विज्ञान-प्रणीत समाजरचना/संस्कृति आणि प्रगति


संस्कृति आणि प्रगति.


 पशूपेक्षा मनुष्य श्रेष्ठ असे आपण म्हणतो. त्या वेळी सर्व पशू सारखे व सर्व मानव सारखे असे आपल्या मनात मुळीच नसते. पशूमध्येही आपण प्रतवारी लावतोच. गाढव, टोणगा यांच्यापेक्षा घोडा, हत्ती व त्यांच्यापेक्षा वाघ, सिंह हे पशू आपण श्रेष्ठ समजतो. माणसातही तसेच आहे. निग्रोपेक्षा रेड इंडियन, त्याच्यापेक्षा चिनी व चिन्यापेक्षा युरोपी श्रेष्ठ अशी प्रतवारी लावली जाते. व्यक्तीव्यक्तीमध्येसुद्धा आपण मनाने तुलना करीत असतो. चंगीझखानापेक्षा नेपोलियन व नेपोलियनपेक्षा शिवाजी श्रेष्ठ असे काही लोक समजतात. व्यक्तीप्रमाणेच राष्ट्राराष्ट्रामध्येही श्रेष्ठकनिष्ठता लाविली जाते. काहींच्या मताने हिंदुस्थान, चीन ही मागासलेली राष्ट्र असून इंग्लंड, जर्मनी, अमेरिका आज श्रेष्ठ आहेत. पण उलट, इंग्लंडजर्मनीपेक्षा आजही हिंदुस्थान श्रेष्ठ आहे असे काहींचे मत आहे. याहीपेक्षा मोठे विभाग करून पाश्चात्य संस्कृती श्रेष्ठ की पौर्वात्य असा वाद घातला जातो व त्यावरही उलट सुलट मते आपण देतो व ऐकतो.
 हा श्रेष्ठकनिष्ठतेचा रूढ झालेला विचार पाहिला म्हणजे असे पक्के वाटू लागते की अमुक श्रेष्ठ व अमुक कनिष्ठ असे जो ठरवितो त्याच्याजवळ त्या श्रेष्ठकनिष्ठतेचे मोजमाप करता येईल असे काही तरी साधन खास असले पाहिजे. ते साधन कोणचे व तेच तू का वापरतोस असे विचारले. तर प्रत्येकाला सांगता येईल असे नाही. पण प्रत्येकाच्या मनात त्या वेळी ते अस्पष्टपणे का होईना ठरलेले असले पाहिजे यात शंका नाही. पण हे साधन आपण तपासून पाहू लागलो तर मात्र आपला गोंधळ उडून जातो. गाढवापेक्षा बैल श्रेष्ठ का तर बैलाचा उपयोग जास्त म्हणून. म्हणजे येथे उपयुक्तता हे माप आहे. पण गाढवापेक्षा सिंह श्रेष्ठ असे म्हणताना उपयुक्तता हे माप लावून बोलतो असे म्हणता येईल काय? माणसामाणसात श्रेष्ठकनिष्ठ ठरविताना असेच प्रश्न निर्माण होतात. शेतकरी सर्व जगाला अन्न पुरवितो व कोष्टी वस्त्र देतो. पण शिरप्या किंवा कोळया यांच्यापेक्षा कोणाचेही पोट न भरणारे जे गंधर्व किंवा रविवर्मा त्यांना आपण श्रेष्ठ समजतो व त्याचांच मानसन्मान करतो. शास्त्रज्ञांमध्ये सुद्धा धान्यासाठी उत्तम खत शोधून काढून एक खंडीच्या जागी दोन खंडी पिकवून देणाऱ्या संशोधकापेक्षा एका ताऱ्यावरचा प्रकाश किरण दुसऱ्या ताऱ्यावर जात असताना एक दश कोट्यांश सेंटी मीटर वाकडा होतो की नाही हे सांगणारे आइन्स्टाइन् किंवा रामन् यांनाच लोक श्रेष्ठ समजतात. नूरजहानला श्रेष्ठ म्हणताना जे माप असते ते झाशीच्या लक्ष्मीबाईला श्रेष्ठ म्हणताना नसते. सीतेला ज्या कारणासाठी आपण मान देतो त्याच कारणासाठी जिजाबाईला मानतो असे नाही. स्वार्थत्यागावर श्रेष्ठता ठरते असे म्हणावे तर रणांगणात आत्मबलिदान करणाऱ्या कोणच्याही सैनिकापेक्षा शिवाजीला आपण श्रेष्ठ समजतो. पित्राज्ञा पालन करणारा रामचंद्र व तिचा भंग करणारा प्रल्हाद, मातेची पूजा करणारा पुंडलीक व तिची हत्या करू पाहाणारा भरत, सत्यासाठी राज्य घालविणारा हरिश्चंद्र व पावलोपावली त्याला हरताळ फासणारा व फासा म्हणून भर देणारा श्रीकृष्ण या सगळ्यांना आपण श्रेष्ठच समजतो. हे सर्व लक्षांत घेतले म्हणजे अमुक श्रेष्ठ व अमुक कनिष्ठ हे जरी चटकन् आपल्या मनात येत असले तरी त्यां श्रेष्ठकनिष्ठतेची कारणमीमांसा करणे हे अत्यंत अवघड काम आहे हे ध्यानात येईल.
 संस्कृती व प्रगती यांच्या अर्थाबद्दल व अर्थ ठरल्यानंतर त्यांच्या इष्टानिष्टतेबद्दल पंडितांमध्ये जी रणे माजून राहिली आहेत त्यांच्या बुडाशी श्रेष्ठकनिष्ठतेसंबंधी वर सांगितलेली अनिश्चितता हीच आहे. कोणाला संस्कृत समजावे व कोणाला प्रगतिमान समजावे व तसे समजल्यानंतर ते मोठेपणाचे लक्षण समजावे की अधःपाताचे याही बाबतीत पंडितांचे एकमत नाही. एडवर्ड कार्पेंटरच्या मते संस्कृती हा समाजाचा एक मोठा रोग आहे व तो नाहीसा होईल तो सुदिन. संस्कृती म्हणजे काय हे मला समजत नाही असे हॅवलॉक् एलिस याने म्हटले आहे. प्रोग्रेस (प्रगती) हा एक भ्रम आहे पण तो आवश्यक भ्रम आहे असे एकाचे मत आहे. यूरोपमधून येणाऱ्या लोकांखेरीज आफ्रिकेत रानटी लोकच नाहीत असे ब्रिक म्हणतो. आपल्या ज्ञानात वाढ झाली असली तरी शक्ति किंवा बुद्धी या दृष्टीने गेल्या चाळीस हजार वर्षांत मानवाची अणु इतकीसुद्धा प्रगती झाली नाही असे ऑसबॉर्न इतर अनेक पंडित यांचे मत आहे. दया, प्रेम, सत्याचरण या दृष्टीने चार हजार वर्षापूर्वीच्या आपल्या पूर्वजांपेक्षा आपण काकणभरही पुढे गेलेलो नाही असे डीन इंग, अल्फ्रेड, रसेल, बॅलेस् वगैरे पंडित म्हणतात. सुख हे माप धरले तरी आगगाडी, विमान, टेलिफोन, सिनेमा इत्यादि साधने असून मानवाचे सुख सुईच्या अग्राइतकेही वाढलेले नाही असे कित्येक म्हणतात व काही आणखी पुढे जाऊन म्हणतात की, खातेऱ्यात लोळणाऱ्या गाढवाच्या सुखात, गणितात मग्न होणाऱ्या न्यूटनच्या सुखांत व समाधी लावून ब्रह्मलीन होणाऱ्या ज्ञानेश्वरांच्या सुखात काही फरक असेल असे आम्हास वाटत नाही व गाढवाच्या सुखाची तुम्हाला मुळीच जाणीव नसल्यामुळे तुम्हाला त्यात काही सांगण्याचा अधिकार नाही. याच्या उलट आजच्या मानवाने बुद्धीला प्रमाण मानून परमार्थाचा भ्रम झुगारून दिल्यामुळे तो फार सुखी झाला आहे, असेही म्हणणारे लोक आहेत. हे सर्व पाहिले आपल्या सामान्य बुद्धीचा मोठा गोंधळ उडून जातो. आपल्या स्थिर कल्पना पाचोळ्यासारख्या उडून गेल्यामुळे मनाला मोठा खेद होतो. संस्कृती म्हणजे हे लोक म्हणतात तरी काय, असा प्रश्न उत्पन्न होतो.
 त्यालाही उत्तर देण्याचा अनेकांनी प्रयत्न केला आहे. कोणत्या समाजाला सुसंस्कृत म्हणावे असे विचारताच (१) ज्यात माणूसकीची वाढ झाली आहे तो (अर्नोल्ड) (२) ज्यांत बुद्धीच्या विकासाला वाव आहे तो, (माँटेस्क्यू) (३) परिस्थितीशी जमवून घेण्याची ज्यांत जास्त शक्ती आहे तो (४) चिकित्सकबुद्धी व परमेश्वरी इच्छा यांना प्राधान्य देणारा, (५) विज्ञान व प्रेम यांच्या नेतृत्वाने चालणारा. (रसेल), (६) एकमेकांच्या फायद्यासाठी ज्यांत लोक झटतात तो, (७) वासना मारून टाकून कर्मसंन्यासमार्गाने मोक्षसाधणारे लोक जास्त आहेत तो, (८) कर्मयोग मार्गाने मोक्ष साधणारे ज्यात जास्त आहेत तो; अशी अनेक उत्तरे आपणास पंडितांच्याकडून मिळतात व पुन्हा मन गोंधळून जाऊन इतक्या भिन्न व्याख्या करण्याजोगी अशी काय भिन्न धोरणे यांनी मनात धरली होती, म्हणजे कोणच्या मापांनी हे समाजाला मोजावयास प्रवृत्त झाले होते हा पहिलाच प्रश्न पुन्हा उभा राहातो.
 अमुक व्यक्ती किंवा समाज श्रेष्ठ असे सांगताना आपल्या मनात जसे काही माप असावे लागते, त्याचप्रमाणे अमके राष्ट्र प्रगतिमान् आहे तमके मागासलेले आहे असे म्हणताना आपल्या मनात काही ध्येय ठरलेले असावे लागते. तसे असले म्हणजे त्या ध्येयापासून ते राष्ट्र किती मागे किंवा जवळ आहे हे मोजून त्यावरून प्रगती किंवा परागती ही ठरविता येईल. स्त्री ही पुरुषाच्या बरोबरीची होणे ही रशियात प्रगती समजतात तर जर्मनीत परागती समजतात. धर्म नाहीसा होत चालला तर रशियाला ती प्रगती वाटेल तर हिंदुस्थानात त्यालाच अधःपात म्हणतील. कारण दोघांची ध्येये दिसावयास तरी भिन्न दिसत आहेत.
 तेव्हा प्रथम अखिल मानवजातीचे ध्येय काय आहे, निरनिराळ्या समाजाची निरनिराळी ध्येये असतात किंवा काय, असल्यास त्या भिन्नपणात कितपत अर्थ आहे, हे पाहून त्यावरून संस्कृती मोजण्याचे काही माप सापडते की काय ते ठरवून मग त्यावरून कोणचे कनिष्ठ हे ठरवावे लागेल त्याचीच चर्चा प्रस्तुत निबंधात करावयाची आहे.
 सर्व मानवजातीचे सुख हे ध्येय आहे. सुखाच्या कल्पना व्यक्तिपरत्वे भिन्न होतात हे खरे. दुसऱ्याच्या देहाला आग लावून देऊन त्याच्या किंकाळ्या ऐकत बसण्यात काहीना सुख वाटते, तर दुसऱ्याच्या किंकाळया थांबविण्यासाठी स्वतःचा देह अग्नीला अर्पण करण्यात काहीना सुख वाटते. सुखाच्या कल्पनांत जरी असे दोन ध्रवाइतके अंतर असले तरी मानव जी कोणची क्रिया करीत असतो ती त्याच्या कल्पनेप्रमाणे सुख मिळविण्यासाठीच करीत असतो यांत शंका नाही. मजूर शेतात राबतो, तो त्याला राबण्यात सुख वाटते म्हणून राबतो असा याचा अर्थ नव्हे. पण या राबण्याने संध्याकाळी भाकरी मिळेल, ही त्याला खात्री असते म्हणूनच तो राबतो हे निर्विवाद आहे. ती खात्री नाहीशी झाली तर तो काम करणार नाही. गुलाम अशाही स्थितीत काम करीत राहातो. भाकरी मिळेलच अशी त्याला खात्री नसते. पण येथेही नीट विचार केला तर असे दिसेल की काम न केले तर जे फटके बसतील, ते टाळण्यासाठी म्हणजे एक प्रकारच्या सुखासाठीच तो काम करीत असतो या प्रकाराला सुख म्हणणे विचित्र दिसेल. पण फटके खाणे ही स्थिती व काम करणे ही स्थिती यांत काम करणे ही स्थिती गलामाला बरी वाटत असते. म्हणजे तो सुखासाठी काम करतो असे जरी म्हटले नाही तरी दुःख टाळण्यासाठी करतो असे म्हणावेच लागले. या प्रकारच्या सुखाला दुःखाभावरूप सुख 'असे' टिळकांनी म्हटले आहे. या अगदी कनिष्ठ सुखापासून खाणेपिणे, नाचरंग, वाचन, मनन, चिंतन अशा सुखाच्या श्रेष्ठ प्रती सुरू होतात. शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक असे सुखाचे तीन प्रकार आहेत. अध्यात्मिक आनंदाला सुख हे नाव देऊन धर्मानेही सुख हेच मानवजातीचे ध्येय आहे हे मान्य केले आहे. इतकेच नव्हे तर तेच असावे असे सांगितले आहे. शारीरिक सुखापेक्षा मानसिक व मानसिकांपेक्षा अध्यात्मिक सुख श्रेष्ठ असे जरी म्हटले असले तरी अंतिम ध्येय सुख, याबद्दल कोणाचाच वाद नाही. पुनःपुन्हा ही गोष्ट सांगण्याचा हेतु असा. काही लोक धर्माच्या मते सुख हे मानवाचे ध्येय नसून हित हे आहे असे म्हणतात. सुख व हित या शब्दांचा विचार केला तर पुढील फरक दिसून येतो. आज कष्ट करण्यात तुला सुख वाटत नसले तरी त्यातच हित आहे असे, आपण विद्यार्थ्याला म्हणतो, पण येथे हित याचा अर्थ उद्यांचे सुख एवढाच आहे. व सुख की हित असा वाद करणाऱ्यांच्या मनात एवढाच फरक असेल तर अधिक ऊहापोह करण्याची जरुरी नाही. कारण मानसिक सुख मान्य करणाऱ्यांच्या मनात आजचेच सुख अभिप्रेत असणे शक्य नाही. अमुकच प्रकारचे सुख हे ध्येय असा आग्रह कोणीच धरीत नाही. तेव्हा धर्माने सुख हेच ध्येय मान्य केले आहे असे म्हणण्यास मुळीच हरकत नाही. निःश्रेयस, हित, कल्याण या शब्दांनी आध्यात्मिक सुख एवढेच अभिप्रेत आहे, असे गीतारहस्यात स्पष्ट म्हटले आहे. (पान ११६).
