शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख/शेतकऱ्यांचा राजा शिवाजी
नवे शिवराज्य
घडवू पाहणाऱ्या
तमाम शेतकऱ्यांना
शेतकरी राजांचे दुर्दैव
इतिहासात शेतकऱ्यांचे असे राज्य आढळत नाही. शेतकरी म्हणजे रयत म्हणजे प्रजा.त्यांनी राबून कसून मेहनत करावी, पिके पिकवावी आणि स्वत:ला राजे म्हणविणाऱ्यांनी, त्यांनी पिकवलेली पिके कधी गोडी गुलाबीने कधी निघृणपणे काढून न्यावीत. शेतकऱ्यांकडून पिके काढून नेणाऱ्या राजांनी एका एका प्रदेशावर सत्ता बसवावी आणि त्या प्रदेशाच्या हद्दीपलीकडील दुसऱ्या राजाशी लुटीच्या हक्काकरिता मारामाऱ्या कराव्यात हे इतिहासाचे स्वरूप राहिले आहे.
पहिला राजा बळी
शेतकऱ्यांचा राजा असा शोधायला इतिहासकाल ओलांडून पुराणकाळात जावे लागते. देशभरचा शेतकरी बळिराजाला आपले दैवत मानतो. पुराणांतरी आणि वेगवेगळ्या ग्रंथांत बळिराजाविषयी दिलेला मजकूर सगळा अकटोविकटच आहे. याचक म्हणून आलेल्या वामनाने कपटाने तीन पावले जमीन मागितली काय आणि मग एकाएका पावलात पृथ्वी आणि आकाश व्यापले काय आणि तिसरे पाऊल कुठे ठेवू म्हटल्यावर जणू पृथ्वीच्या बाहेर राहिलेल्या बळीने डोके पुढे केले काय. खरेखुरे काय घडले याचा अर्थ या भाकडकथेवरून तरी लागत नाही. कदाचित ही कथा एक रूपक असेल.
जोतीबा फुल्यांनी म्हटल्याप्रमाणे "भटशाहीने शेतकऱ्यांवर केलेल्या आक्रमणाची" ती सुरुवात असेल. निश्चितपणे काहीही म्हणणे कठीण आहे. पण जे ग्रंथकारांना जमले नाही ते गावोगावच्या घरी घरांतील मायमाऊल्यांनी करून दाखविले. बळिराजाला जमिनीत गाडून टाकला, समूळ नष्ट केला तरीही शेतकऱ्यांच्या बाया "इडा पिडा बळीचे टळो राज्य येवो" या आशेची ज्योत हर प्रसंगी जिवंत ठेवत असतात. हजारो-हजार वर्ष आपल्या एका राजाचे इतक्या मोठ्या समाजाने इतक्या कृतज्ञतापूर्वक स्मरण ठेवल्याचे क्वचितच दुसरे उदाहरण असेल.
बळिराजाची राजधानी पश्चिम किनाऱ्याला होती व त्याचे राज्य महाराष्ट्रापर्यंत पसरले होते असे सर्वसाधारणपणे मानले जाते. शेतकऱ्यांचा पहिला राजा बळी.तोबळी पुन्हा एकदा वर निघणार आहे व त्या बळीचे राज्य पुन्हा एकदा येणार आहे, शेतकऱ्यांची इडा पिडा टळणार आहे आणि सगळीकडे आनंद मंगल होणार आहे ही आशा शेतकरी अजूनही मनांत बाळगून आहेत. पण असा बळिराजा कोण? कुठला? त्याने केले काय? त्याला संपविण्याकरिता प्रत्यक्ष विष्णूला अवतार घेऊन का यावे लागेल याचा थांगपत्ता लागत नाही. प्रल्हादाच्या प्रार्थनेला ओ देऊन विष्णूने नरसिंह अवतार धारण केला. त्याच प्रल्हादाचा पुत्र विरोचन आणि विरोचनाचा पुत्र बळी, प्रल्हादाच्या नातवाचा वध करण्याकरिता स्वत: विष्णूला पुन्हा एकदा घाईघाईने अवतार घ्यावा लागला हे मोठे गमतीशीर प्रमेय आहे. कागदोपत्री याचा खुलासा होण्याची काहीही शक्यता नाही. बळिराजा संपवण्यात आला एवढेच नाही, त्याची सगळी कहाणीच दडपून टाकण्यात आली.
दुसरा शेतकरी राजा
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे दुसरे दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजीराजांविषयीचा अभिमान हा प्रत्येक मराठी शेतकऱ्यांच्या जणू रक्तातच असतो. शिवाजी कोण होता, कसा होता, काय होता याविषयी कोणाला काही वाचून ठाऊक आहे असे नाही. आधी शेतकरी समाजात वाचणारे कमीच आणि ज्यांना वाचता येते त्यांनी विश्वासाने वाचतो असे काही साहित्यही नाही. गावागावात फडांच्या वेळी, उरूस उत्सवांच्या वेळी गावगन्ना शाहिरांनी रचलेले पोवाडे हाच काय तो त्यांच्या माहितीचा आधार. दरबारातील भाटांच्या काव्याप्रमाणे शाहिरांच्या कवनांची रचनाही समोर बसलेल्या श्रोत्यांच्या औदार्याच्या अपेक्षेने होणारी. सुरवातीच्या शाहिरांच्या समोर बसलेल्या श्रोत्यांत प्रत्यक्षात लढायात भाग घेतलेले सरदार, दरकदार, शिपाई गडी उपस्थित असताना शाहिरांनी त्यांच्या अंगच्या शौर्य, दिलदारपणा इत्यादी गोष्टींचे अतिशयोक्त वर्णन करावे हे साहजिकच आहे. त्याबरोबर शत्रूला सर्व दुर्गुणांचा मूर्तिमंत पुतळा बनवावे आणि त्याला रौद्र अक्राळ विक्राळ मुखवटा द्यावा हेही तितकेच क्रमप्राप्त.समोर बसलेले श्रोते प्रत्यक्ष प्रसंगाचे साक्षीदार असले म्हणजे सत्यापासून अपलाप करण्याबाबत शाहिरांवर आपोआपच मर्यादा पडते. जसजसा काळ जाई आणि काहणी सांगोवांगीच ऐकलेले श्रोते पुढे येत, तसतसे इतिहासाचे इतिहास पण जाऊन मनोरंजक कथांचं स्वरूप यावे हे सहज समजण्यासारखे आहे.
शेतकऱ्याच्या या दुसऱ्या राजाला कोणी वामन संपवू शकला नाही. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्याने स्वराज्य स्थापले. जिवावर आणि स्वराज्यावर आलेल्या काळप्रसंगांना विलक्षण धैर्याने तोंड दिले आणि त्यांच्यार मात केली. दिल्लीश्वराच्या नाकावर टिच्चून राज्य संस्थेची द्वाही फिरविण्याकरिता राज्याभिषेकाने स्वराज्याचेस्वतंत्र तख्त स्थापन केले आणि त्यांचा अकस्मात मृत्यू ओढवला तेव्हा मराठी फौजफाटा घेऊन दक्षिणेत उतरून यावे लागले.
इतिहासाचा अपर्थ
बळिराजापेक्षा शिवाजी राजा जिवंतपणी सुदैवी ठरला.पण मृत्यूनंतर शिवाजीराजाचीही अवस्था बळिराजाप्रमाणेच होऊ लागली आहे. स्वराज्यसंस्थापनेची कल्पना नांगरासह तलवार हाती घेणाऱ्या मावळ्यांच्या आणि सर्वसामान्य रयतेच्या सहकार्याने मूर्त झाली. भारतातील त्या काळात घडणाऱ्या इतर इतिहासाकडे पाहिले म्हणजे भयाण काळोख्या रात्री वादळी हवेत एखादा लहानसा दिवा तेवत असावा असे या स्वराज्याचे स्वरूप दिसते.ही पणती त्या परिस्थतीत तेवत राहणे दुरापास्तच नव्हे अशक्यच होते. संभाजी एक अविवेकि म्हणून सोडून द्या, पण राजारामासारख्या संयत पुरुषाससुद्धा स्वराज्य आणि शेतकरी यांच्यामध्ये वतनदारांचे मध्यस्थ घ्यावे लागले. त्यानंतर मराठेशाहीचे स्वराज्य आणि देशभरातील इतर पाळेगार आणि पुंड यांत जवळ जवळ काहीच फरक राहिला नाही. बंगलमध्ये मोगलांच्या इतक्या स्वाऱ्या झाल्या पण बंगालातील बायकापोरांना दहशत बसली ती भोसल्यांच्या लुटीची! पानिपतच्या लढाईच्या वेळी आसपासच्या शेतकऱ्यांना सदाशिवराव भाऊच्या सैन्याबद्दल आपुलकि वाटण्याचे काहीच कारण नव्हते. खुशवंतसिंग लिहितात, "पंजाबातील लोकांना मराठ्यांकडून लूट होणे अधिक भयानक वाटे. कारण मराठे रयतेच्या अंगावरील कापडचोपडसुद्धा काढून नेत." स्वराज्याचा शिवाजी महाराजांनी लावलेला दिवा त्यांच्याबरोबरच विझला. शिवाजीचे वारसदार आणि पेशवे यांच्यात स्वराज्याचे तेज नावापुरतेसुद्धा शिल्लक नव्हते.
मग शिल्लक राहिल्या त्या फक्त शाहिरांच्या अतिशयोक्त आणि अघळपघळ कहाण्या. शिवाजीला मिळालेली मान्यता वापरून घेण्याचा प्रयत्न करणारे हरघडी निघाले. कोणी छत्रपतीला गोब्राह्मण प्रतिपालक असे बळचे बनविले. कोणी त्याचा उपयोग जातीयवाद वाढविण्याकरिता केला आणि हिंदुत्ववाद्यांनी तर शिवाजीवर जवळ जवळ मक्तेदारीचा कब्जा मिळविला.त्यांनी इतिहासाची मांडणी केली ती अगदी साधी आणि सोपी, पण तितकिच खोटी आणि विखारी.त्यांनी इतिहासाचे कुभांड रचले ते थोडक्यात असे.
शिवाजीच्या काळी सर्व महाराष्ट्र मोगलांनी ग्रासून टाकला होता. ते गावेच्या गावे लुटीत असत, देवळे पाडीत, देवांच्या मूर्ती फोडीत माणसांची कत्तल करीत, त्यांचे हालहाल करीत, स्त्रिया-मुलांचा छळ करीत, त्यांना गुलाम बनवीत किंवा जनानखान्यात दाखल करीत. हिंदूंना पूज्य असलेल्या गोमातेची भरदिवसा कत्तल होत असे. अशापरिस्थितीत प्रत्यक्ष शिवशंभूचा अवतार अशा तेजस्वी शिवाजीचा अवतार झाला. आणि त्याने युक्तिप्रयुक्तद्दने स्वत: भवानीदेवीच्या आशीर्वादाने हिदूंचे राज्य स्थापन केले."बुडाला औरंग्या पापी । म्लेंच्छ संहार जाहला", "उदंड जाहले पाणी। स्नानसंध्या करावया". स्वराज्याची येवढी मर्यादित मांडणी हिदुत्वनिष्ठांनी केली. देशात धर्माधर्माचे वाद माजवण्याच्या त्यांच्या राजकारणास पूरक अशी शिवाजीची मूर्ती तयार केली आणि मग दंग्यामध्ये सुरे घेऊन निघणारे गुंड आणि हरिजनांची घरे जाळणारे दादा 'शिवाजी महाराजकी जय' च्या घोषणा करीत आपली कृष्णकृत्ये उरकू लागले. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रिटिश सरकारने लष्करभरतीच्या जाहिरातीवरसुद्धा शिवाजी महाराजांचे चित्र छापले होते, मग राजकीय स्वार्थासाठी धर्मही वेठीला धरणारे शिवाजीला काय मोकळा सोडणार आहेत?
