वैदू - मच्छाई यो शंकासूर मारुनी ...

मच्छाई यो शंकासूर मारुनी चार्‍ही वेद लाईये । ब्रह्मासी सुख केलीये ।

तुझ्या रूपाची थोरी काय वर्णू ये । बुरगुंडये माये बुरगुंडाये ॥ १ ॥

कच्छाई वो समुद्रमंथन केलीये । पाठन देउन महा मेरू तारियेले ।

दैत्यासी मारिलीये । देवासी रक्षिलीये । ऐसी तुझी थोरवी जग वाखाणिये ।

तुझे स्वरूपाची ऐकून बहु सुख पाविलिये । माये बुरगुंडाये ॥ २ ॥

वर्‍हाई वो पृथ्वी बुडिये । ते दाढे धरीये । विश्वजनासी तारिये ।

तुझे स्वरूपासी ब्रह्म वाखाणिये । न कळे तया सीमाई वो ॥ ३ ॥

नरसीमीयो प्रल्हादाकारणें । वैकुंठींहुनी प्रल्हाद रक्षिलीयो ।

तारिले भवभक्त तारिले प्रल्हादासी । हिरण्यकश्यपाकारणें आईयो ॥ ४ ॥

बळीराम दैत्य पृथ्वी माजलियो । त्या कारणें कैसी धावलीसे वामनरूप धरूनियो ।

तीन पाऊल पृथ्वी दान मागितलीयो । तिसरे पाउलीये बळी घालोनी पाताळीयो ।

तयाचे द्वारीं द्वारपाळ होउनी राहिलीयो । भक्तिकारणें देणें तुझी थोरी झालीयो । आईयो बुरगुंडे ॥ ५ ॥

परशरामाईयो । पित्याचे वचना धांवलीयो । रेणूकें मातेचें शीर उडविलीयो ।

पहा तिचें नवल केवळ थोरीयो । पित्याचे वचनें चौघे उठविलीयो । भक्तिभाव देखोनी निक्षेत्रीं पृथ्वी केलीयो ॥ ६ ॥

रामाईयो सीतकारणें रामें रावण वधिलीयो । देवगणा सोडून सुखी केलीयो । धन्य तुझी एक वृत्ती सकळ धर्म तारीयो ॥ ७ ॥

कृष्णाबाईयो । देवकी बंदीशाळे त्याकारणें धांवलीयो ।

धरून कृष्णलीला कंससामासी मारलीयो । भक्ति कुबजेची देखोनी तिसी भावें उद्धरलीयो ॥ ८ ॥

बोधाईयो भक्तिभाव देखुनी तिष्ठत भीमातिरींयो । पुंडलिकाकारणें सकळ जग उद्धरीलीयो ॥ ९ ॥

कलंकी अवतार धरुनी सकळ पृथ्वी बुडविलीयो । वटपत्रीं राहिलीयो ।

एका जनार्दनीं देखिलीयो । आई वैदीण प्रसन्न झालीयो । सकळ सुख देखिलीयो ॥ १० ॥


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.