 आता शारीरिक सुख सोडून आध्यात्मिक सुख म्हणजे मोक्ष तू मिळव, असे सांगण्यात धर्माचा काय हेतु आहे असा प्रश्न येतो. पण याचे उत्तर अगदी सोपे आहे. तू आता भटक्या मारू नको, अभ्यास करण्यात तुला दुःख वाटत असले तरी अभ्यासच कर; त्यानेच तुला सुख मिळेल असे ज्या कारणासाठी आपण विद्यार्थ्यास सांगतो, त्याच कारणासाठी ऐहिक सुख सोडून तू मोक्षसुख मिळव असे धर्म सांगत असतो. आपल्या सांगण्याचे कारण उघड आहे. आता तू खेळलास तर तुला दहा मिनिटे सुख लागेल, पण अभ्यास केलास तर पुढील आयुष्यात दहा वर्षे सुखाची जातील, असा आपल्या सांगण्यांतील आशय असतो. म्हणजे अल्पकाल टिकणारे सुख सोडून देऊन दीर्घ काल टिकणारे सुख तू घे एवढेच आपण म्हणत असतो. समाजाच्या दृष्टीने याचे बरे-वाईटपण आपण पुढे पाहाणारच आहो. पण येथे येवढं स्पष्ट दिसते की सुखाच्या ऱ्हस्व-दीर्घत्वावरच आपला उपदेश अवलंबून असतो. शारीरिक सुखापेक्षा मानसिक सुख श्रेष्ठ म्हणतात त्याचे कारण हेच आहे. सामाजिक दृष्टीने त्याची आणखीही काही कारणे आहेत. पण व्यक्तीच्या दृष्टीने पाहिले तर शारीरिक सुखापेक्षा मानसिक सुख श्रेष्ठ असे म्हणण्याचे कारण इतकेच की ते दीर्घकाल टिकते. व त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होत नाही. आहार निद्रा, मैथुन या सुखाचे सुखत्व फारच थोड्या काळात नष्ट होते. गोड खाण्यांचा कंटाळा आपणास अर्ध्या तासाच्या आतच येतो. निद्रा ही विश्रांती पुरी झाल्यावर सुखद होऊ शकत नाही. पण मानसिक सुखांचे तसे नाही. वाचन, लेखन, सृष्टीच्या नियमांचा अभ्यास, गूढ प्रश्नांवर चितन यांचा आनंद, ज्याला त्याची गोडी लागली आहे, तो मनुष्य वर्षानुवर्षे अखंड घेऊ शकतो. शारीर सुखाची मर्यादा थोडी जरी ओलांडली तरी व्याधी जडतात. ती भीती मानसिक सुखात नाही. शारीरिक सुखाच्या मानाने मानसिक सुख भोगण्याची आपल्या ठायी असलेली शक्ती अमर्याद आहे असे म्हटले तरी चालेल. आणि म्हणूनच ते सुख श्रेष्ठ असे आपण म्हणतो धर्माची पायरी याच्या पुढची आहे. ब्रह्मात विलीन झालास म्हणजे तुला कायमचे सुख, शाश्वत सुख मिळेल एवढेच धर्माला सांगावयाचे आहे. आणि ते खरे असेल तर व्यक्तीच्या दृष्टीने मोक्ष हे परमोच्च साध्य होय यात शंका नाही आणि म्हणूनच मोक्षसुख किंवा आध्यात्मिक सुख असे ज्याला म्हणतात त्यांचे स्वरूप काय आहे, व त्याच्याही अगोदर तसा काही प्रकार शक्य आहे, का तो उगीचच एक भ्रम आहे, याचा विचार आपणास केला पाहिजे.
 हे जग सोडून, जिवलगांचे संबंध तोडूनही तुम्ही मोक्षाच्या मागे लागा, असे जेव्हा धर्म सांगतो, तेव्हां त्यामुळे तुम्हाला कायमचे सुख प्राप्त होईल असे आश्वासन तो देत असतो. पण मोक्षाच्या स्वरूपाचे जे वर्णन करण्यात येते ते पाहिले तर ते 'मला सुख मिळावे' हा जो मानवाचा हेतू व 'तुला सुख मिळेल' हे जे धर्माचे आश्वासन त्यांशी अगदी विसंगत आहे असे ध्यानांत येईल. मनुष्य म्हणतो 'मला सुख पाहिजे' धर्म म्हणतो हे मला मान्य आहे. आणि येवढ्यासाठीच अत्यंत श्रेष्ठ व कायम टिकणारे सुख मिळविण्याचा मार्ग मी तुला सांगतो. तो कोणचा ? तर 'त नाहीसे होणे' हा मोक्ष म्हणजे दुसरे काय आहे ? आत्मा ब्राह्मात विलीन करून टाकावयाचा. देह तर सोडावयाचाच; पण मी ही जाणीवही नष्ट करून टाकावयाची. आणि मी ही भावनाच नष्ट करून टाकल्यानंतर म्हणजे देह व आत्मा या दोन्ही दृष्टीने 'मी' निखालस नाहीसा झाल्यानंतर 'मला' सुख मिळणार आहे असे धर्म सांगतो. मोक्ष जरी क्षणभर खरा मानला तरी ही सुखाची कल्पना मोठी अजब वाटते. सुख भोगणाराच नाहीसा झाला, म्हणजे त्याला सुख लागेल असे हे उत्तर आहे. आकाशातल्या ताऱ्याकडे पहाण्यात आपण दंग होऊन गेलो असलो, किंवा गायनाच्या लकेरीनी आनंदून गेलो असलो तर त्यावेळी क्षणभर देहभान विसरतो (असे म्हणतात). पण त्या क्षणी मी हे सुख अनुभवीत आहे, ही जाणीव स्पष्ट असते. आणि म्हणूनच तसले सुख तू घे असे कोणी सांगितले तर त्यात कांही विचित्र वाटत नाही. मला सुख हवे असे जेव्हा मी म्हणतो तेव्हा इतरांहून निराळे असे जे माझे व्यक्तित्व ते ठेवूनच, म्हणजे देह, आत्मा व मन हे निराळे ठेवूनच मला सुख हवे असा माझ्या म्हणण्याचा आशय असतो. पण हे व्यक्तित्वच तू नाहीसे कर म्हणजे तुला (?) सुख लागेल लागेल असे धर्म सांगतो. धर्माचे हे सुख माझ्या देहालाही नाही, मनालाही नाही व आत्म्याला तर सुतराम् नाही. कारण तो पूर्ण विलीन झाला, निराळेपणा अगदी नाहीसा झाला म्हणजेच मोक्षसुखाला सुरुवात होत असते. यातना असह्य झाल्या म्हणजे मनुष्य आत्महत्या करतो, त्यांत जी प्रवृत्ती असते तीच मोक्षांत आहे. आत्महत्या केली तरी देहच फक्त जातो, आत्मा तसाच रहातो अशी कोणाची तरी कल्पना झाल्यामुळे तोही नाहीसा करून टाकण्याची युक्ती त्याने सांगितली. व ती म्हणजेच मोक्ष होय. मोक्ष हा आत्यंतिक नाश आहे. त्याखेरीज दुसरे काही नाही. बुद्धाचे निर्वाण म्हणजे हेच. आणि भाषेत थोडाफार फरक केला तरी तेवढ्यावरून मोक्ष, निर्वाण व आत्यंतिक नाश यांत फरक आहे असे म्हणता येणार नाही. पूर्ण नाशाहून मोक्षस्थिती कांही निराळी आहे, असे सिद्ध करण्यासाठी काही साधुपुरुषांचे ब्राह्मी स्थितीचे अनुभव सांगितले जातात. पण एक तर हे अनुभव सर्वांचे सारखे नसतात. ती स्थिती म्हणजेच मोक्ष असे म्हणण्यास काहीच पुरावा नाही. समाधीतून परत आल्यानंतर त्या स्थितीची आठवण राहाते व त्यावरून ती स्थिती नाशापेक्षा निराळी आहे हे जाणता येते. हे जरी क्षणभर कबूल केले तरी साध्या माणसाच्या मृत्यूनंतर त्याला प्राप्त होणारी अवस्था व या समाधीवाल्याच्या मृत्यूनंतर त्याला प्राप्त होणारी अवस्था या भिन्न आहेत हे म्हणण्यास आधार काय ? तसा आधार कांहीच नाही. त्यामुळे मला यातना होत असल्या तर अफू घेऊन 'मी' ही जाणीव नष्ट करून. त्या थांबविणे याने जे सुख होते, त्याच जातीचे सुख म्हणजे अभावरूप सुख हेच मोक्षाने मिळते. इतकेच फार तर म्हणता येईल. पण हे सुख अगदीच हीन दर्जाचे आहे असे आपण आरंभीच पाहिले आहे.
 मोक्षासंबंधी दुसरा एक गैरसमज करून देण्याची चाल आहे. मोक्ष हे सुख नुसते दीर्घकाल टिकणार आहे एवढेच नव्हे तर ते अत्यंत उत्कट, अगदी अलौकिक आपल्याला कल्पनाही येणार नाही इतके अलौकिक आहे, इतर सुखे त्याच्या पुढे पासंगालाही पुरणार नाहीत असे वर्णन धार्मिक ग्रंथांतून केलेले असते. पण मोक्षसुखाची कल्पना प्रथम ज्यांनी सांगितली त्या उपनिषदांत या सुखाचे जे वर्णन आहे, त्यावरून या सर्व कल्पना फोल आहेत असे दिसून येईल. छांदोग्य उपनिषदाच्या मते गाढ निद्रेचे सुख व मोक्षसुख यांत काहीच फरक नाही. गाढ निद्रेत जीव हा निजस्वरूपात विलीन होत असतो 'सता सौम्य तदा संपन्नो भवति' असे गाढ झोपेचे वर्णन केलेले आहे. (छां. ६-८-१ म्हणजे हे मोक्षसुख प्रत्येक मनुष्य निदान कष्टाळू मनुष्य तरी रोज पाच सहा तास अनुभवीत असतो असे उपनिषदाचे मत आहे शंकराचार्य व विद्यारण्य यांनीही हे मत मान्य केले आहे. वरील भागावरील आचार्यांचे भाष्य असे आहे. 'मनसि प्रविष्टं मन आदि संसगंकृतं जीवरूपं परित्यज्य, स्वं सद्रूपं यत् परमार्थसत्यमपोतोऽपिगतो भवति' पंचदशीमध्ये विद्यारण्यानी तर याहीपेक्षा स्पष्ट वर्णन केले आहे.

तच्छ्रमस्यापतुत्त्यर्थं जीवो धावेत् परात्मनि ।
तेनैक्य प्राप्य तत्रत्यो ब्रह्मानंद: स्वयं भवेत् ।। ११-४५

 पंचदशीच्या पुढच्या दोन तीन श्लोकांत व त्याचप्रमाणे बृहदारण्यकोपनिषदातही वाटेल ते शब्द खर्चून, अतिशयोक्ती होईल इतके या सुखाचे वर्णन केले आहे. आता या आचार्यांच्या व श्रुतीतील वचनान्वये मोक्ष व गाढ निद्रा यांच्या सुखात जर काडीमात्रही फरक नसेल तर मोक्षाची जी भरमसाट वर्णने आपण वाचतो, ती सर्व आलंकारिक आहेत, असे म्हणण्यावाचून गत्यंतरच नाही. उपनिषदांतही मोक्षासुखाची विलक्षण वर्णने सापडतात. पण झोपेच्या सुखाचीही तसलीच वर्णने आहेत आणि ते काही असले तरी गाढ झोपेचे सुख व मोक्ष यात फक्त ऱ्हस्वदीर्घत्वाचाच जर फरक असेल तर त्या आलंकारिक बेफाम वर्णनाचा काही एक उपयोग नाही. आणि मग मोक्षसुखाची ज्याला गोडी लागली त्याला इतर सुखं तुच्छ वाटू लागतात, त्या सुखांवरून इतर सुखे ओवाळून टाकावीशी वाटतात. या म्हणण्यात काहीच अर्थ उरत नाही. कारण प्रत्येकाला हे सुख रोज अनुभवावयास मिळत असूनही त्याला इतर सुखे हवीशी वाटतातच. इतकेच नव्हे तर हे परम सुख टाकून देऊन कित्येक मानव नाचरंगांत तो काळ घालवितात. कित्येक पंडितही हे सुख सोडून वाचनमननात रात्रीच्या रात्री घालवतात. त्यांवरून हे सुख अडाण्यांना तर नाहीच पण पंडितानाही मोठेसे लोभनीय वाटते असे नाही. यावरून मग असा विचार डोकावतो की व्यभिचार, नाचरंग, दारू यांसारखी वाटेल ती कृत्ये करूनही मनुष्य जर बेफिकीर राहील व खूप शारीरिक कष्ट करील तर त्याला रोज ब्रह्मसुख मिळण्यास मुळीच पंचाईत पडणार नाही आणि त्यालाही हे सुख मिळणार असेल तर मोक्षासाठी तपश्चर्या करण्याचे कारणच नाही. वार्धक्य आले की काही तरी युक्ती करून झोपेतच प्राण जाण्याची व्यवस्था केली म्हणजे झाले. किंबहुना रोजच्या या महापुण्याच्या संचयामुळे आपोआपच तसे घडून यावयास हरकत नाही.
 आध्यात्मिक सुख हे अशा तऱ्हेने अगदी भ्रामक, हीन दर्जाचे व अलोभनीय ठरल्यानंतर आपल्यापुढे दोन प्रकारचीच सुखे राहिली. शारीरिक व मानसिक. त्यातले मानसिक सुख हे दीर्घकाल अनुभवती येणे शक्य असल्यामुळे शारीरिक सुखापेक्षा श्रेष्ठ आहे असे आपण पाहिले. येथे एक गोष्ट पुनः पुन्हा नजरेस आणावीशी वाटते की शारीरिकांपेक्षा मानसिक व मानसिकांपेक्षा आध्यात्मिक सुख श्रेष्ठ ही जी प्रतवारी लाविली जाते तिच्या बुडाशी कालाच्या अल्पदीर्घत्वावाचून दुसरे कांहीही नाही. म्हणजे सुखासुखांत कमीअधिक तीव्रता नसते असा याचा अर्थ नाही. एक शारीरिक सुख दुसऱ्या शारीरिक सुखापेक्षा श्रेष्ठ असू शकते. व तेच मानसिक सुखाच्या बाबतीतही असू शकेल. पण उत्कट शारीरिक सुखापेक्षा उत्कट मानसिक सुख तीव्रतेच्या, लज्जतीच्या दृष्टीने श्रेष्ठ असते असे म्हणता येणार नाही. एक टाकून दुसरे घ्यावयाचे ते केवळ दीर्घकाल टिकते एवढयाचसाठी. श्रीखंड खाणे, सुंदर युवतीचा नाच पाहाणे किंवा मद्य पिऊन बेहोष होणे ही सुखे वाटेल तितका दीर्घकाल अनुभवणे जर शक्य असते, शरीराला व्याधी जडून त्यांना जर मर्यादा पडल्या नसत्या, तर धर्माने त्यांचा निषेध केव्हाच केला नसता. कारण दीर्घकाल सुख मिळवून देणे एवढेच धर्माचे साध्य आहे. मोक्षसुख, गाढ निद्रेचे सुख व स्त्रीसंगाचे सुख यांची तीव्रता उपनिषद्कारांच्या मते एकच आहे. प्रिय स्त्रीशी संपरिष्वक्त झाल्यावर पुरुषाला बाह्यांतर भान जसे राहात नाही. त्याचप्रमाणे- एवमेव अयं पुरुषः प्राज्ञेन आत्मना संपरिष्वक्तो न बाह्य किंचन वेदनान्तरम्- त्या स्थितीतही बाह्यांतर भान नसते असे बृहदारण्यकोपनिषदात म्हटले आहे. (१४।३।२१). पण तीव्रता तीच असली तरी शारीरिक सुख फार मर्यादित आहे, म्हणून धर्मशास्त्र त्याचा निषेध करते.