संस्थापक महात्मा निघून गेल्यानंतर उरलेल्या मठातील शिष्यांनी बाबांच्या शिकवणुकीचे तिरपागडे करून टाकावे तसे शिवाजीचे बीभत्सीकरण फार मोठ्या प्रमाणावर झाले आहे. यात दुःखाची गोष्ट अशी की शिवाजीचे खरे मोठेपण झाकले गेले. त्या काळाच्या इतर राजेरजवाड्यांप्रमाणे एक, पण धर्माने हिंदू असलेला अशी त्याची प्रतिमा तयार झाली. परदेशात तर सोडा, पण देशाच्या इतर राज्यांतही शिवाजीविषयी यामुळे विलक्षण गैरसमज कानाकोपऱ्यांत आणि खोलवरपर्यंत पसरलेली आहेत. शिवाजी म्हणजे संकुचित, शिवाजी म्हणजे प्रादेशिक, शिवाजी म्हणजे कोत्या मनोवृत्तीचे प्रतीक आणि निव्वळ लुटारू व धोकेबाज अशी कल्पना महाराष्ट्राबाहेर सार्वत्रिक आढळते. जाती, धर्म, प्रदेश यांच्या संकुचित मर्यादांना सहज उल्लंघून जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नशिबी अशी अपर्कीर्ती यावी ही मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचा राजा शिवाजी याला जातीयवाद्यांच्या वधर्ममार्तंडांच्या कैदेतून सोडविणे आवश्यक आहे आणि शेतकऱ्यांचा राजा म्हणून इतिहासात त्याचा पुन्हा एकदा राज्याभिषेक होणे आवश्यक आहे.
शिवाजीसंबंधी महाराष्ट्रात तरी खूप लिहिले गेले, पण त्याचे निर्णायक जीवनचरित्र आजही उपलब्ध नाही. नजीकच्या भविष्यकाळात तयार होण्याची काही शक्यता दिसतही नाही. शिवाजीविषयी अज्ञान जितके सार्वत्रिक, तितका त्याच्या जयंत्यांचा कार्यक्रम अधिकाधिक विपरीत. कर्ण्याच्या मदतीने वाटेल त्या गाण्यांची किंवा पोवांड्यांची उधळण केली म्हणजे शिवाजीचा उत्सव साजरा झाला अशी समजूत सार्वत्रिक होत आहे. शिवजयंतीउत्सवाला गणपतीउत्सवाचे स्वरूप येऊ नये आणि कर्ण्याच्या गदारोळात खरा शिवाजी हरवून जाऊ नये म्हणून या पुस्तिकेचा प्रपंच.
□
इतिहास-राजांचा आणि शेतकऱ्यांचा
शिवाजी महाराजांचा आणि तत्कालीन रयतेचा -शेतकऱ्यांचा इतिहास याचे इतिहासातील इतर कालखंडांपेक्षा एक देदीप्यामान वेगळेपण आहे. हा राजाच्या धाडसी पराक्रमाचा इतिहास आहे, रयतेचा राजासाठी बलिदान करण्याची तयारी दाखवण्याचा इतिहास आहे, राजावरील आक्रमण म्हणजे आपल्या घरादारावरील आक्रमण असे रयतेने प्रत्यक्ष समजून वागण्याचा इतिहास आहे. रयतेसाठी लष्करी पराभव स्वीकारणाऱ्या राजाचा इतिहास आहे. राजा- रयत, शासन-शेतकरी यांच्या परस्पर सौहार्दपूर्ण संबंधांचा इतिहास आहे.
शिवाजी महाराज आणि त्यांची रयत यांच्या इतिहासाचे देदीप्यमान वेगळेपण समजण्यासाठी महाराष्ट्रातील आधीच्या इतिहासाची नोंद घेणे आवश्यक आहे. या इतिहासात राजा-रयत संबंधांची माहिती फारच कमी आहे.
शेतीतून अतिरिक्त धान्य निर्माण झाले तरच दुसरा कोणी बिगरशेतीचे व्यवसाय करू शकतो. बिगरशेतीचे व्यवसाय म्हणजे त्या काळी गावोगावची बलुतेदारीची कामे, उद्योगधंदे व्यापार, किल्ले बांधणे, गढ्या बांधणे, लढाया इ.इ.इतर सर्व व्यवसायांचा जन्म शेतीतून निघालेल्या धान्याच्या मुठीतून होतो. पण इतिहास लिहिला गेला तो शेतीबाहेरील घडामोडींचाच. शेतीतून निर्माण होणाऱ्या संपत्तीच्या लुटालुटीचा, गुलामगिरीचा, वेठबिगारीचा, लुटणाऱ्या दरोडोखोरांचा,राजांचा, लुटलेल्या संपत्तीच्या कैफाचा, अवतीभवती जमणाऱ्या भाटांचा, पुरोहितांचा, नर्तक- नर्तकींचा आणि संस्कृती संस्कृती म्हणून ऊर बडविणाऱ्यांचा. या सगळ्या डोलाऱ्यात गाडीत गेलेली धनधान्य संपत्ती आली कुठून, जमा कशी झाली याचा विचार इतिहासकारांनी टाळला. संपत्तीमुळे खरेदी केले गेलेले तंत्रज्ञान, विकसित झालेले तंत्रज्ञान, कलाकुसार इ. गोष्टी संपत्ती निर्माण करणाऱ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या की नाही याची इतिहासकारांनी दखल घेतली नाही. या गोष्टी पोहोचल्या तर नाहीचत पण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायला हव्या होत्या याची जाणीवही नाही. इतिहास व बखरी लिहिणारे शेतकरी समाजातले नव्हते. शेतीच्या लुटीवर पोसल्याजाणाऱ्या राज्यकर्त्या पुरोहित किंवा व्यापारी समाजातील होते. शेतकऱ्यांच्या शोषणाचा ऊहापोह करणे त्यांना सोयीस्कर नव्हते.
ज्या देशात ऐतिहासिक दस्तऐवज व्यवस्थित लिहिले जातात, ठेवले जातात, सांभाळले जातात-त्या देशांतसुद्धा केवळ कागदपत्रांवरून इतिहासात नेमक काय घडलं हे सांगण कठीण होतं. भारतासारख्या देशात, जिथे लेखी नोंदी क्वचितच ठेवल्या जातात-ठेवल्या तर सत्याच्या आग्रहापेक्षा स्वत:ची किंवा धन्याची भलावण करण्याच्या बुद्धीनं -दप्तरं सांभाळली जात नाहीत. अगदी शिवरायाचे दस्तुरखुद्द कागदपत्र -पहारेकरी हिवाळ्यात क्षणभराच्या उबेसाठी शेकोटीला वापरतात; तिथे तर कागदपत्रांवरून इतिहास समजणं आणखीच दुरापास्त! लढाया, लुटालुटी, जाळपोळ यातून अपघातानं बचावलेले कागद आणखी एका अपघातानं नजरेखाली घालायला मिळाले,तर त्या आधारावर इतिहास उभा करणं धार्ष्ट्याचंच होईल.
महाराष्ट्राचा इतिहास तर अभिनिवेशानंच जास्त भरलेला आहे. पाश्चिमात्य इतिहासकारांनी साम्राज्यशाही राजवटीला आधार देणारा इतिहास मांडला.त्या नेटिव्ह राजेरजवाडे, सरदार, दरकदार यांचं अज्ञान, भेकडपणा, कर्तृत्वशून्यता, आळस, स्वार्थलंपटपणा, देशभक्तीचा अभाव यावर भर दिला. यावर प्रतिक्रिया म्हणून भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या काळात भारतीय अस्मितेचं, राष्ट्रीयत्वाचं संरक्षण करण्याच्या बुद्धीनं अनेक इतिहासकार लेखणी सरसावून निघाले "या दोन्ही पद्धतींमध्ये सत्यसंशोधनाला आवश्यक असणाऱ्या अलिप्त आणि तटस्थ संशोधक दृष्टीला मर्यादा पडल्या. निर्भय वास्तववाद कित्येकदा गमावला गेला आहे." (लक्ष्मणशास्त्री जोशी, पुरस्कार, 'दासशूद्रांची गुलामगिरी-' लेखक : शरद पाटील.)
"आम्ही प्राचीन आहोत. एवढंच नव्हे तर आज जगात शास्त्र, तत्त्वज्ञान, राजकारण वगैरे ज्या ज्या म्हणून काही गोष्टी आहेत-त्या सर्व एके काळी आमच्याजवळ होत्या व आम्हाला ठाऊक होत्या; हे सिद्ध करण्याचे भारतीय लेखकांना व इतिहासकारांना एक प्रकारचे वेडच लागले होते. तुम्ही म्हणता कांट हा महान तत्त्वज्ञानी होता काय? तर मग आमचा शंकराचार्य त्याहूनही महान होता. वाङ्मयात शेक्सपीअर श्रेष्ठ म्हणता तर आमचा कालिदास त्याच्यापेक्षा माठा साहित्यिक होता. तुमच्याकडे राजकारणात रुसोचा सामाजिक कराराचा सिद्धान्त निघाला ना ! तसा आमच्याकडेही होता. आमच्याकडे विमाने, रेल्वे, स्फोटक द्रव्ये सर्व काही होते. विशेष म्हणजे ज्यावेळी युरोपखंडातले लोक अस्वलाची कातडी परिधान करण्याच्या रानटी अवस्थेत होते. त्यावेळी आम्ही तलमदार कापड वापरीत होतो.""ज्यावेळी युरोपियन लोक निव्वळ रानवट होते त्यावेळी आम्ही संस्कृतिसंपन्न होतो ही कल्पना म्हणजे आमच्या इतिहासकारांची फारच मोठी प्रेरक शक्तद्द. आमच्या देशाचा संपूर्ण धुव्वा उडवू पाहाणाऱ्या परकिय शत्रूंना तोंड देण्यासाठी सुसज्ज व्हावे म्हणून आम्ही आमचे पुरातन कील्ले, खंदक, सनदा, भूर्जपत्रे गतेतिहासाच्या गर्तेतून उकरून काढली." (श्री.अ.डांगे -आदिभारत,पृष्ठ ४.)
"एका खोट्याचा प्रतिकार करण्यासाठी दुसरं खोटं सांगून काही सत्य समजू शकत नाही. इतिहासाचं सार काढताना मग अशा बांधिलकिच्या विचारवंतांची त्रेधातिरपीट उडू लागते. विष्णुशास्त्री चिपळूणकरांना - 'सर्वश्रेष्ठ भारतीय संस्कृती निव्वळ अधम अशा इंग्रजी व्यवस्थेपुढे का नमली?' याचं उत्तर देण्यासाठी चक्रनेमिक्रमाने - रहाटगाडग्याप्रमाणे इतिहासात वर गेलेले खाली येतात, खाली आलेले यथाक्रम वर जातात त्यासाठी कोणत्याही प्रकारे भारतीय व्यवस्थेत ढवळाढवळ करण्याचं काही कारण नाही, असं खास पुणेरी निदान मांडावं लागलं.
"एखाद्या पोलिसी चतुरकथेत खून कसा आणि कोणी केला असावा यासंबंधी अजागळ पोलिस अधिकाऱ्यानं आपली अटकळ मोठ्या आत्मविश्वासानं मांडली आणि त्याच्या अटकळीत अनेक गोष्टीचा खुलासा होत नाही असं लक्षात आलं म्हणजे ज्या प्रकारची रुखरुख लागते, त्या प्रकारची रुखरुख मला राष्ट्रवादी इतिहास वाचताना लागते. इतिहासाची साक्ष काहीतरी दडवण्यासाठी काढली जात आहे. काहीतरी लपवलं जात आहे, इतिहासात प्रत्यक्ष काहीतरी वेगळंच असलं पाहिजे असं वाटत राहावं.
"आपला तो बबड्या आणि लोकाचं कारटं" या वृत्तीनं महाराष्ट्राच्या इतिहासात काही आत्मकौतुकाचा भाग यावा हे समजण्यासारखं आहे. पुण्याला पेशव्यांचा विश्रामबागवाडा पाहिला आणि त्याच्या दीडदोनशे वर्ष आधी दिल्लीश्वरांनी केलेले बांधकामं पाहिली म्हणजे सर्व देशाच्या इतिहासात पेशव्यांचं स्थान काय होतं याबद्दलची वर्णनं अवास्तव असावीत हे स्पष्टच होतं. छत्रसाल, बंदा बहादूर, सूरजमल जाट,हैदर, टिपू यांसारख्या इतर प्रदेशातील पुरुषांच्या कामाच्या संदर्भात मराठ्यांचा इतिहास लिहिला पाहिजे याची जाणीव होते. महाराष्ट्राचा इतिहास हा आत्मकौतुकानं भरला आहे आणि अवाजवीपणे आत्मकेंद्रीही आहे.
