शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख/शेतकऱ्याचा असूड शतकाचा मुजरा


 
शेतकऱ्याचा असूड
शतकाचा मूजरा

 



 प्रस्तावना


 'शेतकऱ्याचा असूड : शतकाचा मुजरा' या पुस्तकाची पहिली आवृत्ती १७ फेब्रुवारी १९८४ रोजी प्रसिद्ध झाली. शेतकरी संघटनेच्या परभणी अधिवेशनात त्या आवृत्तीचे प्रकाशन झाले. प्रकाशनाच्या दिवशीच पहिली आवृत्ती संपून गेली आणि अगदी संदर्भाकरितासुद्धा एखादी प्रत मिळणे कठीण झाले. मराठी पुस्तकांच्या इतिहासात ही अपूर्वच घटना म्हटली पाहिजे. पुस्तकाची दुसरी आवृत्ती काढावी, निदान पहिल्या आवृत्तीचे पुनर्मुद्रण करावे असे गेली ५ वर्षे सतत वाटत होते; पण संघटनेच्या कामाच्या धबडग्यात हे राहूनच गेले. संघटनेच्या कामाचा झपाटा इतका की नवीन आंदोलन, नवीन कार्यक्रम, त्यासंबंधी नवीन प्रकाशन आणि प्रचारसाहित्य यातच कार्यकर्त्यांची शक्ती अपुरी पडते. एखादी संपलेली आवृत्ती प्रसिद्ध करण्यासारखे काम अर्थातच मागे पडते.

 काही दिवसांपूर्वी 'शेतकऱ्याचा असूड' हे महात्मा जोतीबा फुल्यांचे पुस्तक वेगवेगळ्या विद्यापीठांत अभ्यासक्रमात लावले गेले. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मडळाने 'महात्मा फुले : समग्र वाङमय' हा ग्रंथ प्रसिद्ध केला त्या वेळी 'शेतकऱ्याचा असूड' पुस्तकाची प्रत मोठी दुरापास्त होती. विद्यापीठात पुस्तक लावल्याच्या कारणाने मूळ पुस्तकाच्या हजारो प्रती छापल्या गेल्या आणि त्या विद्यार्थ्यांच्या हाती आल्या ही आनंदाचीच गोष्ट म्हटली पाहिजे; पण त्यामुळे पुस्तक छापण्याला धंदेवाईक स्वरूप आले. पुस्तक छापले म्हणजे त्याला प्रस्तावना लिहिली पाहिजे असे म्हणून काही प्रस्तावना खरडल्या गेल्या. त्याच वेळी प्रस्तुत पुस्तकाची नवीन आवृत्ती विद्यार्थ्यांच्या हाती जाणे आवश्यक झाले.

 'शेतकऱ्याचा असूड'चा व्यापक अर्थ विद्यार्थ्यांच्या आणि इतर अभ्यासूंच्या नजरेस आणून देणे हे आज आणखी एका कारणानेही महत्त्वाचे झाले आहे. मध्यंतरी कोण्या एका विद्वानाने कोण्या एका साप्ताहिकात जोतीबा फुले यांच्यावर टीका करणारा एक लेख लिहिला. या लेखामुळे साहजिकच अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या असाव्यात. महाराष्ट्र राज्य विधानसभेपासून ते गल्लीवाडीतल्या

सभासंमेलनांपर्यंत लेखकाच्या व संपादकाच्या निषेधाचे ठराव झाले. लेखक-संपादकांना चाबकाने मारले पाहिजे इतक्या कडेलोटाची भाषा झाली. जोतीबा फुल्यांच्या बचावासाठी इतके प्रखर संरक्षक उभे राहिले ही गोष्ट काही कमी भाग्याची नाही.

 पण फुल्यांच्या संरक्षणाकरिता सरसावलेल्यांना फुल्यांच्या विचारांची कितपत माहिती होती? किंबहुना, त्यांच्यापैकी कोणी फुले-वाङ्मय नजरेखालून तरी घातले असेल किंवा नाही याबद्दल जबरदस्त शंका आहे. फुल्यांची तरफदारी करणाऱ्यांत अभिनिवेश जास्त आणि अभ्यास कमी; त्यामुळे फुल्यांवर चिखलफेक करणाऱ्या लेखकांना चोख उत्तर देणे हे झालेच नाही. भाषा गुद्द्यांची झाली, मुद्द्यांची नाही.

 म.जोतीबा फुले यांनी 'गुलामगिरी' या पुस्तिकेत हिंदूधर्मग्रंथांत विष्णूच्या दशावताराच्या संदर्भात ज्या काही कथा सांगितल्या आहेत त्यांच्यावर झोड उठविली. अनेक ठिकाणी उपहासाच्या भरात फुल्यांचे व्युत्पत्तिशास्त्रही दोषास्पद राहिले. भाषाही त्या काळात शिष्टसंमत होण्यासारखी राहिली नाही. एवढेच नव्हे तर तर्कशास्त्राचाही फारसा बोज त्यांनी ठेवला नाही. उदाहरणार्थ,

 ".... ब्रह्मयाचे मुख, बाहू, जंघा आणि पाय या चार ठिकाणच्या योनी दूरशा झाल्यामुळे त्यास एकंदर सोळा दिवस सोवळे होऊन बसावे लागले असेल..."

 "....(ब्रह्मयास) रांड्याराघोबा म्हणावें तर, त्याने सरस्वती नांवाच्या कन्येशी व्यभिचार केला व त्यामुळे त्याचे आडनांव बेटीचोद पडले..."

 "....ब्रह्मा मेल्यानंतर आर्य लोकांच्या मूळच्या नांवाचा आपोआप लोप होऊ. त्यांचे नांव ब्राह्मण पडले..."

 "...पुढे त्या विप्रीय शब्दापासून त्यांचे नाव विप्र पडले असावे..."

 "...खंडोबाचे हाताखाली बहुत मल्ल असत, म्हणून त्यास मलूखान म्हणतात..."

 "... त्याने कधी आपल्यास पाठ दाखविलेल्या शत्रूवर वार केला नाही, म्हणून त्याचे नांव मारतोंड पडले होते. ज्याचा अपभ्रंभ मार्तंड हा आहे..."

 "...(मल्हारीने) स्थापिलेला एक प्रसिद्ध मल्हार राग आहे. तो इतका उत्तम आहे, की त्याच्या आश्रयाने मिय्या म्हणून जो मुलसमान लोकांमध्ये प्रसिद्ध गायक होऊन गेला त्यानेसुद्धा दुसरा एक मल्हार केला आहे..."

 "...नारदासारख्या बायकांतील पावली कम आठ भाऊजीने..."

 जोतीबांनी 'चार तोंडांचा ब्रह्मया', 'दहातोंड्या रावण' यांच्या भाकडकथा, वेदोपनिषदांची लुच्चेगिरी यांना फरा ओढत बाहेर काढले.

 जोतीबांच्या काळातही चिपळूणकर आदींनी जोतीबांच्या अशिष्ट भाषेबद्दल,

चुकीच्या व्युत्पत्त्यांबद्दल आणि तर्कहीनतेबद्दल टीकेची झोड उठवली होती. स्वत: जोतीबांना 'गुलामगिरी' ग्रंथातील त्यांच्या या दोषांबद्दल जाणीव नव्हती असे नाही. ब्राह्मणांच्या ग्रंथांनी आजपर्यंत सांगितलेला इतिहास समाजाच्या मानेवर ओझे होऊन बसला होता. हे ओझे उतरविणे हा जोतीबांचा उद्देश होता. जुना इतिहास मोडायचा म्हणजे त्याला पर्यायी इतिहासाची बांधणी आवश्यक आहे. मत्स्य, कूर्म, वराहांच्या कथा मोडून काढण्यासाठी कोणत्या उत्खननातील किंवा कोणत्या ग्रंथातील पुराव्यांचा उपयोग होणार आहे? जोतीबांनी केलेल्या इतिहासाच्या नव्या मांडणीला पुराव्यांचा पक्का आधार नसेल; पण मुळातल्या धर्मग्रंथातील मांडणीला असा कोणता भरभक्कम आधार होता?

 भटांच्या धर्मग्रंथाइतक्या निराधार खल्लड धर्मग्रंथांना उधळून लावण्यासाठी बारकाव्याने साधनांची मांडणी करणे म्हणजे त्या ग्रंथांना वाजवीपेक्षा जास्त महत्त्व देणे झाले असते.

 दशावतारांमधील अवतारांवर जोतीबांनी केलेल्या सर्व टीकेच्या प्रपंचात एक मोठे सत्य तेवत आहे. इतिहास हा जेत्यांनी लिहिलेला असतो. ब्राह्मण समाजाने इतर समाजांवर वर्चस्व मिळविले आणि त्यांनी केलेल्या ग्रंथांत त्यांना सोईस्कर अशी मांडणी केली. पराभूत समाजांची बाजू कोठे मांडली गेली नाही.

 स्वातंत्र्यवीर सावरकरांनी १८५७ सालच्या संग्रामाचा इतिहास लिहिला. हे बंड नव्हते, स्वातंत्र्ययुद्ध होते ही मांडणी करण्याकरिता स्वातंत्र्यवीरांना थोडाफार तरी पुरावा गोळा करता आला. तेवढ्याच आधाराने त्यांनी एक स्वतंत्र इतिहास लिहिला. 'मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह' चा इतिहास तासून पाहणार कसा? त्यातील हास्यास्पद गोष्टींची हेटाळणी करणे यापलीकडे कोणालाही काही जास्त करण्यासारखे नव्हते. याउलट, बळीराजाचा इतिहास जोतीबांनी प्रभावीपणे उभा केला. बळीराजा हा थोर राजा होता, उदार होता. वामनाने केलेला त्याचा वध अन्याय्य होता. या बाबतीत तर अगदी ब्राह्मणग्रंथातसुद्धा पुष्टी मिळते. उदाहरणार्थ,

 बहुधा बळीद्वार क्षणभरीहि सोडितां नये देवा

 न चुकावी छल.. पाप.. प्रायश्चित्तार्थ साधुची सेवा

(संशय रत्नमाला, आर्या क्र. ६)

 शेतकऱ्याच्या घरच्या आयाबहिणी आजही "इडा पीडा टळो, बळीचे राज्य येवो" अशी प्रार्थना करतात, यामागे एक दडपलेला इतिहास आहे. जोतीबांनी शोषित आणि पराभूत समाजाचा पर्यायी इतिहास कसा असू शकेल याची थोडीशी झलक दाखविली, एवढेच.

 आजकाल देवादिकांवर टीका झाली तर त्याचा कोणी फारसा विषाद मानत नाही. रामकृष्णांच्या लीलांचा अभद्र, अश्लील, बीभत्स अर्थ अभ्यासाने किंवा बिनअभ्यासाचा मांडला तरी फारशी आरडाओरड होत नाही; झाली तरी ती मिटवून घेतली जाते. डॉ. आंबेडकरांच्या 'रिडल्स'विषयी झालेला वाद हे असेच एक उदाहरण आहे.

 मध्यंतरी प्रसिद्ध झालेल्या जोतीबांवरील लेखाच्या निमित्ताने माझ्या मनात एक प्रश्न आला, "देवादिकांच्या उत्पत्तीसंबंधी वगैरे जोतीबांनी काही अभद्र लिहिले, त्यावर थोडा वादविवाद झाला आणि तो शमलाही; पण या वादविवादात जोतीबांच्या समर्थनाकरिता उतरलेल्या शूरवीरांनी, जोतीबांनी इतिहासकालीन व्यक्तिविषयी जे काही लिहिले आहे ते वाचूनही त्यांचे समर्थन केले असते का?" उदाहरणार्थ,

 "...मुकुंदराज, ज्ञानेश्वर वगैरे रामदासासारखे अनेक 'पायलीचे पंधरा आणि अधेलीचे सोळा' ब्राह्मण ग्रंथकार होऊन वाया गेले..." हे जोतीबांचे मत त्यांना पटण्यासारखे आहे का? किंवा "... (आद्य) शंकराचार्याने तुर्की लोकांस मराठ्यांत सामील करून घेऊन त्यांजकडून तरवारीच्या जोराने येथील बौद्ध लोकांचा मोड केला..." हे जोतीबांचे विधान त्यांना मान्य होण्यासारखे आहे का? किंवा

 "...हजरत महंमद पैगंबराचे जहांमर्द शिष्य, आर्य भटांचे कृत्रिमि धर्मासहित सोरटी सोमनाथासारख्या मूर्तीचा तरवारीचे प्रहारांनी विध्वंस करून, शूद्र शेतकऱ्यांस आर्यांचे ब्रह्मकपटांतून मुक्त करूं लागले.." किंवा

 "मुसलमान लोकांनी ... (आर्यभटांनी) जुलमाने दासानुदास केलेल्या शूद्रादि अतिशूद्राचे कळपाचे कळप त्यांच्या तावडीतून सोडवून मुलसमान करून... त्या सर्वांबरोबर रोटीबेटी व्यवहार सुरू करून, त्या सर्वांस सर्व कामी बरोबरीचे हक्क दिले..." असे म्हणण्याची हिंमत या समर्थकांत आहे काय?

 शिवाजी हा धर्मभोळा, अज्ञानी शूद्र राजा होता, त्याने देश म्लेंछापासून सोडवून गायीब्राह्मणांचे कसे पालन केले याविषयी हूलथापा देऊन (भट) शूद्र मुलांचे मनांत देशाभिमानाची खोटी तत्त्वे भरवितात हे जोतीबांचे विधान त्यांचे समर्थक म्हणविणाऱ्यांना खरोखर मान्य आहे काय?

 जोतीबा फुले १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाचा उल्लेख "परदेशी भटपांडे, कोकण्या नाना, तात्या टोप्या वगैरे अनेक देशस्थ भटजींनी केलेले थोरले चपाती गूढ बंड," असा करतात. हा विचार मानण्याची धमक आजकालच्या जोतीबासमर्थकांत आहे काय?

 वासुदेव बळवंत फडक्यांच्या कामगिरीचा उल्लेख जोतीबा "हत्यारबंद पोलिसांच्या उरावर दरवडे घालणारा भट फडका", "फडके वगैरे निमकहरामी

बंडखोर ब्राह्मण", "चोर बंडखोर” इत्यादी असा करतात. भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीतील पहिल्या टप्प्याचा जोतीबांनी लावलेला हा अर्थ मान्य करणे त्यांच्या आजच्या समर्थकांना झेपण्यासारखे आणि परवडण्यासारखे आहे काय?

 किंबहुना, राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना हीच मुळात आर्य भटांचा स्वार्थ साधण्याकरिता व इंग्रजांचे राज्यात शूद्रांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार पहिल्यांदा मिळत असल्यामुळे इंग्रजांविषयी द्वेष निर्माण करण्याकरिता केलेली आहे हे जोतीबांचे म्हणणे त्यांचे भक्त म्हणवणारे मानतात काय?

 थोडक्यात, जोतीबांचे नाव मिरवणारे आणि कधीकाळी हुल्लडबाजी करण्याची संधी मिळाली तर त्यांचा उदेउदे करणारे त्यांचे पाठीराखे जोतीबांचा विचार समजून उमजून काही करतात असे नाही. जोतीबांवर हल्ला चढविणारे आणि त्यांचे समर्थन करणारे या दोघांचीही शेतकऱ्यांचे शोषण आणि त्याचा इतिहास या विषयांवरील मते एकसारखीच आहेत आणि विशेष दुःखाची गोष्ट ही, की दोघांचीही मते जोतीबांनी मांडलेल्या विचाराच्या पूर्ण विरोधी आहेत.

