहे की स्वातंत्र्य, समता या कल्पनांशी मत्सर हा विसंगत आहे. आपले मन कोणावरही जडविण्याचा व्यक्तीला हक्क असला पाहिजे. सेक्स इन् सिव्हिलिझेशन या ग्रंथात (पृ. २३३) वुइल्यम लॉईड म्हणतो की असूया हे स्वार्थीपणाचे लक्षण आहे. स्त्री ही वस्तू आहे. पशुवत आहे या कल्पनेचे असूया समर्थन करते. हॅवलॉक एलिसने आपल्या सायकॉलजी ऑफ सेक्स या ग्रंथात हेच मत दोनतीन ठिकाणी प्रकट केले आहे. पण या पंडितांचे हे मत चूक आहे असे वाटते. मानोगॅमी म्हणजे एकपतिपत्नी ही विवाहाची पद्धत सर्वात उत्तम व नैसर्गिक आहे असे एलिसने स्वतःच मान्य केले आहे (सायकॉलजी ऑफ सेक्स, आवृत्ती १९३५ भाग ४ पृ ४१६, ४९४) असे असताना अनन्यसामान्य निष्ठा त्याने मान्य करू नये, हे विचित्र आहे. विवाहबाह्यसंबंध अपरिहार्य वेळी आणि दोष कबूल करून रसेलने मान्य केले आहेत. पण एलिसचे तसेही नाही. (पृ. ५१३) पण तो स्वैरसंभोगाला अनुकूल आहे असेही नाही. विवाहातील पावित्र्य त्याला हवेच आहे; पण या पंडितांचे मत काही असले तरी एकनिष्ठा, व शाश्वतता या विवाहातील मूल तत्त्वाशी असूयेचा निषेध विसंगत आहे एवढे खरे...या बाबतीत मॅक्डुगलने फार सुंदर विवेचन केले आहे. तो म्हणतो असूया वाटत नसेल तर प्रेमच असणे शक्य नाही. असूया ही अपरिहार्य आहे. एवढेच नव्हे तर ती योग्यच आहे. कॅरेक्टर ॲड कॉण्डक्ट पू. २३१, ३२) अनन्यसामान्य निष्ठा नसेल तर माणसाचे जीवन इस्पितळातल्या जीवनासारखे रसहीन, वैराण व शून्य होईल. आणि जगाच्या अनंत व्यापारांना अवश्य असणारा जो माणसाच्या मनाचा उत्साह तोच नाहीसा होईल. मॅरेज अँड मॉरल्स या पुस्तकात रसेलने हेच मत सांगितले आहे. (पृ. १०८) एडवर्ड कार्पेंटर याने असूयंचे दोन प्रकार सांगून नैसर्गिक असूया चांगली, कृत्रिम वाईट असे म्हटले आहे. वेस्टर मार्क म्हणतो की, सहचराचे मन दुसरीकडे गेले की व्यक्तीला वाईट वाटणे स्वाभाविक आहे. आणि आपल्या सहचरला (Partner) वाईट वाटू नये अशी प्रत्येकाने खबरदारी घेतली पाहिजे (फ्यूचर ऑफ मॅरेज पृ. ७८ लोवेन फील्ड असेच म्हणतो. हे वाचले म्हणजे या शास्त्रांना असूया शब्द फक्त नको आहे, ती कल्पना मान्य आहे असे दिसते. वरील विरोधी पंडितांचाही मनातील अर्थ कदाचित् असाच असेल.
आतापर्यंतच्या विवेचनावरून पुढील गोष्टी स्पष्ट होतील असे वाटले. अनन्यसामान्य प्रेमाची मानवी मनाला भूक आहे. दोन जीव पूर्ण समरस झाल्यावाचून तो भागणं शक्य नाही. या समरसतेत मानसिक भागच जास्त असतो. म्हणून दोघांची सुख:दुखे रागद्वेष, वैचारिक उंची सारखी असल्यावाचून ही समरसता उत्पन्न होऊ शकत नाही. या मानसिक समरसतेला शारीरिक समागमाचीही फार आवश्यकता असते आणि म्हणून हे सर्व घडवून आणण्यासाठी एकनिष्ठ प्रेम व नात्याचा शाश्वतपणा जीत आहे अशी विवाहसंस्था अत्यंत आवश्यक आहे.