 व्यक्तीच्या दृष्टीने विचार केला तर सुख हेच मानवाचे ध्येय आहे आणि शारीरिक सुखापेक्षा मानसिक सुख श्रेष्ठ असल्यामुळे ते प्राप्त करून घेण्यासाठी त्याने झटणे हे युक्त आहे असे आपण पाहिले. आता समाजाच्या दृष्टीने विचार करून त्या दृष्टीनेही हेच ध्येय ठरते की काय व ठरत असल्यास तेथे सुखाची श्रेष्ठकनिष्ठता कशावरून उरते ते आपणास पहावयांचे आहे.
 सुख हे व्यक्तीचे ध्येय म्हणून एकदा मान्य केल्यानंतर समाजाचेही ध्येय तेच असले पाहिजे हे अमान्य करता येणार नाही. कारण अनेक व्यक्ती एकत्र येणे याचेच नाव समाज व्यक्ती काढून टाकल्या तर समाज म्हणून स्वतंत्र काहीच उरत नाही. सर्व व्यक्तींना दुःख होत असताना समाजाला मात्र सुख होईल किंवा दुःख होणार नाही, हे शक्य नाही. म्हणून व्यक्तींना सुख मिळवून देणे हेच समाजाचे ध्येय असावयास पाहिजे मात्र एका व्यक्तीचे सुख हे समाजाचे ध्येय न राहाता सर्व व्यक्तींचे सुख, व ते शक्य नसेल तर जास्तीत जास्त व्यक्तींचे सुख हे समाजाचे ध्येय राहील मानवप्राणी हा इतका दुर्बल आहे की समाजाशिवाय म्हणजे अनेक व्यक्ती एकत्र राहिल्याशिवाय त्यांचे जीवनच अशक्य आहे. म्हणून समाज टिकवून धरणे हे समाजातील व्यक्तीचे सर्वात श्रेष्ठ कर्तव्य होय. दुसरे कोणचेही सुख समाजाकडून व्यक्तीला मिळाले नाही, तरी प्राणरक्षणाचे सुख मिळालेच पाहिजे. कारण त्यासाठीच त्याचे अस्तित्व आहे. तेव्हा जास्तीत जास्त व्यक्तीना जास्तीत जास्त सुख देणे हे ध्येय, समाज संघटित राखणे हे पुण्य व तो फुटून जाईल असे कोणचेही कृत्य करणे हे पाप, या तीन गोष्टी मनात बाळगल्या तर कोणत्याही श्रेष्ठ-कनिष्ठतेच्या किंवा नीती-अनीतीच्या प्रश्नांचा सहज उलगडा होईल.
 पण हा उलगडा कसा होतो हे पाहण्याच्या आधी जास्तीत जास्त व्यक्तींचे सुख हे जे आपण समाजाचे ध्येय ठरविले त्यावर जे अनेक आक्षेप घेतले जातात त्यांचा विचार करणे अवश्य आहे. या ध्येयावर पहिला आक्षेप असा. की संख्येवर जर आपण नीती अनीती ठरवू लागलो तर मोठा गोंधळ उडून जाईल. समजा दहा माणसांनी कट करून एका निरपराधी माणसाला मारले, तर बहुसंख्यांचे सुख या तत्त्वाअन्वये आपणांस त्या दहा लोकांना शिक्षा करता येणार नाही. कारण शिक्षा केली तर दहांना दुःख होईल व नाही केली तर एकाचेच नुकसान होईल. पण हा आक्षेप बरोबर नाही. कारण समाज त्या दहा व्यक्तींना जेव्हा शिक्षा करतो, तेव्हा त्याची विचारसरणी पुढीलप्रमाणे असते. या दहांना जर शिक्षा केली नाही तर खून करण्यात काही वाईट नाही असा इतरांचा समज होईल. कोणीही मनुष्य एकट्याच्या फायद्यासाठी दुसऱ्याचा खन करील. यावरून यांना जर शिक्षा केली नाही, तर अनेकांचे जीवित धोक्यांत येईल हे स्पष्ट आहे. म्हणजे येथे दहांचे सुख विरुद्ध एकाचे सुख असा प्रश्न नसून दहांचे सुख व सर्व समाजाचे सुख असा हा प्रश्न आहे. आणि म्हणूनच त्या दहांना शिक्षा करणे युक्त आहे. न्याय, सत्य, ही जी समाजधारणेची तत्त्वे आहेत त्या कोणच्याही तत्त्वासाठी समाज वाटेल तितक्या माणसांचे बळी घेण्यास मागेपुढे पहात नाही, याचे कारण हेच आहे. तत्वे काही उगीच अस्तित्वांत येत नाहीत. सर्व व्यक्तींच्या रक्षणासाठी म्हणजे समाजधारणेसाठी अमुक एक प्रकारचे अचारण युक्त आहे, असे अनुभवाअंती ठरल्यानंतर त्या अनुभवावरून सिद्धान्त काढून समाज त्याला अढळ असे तत्त्वरूप देऊन टाकतो. मग ते तत्त्व पाळणारा एक मनुष्य व मोडणारी हजार माणसे असली तरी समाज एकाचीच बाजू घेईल व हजारांना शिक्षा करील व जरूर तर ठारही मारील. कारण ते अमूर्त तत्त्व याचा अर्थ लाखो जणांचे किंबहुना सर्व समाजाचे सुख असा आहे. आता पुष्कळ वेळा त्या तत्वांतील तत्त्वपणा म्हणजे अनेकांना सुख देण्याचे सामर्थ्य नाहीसे झालेले असते तरी पण समाज ते आंधळेपणाने तसेच मानीत असतो. व त्याच्या भंगासाठी लोकांना शिक्षा करीत असतो. पण मानवी ज्ञानाला मर्यादा असल्यामुळे हे व्हावयाचेच. मोठ्या समाजसुधारकाची जरूर असते ती याच वेळी. तत्व ही समाजाची मोठी शक्ती आहे. ती आपणावरच उलटली आहे हे अगोदर पुष्कळांच्या ध्यानांत येत नाही. कारण समाजरचनेचा अभ्यास प्रत्येक जण करीत नसतो. काहींच्या ते ध्यानात येते. पण हे कुजलेले तत्त्व उलथून टाकण्याचे सामर्थ्य त्यांना नसते. ते सामर्थ्य क्वचित् एकाद्या महापुरुषाच्या अगी असते. तो त्यावेळी समाजाचा नेता बनतो, व नवीन तत्त्वे सांगून समाजाची घडी बसवून देतो. पण कोणचेही तत्त्व पाहिले तरी त्याच्या बुडाशी अनेकांचे सुख ही एकच गोष्ट आपणास दिसून येते. त्यामुळे लाखो दुर्जन व एक सज्जन यांत संख्याधिक्यावरून लाखो दुर्जनांचे हित केले पाहिजे ही आपत्ती येत नाही. म्हणजे यावरून जास्तीत जास्त लोकांचे सुख या ध्येयाअन्वयेही दहांना शिक्षा करणे युक्त असाच निकाल होतो.
 हे ध्येय मान्य केले तर त्या समाजात कर्त्याच्या सदअसद्बुद्धीचा विचार होत नाही, केवळ परिणामावरूनच निर्णय द्यावा लागतो, असा आणखी एक आक्षेप घेण्यात येतो. सार्वजनिक काम करणारे लोक पुष्कळ वेळा पैसे खातात. समजा पन्नास लाख रुपये जमवून एकाद्याने महाराष्ट्र विद्यापीठ स्थापले. पण तसे करताना दोन तीन रुपये खाल्ले तर यावर आक्षेपकांचे म्हणणे असे की विद्यापीठामुळे पुष्कळांना पुष्कळ सुख झाले आहे, तेव्हा तसे करताना त्या संस्थापकाने पैसे खाल्ले तर तुम्हांला त्याला शिक्षा करता येणार नाही. पण मला वाटते असे म्हणण्याचे काहीच कारण नाही. तत्त्व म्हणजे बहुसंख्याकांचे सुख हे जर ध्यानांत ठेवले, तर हा प्रश्न उद्वणारच नाही. परक्या धनाचा अन्यायाने अपहार करणे हे वाईट आहे. कारण त्यामुळे समाजाच्या अस्तित्वावरच गदा येते असे समाजाने एकदा ठरविले आहे. त्यामुळे विद्यापीठ स्थापले व सर्व महाराष्ट्रीयांचे कल्याण साधले हे जरी खरे असले तरी तसे करतानाही पैसे खाऊ नये या दुसऱ्या कल्याणकारक तत्त्वावर जर त्याने घाला घातला तर ते निंद्यच होय. कारण तत्त्वावर घाला म्हणजे समाजाच्या सुखावर घाला हे समीकरण ठरून गेले आहे. आता फार मोठे कार्य केल्यामुळे समाज कदाचित् तो गुन्हा क्षम्य मानील, हे निराळे. पण तो गुन्हा आहे यात शंकाच नाही. म्हणजे पुष्कळांचे पुष्कळ सुख या ध्ययाअन्वयेही कर्त्याच्या बुद्धीला महत्त्व द्यावेच लागते. कारण तो आपले कार्य करताना समाजाच्या मूलतत्त्वांना म्हणजेच बहुतांच्या सुखाला मान देतो की नाही हे पाहावे लागते. दहा हजार शिलकेपैकी पांचशे रुपये देणारा व शंभरापैकी शंभर रुपये देणारा यांत बहुतांचे सुख या ध्येयाप्रमाणे दुसराच श्रेष्ठ ठरेल. कारण इतरांना मदत करण्याची प्रवृत्ती हे तर समाजाचे जीवन होय. त्यामुळे समाज जास्त सुसंघटित होतो तेव्हा ती प्रवृत्ती ज्याने जास्त दाखविली तो श्रेष्ठ व ज्याने कमी दाखविली तो कनिष्ठ. आता दहा हजार मिळवून पांचशे देणे यांत एवढे पैसे मिळविणे हे एक प्रकारचे सामर्थ्य आहेच व त्यासाठी त्या गृहस्थाला मान मिळेल यात शंकाच नाही. पण समाजाला दुसऱ्या प्रकारची प्रवृत्ती जास्त उपयुक्त आहे. कारण प्रत्यक्ष पाचशे रुपयांनी जे सुख होणार त्यापेक्षा त्या प्रवृत्तीने अंती जास्त होणार आहे. म्हणून समाज तिला जास्त मान देतो
 या पंथावर आणखी एक फारच मोठा आक्षेप येतो तो असा की यांत 'मी दुसऱ्याच्या हितासाठी का झटावे ?' या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मिळत नाही व्यक्तीचे सुख हेच ध्येय असेल तर प्रसंगी समाजाचे नुकसान करूनही मी आपले हित का साधू नये असा जर कोणी प्रश्न विचारील तर त्याला उत्तर देण्यास पंचाईत येईल असे कोणी म्हणतात, पण ही अडचण खरी नाही. जगण्याची इच्छा प्रत्येकाला आहे व समाजावाचून जगणे अशक्य आहे म्हणून समाजधारणेसाठी झटण्यांत आपण पर्यायाने आपल्याच हितासाठी झटत असतो, हे जर प्रत्येकाच्या ध्यानात आणून दिले तर सुबुद्ध माणसाला दुसरे उत्तर नको आहे. आता प्रत्येकाला हे कळणे शक्य नाही. इतरांचे सुख कशात आहे हे नेहमी ठरविणे कठिण असते आणि थोड्या लोकांना कळले तरी बहुसंख्यांना कळणार नाही इत्यादि जो आक्षेप आहेत ते धार्मिक तत्त्वावर उभारलेल्या समाजाला जसेच्या तसे लागू करता येतील. म्हणजे कोणचेही तत्त्व घेतले तरी या अडचणी कधीच सुटत नसतात. पण याहीपेक्षा पुढे जाऊन असे म्हणता येईल की धार्मिक तत्त्वावर उभारलेल्या समाजावरच संख्याबाहुल्यावर निकाल करावयाची पुष्कळ वेळा पाळी येते. श्रुतिस्मृतीवरून धर्म समजत नाही, कोणा ऋषीचे वचन प्रमाण धरावे याचा निश्चय होत नाही. मला तर धर्मतत्त्व समजत नाही तेव्हा आता महाजनो (बहुसंख्य लोक) येन गतः स पंथाः । असा निकाल काही लोकांनी केलेला दिसतो. तेव्हा पुष्कळांचे पुष्कळ सुख या तत्त्वा अन्वये नीतिनिर्णय केला तर काही विक्षिप्तपणा पदरी येतो. असे मुळीच दिसत नाही. उलट मी दुसऱ्यासाठी का झटावे याचे वेदांताने जे उत्तर दिले आहे तेच फसवे आहे. जे पिंडी तेच ब्रह्मांडी आहे; म्हणजे तू व दुसरा मनुष्य दोघे मूलतः एकच आहा व म्हणून त्याचे कल्याण तेच तुझे कल्याण हे उघड असल्यामुळे तू स्वतः इतकेच दुसऱ्यासाठी श्रम कर असे धर्म सांगतो. पण एक तर हे तत्त्व किती लोकांना पटेल याची शंका आहे आणि दुसरे म्हणजे मी व दुसरा मनुष्य एक म्हणून मी त्याच्या सुखासाठी झटणे हे जसे युक्त तसेच त्याच्या श्रमावर मी जगणे व त्यांच्या धनाचा मी अपहार करणे हेही युक्त ठरू लागेल. कारण आम्ही दोघे एकच. तेव्हा बहूसंख्यांचे सुख या तत्त्वाचा बोध न होणे, लोकांनी त्याचा दुरुपयोग करणे हे जितके शक्य आहे तितकेच 'मी तसा दुसरा' या आत्मौपम्य बुद्धीचा बोध न होणे, तिचा लोकांनी दुरुपयोग करणे हे शक्य आहे. वेदांतातील आत्मौपम्य बुद्धीच्या बाजूने असा एकही आक्षेप या पथावर घेता येणार नाही की जो तिच्यावर तितक्याच जोरात परत फिरणार नाही. आणि शिवाय या पंथांत इतरही अनेक गुण आहेत. म्हणून कोणत्याही समाजात बहुसंख्यांचे जास्तीत जास्त सुख हेच ध्येय असावयास पाहिजे आणि नीती, अनीती व श्रेष्ठकनिष्ठता यावरून ठरविली पाहिजे हे मत मान्य करावयास हरकत नाही असे वाटते.
 पुष्कळांचे पुष्कळ सुख या तत्त्वावरच्या ज्या आक्षेपांचा उल्लेख वर केला आहे ते सर्व टिळकांनी गीतारहस्यांत उद्भावित केलेले आक्षेप आहेत. माझ्या अल्प मतीप्रमाणे त्यांचे जे निरसन मला करता आले, ते त्या महाभागाच्या पायाशी सादर करून पुढील विवेचनास आरंभ करतो.
