शब्द सोन्याचा पिंपळ
शब्द सोन्याचा पिंपळ
(साहित्यविषयक लेखसंग्रह)
डॉ. सुनीलकुमार लवटे
संपर्क
‘निशांकुर', अयोध्या कॉलनी,
राजीव गांधी रिंग रोड, सुर्वेनगरजवळ,
पोस्ट- कळंबा, कोल्हापूर - ४१६ ००७
मो. नं. ९८ ८१ २५ 00 ९३
drsklawate@gmail.com
www.drsunilkumarlawate.in
दुसरी आवृत्ती २०१८
© डॉ. सुनीलकुमार लवटे
प्रकाशक
अक्षर दालन,
२१४१, बी वॉर्ड, मंगळवार पेठ,
कोल्हापूर. फोन : ०२३१-२६४६४२४
email- akshardalan@yahoo.com
मुखपृष्ठ
गौरीश सोनार
अक्षर जुळणी
सौ. शिल्पा पराग कुलकर्णी
मुद्रक
प्रिमिअर प्रिंटर्स, कोल्हापूर
'मूल्य ₹२७५'२७५/-
‘शब्द सोन्याचा पिंपळ' हा माझा साहित्यविषयक लेखसंग्रह होय.तो सन २०१३ मध्ये रावा प्रकाशनाने प्रकाशित केला होता.लगेच दुस-या वर्षी त्याची दुसरी आवृत्ती प्रकाशन राहुल कुलकर्णी यांनी काढली होती.तेव्हा या संग्रहात सन १९८५ ते २०११ पर्यंतचे २५ लेख समाविष्ट होते.आज २०१७ मध्ये हे पुस्तक त्यात लेखांची भर घालून विकसित करण्यात आले आहे.ते सन २०११ नंतर लिहिलेले आहे.ही सुधारित आवृत्ती ‘अक्षर दालन'चे अमेय जोशी प्रकाशात आणत आहेत.या दोन्ही प्रकाशकांचे आभार.
या साच्या लेखनाचा आवाका हा समग्र साहित्यव्यवहार होय.साहित्याच्या अगोदर भाषा निर्माण झाली.भाषेचा प्रारंभ वर्णापासून मानला जातो.वर्ण दोन प्रकारचे असतात - स्वर आणि व्यंजन.स्वर अगोदर निर्माण झाले.त्याचं कारणही सरळ आहे.प्रारंभी माणसाकडे भाषा नव्हती.तो सारा व्यवहार हावभावांनी करायचा. त्याला सूक्ष्म जोड देण्यासाठी तो स्वर वापरू लागला.माणसाचा जीवन व्यवहार व व्यापार वाढला तेव्हा स्वरांपलीकडे जाऊन काही व्यक्त करण्याची आवश्यकता निर्माण झाली.त्या आवश्यकतेतून वस्तूचे आकार,रंग,ध्वनी,स्वरूप यातून प्रतीक निर्माण झाली,ती मनुष्य गुंफेत राहात असतानाच्या काळात पुढे चित्ररूप घेती झाली.भाषा लेखनाची आद्य रूपं म्हणजे गुंफांतील चित्र वा कोरीव लेख,चित्रलिपी असा जो शब्द आहे,त्यातच आपल्या लेखनाचं बीज आहे.स्वर आणि व्यंजनांच्या एकीकरणातून अक्षरं,शब्द बनले.शब्दसमूहांचं वाक्य बनलं.वाक्यांचे परिच्छेद झाले. परिच्छेद समूहातून खंड,अध्याय,प्रकरणांची निर्मिती झाली.त्यांच्या संग्रहांच्या पोथ्या, पुस्तकं, ग्रंथ झाले. असा आपल्या लेखनाचा रंजक विकास, इतिहास आणि प्रवास आहे.