विवाहसंस्थेच्या बुडाशी जे तत्त्व आहे तेच गृहसंस्थेच्या बुडाशी आहे. प्रजेचा विचार करताना ती सुप्रजा असावी एवढीच समाजाची अपेक्षा असते. पण व्यक्तीची दृष्टी याहून फार भिन्न आहे. पुत्र चांगले असावे हे कोणालाही वाटणारच. पण समाजात पुष्कळसे चांगले पुत्र आहेत या विचाराने व्यक्तीला मुळीच समाधान होत नाही. मला पुत्र असावा, ही प्रबळ वासना गृहसंस्था निर्माण करते. सुप्रजेचा विचार येथे गौण आहे, येथेही पुन्हा गैरसमज होण्याचा संभव आहे. आपली कन्या किंवा पुत्र चांगले व्हावे म्हणून मनुष्य आटोकाट प्रयत्न करील हे खरे. पण त्या प्रयत्नांच्या बुडाशी समाजात चांगल्या नागरिकाची भर पडावी या हेतूला प्राधान्य नसून माझा पुत्र चांगला असावा याला प्राधान्य आहे आणि म्हणूनच तो गुणरूपांनी जरी कमी असला तरी त्याच्याच पालनपोषणाची मी काळजी घेतो. शेजाऱ्याचा मुलगा आपल्या मुलांपेक्षा जास्त बुद्धिमान आहे, आपल्या पुत्राच्या विद्येवर खर्च करण्यापेक्षा त्याच्यासाठी खर्च केल्यास समाजहित जास्त होईल असा विचारही मी कधी करीत नाही. येथेच समाजाच्या व माझ्या इच्छेचा विरोध येतो. समाजाची इच्छा अशो की पैसा खर्च व्हावयाचा तो चांगल्या विद्यार्थ्यावर व्हावा म्हणजे त्याचे चीज होईल. मला वाटते की मी मिळविलेला पैसा माझ्या मुलावर खर्च होऊन त्याची एक रेसभर जरी उंची वाढली तरी त्याचे चीज झाले. व्यक्तीच्या व समाजाच्या या परस्परविरोधी इच्छेचा समन्वय घडवून आणणे हे फार अवश्य आहे, पण तसे करताना 'माझा पुत्र' या विचाराला व्यक्तीला जे प्राधान्य द्यावेसे वाटते त्याला मुळीच धक्का लावून उपयोगी नाही. युरोपांतील काही अर्वाचीन पंडितांना हे मान्य नाही. समाजहिताकडे दुर्लक्ष करून व्यक्ती आपल्या मनाच्या सुखासाठी विरुद्ध आचरण करण्यास गृहसंस्थेमुळे प्रवृत्त होते, तिच्या सर्व भावना कुटुंबीय जनांवर केंद्रीभूत होऊन त्यातील विशालता नष्ट होते व त्यामुळे समाजाचे नुकसान होते असे त्यांचे मत असून त्यामुळे गृहसंस्था नष्ट करून टाकली पाहिजे असे ते म्हणतात. रशियातील कोलानटाई ही लेखिका या विचारासाठी प्रसिद्ध आहे. फ्लूगेलने आपल्या मेन अंड देअर मोटिव्हज् या पुस्तकात (पृ. ९६) म्हटले आहे की अनेक महत्त्वाच्या बाबतीत गृहसंस्था ही समाज हितबुद्धीच्या आड येते. पण मनाच्या विकासाला पायरी म्हणून फ्लूगेल गृहसंस्थेला मान देतो. हॅवलॅक एलिसनेही गृहसंस्थेमध्ये हा दोष आहे असे मान्य केले आहे. कॅलव्हर्टनही आपल्या बँकरप्टसी ऑफ मॅरेज या ग्रंथात म्हणतो की गृहसंस्था नसेल तर माणसांचे प्रेम जास्त व्यापक होऊन त्यांच्या सुखदुःखांची क्षेत्रे ही संकुचित न राहता विशाल होतील.