 बहुसंख्यांचे सुख हे ध्येय ठेवूनही समाजाला मानसिक सुख हेच श्रेष्ठ का मानावे लागते हे आपणांस आता पहावयाचे आहे. प्रत्येक मनुष्य नेहमीच पराकाष्ठचे शारीरिक सुख भोगीन असे म्हणू लागला. तर ते त्याला शक्य नाही असे आपण पाहिले. पण जितके शक्य भोगावयाचे असा जरी त्याने विचार केला तरी समाजाचे त्यांत नुकसान आहे असे दिसेल. शारीरिक सुखाची स्थितीच अशी आहे की, एक मनुष्य जो जो जास्त सुख भोगू लागतो. तो तो दुसऱ्याच्या सुखावर तो आक्रमण करू लागतो. अन्न व वस्त्र ही जी माणसाची अगदी कमीत कमी गरज त्या बाबतीतही असे दिसते की, जाडीभरडी पण पोटभर भाकरी प्रत्येकाला मिळालीच पाहिजे अशी व्यवस्था समाजाला करता येत नाही. आहे त्या अन्नाची वाटणी सारखी केली तर ते सर्वांना पुरेल असे गृहीत धरले तरी ते अगदी जेमतेम पुरेल इतकेच फार तर म्हणता येईल. मग एकाच माणसाने जास्त वाटा मिळविण्याचा प्रयत्न केला तर त्याला दुसऱ्याच्या तोंडचा घास काढूनच तसे करावे लागेल हे उघड आहे. अन्नवस्त्राची ही गोष्ट. मग इतर चैनीच्या वस्तूंबद्दल बोलावयासच नको. मानसिक सुखाची स्थिती याच्या बरोबर उलट आहे. एक मनुष्य शारीरिक सुख जो जो जास्त घेईल तो तो दुसऱ्यांना दुःख होते. पण मानसिक सुख तो जसजसा जास्त घेऊ लागेल तसतसा दुसऱ्यांच्या सुखाला तो कारणीभूत होतो. एकाच्या मानसिक सुखाने दुसऱ्याला त्रास कधीच होत नाही असे म्हणण्याचा मुळीच हेतु नाही. सत्ता चालविणे, दुसऱ्याची टवाळी करणे अशी काही अधम मानसिक सुखेही आहेत. पण अशीही काही मानसिक सुखे आहेत की, ज्यात स्वतःच्या सुखाबरोबरच अनेक जनांचे सुख साधता येते, व शारीरिक सुखे तशी मुळीच नाहीत इतकेच सांगावयाचे आहे.
 उत्तम चित्र काढणे, उत्तम नाटक किंवा कादंबरी लिहिणे, ही मानसिक सुखे आहेत. आणि या सुखाचे स्वरूप न्याहाळले तर असे दिसते की ही कामे करणारा स्वतः तर सुख अनुभवतोच; पण शिवाय इतरांनाही सुख मिळण्याची कायमची व्यवस्था करून ठेवतो; आणि यामुळेच समाज आपल्या जवळची जी अत्यंत श्रेष्ठ देणगी म्हणजे कीर्ती ती त्या माणसाला देऊन कलाकौशल्याची वाढ करण्यास त्यांना उत्तेजन देतो. कीर्ती हे अत्यंत लोभनीय मानसिक सुख आहे. कीर्तीवरची माणसाची भक्ती ओळखून समाजाने तिचा फार सुंदर उपयोग केला आहे. शारीरिक सुख कमी करून माणसाने चंदनासारखे दुसऱ्यासाठी झिजावे व त्याचा मोबदला म्हणून समाजाने त्याची स्तुती करावी, अशी ही रचना आहे यांत दोघांचेही हित आहे. माणसे दुसऱ्यासाठी झटू लागली का समाज स्थिर होतो आणि माणसालाही श्रेष्ठ सुख मिळते. त्यामुळे कीर्तीचा अभिलाष समाजात जितका जास्त निर्माण होईल तितका तो जास्त सुद्दढं म्हणजेच प्रगतिमान् समजला पाहिजे.
 शारीरिक व मानसिक सुखांत दोन ध्रुवांइतके असणारे हे अंतर समाजाच्या फार फायद्याचे झाले आहे. अगदी कनिष्ठ शारीरिक सुखाचा नियमच हा की ते एकाने भोगले की दुसऱ्याच्या आड येते. पण मानसिक सुखाची अगदी अल्प जरी भेसळ केली तरी त्यातील हा दोष कमी होऊ लागतो. गायन, सिनेमा इत्यादि जी अर्धवट शारीरिक व अर्धवट मानसिक सुखे आहेत, त्यांच्यांत मानसिक सुखाच्या भेसळीमुळे केवढे सामर्थ्य आले आहे पहा. उपभोगण्याची व मिळण्याची शक्यता या दोन्ही वाढल्या. श्रीखंड कोणी किती वेळा खावे याला मर्यादा आहे. पण गंधर्वाचे गाणे प्रत्यक्ष व ध्वनिलेखावरून कोणी कितीवेळा ऐकावे याला मर्यादाच नाही असे म्हटले तरी चालेल. सृष्टिसौंदर्य निरीक्षण, रामायणासारख्या सुंदर काव्याचे वाचन हा शुद्ध मानसिक आनंद आहे. हा मिळविण्यास अत्यंत सुलभ व तो अनुभवण्याची माणसाच्या ठायीची शक्ती अमर्याद आहे. म्हणूनच लोकांना काव्यरसाची गोडी लावणे, किंवा सृष्टिसौंदर्याची आसक्ती त्यांच्याठायी वाढविणे याला समाज फार महत्त्व देतो. ज्या मानाने समाजांत रसिकता वाढेल, त्या मानाने तो थोडा जास्त सुखी होतो. कारण मानसिक सुखाची शक्यता त्यामुळे थोडी वाढते. तेव्हा कलाकौशल्याची वाढ हे समाजाच्या सुखात भर घालण्याचे एक साधन आहे, व त्याची प्रगती मोजण्याचे ते एक माप आहे असे समजण्यास हरकत नाही. पण आपले समाजशास्त्रज्ञ रा. गो. म. जोशी यांना हे मत पसंत नाही. वाङ्मय, कलाकौशल्य, यांची वाढ होणे हे समाजाच्या अव्यवस्थेचे लक्षण आहे असे त्यांचे मत आहे कामविकाराची पूर्ती त्या समाजात होत नसल्याचे ते द्योतक आहे, असे ते म्हणतात. (हिंदूचे. समाजरचनाशास्त्र पान ३४७) आता आर्यसंस्कृतीत कामपूर्ती कधीच होत नसली पाहिजे असे यावरून अनुमान निघेल, कारण भारतीयांनी कला-कौशल्य परिपूर्णतेला नेले होते असा इतिहास आहे. पण असे कड्याळ आपल्यावर येऊ नये म्हणून जोशांनी वरच्या उलटही लिहून ठेवण्याची व्यवस्था केली आहे. वाङ्मय, कलाकौशल्य, तत्वज्ञान यांची वाढ करणारा जो समाजातील बुद्धिमान वर्ग त्याचे समाजाने बिनतक्रार पोषण केले पाहिजे असेही ते म्हणतात. (पान ५५) यावरून जोशी कसे मनोरंजक लिहितात हे कळून येईल. संस्कृती व प्रगती या विषयावर त्यांनी ग्रंथात जे ठायीठायी विवेचन केले आहे, ते सर्व एकत्र करून रंगभूमीवर म्हटले तर भ्रमाच्या भोपळ्यापेक्षाही जास्त करमणूक होईल यात शंका नाही. प्रगती वगैरे सर्व आभास असून वंशपरंपरा संस्कृतिरक्षण हेच संस्कृतीचे (?) आद्य ध्येय आहे असे त्यांस वाटते. (पान ४३७) पण यावरून निग्रो, कातकरी यांच्यापेक्षा चांगल्या प्रतीच्या जीवनाची हिंदूंना अपेक्षा आहे, असे कोणास वाटेल; पण तसे नाही. नुसते जीवन हे तत्त्व मागे पडून चांगल्या तऱ्हेने जीवन हे तत्त्व पुढे येणे त्यांना पसंत नाही. (१७५) अशा तऱ्हेने जगणे हा वैयक्तिक अभिरुचीचा प्रश्न आहे. तो येथे घुसडू नये असे म्हणतात. (पान ४१४) पण हिंसाप्रिय सृष्टीत त्याचे नामरूपाने शिल्लक रहाणे हे मात्र त्यांना हवे आहे. बरे हिंदूचे तेच नामरूप म्हणजे वेदकाळचे, कां कृष्णांच्या काळचे, का औरंगजेबाच्या काळचे, का सध्याचे हे त्यांनी कोठेच सांगितले नाही. कदाचित गणितागत पद्धतीने पुढील ग्रंथांत सांगणार असतील. कलाकौशल्य हे त्यांच्या संस्कृतीत येते व येत नाही असे आपण पाहिलेच. युद्धाची आयुधे चांगली असणे हेही त्यांच्यामते श्रेष्ठत्वाचे द्योतक नाही. (४५) दूरदर्शीपणा व अभिमान हे गुण वंशवृद्धीला हानिकारक आहेत. (३३७) तेव्हा तेही संस्कृतीत येत नसतीलच मग संस्कृती म्हणजे काय तर धर्म (४१५) आणि धर्म म्हणजे काय तर मानवाची बुद्धी खुंटली, डोळे मिटले व कान बंद झाले म्हणजे होणारे ज्ञान ! (७६) पिंडप्रगति व सांस्कारिक प्रगती यावरचे त्यांचे सुंदर काव्य वाचताना कवीच्या बुद्धीचा स्फूर्तीमध्ये लय होत असल्याबद्दल आपल्याला शंकाच रहात नाही. त्या बाबतीत कवीला माझी एवढीच विनंती आहे की, या दोन प्रकारच्या प्रगतीत तोल राखणे हे जे कर्तव्य म्हणून त्याने सांगितले आहे, त्याचाानीट बोध होण्यासाठी किती पिंडप्रगतीला किती सांस्कारिक प्रगती असावी याचे एक कोष्टक तयार करून त्याने प्रसिद्ध करावे असो.
 मानसिक सुखाची आवड समाजात वाढत जाण्यामध्ये समाजाचा आणखी एक फार मोठा फायदा आहे. या आवडीमुळेच समाजात अत्यंत उपयुक्त ज्ञाने व विज्ञाने निर्माण होतात. समाज वाढत चालला की त्याच्यापुढे अनेक तऱ्हेचे प्रश्न येऊन पडतात. ज्या अनेक व्यक्ती सुखासाठी व संरक्षणासाठी एकत्र आलेल्या असतात त्यांचे स्वभाव, आवडीनावडी अत्यंत भिन्न प्रकारच्या असतात. असल्या तऱ्हेच्या व्यक्तीना एकत्र वागविणे हे समाजात अत्यंत कठिण कर्म होऊन बसते. दोन माणसे एकत्र आली की नीती अनीतीचे प्रश्न निर्माण होतात. अनेकांनी एकत्र खपून संपत्ती निर्माण केली की तिच्या वाटणीचे प्रश्न निर्माण होतात. या सर्व प्रश्नांचा विचार करण्यासाठी दीर्घकाल ज्यांनी याच विषयाचा व्यासंग केला आहे, अशा पंडितांची समाजाला जरूर असते. आणि शरीरसुखात मग्न झालेल्या लोकांकडून हे व्यासंग होणे अशक्य असल्यामुळे त्यापेक्षा श्रेष्ठ सुखाची ज्यांना आवड असते, अशी माणसे समाजाला हवी असतात. कीर्ती हे सुख मोबदल्याच्या रूपाने समाज त्यांना देतो. तेही आपले बुद्धिसर्वस्व खर्च करून समाजाला उपयुक्त अशी ज्ञाने निर्माण करतात. किंवा चंदनासारखे झिजून समाजकल्याण साधतात.
 जास्तीत जास्त लोकांचे सुख हे ध्येय ठेवले तरी पराकाष्ठेच्या स्वार्थत्यागाची प्रवृत्ती व तीक्ष्ण बुद्धी यांची समाजात वाढ होणे कसे शक्य आहे व इष्ट आहे ते वरील विवेचनावरून ध्यानात येईल असे वाटते. याचा अर्थ असा मात्र नव्हे की स्वार्थत्यागी, पराक्रमी किंवा बुद्धिमान पुरुष आपापली कार्ये करतात त्या वेळी वरील मीमांसा त्यांच्या ध्यानी असते. आपल्या अमुक एका प्रवृत्तीचा मूळ उगम कशात आहे व तिचे अंतिम फलित काय याचा विचार सामान्य मनुष्य तर नाहीच करीत; पण थोर पुरुषही बहुशः करीत नसतो. कोणच्याही ध्येयाने प्रवृत्त झालेल्या समाजात हीच स्थिती असते. समाजात शतकातून एकादा निर्माण होणारा तत्त्ववेत्ता मात्र या प्रवृतीचा अभ्यास करतो, व समाजसुखाच्या दृष्टीने त्यांना इष्ट वळण लावून देतो. एखादा गोड आंबा खात असताना त्याच्या झाडाला खते कसली घातली होती याचा विचार जसा आपण करीत नाही व करणे जरूर नसते तशीच समाजाच्या मूलतत्त्वांची विवंचना बहुसंख्य लोक करीत नाहीत व त्यांनी करण्याची जरूरही नसते. आंब्याचा माळी मात्र आंब्याची निगा राखून कोणचे आंबे समाजात किती पसरू द्यावे या विचारांत रात्रंदिवस चूर असतो. कार्यकर्त्याला आपल्या कृतीचे आद्यंत माहीत नसतात इतकेच नव्हे तर तत्त्ववेत्त्यालाही प्रत्येक कृतीचा समाजसुखाच्या दृष्टीने नेमका उपयोग काय हे सांगता येईलच असे नाही. मनुष्य सत्यनिष्ठ राहिला तर आपण त्याचे अभिनंदन करतो. पण दर वेळच्या त्याच्या सत्य भाषणाने समाजाला नेमका फायदा काय हे आध्यात्मिक पद्धतीतही सांगणे शक्य नाही. तेच या पद्धतीत होते. बहुसंख्यांचे सुख या ध्येयानुसार रचलेल्या समाजात दोष दाखवून या पद्धतीचा उपहास करणाऱ्यांनी अतींद्रिय तत्त्वावर जी समाजरचना असेल तिच्यात हे दोष जसेच्या तसे सापडतील हे ध्यानात ठेवले तर पुष्कळच वाद मिटेल असे वाटते.
 मानसिक सुखाची वाढ होणे याची समाजाला अत्यंत जरूर आहे हे जरी खरे, तरी मानसिक सुख हे शारीरिक सुखाची सर्व जागा घेऊ शकेल हे अशक्य आहे. मानसिक सुख कितीही वाढले तरी शरीरसुखाची भूक कधीही थांबणार नाही. शारीरिक सुखाच्या आसक्तीला मुरड घालणे एवढेच समाजाला शक्य आहे. म्हणून अन्न-वस्त्र व एकंदर संपत्ती समाजाला पुरेशी निर्माण करणे व तिची योग्य वाटणी करणे हे समाजाचे आद्य कर्तव्य आहे. माणसांची कामेच्छा भुकेइतकीच प्रबल असते. म्हणून तिचाही विचार समाजात झाला पाहिजे. ही व्यवस्था कोणी कशी केली व ती उत्तम आहे की नाही हे कशावरून ठरवावयाचे याचा विचार आता करावयास हवा. तसेच श्रेष्ठकनिष्ठतेच्या आणखी एक दोन फार महत्त्वाच्या कसोट्या राहिल्या आहेत. त्यांचाही विचार केला पाहिजे. तो करून त्याअन्वये विद्यमान राष्ट्रामध्ये श्रेष्ठकनिष्ठता कशी ठरविता येईल हे पाहाणे व संस्कृती व प्रगती यांच्या खऱ्या स्वरूपाचे विवेचन करणे एवढा भाग या विषयाचा अजून राहिला आहे.