 सगळ्याच महात्म्यांचे सगळ्यांत मोठे दुर्दैव म्हणजे त्यांचे शिष्य. पाश्चिमात्य विद्येचा चुटपुटताच संपर्क लाभलेल्या जोतीबांनी तत्त्वज्ञानाचे सर्वोच्च शिक्षण मिळालेल्या मार्क्सपेक्षाही सज्जड असा एक विचार मांडला. जोतीबांच्या विचारातील तेजस्वी सत्यकण कोणते आणि भरणा करण्याकरिता केलेली भरताड कोणती याचा विवेक करून, त्यांचा विचार पुढे मांडणारे शिष्य त्यांना मिळाले असते तर जोतीबांचे नाव आज महाराष्ट्रापुरते किंवा भारतापुरते मर्यादित न राहता जगाच्या थोर विचारवंतांच्या यादीत अग्रक्रमाने तळपले असते. रामदासांच्या शिष्यांनी रामदासांच्या ऐहिक शिकवणुकीचा पराभव केला. महात्मा गांधींचेसारखे शिष्य केवळ 'सूतकाते' राहिले. तसेच जोतीबांचेही शिष्य जोतीबांच्या शिकवणुकीतील जातिसंघर्षाच्या विचाराचा अर्थ समजून न घेता केवळ जातीयवादी द्वेष पसरविणारे निघाले. त्यामुळे जोतीबा म्हणजे आर्य-भटविरोधी, भट ब्रह्मणांचे द्वेष्टे, जातीयवादी अशी एक समजूत रूढ झाली.

 जोतीबा फुल्यांच्या पंक्तीतील द्रष्टे विचारवंत वेगवेगळ्या निमित्ताने, वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या विषयांवर उदंड लिखाण करतात. या सगळ्या लिखाणात विचारांची सुसंगत मांडणी होतेच असे नाही. किंबहुना, सर्वसामान्य माणसांप्रमाणेच या महात्म्यांच्या आयुष्यातही विचारांचा सतत विकास होत असतो. महात्म्यांच्या विचाराला एक सर्वव्यापकता असते आणि काळाची परिमितीही असते. 'हिंदू स्वराज्या'तील गांधी आणि १९४६ सालचे महात्मा गांधी यांच्यात फार प्रचंड अंतर

होते. मार्क्सच्या तर पुस्तकापुस्तकातून त्याच्या विचारात होणारा बदल लक्षात येतो. १९७५ मध्ये सापडलेल्या काही हस्तलिखितांतून आयुष्याच्या शेवटी मार्क्स काही अगदी वेगळाच विचार मांडण्याच्या प्रयत्नाला लागला होता असे दिसते. मग अशा विचारवंतांच्या एकूण विचारपद्धतीचा अर्थ लावण्याची शास्त्रीय पद्धती कोणती? जोतीबांच्या विचारात हिंदू धर्मावरील हल्ला, इतिहासाचे नवे अवलोकन, शिक्षणप्रसाराची चळवळ, सत्यशोधक धर्म, स्त्रीशिक्षण, ब्राह्मण विधवांस मदत असे अनेक पैलू आहेत. या वेगवेगळ्या रत्नांची मांडणी योग्य त्या कोंदणात बसवून करायची कशी?

 यासाठी विचार म्हणजे काय आणि वास्तवाशी त्याचा काय संबंध आहे, याविषयी एक स्पष्ट सैद्धांतिक भूमिका असणे आवश्यक आहे. कोणा एका माणसाचा किंवा समाजाचा विचार बदलला, त्यांना काही नवा विचार सुचला, नवी दिशा आढळली आणि म्हणून त्यांनी सगळा संसार बदलवला असे होत नाही. वास्तविक परिस्थितीत बदल घडवून आणण्याची मनुष्याची आणि मनुष्यसमाजाची सहजप्रवृत्ती आहे. कालच्या पेक्षा आज पोषण अधिक चांगल्या दर्जाचे व्हावे आणि कालच्या पेक्षा आज प्रजोत्पादनाच्या कामातही विविध रंगछटा फुलून याव्यात या दृष्टीने व्यक्ती आणि समाज धडपडत असतात. स्वातंत्र्याच्या कक्षा रुंदावण्याच्या या निसर्गसिद्ध इच्छेने त्यांचा व्यवहार ठरत असतो. त्या व्यवहाराचे समर्थन करण्याकरिता विचार एक सोय म्हणून वापरला जातो. विचाराने वास्तव ठरत नाही, वास्तवाच्या सोयीसोयीने विचार मांडला जातो.

 कोणत्याही एका समाजात कोणत्याही काळी कोणाही एका विषयावरील वेगवेगळी मते असतात; अगदी परस्पर टोकांचे विचार असतात. कोणाचे काय मत असेल हे शंभरात नव्याण्णव वेळा ज्याच्या त्याच्या आर्थिक- सामाजिक हितसंबंधांच्या आधारानेच ठरते. प्रत्येक विचाराचा मूळ गाभा एका आर्थिक- सामाजिक व्यवस्थेचा असतो. त्या व्यवस्थेच्या अनुषंगाने सोयीसोयीने इतिहास मांडला जातो. अगदी भूगोलही बदलला जातो, सोयीसोयीने साहित्य बनते, कलांचा आविष्कार होतो आणि सौंदर्यशास्त्रसुद्धा सोयीसोयीनेच ठरते.

 रस्किन, टॉलस्टॉय, गांधी यांच्या विचारांत उतरणीला लागलेल्या जमीनदार वर्गाच्या आर्थिक घसरगुंडीचे प्रतिबिंब आहे. मार्क्सच्या विचारात उगवत्या कामगारांच्या मनीषांचे चित्र आहे. भांडवलनिर्मितीच्या प्रक्रियेविषयी मार्क्सचा आर्थिक सिद्धांत हा त्याच्या विचारांचा पाया; इतिहासापासून ते पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र इथपर्यंत त्याने केलेले अवगाहन हा त्याच्या विचारांचा व्यापक

आविष्कार आहे. खेड्यांच्या स्वावलंबनावर आधारलेली अर्थव्यवस्था हा गांधीवादाचा पाया आहे. गांधीजींचे सर्व धार्मिक आणि नैतिक तत्त्वज्ञान हा त्या पायाचा परिपोष आहे.

 'शेतकऱ्याचा असूड' व त्यात मांडलेली शेतकऱ्यांच्या शोषणाची कहाणी हा फुले-मताचा पाया आहे. विश्वाच्या उपपत्तीपासून उत्पादक समाजाचे हिंसाचाराने झालेले शोषण हे जोतीबांच्या विचाराचे मध्यवर्ती सूत्र आहे. आजच्या डाव्या विचारवंतांनाही आकलन न झालेले शेतकरी समाजाचे स्पष्ट चित्रण जोतीबांनी अगदी विदारकपणे मांडले. हे सत्य त्यांना प्रत्यक्ष टोचले म्हणून जाणवले. सवर्णांनी केलेले शूद्रांचे शोषण हा विषय मांडायचा तर त्यांना ब्राह्मण ग्रंथातील विश्वाच्या उपपत्तीपासून सर्व कल्पनांवर हल्ला चढविणे भागच होते; इतिहासाचा नवा अर्थ सांगणे आवश्यक होते. सत्यशोधक धर्म हा त्यांच्या प्रतिभेचा विलास होता. शूद्रांचे, स्त्रियांचे शिक्षण हा त्या काळास अनुरूप असा त्यांचा कार्यक्रम होता. भविष्याकडे पाहतांना 'एकमय लोक' या अर्थाने हिंदूस्थान हे एक राष्ट्र नाही याची त्यांना जाणीव होती. 'एकमय लोक' तयार न होता इंग्रज निघून गेले आणि स्वातंत्र्य मिळाले तरी सर्वसामान्य जनतेची परिस्थिती बदलणार नाही; एवढेच नाही तर शूद्रादिअतिशूद्र न्याशनल काँग्रेसात कधीही सभासद होणार नाहीत असेही प्रतिपादन त्यांनी केले.

 जोतीबांचा विचार जातीयवादी नव्हता, आर्थिकच होता; पण जोतीबांच्या काळापर्यंत आर्थिक इतिहासातील महत्त्वाचा घटकच मुळी जाती हा होता. त्यांच्या शिष्यांनी हिणकस तेवढे उचलले.

 आज परिस्थिती अशी आहे, की जोतीबांचे संरक्षण करण्यासाठी उतरलेल्यांनाही जोतीबांचा विचार समजलेला नाही आणि पचलेला नाही. ते समर्थनाला आले ते चुकीच्या अभिनिवेशाने. जोतीबांवर वेडेवाकडे हल्ले करणारे, 'एकमय लोक' प्रत्यक्षात अस्तित्वात आहे असे मानणारे त्यांचे विरोधकही त्याच मताचे. विरोधक आणि संरक्षक यांच्या मूलभूत भूमिकेत फरक तसा काहीच नाही. झुंज लागते ती केवळ अभिनिवेशाने. जोतीबांवरील चर्चा या पातळीला उतरावी हे जोतीबांचे खरे दुर्दैव. प्रस्तुत पुस्तकाची ही दुसरी आवृत्ती निघाल्याने जोतीबांवरील चर्चेला खऱ्या अर्थाने सुरुवात होईल अशी आशा आहे.



 आंबेठाण
शरद जोशी 
 

 दि. १७ फेब्रुवारी १९८९  एक


 खाद्या पुस्तकाची शंभर वर्षे पुरी झाल्याचा समारंभ होणे, उत्सव होणे ही क्वचितच घडणारी गोष्ट. मराठी पुस्तकाच्या बाबतीत तर हा अगदीच दुर्मीळ योग. महात्मा जोतीबा फुल्यांच्या 'शेतकऱ्याचा असूड' या पुस्तकाची शताब्दी महाराष्ट्रभर साजरी झाली, गावोगाव समारंभ झाले. वैजापूरच्या मंडळींनी तर या पुस्तकाची पालखीसकट दिंडी काढली.

 १९७३ मध्ये, दहा वर्षांपूर्वी मार्क्सच्या 'भांडवल' ग्रंथाची शताब्दी झाली. आज महात्मा फुल्यांच्या 'शेतकऱ्याचा असूड' पुस्तिकेला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत आणि त्याचबरोबर शेतकरी संघटनेच्या विचाराची पुस्तके प्रसिद्ध होत आहेत.

 या प्रसंगाच्या निमित्ताने काही प्रश्न साहजिकच मनात उभे राहतात. शेतकरी संघटनेने शेतीविषयी, देशाच्या अर्थकारणाविषयी एक नवा विचार मांडला आहे. शंभर वर्षांपूर्वी याच प्रश्नाचा विचार महात्मा फुल्यांनी केला. या दोन विचारांचे एकमेकांशी काय नाते आहे? हे दोन विचार कितपत जुळतात? फरक काय आहे? तो फरक का?

 या पलीकडे जाऊन आणखी एक विचार सहज येतो. मार्क्स व फुले जवळजवळ समकालीन. एक इतिहासातील द्रष्टा, युरोपात औद्योगिक क्रांतीच्या भर धामधुमीत जन्मला. दुसरा युरोपातील औद्योगिकीकरणाचे वारेही न लागलेल्या, दारिद्र्यात अधिकाअधिक बुडत असणाऱ्या भारतात जन्मलेला. मार्क्सला शिक्षणाचा फायदा भरपूर मिळालेला. बर्लिन विद्यापीठात तत्त्वज्ञानाची सर्वोच्च पदवी मिळविलेली. फुल्यांचे शिक्षण संपल्यावर नऊ वर्षांनी मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली; पण दीनदुबळ्यांच्या प्रत्यक्ष जीवनाशी घनिष्ठ अभ्यासपूर्ण संबंध. मार्क्स व फुले यांच्या विचारांची ही तुलना मोठी उपयोगाची ठरेल.

 'शेतकऱ्याचा असूड' पुस्तकाच्या शतब्दीनिमित्ताने या दोन प्रश्नांविषयी थोडा ऊहापोह करावयाचे ठरविले आहे.


 शेतकऱ्यांचा असूड आणि शेतकरी संघटना

 शेतकऱ्यांच्या परिस्थितीविषयीचे महात्मा फुल्यांनी शंभर वर्षांपूर्वी रेखाटलेले चित्र पाहिले म्हणजे आजही अचंबा वाटतो.

 पूर्वी काही परदेशस्थ व यवनी बादशहा व कित्येक स्वदेशीय राजेरजवाडे या

सर्वांजवळ शूद्र शेतकऱ्यांपैकी लक्षावधी सरदार, मानकरी, शिलेदार, बारगीर, पायदळ, गोलंदाज, माहूत, उंटवाले व अतिशुद्र शेतकऱ्यांपैकी मोद्दार चाकरीस असल्यामुळे लक्षावधी शूद्रादीअतिशूद्र शेतकरी लोकांचे कुटुंबास शेतसारा देण्याची फारशी अडचण पडत नसे. कारण बहुतेक शेतकऱ्यांच्या कुटुंबातील निदान एखाद्या मनुष्यास तर लहानमोठी चाकरी असावयाचीच.'

(महात्मा फुले समग्र वाङ्मय, आवृत्ती १९६९, पृष्ठ क्र. २०३)

 शेतीत स्वत:ची म्हणून सारा भरण्याचीसुद्धा ताकद नाही. याची स्पष्ट जाणीव जोतीबांना होती.

 ...सर्व शेतकऱ्यांमध्ये भाऊहिस्से इतके वाढले, की कित्येकांस आठ-आठ, दहा-दहा पाभरीचे पेऱ्यावर गुजारा करावा लागतो, असा प्रसंग गुजरला आहे व अशा आठ-आठ, दहा-दहा पाभरीचे पेऱ्याकरिता त्यांना एकदोन बैल बाळगण्याची ऐपत नसल्यामुळे ते आपली शेते शेजाऱ्यापाजाऱ्यास अर्धेलीने अथवा खंडाने देऊन, आपली मुले-माणसे बरोबर घेऊन कोठेतरी परगावी मोलमजुरी करून पोट भरण्यास जातात. (पृष्ठ क्र.२०४)

 भाऊहिस्से आता दोनचार पाभरीपर्यंत खाली आले आहेत. एवढीच काय ती शंभर वर्षांत झालेली प्रगती.

 इंग्रजांनी नव्याने तयार केलेल्या जंगलखात्यामुळे 'दीनदुबळ्या पंगू शेतकऱ्यांचे शेरडाकरडास या पृथ्वीचे पाठीवर रानचा वारासुद्धा खाण्यापुरती जागा उरली नाही. त्यांनी आता साही, कोष्टी, सणगर, लोहार, सुतार वगैरे कसबी लोकांच्या कारखान्यांत त्यांचे हाताखाली कामे करून आपली पोटे भरावीत...' (पृष्ठ क्र.२०४)

 तर तेही अशक्य, कारण इंग्रजांचे कारखानदारीला उत्तेजन देऊन गावचे उद्योगधंदे बुडवण्याचे धोरण.

  'इंग्लंडातील कारागीर लोकांनी रुचिरुचीच्या दारू बाटल्या, पाव-बिस्कुटे, हलवे, लोणची, लहानमोठ्या सुया, दाभण, चाकू, कातऱ्या, शिवणाची यंत्रे, भाते, शेगड्या, रंगीबेरंगी बिलोरी सामान, सूत, दोरे, कापड, शाली, हातमोजे, पायमोजे, टोप्या, काठ्या, छत्र्या, पितळ, तांबे, लोखंडी पत्रे, कुलुपे, किल्ल्या, डांबरी कोळसे, तहेतऱ्हेच्या गाड्या, हारनिसे, खोगरे, लगाम शेवटी पायपोस यंत्राद्वारे तेथे तयार करून, येथे आणून स्वस्त विकू लागल्यामुळे, येथील एकंदर सर्व मालास मंदी पडल्याकारणाने येथील कोष्टी, साळी, जुलयी, मोमीन इतके कंगाल झाले आहेत...