पण असूयेप्रमाणेच याही बाबतीत या पंडिताचे मत बरोबर नाही असे म्हणावे लागते. वर दाखविल्याप्रमाणे व्यक्तीच्या व समाजाच्या काही इच्छा परस्परविरोधी असल्या तरी मानवाचे मन विशाल होण्याच्या मार्गात गृहसंस्था आड येईल हे मत अगदी निखालस चुकीचे आहे असे वाटते. आणि उलट प्रेम, दया, स्वार्थत्याग यांचे संस्कार त्याच्या मनावर करण्यास गृह हे एकमेव साधन आहे, हेच खरे वाटते. पुत्र, कन्या, बहीण, भाऊ, पति-पत्नी ही नात्याची माणसे नसतील तर मानवाच्या मनाची वाढ होण्याचे बाजूलाच राहून ते अगदी निरुत्साह, निराश व कर्तृत्वशून्य होईल. स्त्री-पुत्र या प्रेरक शक्ती नसताना केवळ समाजासाठी मनुष्य अहोरात्र उद्योग करील. ही कल्पना अगदी भ्रामक आहे. अनन्यसामान्य प्रेमाचे प्रकार अनेक असतात पति-पत्नीचे प्रेम हा त्याचा निःसंशय एकमेव श्रेष्ठ प्रकार होय. पण मातापिता, पुत्रकन्या, बंधुभगिनी यांच्या प्रेमात या श्रेष्ठ प्रेमाचा भाग असतोच असतो. आणि म्हणूनच ही मंडळी एकत्र राहू शकतात. हा सुवर्णांश जसजसा कमी होत जातो (आणि पुत्र, कन्या, बंधुभगिनी यांच्या बाबतीत तसे होणे अगदी वाजवी आहे) तसतशा त्या व्यक्ती दुरावतात. पण गृहसंस्था ही जी उभारली जाते ती अनन्यसामान्य प्रेम या तत्त्वावरच उभारली जाते. अपत्यांचे संगोपन हे तिचे मुख्य कार्य होय हे खरे; पण ते याच तत्त्वावर झाले पाहिजे आणि होत असते. गृहसंस्थेच्या अभावी अपत्यांचे संगोपन होणार नाही असे नाही. वैद्यकीय दृष्ट्या कदाचित् जास्त चांगले होईल. पण रसेलने म्हटल्याप्रमाणे (मॅरेज अँड मॉरल्स् पृ. ३००) ते अगदी निष्प्रेम होईल आणि त्यात अगदी उद्वेगजनक एकरूपता येईल. मुलाच्या मनाच्या वाढीला व ते आनंदी, निर्भय आणि विशाल व्हावे यासाठी प्रेमळ वातावरणाची आवश्यकता असते आणि ते आईबापावाचून अन्यत्र मिळणे अशक्य आहे असेही त्यानेच म्हटले आहे. (पृ. १९४) तो माझा, मी त्याचा व इतर कुणाचा नव्हे एवढया भावना पिता-पुत्रांच्या प्रेमाला अवश्य आहेत. (याच बाबतीत जास्त चर्चा अपत्य संगोपन प्रकरणी पहावी.)
