शब्द सोन्याचा पिंपळ/जगणं : ...अगोदर असोशी...नंतर नकोशी
जगणं : ... अगोदर असोशी... नंतर नकोशी
काय असतं माणसाचं जगणं? ऊनपावसाचा खेळ? आशानिराशेचा लपंडाव? विजयपराजयाचा संघर्ष ? संधिसवलतींचा खोखो? जगणं असतं तरी काय? खरं तर ती एक स्वप्नांची अनिवार ओढ असलेली सोनसाखळी असते! जन्मापासून मरणापर्यंत माणूस रोज नव्या आशा, आकांक्षा, स्वप्नांना उराशी कवटाळून जगत असतो. लहानपणी न कळण्याच्या काळात जगणं हा खेळ असतो. या खेळाचं स्वतःचं असं एक वैशिष्ट्य असतं. बालपणी लहानपणी स्वतःशी खेळतं नि माणूस शेवटच्या क्षणीही स्वतःशी खेळत असतो. लहानपणाचा काळ सुखाचा तसा खेळही! मोठेपणाचे सारे खेळ विविध रंग, छटा, भावभावनांचे! बालपण सुखद एकांत, तर वृद्धपण विषादयुक्त एकांत! एकूण सारा खेळच खेळ. जगणं खेळच.
मग हाती येतात नवनवी खेळणी. चोखायची, खायची, खेळायची. बालकांच्या खेळण्यांचे आकार, प्रकार, रंग असतात मोठे आकर्षक! चोखावे, खावे, चघळावे, गिळावे वाटणारे सारे भाव म्हणजे त्या बाळाचे जीवन समजून घेणंच असतं. आवाज करणारे रबरी खेळ, बाहुले, पक्षी, प्राणी सा-यांचा मेळ. खेळ म्हणजे पाळण्या, बिछान्यावरची सर्कसच ना? ड्रम वाजवणारं माकड, अस्वल असो वा डोळे मिळणारी बाहुली असो. कृतीतून नवं कळतं नि बाळ हरकतं.
बाळाचं स्वतःशीच खेळणं म्हणजे त्याचा आत्मशोधच असतो. रडूनही आई नाही आली, तर रडून रडून झोपायचं, हे एक प्रकारचं शिक्षणच असतं. झोपेत हसायचं म्हणजे स्वप्नांचा प्रारंभच असतो. कुशीवर वळणं, पालथे पडणं, पोटावर सरकणं नि कॉट, पाळण्यातून पडणं, टण्णू उठणं, खोक पडणं सारी धडपड असते, ती स्वतःच्या पायावर उभा राहायची नि मग एक एक पाऊल उचलत पडत, झडत स्वतःचं स्वतः उभं राहायची. हा सारा खेळच असतो एकीकडे नि दुसरीकडे जगणं समजावून घेणंच असतं. गुडघ्याला घट्टे पडणे नि माती खाणे, हा सारा जगण्याचा सोसच असतो.
बाळाला पाय फुटण्यातून त्यानं समाजीकरण सुरू होणं असतं. मग मित्रमैत्रिणींशी झोंबाझोंबी, ओढाओढी, चावणे, चिमटे घेणे, प्रसंगी झिंज्या ओढणे, ओरबाडणे सारं अस्तित्वाचं प्रदर्शन नि ओव्हर टेकचाच खेळ असतो. सारं करून स्वतः रडायचं म्हणजे कज्जा न करता, कोर्ट केस जिंकायचं कसब, हा ज्याचा त्याचा वकूब. मुलामुलींना भीती, मार, आक्रमण शिकवावं नाही लागत. उपजत काही गोष्टी घेऊनच माणूस जन्मतो. कोण खट्याळ, कोण नाठाळ, कोण लाजरी, कोण साजरी, कोण बुजरी; हे सारं उपजतच असतं. ते सारं अनुवंश, डीएनएचा नकाशा नि शरीरातील जैविक घड्याळ यावर अवलंबून असतं.