 सुख हेच मानवजातीचे ध्येय आहे असे वरील विवेचनात पाहिले; उदात्त कल्पनांच्या प्रसारासाठीच ज्याचे अस्तित्व, तो धर्मसुद्धा यापेक्षा निराळे ध्येय मानवाला सांगू शकत नाही. परमेश्वराचा ही सृष्टी निर्माण करण्यात काय हेतू आहे, हे पाहून मग त्याअन्वये मानवाने आपले ध्येय ठरवावे असे म्हणणाऱ्यांचा एक पक्ष आहे. त्याचा आपण विचारही केला नाही. पण त्याचे कारण उघड आहे परमेश्वराचा हेतू काय आहे हे अजून तरी कोणालांच कळलेले नाही. व त्या बाबतीत गंभीर वाणीने बोलणारे लोकही त्याचे हेतु व कृती अतर्क्य आहेत असेच म्हणतात. त्यामुळे आपल्या काय किंवा कोणाच्याही काय, विचारकक्षेच्या आत परमेश्वराचा हेतू बसतच नाही. सुख हे ध्येय ठरविले तरी त्या दृष्टीने सुद्धा वाङ्मय, कलाकौशल्य, स्वार्थत्यागाची प्रवृत्ती इत्यादि श्रेष्ठ गुणांची वाढ होणे कसे इष्ट आहे हेही आपण पाहिले व त्यावरून समाजाच्या श्रेष्ठकनिष्ठतेचे काही गमक, काही मानदंड ठरविण्यांचा प्रयत्न केला. पण या मानदंडाची उपयुक्तता पूर्ण होण्यास आणखी काही महत्त्वाच्या गोष्टीचा विचार करणे अवश्य आहे. तेव्हा त्याकडे आता वळले पाहिजे.
राष्ट्र आणि व्यक्ति.
 भोवतालच्या क्रूर सृष्टीत मनुष्याला जगावयाचे असेल तर समाज करून राहण्यावाचून त्याला गत्यंतर नाही शरीराने तो अत्यंत दुबळा आहे व ज्या बुद्धीच्या जोरावर निसर्गाशी व इतर प्राणिमात्राशी झगडावयाचे तिच्या विकासाला समाजाची अत्यंत आवश्यकता आहे. म्हणूनच समाज करून राहाणे मनुष्याला अत्यंत आवश्यक आहे. आत्मसंरक्षणासाठी मनुष्याने निर्माण केलेल्या मानवसंघाच्या काही विशिष्ट स्वरूपाला आपण अलीकडे राष्ट्र असे नाव देतो. या राष्ट्रकल्पनेचा आपणास थोडासा विचार करावयाचा आहे.
 एकत्र आलेल्या माणसांची संख्या किंवा त्यांनी व्यापिलेले क्षेत्रफळ यावर राष्ट्रकल्पना अवलंबून नाही. स्विट्झरलंडची लोकसंख्या तीस लक्ष असून क्षेत्रफळ १५ हजार चौरस मैल आहे. साम्राज्य सोडून दिले तरी नुसत्या चीनची वस्ती ३७ कोटी असून क्षेत्रफळ १५ लक्ष चौरस मैल आहे. तरी या दोहीना राष्ट्र हीच संज्ञा आपण देतो. इंग्लंड, इटली, जपान, जर्मनी या पराक्रमी राष्ट्रांचा विचार केला तरी चार कोटींपासून सात कोटींपर्यंत त्यांच्या लोकसंख्या कमीअधीक आहेत. मावरून लोकसंख्या किंवा क्षेत्रफळ यावर राष्ट्रकल्पना अवलंबून नाही हे स्पष्ट दिसते. हे जरी खरे तरी कोणच्याही मानवसंघाला राष्ट्र म्हणता येईल असे नाही. युरोप व युनायटेड स्टेटस् यांचे क्षेत्रफळ जवळजवळ सारखेच आहे. पण त्यांतील एक राष्ट्र आहे व दुसरे नाही. वाटेल त्या शब्दसमूहाला आपण वाक्य म्हणत नाही. ज्यांतील शब्द एकमेकांशी काही नात्यांनी जोडलेले आहेत व जो काही पूर्ण अर्थ सांगतो त्याच समूहाला आपण वाक्य म्हणतो. राष्ट्राचे काहीसे तसेच आहे. ज्यांची सुख-दुःखे एक आहेत, जे अनेक कारणांनी व अनेक प्रसंगी एकमेकांशी समरस होऊ शकतात त्या लोकांच्या संघाला फक्त राष्ट्र म्हणता येईल. आणि या सर्वांचे कारण इतकेच की त्या सर्वांना मिळून आत्मसंरक्षणाचे एकच कार्य करावयाचे असते. ते नसते तर कोणच्याही मानवसमूहाला राष्ट्र म्हणण्यास हरकत नव्हती. किंवा उलट असेही म्हणता येईल की राष्ट्र या कल्पनेचा तेव्हा उदयच झाला नसता. संरक्षणासाठी गटाने राहण्याची फार पुरातन काळी मानवाने जी पद्धत सुरू केली तिचेच राष्ट्र हे परिणत स्वरूप आहे, आणि आपणाहून अत्यंत विभिन्न लोकांशी तोंड देण्याचे प्रसंग जो जो जास्त येतात तो तो या राष्ट्र या कल्पनेची जरूर जास्त पडू लागते. म्हणून मागल्या काळी जरी या कल्पनेवाचून आपण जगू शकलो असलो तरी यापुढे ते शक्य आहे असे म्हणण्यांत अर्थ नाही.
 आत्मरक्षण, बुद्धी व भावना यांचा विकास आणि त्यायोगे जास्तीत जास्त सुखप्राप्ती या हेतूनेच मनुष्य समाज करतो व त्या समाजाचे परिणत स्वरूप म्हणजेच राष्ट्र हे जर ध्यानात घेतले तर त्या संघांत येणाऱ्या व्यक्तिमध्ये जितके जास्त साम्य असेल तितके अधिक हितप्रद होईल, याबद्दल कोणी वाद करील असे वाटत नाही. एकाचे जे सुखदुःख किंवा मनापमान तेच दुसऱ्याचे अशी स्थिति जितकी जास्त असेल तितके ते राष्ट्र जास्त संघटित व समर्थ असेल यांत शंकाच नाही. हे विचार अगदीच साधे आहेत. पण आज एका बाजूने सनातनी व दुसऱ्या बाजूने कम्युनिस्ट लोक या कल्पनेचा उपहास करीत आहेत, म्हणून त्याचा विचार करणे अवश्य आहे.
 राष्ट्र म्हणून एकत्र आलेल्या माणसांची स्थिती ही काठ्यांच्या जुडग्यासारखी आहे. काठ्यांना जितक्या जास्त दोरांनी बांधावे तितके त्यांचे जुडगे जास्त भक्कम होते. त्याचप्रमाणे या माणसांना एकत्र बांधणारे धागे जितके जास्त व जितके जास्त चिवट, त्या मानाने ते राष्ट्र जास्त संघटित व जास्त- सबल होईल. एकत्र आलेले लोक (१) एक रक्ताचे असणे (२) एक धर्माचे असणे (३) त्यांच्या पूर्वपीठिका व इतिहास एक असणे (४) त्यांची भाषा एक असणे (५) व त्या सर्वांना उन्नतीची सारखी संधी मिळणे हे पाच धागे राष्ट्रांतील लोकांना एकत्र बांधण्यास फार उपयोगी पडतात असे आतापर्यंतच्या इतिहासावरून आढळून आलेले आहे. यापैकी एकदा धागा तुटताच राष्ट्र विस्कटते असे नाही; पण जितके जास्त धागे जिवंत तितके राष्ट्राचे सामर्थ्य जास्त हे निर्विवाद आहे. कारण सुखप्राप्ती च दुःखनिरास यांसाठी माणसे एकत्र येतात, व माणमांची सुखदुःखे सारखी असणे हे वरील पाच गोष्टींवर फारच अवलंबून आहे.
 'Workers of the world, unite' हे अगदी भोळे तत्त्वज्ञान आहे. खाणीत काम करणाऱ्या इंग्रज मजुराला चैनीत लोळणारा इंग्रज मालक हा हाडवैरी वाटतो हे खरे; पण आफ्रिकेच्या जंगलात काम करणारा काळाकुट्ट घाणेरडा निग्रो त्या इंग्रज मजुराला जवळचा वाटेल, आपला बांधव आहे असे वाटेल, हे खोटे आहे. निग्रो व इंग्रज मजूर यांच्यातील वैषम्याची दरी दुर्लंघ्य आहे. उलट इंग्रज मजूर व इंग्रज मालक यांच्यातील दरी काही सामाजिक व्यवस्थेमुळे निर्माण झालेली असून एका पिढीतच ती इतकी पालटू शकते की तोच मालक त्याच मजुराला आपली मुलगी आनंदाने देऊ शकतो. एकरक्ततेचा प्रभाव हा असा आहे व तो मान्य न करता उभारलेले कोणचेही तत्त्वज्ञान व्यासपीठापलीकडे जाऊ शकणार नाही. धर्म, भाषा, पूर्वपीठिका, इतिहास या प्रत्येक बाबतीत असेच आहे. जो जो हे जास्त भिन्न तो तो माणसे एकमेकांपासून दुरावतात आणि समाज विसंघटित होतो. जो जो यातील साम्य वाढेल तो तो राष्ट्र जास्त सामर्थ्यसंपन्न होईल
 आपल्या हिंदु राष्ट्राला या पांच धाग्यांपैकी कोणच्या धाग्यांनी बांधलेले आहे हे पाहिले तर, यापैकी कोणचाही एक धागा येथे नाही, इतकेच नव्हे तर तसा धागा नसलाच पाहिजे, असे धार्मिक लोक सांगत आहेत असा विचित्र देखावा दिसून येतो. हिंदु राष्ट्र, हा शब्द मी उगीच वापरला आहे. असे एकादे राष्ट्र मागे कधी होते किंवा पुढे कधी होऊ शकेल असे मला वाटत नाही. पण हल्ली लोक तसे म्हणतात हे एक आणि दुसरे असे की अखिल हिंदुस्थानाची जी स्थिती तीच त्यांतल्या कोणच्याही बारक्या तुकड्यांची, म्हणजे महाराष्ट्र, बंगाल इत्यादी देशांची आहे. म्हणून सर्व हिंदुसमाजाबद्दल विवेचन केले म्हणजे तेच थोड्याफार फरकाने महाराष्ट्राला लागू पडणार असल्यामुळे तसे करण्यास हरकत नाही असे वाटते.
 एकरक्तता या राष्ट्रात मुळीच नाही. आणि बुद्धी व रंग या बाबतीत येथे इतके भिन्न लोक एकत्र जमले आहेत की ती घडवून आणण्याचे प्रयत्न हितप्रद होणार नाहीत. पण याचा अर्थ असा नव्हे की जेवढा फुटीरपणा आज आहे. तितका अवश्य आहे. अशा कित्येक जाती येथे आहेत की ज्यांची रक्ते मिसळण्यास मुळीच हरकत नाही. जितके जास्त लोक एकरक्ततेने बांधले जातील तितकी त्यांची सुखदुःखे सारखी होतात. व तेच आपणास साधावयाचे आहे. असे असताना पाश्चात्य शास्त्रज्ञांचे खोटे आधार घेऊन मिश्रविवाह होऊ नयेत असे काही वेडगळ लोक सांगत आहेत व मोठेमोठे धर्ममार्तंड त्यांना आशीर्वाद देत आहेत.
 जी स्थिती रक्ताची तीच धर्माची. संघटनेच्या दृष्टीने पाहिले तरं हिंदुराष्ट्र या शब्दाला जितका अर्थ आहे तितकाच हिंदुधर्म या शब्दाला माहे. म्हणजे मुळीच नाही. तत्त्वज्ञानात असा एकही विचार नाही व नीती व कर्मकांड यांत असा एकही विचार नाही की जो सर्व हिंदू सारखाच पाळतात. इतकेच नव्हे तर तसा विचार किंवा आचार नसलाच पाहिजे असा सनातन धर्म आहे. ब्राह्मणांचे आचार निराळे, क्षत्रियांचे निराळे, वैश्यांचे निराळे, शूद्रांचे निराळे. कांही लोक म्हणतात की प्रत्येकाची कामे जर निराळी आहेत तर त्यांना त्यांना भिन्न आचार असणे युक्तच आहे. पण या म्हणण्यांत अनेक हेत्वाभास आहेत. एक तर वर्णाप्रमाणे कामाची विभागणी करणे हेच चूक आहे असे वृत्तिसंकराचा विचार करताना आपण पाहिले आहे. आणि दुसरे असे की कामाची विभागणी केली असे गृहीत धरले, तरी कित्येक आचार असे की त्यांचा धंद्याशी कांहीच संबंध नाही. गायत्री मंत्रांचा जप जर सुबुद्धी देतो, तर कोळ्याला किंवा परटाला तो कां सांगू नये ? आपले सर्व धार्मिक आचार वेदमंत्रपूर्वक करण्यास शूद्रातिशूद्रांनासुद्धा का अधिकार नसावा ? पण शूद्र तर दूरच राहिले. शिवछत्रपतीच्या कुळात जन्मलेल्या कोल्हापूरच्या भोसल्यांनासुद्धा तो अधिकार नाही. लखलखीत ज्ञानमय परब्रह्माच्या उपासकापासून तो थेट मरीआईच्या उपासकांपर्यंत सर्व लोक हिंदुधर्मात आहेत. सात जन्म एकच पति मिळावा, यासाठी व्रते करणाऱ्या स्त्रियापासून एकाच जन्मी मुदतीच्या कराराने सात नवरे करणाऱ्या स्त्रीपर्यंत सर्व प्रकारच्या स्त्रिया येथे आहेत. ब्राह्मणांची विवाहपद्धती निराळी, क्षत्रियांची निराळी, त्यांचे अध्ययनाचे वय व अधिकार वेगळे, त्याच्या स्वच्छतेच्या कल्पना वेगळ्या. इतकेच नव्हे तर त्यांची वस्त्रे नेसण्याची पद्धतही वेगळी असावी असे शास्त्र आहे. आणि आचारस्वातंत्र्य या गोंडस नावाखाली सनातनी लोक त्याचे समर्थन करतात. पण हिंदुधर्मात आचारस्वातंत्र्य आहे ही थाप आहे. निरनिराळे आचार येथे आहेत इतकेच खरे आहे. त्या त्या समूहाच्या ठरलेल्या आचाराबाहेर मनुष्य गेला तर समाज ते मुळीच सहन करीत नाही आणि हे नियम लग्नविधीपासून पाणी पिण्यापर्यंत सारखेच कडक समजले जात असत. सर्व हिंदूंना इतरांपासून स्पष्टपणे निवडून दाखवील असा, सर्वांना एका कक्षेत आणील असा आचार, विचार धर्मग्रंथ किंवा देव, एकही नाही; आणि नसलाच पाहिजे असा धर्म आहे. हिंदूचे, हिंदुधर्माचे जे आचार म्हणून आपण म्हणतो, व उत्तम आचार म्हणून ज्याची स्तुती करतो ते सर्व कांही ठरीव वर्गाचे आहेत. स्नानसंध्या, सोवळेओवळे, उपनयन, वेदपठन या थोर आचारांची स्तुती करणारे लोक सर्व हिंदूंचे हे आचार आहेत अशा स्वरांत बोलतात. हा स्वर हा त्यांचा भ्रम खरा ठरावा, शूद्रांपर्यंत सुद्धा वेदमंत्र पोचावे यातच वास्तविक हित आहे. पण तसे ते कधीही सुखाने होऊ देणार नाहीत. हे आचार सर्वांचे आहेत, असे उगीचच भासविण्यात मात्र काही अर्थ नाही हिंदूंच्या श्रेष्ठ आचारांची स्तुती करताना रा. गो. म. जोशी म्हणतात की खरा हिंदु रोज स्नान केल्यावाचून राहु शकत नाही. हे अज्ञान त्यांनी कोठून चोरले, याबद्दलची थाप त्यांनी लवकरच प्रसिद्ध केलेली बरी. हिंदूधर्माची व्याख्या करण्याचा अनेक पंडितांनी प्रयत्न केला आहे. पण समर्पक अशी व्याख्या अजून एकही झालेली नाही, व होणे शक्य नाही. कारण सर्व हिंदूंना सारखे असे काहीच नाही.