आपलं विशिष्ट ऐतिहासिक तत्त्वज्ञान लक्षात घेऊन त्याच्या अनुरोधानं गतकाळ तपासून बघण्याचा कार्यक्रम काही मार्क्सवादी लेखकांनीही पार पाडला आहे. डांगे, राजवाडे, जयस्वाल, देवीप्रसाद चट्टोपाध्याय, शरद पाटील यांनी आदिभारत काळातील अर्थव्यवस्थेचा विकास, हा मार्क्सच्या अनुमानाप्रमाणेच झाला असंमोठ्या विस्तारानं मांडलं, त्यासाठी शंकास्पद विश्वसनीयतेच्या वेदोपनिषदकालीन साहित्याचं त्यांनी एखाद्या महामहोपाध्यायापेक्षा विस्तारानं अवगाहन केलं. याउलट, मुसलमानी आक्रमणापासूनच्या इतिहासाचा अन्वय लावण्याचं काम मार्क्सवाद्यांनी फार किरकोळ केलं,' मध्ययुगीन राजेरजवाड्यांच्या एकमेकांतील लढाया' असा शिक्का मारुन हा उभा कालखंड त्यांनी दुर्लक्षित केला. सैद्धान्तिक दृष्टिकोनातून त्यांनी हा इतिहास तपासून बघितला असता तर इतिहासाचा पुरा अर्थ मार्क्सच्या विश्लेषणातही लागत नाही हे त्यांच्यासुद्धा लक्षात आलं असतं.
पश्चिमी इतिहासकारांचं लिखाण वाचताना जागोजाग असमाधान राहतं. लेखकाला देशाची कल्पना किती तुटपुंजी आहे याची ओळीओळीला जाणीव होते. ते साहजिकच आहे. पण भारतीयांनी लिहिलेला भारताचा किंवा महाराष्ट्राचा इतिहास वाचतानाही त्याच प्रकारचं असमाधान वाटतं. या इतिहासातले धागे एकमेकांशी जुळत नाहीत. कुठेतरी काहीतरी चुकतं आहे अशी रुखरुख लागून राहते. ( शरद जोशी - रामदेवरायाचा धडा-प्रचलित अर्थव्यस्थेवर नवा प्रकाश)
इतिहासाच्या या अनेक मांडण्यांमध्ये शेतकऱ्यांच्या परिस्थितीला स्थान कुठेही नाही. इतिहासाची एक मांडणी महात्मा जोतिबा फुल्यांनीही केली. आजवरच्या कोणत्याही मांडणीत संपत्ती - उत्पादक शेतकऱ्याला स्थान नव्हते. ते महात्मा फुल्यांच्या मांडणीत आहे.
"इतिहासाचा अर्थ सलगपणे, एका सूत्रामध्ये ओवण्याचं पहिलं काम महात्मा जोतिबा फुल्यांनी केलं, अगदी विष्णूच्या मत्स्यावतारापासून ते वासुदेव बळवंत फडक्यांच्या बंडापर्यंत -'शूद्रांची गुलामगिरी' या एका सूत्रात त्यांनी सर्व घटना गुंफून दाखवल्या. राष्ट्रवादी आघाडीची पर्वा न करता त्यांनी मोगलांना शूद्रांच्या मुक्तद्दचं श्रेय दिलं.
('आर्य धर्म श्रेष्ठ भट वाखाणीती। जुलमी म्हणती । मोगलास ॥ भटपाशातून शूद्र मुक्त केले। ईशाकडे नेले। कोणी दादा?' मानव- महंमद- महात्मा फुले सग्रम वाङ्मय, पृष्ठ ४९०) आणि राष्ट्रवाद्यांच्या महापुरुषांवर कडाकड आसूड उडवले. ('शेतकऱ्यांचा असूड' समग्र वाङ्मयः पृष्ठ २०१)
'तेव्हा अखेरी शंकराचार्याने तुर्कि लोकास मराठ्यात सामील करून घेऊन त्यांजकडून तरवारीचे जोराने येथील बौद्ध लोकांचा मोड केला. त्यावर काही काळ लोटल्यानंतर हजरत महंमद पैगंबराचे जहामर्द शिष्य, आर्यभटांच कृत्रिम धर्मासहित सोरटी सोमनाथ सारख्या मूर्तीचा तरवारीच्या प्रहारांनी विध्वंस करून, शेतकऱ्यास आर्यांच्या ब्रह्मकपाटातून मुक्त करू लागल्यामुळे भटब्राह्मणांतीलमुकुंदराज, ज्ञानोबांनी भागवत बखरीतील काही कल्पित भाग उचलून त्याचे प्राकृत भाषेत विवेकसिंधू व ज्ञानेश्वरी या नावांचे डावपेची ग्रंथ करून शेतकऱ्यांची मने इतकि भ्रमिष्ट केली की, ते कुरणासहित महंमदी लोकास नीच मानून त्यांच्या उलटा द्वेष करू कागले. नंतर थोडा काळ लोटल्यावर तुकाराम या नावाचा साधू शेतकऱ्यामध्ये निर्माण झाला. तो शेतकऱ्यांतील शिवाजीराजास बोध करून त्याचे हातून भटब्राह्मणांच्या कृत्रिम धर्माची उचलबांगाडी करून शेतकऱ्यांस त्यांच्या पाशातून सोडवील, या भयास्तव भटब्राह्मणांतील अत्यंत वेदांती रामदास स्वामींनी महाधूर्त गागाभटाचे संगन्मताने, अक्षरशून्य शिवाजीचे कान फुंकण्याचे सट्टल ठरवून, अज्ञानी शिवाजीचा व नि:स्पृह तुकारम बुवांचा पुरता स्नेह वाढून दिला नाही.'
महात्मा जोतिबा फुल्यांच्या इतिहासमांडणीला संशोधनाचा वा कागदोपत्री साधनांचा आधार नव्हता. अशा तऱ्हेचा पुरावा पाच हजार वर्षांचा इतिहास लिहिणाऱ्याला मिळवणं शक्यही नव्हतं. शूद्रांच्या गुलामगिरीच्या सूत्रावर त्यांनी प्रचंड प्रतिभेनं एक इतिहासाचा प्रपंच उभा केला. पण विद्वत्मान्य इतिहासकारांत आज जोतिबांना काहीच मान्यता नाही. (शरद जोशी- रामदेवरायाचा धडा.प्रचलित अर्थव्यवस्थेवर प्रकाश)
शेतीमध्ये वरकड उत्पन्न तयार होऊ लागल्यापासून एका वेगळ्या कालखंडाला सुरूवात झाली. शेतीवर कष्ट करणाऱ्यांनी राबराबून अन्नधान्य तयार करावे आणि ते अशा अन्नधान्य लूटमार करणाऱ्या दरोडेखोरांनी लुटून न्यावे अशा व्यवस्थेचा हा नवीन कालखंड होता. लुटणाऱ्यांची संख्या वाढत गेली. तसे या लुटारूंचे रूपांतर सरकार राजामहाराजांत झाले. राज्यव्यवस्थेची सुरूवात हीच लुटीतून झाली. प्रत्येक लुटारू टोळीच्या प्रमुखाने स्वत:ची हत्यारबंद लुटीची फौज तयार केली. त्या फौजेच्या उदरभरणाकरिता आणि टोळीप्रमुखांच्या चैनीकरिता आसपासच्या शेतीतून तयार होणारे अन्नधान्य ताब्यात घेणे हे एकमेव साधन होते. काही काळानंतर या लुटीला व्यवस्थित स्वरूप देऊन महसुलाची यंत्रणा तयार झाली. प्रत्येक लुटारू-प्रमुख काही प्रदेशातील शेतकऱ्यांकडून त्यांच्या उत्पादनातील वाटा मिळविणे आपला स्वयंसिद्ध हक्क मानू लागले. मग आपापल्या राज्याच्या प्रदेशातील शेतकऱ्यांकडून लूट मिळवून त्यांचे समाधान होण्यासारखे नव्हते. राज्यातील शेतकऱ्यांवर दबाव आणण्यासाठी तयार केलेली फौज आसपासच्या राज्यावर चालून जाण्याकरिता राबवली जाऊ लागली. या लढाया जो जिंकेल तो सार्वभौम राजा. जो हरेल तो मांडलिक राजा. मांडलिक राजाच्याताब्यातील प्रदेश कायमचा ताब्यात घेण्याची आवश्यकता नव्हती. मांडलिक राजांकडून त्यांच्या प्रदेशात केलेल्या लुटीचा एक भाग मिळाला की सर्व जेत्या राजांचे समाधान होत असे. अशा लढाया निरंतर चालत. लक्ष्मी संपादण्याचा सर्वात फायदेशीर मार्ग नांगर चालवणे, बलुतेदारांचे व्यवसाय करणे हा नाही तर तलवार चालवणे हा बनला.
राजा-रयत परस्पर संबंधांचा काही परिणाम इतिहासात उल्लेखलेल्या मोठ्या राजकीय स्थित्यंतरावर होणे स्वाभाविक आहे. राजा-रयत संबंधात सौहार्द असेल तर त्या संबंधांचा परिणाम आणि राजाविषयी कदाचित त्यातूनच निर्माण होणाऱ्या स्वामिनिष्ठेचा परिणाम म्हणून आपल्या राजाविरुद्धच्या राजकिय स्थित्यंतराला प्रजेचा सक्रिय विरोध होण्यात दिसू शकतो. गनिमी काव्याला अनुकूल भौगोलिक रचनेबरोबरच अनुकूल समाजाचीही तेवढीच आवश्यकता असते. केवळ लुटीचे संबंध असतील तर राजाच्या लढायांबद्दल प्रजा पूर्ण उदासीनही होऊ शकतो. प्रसंगी राजाविरोधीही होऊ शकते. रयत राजा संबंधाचे सूत्र ध्यानात ठेवले तर इतिहासातील बऱ्याच गोष्टींचा उलगडा होऊ लागतो.
महाराष्ट्रातील इजिहासात एतद्देशियांचे राज्य जाऊन मुसलमानी सत्ता येणे, ती स्थिर होणे, मुसलमानी सत्ता जाऊन मराठ्यांची सत्ता येणे मराठ्यांची सत्ता जाऊन इंग्रजांची सत्ता येणे ही तीन स्थित्यंतरे घडली.
महात्मा फुल्यांच्या काळातच मराठ्यांचे राज्य जाऊन इंग्रजांचे राज्य येत होते. 'पेशवाईच्या सावलीत' या लेखामध्ये इतिहासकार शेजवलकरांनी वर्णन केलेल्या गोष्टींचे फुले कदाचित जवळचे साक्षीदार होते. १८५७ च्या इंग्रजांविरुद्धच्या एकेिशियांच्या राज्य टिकवण्याच्या शेवटच्या प्रयत्नाचे फुले साक्षीदार होते.
"सामाजिक प्रगतीला आणि क्रांतीला प्रतिकूल ठरलेल्या ब्राह्मणी राज्यापेक्षा इंग्रजी राज्य परवडले. नानासाहेब पेशवे जिवंत असले तर ब्राह्मणांचे जातिश्रेष्ठत्व मानणारे अन्यायी आणि प्रतिगामी राज्य पुन: महाराष्ट्रात आले असते," अशी भीती त्यांना वाटत होती. ( म.जोतिबा फुले- धनंजय किर : पृष्ठ ९१)
मराठा राज्यातून इंग्रजी राज्य येण्याच्या स्थित्यंतराची अनुभवलेली भावना जोतिबांनी हिंदू राजवट जाऊन मुसमानी राजवट येण्याच्या स्थित्यंतरात पाहिली.
महात्मा फुल्यांच्या मते सर्वसाधारण रयतेची हीच भावना त्यांच्या जवळच्या गढीत, किल्ल्यावर किंवा राजधानीत राहणाऱ्या स्वदेशबांधव व स्वधर्मीय सरदार, राजाविषयी असावी. मुसलमानी आक्रमकांडून एतद्देशीय राजाच्या पराभवातरयतेला सूडाचे समाधान असावे. म्हणून परकिय लुटारूंच्या रूपाने विमोचक आला असे वाटले असावे. किमान पक्षी दोन लुटारूंच्या लढाईत स्वत:चा जीव धोक्यात घालण्यात व धारातीर्थी पडण्यात रयतेला स्वारस्य वाटले नसावे.
महाराष्ट्रामध्ये देवगिरीची यादवांची सत्ता जाऊन मुसलमानी सत्ता आली याचे एक कारण सर्वच जण 'एकराष्ट्रीयतेचा अभाव' असे देतात. याचे उदाहरण म्हणून या प्रांतातच अनेक छोटी छोटी राज्ये होती, प्रत्येक राजा स्वत:ला 'राजाधिराज', 'पृथ्वी वल्लभ' इ. बिरुदे घेत होता आणि सर्व राजे आपआपसात भांडत होते- ही वस्तुस्थिती मांडली जाते. फुल्यांनी या एकराष्ट्रीयतेच्या अभावाचे अधिक खोलात जाऊन विश्लेषण केले आहे. त्यातल्या त्यात मोठ्या, प्रभावशाली असणाऱ्या हिंदुधर्मीयांच्या राज्याच्या अंतर्गतही एकराष्ट्रीयत्वाची भावना नव्हती असे सूचित केले आहे.