भाषेचे मूलभूत अंग म्हणून बनलेले स्वर, व्यंजन वा वर्ण निरर्थक नाहीत.आपल्या प्रत्येक स्वर व व्यंजनांची निर्मिती व्यावहारिक आवश्यकतेतून झाली असल्याने प्रत्येक वर्गाला अर्थ आहे.‘ख’ म्हणजे आकाश. भूगोलात ‘ख’ स्वस्तिक असतो.'ग' म्हणजे गमन करणे.यांच्या संयोगाने बनलेला शब्द ख + ग = खग. त्याचा अर्थ पक्षी.आकाशात विहरणारा तो पक्षी.असा सर्व शब्द,अक्षरांचा शोध व्युत्पत्तीशास्त्रात घेतला जातो.तसंच लेखनाचंही.पूर्वीचं ‘अ’ अक्षर संक्षिप्त होत होत त्याचं आजचं रूप तयार झालं आहे.लिपीशास्त्रात ‘अ’ स्वर पूर्वी कसा लिहिला जायचा,मध्य काळात कसा लिहीत व आजचं रूप कसं झालं याची साद्यंत माहिती वाचावयास मिळते. म्हणून साहित्य, भाषा, शैली, व्याकरण, छंद,अलंकार, विरामचिन्हे, ताल, संगीत सारं मिळून आपलं जीवन बनतं.म्हणून साहित्य समग्र असतं.
या पुस्तकात शब्द, वाचन, पुस्तक, साहित्य,समीक्षा, लेखक, ग्रंथालय, विचार अशा अंगांचे वैविध्यपूर्ण लेख आहेत. काही ललित लेखही आहेत.उदाहरणार्थ ‘झंप्री' ते काही मनात योजून लिहिले गेले नाहीत. निमित्तानं केलं गेलेलं हे लेखन आहे.पण आज एकत्रपणे पाहताना माझ्या लक्षात आलं आहे की,अजाणतेपणी या सर्वांतून साहित्याचा एक समग्र धांडोळा घेतला गेला आहे.शब्द किती व्यापक ते धन आहे, शस्त्र आहे, शक्ती आहे, विचार आहे,अर्थ आहे... काय नाही शब्दात? म्हणून तर तो जपून वापरायचा.शब्दांचं वजन, अर्थछटा, उच्चार, लय, लकब या सा-यांचं भान ज्या साहित्यिकास असतं तो लेखक, कवी म्हणजे शब्दांचा किमयागार! अल्प शब्दांत महान नि गहन अर्थ, आशय, व्यक्त-अव्यक्त सारं प्रतिबिंबित करायची किमया कवीत असते.आरती प्रभू, सुरेश भट, ग्रेस, विंदा, कुसुमाग्रज या सा-यांची बलस्थानं, ओळख वेगळी का? तर त्यांनी शब्दांचे वेगवेगळे खेळ मांडले.या पुस्तकात ‘अजून मोहविते मधुशाला' शीर्षक लेख आहे.'मधुशाला' हे हिंदीतलं प्रेमकाव्य,हरिवंशराय बच्चन यांनी ते लिहिलं.सन १९८५ ला या काव्याला पन्नास वर्ष झाली.त्याचं सौंदर्य मराठी वाचकांना कळावं म्हणून लिहिलेला हा लेख.बच्चन पूर्वी ‘मधुशाला' गाऊन सादर करायचे.सुरेभ भटांनी पण एकेकाळी आपल्या गझल अशा गाऊन सादर केल्या आहेत. बच्चन यांच्या सादरीकरणाने हिंदी वाचक, श्रोत्यांचा, कवितेवर प्रेम करणा-यांचा एक नवा वर्ग हिंदी साहित्यात तयार झाला.पूर्वी उर्दू मुशायरे व्हायचे.मग हिंदी कवी संमेलनं होऊ लागली.अशा लेखनातून साहित्य स्मृती,इतिहास जपला,जोपासला जातो अशी माझी धारणा आहे.शब्द सोन्याचा पिंपळ होतो तो असा!
वाचन काय आहे? छंद, व्यसन, व्यासंग, परिपाठ, सत्संग, सहवास, नाद, वेड, विचार, क्रिया, हितगुज, संवाद, आत्मलाप काय आहे? नुसत्या या शब्दांतूनही तुम्हास वाचनाच्या व्यापकतेचं भान आल्याशिवाय राहणार नाही.वाचन समाधी असते.साधन असते.शिळोप्याचं साधन असतं.तो विरंगुळा असतो.एकांत सोबत असते वाचन.व्हॉल्ट व्हिटमन म्हणाला होता, 'Who touches the book, touches the heart' जो पुस्तकास स्पर्श करील, त्यात हृदयाला हात घालण्याची क्षमता येईल.वाचकच हृदयस्पर्शी संवाद करू शकतो.प्रसंगी अखंडित वाचित जावे' असं कवी म्हणतो तेव्हा त्याला वचन ही नित्य नि निरंतर क्रिया (कर्मकांड नव्हे!) वाटत असते, हे आपण लक्षात घ्यायला हवं.यावर यातील अनेक लेखांमध्ये विस्तारानं लिहिलं गेलं आहे.