त्यातून त्याला जगण्याच्या खाचाखोचा, खाचखळगे समजत, उमजत राहतात आणि तो रोज अनुभवसंपन्न, शहाणा होत राहतो.
मुलामुलींचं कुमार, किशोरी होणं म्हणजे स्वतःचं विश्व तयार होणं. 'मी', 'माझे' असं भान येणं. हक्क, कर्तव्याची जाणीव, जबाबदारीची जोखीम यातून तो स्वतःला आजमावत आत्मशोध घेत असतो. चांगलं काय नि वाईट काय हे कळत नसलं, तरी दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत, हे त्याच्या एव्हाना पचनी पडलेलं असतं. मग गुरुजींच्या सांगण्यातून संगतीचे, संगतिदोषांचे भान येतं. आईबाबांच्या दटावणीतून अभ्यासाचं वळण लागतं. त्याच वेळी ताई, दादा, मोठे मित्र यांच्या ‘धरि शस्त्र मी न हाती, सांगेन युक्तीच्या गोष्टी दोन-चार' अशा स्वरूपाच्या अनौपचारिक शिक्षणाचे महत्त्व मोठ्ठ झाल्यावर उमजतं. तोवरचं जीवन म्हणजे 'आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहीकडे' असंच असतं. ‘मोही रंगले, चित्त दंगले, गान स्फुरले अशी ती अवस्था म्हणजे जगण्याचं गारूड नि सुंदर स्वप्न असतं.
मनात हुरहूर नि काळजाची झुरझुर म्हणजे आयुष्याचा अनमोल ठेवा. किंकर्तव्यविमूढ ही अवस्था म्हणजे ‘खाये तो पछताये, न खाये तो भी!' कळतं पण वळत नाही, असे ते दिवस. घरापेक्षा बाहेरचं जग अधिक मोहक वाटू लागतं ते प्रलोभनाचा बाजार तेज होऊ लागल्यानं. आजूबाजूचे जे चांगलं सांगतात ते वैरी, दुश्मन वाटू लागतात. वाईट ते आकर्षक असतं, हे न कळण्याच्या त्या दिवसांत चकाकतं ते सोनं वाटत असतं. मित्रमैत्रिणींचा सहवास, संगत, संवाद म्हणजे सर्वस्व वाटण्याचे ते दिवस वसंतापेक्षा मनोहारी असतात खरे! समलिंगी सहवास नि भिन्नलिंगी आकर्षण, असं दुहेरी गारूड! नक्की काहीच कळत नसतं. काय खरं, काय खोटं? चाचपडणं, चाचपणं असं फुकत फुकत जीवनाचा आस्वाद घेणं, मिटक्या मारण्यापेक्षा कमी रंगतदार नक्कीच नसतं. एकाच वेळी भीती नि जिज्ञासेचं द्वंद्व. प्रत्येक अनुभव नवाकोरा, हवाहवासा वाटणारा. कुतूहल म्हणजेच तर जीवन नाही ना, असा संभ्रम पडण्याचा हा काळ, जगण्याची अनिवार असोशी देऊन जातो नि मोठं होण्याची महत्त्वाकांक्षा. मिशा केव्हा फुटतील, पाळी म्हणजे शिसारी; असं एकीकडे नि दुसरीकडे गुफ्तगूचा माहौल! सिक्रेट सेव्हनचा हा काळ म्हणजे रोज काहीतरी नवं कळणं, मिळवणं नि गमावणं पण!