 पूर्वपीठिका आणि पूर्वजांचा इतिहास या बाबतीत तीच निराशाजनक स्थिती आहे. येथे एक गोष्ट लक्षात ठेवावयास हवी. ती अशी की हिंदूंचा धर्म, त्यांची संस्कृती, त्यांचा पूर्वेतिहास व पूर्वपीठिका या अत्यंत उज्ज्वल अशा आहेत याबद्दल वाद नाही. दोष आहे तो एवढाच की, त्या सर्व जुन्या मिळकतीची मालकी फक्त काही विशिष्ट वर्गाकडे आहे. त्यामुळे सर्व समाजाला तिचा कडकडून अभिमान वाटत नाही आणि म्हणून संघटना करणे हे जे अत्यंत महत्त्वाचे तिचे काम ते ती करू शकत नाही. येथे ज्या अनेक जाती आहेत त्यांची रक्ते तर भिन्न आहेतच, पण त्यांच्या अभिमानाची केंद्रेही भिन्न आहेत. पूर्वपीठिका जितक्या एक व पूर्वजांच्या पराक्रमाचा अभिमान जितका जास्त पसरलेला तितका तो समाज जास्त संघटित होतो पण आम्ही एकमेकापासून इतके फुटलेले आहो की, एकाला दुसऱ्याच्या पूर्वपीठिका व पूर्वज यांच्याबद्दल अभिमान नाही. इतकेच नव्हे तर तिटकारा आहे. विक्रमादित्य हा माझा आहे असे वाटून त्याच्याबद्दल मला जो अभिमान वाटतो त्याला दोन कारणे असू शकतात. तो माझ्या रक्ताचा असेल तर त्याचा पराक्रम म्हणजे माझाच पराक्रम आहे, माझे रक्त तितकेच पराक्रमी आहे हा आत्मविश्वास माझ्या ठायी निर्माण होतो व जगही माझ्याकडे त्या दृष्टीने पाहू लागते. या दुहेरी ऋणामुळे मला त्याचा अभिमान वाटतो. एकरक्तता नसली तरी त्याची माझी सुखदुःखे जर एक असतील म्हणजे तो राजा झाल्यामुळे माझ्या सुखात जर जास्त भर पडणार असेल, तर मला त्याच्याबद्दल अभिमान वाटतो. या बाबतीत अखिल हिंदुसमाजाची स्थिती वाईट असली तरी महाराष्ट्राची स्थिती बरीच समाधानकारक आहे. गेल्या दोनतीन शतकांत भिन्न भिन्न क्षेत्रांत मराठ्यांनी जो पराक्रम केला त्याचे श्रेय अनेक जातींना असल्यामुळे हे वैभव आमचे आहे असे बहुसंख्य समाजाला वाटावे अशी स्पृहणीय स्थिती येथे झाली आहे. धार्मिक क्षेत्रांत ज्ञानेश्वर, एकनाथ या ब्राह्मणांच्या जोडीला तुकाराम, नामदेव हे ब्राह्मणेतर अगदी बरोबरीच्या मानाने बसू शकले व राजकीय क्षेत्रांत संताजी, धनाजी यांच्या बरोबरीनेच प्रतिनिधी व पटवर्धनांनी उडी घेतली यामुळे अमुक मिळकत अमक्या जातीची असा दुजाभाव राहिला नाही व मराठी साम्राज्य वैभवाला चढूं शकले. हे जे आपोआप घडून आले तेच शास्त्रशुद्ध पायावर, नवीन तत्त्वज्ञान उभारून मुद्दाम घडवून आणावयास हवे आहे. म्हणजे भेदाचे व दुहीचे भूत पुन्हा या देशाला झपाटू शकणार नाही. तुकारामाच्या व नामदेवाच्या वाणीलाच वेद म्हटल्यानंतर भोसले कुळातल्या माणसाला वेदमंत्र नाकारणे यात कोणचा शहाणपणा आहे ? पुष्कळ लोक म्हणतात तशी ही बाब लहान नाही. या बारीक गोष्टींच्या मागे अभिमानाचे तीव्र पीळ आहेत व त्यामुळेच भेदाच्या धारेला विषारी कटुता येते. राष्ट्रीय पीठिका एक असूनसुद्धा ब्राह्मणांना अत्यंत वंद्य वाटणाऱ्या रामदास, विष्णुशास्त्री, टिळक, अशा ज्या विभूती त्यांना; ब्राह्मणेतर अत्यंत घाणेरड्या शिव्या देऊ शकतात व ते विशिष्ट लोक बेजबाबदार म्हणून सोडून दिले तरी उरलेल्या समाजामध्ये बारीक भेदाचे पडदे कसे पडत गेले आहेत याची जाणीव त्यामुळे झाल्यावाचून राहात नाही. आज सावतामाळी, बांकामहार इत्यादि कमी अधिक उंचीचे पण आपापल्या जातीचे पुरुष घेऊन ती ती जात त्यांची पूजा करते ही गोष्ट दुर्लक्षणीय खास नाही. इतर थोर पुरुषांची पूजा केली तरी आपल्या जातीतल्या पुरुषांची पूजा करणे युक्तच आहे हे खरे, पण वरील पूजेचा इतका साधा अर्थ नाही. व्यासवाल्मिकि, रामदास, ज्ञानेश्वर हे महापुरुष या जातींना जवळचे वाटत नाहीत; ते फारच दूरचे असल्यामुळे त्यांच्या पराक्रमामुळे यांना स्फूर्ती व तेज चढत नाही; ते पराक्रमी म्हणूनच आम्ही पराक्रमी असे त्यांना म्हणता येत नाही व सांवता माळी किंवा इतर सत्पुरुष यांच्याबद्दल तसे म्हणता येते हे कारण या पूजेच्या बुडाशी आहे. ब्राह्मणा ब्राह्मणांतसुद्धा हे आडपडदे आहेत. पेशवेपटवर्धनांचा कोकणस्थांना जितका अभिमान वाटतो तितका देशस्थांना वाटत नाही व प्रभू लोकांपैकी पुष्कळांना तर हे आपले शत्रूच वाटतात. यावरून असे दिसेल की एकरक्तता नसली तरी ज्यांना एक राष्ट्र म्हणून रहावयाचे आहे त्यांनी आचार, पूर्वपीठिका यांच्या साह्याने सर्व समाज शक्य तितका एका पातळीवर आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जे जुने ठेवणे असेल ते माझे आहे असे प्रत्येकाला अभिमानाने सांगता आले तर समाजाला एकरूपता व त्यामुळेच सामर्थ्य जास्त येते, याबद्दल कोणी वाद करील असे वाटत नाही.
 राष्ट्रामध्ये जे लोक एकत्र जमले असतील त्यांना एकमेकांबद्दल आपलेपणा वाटावयास रक्त, धर्म, व पूर्वपीठिका यांचे धागे नसले तरी यांच्या भावामुळे निर्माण होणारे दोष काही एका व्यवस्थेने काढून टाकणे बरेचसे शक्य असते. उन्नतीच्या सर्व क्षेत्रात वाटेल तितके उंच चढण्यास प्रत्येक व्यक्तीला सारखी संधी देणे, ही ती व्यवस्था होय. माझ्या अंगी कर्तृत्व विद्वत्ता व योग्यता असूनही केवळ जातीने मी कोळी किंवा गवंडी आहे एवढ्याच कारणासाठी जर मला राजपद, किंवा शंकराचार्याचे पद मिळणार नसेल, तर हा हिंदु समाज जवळचा व चिनी किंवा इराणी समाज लांबचा, असे मला का वाटावे ? जे जे मानाचे व वैभवाचे पद या राष्ट्रात असेल, तेथपर्यंत जाण्याची मोकळीक प्रत्येक कर्तृत्ववान् व्यक्तीला असली तरच हे राष्ट्र माझे आहे व त्याच्या उन्नतिअवनतीची जबाबदारी माझ्यावर आहे. ही जाणीव तिला होईल. व अशी व्यवस्था असली म्हणजे राष्ट्राच्या अग्रभागी चमकणाऱ्या पुरुषांत प्रत्येक जातीचा प्रतिनिधी दिसत असल्यामुळे प्रत्येक क्षेत्र सगळ्यांचे व सगळी क्षेत्रे प्रत्येकाची अशी स्थिती निर्माण होते. आणि त्यामुळेच आपलेपणा वाढतो. भिन्नधर्ममते, श्रीमंती, दारिद्रय, यामुळे कोणच्याही राष्ट्रात भिन्नभिन्न गट पडलेले असतातच. पण त्या भिन्न गटांतील कोणाही व्यक्तीला समाजातल्या कोणच्याही उच्च पदाला जावयास मोकळीक असते. परिस्थितीने अडचण येईल तर निराळी. पण तशी अडचण आली तर ते दुर्दैव आहे, अन्याय आहे. समाजाची तशी व्यवस्था नसली पाहिजे हे तत्व तेथे सर्वमान्य असते. तसे असणे हीच समाजाची व्यवस्था, हेच आमच्या मोठेपणाचे लक्षण असे मानणे निराळे आणि नाइलाजाने तसे होणे निराळे. पौर्वात्य व पाश्चिमात्य समाजाची विभागणी कशी भिन्न आहे, हे रिस्लेने फार सुंदर रीतीने स्पष्ट केले आहे. पौर्वात्य समाजाला विभागणारे तक्ते आडवे आहेत. म्हणजे येथे अगदी खालच्या थरांतल्या माणसाला वरच्या थरात केव्हांच येता येत नाही. पश्चिमेतील समाज विभागणीच्या भिंती उभ्या आहेत. म्हणजे तेथे गट कितीही भिन्न असले तरी तळचा मनुष्य अंगी कर्तृत्व असेल तर वरपर्यंत जाऊ शकतो. या व्यवस्थेमुळेच समाजांतल्या सर्व गटांतील व्यक्तीच्या कर्तृत्वाला वाव मिळतो. महाराष्ट्राला थोडेसे जे राष्ट्रस्वरूप प्राप्त झाले आहे, ते या तत्त्वाचा अवलंब केल्यामुळेच झाले आहे. शिवाजी, बाजी या थोर पुरुषांनी वाटेल त्याला आऊत सोडून राऊत व्हावयास संधी दिली, इतकेच नव्हे तर मेंढ्या सोडून राजपदावर चढण्यालाही उत्तेजन दिले. याबद्दल हे राष्ट्र त्यांचे सदैव ऋणी राहील. वर्णाश्रमधर्माचे घातकी तत्त्व जर महाराष्ट्राने पाळले असते तर वर्णाश्रमधर्म हे शब्दही कदाचित् ऐकू आले नसते. या विषयासंबंधी जीवनशास्त्रदृष्ट्या जो प्रश्न उपस्थित होतात त्यांचा विचार अनुवंश व रक्तसंकर या आरंभीच्या दोन लेखांत केलेलाच आहे व त्या शास्त्राप्रमाणेही सर्वांना सारखी संधी हेच तत्त्व कसे हितप्रद ठरते, हे दाखविले आहे. येथे फक्त राष्ट्रसंघटनेच्या दृष्टीनेच त्याचा विचार करावयाचा आहे. राष्ट्राने मिळविलेले वैभव, कीर्ती, ही माझी कीर्ती आहे, ही राष्ट्रीय संघटनेला अत्यंत अवश्य म्हणून वर सांगितलेली भावना सर्वांना सारखी संधी या तत्त्वामुळे निर्माण होणे बरेचसे शक्य होते. कारण मत्सराचे मूळच या व्यवस्थेने खणून निघाल्यासारखे होते.
 सर्वांना सारखी संधी या तत्त्वावर आक्षेप घेऊन एक समाजशास्त्रज्ञ म्हणतात की आज वेद वाचण्यास सर्वांना मोकळीक आहे तरी किती अस्पृश्यांनी मॅक्समुल्लरची वेदाची प्रत वाचली आहे ? वेदज्ञान सर्वांना मोकळे ठेवण्यात काही अर्थ नाही असे यावरून त्यास सुचवावयाचे आहे. पण त्यांना उलट असे विचारता येईल की ही वेदाची प्रत किती ब्राह्मणांनी वाचली आहे ? ज्यांना द्रव्यार्जन म्हणूनच वेद उच्चारावे लागतात ते सोडले, तर शास्त्री म्हणविणाऱ्यातसुद्धा ऋग्वेद सबंध ज्यांनी वाचला आहे असे किती निघतील ? आणि असे जर निघणार नसले तर ब्राह्मणांना तरी वेदाध्ययनाचा अधिकार ठेवण्यात तात्पर्य काय ? तेव्हा अशा प्रश्नात काही अर्थ नाही. पूर्वपरंपरा किंवा पूर्वीचे सदाचार प्रत्येकजण अनुसरेलच असे नाही. ते अनुसरण्यास सर्वांना मोकळीक असणे याला महत्त्व आहे. अशी व्यवस्था असली म्हणजे मागून जी विषमता शिल्लक राहते, ती विषारी असू शकत नाही. इंग्लंडांदि देशात जी विषमता आहे ती या तऱ्हेची आहे. तेथेही पैसेवाल्यांचा गट वंशपरंपरेने निराळा पडतो असे दिसू लागताच भेदाचे वारे वाहू लागतात व भांडवलवाले व मजूर असे शत्रुपक्ष निर्माण होतात. या सर्वाचा अर्थच हा की ज्यांची सुख:दुखे वंशपरंपरेने भिन्न राहाणार ते गट कधीच एकजीव होऊ शकत नाहीत. कारण ज्या परिस्थितीला आपण मुळीच जबाबदार नाही, तिच्यामुळे, अंगात कर्तृत्व असूनही आपणास खितपत पडावे लागते ही जाणीव व्यक्तीच्या आणि त्या त्या जातीच्या मनात समाज व्यवस्थेबद्दल असंतोष निर्माण करते. भांडवलवाले व मजूर यांच्यातल्या भेदाच्या भिंती जातीतल्या भेदाच्या भिंती इतक्या लंघ्य नाहीत. पण त्यांनासुद्धा वंशपरंपरेचा वास येताच त्या राष्ट्राला जाचक होतात. मग जातिभेदाच्या शाश्वत व दुर्लंघ्यभिंती किती जाचक होतील हे सांगणेच नको. जातिभेद ठेवणेच असेल तर सर्वांना समसंधी हे तत्त्व मान्य करून मग ठेवावा. म्हणजे त्याचा विषारी दात नाहीसा होईल आणि संघटनेच्या तो फारसा आड येणार नाही.