(पृष्ठ क्र.२०४)

 खूद्द शेतीची परिस्थिती अशी,... की गरीब शेतकऱ्यांनी, ज्या शेतकऱ्याजवळ

भरपूर शेते असतील, त्याचे हाताखाली मोजमजुरी करून आपला निर्वाह करावा तर एकंदर सर्व ठिकाणी... पाळीपाळीने शेते पडीत टाकण्यापुरती भरपूर शेते शेतकऱ्याजवळ उरलेली नाहीत. तेणे करून शेतास विसावा न मिळता, ती एकंदर सर्सहा नापीक झाली आहेत. त्यांत पूर्वीप्रमाणे पिके देण्यापुरते सत्त्व शिल्लक राहिले नाही. त्यांना आपल्याच कुटुंबाचा निर्वाह करिता करिता नाकी दम येतात. तेव्हा त्यांनी आपल्या गरीब शेतकरी बांधवास मोजमजुरी देऊन पोसावे असे कसे होईल बरे?' (पृष्ठ क्र.२०५)

 कर्ज मिळवून अडचणीतून तात्पुरते दूर व्हावे म्हणावे, तर...

  '... खानदान चालीच्या सभ्य सावकारांनी आपला देवघेवीचा व्यापार बंद केला आहे; तथापि बहुतेक ब्राह्मण व मारवाडी सावकार... अक्षरशून्य शेतकऱ्यांबरोबर देवघेवी करितात. त्या अशा, की प्रथम ते, अडचणीत पडलेल्या शेतकऱ्यास फुटकी कवडी न देता, त्याजपासून लिहून घेतलेल्या कर्जरोख्यावरून...लवाद कोर्टात हुकूमनामे करून घेऊन नंतर व्याजमनुती कापून घेऊन, बाकीच्या रकमा त्यांच्या पदरात टाकतात. या सोवळ्या व अहिंसक सावकारांपासून कुटुंबवत्सल, अज्ञानी भोळ्या शेतकऱ्यांची शेते क्वचित परत मिळतात.'

(पृष्ठ क्र.२११)

 भारताच्या शहरीकरणाला सुरुवात झाली आहे. शहरे, सरकारी यंत्रणा ही भटशाहीच्या संपूर्ण प्रभावाखाली.

  'एकट्या पुणे शहरांतील म्युनिसिपालिटीचे आताचे वार्षिक उत्पन्न सांगली संस्थानचे उत्पन्नाची बरोबरी करू लागले. त्याचप्रमाणे मुंबईतील टोलेजंग म्युनिसिपालिटीच्या उत्पन्नाचे भरीस पंत-सचिवासारखी दहा-बारा संस्थाने घातली तरी तो खड्डा भरून येणे नाही... जिकडे पहावे तिकडे दुतर्फा चिरेबंदी गटारे बांधलेले विस्तीर्ण रस्ते, चहुकडे विलायती खांबावर कंदिलाची रोषणाई, जागोजाग विलायती खापरी व लोखंडी नळांसहित पाण्याच्या तोट्या, मुत्र्या, कचऱ्याच्या गाडी वगैरे सामानांचा थाट जमला आहे.' (पृष्ठ क्र.२२९)

  'शासन आपले सर्व कामगारांस मन मानेल तसे पगार व पेन्शन देण्याचे इराद्याने नाना प्रकारचे नित्य नित्य नवे कर शेतकऱ्यांचे बोडक्यावर बसवून, त्यांचे द्रव्य मोठ्या हिकमतीने गोळा करू लागल्यामतुळे शेतकरी अट्टल कर्जबाजारी झाले आहेत.' (पृष्ठ क्र.२२९)

 सैन्यातील साध्या सोजिराच्या राहणीमानाची शेतकऱ्याच्या हालाखीशी जोतीबांनी केलेली तुलना मुळातच वाचून पहायला पाहिजे.

  'युरोपियन व ब्राह्मण कामगारांस मोठमोठ्या पगाराच्या जागा व पेन्शने देण्यापुरते महामूर द्रव्य असावे याहेतूने, कोरड्या ओल्या कोंड्याभोंड्याच्या भाकरी खाणाऱ्या, रात्रंदिवस शेतीत खपणाऱ्या कष्टाळू शेतकऱ्यांच्या शेतावर दर तीस वर्षांनी पाहिजेल तसे शेतसारे वाढवले.' (पृष्ठ क्र. २२७)

 साऱ्याशिवाय जकाती वाढवल्या, जंगले घशात टाकली, 'कालव्याच्या पाण्याची किंमत अज्ञानी शेतकऱ्यांपासून मनमानेल तशी' घेतली. (पृष्ठ क्र. २२८)शासनाच्या या धोरणाचा परिणाम असा झाला, की

  'कधी कधी शेतकऱ्याने गाडीभर माळवे शहरात विकण्याकरितां आणल्यास त्या सर्व मालाची किंमत बाजारात जास्ती कमी वजनाने घेणारे-देणारे दगेबाज दलालांचे व म्युनिसिपालिटीचे जकातीचे भरीस घालून गाडीभाडे अंगावर भरून, त्यास घरी जाऊन मुलाबाळांपुढे शिमगा करावा लागतो.' (पृष्ठ क्र. २२९)

  'सारांश या सर्व कारणांमुळे शेतकऱ्यांनी लागवडीकडे केलेला खर्चसुद्धा उभा राहणेची मारामार पडते.' (पृष्ठ क्र. २३०)

 दोन

 'शेतकऱ्याचा असूड'चे चौथे प्रकरण प्रत्येक शेतकऱ्याने प्रत्यक्षात वाचलेच पाहिजे इतके सुंदर उतरले आहे. 'शेतकऱ्यांसहित शेतकीची हल्लीची स्थिती' या प्रकरणांत एका शेतकऱ्याच्या गृहस्थितीचे इतके सरस यथार्थ चित्रण आहे, की जोतीबा केवळ दूरदृष्टीचे तत्त्वज्ञानी आणि समाजसुधारक होते, एवढेच नव्हे तर प्रभावी लेखणीचे लेखकही होते हे लक्षात येते. मराठी भाषा किती परिणामकारक रीतीने वापरता येते, तिची शब्दसंपत्ती किती अथांग आहे याची जाणीव वाचकाला होतेच; पण यापलीकडे जोतीबांच्या सर्व लिखाणाची, कार्याची, जीवनाची खरी प्रेरणा आणि तळमळ यांचे उगमस्थान लक्षात येते.

 माझ्या गावातील पाचपंचवीस शेतकऱ्यांना मी हे प्रकरण वाचून दाखविले. आयाबहिणीसुद्धा सहज ऐकायला येऊन बसल्या. लहान पोरे-पोरीसुद्धा आल्या. सगळे प्रकरण वाचून होईपर्यंत कोणी हालले नाही का बोलले नाही. त्यांच्या दररोजच्या वापरातले शब्द पुस्तकात लिहिले गेलेले त्यांनी ऐकलेच नव्हते. पुस्तकांत म्हणजे भटाळलेलीच भाषा असावयाची अशी अनुभवाने खात्री झालेली. हे काय नवल ऐकतो आहे अशा अचंब्याने डोळे विस्फारून ती ऐकत होती. वाचणे

संपल्यावर एक म्हातारी म्हणाली, “आजपावेतो घरात हीच अवस्था आहे बघा."

 जोतीबांनी रेखाटलेले चित्र, 'शेतीत खपणाऱ्या कष्टाळू, अज्ञानी शेतकऱ्यांच्या कंगाल दीनवाण्या स्थितीचे' तर आहेच. (पृष्ठ क्र. २४१) खानदानी संबंधामुळे 'मराठ्याचा डौल घालून शेखी मिरवणाऱ्या एक मजला कौलारू घर आणि आठ बैली जुना गाडा यांचा मालक असलेल्या आणि तरीही कर्जबाजारी, अज्ञानी' कुणब्यांच्या हल्लीच्या वास्तविक स्थितीचा मासला जोतीबांनी पुढे ठेवला आहे (पृष्ठ क्र. २४०)

  'त्याचे घर एक मजला कौलारू आहे. घराचे पुढचे बाजूस घरालगत आढीमेढी टाकून बैल बांधण्याकरिता छपरांचा गोठा केला आहे. त्यांत दोनतीन उठवणीस आलेले बैल रवंथ करीत बसले आहेत व एका बाजूला खंडी सवा खंडीच्या दोन तीन रिकाम्या कणगी कोपऱ्यांत पडल्या आहेत. बाहेर अंगणात उजवे बाजूस एक आठ बैली जुना गाडा उभा केला आहे. त्यावर मोडकळीस आलेल्या तुराठ्यांचा कुरकुल पडला आहे. डावे बाजूला एक मोठा चौरस ओटा करून त्यावर एक तुळशी वृंदावन बांधले आहे व त्यालगत खापरी रांजणाच्या पाणईचा ओटा बांधला आहे. त्यावर पाण्याने भरलेले मातीचे दोनतीन डेरे व घागरी ठेविल्या आहेत; पणईशेजारी तीन बाजूला छाट दिवाली बांधून त्यांचे आत ओबडधोबड फरशा टाकून एक लहानशी न्हाणी केली आहे. तिच्या मोरीवाटे वाहून गेलेल्या पाण्याचे बाहेरचे बाजूस लहानसे डबके सांचले आहे, त्यामध्ये किड्यांची बुजबुच झाली आहे. त्याचे पलीकडे पांढऱ्या चाफ्याखाली, उघडी नागडी सर्व अंगावर पाण्याचे ओघळाचे डाग पडलेले असून; खर्जुली, डोक्यांत खवडे, नाकाखाली शेंबडाच्या नाळी पडून घामट अशा मुलांचा जमाव जमला आहे.' (पृष्ठ क्र. २३५-२३६)

 ...बाहेर परसात एके बाजूस कोंबड्याचे खुराडे केले आहे. त्याशेजारी एकदोन कैकाडी झाप पडले आहेत व दुसरे बाजूस हातपाय धुण्याकरिता, खरकटी मडकी भांडी घासण्याकरिता गडगळ दगड बसवून एक उघडी न्हाणी केली आहे. तिच्या खुल्या दरवाजांनी जागोजाग खरकटे जमा झाल्यामुळे त्यावर माशा धो धो करीत आहेत. पलीकडे डाव्या बाजूला शेणखई केली आहे. त्यात पोरासोरांनी विष्ठा केल्यामुळे हिरव्या माशा भणभण करीत आहेत. (पृष्ठ क्र. २३६)


 शेतकरी पुत्रांची अनास्था

 सुदैवाने शिक्षणाची संधी उपलब्ध झाली, सरकार दरबारी नोकरी मिळाली अशी शेतकऱ्यांची पोरे जोतीबांच्या काळीही होती; पण ती आजच्या सत्ताधारी

शेतकरीपुत्रांसारखीच. त्यापैकी कोणी शेतकऱ्याच्या अवस्थेकडे लक्ष देईल तर हराम! अशा शेतकरीपुत्रांवर जोतीबांनी कडाडून असूड फडकावला आहे.

 कोणी कंत्राटे व कोणी रायटरीची वगैरे नोकऱ्या करून शेवटी, पेनशने घेऊन डौल मारीत असतात. अशा रीतीने पैसा मिळवून इस्टेटी करून ठेवतात; परंतु त्यांच्या पाठीमागे गुलहौशी मुले पोटासाठी दोम दोम करीत फिरतात. (पृष्ठ क्र. १८९-१९०)

 संस्थानिकांनी भटशाहीच्या कारस्थानाला आळा घालावा अशा आशेने बघावे तर ते,

 ब्राह्मण कारभाऱ्यांच्या ओंजळीने पाणी पिऊन दिवसा गोप्रदाने व रात्री प्रजोत्पादन करीत स्वस्थ बसतात. (पृष्ठ क्र. १९०)

 सुशिक्षित कुणब्यांकडे पहावे तर,

 ही शेतकऱ्यांची साडेसात तुटपुंजी विद्वान मुले, आपल्या इतर अज्ञानी शेतकरी बांधवांचा सत्यानाश सरकारी ब्राह्मण कामगार कसा करतात, तो सर्व बाहेर उघडकीस आणून सरकारचे कानावर घालण्याविषयी आपल्या गच्च दातखिळी बसवून, उलटे ब्राह्मणांचे जिवलग शाळूसोबती बनून जातात. (पृष्ठ क्र. २४२)

 एवढेच नव्हे तर

 .. पोटावर पाय देतील, या भयास्तव हे आपल्या मनातून बाह्मण कामगारांचे नाव ऐकल्याबरोबर टपाटपा लेंड्या गाळतात... (पृष्ठ क्र. २४३)


 या भयानक स्थितीचे कारण काय?

 जोतीबांनी शेतकऱ्यांच्या आणि शेतकीच्या स्थितीचे जे वर्णन केले आहे ते वाचताना शंभर वर्षांपूर्वीचे लिखाण वाचतो आहे असे वाटत नाही. अगदी आजच्या परिस्थितीचेच वर्णन एखादा सिद्धहस्त लेखक प्रत्यक्ष करीत आहे असे वाटते.

 १८८३ मध्ये जोतीबांनी केलेले निरीक्षण. १९४० मध्ये साने गुरूजींनी दिलेली हाक-

'रात्रंदिवस तुम्ही करीत असा काम।
जीवनांत तुमच्या उरला नाही राम।
घाम गळे तुमचा हरामाला दाम ।
येवो आता तुम्हां थोडा तरी त्वेष ।
येथून तेथून सारा पेटू दे देश ॥'

 आणि १९८० पासून शेतकरी संघटनेने मांडलेले अर्थशास्त्र यांतील समान सूत्र - 'शेतकऱ्याची दुरवस्था' उघड आहे; पण या परिस्थितीला जबाबदार कोण? या गरिबीचे कारण काय? संघटनेचा विचार आणि जोतीबांचे द्रष्टेपण यांत एकसूत्र आहे की काही फरक आहे? हे समजून घेण्यासाठी जोतीबांनी या परिस्थितीची केलेली कारणमीमांसा बारकाईने समजून घेतली पाहिजे.
 अगदी पहिली गोष्ट म्हणजे 'शेतकरी लोक लग्नकार्य निमित्ताने बेलगामी खर्च करितात म्हणून ते कर्जबाजारी झाले आहेत' या त्या काळीसुद्धा अनेक विद्वानांनी आणि संस्थांनी मांडलेल्या लटक्या कंडीस जोतीबांनी विरोध केला आहे.

(पृष्ठ क्र. २३०, २४४, २४५)

 शेतकऱ्याच्या घरच्या मंगलकार्याचे त्यांनी उभे केलेले चित्र मोठे विदारक आहे.