"अठरा धान्यांची एकि होऊन त्याचे चरचरीत कडबोळे म्हणजे एकमय लोक (Nation) कसे होऊ शकेल?" असा प्रश्न जोतिबांनी विचारला.
रयतेला आपण राजाच्या राष्ट्राचे आहोत असे वाटत नसेल, रयतेचे अगदी स्वकिय राजांशी असलेले संबंधही रक्त, अश्रू आणि घाम यांनीच भरलेले असतील तर एकराष्ट्रीयत्वाची भावना कशी निर्माण होऊ शकणार?
'एकमय लोक' या अर्थाचे राष्ट्र मुसलमानपूर्व महाराष्ट्रातही नव्हते. जोतिबांच्या वेळीही नव्हते आणि आजही तयार झालेले नाही. महाराष्ट्राच्या इतिहासात शेतीच्या लुटीचे युग सुरू झाल्यापासून एकसंध शेतकऱ्यांच्या, बलुतेदारांच्या हिताचे असे राष्ट्र उभे करण्याचा प्रयत्न एका लहानशा कालखंडात झाला. या कालखंडाचे नायक होते छत्रपती शिवाजी महाराज.
□
शिवपूर्वकालीन राजांचा इतिहास
शिवाजी महाराजांनी मावळ्यांना हाताशी धरून ज्या गुलामगिरीला जबरदस्त हिमतीने धक्का दिला ती गुलामगिरी मुसलमानी आक्रमणापासून सुरू झाली अशी सर्वसाधारण समजूत आहे.
इ.स.७११ पासून भारतावर मुसलमानी आक्रमकांचे हल्ले झाले तरी महाराष्ट्रावरचे पहिले मुसलमानी आक्रमण इ.स.१२९५ मध्ये अलाउद्दीन खिलजीने केले. तोपर्यंत महाराष्ट्रावर सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट घराण्यांनी राज्य केले. त्याखेरीज अभीर (खानदेश), त्रैकूट ( नाशिक), शतक्षत्रप (प. महाराष्ट्र ), शिलाहार (कोकण)अशाही काही छोट्या राजवटी ठिकठिकाणी सत्ता गाजवत होत्या.
या काळात देशाची स्थिती कशी होती याची कल्पना काही त्रोटक पुराव्यांच्या आधारे करावी लागते. सातवाहन काळात प्रजा आनंदात जीवन जगत होती, स्त्रियांना भरपूर स्वात्रंत्र्य व प्रतिष्ठा होती, सतीची चाल सुरू झाली नव्हती, वेगवेगळ्या व्यवसायांना सुरूवात झाली होती असे शिलालेख सांगतात.
राष्ट्रकूटांच्या काळात मुसलमान व्यापारी भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर उतरले, त्यांनी सागरी व्यापारावर ताबा मिळवला, किनारपट्टीवर आरमारी प्रभुत्व कायम केले. राष्ट्रकूटांच्या काळात चातुर्वर्ण्याला विकृत स्वरूप येऊ लागले, सोवळे ओवळे, विधवांचे केशवपन अशा चाली रूढ होऊ लागल्या असे दिसते.
यादव राज्याची सुरूवात नाशिक जिल्ह्यात झाली. ११८७ मध्ये देवगिरीची स्थापना झाली. कोकणातील शिलाहारांचे राज्य पूर्णत: नष्ट करून महादेवराय यादव याने कोकणावर ताबा बसवला. या घराण्यातील वेगवेगळ्या राजांनी स्वत:लाच ज्या पदव्या लावून घेतल्या आहेत त्या पाहता त्यांचा पराक्रम नाही, तरी महत्त्वाकांक्षा दिसून येते 'सपस्त भुवनाश्रय' , 'पृथ्वीवल्लभ', 'सकलपृथ्वी आश्रय', 'राजाधिराज' वगैरे. प्रसिद्ध हेमाडपंडित हा महादेवरायाच्याच दरबारात होता. त्याच्या 'चतुर्वर्ग चिंतामणी' हा ग्रंथ पाहिला म्हणजे तत्कालीन समाजाची काही कल्पना येते. अगदी क्षुल्लक व किरकोळ गोष्टीतही मुहूर्त आणि शुभाशुभपाहणे, संकटाच्या निर्वर्तनासाठी वेगवेगळे विधी आणि यज्ञयाग करणे याबद्दल हेमाडपंताने जी माहिती दिली आहे ती पाहता त्या वेगळ्या समाजाची किव व समाजधुरीणांविषयी चीड आल्याशिवाय राहत नाही. महादेवारायानंतर त्याचा मुलगा अम्मन हा राजा झाला. पण रामचंद्रदेवाने त्याला कपटाने कैदेत टाकले. एवढेच नव्हे तर त्याचे डोळे काढले आणि राज्य ताब्यात घेतले. रामचंद्राने बनारसपर्यंत स्वाऱ्या केल्या असे म्हटले जात असेल तरी त्याच्या कारकिर्दीपर्यंत इस्लामी आक्रमकांनी पंजाबपासून बंगालपर्यंत व हिमालयापासून विंध्यापर्यंत समग्र भारत व्यापला होता. हे पाहता या बढाईत फारसा अर्थ वाटत नाही.
अलाउद्दीनचा हल्ला व देवगिरीचा पाडाव
अशा या यादवांच्या राज्यावर अलाउद्दीन खिलजी ४००० घोडस्वार, २००० पायदळ सैन्य घेऊन चालून आला. पहिल्याच लढाईत रामदेवरायाचा पराभव झाला. त्यानंतर शंकरदेवाचाही पराभव झाला आणि अलाउद्दीन देवगिरीची प्रचंड संपत्ती घेऊन दिल्लीला परतला व त्याने दिल्लीचे तख्त ताब्यात घेतले.१३०६ साली मलिक काफूर ३०,००० फौजेसह देवगिरीवर ३ वर्षाच्या खंडणीची थकबाकी वसूल करण्याकरिता आला. लढाई पुन्हा देवगिरीलाच झाली. फिरून पुन्हा यादवांचा पराभव झाला. मलिक काफूर रामदेवाला कैद करून दिल्लीला घेऊन गेला. अलाउद्दीनने त्याला लालछत्र देऊन 'रायेरायान' हा किताब देऊन बरोबर विपुल द्रव्य व गुजराथेतील नवसारी जिल्हा बहाल करून परत पाठवून दिले. मरेपर्यंत रामदेवाने निष्ठावान मांडलिक म्हणून अलाउद्दीनची सेवा केली.
रामदेवाच्या मृत्यूनंतर शंकरदेव यादव याने पुन्हा एकदा बंड उभारण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा मलिक काफूर सैन्य घेऊन दिल्लीहून निघाला आणि विनासायास देवगिरीला पोचला. युद्धात पुन्हा शंकरदेवाचा पराभव झाला. एवढेच नव्हे स्वत: शंकरदेव ठार झाला.
अलाउद्दीनच्या मृत्यूची बातमी कळताच मलिक काफूर दिल्लीला पोचला. त्यावेळी रामदेवाचा जावई हरपालदेव याने पुन्हा एकदा स्वतंत्र होण्याचा प्रयत्न केला. दिल्लीचा नवा बादशहा मुबारक शहा याने एकाच वर्षात आपल्या राज्यात स्थिरता आणली आणि १३१८ मध्ये देवगिरीवर स्वत: चालून आला. पुन्हा एकदा युद्ध देवगिरीच्या आसमंतातच झाले. पुन्हा एकदा हरपालदेवाचा पराभव झाला आणि त्याला हालहाल करून मारण्यात आले. मुबारक शहा देवगिरीस ठाण मांडून राहिला आणि त्याने यादवांचे राज्य फिरून उभे राहून शकणार नाही अशा तऱ्हेने नष्ट करून टाकले.देवगिरीच्या पराभवाची कारणमीमांसा
देवगिरीच्या पहिल्या पाडावाची अनेक कारणे सांगितली जातात.देवगिरीचे सैन्य जागेवर नसणे, किल्ल्यात धान्याऐवजी मिठाची पोतीच भरलेली सापडणे, दिल्लीहून मागाहून मोठी फौज येत आहे अशी अफवा अलाउद्दीनाने मुद्दाम सोडून दिली होती, त्या अफवेने देवगिरीच्या सैन्याने घाबरून जाणे अशी त्यातील काही कारणे सांगितली जातात.
पण हा पराभव आक्रमणाच्या आकस्मिकपणामुळे आलेला दुर्दैवी पराभव होता असे मानण्याचे काहीच कारण नाही. संपूर्ण उत्तर भारतात मुसलमानी राजवट असताना मुसलमान दक्षिणेत उतरणारच नाहीत असे जबाबदार राजकर्ता मानूच शकत नाही. उत्तरेहून स्वारी निघाली आहे. ती लवकरच येऊन थडकणार आहे याची अगोदर बातमी न लागणे म्हणजे हेरखाते बिलकुल अस्तित्वात नसण्याचा पुरावाच आहे. एवढेच नव्हे तर राजाला प्रजेच्या, राज्याच्या संरक्षणाच्या जबाबदारीची जाणीव नसण्याचे द्योतक आहे. उत्तरेत सर्वत्र मुसलमानी राज्य आहे. दक्षिणेत केव्हातरी आक्रमण होईल याची जाणीव ठेवून दक्षिणेतील सत्तांची, सैन्याची एकसंध फळी उभी करण्याऐवजी ऐन मुसलमानी स्वारीच्या वेळीच युवराज शंकरदेव यादव ससैन्य दक्षिणेत स्वारीसाठी गेला होता. यातून देवगिरीच्या यादवराजांच्या मनात काही व्यापक राष्ट्रीय किंवा धार्मिक भावना नव्हती असे मानता येईल. याशिवाय देवगिरीच्या राजदरबारातही बेबनाव होता असे मानायला जागा आहे. रामदेवराय याने स्वत: राज्याचा अधिकारी वारस अम्मन याचा वध केला होता व राज्य बळकावले होते. महानुभावांच्या 'भानुविजय' ग्रंथात तर खुद्द हेमाडपंताने यादवांचे राज्य नष्ट करण्यासाठी तुर्कास बोलावले असा समज दिसतो.
देवगिरीच्या पहिल्या पराभवाची कारणे अशी अनेकविध आहेत, तरी पण पहिल्या पराभवानंतर तीनदा देवगिरीचा पराभव झाला व शेवटी पूर्ण पाडाव झाला हे सत्य नजरेआड करता येणार नाही. महाराष्ट्राची लक्ष्मी खंडणीच्या रूपाने दिल्लीला जात होती याचा शंकरदेवाला आणि हरपाळदेवाला राग जरूर आला पण महाराष्ट्राच्या प्रजेला जर हा राग आला असता तर नंतरच्या आक्रमणांना तोंड देण्यासाठी शंकरदेवाला किंवा हरपालदेवाला सैन्यबळ वाढवणे शक्य झाले असते. समाजाला गनिमी काव्याला अनुकूल करून घेणे सहज शक्य झाले असते. मुसलमानी सैन्य उत्तरेतून देवगिरीवर चालून येताना जागोजागी त्यांना अडवण्याची मोर्चेबांधणी करता आली असती. पण यादवराजांचे दुःख शेतकऱ्यांकडून लुटलेली संपत्ती दिल्लीला पाठवावी लागते या गोष्टीपुरते मर्यादित राहिले असेल तर केवळपगारी सैन्याच्या आधारावर आक्रमण थोपवणे अशक्य होणे स्वाभाविकच आहे.
यादवांचा पाडाव झाला. नंतर महंमद तुघलकाने राजधानी दिल्लीहून देवगिरीला आणण्याचा प्रयत्न करून पाहिला आणि नंतर बरीच वर्षे महाराष्ट्रावर पहिल्यांदा बहामनी आणि नंतर आदिलशाही, निजामशाही मुसलमान सत्ताधीशांची सत्ता राहिली. बहामनी राजाच्या सुमारे अठरा सुलतानांतले सात आठजण तर घातपातात ठार झाले. आंधळे झाले, पांगळे झाले. दरबारी कारस्थानांना बळी पडले. उरलेल्यांतील चार-पाच बहामनी सुलतानांनी शेतीभातीची व्यवस्था लावण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. पण त्याचबरोबर हजारहजार लोकांच्या कत्तली करून दहशत बसवणेही चालू ठेवले होते. बहामनी राज्य फुटून त्याच्या पाच सुलतानशाह्या झाल्या. त्यावेळी मात्र मराठा जहागीरदार वतनदारांचा उपयोग सुलतानांनी सुरू केला. थेट प्रजेला लुटायचे काम वतनदार जहागीरदारांनी करायचे, त्यांच्याकडून लुटीचा काही भाग सुलतानांनी वसूल करायचा आणि आपल्या युद्धासाठी जहागीरदार, वतनदारांनी पदरी बाळगलेले सैन्य वापरायचे अशी लुटीची उतरंडीची व्यवस्था सुलतानांनी राबवायला सुरूवात केली. यातून वतनदार जहागीरदार शिरजोर तर झालेच, पण सरशी होणाऱ्या सुलतानाकडे तातडीने जायच्या वृत्तीमुळे प्रजेचीही वाताहत सुरू झाली.
