व्यवस्थापनाची मूलतत्त्वे/व्यवस्थापनातील अधिकार

प्रकरण ७

व्यवस्थापनातील अधिकार




व्यवस्थापकांची एक नेहमीची तक्रार असते ती म्हणजे पुरेसे अधिकार न मिळण्याची.
 अधिकाराचे तीन स्रोत आहेत. पहिला स्रोत अधिकारांची सोपानपद्धतीने रचना केल्यामुळे आलेले असतात. संघटना एक परिपत्रक काढते, “१ एप्रिलपासून हा व्यवस्थापक या विभागाचा प्रमुख आहे." यातून असे सूचित होते की जर विभागातील एखाद्याने त्या व्यवस्थापकाचे आदेश पाळले नाहीत तर त्यावर शिस्तभंगाची कार्यवाही होऊ शकते. पण व्यवस्थापकावरचा वरिष्ठ अधिकारी किंवा आस्थापना अधिकारी म्हणतो, “कृपया युक्ती वापरून पाहा." याचा अर्थ असा की शिस्तभंगाची कार्यवाही कधीही करू नका. म्हणून, सोपानबद्ध अधिकाररचनेतून येणारा अधिकार ज्या दिवशी मिळतो त्या दिवशीच जाण्याची शक्यता असते.
 दुसरा अधिकार हा विशेष नैपुण्य, तंत्रज्ञान असण्यातून येतो. जर व्यवस्थापक तज्ज्ञ असेल, तर त्याच्या हाताखालची व्यक्ती म्हणेल, “हा वरिष्ठ अधिकारी त्रासदायक आहे - पण त्याला त्याच्या क्षेत्रातील भरपूर माहिती आहे. त्याच्याकडून तपासून घेणे हे बरे." मात्र बदलत्या तंत्रज्ञानाबरोबर विशेष नैपुण्य, तंत्रज्ञान अवघड होत चालले आहे. जेव्हा वर्षानुवर्षे तेच तंत्रज्ञान कार्यरत असायचे, तेव्हा त्यावर वीस वर्षे काम करणाच्याकडे नैपुण्य, तज्ज्ञपणातून येणारा अधिकार होता. आता तंत्रज्ञान अतिशय वेगाने बदलत आहे. दर दहा वर्षांनी, अगदी दर पाच वर्षांनीसुद्धा बदलते. त्यामुळे ते तंत्रज्ञान हाताळणाच्या हाताखालील व्यक्तीकडे केवळ याद्यांचा (कॅटलॉगांचा) अभ्यास करणाच्या व्यवस्थापकापेक्षा ज्ञान, नैपुण्य अधिक असण्याची शक्यता असते.
 याबाबत घरच्या परिस्थितीशी तुलना करा. हल्ली घरात टीव्हीबाबतचा तज्ज्ञ कोण असतो - सर्वात लहान की सर्वात मोठा? मागे मी माझ्या एका मित्राच्या घरी टीव्ही पाहत बसलो होतो. चित्र हालू लागलं. माझ्या मित्राची बायको चित्र स्थिर करण्यासाठी उठली. त्यांचा आठ वर्षांचा नातू आला आणि म्हणाला, “आजी, तू टीव्हीला हात लावू नकोस. तू बिघडवशील. काही झालं तर मला सांग." त्याने बटनांबरोबर काहीतर खटपट केली आणि टीव्ही छान चालू लागला. मला आठवतंय, मी जेव्हा आठ वर्षांचा होतो तेव्हा टीव्ही हा प्रकार नव्हता. रेडिओ आणला होता. पण तो खूप उंचावर ठेवला होता. त्याकाळी प्रत्येकाला असे वाटायचे की लहान मुलांनी एखाद्या वस्तूला हात लावला तर ती खराब होते, बिघडते. खरं तर, घरात काही बिघडलं तर मुलांना सांगितलं जायचं, “तुम्हीच त्याला हात लावला असणार, नाहीतर कसं बिघडलं ते?"