जे वाचनाचं,ते लेखनाचं.‘दिसामाजी काहीतरी लिहावे' शीर्षक लेख वाचाल तर ते स्पष्ट होईल.एकदा का तुम्ही लिह लागलात की,मग तुम्हाला लिहिल्याशिवाय चैनच पडणार नाही.माझे लेखन सुरू झालं ते तारुण्यातील हुरहर,जिज्ञासा,भय इत्यादी अस्वस्थतेतून.मी एकाच काळात कविता लिहिल्या व मनाचं काहूर गद्यातही लिहिलं.लेखन अनेक प्रकारचे होत जातं.कारण आपलं जीवन व्यामिश्र असतं.या संग्रहातले नुसते सर्व लेख पाहिले तरी त्यांचे विषयवैविध्य तुमच्या लक्षात येईल.लेखक गायकासारखा असतो.गायक एक गाणं अनेक चालीत,रागात सादर करतो तसा लेखक आपलं म्हणणं, सांगणं, विचार, कल्पना अनेक परीनं, रूपानं व्यक्त करतो.कहाणी किती रूपांनी व्यक्त होते-कथा,कादंबरी,नाटक,एकांकिका,आत्मकथा, चरित्र, काव्य,महाकाव्य. या संग्रहात अनेक चर्चित साहित्यिक व त्यांच्या साहित्य कृतींबद्दल लिहिलं गेलं आहे.आर्मेनियन (सिरियन) कवी खलील जिब्रानचं महाकाव्य ‘प्रोफेट', मराठीतील पहिलं स्त्री आत्मकथन ‘आमच्या आयुष्यातील काही आठवणी' या साहित्य रचनेला २०१० साली शंभर वर्षे पूर्ण झाली.शंभर वर्षांपूर्वीचं समाजजीवन या आत्मकथेत प्रतिबिंबित आहे.शंभर वर्षांपूर्वी स्त्रियांची स्थिती वाचताना अंगावर काटे उभे राहतात.लेखक आपला अनुभव इतरांना वाटण्यासाठी, देण्यासाठी लिहितो त्याचं हे उदाहरण.एखादी साहित्यकृती तुम्हाला इतकी प्रभावित करते, वेड लावते की ती वारंवार तुम्ही वाचता.वारंवार आरशात पाहण्यासारखं असतं हे.आपण आरशात प्रत्येकवेळी वेगळे दिसतो, असतो, बोलतो.तसं पुस्तकंही प्रत्येक वेळी नवा अर्थ,आशय,दृष्टी,विचार देत राहतात, असा माझा अनुभव आहे.'ज्वाला आणि फुले',‘प्रोफेट’,‘कुरल' ही अशी पुस्तके होत की जी मला रोज नवं देत राहतात.