हिंदू राजाची सत्ता जाऊन मुसलमानी सत्ता महाराष्ट्रावर आली. स्थिर झाली याची कारणमीमांसा अनेकांनी केली आहे. 'राधामाधव विलास चंपू'च्या प्रस्तावनेत इतिहासकार राजवाडे म्हणतात,
"हिंदू राजवटीतील महाराष्ट्र संस्कृतीची व्याप्ती अत्यल्प ब्राह्माणांपुरती आणि उत्तरेकडील क्षत्रियांपुरती होती. बहुसंख्य नागवंशी आदी मराठे अत्यंत मागासलेले असून त्यांच्यात राष्ट्रभावनेचा उदय झालेला नसल्यामुळे ते अभिमानाने लढण्यास पुढे येऊ शकले नाहीत आणि त्यामुळे अल्पसंख्य आर्य क्षत्रियांचा पराभव होताच महाराष्ट्रात मुसलमानी झाली."
राज्यकर्ते क्षत्रिय आणि त्यांच्या आश्रयाने 'नागवंशीय आदी मराठा शेतकऱ्यांच्या' लुटीत सहभागी होणारे आर्य ब्राह्मण यांच्या बाजूने अभिमानाने लढायला शेतकरी तयार होतील ही अपेक्षा करणेच वास्तविक चूक ठरेल.
इतिहासकार शेजवलकरांनी राष्ट्रीयतेचा अभावाचे विश्लेषण अधिक शास्त्रीयतेने केले आहे.
"एतद्देशीय अल्पसंख्याक ब्राह्मण क्षत्रियांना इतर आडमुठ्यांच्या साहाय्याने स्वातंत्र्य का टिकवता येऊ नये? तर त्यांच्या सामाजिक उच्चनीचतेच्या मूर्खभावनांमुळे समाज दुभंगलेला आणि धार्मिक होता. आपापसात द्वेषबुद्धी आणि कदाचित सूडाचे वातावरण निर्माण झाले होते. आपले वर्चस्व टिकावे म्हणून इतरांना सर्व बाजूने दुबळे ठेवण्याची पद्धत उच्चवर्णीयांच्या अंगलट आली होती."
अल्पसंख्यांच्या फायद्याच्या सामाजिक रचनेला राष्ट्र कसे म्हणता येईल? बहुसंख्यांना राष्ट्र आपले वाटतच नव्हते आणि अल्पसंख्यांना सुद्धा राष्ट्रभावना होती की स्वार्थ भावनाच होती? याचा अर्थच हा की या ठिकाणी एक राष्ट्रच नव्हते.
१८५३ साली मार्क्सने एंगल्सला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे,
"खेड्यात राहणाऱ्यांना राज्ये फुटली, मोडली याचे काहीच दुःख नाही. खेड्याला धक्का लागला नाही तर ते कोणत्या राजाकडे जाते व कोणत्या सुलतानाची अधिसत्ता चालते याची काहीच चिंता नसते. गावगाडा अबाधित चालत राहतो."
इतिहासाचार्य राजावाडे यांनी महिकावतीची बखर' या पुस्तकाच्या प्रस्तावनेत हा विचार अधिक स्पष्ट केला आहे.
"गेल्या तीन हजार वर्षांत हिंदुस्थानात जी देशी आणि परदेशी सरकारे होऊन गेली ती सर्व एक प्रकारच्या पोटभरू चोरांची झाली व सरकार म्हणजे उपटसुंभ चोरांची टोळी आहे अशी हिंदू गावकऱ्याची अंत:स्थ प्रामाणिक समजूत आहे."
शिवपूर्वकालीन राजांचा इतिहास हा या प्रकारचा आहे. तो राष्ट्राचा इतिहासच नाही. तो राजवंशाचा आणि त्यांच्याभोवतालच्या भाऊगर्दीचाच इतिहास आहे.
□
शिवपूर्व काळ
१३१८ साली देवगिरीचा पाडाव पूर्ण झाला. शिवाजीचा जन्म १६३० सालचा आणि त्याने रोवलेली स्वराज्याची मुहूर्तमेढ १६५४ सालची. असे धरले तर या दोन घटनांमध्ये सव्वातीनशे वर्षाच्या वर काळ लोटला. या प्रदीर्घ काळात महाराष्ट्राचे सर्व रंगरूपच आमूलाग्र बदलून गेले.हे बदल समजून घेणे महत्त्वाचे आहे कारण त्याशिवाय शिवाजीने घडवून आणलेल्या क्रांतीची सर्वंकषता कळणे कठीण होईल.
परशुरामाने पृथ्वी निःक्षत्रिय करून टाकली त्यामुळे आता पृथ्वीवर संरक्षणाची जबाबदारी उचलणारा, राज्यभार सांभाळणारा कोणी शिल्लकच उरला नाही अशी मान्यता मुसलमानी आक्रमणाच्या आधी कित्येक वर्षांपासून होती. अकबराच्या काळात कृष्ण भट्ट शेष याने 'शूद्राचार शिरोमणी' नावाचा एक ग्रंथ लिहिला आणि हिंदूधर्मात आता राजतेजाचे वा राजवंशाचे क्षत्रिय कोणीच उरले नाहीत, उरले ते फक्त ब्राह्मण व शूद्रच असे प्रतिपादन केले.
महाराष्ट्रात देवगिरीच्या पाडावानंतर भूमी खरोखरच निःक्षत्रिय झाल्यासारखी दिसू लागली.राजवंशांचा व लष्करी पेशातील समाजाचा समग्र उच्छेद मुसलमानांनी मांडल्यामुळे तो समाज लुप्तच झाला. आसपासच्या उपजीविकेसाठी कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांत मिसळून जाण्याखेरीज जिवंत राहण्याचीसुद्धा त्यांना काही शक्यता राहिली नाही. आपली हत्यारेपात्यारे गाडून टाकून ही मंडळी हाती नांगर घेऊ लागली. यामुळे शिलाहारांचे शेलार, परमारांचे पवार, कदंबांचे कदम आणि यादवांचे जाधव बनले. दरबारात मान असलेले मनसबदार दरकदार यांची वाताहत झाली. उत्तम शेती, मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी ही म्हण या आपत्कालात तरी प्रत्यक्षात आली.
राजदरबारात सर्व महत्त्वाची स्थाने मुसलमानांकडे गेली. धर्मांतर केलेल्यांना दरबारात हलकिसलकि अपमानास्पद कामेच मिळाली. संस्कृत व मराठी भाषांचा उपयोगसंपला.फारशी वाचूशकणारे पारसनीस महत्त्वाचे ठरले. दररोतच्या बोलण्यातही हजारोंनी फारसी शब्द मराठीत घुसले. लोकांचा वेशभूषेचा, राहणीचा ढंगच मुसलमानी होऊन गेला. हिंदू देवदेवतांपेक्षा मुसलमानी पीर आणि फकिर जास्त सामर्थ्यवानआहेत या भावनेने पोरे होण्यासाठीसुद्धा नवस त्यांचेच होऊ लागले आणि मुलांच्या नावात बाजीराव, हिम्मतराव, जानराव सर्रास आढळू लागले.
मुसलमानी सत्तेच्या लाटेस तोंड देण्याचे जे काही किरकोळ प्रयत्न झाले ते समूळ मोडून काढण्यात आले. इ.स.१४७२ पर्यंत महाराष्ट्रात प्रतिकार करणारी संघटित शक्ती शिल्लकच राहिली नाही. या नंतरचा महाराष्ट्राचा सगळा इतिहास हा बहामनी राज्यांच्या मोडतोडीचा आणि विजयनगरच्या वैभवाचा. तालीकोटाच्या लढाईनंतर तर सर्वच आशा संपल्या आणि नामदेवाच्या म्हणण्याप्रमाणे कलियुगाचा अंत होईल तेव्हा कलंकी अवतारच म्लेंच्छांना नष्ट करेल, तोपर्यंत हरिनाम घेण्यापलीकडे पर्याय नाही अशी अगदी भल्याभल्यांची धारणा झाली होती.
यानंतरचा इतिहास हा प्रामुख्याने मोगल सुलतानांच्या आपापसातील लढायांचा आहे. बहामनी राज्याचे तुकडे झाले; त्यांच्यातील लढायांचा शेवट म्हणून फक्त आदिलशाही व निजामशाहीच काय ती उरली आणि त्याचवेळी दिल्लीतील मोगल सत्ता स्थिर होऊन तिने दक्षिणेकडे नजर फिरवली आणि सहधर्मीय पातशाह्यांवर आक्रमण चालू केले. दिल्लीच्या आक्रमणाला तोंड देणे आदिलशहास व निजामशहास दोनशे वर्षांपूवी रामदेवरायास जितके कठीण गेले तितकेच कठीण वाटू लागले. अशा परिस्थितीत धर्माभिमान वगैरे बाजूला ठेवावा लागतो. दक्षिणेतील सुलतानांनी मराठे सरदारांना आपल्या पदरी ठेवून घेण्यास, एवढेच नव्हे तर त्यांना दरबारात मानमरातबाच्या जागा देण्यासही सुरूवात केली. मराठ्यांच्या अभ्युदयाला सुरूवात झाली ती उत्तरेतील मोगल आणि दक्षिणेतील सुलतानशाह्या यांच्यातील स्पर्धांच्या युद्धांमुळे.
संतांची कामगिरी
मुसलमानी आक्रमणाखाली अनेक देश भरडले गेले. स्पेनसारख्या देशात मुसलमानांचा पराभव झाला. आर्मेनियासारख्या देशात मुसलमानी आक्रमकांशी स्थानिक जनतेने सतत तीव्र संघर्ष केला आणि त्यांना तुर्कस्थानात परत जाण्यास भाग पाडले. याच्या अगदी उलट्या टोकाला मलाया, इंडोनेशियासारखे देश ! या देशात मुसलमानी आक्रमणपूर्व संस्कृती नामशेष झाल्या. या देशांप्रमाणेच महाराष्ट्रही मुसलमानी आक्रमणाच्या पहिल्या धक्क्यामुळे कोसळला.पण ३०० वर्षांच्या प्रदीर्घ वनवासानंतर त्यातून बाहेर पडला ही एक विशेषच घटना आहे. या काळात पराभूत झालेले,उपासमारीने, दुष्काळाने दुःखाने गांजलेले लोक काय विचार करीत होते? आपल्या डोळ्यासमोर घरच्या मायबहिणींनाओढून नेत असताना हताशपणे पाहण्याची ज्यांच्यावर पाळी आली त्या लोकांनी मनात काय विचार आणला असेल? ३०० वर्षांपर्यंत हा समाज सुप्तावस्थेत गाडला गेला होता.३०० वर्षांनी तो त्यातून बाहेरआला. ३०० वर्षांनंतर पुन्हा फुलून उठलेल्या या अस्मितेचे रहस्य काय?
ज्यांच्या आयुष्याच्या एक क्षणाची शाश्वती नाही, ज्यांना संध्याकाळच्या भाकरीची भ्रांत आहे आणि पोराबायकांच्या अब्रूचीही खात्री नाही असा समाज कोणते तत्त्वज्ञान स्वीकारेल? हजारो गाईचे कळप बाळगणाऱ्या सुरक्षित, संपन्न आर्य समाजाच्या यज्ञयागांना त्याच्या दृष्टीने काहीच अर्थ नसणार. स्वस्थ गृहस्थीची यज्ञयाग आणि पुरुषार्थाचा गौरव करणारी नीतितत्त्वे पराभूत अपमानित समाजाच्या काय उपयोगाची?