‘आहे मनोहर तरी, गमते उदास', असं वाटणाच्या तारुण्याच्या उंबरठ्यावरचा काळ म्हणजे सांगता येत नाही आणि सोसवतही नाही, असं काहीतरी. ‘धरलं तर चावतं, नि सोडलं तर पळतं.' सारं जग कवेत घ्यायच्या
उमंगीनं, उमेदीनं काही पाऊल टाकावं, तर यशापेक्षा पाय घसरण्याचीच भीती. 'लाथ मारीन तिथं पाणी काढीन', असं लाख वाटलं, तरी कपाळमोक्षाचं भय कानात वारा शिरलेल्या वासरासारखं भ्रमित करून टाकतं. एका कोळियाने' ऐकायला बरे वाटते. 'झटे निश्चयाचे बळ। अंती त्याला यश मिळे।।' याची खात्री असली, तरी आत्मविश्वासाभावी साहस घडत नाही. पंखात बळ असतं; पण झेपावण्याचा अनुभव, अंदाज नसल्याने दरी वास्तवापेक्षा अधिक खोल भासू लागते. काळोखाच्या भयाण लाटा। उठती, फुटतील बारा वाटा' अशा मनःस्थितीत नक्की काय करावं, याचा निश्चय होत नाही. जगणं आता अनिवार्य, हे कळून चुकलेलं. पण, हमरस्त्यावर यायचं म्हणजे १००० व्होल्टचा शॉक! त्यातही भर चौकात मध्ये आपण एकटे नि सारे रस्ते खुणावणारे, अशा स्थितीत कसोटी असते ती आपलीच. हिय्या करायचा नि पुढे जायचं, असं एखाद्या निर्णयाच्या क्षणी ठरवावंच लागतं. तो क्षण निर्वाणाचाही ठरू शकतो, हे माहीत असूनही जो जोखीम पत्करेल, त्यालाच लॉटरी लागणार. ‘सत्य असत्याशी मन केले ग्वाही। नाही मानियेले बहुमता', असं जाणून जो विवेकाचा कौल मानतो, तोच जगण्यावर मांड ठोकून जगज्जेता होतो. ‘सोन्याचे घर, दिसते माती', असं असताना जो मुशाफिरीला निघतो, त्यालाच प्रवास घडतो. बाकी सारे घाण्याचे बैल होत असताना तो आपण 'मुकद्दर का सिंकदर' व्हायचं ठरवतो. तो क्षण आत्मस्वर सापडल्याची खूणगाठ असते. ती सुरगाठ होईल की निरगाठ, याचा विचार न करता जे प्रयत्नशील राहतात, त्यांच्याच मुठीत काहीतरी येतं. झाकली मूठ सव्वालाखाची' याचा अर्थ जे मुठी वळतात, तेच कमावतात. तरुणपणी मूठ नाही वळायची, तर मग ती केव्हा वळायची? Thus, no far, no further' म्हणतात, तरुण दिग्विजयी ठरतात.
लग्न, घर, कुटुंब, मुलंबाळं अशा गोतावळ्यात अडकणं, जीवनाची ओढ, जीवनाची सार्थकता हे कळण्याचा आनंद काही आगळाच. बालपण, कुँवारपण, तारुण्य असे आयुष्याचे एक एक उंबरठे पार करत, लग्नाच्या बोहल्यावर चढणे म्हणजे ‘याचसाठी केला होता सारा अट्टाहास', अशी कृतार्थता नि कृतकृत्यता! चांगला जीवनसाथी अथवा अर्धांगिनी मिळणं म्हणजे जीवनाचं एक भव्य स्वप्न साकारणं असतं. संसार थाटणं, मांडणं म्हणजे चिमणीनं काडी काडी जमवून, जुळवून विणलेला खोपाच असतो ना? मग पहिल्या बाळाची चाहूल म्हणजे स्वर्गसुख! पत्नीच्या चेह-यावर खुलणारं मातृत्व पाहणं म्हणजे शरदाचं चांदणं न्याहाळणं असतं. पत्नीला