काही लेखक तुमचं जीवन बदलतात.कबीर,साने गुरुजी, वि.स.खांडेकर,यशपाल,खलील जिब्रान यांनी माझं जीवन बदललं.त्यांच्याबद्दल मी वेळोवेळी भरभरून (प्रसंगी भारावूनही!) लिहिलं,आणि काही केलं आहे. साने गुरुजी, वि.स.खांडेकर यांचे स्मृती संग्रहालय उभारणं,हे मी माझ्या आयुष्यातलं पुढच्या पिढ्यांसाठी केलेलं उतराईचं काम,कृतज्ञता कार्य,ऋणमुक्ती मानतो! एक लेखक जरी तुम्ही आयुष्यभर समग्र समजून घेतला तरी तुमचं जीवन बदलून जातं.वि.स.खांडेकर,साने गुरुजी यांच्या विचार शाळेत मी शिकलो. वि.स.खांडेकर,साने गुरुजी मी समग्र वाचले. वि.स.खांडेकर तर मी किती परीने अनुभवले.त्यांनी मला शिकवलं.मी त्यांची भाषणं ऐकली.मी त्यांच्याशी बोललो, त्याचं साहित्य, संपादन, संशोधन, समीक्षा, अनुवाद, संकलन काय नाही केलं? त्यांच्या स्मृती संग्रहालयाची शिवाजी विद्यापीठातील उभारणी आणि त्यांच्या समग्र अप्रकाशित, असंकलित साहित्याचे संपादन म्हणजे त्या लेखकाप्रती पूर्ण भाव व्यक्त करणं ठरलं... माझ्यापुरतं तरी! यातील काही लेख त्याची प्रचिती देतील.तोच अनुभव साने गुरुजी स्मृती संग्रहालयाच्या साधन संशोधन व संकलनाचा.त्यातील निरीक्षणं या संग्रहातील दोन लेखात 'दैनंदिनी' व 'बारनिशी' मध्ये वाचण्यास मिळतील.यातून ते लेखक, त्यांचं व्यक्तिमत्त्व, विचार,जीवनमूल्ये तुम्हास समजतील.मी छंद म्हणून कधीच लिहिलं नाही.प्रत्येक लेखनामागे ध्येय,उद्देश,मूल्यं होतं.म्हणून मी नेहमी म्हणत असतो की, मी साहित्यिक नाही.कारण मला कल्पनेनं,प्रतिभेनं लिहिता येत नाही. ललित लिहिणं माझा पिंड नाही.जीवनास आकार,उकार,विचार, दृष्टी देणारं लिहिणं म्हणजे साहित्य अशी माझी धारणा आहे.मी कविता,कथा,नाटिका लिहिल्यात.अगदी लावणीही लिहिली.पण ती माझी प्रकृती नव्हे हे निश्चित.तसा मी केवळ लेखक आहे.
यात काही वैचारिक, ऐतिहासिक, समीक्षात्मक लेख आहेत.त्याबद्दल लिहिलंच पाहिजे.कबीर, नारायण सुर्वे हे माझ्या कुळातले किंवा मी त्यांच्या कुळातला.त्यांच्याप्रमाणे मला वंचित आयुष्य लाभलं. त्यांच्या काव्यात वंचितांच्या वेदना जशा आहेत, तशीच पुरोगामी वृत्तीपण. मराठी साहित्याच्या इतिहासात वंचितांच्या व्यथा, वेदनांबद्दल भरपूर लिहिलं गेलं तरी साहित्याच्या इतिहास व समीक्षेत म्हणावी तशी दखल घेतली न गेल्याने 'वंचित साहित्य : उद्गम आणि विकास' हा लेख यात आवर्जून समाविष्ट केला आहे. तो वाचल्यास त्यामागील भूमिका स्पष्ट होईल.
विचाराच्या अंगांनी राजस्थानी साहित्य, सार्वजनिक ग्रंथालये व गांधी विचार विषयक लेखांचे महत्त्व आहे. विचाराशिवाय साहित्याची कल्पनाच करता येणार नाही. साहित्य रंजक हवे तसं प्रबोधकही! आधुनिक काळ हा बहुभाषी समाजाचा आहे. जागतिकीकरणाने माणसाचं बहुभाषी होणं अनिवार्य केलं आहे. भारतापुरतं बोलायचं झालं तर केवळ आपणास मराठी भाषा व साहित्य माहीत असणं पुरेसं नाही. भारतातील विविध भाषांतील साहित्याची जाण असल्याशिवाय आपण भारतीय होणार नाही. अन्यथा आपली ओळख एक महाराष्ट्रीय इतकीच राहील. 'लोकल' तसंच 'ग्लोबल' होणं ही काळाची गरज आहे. राजस्थानचे स्वातंत्र्योत्तर हिंदी साहित्य लेखातून भारत परिचयाचा छोटा प्रयत्न केला गेला आहे. 'सार्वजनिक ग्रंथालये' मराठी संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. शतकोत्तर हिरक महोत्सवी, अमृत महोत्सवी, रौप्य महोत्सवी ग्रंथालये महाराष्ट्रात आहेत. त्यातून या संस्थेचं महत्त्व काळानेच अधोरेखित केलं आहे. पोथ्यांनी सुरू झालेलं ग्रंथालयं आता आभासी (व्हर्म्युअल) जगाचा वेध घेत लेखन, वाचनाचा ‘ई' अवतार धारण करीत आहेत. 'ऑनलाईन रिडिंग' आता सर्रास होतं आहे. पाहणं, ऐकणंही वाचनाचाच एक प्रकार होण्याच्या आजच्या माहिती व संपर्क युगात ग्रंथालयाचा होणारा कायापालट आपण समजून घेतला पाहिजे.