एका बाजूला देवगिरीवर हल्ला होत असताना संत ज्ञानेश्वरांनी भक्तिमार्गाची गुढी रोवली. परमेश्वराशी एकरूप होण्याचा नामसाधन हा मार्ग भक्तिपंथाने मांडला.अगदी निराधार निराश्रितांनासुद्धा परमेश्वराचे नाव मुखी घेण्याची तरी शक्यता आणि स्वास्थ्य असते.हरघडी डोळ्यासमोर ओढवणाऱ्या दु:खातून मोकळे कसे व्हावे? तर या इहलोकीच्या दुःखाना काही महत्त्वच नाही. 'बाईल मेली बरे झाले, पोर मेले त्याहून बरे झाले.' अशाही परिस्थितीत तुकारामाला आयुष्य सार्थकी लावता येते तर आपल्याला निराश होण्याचे काय कारण? 'जयजय रामकृष्ण हरी' आणि 'पुंडलिक वरदा'च्या घोषाने दुःखे संपली नाहीत तरी या दुःखापलीकडे पाहण्याची ताकद समाजाला मिळाली.
भक्तिमार्गाने समाजात एक मोठा बदल घडवून आणला. चातुर्वर्ण्याने समाजाची शकले पडली होती. जातीच्या बंधनांपलीकडे जाणे वरच्या वर्णातील लोकांनाही शक्य नव्हते. खालील जातीत जन्मलेल्यांना त्यांच्या अवस्थेविषयी तक्रार करण्याचीही शक्यता नव्हती. धर्म आणि अध्यात्म ही केवळ उच्चवर्णीयांची मक्तेदारी. जन्मभर काबाडकष्ट, निकृष्ट राहणीमान आणि दैनंदिन जीवनात पदोपदी अपमान आणि अवहेलना या पलीकडे शूद्रातिशूद्रांना दुसरे आयुष्य नव्हते.निव्वळ माणुसकि म्हणून त्यांच्याकडे पाहणेसुद्धा धर्मसंमत नव्हते. अशा परिस्थितीत ज्ञानेश्वरापासून तुकाराम महाराजापर्यंत सर्व संतांनी जातीव्यवस्थेतील उच्चनीचतेवर आपल्या लिखाणाने आणि वागणुकिने उघडपणे आघात केले. शूद्रातिशूद्रांना समाज पारखा झाला होता. मुसलमानी आक्रमणाचे त्यांना दु:ख वाटणे तर सोडूनच द्या पण सोयरसुतक वाटत नव्हते. संतांनी उपदेशिलेल्या भक्तिमार्गामुळे त्यांच्या मनात आसपासच्या समाजाशी आपले काहीतरी लागेबांधे आहेत अशी भावना तयार होणे शक्य झाले. पण भक्तिमार्गामुळे जातीव्यवस्था संपली नाही. ती आजतागायतही संपलेली नाही; पण निदान परकिय आक्रमणाला तोंड देण्यापुरते का होईना वेगवेगळ्या जातीचे लोक एक फळी उभारायला तयार होऊ लागले.
संतांनी बजावलेली आणखी एक मोठी कामगिरी म्हणजे अध्यात्म व धर्मजनसामान्यांच्या मराठी भाषेत मांडणे. संस्कृत भाषा फक्त ब्राह्मण समाजापुरती मर्यादित. सर्व धर्मग्रंथ संस्कृत भाषेतलेच. धार्मिक विधीच्या वेळी ब्राह्मणांच्या तोंडून न समजणाऱ्या मंत्रांचे घोष ऐकण्यापलीकडे लोकांची धर्मविचाराशी वा तत्त्वाशी तोंडओळख होण्याची काहीही शक्यता नव्हती. सर्व धर्मकारण मराठीत आणून अत्यंत दुष्कर परिस्थितीत कथाकिर्तनांचा जोर लावून आणि स्वत:च्या शुद्ध, सात्त्विक आचरणाच्या प्रतिष्ठेची जोड देऊन संतांनी सामान्यजनांना धर्मविचाराचे एक नवीन दालन उघडून दिले. धर्म म्हणजे निरर्थक वटवट नाही. धर्मविचार सामान्य जीवनातही महत्त्वाचा आहे. सामान्यांनाही कळण्यासारखा आहे याची जाणीव जनसामान्यांना पहिल्यांदा झाली आणि या नव्या दालनातील विचारांच्या वैभवाने ते दिपून आणि मोहरून गेले. तुकडे तुकडे झालेल्या समाजाला एकत्र जोडण्याकरिता संतांनी केलेले हे काम अद्वितीयच मानावे लागेल.
वारकरी पंथाची शिकवण व त्या पंथाने तयार केलेल्या संस्था समकालीन समाजाच्या परिस्थितीशी निगडित होत्या. पंथाला समाजात जी मान्यता मिळाली त्याचे कारण समाजाची अत्यंत आवश्यक गरज वारकरी पंथ भागवीत होता. याचे एक चांगले उदाहरण म्हणजे वारकरी पंथाचा गाभा समजली जाणारी पंढरपूरची आषाढी यात्रा. भर खरिपाच्या हंगामात बहुसंख्य कोरडवाहू शेतकरी लाखालाखाच्या संख्येने शेतीतील कामे-धामे संपवून पंढरपूरला जातात ही तर्काला न पटणारी गोष्ट. पंढरीच्या वारीतील भक्तिभावपाहून अनेकांनी भक्ति रसाने ओथंबलेली काव्ये रचली. विठोबाच्या भक्तद्दची पेठ उघडली गेली आणि विठोबा रखुमाई हा मोठा किफायतशीर व्यवसाय बनला. पंढरपूरला जाणारा वारकरी शेतीतील कामे सोडून भक्तद्दच्या पुरात वाहात पंढरपूरला जातो ही गोष्टच मुळात खोटी. देहू, आळंदी तसेच पंढरपूरला जाणाऱ्या दिंड्या जेथून जेथून निघतात ते सगळे विभाग कोरडवाहू शेतीचे आहेत. त्या भागात भूगर्भातील पाणी जवळ जवळ नसल्यासारखे. अस्मानी आणि सुलतानीने शेतकऱ्यांची परिस्थिती अशी की शेवटचे धान्य खाऊन शिमगा साजरा करायचा. मुळे,पाने, गवताचे बी असे खाऊन आणखी काही पंधरवडे डबरा भरायचा. आगोठीला बियाण्यांची ज्वारी जी शिल्लक असेल ती नाहीतर उसने पासने करून आणलेली शेतात फेकायची; आणि हाती काही तरी पीक येईपर्यंत देशोधडीला लागायचे. पंढरपूरच्या आसमंतातील जमिनीच्या पोटात उदंड पाणी आहे. आजही तेथील एकेका विहिरीवर सात आठ एकर ऊस निघू शकतो. ज्वारीचे पीकही भरभरून येते. कोरडवाहू शेतकरी पोटाच्या सोयीकरिता निघाले की त्यांचे पाय साहजिकच पंढरपूरकडे वळत. साहजिकच वाटेने भले शेतकरी त्यांना भातरतुकडा घालायला मागेपुढे पाहत नसत. आजही देहू आळंदीहूननिघालेल्या दिंडीतील वारकरी चिंचवडभोसरीपर्यंतच उदार भाविकांनी वाटलेले कुरमुरे, केळी आणि दशम्या किती हव्यासाने गोळा करतात हे पाहिले म्हणजे पंढरपूरची वारी हा निराधारांचा आधार आहे हे स्पष्ट होते. वारकरी पंथाने या चलनवलनातील लाचारीचे रूप काढून टाकले. पंढरपूरला जाणारे पोटार्थी भिकारी राहिले नाहीत. पंढरीनाथाचे पुण्यवान भक्त झाले. त्यांना भाकरतुकडा घालणारे श्रीमंत दाते राहिले नाहीत. विठोबाच्या भक्तांच्या सेवेचे मानकरी झाले. महाराष्ट्रातील भक्तिमार्ग हा एका अत्यंत बिकट दैनावस्थेत समाजाला तगवून धरणारा चमत्कार ठरला तो असा.
१६ व्या शतकाच्या शेवटी आणि १७ व्या शतकाच्या सुरूवातीस मुसलमान अंमलाखालीच का होईना मराठी सरदारांचा पुन्हा उदय होऊ लागला आणि नवीन बदलाची पहाट दिसू लागली त्यावेळी निवृत्तीपर संतपंथाबरोबरच रामदासांच्या आचार्य परंपरेलाही जोम आला. पुन्हा रामदासांच्या ओजस्वी वाणीत आपले प्रतिबिंब पाहू लागला होता.
मराठ्यांचा अभ्युदय
१६ व्या शतकाच्या शेवटी मोगलांची धास्ती तयार झाल्यापासून दक्षिणेतील सुलतानांनी मराठी माणसांना आश्रय अन् मान देण्यास सुरूवात केली. या वेळेपर्यंत सुलतानांच्या दरबारातही अंदाधुंदी आणि बेबंदशाही माजलेली होती. दरबारातील वजिरापासून मनसबदारापर्यंत सगळेजण सतत कटकारस्थानात गुंतलेले असत. कधी सुलतानाची मर्जी सांभळण्याकरिता, कधी सुलतानाला गादीवरून उठवून लावण्याकरिता, कधी दरबारातील दुसऱ्या मानकऱ्यांचा पाडाव करण्याकरिता, कधी आपल्या मर्जीतील सरदारांना मोठे करण्याकरिता कारस्थाने आणि लढाया सतत चालू असत. सुलतानांनाही कधी दरबारातील एका पक्षाकडे तर कधी दुसऱ्या पक्षाकडे झुकावे लागे. कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नव्हता. मुसलमान सरदाराबरोरब महाराष्ट्रात घोरपडे, घाटगे, निंबाळकर, जाधव, भोसले इत्यादी घराणी बारगिरांचा फौजफाटा बाळगून नावारूपास येऊ लागली. दरबारातून मनसबदारी मिळवावी, आपले सैन्य बाळगावे, सरकार दरबारात सारा भरावा, दरबाराच्या अधिकाऱ्यांशी आणि जवळच्या कील्लेदारांशी लाचारी करावी म्हणजे आपल्या मुलखात आपल्याला सार्वभौम राजाप्रमाणे बेबंद वागता येते हे त्यांना पुरतेपणी कळले होते. आपल्या वतनांपलीकडे जाऊन दुसऱ्याच्या वतनातूनही लूटमार करावी अशी त्यांची प्रवृत्ती. त्यामुळे रयतेचे जीवन पुन्हा एकदा मोठे कठीण होऊन गेले. देवगिरीपूर्व काळातील जुलमातून आणि लुटीतून मुसलमान आल्यामुळे जी शाही मुक्तता झाली होती ती संपुष्टात आली आणि शेतकऱ्यांचे जीवन एकदा अत्यंत दुःसह झाले. शिवाजीच्या जन्माच्या वेळीमहाराष्ट्रावर विजापूरचा आदिलशहा, नगरचा निजामशहा आणि दिल्लीतील मोगलशाहीच्या सुभेदारांचा अंमल होता. सर्व शाह्यांच्या ताब्यातील मुलूखांच्या सीमा लागून असल्यामुळे एकमेकांचा मुलूख बळकावण्याच्या सरदाराच्या सत्ता स्पर्धा नेहमीच चालत. महाराष्ट्रातील जनतेला त्या काळात जाच होत होता. आपपल्या मुलूख वाढवणे राज्याच्या सीमा विस्तारित करणे, गेलेले मुलूख परत मिळविणे, जिंकून नवा मुलूख ताब्यात घेणे याचा परिणाम त्यावेळच्या रयतेवरच होत असे. खेडूत, शेतकरी, बलुतेदार कोणाच्या तरी फौजेकडून लुटूनच घ्यायचे आहे अशा अपेक्षेत जगत.
देशमुखी व वतनदारी ही त्या काळात रूढ झालेली होती. वतनदारांनी फौजा ठेवायाच्या, त्या फौजांनी शेतकऱ्यांची लूट करायची आणि लुटीचा एक भाग हा ज्या सरदाराची वतनदारी त्या भागात असेल त्याला द्यायचा. शिवाजीराजाच्या जन्मापूर्वी फक्त २ वर्षे आधी म्हणजे १६२८ ते १६३० या काळात महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला. सतत दोन वर्षे पावसाचा थेंबही नाही. त्यामुळे अन्नधान्याचे उत्पादनही नाही. बादशहाच्या फौजांकडून वेळोवेळी झालेल्या लुटीमुळे शेतकऱ्यांकडे धान्याचा साठा म्हणून शिल्लक राहिला नव्हताच. साहजिकच महाराष्ट्रामध्ये अन्नानदशा निर्माण झाली. याचे समर्थ रामदासांनी अतिशय बोलके असे वर्णन केलेले आहे.