 ... गावांतील तरूण स्त्रिया वरमाईस बरोबर घेऊन, कांदे चिरून, हळकुंडे फोडून, भाजल्या बाजरीचा बेरूवार, हळद, चिकसा दळून काढतात. त्यामुळे सदरच्या पदार्थांची घाण, रातदिवस काम करणाऱ्या वरमाईच्या हिरव्या रंगाच्या पातळाच्या घाणीमध्ये मिसळून तिच्या सर्व अंगाची इतकी उबट दुर्गंधी चालते, की तिजपासून जवळच्या मनुष्यास फार त्रास होतो. त्याच्या घरापुढे अंगणात लहानसा लग्नमंडप शेवरीच्या मेढी रोवून, त्याजवर आडव्या तिडव्या फोंकाठ्यावर आंब्याचे टहाळे टाकून नांवाला मात्र सावली केलेली असते. ढोलकी अथवा डफड्याचे महार मांगाचे बदसूर वाजंत्र्याची काय ती मौज! नवऱ्या मुलास गडगनेर म्हटले, म्हणजे पितळीमध्ये अर्ध पावशेराच्या भातावर थोडासा गूळ व नखभर तूप घातले की, नवऱ्या मुलीमुलांबरोबर फिरणारी मुले लांडग्यासारखी घासामागे घासाचे लचके मारून एका मिनिटांत पितळी चाटून पुसून मोकळी करितात. लग्नातील भोजन समारंभ रस्त्यावर हमेशा बसावयाकरिता पडदा अंथरल्याशिवाय पंगत पडावयाची. देवकार्याच्या दिवशी सर्वांनी आपापल्या घरून पितळ्या घेऊन आल्यानंतर त्यांमध्ये ज्वारीच्या भाकरी, कण्या अथवा बाजरीच्या घुगऱ्यांबरोबर सागुतीचे बरबट, ज्यामध्ये दर एकाच्या पितळीत एकदा चार अथवा पाच आतडीबरगड्याचे रवे पडले म्हणजे जेवणाराचे भाग्य...
 अशा थाटाची शेतकऱ्यांत लग्ने होत असून, तेथील एकंदर सर्व गैरमहित शहाणे ब्राह्मणांतील विद्वान, आपल्या सभांनी लटक्या मुटक्या कंड्या उठवून कारभारीस सुचवतात, की शेतकरी आपले मुलाबाळाचे लग्नात निरर्थक पैसा खर्च करितात, त्यामुळे ते कर्जबाजारी झाले आहेत.' (पृष्ठ क्र. २४४-२४५)

 जोतीबांच्या लेखणीतून उतरलेल्या या वर्णनाची ताकद ते मुळात वाचूनच

अनुभवयास पाहिजे.

 विद्येविना मति गेली, मतीविना नीति गेली,

 नीतिविना गति गेली, गतीविना वित्त गेले,

 वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले.(पृष्ठ क्र. १८९)

 पण या अविद्येचे काय कारण? अगदी थोडक्यात आणि स्पष्ट उत्तर दिले आहे. भटशाहीची दोन अंगे महत्त्वाची.

 १. बनावट व जुलमी धर्म

 २. सरकारी खात्यांतील ब्राह्मण कामगारांचे प्राबल्य - विशेषतः युरोपियन कामगार ऐषारामी असल्यामुळे.

 याखेरीज वेगवेगळ्या प्रसंगांनी विवेचन करताना जोतीबांनी इतरही काही कारणे घसघसून मांडली आहेत.

 ३. जंगल संपत्तीसंबंधी इंग्रज सरकारचे नवे धोरण.

 ४. कारखानदारी मालाच्या आयातीसंबंधी देशी उद्योग बुडविणारे धोरण

 ५. अपुरी व अनुत्पादक शेती

 ६. डाईजड सरकारी कर, शेतसारा, लोकल फंड, जकात, पाणीपट्टी वगैरे.

 ७. सरकारी उधळपट्टी, कामगारांचे पगार, विलायती व्याजादाखल देणी वगैरे.

 ही कारणमीमांसा शेतकरी संघटनेच्या विचारांच्या संदर्भात तपासावयाची आहे. वेगवेगळ्या दिसणाऱ्या या सगळ्या कारणांचे एक शब्दांत रूप आहे- 'भटशाही'. 'कुणबी' विरुद्ध ‘भटशाही' हे शंभर वर्षांपूर्वी 'भारत' विरूद्ध 'इंडिया' संघर्षाचे स्वरूप होते. मनुष्यजातीचा इतिहास हा शेतीतील गुणाकार लुटण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींचा इतिहास आहे. लूटमार, गुलामगिरी, वेठबिगारी, सामाजिक व धार्मिक रूढी, अपुरी मजुरी, अपुऱ्या किमती हा वेगवेगळ्या पद्धतींचा साद्यंत इतिहास जोतीबांनी मांडला, शंभर वर्षांपूर्वी मांडला. यातच त्यांचे द्रष्टेपण आणि माहात्म्य.


 तीन

 जग बदलावयाचे आहे

 जोतीबा केवळ पंडिती विचारवंत नव्हते. अत्यंत सचोटीचे आणि प्रामाणिक कार्यकर्ते होते. त्या काळच्या अनेक सुधारकांप्रमाणे 'खाणं थोडे मचमच फार' असा त्यांचा कारभार नव्हता. सनातन्यांच्या बहिष्काराला घाबरून शरणचिठ्ठी देणारे

गोपाळराव देशमुख आणि वडिलांच्या मर्जीखातर सख्ख्या बहिणीला वैधव्याच्या खाईत होरपळू देणारे आणि प्रौढ वयात अकरा वर्षाच्या मुलीशी विवाह करणारे माधव गोविंद रानडे यांचा ढोंगीपणा जोतीबांत अजिबात नव्हता. जेथे जेथे अन्याय दिसेल, दु:ख दिसेल तेथे पुढे होऊन कामाला सुरुवात करणे हे त्यांचे ब्रीद. स्त्री-शिक्षण, शूद्रातिशूद्रांचे शिक्षण, सत्यशोधक चळवळ या सर्व कामांत त्यांनी सोसलेला विरोध, छळ, दारिद्र्य, जिवावरचा धोका हे सर्व लक्षात घेतले म्हणजे जोतीबांविषयी आदराने मन भरून जाते. प्रत्यक्ष कामाला जुंपून घेतल्यानंतर कामाच्या धडाक्यात जे दर्शन होईल, ते त्यांचे तत्त्वज्ञान होते.

 आर्य ब्राह्मणांविषयी त्यांच्या मनात विलक्षण घृणा होती; पण त्या ब्राह्मणांतील विधवांची केविलवाणी अवस्था, गर्भपात, भ्रूणहत्या, मृत्यू लक्षात आल्यावर खुद्द पुण्यात ब्राह्मण विधवांना ही अघोर कर्मे करण्याची वेळ येऊ नये म्हणून गुप्तपणे बाळंत होण्याची त्यांनी स्वत:च्या घरी सोय केली. एवढेच नव्हे तर अशाच एका विधवेच्या बाळाची नाळ सावित्रीबाईंनी आपल्या हाताने कापून मुलाला दत्तक घेतले. त्याचे 'यशवंत' नाव ठेवले. त्यांचे विचार पुस्तकी नव्हते. जग समजावून घेणे जितके महत्त्वाचे आहे त्याहीपेक्षा ते बदलणे जास्त महत्त्वाचे आहे. ही समकालीन मार्क्सची उक्ती भारतात जोतीबा प्रत्यक्षात आणत होते. भारतात कृतिशील विचारवंत म्हणून जोतीबांची तुलना फक्त महात्मा गांधींशीच होऊ शकते.


 भारतातील पहिली शास्त्रीय विचारपद्धती

 कृतिशील कार्यकर्त्याचा विचार कामाच्या ओघात आपोआपच स्वच्छ होत जातो. पंडिती लिखापढी करणारा प्रत्येक विषयावर काही जुजबी विचार मांडतो आणि अशा विचारांच्या चिंध्यांची गोधडी बनवतो. वेगवेगळ्या विषयांवरील त्याच्या विचारांत सुसंगती नसते. प्रत्यक्ष रणक्षेत्रात उतरायचे नसल्यामुळे त्याच्या विचारांतील गोंधळ त्याच्या जिवावर बेतण्याची शक्यता नसते. स्वार्थाचे तत्त्वज्ञान शिजवणाऱ्यांच्या विचारांत अशी विसंगती येतेच येते.

 पुण्यातील पंडितवर्गाचे आदरस्थान, मराठी भाषेचे शिवाजी मानले जाणारे विष्णुशास्त्री चिपळूणकर हे अशा विसंगतिपूर्ण विचारांचे मूर्तिमंत उदाहरण म्हणता येईल. जोतीबांनंतर पुऱ्या तेवीस वर्षांनी विष्णुशास्त्री जन्मले. घरच्या व्युत्पन्नतेचा, इंग्रजी शिक्षणाचा मोठाच फायदा मिळालेला, ॲडिसन, जॉन्सनसारख्या पट्टीच्या लेखकांच्या शैलीचा कसून अभ्यास केलेला; तरीही विष्णुशास्त्र्यांच्या विचाराला पद्धत म्हणून नव्हती.

 हिंदूधर्म ही त्यांची विचारांची चौकट. वेदपुराणांतील अगदी बाष्कळ कल्पनांचासुद्धा निषेध नामंजूर. पेशव्यांच्या राजवटीत काही चूक होती, अन्याय झाला हेसुद्धा ते मान्य करायला तयार नाहीत. ब्राह्मणेतरांनी वेद वाचण्याच्या हक्कासाठी भांडू नये; पण ते वंदनीय समजून त्यांतील ब्राह्मण सांगतील तो धर्म पाळावा. या देशाचा इतिहास केवळ उज्ज्वल, अभिमानास्पद. देशाची अवनती झाली ती सामाजिक, राजकीय दोषांमुळे झाली असे नव्हे तर केवळ रहाटगाडग्यांतील गाडगी खालीवर येतात, जातात त्याप्रमाणे 'चक्रनेमिक्रमेण' देश खाली गेला. यथावकाश तो परत उन्नतीस येईल, हा त्यांचा विचार.

 ब्राह्मण हे निसर्गत: श्रेष्ठ असल्याची त्यांची खात्री होती. त्यांची दर्पोक्ती एखाद्या जेत्या सेनापतीला साजेशी आहे.
 आमच्या शूद्र प्रतिपक्षांनी नेहमी लक्षात ठेवावे, की चित्पावन हे चितेपासून जिवंत झालेले असोत किंवा इराणांतून आलेले असोत, त्यांचे नैसर्गिक गुण जे यापूर्वी प्रकट झाले व अद्याप होत आहेत ते छप्पन्न 'गुलामगिऱ्यांनी' व शंभर 'जातिभेदसारांनी'ही लवमात्र कमी होणारे नव्हते. चित्पावनांनी गेल्या शतकांत सारा हिंदूस्थान दणाणून देऊन आपल्या क्षत्रकुलांतक क्षेत्रपतीप्रमाणे दिग्विजय केला व अद्यापही त्यांचे बुद्धिवैभव जसेच्या तसे जागृत आहे. या गोष्टी सर्वजनश्रुत आहेत.(कित्ता पान १०२३)

 एवढा धुत्कार करणाऱ्या ब्राह्मणांबरोबर राष्ट्रातील सकलजनांनी, अगदी शूद्रातिशूद्रांनीसुद्धा परकीय वर्चस्व दूर करण्यासाठी एक व्हावे, झटावे ही तर त्यांची इच्छा होती. यातील विसंगती त्यांच्या ध्यानांतही येत नव्हती. भाषेवर प्रभुत्व; पण ऐतिहासिक, सामाजिक दृष्टीचा पूर्ण अभाव अशी पुण्यातील विद्वानांच्या अग्रणींचीही त्या काळात परिस्थिती होती.

 जोतीबांचे कौतुक हे, की जगाच्या उत्पत्तीपासून ते शेतकऱ्यांच्या दुर्दशेपर्यंतचा त्यांचा विचार हा एकसलग होता. एका धाग्याने विणलेले हे महावस्त्र होते; थातुरमातुर चिंध्यांची गोधडी नव्हती. युरोपीय परिस्थितीत मार्क्स पहिली शास्त्रीय विचारपद्धत उभारीत होता. त्याच वेळी मराठमोळा जोती गोविंद फुले तितक्याच तोलाच्या प्रतिभेने एक संपूर्ण विचारपद्धती मांडत होता. तत्कालीन देशाच्या दुरवस्थेची सुरुवात त्यांच्या दृष्टीने इंग्रजी अमलापासून झालेली नव्हती. हजारो वर्षांचा हा रोग होता. त्या आधीच्या दोन आक्रमणांनीच त्याची सुरुवात झालेली होती.

  'म्हणजे आर्यब्राह्मण व मुसलमान यांपासून प्रजेस (येथे व पुढे प्रजा शब्दाचा अर्थ शूदादिअतिशूद्र लोक समजावा) फारच त्रास उत्पन्न झाला...'

  'त्यांनी आपले अविचाराचे हेतू सिद्धीस जावे म्हणून हातांमध्ये अंमलरूपी अतितीव्र कोरडा घेऊन या देशांतील हस्तगत झालेले दीन प्रजेच्या अंगावर फडाफड उडवीत गेले. त्या वेळेस ते प्रजेस, ज्या हितकारक, सौख्यकारक गोष्टी त्यांजमध्ये सुधारणा न करता तिचा छळ कसा करावा यामध्ये मोठे प्रवीण होते...'

  'प्रजा याचा अर्थ काडी, कस्पट, ढेकूण अथवा काही एक प्रकारची जनावरे समजत असत. त्यांचा उपयोग म्हणजे त्यांनी राजे व त्यांचे जातीय लोकांकरिता, त्यांचे स्त्रियांकरिता व मुलाबाहांकरिता धान्य उत्पन्न कावे व वस्त्रे विणावी, त्यांच्याकरिता उन्हातान्हांत खपावे आणि त्यांस ज्या ऐषारामाच्या गोष्टी लागतात त्या पुरवाव्यात ह्याशिवाय दुसरे काही नाही. (इशारा, पृष्ठ क्र. ३१३-३१४)

  इंग्रजांचे राज्य अशा अवस्थेत संकट म्हणताच येणार नाही. उलट परमेश्वराने कनवाळू होऊन आपले दुःखांनी पीडित अशा शूद्रादि अतिशूद्र प्रजेस परमन्यायी, हितावह, सौख्यकारक, सदाचारी व शांत असे राज्य इंग्रज सरकारच्या अमलाखाली प्राप्त करून दिले. सबब ती त्या प्रभूची फार फार ऋणी आहे...'

(इशारा, पृष्ठ क्र ३१५)


 इंग्रज प्रजेचे शोषण करीत नाहीत असे नाही. भरमसाट कर आकारणी, कारखानदारी मालाची आयात, जंगलविषयक इत्यादी घोरणे देशाला विघातक आहेत हे जोतीबांना पुरेपूर समजले होते. (असूड, पृष्ठ क्र २०४, २०५) पण त्याहीपेक्षा भयानक लूट होती ती भटांच्या सरकारी नोकरीतील प्राबल्यामुळे.

 देशी आणि विदेशी शोषक

 गावोगाव भोळ्याभाबड्या अज्ञानी रयतेला धर्मरूढीच्या नावाखाली भटब्राह्मण लुटतात. सरकारांतही त्याचेच प्राबल्य. इंग्रज अधिकारी ऐषारामी, अज्ञानी, कामात गढलेले. भट कामगार त्यास बनवतात व शेतकऱ्यांना नाडतात. उलट शूद्रांनाच इंग्रज राज्याविरूद्ध उठवण्याचा प्रयत्न करितात.

 जोतीबा स्वातंत्र्याविरुद्ध होते, इंग्रजांच्या बाजूने होते अशी कावकाव खूप झाली; पण जोतीबांचा विचार अगदी स्पष्ट होता.

 इंग्रज लोक आज आहेत उद्या नाहीत. ते आपल्या जन्मास पुरवतील म्हणू कोणाच्याने खास करून सांगवत नाही. यास्तव या लोकांचे राज्य या देशात आहे तोच आपण शूद्रांनी जलदी करून भटांच्या वडिलोपार्जित गुलामगिरीपासून मुक्त व्हावे, यामध्ये मोठा शहाणपणा आहे. (गुलामगिरी, पृष्ठ क्र १३६)

 शूद्रांस भटांच्या दास्यत्वापासून मुक्त होण्याची संधी पुन्हा मिळणे नाही.