मी, माझी पत्नी, माझी अपत्ये ही भिन्नतेची भावना मानवाच्या मनाला फार पोषक आहे. शाळेच्या लहानशा जगातही हिचा परिणाम आपणास दिसून येतो. ए व बी या तुकड्यांच्या मुलांत तादृश फरक फारसा नसतो, पण आपण 'ए' पासून निराळे आहो, त्यांच्यावर चढ करण्यास आपण झटले पाहिजे, ही भिन्नतेची भावना विघातक तर नाहीच; पण उलट पोषक आहे. तुकडीच्या लहानशा गटांतील हीच भिन्नतेची भावना शाळा, शहर व राष्ट्र या पायऱ्यांनी वर गेलेली असते. इतरांहून भिन्नता जितकी तीव्र तितकी गटाशी निष्ठा उत्कट आणि त्या मानाने कर्तृत्त्व जास्त प्रभावशाली असे येथे अगदी स्पष्ट दिसून येते. अर्थात् या भिन्नतेत द्वेषाचा मागमूसही न येऊ देण्याची दक्षता घेणे फार अवश्य आहे पण काही असले तरी भिन्नतेखेरीज जीवन रुक्ष व कर्तृत्वशून्य होय यात शंकाच नाही. भिन्नतेची ही भावना गृहसंस्थेत अगदी उत्कटतेला नेलेली असते.
विषयानंद, सुप्रजेची निर्मिती आणि अनन्यसामान्य प्रेमाची प्राप्ती या विवाहाच्या तीनही हेतूंचे येथवर आपण परीक्षण केले; आणि त्यातील तिसरा हेतु श्रेष्ठ ठरविला. विषयानंद व सुप्रजा यांना कमी महत्व आहे असे मुळीच नाही. अनन्यसामान्य प्रेमाला ते पोषकच आहेत. पण तिसरा हेतू श्रेष्ठ ठरविण्याचे कारण असे की त्यावाचून विवाहच असणे शक्य नाही. एखाद्या पतिपत्नींना अपत्य झाले नाही तरी त्यांचे वैवाहिक नाते संपत नाही तुरुंगात गेल्यामुळे किंवा अन्य काही कारणामुळे दहापंधरा वर्षे जरी त्यांना विषयसुख मिळाले नाही, तरी आपण त्यांना नावे ठेवीत नाही. त्यांनी विवाहबंधने मोडली असे आपण म्हणत नाही. पण ते जर परस्परांशी एकनिष्ठ नसतील तर त्यांच्या विवाहाला आपण विवाहच म्हणत नाही. तेव्हा विवाहात अनन्यसामान्य प्रेमाला श्रेष्ठता आहे हे निर्विवाद होय. यावरून असे दिसेल की व्यक्तीचे सुख हेच विवाहाचे अंतिम आहे. प्रजेच्या बाबतीत सुद्धा असेच आहे. व्यक्ती स्वतःच्या सुखासाठी प्रजा निर्माण करते व तिचे संगोपन करते. समाजाचे हित हे पर्यायाने व्यक्तीचेच हित असल्याने या सुखाला मुरडी व बंधने घालून सामाजिक दृष्टीही विवाहांत ठेवली पाहिजे हे खरे; पण हे सांगताना समाजाने मूळ हेतूकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, हेही तितकेच खरे आहे.