पदार्थमात्र तितुका गेला । नुसता देशचि उरला
जन बुडाले बुडाले, पोटेविण गेले
बहु कष्टले, किती येक मेले
माणसा खावया अन्न नाही। अंथरुण पांघरुण तेहि नाही
कितेक अनाचारी पडिली । कितेक यातिभ्रष्ट जाली।
कितेक ते आक्रंदली । मुलेबाळे ॥
कितेक जिवे घेतली। कितेक जळी बुडाली।
जाळिली ना पुरली। किती येक ॥
भिक्षा मागता मिळेना । अवघे भिकारीच जना । काय म्हणावे।
लोके स्थानभ्रष्ट जाली। कितेक तेथेचि मेली।
उरली ते मराया आली। गावावरी ॥
प्राणिमात्र जाले दु:खी।
याच परिस्थितीचे वर्णन 'बादशहानाम्या'त अत्यंत भेदक केलेले आहे.या
दुष्काळाचा परिणाम मराठी मुलखास दीर्घकाळ भोगावा लागला.
तेपढा महसूलसुद्धा गोळा होत नसे....भाकरीच्या तुकड्यासाठी लोक स्वत:ला विकून घ्यावयास तयार होते. पण विकत घेणाराच कोणी नव्हता. एका भाकरीसाठी लोक आपल्या पदाचा त्याग करावयास तयार होते. पण त्याची कोणाला पर्वा नव्हती. शेवटी दारिद्र्य इतके शिगेला पोहोचले की, माणसे माणसाला खाऊ लागली आणि पुत्रप्रेमापेक्षा त्याचे मांस हे त्याला प्रिय वाटू लागले.'
याचवेळी उत्तरेतही पाऊस पडला नाही. पण दिल्ली दरबाराच्या कार्यवाहीमुळे दक्षिणेतेल्याइतके दुष्काळाचे भीषण परिणाम जाणले नाहीत. महाराष्ट्रात मात्र यापेक्षा वेगळी परिस्थिती होती. महाराष्ट्रात नेमका अंमल कोणाचाच नव्हता. एक राजा नव्हता. बेबंदशाही माजली होती आणि सगळीकडे लुटारूंचे साम्राज्य पसरले होते.
राजवाडे या दुष्काळासंबंधी 'राधा-माधव विलास चंपू'च्या प्रस्तावनेत म्हणतात, "एका हंदक्यास म्हणजे लहान होनास २०० दाणे झाले. अखेर करवसुली शक्य नसल्यामुळे मूर्तजाची (निझाम) आधीच खंगलेली तिजोरी पूर्णपणे शुष्क होऊन गेली.'
परमानंदाच्या शिवभारतातसुद्धा या दुष्काळाचा उल्लेख आहे. अर्थात त्यात कवीला शोभेल अशी अतिशयोक्तद्द असणे शक्य आहे.
"पुष्कळ काळापर्यंत अहमद निझामानंतरच्या देशात धान्य महाग आणि सोने स्वस्त झाले. श्रीमंत लोक शेरभर रत्ने देऊन मोठ्या प्रयासाने शेरभर कुळीथ घेत. खाण्यास काही नसल्यामुळे एकच हाहाकार उडून पशू पशूस आणि माणसे माणसास खाऊ लागली.' (शिवपूर्व शिवभारत अध्याय ८; ५३- ५५)
या दुष्काळाबद्दल इंग्शिल फॅक्टरी रेकॉर्डस्मध्ये एका समकालीन व्यापाऱ्याने असे म्हटले आहे, 'लोकांची एकच मागणी होती- आम्हास खावयास द्या, नाही तर मारुन टाका.'
या दुष्काळात वतनदाराची वागणूक शेतकऱ्यांशी कशी होती कशी होती याचा उल्लेख करणे अत्यंत आवश्यक होतील. शेतकऱ्याकडील महसूल हे वतनदारांचे मौजमजा उडवायचे साधन असल्यामुळे या दुष्काळी परिस्थितीतसुद्धा वतनदाराचे महसूल अधिकारी वसुली करण्यासाठी थैमान घालीत. वसुलीसाठी गावे बेचिराख केली जात.
सैनिक उभ्या पिकाचा फडशा पाडत. या दुष्काळी परिस्थितीत तर शेतकऱ्याकडे रोख काही नसल्यामुळे अधिकाऱ्यांची वक्र दृष्टी त्यांच्या घराकडे वळे आणि असेल नसेल ते किडूकमिडूकही लुटले जाई.
या दुष्काळाचा फटका तुकाराम महाराजांसारख्यांना बसला. तुकाराम महाराजांची पहिली बायको व त्यांचा एक मुलगा या दुष्काळात अन्न अन्न करीत मरण पावला.तुकारामासारख्या वैरागी संताची प्रतिक्रिया अभंगात लिहिली गेली.
बाईल मेली मुक्त झाले । देवी माया सोडविली ॥
पोर मेले बरे झाले । देवे मायाविरहित केले॥
माता मेली मजदेखता । दु:खात मना पळाली चिंता ॥
बरे झाले देवा निघाले दिवाळे । बरे या दुष्काळे पिडा गेली ॥
बरे झाले जगी पावलो अपमान । बरे गेले धन ढोगे गुरे ॥
पण संसारी गृहस्थांच्या मनात आपली पोरेबाळे आणि बायामाणसे डोळ्यासमोर भुकेने पटापट प्राण सोडताना पाहून काय आगीचा डोंब उसळला असेल याची कल्पनादेखील कठीण आहे.
समर्थ रामदास याच काळात महाराष्ट्रात लोकदर्शनासाठी संचार करीत होते. त्यांनी
या काळात महाराष्ट्राच्या परिस्थितीचे केलेले वर्णन असे-
किती येक छंद ते छंद ना बंद नाही। किती येक बेबंद ते ठायि ठायी।
किती येक ते धान्य लुटूनि नेती। किती येक ते पेव खणोनि नेती ॥
किती येक ते पूरिले अर्थ नेति । किती पूरिलीं सर्व पात्रेचि नेती ॥
किती येक ते प्राण कर्णेचि घेती। किती उत्तमा त्या स्त्रिया भ्रष्टवीती॥
अशा परिस्थितीत त्या वेळेचे समाजधुरीण कसे वागत होते हे पाहण्यासारखे आहे. विद्वान पंडितराज जगन्नाथ हे शहाजहान राजाचा आश्रयाने होते. त्यांना जयपूरच्या हिंदू राजाने आपल्या राजसभेचे भूषण होण्यासाठी बोलाविले असता त्याला त्यांनी उत्तर दिले.
दिल्लोश्वरो वा जगदीश्वरो वा मनोरथान् पुरवितुं समर्थः
अन्यैनृपालैः परिदीयमानं शाकाय वा स्थल्लवणाय वा स्थान
(माझे मनोरथ पूर्ण करण्याचे सामर्थ्य केवळ दिल्लीश्वर व जगदीश्वर या दोघांच्यातच आहे. बाकि राजांनी मला काही देण्याचे मनात आणलेच तर ते फार तर माझ्या मीठमिरचीला पुरण्याइतपतच राहील.)
पंडितराज जगन्नाथांसारख्या विद्वान माणसाची ही अवस्था, तर महाराष्ट्रातील किरकोळ पंडितांच्या अधिपत्याखालील धार्मिक संस्था तर पार रसातळालाच बुडाल्या होत्या. धर्माचा किंवा धार्मिक संस्थाचा सामान्य रयतेला आधार वाटावा अशी परिस्थितीच शिल्लक राहिली नव्हती. धार्मिक संस्थांवरील आपला हक्क ब्राह्मण लोकही वतनदार देशमुखांप्रमाणेच बादशहाकडून सही शिक्का आणून मिळवीत. धार्मिक संस्थाचे उत्पन्न कोणी घ्यायचे? यावर हक्क कोणाचा? यासाठी त्या काळातील तथाकथित विद्वान समाजधुरीण आपापसात भांडत आणि हे भांडण सोडविण्यासाठीते सुलतानाकडे धाव घेत. नाशिक येथील 'वेदोनारायण' ऋग्वेदी यांत्रेकरूंची पिंडे कुणी पाडायची आणि यजुर्वेदी यात्रेकरूंची पिंडे कोणी पाडायची याकरिता भांडत होते.आणि आपापसात भांडून निर्णय मागायला बादशहाकडे किंवा वजिराकडे जात होते.
सप्तशृंग भवानीची पूजा कोणी करायची हा तंटा सुलतानी ठाणेदारापुढे जात होता. याचवेळी कित्येक वेदशास्त्रसंपन्न शास्त्री, पंडित केवळ वर्षासनाच्या भिकेसाठी गोदावरीच्या तीरावर किंवा कृष्णेच्या तीरावर पूजाअर्चा करून. "हजरत साहेबांना परमेश्वराकडून दुवा' मिळवून देत होते. पंढरपूरचे बडवे व महाजन देवापुढच्या विड्यासाठी भांडत होते. कोकणात देवरुखे व इतर ब्राह्मण देवरुख्यांच्या घरी ब्राह्मणांनी जेवायचे की नाही यासाठी वितंडवाद घालीत. सबंध महाराष्ट्र जुलूम, अत्याचार आणि गुलामगिरीच्या टाचेखाली भरडला जात आसताना वैदिक धर्माचा वारसा सांगणारे भिकेसाठी, वतनाच्या एका तुकड्यासाठी, खोट्या प्रतिष्ठेसाठी आपापसात भांडत होते. विद्वान वेदशास्त्रसंपन्न समाजधुरीणांची ही अवस्था होती. दुसरीकडे, क्षात्रतेजाचा वारसा सांगणाऱ्या मराठे सरदारांचीही अवस्था काही वेगळी नव्हती. ते लढत होते, शौर्य गाजवत होते. मोगल, निझाम किंवा आदिलशहाच्या तख्ताच्या रक्षणासाठी आणि रयतेला लुटून बादशाही खजिना भरण्यासाठी. छत्रपती शिवाजीमहाराजांचे वडील शहाजी राजे यांचा सुपे आणि पुणे परगणा हा प्रांतसुद्धा मराठ्यांच्या या लुटीतून सुटू शकला नाही. शहाजीराजांनी आदिलशहाचा मुलूख मारला तो निझामासाठी. पण आदिलशहाचा वजीर खवासखान याने शहाजीराजांची बंडखोरी मोडण्यासाठी रायाराव व मुरारपंत या दोन मराठी सरदारांना पाठविले. आदिलशहाच्या फौजा पुण्यात घुसल्या. सैनिकांनी पुण्यात थैमान घातले. शहाजीराजांचे वाडे पेटविले. गरिबांच्या हालाला तर पारावारच उरला नाही. तलवारीचे वार आणि आगीच्या ज्वाळांचा तडाखा चुकविण्यासाठी ते पुणे सोडून पळत सुटले. रायारावाने पुण्याच्या भोवती असलेली तटबंदी पार पाडून टाकली, पुण्याच्या डौलदार वेशी सुरूंगाने उद्ध्वस्त केल्या. महंमद आदिलशहा आणि खवासखानाच्या मनातील शहाजीराजांची जहागिरी उद्ध्वस्त करण्याचे स्वप्न पूर्ण केले ते मराठे सरदार मुरारपंत आणि रायारावाने. या शौर्यासाठी रायारावाला आदिलशहाने 'प्रतापराव' असा किताब बहाल केला. रायाराव व मुरारपंतानी खरोखरीच चार पायाची गाढवे आणून त्यांचा नांगर पुण्यावरून फिरवला. लोखंडी पहार जमिनीमध्ये ठोकली. फुटकी कवडी आणि तुटकी वहाण पुण्यात टांगून ठेवली. हेतू हा की स्वाभिमानाने उभे राहण्याचा प्रयत्न केला तर त्याचा परिणाम असा होतो अशी दहशत बसावी.
अशा या असुरक्षित राजकिय अस्थिरतेच्या वातावरणात मराठे सरदार मात्रजमिनीच्या तुकड्यावरून आणि शेतकऱ्यांच्या लुटीच्या मोबदल्यावरून आपापसात भांडत होते. जेधे-बांदल संघर्ष हा त्या दृष्टीने ठळक आणि महत्त्वाचा आहे. अखेर या दोन सरदारांच्या आपापसातील वैराचा निर्णय लढाईनेच लागला. अगदी ठरवून युद्ध घडवून आणले. रणखांब ठोकले गेले. युद्धाच्या ठरलेल्या तिथीनुसार परस्परांना आव्हान देत बांदलांचे १२५० लोक आणि जेध्यांचे ७०० लोक रणभूमीवर आले. ३०० माणसे लढाईत कापली गेली. मृतांचे देह जातवार वेगळे गेले. घरे मोडून त्याचे वासे काढून प्रेते एकत्र जाळली गेली.