(गुलामगिरी, पृष्ठ क्र १३४)

 थोड्या काळानंतर समाजसुधारणेला राजकारणापेक्षा प्राधान्य द्यावे यासाठी गोपाळराव आगरकरांनी जी भूमिका मांडली तीच भूमिका जोतीबांनी समाज- अर्थकारणाला प्राधान्य देणयाविषयी आग्रह धरून मांडली. टिळक व आगरकर दोघेही ब्राह्मण. महाराष्ट्रभर गाजलेला त्यांचा वाद समाजकारण आणि राजकारण यांमधला. सुखवस्तू समाजाच्या या धुरीणांना अर्थकारणाच्या महत्त्वाची जाणीव पुसटच. जोतीबा याबाबत आजच्या कोणत्याही विचावंताइतकेच आधुनिक होते. जातिव्यवस्था,ब्राह्मणेतरांना विद्याबंदी, स्त्रियांची गुलामगिरी हे अन्याय अपघाताने होत नाहीत. जाणीवपूर्वक, समजूनउमजून आर्थिक शोषणाच्या षड्यंत्राचे हे भाग कुशलतेने एकत्र केलेले आहेत हे त्यांनी बरोबर ओळखले आणि पहिला हल्ला चढविला तो धर्मव्यवस्थेवर आणि त्याचे प्रणेते आर्यब्राह्मण यांजवर. शेतकऱ्यांच्या शोषणाकरिता इंग्रजांना वेगळी यंत्रणा उभारावी लागलीच नाही. ब्राह्मणांनी प्रस्थापित केलेल्या व्यवस्थेचे अध्यक्षपद त्यांनी स्वीकारले. त्यांचा वेगळा हिस्सा चालू झाला. शेतकऱ्यांची हलाखी वाढत चालली. शहरांच्या माध्यमांतून इंग्रजांनी खेड्यांचे शोषण केले ही कल्पना महात्मा गांधींनीही पुढे स्पष्ट केली. जोतीबांच्या काळी शेतकऱ्यांच्या दृष्टीने भटशाही हाच मोठा चोर होता. इंग्रज त्या मानाने सोसवणारा चोर. छोट्या चोराच्या आधाराने मोठ्या चोराला उलथवण्याची चतुर रणनीती जोतीबांनी स्वीकारली आणि परंपरागत हिंदूधर्माच्या सर्व अंगांवर कोणाच्या रागालोभाची पर्वा न करता तुफान हल्ला चढवला.


 चार



 वेपुराणांची भंबेरी

 हिंदूधर्मव्यवस्थेविरुद्ध जोतीबांनी आघाडी उघडली. ती नाजूक तीर मारीत नाही. धर्मग्रंथात अस्पृश्यतेला, स्त्रियांच्या दास्यत्वाला आधार नाही... असले पंडिती युक्तिवाद करण्याचा त्यांनी प्रयत्नही केला नाही. वेदोपनिषद, पुराणे, महाभारतासाहित समग्र धर्मव्यवस्थेवर त्यांनी तोफांचा भडिमार सुरू केला. विष्णूच्या दशावतारांची दशा दशा करून टाकली. मासे, कासव, डुक्कर, सिंह, वानर या आकाराच्या देवांची भंबेरी उडवली. 'चार तोंडाचा ब्रह्मा', 'दहातोंड्या रावण' यांच्या भाकडकथा, वेदोपनिषदांची लुच्चेगिरी यांना फरा ओढत बाहेर काढले. मुकुंदराज, ज्ञानेश्वर, रामदासांसारख्या ब्राह्मणांतही मानल्या जणाऱ्या संतांची

संभावना 'पायलीचे पंधरा आणि अधोलीचे सोळा' ब्राह्मणग्रंथकार म्हणून केली. शूद्राच्या गळ्यातील दास्यत्वाच्या पट्ट्याला ज्यांनी बोटसुद्धा लावले नाही, त्यांच्या पोकळ पांडित्याची किंमत जोतीबांच्या हिशेबी शून्य होती.

 ब्राह्मणांच्या ग्रंथांनी आजपर्यंत सांगितलेला इतिहास जोतीबांनी उलटविला. शूद्रांच्या दृष्टिकोनातून इतिहासाची एक नवी मांडणी केली. या मांडणीला असलेला पुराव्यांचा आधार पक्का नसेल; पण भटांच्या धर्मग्रंथाइतक्या निराधार खल्लड ग्रंथांना उधळून लावण्यासाठी बारकाव्याने साधनांची मांडणी करणे म्हणजे त्या ग्रंथांना वाजवीपेक्षा जास्त महत्त्व देणे झाले असते. शेतकऱ्यांच्या इतिहासाची मांडणी करताना 'बळीराजा'ला जोतीबांनी अक्षरश: पुन्हा जीवन दिले. शेतकऱ्यांना एक अभिमानाचे स्थान मिळवून दिले.

 हिंदूधर्माच्या तुलनेने एक निर्मिक व मनुष्यप्राणिमात्रांत समानता मानणाऱ्या ख्रिस्ती धर्माचे तर जोतीबांनी भरभरून कौतुक केलेच; पण हिंदू मनाला झोंबणारी गोष्ट म्हणजे त्यांनी महम्मद आणि त्याच्या समतारूपी धर्माचेही कौतुक केले. अफझलखानासमवेत असलेल्या सय्यद बंडाची बाजीप्रभू देशपांडेच्या व मुरारबाजीच्या बरोबरीने वाहवा केली.

 आर्यदस्यु इस्लामने मुक्त केले । ईशाकडे नेले । सर्व काळ ॥

 आर्यधर्म-भंड इस्लामे फोडिले । ताटात घेतले । भेद नाही ॥

 अशीही घोषणा केली.


 भटब्राह्मणांकडून लूट

 सम्यक् धर्मव्यवस्थेविरुद्ध बंड उभारण्याचे कारण ब्राह्मणांचे सर्वंकष लुटालुटीचे धोरण. शूद्रांना विद्याबंदी करून, त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांना वेळोवेळी भट कसे फसवीत, लुबाडीत याचे महिनावार, सणवार, प्रसंगवार, जन्मापासून दशयपिंडांपर्यंत तपशीलवार वर्णन शेतकऱ्यांच्या असूडाच्या पहिल्या प्रकरणात केले आहे. या धार्मिक लुटीचे प्रमाण किती होते? ब्राह्मण दक्षिणेच्या निमित्ताने काय इतका पैसा उधळीत होते, की ज्यामुळे शेतीतील गुणाकार आटून जावा?

 ११ जुलै १९८४ च्या नेटिव्ह ओपिनियन' या नियतकालिकाचा बातमीदार म्हणतो:

  'खेड्यांतील भटांचा वार्षिक सरासरी फायदा वीस रुपयांपेक्षा क्वचितच जास्त असतो, ही गोष्ट लक्षात घेता शेतकऱ्यांच्या भयंकर दारिद्रयाचे कारण आपण दुसरीकडेच शोधले पाहिजे... शेतकऱ्यांच्या दारिद्रयाची जबाबदारी इंग्रज

भांडवलदार, कुणब्यांना रोजंदारीस बुडविणारी हिंदी रेल्वे आणि शेतकऱ्यांकडून भरमसाट करांची मागणी करणारे सरकार यांच्या माथी मारली पाहिजे.'

 'नेटिव्ह ओपिनियन'च्या अनामिक बातमीदाराने एक व्यापक भूमिका मांडली आहे हे निश्चित; पण या व्यापक भूमिकेची कल्पना जोतीबांना नव्हती असे नाही. या इतर कारणांविषयी त्यांनी तपशीलवार लिहिलेही आहे; पण धार्मिक विधीकरिता होणाऱ्या लुटीचे प्रमाण उपेक्षणीय मुळीच नव्हते. त्याकडे दुर्लक्ष करणे हेही योग्य झाले नसते.

 खेड्यातील भटांचा वार्षिक फायदा त्या काळी केवळ वीसच रुपये होता ही माहिती खरी धरली, तरीसुद्धा ही रक्कम काही अगदीच क्षुद्र नाही. 'इशारा' पुस्तिकेत दुष्काळाच्या काळात बी-बियाण्यासाठी शेतकरी किती रुपयांचे कर्ज घेतो असे दाखविले आहे, माहीत आहे? दहाबारा रूपयांचे. एका शेतकऱ्याच्यास बी-बियाण्याच्या रकमेच्या दुप्पट भटाचा फायदा होता हीही काही क्षुल्लक गोष्ट नाही (समग्र वाङमय, पृष्ठ क्र ३१९-३२१). याच रकमेपोटी शेतकऱ्यावर जप्ती येऊन तो देशोधडीस लागतो किंवा प्राणत्याग करण्यास सिद्ध होतो. जोतीबांचे वडील गोविंदराव शेळ्या राखण्याचे काम करीत. तेव्हा त्यांचा रोज एक पै होता, म्हणजे वर्षाला २ रुपयेसुद्धा नव्हता. तेव्हा त्या काळात २० रु. ही रक्कम मामुली नव्हती.

 या पलीकडे जाऊन भटभिक्षुकांचे वास्तविक उत्पन्न खरोखरीच २० रुपयांइतके मर्यादित होते काय याचा विचार व्हावयास पाहिजे. प्रजेकडून मिळणाऱ्या दक्षिणा नेहमीच इतक्या किरकोळ असत असे जोतीबांच्या लिखाणातील संदर्भावरून तरी दिसत नाही. 'इशारा' पुस्तिकेच्या उपोद्घातात जोतीबांनी उल्लेख केला आहे,

  ....यांचे आर्यभट बंधू आम्हा शूद्र शेतकऱ्यांचे निढळाचे श्रमाची वीस वीस रूपयांची गोप्रदाने दररोज घेऊन नायकिणीच्या भरीस घालतात. (पृ. ३१२)

 यांना खाजगी दक्षिणांव्यतिरिक्त सार्वजनिक संस्था व सरकारी पीठे यांच्याकडून, मोठ्या प्रमाणावर प्राप्ती होत असली पाहिजे हे उघड आहे. जोतीबा म्हणतात :

  '(भट राजांनी) आपले जातीचे भट लोकांकरिता जागोजागी देवाची संस्थाने स्थापन करून तेथे त्याजकरिता अन्नछत्रे घातली. प्रजेकडून पैसा वसूल झाला, की लागलीच ब्राह्मण भोजन प्रीत्यर्थ अमुक संस्थानाकडे दोन लक्ष रुपये, अमुक संस्थानाकडे पन्नास हजार रुपये येणेप्रमाणे ठराव करून पैसा वाटून घ्यावा आणि दररोज पर्वतीसारख्या संस्थानावर आज काय, फक्त ब्राह्मणांस तूपपोळीचे जेवण व वर दहा दहा रुपये दक्षणा, आज काय लाडूचे जेवण व वर वीस वीस रुपये दक्षणा, आज ब्राह्मणांस केशरी भाताचे जेवण व वर ओगराळे भरून रुपये प्रत्येकास दक्षणा.

याशिवय कित्येक ब्राह्मणांस शालजोड्या, कित्येकांस पागोटी, कित्येकांस धोतरजोड्या, कित्येकांस यथासांग वर्षासन देण्याच्या नेमणुका, अशा रीतीने दररोज ब्राह्मणांस यथेच्छ भोजन घालून वर रगड दक्षिणा देण्यांत व बक्षिसे देण्यांत प्रजेस अति दुःख होऊन वसूल केलेल्या पैशाची नासाडी करून टाकली होती.

(इशारा, पान ३१६)

 खेड्यातील भटांना फायदा केवळ वीसच रुपये मिळत असेल, चंगळ शहरातील ब्राह्मणांचीच होती असे धरले तरी त्याबरोबर हेही लक्षात घेतले पाहिजे, की खेड्यातील भटाला वीस रुपये दक्षिणा मिळण्यासाठी शेतकऱ्यांना शेकडो रुपयांचा अनावश्यक खर्च करावा लागत असला पाहिजे. धार्मिक विधींसाठी लागणारी सामग्री, तांदूळ, गहू, खोबरे, खारका, हळकुंड, हळदकुंकू, पान, सुपारी, नारळ, दही, दूध, तूप, तेल, लाह्या, बत्तासे, दुर्वा, फुले, पत्री, रवा, केळी, फळ-फळावळ, साखर काही बिनघामाची येत नाहीत. त्यातील काही वस्तू घरात तयार होत असल्या तरी इतर बाहेरूनच आणाव्या लागतात. वर वेगवेगळ्या प्रसंगाने धोतर, शालजोड्या, लुगडी, पावसाळा असल्यास छत्र्या, हिवाळा असल्यास पांढऱ्याधाबळ्या, उन्हाळा असल्यास पंखे, पायातील जोडे, पागोटी, तांबेपितळ्या, काठ्या, गाद्या, भाजीपाला अशी अनेक दाने द्यावी लागत. याखेरीज प्रत्येक धार्मिक विधीनिमित्ताने छोटा का होईना भोजन समारंभ-निदान तूपपोळ्यांचा तर होणारच. खेड्यांतील भटांचा फायदा वीसच रुपये होता असे गृहीत धरले तरी शेतकऱ्याचा धार्मिक खाती खर्च बराच मोठा असला पाहिजे आणि आधीच अस्मानी सुलतानीने जर्जर झालेल्या शेतकऱ्यास, व्रणावर चोच घालणाऱ्या या कावळ्यांचा उपद्रव जाणवणार असलाच पाहिजे.

 यात गावोगावचे भिक्षुक काही बळजबरी करीत होते असे नाही. त्यांची भूमिका 'नि:संग दांडग्या भिकाऱ्याची- प्रतिष्ठित भीक मागत फिरण्याची' होती हे जोतीबांनीही मानले आहे; पण समाजातील ब्राह्मणांची भूदेवाची प्रतिष्ठा, शेतकऱ्यांची हवालदिल स्थिती आणि अज्ञान पाहता या भीक मागण्यातही एक प्रचंड जबरदस्ती होती.धर्मव्यवस्थेने अज्ञान लादले. ब्राह्मणांनी भूदेवपद स्वत:कडे घेतले. पाऊस, नक्षत्रे, आजारपण, जन्ममृत्यू सर्वांवर आपला अधिकार सांगितला. वेदांतील तिसरा भाग पावसासंबंधीच. 'यज्ञात् भवति पर्जन्यः' व्यवस्थेचा शेतकऱ्यांना धाक असणे साहजिकच.

 पण धर्ममिषाने दक्षिणेची भीक मागणाऱ्या भिक्षुकांचं फळ पै शिवराईची दक्षिणा नव्हती. जागोजाग वेळोवेळी मिळेल तेथे टोचलेला हा शेतकरी कर्जात सापडेल

आणि सरकारी यंत्रणेतील ब्राह्मण कामगारांच्या प्रभुत्वाचा यथायोग्य फायदा उठवून, सर्व जमीनच गिळंकृत करता येईल एवढी या भिकेची झेप होती. आज यजमानापुढे विनम्र असलेला पुरोहित भटजी उद्या त्यांच्यापुढे सावकार आणि परवा जमीनदार म्हणून येईल. बळीराजापासून भीक मागून तीन पावले मागून घ्यायची आणि शेवटी त्यालाच गाडून टाकायचे याच इतिहासाचा हा हर खेड्यात दरवर्षी होणारा प्रयोग होता.


 पाच


 सरकार पुन्हा आर्यभटांचेच

 भट कामगारांचे सरकारी खात्यातील प्राबल्य हे शेतकऱ्यांच्या दुर्दशेचे दुसरे महत्त्वाचे कारण जोतीबांनी दिले. 'शेतकऱ्याच्या असूडा'तील दुसरे प्रकरण या विषयाकरिता दिलेले आहे.