हवं नको पाहणं, खावंसं वाटते ते आणून देणं (प्रसंगी चोरून!) तिचे लाडकोड करणं या सा-यांत अलोट प्रेम वाहत राहतं. मग बाळाचे ठोके ऐकणं, बाळ आईच्या पोटात लाथा मारू लागल्याचा सुगावा म्हणजे बाळाची चाहूल! अन् प्रत्यक्षात बाळाचं आगमन म्हणजे आईचा, पत्नीचा पुनर्जन्मच. ते म्हणजे नुसतं पेढे, बर्फी वाटणं नसतं, तर जीवन सफळ झाल्याची ग्वाही, द्वाही, दवंडीच. बाळासाठी झबली, टोपडी जमवणे, नवी खरेदी करणे म्हणजे दिवाळीआधीची दिवाळीच ना? बारसं होऊन पहिला वाढदिवस केव्हा येतो कळतसुद्धा नाही. कधी कधी एव्हाना दुस-या बाळाची खबर म्हणजे जीवन संपल्याचा, आनंद विरल्याचा विषाद. मग बाळांच्या वाढीत आपलं तारुण्य सरून आपण प्रौढ झाल्याच्या खुणा, पहिला पांढरा केस देऊन जातात. चाळिशीनंतरच्या मोनोपॉजच्या व्यथा, वेदना, नवनवी लक्षणं म्हणजे एकाच क्षणी भोग सरल्याचा संतोष नि प्रौढत्वाचे घोर. मुलामुलींची वये एरंडासारखी असतात. कधी ती कानाखांद्याला लागतात, कळतसुद्धा नाही. मग त्यांचे शिक्षण, लग्न, नोकरी, संसार रोज नवे प्रश्न, नवी लढाई, नवी जुळवाजुळव. जीव कसा मेटाकुटीला येऊन जातो. अजुनि चालतोचि वाट, माळ हा सरेना' असं होऊन थकून जातो माणूस; पण तरीही त्याची जगण्याची जिद्द मात्र न हारता, न थांबता, शिकते ते त्या कष्टातही, ते कष्ट उपसण्यातही कोण आनंद असतो. आपल्याला जे मिळालं नाही, ते मुलांना भरभरून, भरपाईने देण्याची महत्त्वाकांक्षा म्हणजे कर्तव्यपूर्तीचा सोहळा!
मुलाबाळांतून मोकळे झाले की मात्र ‘दिन गेले मास, तसे वत्सरेही गेली। निकट वाटते जीवनसंध्या ही आली।।', अशी जाणीव होऊ लागते. पाठ धरू लागते, गुडघे धरू लागले की हेही जीवनाचं एक अटळ पर्व असतं व त्याला तुमची इच्छा असो वा नसो, सामोरे जावेच लागते. सून, जावयांचं असं उगवणं म्हणजे आपला सूर्य कलत चालल्याच्या खाणाखुणा! मग चारधामचे वेध. पूर्वी काशीचे खेटे मनी यायचे. हल्ली युरोप, अमेरिका, पटायाची ‘सेकंड इनिंग ट्रीप म्हणजे जिवंतपणी मोक्षप्राप्तीचा आनंद नि स्वर्गसुखाची अनुभूती. आता कधी नव्हे ते पतिपत्नीमधील एकमेकांबद्दलचा दुरावा झडून, त्याची जागा जिव्हाळ्याचा झरा घेऊ लागते. शेवटी दोघांचे मिळून सरण सजावे, अशी इच्छा केवळ शहाजहाँ-नूरजहाँचीच नसते, आपलीपण असते. बरं झालं, तेव्हा विमा उतरला होता म्हणून, नाहीतर आज कुत्रं हाल खाल्लं नसतं, असा दिलासा म्हणजे आपण दूरदृष्टीनं जगलो, या आपल्या शहाणपणाची सेल्फ प्रशंसा, आपणच आपल्या पाठीवरथाप मारून घेणं. मुलंमुली, सूनजावई ज्यांना त्यांना आपले संसार असतात. ते त्यांच्यात रममाण. आपण आता पानांवर नाही, तर मार्जिनमध्ये गेल्याची अनुभूती म्हणजे विषादच नसतो, तर ऊर्मी, ऊर्जा हरवण्याची हताशा विशद करणारी असते. ‘ने रे एकदा वर’, ‘लागले नेत्र पैलतीरी’, ‘गोव-या पोहोचल्या स्मशानात, आता फक्त तिरडी पोहोचवायची वाट' अशी निरवानिरवीची, निर्वाणीची भाषा म्हणजे संध्याछाया भिवविती हृदया' अशीच अभिव्यक्ती. ‘कुठे दडून बसलास रे, ने लवकर' म्हणणं म्हणजे भवसागराचा वीट नि जगणं असह्य झाल्याची साक्ष! 'देह जळो नि फुली उजळो' म्हणत दिवस काढणंही कठीण होतं. असं वाट बघत जगण्यापेक्षा मरणच बरं, असं कितीही वाटलं, तरी ते कुणाच्या हातात नसतं? ‘पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही भेट' म्हणत पतिपत्नीतील स्पर्धा म्हणजे विधुर, विधवा म्हणून जगणं नाकारणं! पण, तेही काळाच्या मुठीत बंद असतं. हाती असतं फक्त मरण येईपर्यंत जगणं!