 ज्यांची सुखदुःखे एक आहेत व उत्कर्षापकर्ष सारखे आहेत तेच लोक राष्ट्र म्हणून एकत्र येऊ शकतात असे आपण पाहिले. सर्व हिंदुस्थान इंग्रजानी जिंकला व सर्वांचेच स्वातंत्र्य गेले. या एकाच गोष्टीतल्या सारखेपणामुळे, म्हणजे सर्वांचे दुःख एक झाल्यामुळे अत्यंत भिन्न अशा अनेक गटांतले व देशांतले लोक सहकार्य करून चळवळ करू लागले व या बाह्य उपाधीमुळे आपण एक असे त्यांना वाटू लागले. मग इतरही दुःखे अशीच एक झाली, व त्याबरोबर सुखेही सारखी झाली तर एकीची भावना किती वाढेल व संघटितपण किती येईल याची कल्पना कुणालाही सहज करता येण्याजोगी आहे. आणि सुखदुःखे एक असणे संघटनेला जरूर आहे हे मान्य झाल्यानंतर ती सुखदुःखे, रक्त, धर्म, इतिहास, पूर्वपीठिका व आचारविचार यांवर अबलंबून असल्यामुळे तेही शक्य तो एकरूप असावे हेही मान्य होईल असे वाटते.
 जगावयाचे असेल तर समाज केला पाहिजे, समाज टिकवून धरावयाचा असेल तर राष्ट्रकल्पनेचा अवलंब केला पाहिजे आणि तिचा अवलंब करावयाचा तर सर्वांची सुखदुःखे शक्यतो एकरूप असली पाहिजेत अशी ही प्रणाली आहे. ती जाणून ज्यांनी राष्ट्रकल्पना पूर्णत्वाला नेली ते लोक श्रेष्ठ होत व त्यांचीच प्रगती झाली आहे, हे म्हणणे अमान्य करता येणार नाही.
 राष्ट्रकल्पनेचा विचार केल्यावर त्याबरोबरच तितक्याच महत्त्वाच्या दुसऱ्या एका प्रश्नाचा विचार करणे क्रमप्राप्त होते. व्यक्ती व राष्ट्र यांचे परस्परसंबंध काय असावे हा तो प्रश्न होय.
 समाज हा व्यक्तीच्या सुखासाठी अस्तित्वात आलेला आहे तेव्हा त्यांतील प्रत्येक संस्था-धर्मसंस्था, शासनसंस्था, विवाहसंस्था- जास्तीतजास्त सुख कसे मिळेल इकडे लक्ष ठेवूनच उभारली पाहिजे या तत्त्वाकडे पुष्कळ लोक दुर्लक्ष करतात आणि मग व्यक्ती ही समाजासाठी का समाज व्यक्तीसाठी असले प्रश्न निर्माण होतात. समाजासाठी व्यक्ती या म्हणण्याला काडीचाही अर्थ नाही. समाजासाठी म्हणजे सर्व लोकांच्या सुखासाठी असा जरी अर्थ केला. (हा अर्थ त्या लोकांच्या मनात असतो असे दिसत नाही. समाज म्हणजे व्यक्तिसुखनिरपेक्ष अशी काही संस्था आहे असा त्यांच्या विचाराचा कल असतो) तरी त्या सुखासाठी व्यक्ती आहे असेही म्हणता येणार नाही. दुसऱ्यासाठी आपले सर्वस्व होमून टाकणारे महात्मे समाजात असतात व समाज त्यांना मान देतो हे खरे; पण त्या व्यक्तींना त्यांत अलौकिक समाधान वाटत असते हे एक व समाज त्याबद्दल त्यांना मोबदला देत असतो हे दुसरेही ध्यानात ठेवले पाहिजे. समाजात एकाच्या सुखासाठी दुसऱ्याने झटावे हा जो सामान्य नियम त्याच्या बुडाशी असे केल्याने प्रत्येकाला सुख मिळेल हे तत्त्व असते आणि याचा अर्थ असा की समाज एकत्र मिळून जी सुखे निर्माण करील त्याचा वाटा सर्वांना मिळालाच पाहिजे. त्याचे प्रमाण ज्याच्या त्याच्या गुणांवर अवलंबून राहील हे खरे; पण हा जर वाटा मिळणार नसेल किंवा मिळावयाचाच नाही असे ठरले तर ती व्यक्ती किंवा तो समूह त्या समाजाचे काही एक लागत नाही. आपल्या समाजांतील अस्पृश्य समाजाचे उदाहरण असे आहे. ते लोक हिंदू समाजाचे कांही ऋण लागतात असे मला वाटत नाही उच्च प्रकारची सुखे जी समाजात निर्माण होतात ती त्यांना नाहीच मिळावयाची असे ठरले आहे. त्यांची योग्यता नाही या म्हणण्यात काडीचाही अर्थ नाही कारण योग्यता दाखविण्यास त्यांना संधीच मिळालेली नाही आणि ही संधीही नसेल तर त्या व्यक्ती समाजासाठी आहेत हे जबरदस्तीने पाहिजे तर म्हणावे. समाजरचनेच्या कोणत्याही तत्त्वा-अन्वये हे म्हणता येणार नाही.
 यापुढचा प्रश्न याहीपेक्षा महत्त्वाचा आहे. खाणे पिणे, वाचणे या सुखापेक्षाही व्यक्तीला आणखी एका प्रकारच्या सुखाची तीव्र इच्छा असते. मी जगावे, मला खावयास मिळावे ही जशी व्यक्तीच्या ठायी इच्छा असते त्याचप्रमाणे प्रत्येक बाबतीत मला काहीतरी मत असावे, माझे म्हणणे लोकांनी ऐकावे, निदान ऐकून तरी घ्यावे ही व्यक्तीला जबर आकांक्षा असते. माणसाच्या ऐपतीप्रमाणे घर, वर्ग, राष्ट्र, जग या पायऱ्या तो चढतो व त्या त्या क्षेत्रात आपले म्हणणे लोकांनी ऐकावे असा अहंकार त्याला निर्माण होतो. यालाच अलीकडच्या भाषेत व्यक्तित्व असे म्हणतात आणि माणसाच्या या व्यक्तित्वाची योग्य जोपासना करून फिरून जास्तीत जास्त व्यक्तींच्या व्यक्तित्वाचा समन्वय घडवून आणणे हे समाजातील अत्यंत दुर्घट काम आहे. शब्दप्रामाण्य हे व्यक्तित्वाच्या आड येणारे तत्त्व आहे. बुद्धिप्रामाण्य हे त्याला पोषक आहे. व्यक्तित्वाची जोपासना झालीच पाहिजे असे पश्चिमेकडील अर्वाचीन संस्कृतीचे प्राणतत्त्व आहे. आपल्याकडे गेल्या एक दोन हजार वर्षांत ते नव्हते. आता येऊ पहात आहे, पण त्याला पुष्कळांचा विरोध आहे. समाज नीट चालावयाचा असेल तर हे असेच का व ते तसेच का असे बोलावयाचा कोणासही अधिकार असता कामा नये, असे हे लोक म्हणतात. पण व्यक्तीचे व्यक्तित्व दडपून रचना केली तर तो दगडांचा किंवा फार तर पशूंचा समाज होईल. माणसाच्या व्यक्तित्वाला अवसर दिला तर समाजरचना अत्यंत अवघड होऊन बसते हे खरे. पण ते दडपणे म्हणजे मानवताच नष्ट करण्यासारखे आहे. अहंकार, व्यक्तित्व हेच मानवतेचे मुख्य लक्षण आहे. दोन दगड एकत्र ठेवले तर भांडत नाहीत हे खरे; पण त्यांच्यात प्रेम निर्माण होऊ शकत नाही, हेही तितकेच खरे आहे. माणसांच्या बाबतीत ही दोन्ही शक्य आहेत. तेव्हा दगडत्व टाकून द्यावयाचे असेल तर ही दोन्ही पत्करली पाहिजेत व त्यांतील पहिले नाहीसे करून दुसऱ्याची वाढ होईल अशी व्यवस्था समाजरचनेत केली पाहिजे. व्यक्तीच्या देहाचा नाश होऊ न देणे हे जितके महत्वाचे आहे तितकेच त्यांच्या मनाचा नाश न होऊ देणे हेही महत्त्वाचे आहे. ते जर होत नसेल तर ती समाजरचना सदोष आहे. व्यक्तित्व दडपून समाजरचना उत्तम करणे हे दगडांना एकत्र रचणे किंवा पशूंची दावण बांधणे इतक्याच कौशल्याचे आहे. अहंकाराला अवसर देऊन अनेकांच्या अहंकारांचा समन्वय करणे हेच तर बिकट कर्म कवी, तत्त्ववेत्ते, मुत्सद्दी यांना करावयाचे असते. त्यांतच त्यांची थोरवी आहे. पशूंची दावण बांधणे असे वर म्हटले आहे. पण तेही तितकेसे खरे नाही. कारण पशूंनाही व्यक्तित्व असते. त्यात जो आपले व्यक्तित्व ठासून सांगतो, बंधने अप्रिय मानतो, तो वनराज सिंह आपल्याला आवडतो. व्यक्तित्वाचा नाश सहन करणाऱ्या गाढवाचा आपण तिरस्कार करतो. गाढवापेक्षा सिंह श्रेष्ठ का याचे उत्तर आपणास हवे होते. ते उत्तर हे आहे. ओझे वाहणे ही उपयुक्तता खरी, पण आपला अहंकार प्रगट करणे हे जे सर्वात श्रेष्ठ सुख त्याचा धडाच सिंह घालून देतो. म्हणून उपयुक्ततेच्या दृष्टीनेही सिंहच श्रेष्ठ वाटतो. हे जसे पशूंमध्य तसेच माणसामध्ये आहे. व्यक्तित्व नाहीसे करून समाजरचना करणे हे सोपे आहे. मुद्रण स्वातंत्र्य, भाषण स्वातंत्र्य हे नाहीसे करून झार किंवा सुलतान यांचा अंमल निर्बंध चालेल हे खरे. आणि मुसोलिनी किंवा हिटलर यांनी स्वीकारलेले धोरण बिकट प्रसंगी अनुसरावे यालाही कोणी हरकत करणार नाही. मनुष्य आजारी असताना आपण तेच करीत असतो. पण बिकट प्रसगी व्यक्तित्व दडपणे निराळे व नेहमीच ती व्यवस्था असणे निराळे. व्यक्तित्व संभाळावयास लोक नालायक असले तर तेथे हुकमत असू नये, असाही आग्रह नाही. पण लोकांना ते संभाळावयास लायक करणे हेच त्या हुकमतीचे धोरण असले पाहिजे. हुकमत चालविता यावी म्हणून व्यक्तित्व दडपणे हे हीनतेचे,- पशुतेचे- दगडपणाचे लक्षण आहे. व्यक्तित्वाला अवसर दिला तर समाजरचना अवघड होऊन आणखी निराळीच दुःखे उद्भवतात हेही मान्य आहे. पण हा पेचच असा आहे. सृष्टिरचनतेला कधीही नाहीसा न होणारा हा दोष आहे. इन्सेन म्हटलेच आहे Suppress individuality and you have no life, assert it and you have war and chaos. व्यक्तित्व नष्ट करावे तर मनुष्यत्वच नष्ट होते. त्याला अवसर द्यावा तर कलह माजतो. सर्वत्र हेच दुःखद दृश्य आपणांस दिसते. स्त्रीला स्वातंत्र्य द्यावे तर पतिपत्नीचे पटत नाही. न द्यावे तर स्त्री ही माणुसकीतून खाली उतरते ! राजकारणातही तेच ! लोकशाही निर्मून प्रत्येक व्यक्तीच्या मताला अवसर देणे ही एक उत्तम व्यवस्था आहे असे आरंभी वाटत होते. पण त्यातले अनंत दोष व भयंकर वर्गकलह प्रत्ययास येऊ लागल्यामुळे पुन्हा हुकूमशाही सुरू करावी की काय असे पुष्कळांना वाटू लागले आहे. पण काही असले तरी ज्या कुटुबात किंवा राष्ट्रात जास्तीत जास्त लोकांच्या व्यक्तित्वाला अवसर आहे, तेच राष्ट्र पशुकोटीतून वर निघालेले व जास्त सुखी होय असे म्हटले पाहिजे. ज्ञान हे दुःखप्रद आहे हे तत्त्व सनातन आहे. तरी पण ज्ञानाचा मोह अनिवार आहे. कारण त्यात वरच्या दर्जाचे सुख मिळते. तेच व्यक्तित्वाचे आहे. आणि असे आहे म्हणून अनेक व्यक्तींच्या अहंकाराचा समन्वय कसा करावा हे सांगणारा तत्ववेत्ता अन्न निर्माण करणाऱ्या शेतकऱ्यापेक्षा श्रेष्ठ ठरतो.
 ज्या समाजात राष्ट्रीय भावना वाढीस लागल्या आहेत, म्हणजे आपल्या सुखापेक्षा राष्ट्राचे सुख अधिक महत्वाचे असे जेथील व्यक्तींना वाटत आहे, व शिवाय जो समाज व्यक्तीचे व्यक्तित्व जास्तीत जास्त टिकवून धरण्याचा प्रयत्न करावयाचा या तत्त्वाने चालत आहे, तो समाज जास्त सुखी होय, असे आपण पाहिले. आणि त्यामुळे श्रेष्ठ-कनिष्ठत्वाची आणखी एक कसोटी आपल्या हाती आली. आता सुखदुःखाच्या मापनासंबंधी रा. गो. म. जोशी यांनी उपस्थित केलेल्या एकदोन मुद्यांचा विचार करून मग संस्कृतीसंबंधीच्या इतर प्रश्नांची चर्चा करू.
 रा. जोशी यांनी श्रेष्ठकनिष्ठतेचा विचार फारसा कोठे केला नाही; पण सुखदुःख मोजण्याच्या साधनांचा थोडासा विचार केला आहे. ज्या समाजात (१) आत्महत्त्येचे प्रमाण वाढत आहे, (२) वेड लागण्याचे प्रमाण वाढत आहे (३) व उपदंशादि रोगांचा फैलाव होत आहे, तो समाज अधःपाताकडे चालला आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. हे मुद्दे महत्त्वाचे व खरे आहेत यात शंका नाही; पण त्यांचे जोशीकृत विवेचन कसे मासलेवाईक आहे, ते पाहण्यासारखे आहे. दोनचार पानांच्या अंतराने केलेली जोशी यांची पुढील तीन विधाने वाचून कोणालाही मौज वाटेल (१) ज्या राष्ट्रांत वेड लागण्याचे प्रमाण जास्त तेथे आत्महत्त्येचे प्रमाण कमी असते (पान २७५), (२) जे समाज अस्थिर आहेत, म्हणजे ज्यांची प्रगती चालली आहे. त्यांत आत्महत्येची प्रवृत्ती वाढत आहे. (२८२), (३) सर्व सुधारलेल्या (प्रगतिमान्) समाजात वेडाचे प्रमाण वाढत आहे. (२८६) वेड आणि आत्महत्या ही एकत्र नसतात असे एकदा म्हणून लगेच पुन्हा सर्व प्रगतिमान् समाजात ही दोन्ही वाढत आहेत, असे जोशांना म्हणावयाचे आहे. साहेबाचे ग्रंथ वाचताना चांगले मुद्दे आढळले तरी ते उतरून घेऊन आपल्या लिखाणात मांडताना विचार करावा लागतो हे जोशीबुवांना पसत नाही असे दिसते. पण त्यांनी जरी आपल्याच म्हणण्याचा विचका केला असला तरी त्यांतील मुद्दा खरा असल्यामुळेच तेवढाच समजावून घेऊन त्याचा आपणास विचार केला पाहिजे.