  'सरकारी गोरे अधिकारी हे बहुतकरून ऐषारामांत गुंग असल्याने त्यांना शेतकऱ्यांचे वास्तविक स्थितीबद्दल माहिती करून घेण्यापुरती सवड होत नाही व या त्यांच्या गाफीलपणामुळे एकंदर सर्व सरकारी खात्यांत ब्राह्मण कामगारांचे प्राबल्य असते.' (पृष्ठ क्र. २०३)

 पण हे प्राबल्य केवढे खोलवर रुजजेले आहे! शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन, ते अगदी न्याशाधीशाच्या किंवा कलेक्टरच्या समोरील कामांचीही कशी फिरवाफिरव करून शेतकऱ्यास नाडतात; कुलकर्ण्यापासून ते मामलेदारापर्यंत, बांधकाम खात्यापासून ते पाणीपुरवठा खात्यापर्यंत सर्व विभाग त्यांनी कसे व्यापले आहेत यावे वर्णन 'गुलामगिरी'त अधिक विस्ताराने केलेले आहे.

  'ज्या शूद्रांस वाचता आणि लिहिता येत नाही, अशांस कित्येक कुलकर्णी गांठून त्यांचे आपण सावकार होऊन त्यांपासून जेव्हा गहाणखते वगैरे दस्तऐवज लिहून घेतात त्यावेळी ते आपल्या जातीचे लेख लिहून मिलाफी करून त्यांत एक तऱ्हेच्या शर्ती लिहून आणि त्या अज्ञानी शूद्रांस भलतेच काहीतरी वाचून दाखवून त्यांचे हात लेखणीस लावून खते पुरी करून पुढे काही दिवसांनी या कपटाने लिहिलेल्या शर्तीप्रमाणे त्यांची वतने घशांत टाकून ढेकर देत नसतील काय?' (पृष्ठ क्र. १२९)

  '...एकाद्या लंगोटी बहाद्दराने छातीचा कोट करून एखाद्या बुटलेराच्या मदतीने युरोपीय कलेक्टरांस एकांतात गाठून त्याच्यासमोर उभे राहून "माझी दाद लागत

नाही' इतके चार शब्द बोलल्याची या कलमकसायांस बातमी लागली, की पुढे मग त्या दुर्दैव्याचे नशीबच फुटले म्हणून समजले पाहिजे. कारण ते कलेक्टरच्या कचेरीतील आपल्या जातीच्या भट चिटणिसांपासून तो रेव्हिन्यूच्या अथवा जज्जाच्या सर्व भट कामगारांपावेतो आतल्या आंत यवनी गायत्रीची वर्दी फिरवून त्याच्या तंट्यात इतका गोंधळ करून टाकतात की यांत सत्य काय आणि असत्य काय हे निवडून काढण्याकरिता मोठमोठे विद्वान युरोपीय कलेक्टर आपली सर्व अक्कल खर्च करितात, तथापि त्यांस त्यांतील कधी कधी काडीमात्र गुह्य न कळता ते उलटे गाहाणे केलेल्या लंगोट्यांसच 'तू मोठा तरकटी आहेस' असे सांगून त्याच्या हातात नारळाची आई देऊन त्यांस शिमगा करण्याकरिता त्याचे घरी पाठवत नसतील काय?'

(पृष्ठ क्र. १३०)

 एखादा जज भट शिरस्तेदार चूप बसवून प्रत्यक्ष कागद वाचून पाहणारा निघाला तरी

  '... त्या कागदाला तो काय करील बापुडा! कारण पूर्वीच्या एकंदर सर्व कलेक्टर कचेरीतील भटांनी, कुळकर्त्यांच्या सूचनेप्रमाणे... सर्व खटल्याचे स्वरूपच बदलून टाकले होते.' (पृष्ठ क्र. १३२)

 राजे इंग्रज; पण राज्य जुने भटशाहीचेच अशी ही स्थिती.


 शोषणाला विरोध हा जातीयवाद नव्हे

 या धर्मव्यवस्थेचा हेतू आर्थिक शोषण हाच होता हे जोतीबांनी उजेडात आणले. साहजिकच त्यांच्यावर जातीयवादाचा, अगदी राष्ट्रद्रोहाचासुद्धा आरोप केला गेला. कुणाकडून? तर ज्यांनी देशातील बहुसंख्य शूद्रांना लुटून खाण्याचे काम हजारो वर्षे चालवले त्यांजकडून. शेतकरी संघटनेला केवळ शेतकरी संघटनेचे हित न पाहता सर्व समाजाचेही हित लक्षात घेण्याचा उपदेश करण्यात येतो त्यातलाच हा प्रकार.

 'घाण करणारा लाजला नाही तरी पाहणाराने लाजावे' या न्यायाने जोतीबांनी जातीय भूमिका घ्यावयास नको होती असे मोठा मानभावीपणे सांगितले जाते. जोतीबा हे कुणाच्या हेव्यादाव्याची क्षुद्र बुद्धी ठेवणारे लटपटे संधिसाधू नव्हते; त्या काळच्या परिस्थितीत ही भूमिका घेणे त्यांना अपरिहार्य वाटले. महाराष्ट्रात उत्तर पेशवाईच्या अनागोंदी, अत्याचारी, क्रूर, मूर्ख राजवटीची पार्श्वभूमी जोतीबांची भूमिका लक्षात येण्यासाठी समजून घेतली पाहिजे.

 'शेतकऱ्यांना नि शेतीवर राबणाऱ्या कामकऱ्यांना पेशव्यांचे अधिकारी व त्याचा दत्तक भाऊ अमृतराव हे छळून हैराण करीत असत. त्यांनी मागितलेली रक्कम

शेतकऱ्यांना देता आली नाही तर तो चांडाळ अमृतराव त्यांच्या मुलांच्या अंगावर उकळत्या कढईतील तेल ओती, तवे तापवून शेतकऱ्यांना त्यावर उभे करी. त्यांना तक्त्यांत पिळीत. शेतकऱ्यांच्या पाठीवर अमानुषपणे मोठमोठाले दगड ठेवण्यात येत. त्यांना ओणवे करून त्यांच्या नाकाखाली मिरचीचा धूर देण्यात येई. त्यांच्या कानांत व बेंबीत बंदुकीची दारू घालवून उडवीत.'

 'सावकार रीतसर दस्तऐवज करून घेऊन ऋणकोच्या मुलांना नि मुलींनाही गहाण लावून घेत... शेतकऱ्यांची मालमत्ता ते केव्हाही गहाण लावून घेत...शेतकऱ्यांची मालमत्ता ते केव्हाही ताब्यात घेत, त्यांच्या डोकीवर वा छातीवर धोंडा ठेवून किंवा त्यांना ओणवे करून पैसे वसूल करीत. क्षुल्लक रकमेसाठी त्यांच्या गुराढोरांचा लिलाव करीत, शेती जप्त करीत, त्यांना विहिरीस मुकवीत.' (महात्मा जोतीराव फुले- धनंजय कीर- पृष्ठ क्र. ४-५)
 एखादेवेळेस कोणी शूद्र नदीकाठावर आपली वस्त्रे धूत असता त्या स्थळी जर एखादा भट आला तर त्या शूद्रास आपली सर्व वस्त्रे गोळा करून, बऱ्याच दूर अंतरावर, जेथून भटाच्या अंगावर पाण्याचा शिंतोडा येण्याचा संभव नसेल अशा स्थळी जाऊन आपली वस्त्रे धुवावी लागत असे. तेथून जर भटाच्या अंगावर पाण्याचा शिंतोडा आला, अथवा आला असा खोटा भास झाला तर त्या भटाने अग्नीसारखे रागाने तप्त होऊन जवळचे भांडे त्याचे मस्तक रोखून मोठ्या त्वेषाने मारावे. त्याजमुळे त्याचे मस्तक रक्तबोंबाळ होउन मूर्च्छित होत्साता जमिनीवर धाडकन् पडावे. पुढे काही वेळाने शुद्धीवर येऊन आपली रक्ताने भरलेली वस्त्रे घेऊन निमूटपणे घरी जावे. सरकारास जर कळवावे तर भटशाही पडली. उलटी त्यासच सजा देणार.

  'भटराज्यांत त्यांस व्यापाराच्या अथवा दुसऱ्या गोष्टीच्या संबंधाने फिरणे झाल्यास मारामारी मोठी पडत असे. त्यांतून प्रात:काळी तर फारच अडचण पडे? कारण त्या वेळेस सर्व वस्तूंची छाया लांब पडते आणि अशा प्रसंगी जर कदाचित कोणी शुद्र रस्त्याने जात असता समोरचे रस्त्याने भटसाहेबांची स्वारी येत आहे हे पाहून त्यांच्या अंगावर आपली छाया न पडावी या भीतीस्तव घडी दोन घडी आपला खोळंबा करून रस्त्याचे एका बाजूस होऊन त्यास बसावे लागे... एकादे वेळेस याची छाया भटाचे अंगावर चुकून पडली तर तो भट लागीच त्यास मरेमरेतो मारी आणि ताबडतोब नदीवर जाऊन स्नान करी. त्यापैकी कित्येक लोकांस रस्त्यांत थुकण्याचीही पंचाईत. याजकरिता त्यांस भटवस्तीतून जाणे झाल्यास आपल्याबरोबर धुंकण्याकरिता एकादे भांडे ठेवावे लागत असे. जर त्याचा थुका पडून भट साहेबाने पाहिले म्हणजे त्या मनुष्याने समजावे की आतां आपले पुरे आयुष्य भरले.'

(गुलामगिरी, पृष्ठ क्र. १२९)
 रस्त्यावर उठलेली पावले पुसली जावीत म्हणून कमरेस झाडाची एक फांदी बांधावी लागे. सर्वसामान्य शूद्रांच्या भावना जोतीबांच्या शाळेत तीन वर्षे शिकलेल्या एका विद्यार्थिनीच्या निबंधात फार चांगल्या तऱ्हेने दिसतात.

  'इमारतीच्या पायांत आम्हास तेलशेंदूर पाजून पुरण्याचा व आमचा निर्वंश करण्याचा क्रम चालविला होता. त्या समयी महार व मांग यांतून कोणी तालीमखान्यावरून गेला असतां गुलटेकडीच्या मैदानांत त्याच्या शिराचा चेंडू व तलवारीचा दांडू करून खेळत होते. अशी जर मोठ्या सोवळ्या राजाच्या दारावरून जाण्याची बंदी, तर विद्या शिकण्याची मोकळीक कोठून मिळणार? कदाचित कोणास वाचता आले आणि ते जर बाजीरावांस कळले तर तो म्हणे, की हे महारमांग वाचतात तर ब्राह्मणांनी कां त्यांस दप्तराचे काम देऊन त्यांच्याऐवजी धोकट्या बगलेत मारून हजामती करीत फिरावे की काय? असे बोलून तो त्यांस शिक्षा करी.. हा जूलूम विस्ताराने लिहू लागले तर मला रडू येते.'

 पेशवाई संपली, आता इंग्रजांच्या समतावादी, न्यायी राज्याचे फायदे काही हाती पडतील अशा आशेने शूद्र पाहत असता त्यांच्या लक्षात आले की,

 'शूद्रांवर ब्राह्मणांचा कारभार आणि ब्राह्मणांवर इंग्रजांचा कारभार असे या नवीन राज्याचे स्वरूप आहे.' (धनंजर कीर, पृष्ठ क्र. २११)


 सहा


 हे एक राष्ट्रच नव्हे

 शतकानुशतके चालत आलेल्या आर्यभटांच्या अन्यायाचे परिमार्जन इंग्रजांच्या राज्यातही होत नाही. शेतकरी जेथल्या तेथे राहतो आहे. त्याची परिस्थिती उलटी खालावत आहे. याउलट ब्राह्मण अज्ञानी लोकांच्या मनात इंग्रजी राज्याचा द्वेष भरवून जागोजाग मोठमोठी बंडे उपस्थित करीत आहेत. उमाजी रामोशाचे बंड, वासुदेव फडक्याचे बंड, १८५७ ची बंडाळी ही पाहता आपली इतिहासजमा झालेली धार्मिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक सत्ता पुन्हा मिळवण्याच्या प्रयत्नास ब्राह्मण लागले आहेत. अनेक शूद्रही त्यांत सामील होत आहत हे पाहून जोतीबांना चिंता वाटू लागली. इंग्रजी राज्य तर काय कायमचे राहणारे नाही; पण इंग्रज गेल्यांनतर सत्ता कोणाच्या हाती जाणार?

  'परकी सुराज्य हे स्वराज्याची बरोबरी करू शकणार नाही, त्याला त्याची सर येणार नाही ह्या तत्त्वावर जोतीरावांचा विश्वास नव्हता असे म्हणणे योग्य होणार नाही. त्याचा अर्थ एवढाच करावयाचा, की त्यांच्या मते सामाजिक प्रगतीला नि क्रांतीला प्रतिकूल ठरलेल्या ब्राह्मणी राज्यापेक्षा इंग्रज राज्य परवडले. नानासाहेब पेशवे यशस्वी झाले असते तर ब्राह्मणाचे जातिश्रेष्ठत्व मानणारे, अन्यायी नि प्रतिगामी ब्राह्मणी राज्य पुन्हा महाराष्ट्रांत आले असते अशी त्यांना भीती वाटत होती.' (धनंजर कीर, पृष्ठ क्र. ९१)

 इंग्रजी राज्य हे परमेश्वराचे या देशास अतर्क्य वरदान आहे असे स्पष्टपणे बजावणाऱ्या नामदार गोपाळ कृष्ण गोखल्यांपेक्षा त्यांची भूमिका वेगळी नव्हती. मोहनदास करमचंद गांधी दक्षिण आफ्रिकेत इंग्रजांच्या स्वामी निष्ठेचीच भूमिका घेत होते.

 जोतीबांचा विचार अधिक स्पष्ट होता : 'आर्यांच्या खोडसाळ मतलबी धर्मांवरून धूर्त आर्यभट ब्राह्मण अज्ञानी शूद्रास तुच्छ मानिनात. अज्ञानी शूद्र, अज्ञानी म्हारांस नीच मानितात. त्यातून अतिसोवळे पूर्व आर्यभट ब्राह्मण शूद्रादि-अतिशूद्रांस नीच मानून आपण तर नाहीच; परंतु त्या सर्वांमध्ये आपापसात रोटी व्यवहार व बेटी व्यवहार होऊ देण्याविषयी प्रतिबंध केल्यामुळे अर्थातच त्या सर्वांमधले भिन्नभिन्न प्रकारचे आचारविचार, खाणेपिणे, रीतिभाती,एकमेकांच्या एकमेकांशी मिळत नाहीत. अशा अठरा धान्यांची डाळी होऊन त्याचे चरचरीत कोडबुळे म्हणजे एकमय लोक 'nation' कसे होऊ शकेल? (सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक, पृष्ठ क्र. ४६०)

 जोतीबांची राष्ट्र ही संकल्पना विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्यापेक्षा वेगळी आहे. राष्ट्र म्हणजे भौगोलिक प्रदेश, वेगवेगळी स्थळे, भाषा, परंपरा, जुन्या रूढी आणि प्रसिद्ध व्यक्तींचा इतिहास नव्हे. राष्ट्र म्हणजे सामाजिक, राजकीय, आर्थिकदृष्ट्या एकमय झालेले लोक. न्यायमूर्ति रानड्यांच्या शब्दांत :

  'तुमच्या राजकीय हक्काच्याबाबतीत जर तुमची अधोगती झालेली असेल तर तुमची समाजपद्धती चांगली असणे शक्य नाही. तुमची समाजपद्धती विवेक व न्याय ह्यांवर अधिष्ठित नसेल तर तुम्ही राजकीय अधिकार व वैयक्तिक हक्क यांचा उपभोग घेण्यास लायक ठरणार नाही. तुमची समाजव्यवस्था चांगली असल्याखेरीज तुमची धर्मविषयक ध्येये जर हीन व निकृष्ट असतील तर सामाजिक-आर्थिक किंवा राजकीय क्षेत्रात तुम्हाला यश मिळणे शक्य नाही. हे परस्परावलंबन योगायोगाने आले नसून हा निसर्गनियम आहे.'