स्त्री पुरुषांची उच्चतम मैत्री, अनन्यसामान्य प्रेम, ही भावना मुळांत जरी नैसर्गिक असली तरी तिची वाढ करून तिला योग्य वळण लावणे हे अवश्य आहेच. कारण परस्परविरोधी अनेक प्रकारच्या प्रवृत्ती मनुष्याच्या अंगी असतात. कीर्तीची आस कोणाला नाही ? पण प्रत्येकाला ती असूनही आळस, हीन सुखाचा लोभ हे अनेक दुर्गुण तिच्या आड येतातच. तसेच अनन्यसामान्य प्रेमाचे आहे. कीर्तीची आस जरी नैसर्गिक असली तरी तिची शिकवण समाजाला देऊन तिचे सारखे संगोपन करणे हे जसे अवश्य आहे, तसेच स्त्री-पुरुषांच्या या उच्च मैत्रीचे आहे. सर्वांना यातील गोडी कळेलच असे नाही. कळली तरी त्याची किंमत देण्यास ते तयार होतीलच असे नाही. मनुष्य हा जसा अनेक चांगल्या प्रवृत्तीने युक्त आहे तसाच असत प्रवृत्तीनेही तो युक्त आहे त्यामुळे अनन्यसामान्य प्रेम हे जरी ध्येय असले तरी ते पूर्णांशाने कोठेही व कधीही साध्य होत नसते. बंधारा घालून नदीचे सर्वच्या सर्व पाणी आडवले तर हवेच आहे. पण तसे करू गेल्यास सर्वच पाणी वाहून जाऊन तलाव कोरडा पडण्याचा संभव असतो हा सृष्टिरचनेचा दोष आहे. मानवाच्या हातात नाहीत अशा शक्तीच इतक्या आहेत की त्यांचे ध्येय पूर्णांशाने त्याला कोठेच साध्य करून घेता येत नाही. इतकेच नव्हे तर आपला कमकुवतपणा, व सृष्टीच्या विरोधी शक्ती या ओळखून त्याने ध्येयाला योग्य त्या मुरडी घातल्या नाहीत, तर सर्वच बंधारा फुटून त्याची जमीन वैराण होण्याचा प्रसंग येतो. याच दृष्टीने एकनिष्ठा व शाश्वतपणा या विवाहाच्या अलौकिक तत्वांनाही अगदी नाइलाजाने व मोठ्या दुःखानेच का होईना पण मुरडी घालणे प्राप्त होते. त्या तशा घातल्या नाहीत म्हणूनच पश्चिमेकडील विवाहसंस्थेचे दिवाळे वाजले अशी लिंडसे, एलिस वगैरे थोर विचारवंताची तक्रार आहे. त्या मुरडी कोणच्या व कशा घालावयाच्या, त्या कितपत इष्टानिष्ट व शक्याशक्य आहेत याचा विचार पुढील प्रकरणी करावयाचा आहे. पण तत्पूर्वी विवाहसंस्था व गृहसंस्था यांच्याबद्दल नवविचारी पाश्चात्य पंडितांची काय मते आहेत ते पहावयाचे आहे.
सामान्यतः पश्चिमेकडील सर्वच देशात विवाहसंस्था नष्ट होत आहे असे आपण ऐकत असलो तरी त्यातल्या त्यात रशियाबद्दल ओरड फार आहे. तेथे विवाहाची नोंद कायद्याने आवश्यक नाही. घटस्फोट वाटेल तेव्हा मिळतो, गर्भपात बेकायदेशीर नाही असे आपण ऐकतो आणि त्यामुळे तेथे सर्वत्र स्वैराचार, भ्रष्टाचार, बेबंदशाही आहे असे कल्पून त्यावर लेख लिहितो. सह्याद्रीच्या एप्रिलच्या अंकात असाच एक लेख आला आहे. पण मिस मेयोचे उदाहरणे ध्यानात ठेवून वाचकांनी या बाबतीत फार सावध राहिले पाहिजे. त्या प्रश्नाची चांगली बाजूही पाहून सहानुभूतीने विचार करणे हेच युक्त होईल. 