 आणि आता तर तीन वर्षांच्या मुलांनाही टीव्ही चालू-बंद करायची परवानगी आहे. याचा परिणाम त्यांना केवळ थोडाथोडका आत्मविश्वासच नाही तर बराच आत्मविश्वास वाटतो. मी जेव्हा लहान होतो तेव्हा मला वाटायचं की माझ्या वडिलांना सगळं काही माहीत आहे आणि माझ्या वडिलांना जे माहीत नाही ते माहीत करून घेण्याच्या लायकीचं नाही. आज चिमुरडी मुलं ब्रेकफास्टच्या टेबलावर मला प्रश्न विचारतात आणि मी जर बरोबर उत्तर दिलं तर ते आनंदाने खिदळतात. ते म्हणतात, “अरेच्चा! डॅडींनासुद्धा हे माहीत आहे."
 कामाच्या ठिकाणीही हे असंच घडतं. शेवटी घरासाठी आणि ऑफीससाठी देवाने वेगवेगळी मुले जन्माला घातलेली नाहीत. तीच मुले एके दिवशी ऑफिसात येतात आणि ते जसे घरी बगायचे तसेच वागतात. जेव्हा मी माझ्या पहिल्या नोकरीवर रुजू झालो तेव्हा तेथे पन्नास वर्षांचा एक विभागप्रमुख होता आणि मी तेवीस वर्षांचा तंत्रज्ञ होतो. मी विचार केला, “हा माणूस येथे तीस वर्षे काम करीत आहे. त्याला खूप काही माहिती असेल. एक दिवस मला त्याची जागा घ्यायचीय. मला आशा वाटतेय मी त्याच्याकडून खूप काही शिकेन," आणि आता? आता तरुण तंत्रज्ञ नोकरी घेतो आणि पन्नास वर्षे वयाच्या त्याच्या वरिष्ठ अधिका-याकडे पाहून म्हणतो, “हा म्हातारडा इथं काय करतोय? त्याचा एक पाय थडग्यात आहे! मला नाही वाटत त्याला अभियांत्रिकीची काही माहिती असेल. तीस वर्षांपूर्वी तो जी अभियांत्रिकी शिकला ती आता पार कालबाह्य झाली आहे आणि मला नाही वाटते त्याने काही वाचन केलंयत्याचं सकाळचं वर्तमानपत्र सोडून."
 अधिकाराचा तिसरा प्रकार आहे तो म्हणजे चिंतेतून येणारा अधिकार. हा अधिकार प्रत्येक गृहिणीकडे असतो. गृहिणीकडे अधिकाराच्या सोपानबद्ध रचनेतून येणारा अधिकार नसतो; विशेष नैपुण्यातून येणारा अधिकार नसतो. तिच्याकडे चिंतेतून येणारा अधिकार असतो. 'काळजी' या शब्दातून येणारा अधिकार. अलीकडेच मला मुंबईत एक तरुण भेटला. त्याने गळ्याभोवती मफलर गुंडाळला होता. “काय झालंय तुला?" मी त्याला विचारलं, "तुझ्या गळ्याभोवती मफलर का आहे?"
 “माझा घसा दुखतोय," तो म्हणाला, “माझी आई म्हणतेय मी मफलर घालायलाच हवा. मी जर मफलर घातला नाही तर ती काळजी करीत राहील."  ‘काळजी' हा एक शब्द. काम करताना दिसतो - दिलेले आदेश कायदेशीरपणे न पाळल्याबद्दलचे आरोपपत्र न देताही.
 मागे एकदा मी पूर्वसूचना न देता एक महत्त्वाची पार्टी दिली. अचानक एक मित्र जायला निघाला.
 “का?" प्रत्येकाने विचारलं.
 “आठ वाजलेत," तो म्हणाला.
 "यावेळी रोजच आठ वाजतात. आज कसली घाई?" मी विचारलं.
 "माझी बायको एकटी आहे." तो म्हणाला.
 “जोवर ती एकटी आहे तोवर कसली चिंता?" मी विचारलं.
 "मी घरी पोहोचल्याखेरीज ती काही खाणार नाही." तो म्हणाला.
 "तिच्याकडे तिचं स्वयंपाकघर आहे. ती खाईल काहीतरी." मी मुद्दा मांडला.
 "नाही." तो म्हणाला, “ती काळजी करीत राहील."
 मी म्हणालो, “मग तू जा."
 नाहीतर बायकोच्या चिंतेची चिंता करीत त्याने पार्टीची मजा बिघडविली असती.