 आर्थिक, सामाजिक, धार्मिकदृष्ट्या विभिन्न असलेल्या जनसमुदायांना केवळ

राजकीय स्वातंत्र्य मिळाले तर ते एकमेकांवर आर्थिक, सामाजिक, धार्मिक, राजकीय गुलामगिरी लादू पाहतील हे जोतीबांनी अचूक हेरले होते.

 यासाठी वेगवेगळ्या जातीजमातींना एकत्र करून खरेखुरे एकमय लोक तयार करावेत इंग्रजी राज्याच्या आसऱ्याचा त्याकरिता उपयोग करून घ्यावा अशा मताचे होते. अंतर्गत शोषण असेल तर ते राष्ट्रच नव्हे. कोणाही व्यक्तीविषयी वा जातीविषयी आकस ठेवण्याइतके जोतीबा क्षुद्र मनाचे नव्हते. ब्राह्मण विधवांकरिता त्यांनी केलेले काम आपण पाहिलेच आहे.

  'पाश्चात्त्य विचार व सांस्कृतिक यांचा परिणाम ब्राह्मणांच्या मनावर होत होता. पेशव्यांच्या राज्यांत जितके ते धर्मांध अन् कर्मठ अन् असहिष्णू होते तितके ते आता राहिले नव्हते.'

  'ब्राह्मण हे बंधू आहेत; परंतु त्याच्या दुष्कृत्यामुळे त्यांना बंधू म्हणावयास आपल्याला लाज वाटते. जरी त्यांनी पूर्वी शूद्रांचा छळ केला आहे तरी त्यांना आपण बंधू म्हणून मानावयास तयार आहोत. मात्र त्यांनी आजपासून वर्तनातील स्वार्थी हेतू टाकून दिला पाहिजे.'

  'भूतकाळातील आपल्या स्वार्थसाधू वृत्तीविषयी पश्चात्ताप करावयास ब्राह्मण तयार आहेत काय?'

  परंतु आमची पूर्ण खात्री आहे, की आपल्या उच्च स्वयंसिद्ध पदावरून ब्राह्मण हा खाली उतरून कुणब्यांशी आणि कनिष्ठ वर्गांतील लोकांशी बंधुत्वाच्या समान भूमिकेवरून, आम्ही त्याच्याशी झगडा केल्याशिवाय कधीही अपसूक येणार नाही.' (धनंजय कीर, पृष्ठ क्र १३३, १३५)

 ब्राह्मणावर टीका करताना शूद्रादि वर्गावर कोरडे ओढायलाही त्यांनी कमी केले नाही. देशांतर्गत संघर्ष उभा करण्याची जोतीबा फुल्यांची भूमिका अशी होती.

 तुर्कस्थानातील राज्यक्रांतीनंतर केमाल पाशाने गोंड्याच्या तुर्की फेज टोपीवर बंदी घातली. अनेकांनी विचारले गोंड्याच्या टोपीत आक्षेपार्ह, निषेधार्ह काय आहे? केमाल पाशाने उत्तर दिले, 'टोपीत काहीच दोष नाही. काळी काळानंतर मीच कदाचित ही टोपी वापरा म्हणून लोकांना आग्रह करेन, पण आज ती टोपी सर्व प्रतिगामी, बुरसटलेल्या विचारसरणीच प्रतिक आहे; म्हणून तिला आज बंदी घातली पाहिजे.'

 जोतीबांनी 'पगडी'ला विरोध केला ते पगडी म्हणजे शोषण अशा गैरसमजाने नाही. हे शोषण फेट्याकडून होते, हॅटमधून होते. खादी टोपीतून होते आणि बोडक्यानेही होऊ शकते. जोतीबांच्या काळी ते पगडीतून होत होते म्हणून तिला विरोध.



 सात


 भटशाहीचे साथीदार
 जोतीबांना इंग्रजांच्या धोरणाचा भारतीय शेतीवर व शेतकऱ्यावर होणारा भयानक परिणाम चांगला माहीत होता. शेतकऱ्यांच्या दुरवस्थेच्या आर्थिक कारणांचीही त्यांनी मीमांसा केली आहे.



 १. जंगलखात्याचे धोरण : 'पूर्वी ज्या शेतकऱ्याजवळ फारच थोडी शेते असत व ज्याचा आपल्या शेतीवर निर्वाह होत असे, ते आसपासचे डोंगरावरील दऱ्याखोऱ्यांतील जंगलांतून उंबर, जांभूळ वगैरे झाडांची फळे खाऊन, पळस, मोहा इत्यादी झाडांची फुले, पाने आणि जंगलांतून तोडून आणलेल्या लाकूडफाट्या विकून, पट्टीपासोडीपुरता पैसा जमा करीत व गांवचे गायरानाचे भिस्तीवर आपल्याजवळ एक दोन गाया व दोन चार शेरड्या पाळून, त्यांच्यावर जेमतेम गुजारा करून मोठ्या आनंदाने आपापल्या गावीच राहत असत.' (पान. २०४)

 सामाजिक मालकीची जंगले वगैरे सरकारी झाल्यामुळे गरीब शेतकऱ्यांना तोही आसरा राहिलेला नाही.

 २. ग्रामोद्योगांचा नाश

 इंग्लंडातील कारागीर लोकांनी तयार केलेल्या तऱ्हेतऱ्हेच्या नित्योपयोगी वस्तू आयात केल्यामुळे देशी कारागिरांची दैना उडाली आहे. यासंबंधीचे जोतीबांचे विवेचन आपण पहिल्या प्रकरणातच पाहिले आहे.

 ३. अपुरी शेती

  'सर्व हिंदूस्थानात हमेशा लढाया धुमाळ्यांत मनुष्यप्राण्यांचा वध होण्याचे बंद पडल्यामुळे चहुकडे शांतता झाली खरी, परंतु या देशात स्वाऱ्या, शिकारी बंद पडल्यामुळे शौर्य व जहामर्दी लयास जाऊन राजेरजवाडे 'भागू बाया' सारखे दिवसा सोवळे नेसून देवपूजा करण्याचे नादांत गुंग होऊन रात्री निरर्थक उत्पत्ती वाढविण्याचे छंदांत लंपट झाल्यामुळे येथील चघळ खानेसुमारी मात्र वाढली. यामुळे शेतकऱ्यांमध्ये भाऊहिस्से इतके वाढले, की कित्येकांस आठआठ दहादहा पाभरीचे पेऱ्यावर गुजारा करावा लागतो.' (पान २०३-२०४)

 लोकसंख्येच्या प्रश्नाचे हे विश्लेषण आजच्या दृष्टीने प्राथमिक वाटले तरी त्या काळात फारसे अनुचित नव्हते.

 ४.अनुत्पादक शेती

 शेतजमिनी पाळीपाळीने पडीक ठेवता येत नाहीत, त्यामुळे त्या नापीक झाल्या आहेत. (पान २०५) गोवधामुळे मजबूत बैलांचे बेणे कमी कमी होत गेले. गायरानांच्या कमताईमुळे पोटभर चारावैरण मिळेनाशी होऊन जनावरांचा ऱ्हास होत चालला. जिराईत शेते पिकामागून पीक देऊन थकली. जमिनीची धूप होऊन लक्षावधी खंडी खतांचे सत्त्व समुद्रात वाया दवडले जाते (पान २४७) पिकांचा डुकरे येऊन नाश करतात (पान २४९) पेशवाईत शेतीउपयोगी कामे अजिबात झाली नाहीत. अशा अनेक शेतीच्या समस्यांची नोंद जोतीबांनी केली आहे.

 ५. सरकारी करवसुली

 इंग्रजांनी प्रथम रोख महसूल आणि कर शेतकऱ्यांवर लादला. धान्याच्या स्वरूपात सरकारला कर देणे हे शेतकऱ्यांना प्रचंड संकट नसे. रोख रक्कम द्यावी लागणे म्हणजे बाजारात जावे लागणे. पुरेशी रक्कम क्वचितच उभी करता येत नसली, की सावकाराच्या घरी जाणे आलेच.

 सरकारी जमीन पट्टी दर तीन वर्षांनी पैमाष करिताना वाढवली जाई. जंगले गायराने यांच्या वापराकरिता रोख पैसे मोजावे लागू लागले. (पान २०६) शिक्षणासाठी लोकल फंड लादला. (पान २२७) माल बाजारांत नेऊन दान करावयास जाण्याच्या मार्गात दर सहा मैलांवर जागोजाग जकाती, अगदी मिठावरसुद्धा भली मोठी जकात बसवली. कालव्यांतील पाण्याची किंमत अज्ञानी शेतकऱ्यांपासून मन मानेल तशी घेऊन पाण्याची मात्र योग्य तजवीज नाही (पान २२८) अशा करांतून आपल्या देशबांधव युरोपांतील इंजिनीयर कामगारांस मोठमोठे पगार देण्याच्या' आणि 'युरोपांतील सावकारांस महामूर व्याज देण्याचा' हेतू असे.

 इंग्रजांच्या वसाहतवादी धोरणाची जोतीबांना स्पष्ट कल्पना होती. शेतकऱ्यांचा कच्चा माल लुटीच्या भावाने विकत घेण्याची व्यवस्था पूर्वीच्या राजवटीत तयार झालेली होती. त्याचा फायदा आता इंग्रजही विनासायास घेऊ लागले. आपला कारखानदारी माल येथे आणून खपवू लागले. प्रचंड करभार लादून लूट राजरोस केली.

 ६. सरकारी उधळपट्टी

 आणि अशा लुटीचा उपयोग जनकल्याणासाठी करण्याचे ऐवजी केवळ कामगारांचे पगार, ऐषाराम, विलायती देणी यासाठी केला जाऊ लागला. युरोपीय कामगारांचीच नव्हे,नेटीव ब्राह्मण कामगारांचीही भरभक्कम पगारांमुळे चंगळ चालू झाली. त्यांच्या राहणीमानाची सुरेख वर्णने जोतीबांनी जागोजाग केली आहेत.

 'विद्या खात्यातील एका मुख्य भट कामगाराच्या निदान दरमहा सहाशे सुर्ती म्हणजे दरवर्षी (७२००) सात हजार दोनशे रुपये, पदरी आवळावे लागतात. आता सुलतानीचा तर घोरच नाही; परंतु असमानी मेहेर झाल्यास एवढी रक्कम तयार करण्याकरितां शूद्रांच्या किती कुटुंबास एक वर्षभर रात्रंदिवस शेतीत खपावे लागत असेल बरे ! निदान एक हजार कुटुंबे तरी म्हटली पाहिजेत कां नको? बरे या ऐवजाच्या मानाने या बृहस्पतीपासून शूद्रांस काही उपयोग होतो काय ! अरे, चार आणे दररोज मिळणाऱ्या शूद्र बिगाऱ्यास उन्हामध्ये सूर्य उगवल्यापासून तो मावळेपर्यंत सडकेवर मातीची टोपली वहावी लागतात. त्याला बाहेर कोठे जाण्यास एक घटकेचीसुद्धा फुरसत होत नाही आणि वीस रुपये रोज मिळणाऱ्या भटचाकरांस शाळेत हवाशीर जगण्यात खुर्ची आसनावर बसून काम करीत बसता त्यास म्युनिसिपालिटीचा वराती होऊन, दररोज सकाळी आणि संध्याकाळी थंडाई पडल्याबरोबर आपण सर्व लोकांच्या ओळखीस यावे म्हणून मोठ्या डौलाने घोड्याच्या गाडीत बसून शहरातील रस्तोरस्ती लोकांच्या पढव्या, शेतखाने पाहून मिरवण्यापुरती फुरसत कोठून मिळते?'

(गुलामगिरी, पान १३७)


 आठ


 'शेतकऱ्यांचा असूड' प्रसिद्ध झाल्यानंतर आज शंभर वर्षांनंतर भटशाहीची अवस्था काय आहे ?

 ब्राह्मण असा ग्रामीण भागांत तसा दुर्मीळच झाला आहे. तसे भटशाहीच्या ऐन भरातही ब्राह्मण घरे ग्रामीण भागात विरळच होती. महाराष्ट्रात पुणे ही त्यांची राजधानी. तेथे त्यांचे प्रमाण जास्तीत जास्त म्हणजेसुद्धा पाच सहा टक्क्यांवर कधी नव्हते. तालुक्याच्या गावाला ब्राह्मणवस्तीत पाचदहा घरे असायची. सज्जाच्या गांवचे एखादे घर आसपासच्या पाचदहा गावांची भिक्षुकी सांभाळायचे.

 आर्य हे मुळात बाहेरून आलेले या जोतीबांच्या विधानाबद्दल आता कोणी फारसा वाद घालत नाही. मूळस्थान कोणते, इराण, पूर्व युरोप का उत्तर ध्रुव याबद्दल चर्चा असली तरी ते बाहेरून आले याबद्दल आता वाद नाही. खरे म्हणजे आर्यांच्या आक्रमणाचा पुरावा शोधायला कागदपत्रे तपासण्याची आवश्यकता नाही. बाहेरून आलेल्या टोळ्या देशाच्या खोलवर कानाकोपऱ्यात लहान लहान वाड्या वस्त्यांपर्यंत पोचत नाहीत.

 ब्राह्मण, मुसलमान तसेच त्यानंतर आलेले इंग्रज यांच्या राजवटीचे स्वरूप मूलत: शहरी होते. शोषणाचे हे कॅन्सर मोक्याच्या जागाच पकडतात. इंग्रजांनंतर देशावर अंमल चालविणाऱ्या 'इंडिया'चे स्वरूप याच कारणाने शहरी आहे. असो.

 ग्रामीण भागात ब्राह्मणांची घरे गेल्या शंभर वर्षांत आणखीनच कमी झाली आहेत. सर्वसाधारणपणे भावंडांतील एकच खेड्यावर सोडून बाकीचे सगळे शहरात कामधंद्याकरिता, उद्योगधंद्याकरिता निघून गेले आहेत.

 गावाशी एवढेच नव्हे तर गावांतील नातलगांशी त्यांचे संबंध जगदी जुजबी. सावकारांविरुद्ध झालेल्या उठावामुळे, दरवडेखोरांमुळे ब्राह्मण ग्रामीण भागांतून संपत आला आहे. मराठवाड्याचीही स्थिती तीच. उलट मुसलमानांची ग्रामीण भागातील संख्या वाढत आहे. मुलाण्याच्या कामासाठी गावोगावी मुसलमानांना वस्तीसाठी बोलावून नेले जाते. गांधीवधानंतरच्या जाळपोळीत ब्राह्मण मोठ्या प्रमाणावर शहराकडे आले आणि त्यानंतर कूळ कायद्याच्या अंमलबजावणीत फारच थोड्या ब्राह्मणांना आपल्या जमिनी लपवता आल्या. परिणामत: खेडेगावातील ब्राह्मण आज आर्थिक दृष्ट्या नगण्य झाला आहे. गावातील राजकारणात, एवढेच नाही तर राज्यातील राजकारणातील त्यांचे महत्त्व बऱ्याच प्रमाणात छाटून टाकण्यात आले आहे. देशपातळीवर मात्र आजही ब्राह्मणांचे राजकारणातही त्यांच्या संख्येच्या मानाने फार मोठे प्रभुत्व आहे.

 उदाहरणार्थ, लोकसभा व राज्यसभा यांमधील ब्राह्मण खासदारांचे प्रमाण पाहा.