'फॅक्टरी, फॅमिली ॲंड वूमन इन् सोव्हिएट रशिया'- किंग्जबरी व फेअरचाइल्ड; 'मॅरेज अँड मॉरल्स् इन् सोव्हिएट युनियन- ॲना लुइस स्ट्रांग; 'प्रोटेक्शन ऑफ वुमेन अँड चिल्ड्रेन इन् सो. रशिया'- अलाइस विथ्रोफील्ड वगैरे पुस्तके पाहिली तर वस्तुस्थिती पुढीलप्रमाणे आहे असे दिसून येईल. स्वैराचाराला रशियात मुळीच उत्तेजन नसून आत्मनिग्रह, एकनिष्ठा हीच त्यांना प्रिय आहेत. मते मागविली तेव्हा शेकडा ७० तरुणांनी एकपत्नीपद्धत मान्य असल्याचे सांगितले. स्वैराचार करणाऱ्याला कम्युनिस्ट पार्टीतून हाकलून देतात. केवळ एकदा समागम केला इतके जरी सिद्ध झाले तरी पुरुषाला अपत्याच्या संगोपनाचा खर्च देणे कायद्याने भाग पडत असल्यामुळे स्वैराचार करणे येथे फार कठीण झाले आहे. गर्भपाताला कायद्याने परवानगी असली तरी त्याविरुद्ध सरकारने फार जोराची चळवळ चालविली आहे. बर्लिनपेक्षा मास्कोमध्ये जास्त गर्भपात तर होत नाहीतच, पण सरकारी डॉक्टरांच्या नजरेखाली शस्त्रक्रिया होत असल्यामुळे रशियातील स्त्रीच्या जीविताला धोका जवळजवळ नाहीसा झाला आहे. शिवाय पहिला गर्भ किंवा अडीच महिन्यांवर वाढलेला कोणाचाही गर्भ नाहीसा करणे बेकायदेशीर आहे. यावरून असे दिसेल को विज्ञानान्वये जे शुद्ध व निग्रही आचरण ठरेल ते रशियन लोकांना हवेच आहे. स्वैरता, अनिर्बंधता तेथे मुळीच नाही. फरक एकच आहे की या बाबतीत कायद्याचा काहीएक उपयोग नाही असे त्यांना वाटल्यामुळे ही गोष्ट उपदेशाने घडवून आणावी असा त्यांचा प्रयत्न आहे.
मूठभर आर्यस्त्रियांच्या थोरवीकडे नजर ठेवून आर्यस्त्रियांच्या शीलाबद्दल भोळसटपणे काही तरी लिहिणाऱ्या लेखकांची खरोखर कींवच येते. काही थोड्या जाती सोडून दिल्या तर येथेही दोनतीन बाप, स्वैरसंभोग, मुदतीची लग्ने, बहुपतित्व ही वाटेल तितकी दृश्ये दिसतील. आणि पुन्हा या सर्वावर धर्माचा शिक्का लागलेलाही दिसेल. रशियात गर्भपाताला स्वातंत्र्य आहे असे सांगणे हे हिंदुस्थानात चौदा वर्षांच्या आतील मुलीवर अत्याचार करण्यास परवानगी आहे असे सांगण्याप्रमाणेच आहे. हिंदुस्थानात पंधरा वर्षांखालच्या ६४ लक्ष; पाच वर्षाखालच्या दीड लक्ष आणि एक वर्षाच्या आतल्या १०८१ विधवा (!) आहेत. हे येथल्या विवाहपद्धतीच्या यशाचे चिन्ह खास म्हणता येणार नाही. शिवाय दहा व अकरा वर्षांच्या कित्येक माता (!) येथे मृत्युमुखी पडतात. हेही दृश्य मोठेसे शुभ नाही. श्रद्धानंद महिलाश्रम, पंढरपुरचे आश्रम वगैरे संस्था येथल्या विवाहसंस्थेबद्दल कोणची साक्ष देतात तीही ऐकली पाहिजे. त्यावरून असे दिसते की पश्चिमेकडे विवाहसंस्था धुळीस मिळत असली तर येथेही तेच आहे. इतकेच नव्हे तर येथल्या काही जाती सोडल्या तर हजारो वर्षे येथे रशियाच आहे. आणि त्या शुद्ध जातीचे जे प्रमाण आपल्याकडे निघेल, तितक्या स्त्रिया रशियातच काय पण कोणत्याही देशात सापडतील. मात्र अजून एक ठळक फरक आहे. हिंदुस्थानांतल्या स्त्रीला स्वातंत्र्याची प्राप्ती झाली नाही. ती झाली, तिला आपल्या व्यक्तित्त्वाची जाणीव झाली म्हणजे मग ती कशी राहील यावर सर्व अवलंबून आहे. येथे स्त्रियांना गोषात ठेवाव्या लागतात, किंवा गावाला जाताना त्यांना सुंकले घालावे लागते अशी कित्येक ठिकाणी स्थिती आहे. तेव्हा येथल्या विवाहसंस्थेची स्थिती काही फार अलौकिक आहे हे भोळसट समाधान मानून स्वस्थ बसणे अगदी घातकी ठरेल हे ध्यानात ठेवले पाहिजे.