या पुस्तकातला लेख ‘सामाजिक धर्मबुद्धी व गांधी विचार' न वाचता हे पुस्तक तुम्हास मिटता येणार नाही. महात्मा गांधी हे केवळ भारताचेच नव्हे, तर जगाचे मार्गदर्शक, तत्त्वज्ञ, कार्यकर्ते होत. जीवनात संस्कृती आणि विकृती यांचा संघर्ष सुरूच असतो. त्यातून वाट काढत माणसाची जी मूल्याधिष्ठित प्रकृती, वृत्ती, कृती निश्चित होते ती सामाजिक धर्मबुद्धीमुळेच. धर्म हा व्यक्तिगत श्रद्धा व आचरणाचा विषय होय. त्याचं सामाजिक वा सार्वजनिक प्रदर्शन, आचरण करणे म्हणजे सहअस्तित्व करणाच्या अन्य धर्मियांच्या भावनांना एक प्रकारचं आव्हान असतं. म्हणून त्यापलीकडे जाऊन सर्वांना भेदरहित वृत्तीनं, समतेचा व्यवहार सामाजिक
धर्मबुद्धी शिकवत असतो. ती आपण अंगिकारली तर भारतीय समाजातील जात, धर्म, भाषा, प्रांत, वंश, लिंग इत्यादींवर आधारित भेद व विषमता नष्ट होऊन भारत एकसंध व एकात्म देश होईल. एकविसाव्या शतकातील महात्मा गांधींच्या विचारांची प्रस्तुतता समजावणारा हा लेख म्हणजे साहित्य आणि विचारांचं अद्वैत अधोरेखित करणारा आचारधर्म म्हणून पाहता येईल. ‘शब्द सोन्याचा पिंपळ' तेव्हाच होईल, जेव्हा भाषा आणि साहित्य हे माणूस घडणीची विधायक साधनं बनतील.
सुधारित आवृत्तीतील नव्या आठ लेखात विषय वैविध्य व समकालीनता आहे. त्याचा परिचय एका लेखात आहे. आजच्या माहिती व तंत्रज्ञान युगात इंटरनेटच्या माध्यमातून मराठी समृद्ध होत आहे. तिची ओळख करून देण्यात आली आहे. आज माध्यम व मौखिक मराठीवर इंग्रजीचे आक्रमण वाढत आहे. ती इंग्रजीच्या गर्तेत घुसमटत आहे. मराठीत वापर मराठी भाषेस केवळ प्रदूषित करत नसून तो मराठीचा -हास करतो आहे. याबद्दल जागृतीच्या दृष्टीने लिहिलेला लेख वाचकांना अंतर्मुख करेल. भाषा कौशल्याची क्षेत्र नव्या काळात वाढली असून मराठी विकास व वापराची नवी क्षेत्रे व संधी विकसित झाल्याचे भान वाचकांस नवीन लेखांमधून होईल. वाचन व्यवहारांच्या बदलत्या व्यवहार व साधनांचे भान नवे लेख देतील. नवी पिढी वाचत नसल्याने साहित्यिकांची, शिक्षकांची तब्दतच पालकांचीही जबाबदारी वाढत आहे, याचे भान हे पुस्तक देईल असा मला विश्वास वाटतो.
अनुक्रम
२९. | मराठी भाषाकौशल्याची किमया | १७४ |
३०. | जागर वाचनाचा | १७९ |
३१. | संगणकीय तंत्रज्ञान व बदलता वाचन व्यवहार | १८४ |
३२. | चला मुलांसाठी नवा डाव मांडू या | १८७ |
३३. | महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ:कार्य आणि योगदान | १९० |
३४. | झंप्री | १९६ |
३५. | जगणं : ...अगोदर असोशी...नंतर नकोशी | २०१ |