 ब्राह्मण खासदारांचे संसदेतील प्रमाण (%)

इसवी सन   लोकसभा   इसवी सन   राज्य सभा
१९५२ ३५ १९५२ २७
१९५७ ४७ १९५७ ४७
१९६२ ४१ १९६० ४९
१९६७ ३७ १९६४ ४३
१९७१ ३४ १९६८ ४५
१९७७ २५ १९७० ५०
१९८० ३६ १९७४ ४७
१९७८ ३४
१९८० ३६
 राज्यपाल, मंत्री, मुख्य सचिव, न्यायाधीश वगैरे उच्चपदांवरही ब्राह्मणांचे प्रमाण

त्यांच्या संख्येच्या मानाने अवास्तव आहे.

 उच्चपदातील ब्राह्मणांचे प्रमाण

 राज्यपाल, नायब राज्यपाल- ५० %, केंद्रीय मंत्री - ५३ %, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश - ५६%, राज्य मुख्यसचिव ५४%, उच्च न्यायालयातील न्यायाधीश - ५० %,मंत्र्यांचे निजीसचिव - ७० %, केंद्रातील मुख्य सचिव ६२ %, परराष्ट्रातील राजदूत ४१.५ %, कुलगुरू - ५१ %, सार्वजनिक क्षेत्रातील महामंडळाचे मुख्याधिकारी केंद्रपातळीवर ५७ %, राज्य पातळीवर ८२ %.

 अगदी राज्य पातळीवरील शासकीय उच्चाधिकाऱ्यांच्या पदांवरील उत्तर प्रदेशातील ब्राह्मणांची टक्केवारी बघा-

 सचिव ते उपसचिव- ५४ %, कमिशर ते उपनिदेशक- ५७%, पोलिस महानिदेशक ते उपनिदेशक - ५७ %, शासकीय व लेखा अधिकारी - ५७ %, जिल्हाधिकारी ५८%. या परिस्थितीत जोतीबांच्या काळापासून धार्मिक आणि आर्थिक शोषणात काही फरक पडला आहे काय ?

 धार्मिक रूढींच्या बाबतीत बोलायचे झाले तर खेड्यातील धार्मिक विधीची आणि समारंभांची पीछेहाट तर झालेली नाहीच, उलट गणपती, सत्यनारायण यांसारख्या पूजांचे प्रमाण वाढले आहे, ही सत्य परिस्थिती कबूल करावयास हवी. रामनवमी, हनुमानजयंती, हरतालिका, महालक्ष्मी (गौरी, गणपती), दसरा, होळी, संक्रांत सारखे सण, शेतकऱ्यांच्या बळीराजाचा वध केल्याचा दिवाळी-उत्सव, शेतकरी दिवसेंदिवस जास्त उत्साहाने साजरा करितात. एकादशी महाशिवरात्रीसारखे उपवास, पंढरपूर, आळंदीसारख्या यात्रा आणि खंडोबाच्या जेजुरी, लिमगाव जत्रा शेतकरी निष्ठेने करतात. साखरपुडे, लग्ने अजून भटाला बोलावूनच होतात. दशपिंडाचा आवाका वाढत चालला आहे. पुष्कळ ठिकाणी त्याला पुढाऱ्यांमुळे राजकीय सभांचेच नव्हे तर निवडणूक प्रचारसभांचे स्वरूप येते. ब्राह्मण कमी पडतात. त्यांना मिनतवारी करून बोलवावे लागते.


 नऊ


 शिक्षणाचा प्रसार स्वातंत्र्यानंतर व्यापक प्रमाणावर झाला. जवळजवळ प्रत्येक गावात निदान प्राथमिक शाळा जवळपास आहेच. माध्यमिक शाळा फार लांब नाहीत. महाविद्यालये तालुक्याच्या गावाच्याही खाली स्थापन झाली आहेत. तरीही

धर्माची, श्रद्धेची, रूढीची पकड खऱ्या अर्थाने ढिली झालेली नाही. भटशाहीचा अस्त झाला. विद्येचा प्रसार झाला. जोतीबांच्या अटी मोठ्या प्रमाणावर पुऱ्या झाल्या, पण त्यांना अपेक्षित परिणाम मात्र दिसून आले नाहीत.

 भट, कुणब्याचा पोर सरकारी नोकरीत गेल्यावर तो कुणब्याला सन्मानाने वागवेल, त्याच्यावर अन्याय करणार नाही अशी जोतीबांची अपेक्षा होती. या अपेक्षेचे कारण जोतीबांनी चितारलेल्या खास मराठा म्हणविणाऱ्या गृहस्थाच्या शब्दात-

 'माझा ज्यांच्याशी रोटीव्यवहार, बेटी व्यवहार त्यांच्याशी वाकडा होऊन माझ्या मुलीमुलांस मुरळ्या वाघे करू काय? त्यांच्या मुलाबाळांच्या मध्ये माझ्या मुलाबाळांना सारे जन्म काढावयाचे आहेत. इ.इ. (शेतकऱ्याचा असूड, पान २६७)

 शूद्रांचे नोकरीतील प्रमाण ब्राह्मणांच्या बरोबरीने झाले. लोकसंख्येतील त्यांचे प्रमाण पाहता ते आणखीही वाढावयास पाहिजे; पण या संख्यात्मक बदलातून जोतीबांना अपेक्षित असा गुणात्मक बदल अजिबात घडून आलेला दिसत नाही.

 शालांत परीक्षा पास होऊन पुढाऱ्याच्या ओळखी-वशिल्याने भू-विकास बँक, जिल्हा परिषद, बांधकाम वगैरे ठिकाणी चिकटलेला कुणबी पोरगा शेतकऱ्याला पूर्वीच्या ब्राह्मण कामगाराइतकेच नव्हे, बहुतांशी अधिक अरेरावीने वागवितो. हात ओले झाल्याखेरीज कामाला हात लावीत नाही. घरचा चोर जिवानिशी सोडेना अशी स्थिती. प्रत्यक्ष राज्यकर्तेपदी कुणब्यांची पोरे आली तरी फरक नाही.

 देशपातळीवर गोरा इंग्रज जाऊन काळा इंग्रज आला तसेच गावपातळीवर गोरा(!) ब्राह्मण जाऊन काळा ब्राह्मण आला. अन्याय, अत्याचार तसाच कायम राहिला. याही बाबतीत जोतीबांची औषध योजना फोल ठरली आहे. याची कारणे शोधणे आवश्यक आहे.

 जोतीबा आणि मार्क्स

 शेतकऱ्याच्या प्रश्नाला जोतीबांनी हात घातला तो मोठ्या व्यापक भूमिकेतून. शेतकऱ्याची परिस्थिती फार केविलवाणी आहे हो ! त्याच्यावर दया करा अशी अति भिकेची किंकाळी त्यांनी मारली नाही. शेतकरी कष्ट करतो, राबतो; पण त्याच्या कष्टाचे फळ त्याच्याकडून लुटून नेले जाते. प्रथमत: भटशाहीकडून आणि राहिले सुरले इंग्रजांकडून. हे शोषण फार पुराणे आहे. त्याची सुरुवात पेंढारी, कहीवाले, मागून सरदार, राजेरजवाडे यांच्या लुटीतून होते (सत्सार २, पान ३०१). वेठबिगार, धर्मव्यवस्था, करभार, अपुऱ्या किमती हे सर्व शेतीच्या लुटीचे प्रकार आहेत ही जाणीव झाल्यानंतर त्यांनी शेतीच्या लुटीचा एक इतिहास आणि

विचारपद्धती पुढे मांडली.

 समाजाचा इतिहास हा शेतीतील गुणाकाराच्या वाटपाचा इतिहास आहे. या लुटीतून इंग्लंडची भरभराट होते आहे. देशातील शहरांची वाढ होते आहे. थोडक्यात शेतीची लूट हे भांडवलनिर्मितीचे साधन आहे ही जाणीव जोतीबांना स्पष्ट दिसते. ही लूट व्यवहारांत संभाव्य होते, याचे कारण अज्ञान व अविद्या. ब्राह्मणांनी विद्याबंदी केली नसती तर अशी लूट होऊ शकली नसती अशी त्यांची कल्पना. विद्याबंदी आणि जातिव्यवस्था नसलेल्या देशांतही शेतीचे शोषण होत असते याची जाणीव त्यांना असण्याचे कारण नव्हते. पुढे याच देशात विद्येचा प्रसार झाला, भटांचे नोकरीतील प्राबल्य कमी झाले, तरीही शेतकऱ्याचे शोषण चालूच राहील हीदेखील अपेक्षा त्यांना नव्हती.

 हिंदू धर्मव्यवस्थेपासून ते दूर गेले ते एकनिर्मिक कल्पनेकडे म्हणजे ख्रिस्ती किंवा मुसलमानी नमुन्याकडे. शंकराचार्यांच्या आत्मवादी अद्वैताची हेटाळणी केल्यानंतर आर्य या देशात येण्यापूर्वी प्रस्थापित असलेल्या वस्तुवादी लोकायताची जोतीबांना माहिती होती असे दिसत नाही. त्यामुळे हिंदू देवतांची निर्भर्त्सना करण्याची हिंमत असलेला हा विचारवंत आडातून फुफाट्यात पडला. वस्तुवादी भूमिकेकडे येऊ शकला नाही. अविद्येमुळे शेतकरी बुडाला हा निष्कर्ष या आत्मवादी भूमिकेतूनच निघाला.

 विचाराने वस्तुस्थिती बदलत नाही. वस्तुस्थितीने विचार ठरतो अशी विज्ञानवादी भूमिका जोतीबांना घेणे जमले नाही. भारतातील शोषण ही काही एक अपवादात्मक घटना नाही, जातिव्यवस्थेमुळे व भटशाहीमुळे उगवलेली ही विवक्षित विषवल्ली नाही. औद्योगिकरणाकरिता आवश्यक असलेल्या भांडवलनिर्मितीसाठी अवलंबल्या गेलेल्या एका विश्वव्यापी विपरीत अवस्थेचा तो केवळ भारतीय अवतार आहे, ही विचारांची व्यापकता जोतीबांच्या काळात भारतात तरी असंभाव्यच होती.

 ज्या एकनिर्मिक ख्रिस्ती धर्माचा जोतीबांवर इतका प्रभाव पडलेला होता त्या धर्माच्या प्रदेशात जोतीबा कार्यरत असतानाच मार्क्सने हेगेलचा आत्मवादी अद्वैत उलथवला होता. वस्तुवादी अद्वैताची मांडणी केली होती. त्यांतून मानवी इतिहासाचा एक नवा क्रांतिकारी अर्थ जगापुढे मांडला होता. गंभीरतेने, भारदस्तपणे प्रस्थापित विद्वत्तेच्या परिमितींनासुद्धा पुरे करीत मांडला. जगाला पहिली परिपूर्ण विचारपद्धती मिळाली. समाजाच्या उत्क्रांतीच्या वेगवेगळ्या अवस्था उत्पादनाच्या साधनांच्या मालकीवरून ठरतात. प्रत्येक अवस्थेत वर्गा-वर्गांचा संघर्ष यांतून वर्गविहीन समाजाची स्थापना कामगारवर्गाच्या नेतृत्वाखाली होईल असे भाकीत केले.

 जोतीबा चुकले, तसे मार्क्सही घसरला. मनुष्यप्राण्याचा विचार तितका स्थलकालसापेक्ष म्हणून मर्यादितच. जोतीबांची पाळेमुळे जशी शेतकरी वर्गात होती तशी जर मार्क्सची असती तर युरोपीय देशातील कामगारांच्या श्रमशक्तीच्या शोषणापेक्षा वसाहतींतील शेतकऱ्यांच्या श्रमशक्तीचे शोषण जास्त महत्त्वाचे आहे हे त्याला कळले असते. तिसऱ्या जगाचे शोषण जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत साम्राज्यवादी देशांतील कामगारांचे शोषण अपरिहार्य नाही. पाश्चिमात्य देशांतील कामगाराला भेडसावणारा प्रश्न त्याची नवी मोटार गाडी पार्क करायला जागा मिळत नाही हा असेल. नव्याने स्वतंत्र झालेल्या भारतासारख्या देशात कामगार-कारखानदार गुफ्तगू होऊन शेतकऱ्याचे शोषण होईल. ही सर्व आज प्रत्यक्ष दिसणारी चित्रे मार्क्सला पाहता आली नाहीत कारण तो जोतीबा नव्हता.

 एकेश्वरवादापाशी अडकलेल्या जोतीबांना शेतकऱ्यांच्या शोषणातली सनातनता जाणवली होती; पण समजली नव्हती. या शोषणाचे 'भटशाही' हे तत्कालीन स्वरूप आहे. त्या जातीच्या अंगभूत गुणांमुळे शोषण होत नाही, आर्थिक इतिहासक्रमाचा अपरिहार्य भाग म्हणून होते. हा शोषक कधी दरवडेखोराच्या रूपांत येतो, कधी जमीनदार सावकाराच्या, कधी भटाभिक्षुकाच्या, कधी राजा महाराजांच्या, कधी इंग्रजांच्या, कधी स्वकीय राज्यकर्त्यांच्या. हे त्या काळात त्यांना उमगत नाही.

 शेतकऱ्यांचा शोषक भट पुढे आपल्यात शूद्रच काय अतिशूद्रही सामील करून घेईल, शिक्षणाचा प्रचार करील; पण शेतकऱ्यांचे शोषण सोडणार नाही. कारण शेतीच्या शोषणाखेरीज त्याला सोईस्कर असा भांडवलनिर्मितीचा मार्गच नाही. हे जोतीबांना समजले नाही कारण जोतीबा मार्क्स नव्हते.

 भारतातील विवक्षित परिस्थितीमुळे जोतीबांवर मर्यादा पडल्या. तसेच युरोपीय देशांतील ऐतिहासिक परिस्थितीमुळे मार्क्स फसला. १९४८ च्या पॅरिसच्या उठावात शेतकऱ्यांनी भाग घेतला नाही. त्यामुळे नाराज झालेला मार्क्स औद्योगिक कामगाराला क्रांतीचा अग्रदूत मानू लागला.

 कामगारांना या भूमिकेस साजेसा आर्थिक शोषणाचा, वर्गजाणिवेचा आणि विग्रहाचा विचार त्याने मांडला. वस्तुत: शोषण हे तिसऱ्या जगांतील प्राथमिक अर्थव्यवस्थेचे होत आहे आणि या लुटीचा फायदा पुढारलेल्या देशांतील कारखानदार, भांडवलदार, कामगार धरून सगळेच कमीअधिक प्रमाणात घेत आहेत. औद्योगिकदृष्ट्या सर्वांत प्रगत देशात क्रांती होत नाही, मागासलेल्या देशांत होते. एका देशातील कामगार दुसऱ्या देशातील कामगाराच्या हक्कासाठी लढत नाही. १५०० रुपये महिना मिळवणारा कामगार कारखान्याच्या कुंपणाबाहेर रिकाम्या

पोटाने राबणाऱ्या दुसऱ्या कामगारापेक्षा आपल्या मालकाचेच हित जवळचे मानतो ही जाणीव मार्क्सला झाली नाही.
 त्याच्यानंतर थोड्याच वर्षात रोझा लुक्सेंबुर्गला ही जाणीव होऊ शकली; पण मार्क्सला झाली नाही. मार्क्सची तत्त्वज्ञानाची बैठक आणि जोतीबाचे जमिनीशी इमान शेतकरी संघटनेच्या रूपात एकवटायला शंभर वर्षे मध्ये जावी लागली. मार्क्सच्या कॅपिटल ग्रंथाला मुजरा नुकताच केला. आता 'शेतकऱ्याचा असूड'ला त्रिवार मुजरा.

□ ◘