रशिया सोडून इतर देशांकडे पाहिले तरी असे दिसले की विवाहसंस्था किंवा गृहसंस्था अजिबात नाहीशी करावी असे म्हणणारे लेखक क्वचितच आढळतात. तिच्यामधले दोष दाखविणारा एलिससारखा पंडितही स्पष्टपणे असे सांगतो की गृहसंस्था बुडवायचा प्रयत्न करूनही बुडणार नाही. इतकी ती मानवाच्या स्वभावाशी निगडित झाली आहे. (मोअर एसेज ऑफ लव्ह अँड व्हर्च्यू पान २४ व्हिदर मनकाइंड पान २१४). जज् बेन लिंडसे यांच्यावर या बाबतीत फार गहजब झाला आहे. पण रिव्होल्ट ऑफ मॉडर्न यूथ या पुस्तकांत (पृ. १३७) त्याने स्पष्ट म्हटले आहे की विवाहसंस्थेवर माझा ठाम विश्वास आहे. आणि स्त्रीपुरुषांचे एकमेकांवर अनन्यसामान्य प्रेम (The love of one man for one woman) यालाच मी विवाह म्हणतो. रसेलचे मत वर सांगितलेच आहे. विवाहसंस्था मोडणे मुळीच हितप्रद नसून ती मोडली तर अपत्य संगोपन नीट होणार नाही आणि पुरुष कर्तृत्वशून्य होईल असे तो म्हणतो. दि वे ऑफ ऑल वूमेन (पू. १७२) या पुस्तकात ईस्थरहार्डिंग या लेखिकेने म्हटले आहे की शाश्वतता हे तर विवाहाचे मुख्य लक्षण होय. आणि तसे न मानता जी स्त्री विवाह करील तिचा विवाह कधीच सुखादायी होणार नाही. व्हॅन डी व्हेल्डे या स्विट्झरलंडमधील मोठ्या लेखकाचे मत असेच आहे तो म्हणतो की एकनिष्ठा व शाश्वतता या लक्षणांनी विवाहसंस्थेचा विकासच दिसून येतो आणि विवाहातून काही त्रास व दुःखे जरी निर्माण होत असली तरी त्या संस्थेच्या अभावी याच्यापेक्षा किती तरी अधिक दुःखे मानवाला भोगावी लागतील. (आयडियल मॅरेज पृ. २) मॅक् डुगल या विख्यात मानवशास्त्रज्ञाला विवाह तर मान्य आहेच, पण शिवाय विवाहित स्त्रीपुरुषांनी परक्या स्त्रीपुरुषांसह नाचणे हेही गर्ह्य आहे असे तो मानतो (कॅरेक्टर ॲंड काँडक्ट.)
यावरून असे दिसेल की युरोपातल्या पंडितांनाही विवाह आणि गृह या दोन्ही संस्था अत्यंत आवयश्क वाटतात. फरक एवढाच आहे की तिच्या मर्यादा व नीतिनियम विज्ञानाला विचारून बसवावे असे ते म्हणतात. मानसशास्त्र, सुप्रजाशास्त्र, आरोग्यशास्त्र, अर्थशास्त्र इत्यादी अनेक शास्त्रांना विचारून नियम ठरवावे व त्यांना संमत नाहीत अशी बंधने कितीही पवित्र, व श्रुतिस्मृतिपुराणबायबलोक्त असली तरी ती काढून टाकावी असे त्यांचे म्हणणे आहे. तपशिलात मतभेद होणे केव्हाही शक्य आहे. काही मतभेदाने सिद्धान्तच उलटतो हेही खरे आहे. पण असे कोठेही असणारच. आपल्याकडच्या दोन स्मृती घेतल्या तरी त्यताही असे दिसून येईल. तेवढ्यावरून काही विपरीत बोलण्यात मुळीच अर्थ नाही. आता विज्ञानाचे सांगणे आणि धर्माचे सांगणे यातच जमीनअस्मान अंतर आहे यात शंका नाही. पण ते एवढ्याच बाबतीत नसून सर्वच क्षेत्रात आहे. आणि अशा वेळी विज्ञानाचे ऐकले पाहिजे हे आपण मागेच ठरविले आहे.