 मला एक जुनी गोष्ट आठवते. गोष्ट लिहिली आहे मुन्शी प्रेमचंदने. या गोष्टीचे नाव आहे ‘बडे भाईसाहब'. ही गोष्ट दोन भावांची आहे. एक मोठा भाऊ आणि दुसरा धाकटा. मोठा भाऊ गंभीर, अभ्यासू वृत्तीचा आहे. धाकटा भाऊ निर्धास्त, आनंदी, खेळकर स्वभावाचा. त्याला पतंग उडवायला आवडतं. प्रत्येक वेळी जेव्हा मोठा भाऊ धाकट्या भावाला पतंग उडविताना पाहतो तेव्हा त्याला ओढून घरी आणून म्हणतो, "बेड लागलंय तुला? परीक्षा जवळ आली आहे ते कळत नाही तुला? अभ्यासाला बस, खूप अभ्यास कर, चांगले गुण मिळव, परीक्षा पास हो आणि आयुष्यात यशस्वी हो!" तो धाकटा भाऊ बिचारा अभ्यासाला बसतो. धाकटा भाऊ पास होतो. मोठा भाऊ नापास होतो! पुन्हा मोठा भाऊ धाकट्या भावाला पतंग उडविताना पकडतो. तो म्हणतो, “तु पास झालास यावर जाऊ नकोस. खालच्या वर्गाच्या परीक्षा सोप्या असतात. तू जसजसा वरच्या वर्गात जाशील तसतशा परीक्षा कठीण होत जातील. अभ्यासाला बस, खूप अभ्यास कर, चांगले गुण मिळव, परीक्षा पास हो आणि आयुष्यात यशस्वी हो!" पुन्हा तो धाकटा भाऊ पास होतो आणि मोठा भाऊ नापास. आती दोघे एकाच वर्गात येतात. पुन्हा मोठा भाऊ धाकट्या भावाला पतंग उडविताना पकडतो. तो म्हणतो, “वेड लागलंय की काय तुला? मी किती मन लावून मेहनतीने अभ्यास करतो हे दिसत नाही तुला? तरीसुद्धा मी ही परीक्षा पास होऊ शकत नाही. तू पास झालेल्या परीक्षा मी पण पास झालोय. ही खरी अवघड परीक्षा आहे. अभ्यासाला बस, खूप अभ्यास कर, चांगले गुण मिळव, परीक्षा पास हो, आयुष्यात यशस्वी हो!" धाकटा भाऊ पास होतो. मोठा भाऊ पुन्हा नापास होतो!
 यावेळी धाकट्या भावाला वाटतं.आता मोठा भाऊ मला कसा रोखू शकणार? तो नापास झाला आहे, आणि मी पास झालो आहे. माझ्यावरचा अधिकार त्याने गमावला आहे. तो पतंग काढतो, दोच्याचं रीळ काढतो आणि बाहेर जायला निघतो. मोठा भाऊ त्याला पाहतो. तो म्हणतो, “थांब!" धाकटा भाऊ थांबतो. काही न बोलता मागे वळून पाहतो. मोठा भाऊ म्हणतो, “हो, मला माहीत आहे तू काय विचार करतोयस ते. तू पास झालेल्या परीक्षेत मी नापास झालोय—त्यामुळे मी आता तुझ्यावरचा अधिकार गमावला आहे. पण तू चुकतोयस! मी परीक्षा पास झालो नाही, मी माझं आयुष्य यशस्वी केलं नाही. तरी जोवर मला तुझी चिंता आहे आणि मला तू आयुष्यात यशस्वी व्हायला हवा आहेस-तोवर माझा तुझ्यावर अधिकार आहे. अभ्यासाला बस, खूप अभ्यास कर, चांगले गुण मिळव, परीक्षा पास हो आणि आयुष्यात यशस्वी हो."
 तो धाकटा भाऊ परत फिरतो - येथे ती गोष्ट संपते. पण या लहानशा गोष्टीत प्रेमचंदने आपल्याला अधिकाराविषयीचं फार मोठं रहस्य सांगितलं आहे.
 योग्य निकाल, यश मिळविण्यासाठी व्यवस्थापकांनी हा अधिकार वापरायला हवा. प्रत्येक संघटनेतील अधिका-याची तक्रार असते : ‘येथे आमच्यावर जबाबदारी आहे पण अधिकार काही नाहीत. प्रत्येक अधिका-याला अधिकाधिक जबाबदारी मिळतच राहणार आहे. इतरांविषयी चिंता, काळजी वाटण्यातून त्याने अधिकाराची निर्मिती करणे त्याला भाग आहे.

★★★