शुभ्र बुधवार व्रत/बुधाच्या भक्तीचे उपाय

<poem> १ चैत्र महिन्यातील शुद्ध अष्टमी किंवा बुधवार अथवा विशाखा नक्षत्राच्या जवळपासचा योग पाहावा. ब्राह्ममुहूर्तावर उठावे. शरीरशुद्धी, अंघोळ वगैरे उरकावी.

श्रीमंगलमूर्ती गणपतीचे पूजन करून ॥ ॐ गं गणपतयेनमः ॥

या मंत्राचा जप (२१ च्या पटीत म्हणजे २१, ४२, ६३, ८४, १०५ करावा ) मग एका कलशाची स्थापना करून त्यावर बुधाची सोन्याची अगर पितळेची प्रतिमा स्थापावी. मग शंखाची व घंटेची पूजा करून शंखातील पाणी सर्व पूजाद्रव्यावर शिंपडून ते शुद्ध करून घ्यावे. मग कलशाचे पूजन करावे आणि पुढील श्लोक म्हणावा. हे ध्यान होय.

चतुर्बाहुं ग्रहपतिं सुप्रसन्नमुखं बुधम ।

ध्यायेत् शंखचक्रासि पाशहस्तम् इलाप्रियम् ॥

मग फुले, वस्त्र, चंदन हे सर्व पिवळ्या रंगाचे वाहावे. धूप, दीप, नैवेद्य, फळ, विडा व दक्षिणा वाहावी. मुगाचे आठ लाडू करून ते विडा-दक्षिणेसुद्धा ब्राह्मणाला द्यावेत. मग बुधस्तोत्राचा पाठ करावा.

अथवा

३. बुधाची जपसंख्या चार हजार आहे. ती सहा बुधवारांत पुरी करावी.

अथवा

४, बुधाचे रत्‍न पन्ना म्हणजे पाचू अंगठीचे ठेवून वापरावे.

अथवा

१) सुवर्णाच्या हत्तीची प्रतिमा तयार करावी.

२) एका चौरंगावर निळे वस्त्र अंथरावे. त्यावर सव्वा पायली मूग पसरावेत. काशाच्या धातूच्या भांड्यात ही हत्तीची प्रतिमा ठेवावी.

३) पाचूचा खडा दुसर्‍या चांदीचा भांड्यात ठेवावा.

४) नवग्रहांची पूजा करावी.

५) बुधाचा जप ब्राह्मणाकडून करावा.

६) उपासना करणाराने रोज दोन वेळा मुगाला तुपाचा हात लावून ते मिश्रण उत्तर दिशेला उधळावे. हे मिश्रण सूर्योदयापूर्वी निदान दहा दिवस तरी उधळावे. म्हणजे बुधग्रह शांत होतो.

विद्याप्राप्तीसाठी

गणपतीचे ११ बुधवार करावेत. यासाठी सकाळीच शुचिर्भूत (शौचमुखमार्जन) होऊन स्नान, देवपूजा करावी. यावेळी गणपतीची पूजा करावी.

१. गणपतीला तांबड्या रंगाच्या जास्वंदीची फुले आणि मंदाराचे फूल प्रिय आहे; तसेच शमी, दूर्वा प्रिय आहेत.

२. गणपतीला शेंदूर आणि रक्तचंदन वाहावे.

३. धुतलेले तांबडे तांदूळ पूजेत वापरावे.

४. पूजा करताना तोंडाने सारखा "ॐ गं गणपतये नमः" हा मंत्र म्हणावा.

५. नैवेद्यासाठी एकवीस माव्याचे, खव्याचे, अगर घरी तयार केलेले मोदक असावेत.

६. उपासकाने पांढरे वस्त्र धारण करावे. पांढर्‍याच वस्तूंचा आहार घ्यावा.

व्रत पूर्ण झाल्यावर ब्राह्मणाला इच्छाभोजन घालून संतुष्ट करावे. असे केल्याने बुधाच्या रूपात श्रीगणपती प्रसन्न होतो आणि विद्येत भरभराट होते.

बजरंगबली हनुमान

बजरंगबली हनुमान मारुती याचेही बुधवार करतात. या योगे संकटाचा नाश होतो. संकटाचा परिहार होतो.

मारुती भूत, प्रेत, समंध व कोणतेही इतर संकट दूर करतो. म्हणून मारुतीच्या नावाने बुधवार करतात.

हे बुधवार अकरा करावेत. यासाठी शरीरशुद्धी करावी, अंघोळ करावी, श्रीमारुतीची (तो ज्याचा भक्त आहे त्या श्रीरामाची) पूजा करावी.

१. ॐ हनुमते नमः ।

हा मंत्र १०८ वेळा म्हणावा. अथवा

२. अंजनी गर्भ संभूतं कपीन्द्रसचिवोत्तम् ।

रामप्रियं नमस्तुभ्यं हनुमन् रक्ष सर्वदा ।

हा मंत्र १०८ वेळा म्हणावा.

अथवा

३. ॐ मर्कटेश महोत्साह सर्वशोक विनाशक ।

शत्रून् संहर मां रक्ष श्रियं दापय मे प्रभो ।

या कोणत्याही मंत्राने आपले कार्य सिद्धीला जाते. संकटाचे निवारण होते.

श्रीरामाची पूजा केल्यावर

आपदामहर्तारं दातारं सर्व संपदाम् ।

लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् ।

हा रामरायाचा मंत्र १०८ वेळा म्हणावा. रामरायाचा सेवक मारुतिराय तुमचे संकट निवारण्यासाठी उडी घालीत तुमच्याकडे येऊन तुमच्या संकटाचा नाश करील.

या मारुतीच्या उपासनेचे बुधवारचे उपवास अळणी न केल्यासही चालतात. सायंकाळी मारुतीची आरती करून उपास सोडावा. तुमची सर्व संकटे व अडचणी दूर होतील.

<poem>

हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.