पण गृहसंस्थेच्या पुरस्कर्त्यांनी पश्चिमेकडील या हल्ल्याने गांगरून जाण्याचे मुळीच कारण नाही. येथील वेदान्त्यांनी याहीपेक्षा जास्त मोठा हल्ला मागे या संस्थेवर केला होता आणि अजून तीच बडबड करण्याची चाल तत्पंथीयांनी सोडलेली नाही. कसली बायको नि कसला पुत्र असे म्हणून आचार्यांनी पुरुषाची दोन प्रबळ निष्ठास्थांनेच हलविली. संसाराची काळजी वाहणे हे या मार्गातील लोकांना मोठे गर्ह्य वाटते, एखादेनि अकाळ काळें । मजचि जैं मरण आलें । तें काय करितील स्त्रिया वाळें आसवीं डोळे लोटतीं ॥ अशी खंती पुरुष करतो म्हणून एकनाथमहाराजांनी त्याला मूढगती म्हटले आहे. (एकनाथी भागवत १७।५२४.) पण ही उदाहरणे कशाला ? संसाराची निंदा करण्याचे सुख जिव्हेने भागले नाही असा सत्पुरुषच आपणास सापडणार नाही पण विवाहसंस्थेचे अद्भुत यश यातच आहे की हे ऐकून लोकांनी तर संसार सोडले नाहीतच पण या साधूसंतांनीही ते सोडले नाहीत. आलिप्तपणे का होईना, भोगायचे नाही अशा इच्छेने का होईना ते संसारसुख भोगीतच राहिले. आता लोकांनी संसार सोडले नाहीत तरी ज्ञान विन्मुखता, तर्कशून्यता, कर्तृत्वाबद्दल निराशा इत्यादी अनेक दुर्गण या उपदेशामुळे उत्पन्न झालेच; पण विवाहसंस्था अजिबात ढासळली नाही हे काय थोडे झाले ? तेव्हा वेदान्ताच्या प्राणघातक हल्ल्यातूनही जी संस्था सहीसलामत बाहेर पडली तिला, सर्वस्वी अनुकूल असलेल्या पाश्चात्यांच्या काही तपशिलातल्या सुधारणांनी भय उत्पन्न होईल, अशी भीती बाळगणे अगदीच असमंजसपणांचे होईल.
विवाह आणि गृह या संस्थेवर कितीही जहरी टीका होत असल्या त्यावर कितीही जोराचे हल्ले होत असले तरी त्या ढासळून पडणार नाहीत व पडू नयेत अशीच सर्व विचारी पु षांची इच्छा आहे, हे मागील प्रकरणी आपण पाहिले पण त्याबरोबरच आपल्या असेही ध्यानात आले की या दोन्ही संस्था जर चिरंजीव करावयाच्या असतील तर त्यांच्या स्वरूपात व रचनेत आपणांस आमूलाग्र फरक केला पाहिजे. गेल्या दोन हजार वर्षांत व विशेषतः गेल्या दीडशे वर्षांत समाजाच्या स्थितीत, माणसांच्या मनोभावनात, नैतिक मूल्यात इतके जमीनअस्मान फरक पडले आहेत की जुन्या तत्वावर चालविलेली कोणतीही संस्था या कालात टिकून राहणे अगदी अशक्य आहे.
विवाहसंस्थेचे भवितव्य.

गृहसंस्थेचे नवे स्वरूप