▄ ▄
१. शब्द सोन्याचा पिंपळ
(दै. सकाळ, कोल्हापूर - ६ मार्च, २00७)
२. शब्द माहात्म्य
(चिंतन/आकाशवाणी, सांगली - २८ मे, १९८६)
३. वाचनाने जग बदलते
(दै. सकाळ, कोल्हापूर - १४ जानेवारी, २०१२)
४. दिसामाजी काहीतरी लिहावे
(दै. सकाळ, कोल्हापूर - १६ जानेवारी, २०१२)
५. पुस्तकाचे महत्त्व
(चिंतन/आकाशवाणी, सांगली - २० ऑगस्ट, १९८७)
६. एकतरी पुस्तक प्रत्येक घरी
(दै. सकाळ, कोल्हापूर - १३ जानेवारी, २०१२)
७. लेखक माझ्या मनी, अंगणी
(दै. सकाळ, कोल्हापूर - १५ जानेवारी, २०१२)
८. अजून मोहविते 'मधुशाला'
(दै. रविवार सकाळ, कोल्हापूर - २६ मे, १९८५)
९. कार्यमग्नता श्वास बनवणारे : ‘प्रोफेट'
(दै. सकाळ, कोल्हापूर - ४ मे, २०१२)
१०. सर्वश्रेष्ठ हिंदी कादंबरी : 'गोदान'
(विचारशलाका-एप्रिल-सप्टेंबर, २00२)
११. जहाल वेदनेची विषण्ण गीते : ‘ज्वाला आणि फुले'
(मेहता ग्रंथजगत - दिवाळी, २०१२)
१२. अस्वस्थ करणारं स्त्री जीवन : ‘आमच्या आयुष्यातील काही आठवणी'
(मिळून सा-याजणी - डिसेंबर २०१७)
१३. संत कबीर आणि अंधश्रद्धा निर्मूलन
(संत साहित्य आणि अंधश्रद्धा निर्मूलन-संपादक डॉ. रा. तु. भगत - १५ ऑगस्ट २00२)
१४. कारंथीय नाट्यमीमांसा
(अभिरूची रंगसंवाद - २४ डिसेंबर २०00)
१५. वि. स. खोडेकरांच्या रूपक कथा
(वाचू आनंदे/आकाशवाणी, कोल्हापूर-२७ मार्च, २00१)
१६. वि. स. खांडेकरांचा पत्रसंवाद
(मेहता ग्रंथजगत - दिवाळी २०१०)
१७. वि. स. खांडेकर : समग्र मूल्यांकनाच्या प्रतीक्षेत
(दै. सकाळ, कोल्हापूर-३१ ऑगस्ट, २00१)
१८. वि. स. खांडेकर स्मृती संग्रहालय : एक दृष्टिक्षेप
(किर्लोस्कर सांस्कृतिक पर्यटन विशेषांक-मार्च, २00५)
१९. साने गुरुजींच्या दैनंदिनी चाळताना...