 समाजात आत्महत्येचे प्रमाण वाढणे, हे समाजाच्या दुःस्थितीचे लक्षण आहे, यात शंकाच नाही; आणि स्त्री, पुत्र, राष्ट्र इत्यादी बाह्य निष्ठास्थाने म्हणजे माणसाचे मन येथे खेचून धरणाऱ्या गोष्टी जितक्या जास्त तितका तो आत्महत्येस कमी प्रवृत्त होतो, हेही खरे आहे. पण बाह्य निष्ठास्थाने कमी असणे एवढेच कारण पुरेसे नाही. आपण घटस्फोटाचे उदाहरण घेऊ. सुधारलेला समाज घेतला तर ज्यांचे घटस्फोट झाले त्यांच्यामध्ये, ज्यांनी केले नाहीत त्यांच्यापेक्षा आत्महत्येचे प्रमाण दुप्पट सापडते हे खरे, पण जेथे जेथे घटस्फोट तेथे तेथे तो नसलेल्यांच्या पेक्षा प्रमाण दुप्पट हे जोशांचे म्हणणे खरे नाही. महाराष्ट्र सांवत्सरिकांतील जातिपरिचय जरी त्यांनी वाचला असता तरी त्यांच्या ध्यानात आले असते की थोड्या थोडक्या नाही तर येथल्या दीडशे जातीत घटस्फोट आहे. तरी पण तेथे आत्महत्या नाही. तेव्हा आत्महत्येला बाह्य निष्ठास्थान ढळणे याशिवाय आणखी काही तरी लागते आणि ते आणखी काही तरी म्हणजे सुसंस्कृत मन हे होय. अमेरिकन किंवा युरोपियन समाजात ते जास्त आहे. बायकोशी पटले नाही, ती दुसन्यावर मन ठेवू लागली, संसार उध्वस्त झाला, तर सुसंस्कृत मनाला जितका धक्का बसतो तितका असंस्कृत मनाला बसत नाही. म्हणून त्याची आत्मनाशाकडे प्रवृत्ती होत नाही. मात्महत्त्येची जी जी कारणे अमेरिकेत आहेत. ती ती सर्व हिंदुस्थानांतल्या कनिष्ठ जातीत आहेत. तरी येथल्या लोकात आत्महत्या फार कमी आहे ती कारणे येथल्या वरच्या वर्गात पसरल्याबरोबर येथे आत्महत्या सुरू झाल्या. यावरून निघणारा निर्णय फार भयानक आहे, पण त्याला काही इलाज नाही. वर व्यक्तित्वाचे विवेचन करताना जो विचित्र पेच म्हणून सांगितला त्याचेच हे उदाहरण आहे.
 संस्कृति वाढवावी तर मानापमानाच्या कल्पना फार तीव्र होतात. आणि मनातल्या आकांक्षेप्रमाणे जीवितक्रम चालवता येत नसेल, तर मृत्यू बरा, असे वाटू लागते. म्हणजे मृत्यूंत दुःख कमी असे होऊन जाते. सस्कृति न वाढवावी तर पशुस्थिती येते. अस्थिर विवाहस्थिति व पैशाची कमतरता या दोन गोष्टी आत्महत्येस विशेष कारणीभूत होतात. मागल्या काळी सर्व जगातच स्त्रीचे व्यक्तित्व दडपलेले होते म्हणून विवाह स्थिर होते. आणि रोगराई, दुष्काळ वगैरे कारणाने माणसे फार मरत असल्यामुळे जीवनार्थ कलह तेव्हा इतका तीव्र नव्हता. म्हणून आत्महत्येचे दुसरेही कारण फारसे जारी नव्हते. त्यामुळे सर्व जगातच तेव्हा आत्महत्या कमी होत्या. हिंदूच्या समाजव्यवस्थेशी त्याचा काहीएक संबंध नाही. गेल्या शभर वर्षात युरोपात ही स्थिती पालटली आहे. पशूसारख्या जिण्याविरुद्ध स्त्री बंड करून उठली आणि संपत्ती वाढत असली तरी जीवनार्थ कलह फार तीव्र झाला. आता ही दोन्ही कारणे असूनही आत्महत्त्या वाढल्या नसत्या, पण यांच्या जोडीला समाजांतील स्त्री-पुरुषांत शिक्षणाचा प्रसार झाला व प्रत्येकाच्या व्यक्तित्वाची किंमत वाढली. आणि त्यामुळे हीन प्रकारच्या जीवनापेक्षा मरण पुरविले असे व्यक्तीला वाटू लागले. बायको दुसऱ्याबरोबर गेली तर मारपीट करून तिला परत आणणे व पुन्हा कामाला लावणे एवढाच फरक कातकऱ्याच्या जीवितात होतो. पण बायको दुसऱ्याबरोबर गेली तर सुसंस्कृत माणसाच्या जीवितांत अफू खावीशी वाटण्याइतका फरक होतो. हा दोष त्याच्या सुसंस्कृत मनाचा आहे. स्त्री व पुरुष या दोघांचे व्यक्तित्व कायम ठेवावयाचे, संस्कृती कायम ठेवावयाची व तरीसुद्धा हा दोष निर्माण होऊ द्यावयचा नाही, हे अजून कोणालाच साधले नाही. हिंदूनी त्या बाबतीत व्यर्थ ऐट मारण्यात अर्थ नाही. ज्ञानाबरोबर दुःखे येतात त्यातलेच हे एक आहे, पण त्याला इलाज काय! स्त्रीचे व्यक्तित्व नाहीसे करून तिला पशुकोटीत ढकलणे, किंवा कातकरी जीवनास तयार होणे, हा त्यावर खास उपाय नाही. स्त्रीच्या व्यक्तित्वांचे हे फाजिल स्तोम आहे असे काही लोक म्हणतील; पारतंत्र्यामुळे स्त्री पशुवत् होते, हे त्यांना खोटे वाटेल. त्यांना विनंती एवढीच की त्यांनी हा प्रयोग स्वतःवर करून पाहावा.
 आत्महत्येसारखाच दुसरा दोष म्हणजे वेड लागणे. हे युरोपीय समाजांत वाढत आहे हे खरे आहे; पण ते समाजाच्या अव्यवस्थेचे द्योतक नसून फाजील व्यवस्थेचे द्योतक आहे, असे हॅवलॉक एलिसने म्हटले आहे ते खरे आहे. इस्पितळे, अनाथालये ही अलीकडे इतकी वाढली आहेत, की चांगल्या माणसांच्या बरोबरचं वेडी अर्धवट माणसे, जी पूर्वी निसर्गाच्या तडाख्यात मरून गेली असती ती पण जगू लागली. त्यांना सुस्थिती मिळाल्यामुळे त्यांची प्रजाही फार वाढू लागली. तेव्हा समाजाने जी जास्त व्यवस्था केली, तिचे हे फल आहे. पण विचारी लोकांचे आता तिकडे लक्ष गेले आहे व अशा लोकांना निरपत्य करून टाकण्यांची त्यांनी मोहीमच सुरू केली आहे. त्यामुळे त्या दोषांकडे बोट दाखविण्यात अर्थ नाही. सुधारणेचा व वेडाच्या वाढीचा यापेक्षा निराळा सबंध काही नाही.
 उपदंशादि रोगाचे प्रमाण युरोपीय लोकांत वाढत आहे हे खरे आहे. आणि ते अवनतीचे लक्षण आहे यातही शंका नाही. पण तेवढ्या एकाच प्रमाणावरून श्रेष्ठकनिष्ठता ठरविणे कितपत युक्त होईल, याचा वाचकांनी विचार करावा. आणि दुसरे असे की हिंदी लोकांचे सरासरी आयुर्मान फार कमी म्हणजे तेवीस आहे हे आपल्या हिताचेच आहे, असे रा. जोशी यांनी सुंडबर्ग नावाच्या साहेबाच्या आधाराने दाखविलेच आहे, (पान ३३३). आणि उपदंशादि रोगांनी ते आणखी कमी होईल हे स्पष्ट दिसत असताना त्यांच्या प्रसाराविरुद्ध तक्रार करणे निदान जोशांना तरी शोभत नाही.
 श्रेष्ठकनिष्ठतेच्या जेवढ्या म्हणून कसोट्या उपलब्ध आहेत तेवढयांचा येथवर दोन प्रकरणांत आपण विचार केला (१) सुख हे ध्येय म्हणून कला- कौशल्यादि साधनांनी मानसिक सुखाची आत्यंतिक वाढ झालेली असणे (२) आत्मरक्षणासाठी समाज अवश्य म्हणून त्यांचे राष्ट्र हे जे परिणत स्वरूप त्यावर लोकांची निष्ठा असणे, (३) आणि मानसिक सुखाचे आद्य साधन जे व्यक्तित्व त्याचा त्या राष्ट्रासाठी किंवा धर्मासाठी बळी दिलेला नसणे, ही कोणच्याही राष्ट्राच्या श्रेष्ठत्वमापनाची साधने आहेत, असे थोडक्यांत सांगता येईल.
 संस्कृती व प्रगथी या संबंधात निर्माण होणाऱ्या कोणच्याही प्रश्नाची उत्तरे आपणास आता देता येतील असे वाटते. माझ्या मताने संस्कृति व प्रगति या भिन्न मानण्याचे मुळीच कारण नाही. शब्दाबद्दल माझा वाद नाही. दोहीचा अर्थ अभिन्न आहे इतकेच सांगावयाचे आहे. आणि त्या दृष्टीने पाहिले तर हिंदुस्थानात मागे संस्कृतीची कितीही वाढ झालेली असली तरी गेली हजार वर्षे हा समाज अगदी हीनदीन स्थितीप्रत जाऊन पोचलेला आहे असे मोठ्या खेदाने म्हणावे लागते. रामायण, महाभारत, शाकुंतल, ज्योतिषशास्त्र, गणितशास्त्र, योगशास्त्र, वेरूळ, अजंठा, बरोली ही जर आमच्या गतवैभवाची व संस्कृतीची स्मारके होत, तर तसली एकही गोष्ट गेल्या हजार वर्षात झाली नाही हे त्या काळाच्या अधःपाताचे लक्षण नव्हे असे कसे म्हणता येईल ? आणि सध्याच्या काळी टिळक, गोखले (अमेरिका) रामन्, बोस असे मोठमोठे संशोधक होत असता त्या क्षेत्रांत थोडी प्रगती आहे असे म्हटले तर ते तरी नाकबूल कसे करता येईल ?
 प्रगती हा एक भ्रम आहे असे काही पंडितांचे मत आरंभी सांगितले आहे. पण ते खरे नाही असे आता दिसून येईल. गेल्या चाळीस हजार वर्षात मानवाची मुळीच प्रगती झाली नाही हे म्हणणे बरोबर नाही. मानवाला कोणतेच ध्येय नाही, असे ज्यांचे मत असेल, त्यांना कदाचित् असे म्हणता येईल. पण प्रगती हा शब्दच त्यांना वापरता येणार नाही. पण एरवी गट- भावना किंवा राष्ट्रीय वृत्ती वाढणे, व्यक्तित्वाची जाणीव निर्माण होणे, बुद्धीचा विकास होऊन ज्ञानांत भर पडणे ही निःसंशय प्रगती आहे. नीतिदृष्ट्या विचार केला व गेल्या सातआठ हजार वर्षांचाच विचार केला तर मात्र अल्फ्रेड वॅलेस किंवा डीन् इंग यांचे म्हणणे खरे आहे असे वाटते. म्हणजे त्या काळी जे समाज सुसंस्कृत होते, त्यांच्यात एका माणसाला दुसऱ्या माणसाबद्दल त्या काळी जे प्रेम वाटत असे, त्यांत व आताच्या स्थितीत काही फरक आहे असे वाटत नाही. थोडक्यांत असे की, सत्यनिष्ठा, बंधुभाव वगैरे सद्गुणांची जी उंची वेदकाळी होती तीच आज आहे, त्यांत सुधारणा झाली नाही, हे खरे आहे इतकेच नव्हे तर पुढे कधी होईल, असा आशेचा किरण क्षितिजावरसुद्धा दिसत नाही. पण आठदहा हजार वर्षांपूर्वी जी स्थिती होती, तीच पन्नास हजार वर्षापूर्वी होती, असे म्हणता येणार नाही. हिंदी, मिसरी, चिनी वगैरे संस्कृतीचे लोक केव्हा तरी आफ्रिकेतल्या रहिवाश्यांच्या स्थितीत होतेच. आणि त्या स्थितीतून ते वर आले असे दिसत असताना नीतिदृष्ट्या प्रगती झाली नाही ह्या म्हणण्यात तरी काय अर्थ आहे ?
 आणि तसा अर्थ नसेल तर प्रगती अमान्य करता येणार नाही. कोणचाही एक कालखंड घेतला तर त्यांत आजच्यापेक्षा उद्या बरी स्थिती प्राप्त करून घेण्याकडे माणसाने दृष्टी ठेवणे हेच खरे जिवंतपणाचे लक्षण आहे. बरी स्थिती कोणची ते वर सांगितलेच आहे. ती स्थिती ज्याला आली असेल तो समाज सुसंस्कृत होय. केवळ टिकून राहिलो येवढ्यातच फुशारकी मारण्यात काही अर्थ नाही. अगोदर तेही खरे नाही, पण ते आहे असे धरले तरी त्यांत पराक्रम किंवा मोठेपणा काहीच नाही. आफ्रिकेतले नीग्रोही टिकून राहिलेलेच आहेत आणि ढेकूण व पिसवा याही टिकून राहिल्या आहेत. मानवाला ते जिणे आवडत नाही म्हणून तर सर्व खटाटोप आहे. तो मूल हेतूच ज्यांना अमान्य करावयाचा असेल, त्यांनी हिंदू समाज सुस्थितीत आहे असे म्हणावे. इतरांना तसे म्हणणे लज्जास्पद वाटेल. यावच्चंद्रदिवाकर टिकून राहावे ही ईर्षा तर आहेच, पण ते मानाने टिकून राहावे अशी दुसरीही ईर्षा आहे. आणि या दोहोंचा खटका आला तर मानी पुरुष दुसरीचीच किंमत जास्त करील. आणि तसेच करण्याकडे या जुनाट भारत देशाची प्रवृत्ती व्हावी त्याने आपली सनातन शांतता सोडून देऊन थोडी अस्वस्थता व अस्थिरता धारण करावी, अशी शुभेच्छा प्रगट करून संस्कृतीचे हे लांबलेले विवेचन पुरे करतो.