(दै. प्रहार (कोलाज) ५ जून २०११)
२०. साप्ताहिक साधना पहिली जावक बारनिशी : काही निरीक्षणे
(अप्रकाशित)
२१. सुर्वे काव्य : वंचितांचा टाहो
(नवी सनद (नारायण सुर्वे श्रद्धांजली विशेषांक) जुलै - ऑगस्ट २०१0)
२२. मराठी वंचित साहित्य : उद्गम आणि विकास
(परिवर्तनाचा वाटसरू-१६, ३० सप्टेंबर,२००७)
२३. राजस्थानचे स्वातंत्र्योत्तर हिंदी साहित्य
(संबंध (राजस्थानी अंक)-मे १९८७)
२४. सार्वजनिक ग्रंथालये : काल, आज आणि उद्या
(अप्रकाशित)
२५. सामाजिक धर्मबुद्धी आणि गांधी विचार
(गांधीजी आणि सामाजिक समता - संपादक - डॉ. श्रीराम जाधव - २00९)
२६. मराठी साहित्याची लोभस इंग्रजी प्रतिबिंबे
(महाराष्ट्र टाइम्स, कोल्हापूर - २३ एप्रिल, २०१५)
२७. इंटरनेटवरील समृद्ध मराठी
(लोकराज्य, फेब्रुवारी, २०१४)
२८. इंग्रजीच्या गर्तेतील मराठी
(पूर्वरंग, सांबरा, बेळगाव - १८ डिसेंबर, २०१६)
२९. मराठी भाषाकौशल्याची किमया
(लोकराज्य, जून, २०१३)
३०. जागर वाचनाचा
(निर्झर वार्षिक/२०१४)
३१. संगणकीय तंत्रज्ञान व बदलता वाचन व्यवहार
(महात्मा गांधी ग्रंथालय शताब्दी - २०१६)
३२. चला मुलांसाठी नवा डाव मांडूया (भाषण)
(मासिक, ऋग्वेद बालकुमार साहित्य संमेलन विशेषांक - मार्च, २०१६)
३३. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ : कार्य आणि योगदान
(लोकराज्य, फेब्रुवारी, २०१३)
३४. झंप्री
(त्रैमासिक इंद्रधनुष्य/मार्च, एप्रिल, मे, २०१७)
३५. जगणं... अगोदर असोशी... नंतर नकोशी
(प्रबोधन प्रकाशन ज्योती-डिसेंबर, २०१७)
▄ ▄
डॉ. सुनीलकुमार लवटे : साहित्य संपदा
१. खाली जमीन, वर आकाश (आत्मकथन)
मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे/२00६/पृ. २१०/रु. १८0 सहावी आवृत्ती
२. भारतीय साहित्यिक (समीक्षा)
मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे/२00७/पृ. १३८/रु. १४0 तिसरी आवृत्ती
३. सरल्या ऋतूचं वास्तव (काव्यसंग्रह)
निर्मिती संवाद, कोल्हापूर/२०१२/पृ.१00/रु.१00/दुसरी आवृत्ती
४. वि. स. खांडेकर चरित्र (चरित्र)
अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.१८६/रु.२५0/तिसरी सुधारित आवृत्ती
५. एकविसाव्या शतकातील शिक्षण (शैक्षणिक लेखसंग्रह)
अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.१७६/रु.२२५/दुसरी सुधारित आवृत्ती
६. कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (व्यक्तीलेखसंग्रह)
अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.१७५/रु.२००/तिसरी आवृत्ती
७. प्रेरक चरित्रे (व्यक्तीलेखसंग्रह)
अक्षर दालन, कोल्हापूर/२0१८/पृ.३१/रु.३५/तिसरी आवृत्ती
८. दुःखहरण (वंचित कथासंग्रह)
अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.१३0/रु.१७५/दुसरी आवृत्ती
९. निराळं जग, निराळी माणसं (संस्था/व्यक्तिविषयक लेखसंग्रह)
अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.१४८/.२00/दुसरी आवृत्ती
१०. शब्द सोन्याचा पिंपळ (साहित्यविषयक लेखसंग्रह)
अक्षर दालन, कोल्हापूर/२0१८/पृ.२११/रु.२७५/तिसरी सुधारित आवृत्ती
११. आकाश संवाद (भाषण संग्रह)
अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.१३३/रु.१५0/दुसरी सुधारित आवृत्ती
१२. आत्मस्वर (आत्मकथनात्मक लेख व मुलाखती संग्रह)
साकेत प्रकाशन, औरंगाबाद/२0१४/पृ.१६0/रु.१८0/प्रथम आवृत्ती
१३. एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (सामाजिक लेखसंग्रह)
अक्षर दालन, कोल्हापूर/२0१८/पृ.१९४/रु.२00/दुसरी आवृत्ती
१४. समकालीन साहित्यिक (समीक्षा)
मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे/२०१५/पृ.१८६/रु.२००/दुसरी आवृत्ती
१५. महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण : दशा आणि दिशा (सामाजिक
लेखसंग्रह) अक्षर दालन, कोल्हापूर/२0१८/पृ.१७६/रु.२00/तिसरी आवृत्ती
१६. वंचित विकास : जग आणि आपण (सामाजिक लेखसंग्रह)
अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.११९/रु.२00/दुसरी आवृत्ती
१७. नवे शिक्षण, नवे शिक्षक (शैक्षणिक लेखसंग्रह)
अक्षर दालन, कोल्हापूर/२०१६/पृ.२१२/रु.२२५/दुसरी आवृत्ती
१८. भारतीय भाषा व साहित्य (समीक्षा)
साधना प्रकाशन पुणे २0१७/पृ. १८६/रु. २00/दुसरी आवृत्ती
१९. मराठी वंचित साहित्य (समीक्षा)
अक्षर दालन, कोल्हापूर २०१८/पृ.८३ रु.१५० /पहिली आवृत्ती
२०. साहित्य आणि संस्कृती (साहित्यिक लेखसंग्रह)
अक्षर दालन, कोल्हापूर २०१८/पृ. १९८ रु. ३00 /पहिली आवृत्ती
२१. माझे सांगाती (व्यक्तीलेखसंग्रह)
अक्षर दालन, कोल्हापूर २0१८/पृ.१३६ रु.१७५ /पहिली आवृत्ती
२२. वेचलेली फुले (समीक्षा)
अक्षर दालन, कोल्हापूर २०१८/पृ. २२० रु. ३०० /पहिली आवृत्ती
२३. सामाजिक विकासवेध (सामाजिक लेखसंग्रह)
अक्षर दालन, कोल्हापूर २0१८/पृ.१८५ रु.२५० /पहिली आवृत्ती
२४. वाचावे असे काही (समीक्षा)
अक्षर दालन, कोल्हापूर २0१८/पृ.१५५/रु.२00/पहिली आवृत्ती
२५. प्रशस्ती (प्रस्तावना संग्रह)
अक्षर दालन, कोल्हापूर २0१८/पृ.२८२/रु.३७५ /पहिली आवृत्ती
२६. जाणिवांची आरास (स्फुट संग्रह)
अक्षर दालन, कोल्हापूर २0१८/पृ.१७७/रु.२५0/पहिली आवृत्ती
आगामी
- भारतीय भाषा (समीक्षा)
- भारतीय साहित्य (समीक्षा)
- भारतीय लिपी (समीक्षा)
- वाचन (सैद्धान्तिक)
(*) वरील सर्व पुस्तके मिळण्याचे ठिकाण अक्षर दालन
▄ ▄