कारीचे जेधे व उतरावळीचे खोपडे यांचे पिढ्यान्पिढ्यांचे वैमनस्य होते. बिदरच्या बादशहाकडून आबाजी जेध्यांना देशमुखीच्या वतनाची सनद मिळाली. ती घेऊन येत असल्याची बातमी खोपड्यांना कळताच गाडे खिंडीत गाठून जेध्यांना त्यांनी ठार मारले. तेव्हा जेध्यांच्या वंशाने हे वैर पुढे कायम ठेवले आणि खोपड्यांचे एक लग्न करनवडे मुक्कामी येत असल्याचे कळताच पाळत ठेवून लग्नाचे सारे वऱ्हाडच जेध्यांनी कापून काढले. या हत्याकांडात बायकाही कापल्या गेल्या. चोरगे - शिळीमकरांचे वैरही असेच प्रसिद्ध आहे. पायगुडे, ढमाले, देशमुख यांच्यामध्ये जीवघेणी हाणामारी सुरू झाली. पाटीलकीसाठी कोंडाजी तानवणेने लुमाजीच्या कुटुंबात ६ खून पाडले, तर लुमाजीच्या कुटुंबाने कोंडाजीचे दोन. कानदखोऱ्यातील बळवंतराव देशमुखांनी आपल्या भाईबंदांच्या गावावर अचानक छापा घालुन कापाकापी केली. घरेदारे पेटवून दिली. आगीत १० बैलगाड्या व १० म्हशी ८ पारडी जळून खाक झाली. रंगोजी कृष्णाजी याने आपला मुलूख देऊन जावई करून घेतले. पाहुणचारासाठी बोलावून जावयाला जहर खाऊ घातले. हेतू हा की, 'वतन दरोबस्त लेकीचे होईल व मग ते आपल्या हाती येईल.' अशामुळे आपली लेक विधवा होईल याची यत्किंचितही काळजी त्यांना नव्हती
या संघर्षामागे वतन मिळविणे हेच उद्दिष्ट असेल असे नाही. जाधव-भोसल्यांच्या संघर्षांमध्ये शहाजीराजांचे सरदार खंडागळे यांचा हत्ती बेफाम झाला. रस्त्यात दिसेल त्याला सोंडेने उचलून टाकू लागला. शिवाजीराजांचे सख्खे मामा दत्ताजी जाधवराव या उन्मत्त हत्तीला आवरण्यासाठी पुढे आले. तर विरुद्ध बाजूने संभाजी राजे व खलोजी भोसले हे हत्तीच्या रक्षणासाठी जिवाची बाजी लावून उभे राहिले. तुंबळ युद्ध झाले. या संघर्षाला हत्ती हे फक्त कारण मात्र झाले. दत्ताजी जाधवराव आणि संभाजीराव भोसले निजामशहाच्या महालापुढे ठार झाले. सारांश एवढाच, हिंदू हिंदूतील वतनदार खानदानी घराण्यांतील भांडणांमध्ये नात्यागोत्याचासुद्धा विसर पडत असे.
महाराष्ट्रातील क्षात्रतेज, ब्राह्मतेज असे लोप पावत चाललेले होते. सर्वच क्षेत्रातबजवजपुरी माजली होती. कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नव्हता.
शहाजींचा स्वराज्याचा प्रयत्न
१९२६ ते २७ या काळात निजामशाहीचा कर्तबगार वजीर मलिक अंबर, विजापूरचा इब्राहीम आदिलशहा आणि दिल्लीचा सम्राट बादशहा जहांगीर या तिघांचाही एकापाठोपाठ एक मृत्यू झाला. त्यानंतर जी राजकीय अंदाधुंदी माजली त्याचा फायदा घेऊन अनेक मराठे सरदार उदयाला आले आणि काही काळ तरी त्यांनी सुलतानांच्या दरबारातील सत्ता आपल्या हाती ठेवली. निजामशाहीत मलिक अंबराचा मुलगा फतेहखान आणि हमीदखान यांच्या लठ्ठालठ्ठीत लखुजी जाधवांचा खून पाडला गेला. विजापूरच्या दरबारातही मुस्तफा खान व खवासखान यांचे दोन तट पडले. दोन्ही शाह्या मोगलांच्या मदतीने एकमेकांस ग्रासण्याचा प्रयत्न करू लागल्या. या परिस्थितीचा फायदा घेऊन शहाजीराजांनी पुणे प्रांतात उठाव केला. त्याचा बंदोबस्त विजापूर दरबारने मुरारपंतांना पाठवून केला ही हकीकत पूर्वी आलेलीच आहे. मुरारपंताशी सल्लामसलत करून शहाजीने नंतर नाशिक, त्र्यंबकेश्वर, संगमनेर, जुन्नर व कोकणापर्यंत प्रदेश ताब्यात घेतला व निजामशाही वंशातील एक मूल गादीवर बसवून ते स्वत:च या राज्याचे कारभारी बनले. एका बाजूला मोगल आणि दुसऱ्या बाजूस आदिलशाही यांना एकमेकांत खेळवून १६३३ साली शहाजीने पेमगिरी येथे निजामशहास राज्याभिषेक करवला. आदिलशाहीतील परिस्थितीत उलथापालथ होताच 'महाराज राजाधिराज मुरारी पंडित साहेब' एकटे पडले, कैद झाले. त्यांची जीभ छाटून गाढवावरून धिंड काढली व त्याचे तुकडे तुकडे करण्यात आले. विजापूर व दिल्लीतील तहानुसार शहाजीच्या निजामशाहीस मान्यता नाकारण्यात आली व दोन्ही राज्यांच्या फौजा शहाजीविरुद्ध चालून आल्या. शहाजीला निजामशहा मोगलांच्या हाती द्यावा लागला आणि विजापूरची चाकरी पत्करावी लागली.
मुसलमान अंमलाच्या पडत्या काळात शहाजीने काही हिंदू सरदार, तर दरबारातील रणदुल्लाखान, खवासखान यांसारखे काही मुसलमान सरदार एकत्र करून आपल्या अंमलाखाली एक राज्य तयार करण्याच्या प्रयत्न केला. रयतेला लुटणाऱ्या वतनदारांची आघाडी बांधून स्वत:चे राज्य उभे करण्याचा प्रयत्न शहाजीने केला. त्यात त्याला यश आले नाही. आले असते तरी नवीन राज्यात रयतेच्या दु:खात, हलाखीत काही फरक झाला नसता. मुसलमान सुलतानांची जागा हिंदू सुलतानांनी घेतले असती एवढेच. रयतेच्या आयुष्यात बदल घडवून आणण्यासाठी, वतनदारी मोडून काढून मावळ्याची, रयतेची फौज तयार करून शेतकऱ्यांना नाडणाऱ्या मुसलमान दरबार व हिंदू वतनदार यांच्याशी एकाच वेळी टक्कर देऊन स्वराज्याची स्थापना करणे आवश्यक होते व हेच कामइतिहासाने शिवाजीराजाकडून करून घेतले.
मराठ्यांचा अभ्युदय
१६ व्या शतकाच्या शेवटी मोगलांची धास्ती तयार झाल्यापासून दक्षिणेत सुलतानांनी मराठी माणसांना आश्रय व मान देण्यास सुरूवात केली. या वेळेपर्यंत सुलतानांच्या दरबारातील वजिरांपासून मनसबदारापंत सगळेजण सतत कट कारस्थानात गुंतलेले असत कधी सुलतानाची मर्जी सांभाळण्याकरिता, कधी सुलतानाला गादीवरून उठवून लावण्याकरिता, कधी दरबारातील दुसऱ्या मानकऱ्यांचा पाडाव करण्याकरिता, कधी आपल्या मर्जीतील सरदारांना मोठे करण्याकरिता कारस्थाने आणि लढाया सतत चालू असत. सुलतानांनाही कधी दरबारातील एका पक्षाकडे तर कधी दुसऱ्या पक्षाकडे झुकावे लागे. कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नव्हता. मुसलमान सरदारांबरोबर महाराष्ट्रात घोरपडे,घाटगे, निंबाळकर, जाधव, भोसले इत्यादी घराणी बारगिरांचा फौजफाटा बाळगून नावारूपास येऊ लागली. दरबारातून मनसबदारी मिळवावी. आपले सैन्य बाळगावे, सरकारदरबारात सारा भरावा, दरबारच्या अधिकाऱ्याशी आणि जवळच्या कील्लेदारांशी लाचारी करावी म्हणजे आपल्या मुलखात आपल्याला सार्वभौम राजाप्रमाणे बेबंद वागता येते हे त्यांना पुरतेपणी कळले होते. आपल्या वतनांपलीकडे जाऊन दुसऱ्यांच्या वतनातूनही लुटमार करावी अशी त्यांची प्रवृत्ती यामुळे रयतेचे जीवन पुन्हा एकदा मोठे कठीण होऊन गेले. देवगिरीपूर्व काळातील जुलमातून आणि लुटीतून मुसलमान आल्यामुळे जी काही मुक्तता झाली होती ती संपुष्टात आली आणि शेतकऱ्यांचे जीवन पुन्हा एकदा अत्यंत दुःसह झाले.
□
शेतकऱ्यांच्या राज्याचे बीजारोपण
शिवाजीराजाचा जन्म अंदाधुंदी, बेबंदशाही, दुष्काळ आणि गुलामगिरीच्या काळात झाला. त्यांच्या कामगिरीची थोरवी खऱ्या अर्थाने समजण्याकरिता हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. राजाने जे केले ते त्या काळाच्या परिस्थितीत इतके अलौकीक होते की, त्याच्या मनातील आदर्श व प्रेरणा कशा तयार झाल्या असतील याविषयी कुतूहल आणि आश्चर्य वाटावे. महान क्रांतिकारकांच्या प्रेरणा त्यांना जशाच्या तशा तयार आसपासच्या व्यक्तींकडून क्वचितच मिळतात. इतिहासात परंपरेने आई जिजाबाई व कारभारी दादोजी कोंडदेव यांच्या शिकवणीमुळे व प्रभावामुळे शिवाजीवर मोठा परिणाम घडला असे सांगितले जाते. परंतु राजांची सबंध कारर्किद पाहता त्यांचे व्यक्तिमत्त्व कोणा एकदोघा व्यक्तीमुळे घडले असेल हे असंभवनीय आहे. थोर पुरुषांच्या गुणांची निपज ही पोषक पार्श्वभूमीमुळे होत नाही. उलट आजूबाजूला पसरलेल्या सर्व विरोधी व्यक्तींना आणि अडचणींना तोंड देऊन त्यांच्यावर मात करता करता त्यांनी आपल्या प्रेरणा, आदर्श व शक्तद्द तयार केलेल्या आढळतात. जिजाबाईला शिवनेरी किल्ल्यावर राहायली लागणे मुलाच्या संगोपनाची जबाबदारी तिच्यावर येणे आणि शहाजी राजांचे वेगवेळ्या वतनदारांतील आयाराम गयाराम राजकारण आणि त्यातील अपयश या वातावरणाचा शिवाजीराजावर परिणाम होणे अपरिहार्यच होते. पण या गोष्टीपेक्षाही खानदानीच्या बंधनांतून व महालाच्या कैदेतून मुक्त झालेल्या शिवाजीराजाचे आसपासच्या मावळे शेतकऱ्यांशी जडलेले जीवाभाचे संबंध जास्त निर्णायक ठरले असणार.
पण परंपरेप्रमाणे दादोजी कोंडदेव यांच्या शिकवणीमुळे जमीनधारा, शेतीसुधारणा आणि प्रजासंगोपण याबद्दलच्या राजाच्या कल्पना बनल्या असे मानले जाते. त्यामुळे दादोजींची शेतीव्यवस्था पाहणे महत्त्वाचे ठरते.
दादोजी कोंडदेव हे दौड तालुक्यांतील पाटस जवळील मलठण गावचे कुलकर्णी. शहाजी महाराजांच्या पदरी पूर्वीपासून असावेत. पुणे आणि सुपे प्रांताची जहागिरी भोसल्यांकडे फार पूर्वीपासून. मालोजीराजांना ही जहागिरी निजामशहांनी दिली.त्यानंतर शहाजीराजांकडे ती पुढे चालवण्यात आली. शहाजीराजांनी नौकऱ्या बदलल्या तरीही ती जहागिरी भोसल्यांकडेच राहिलेली दिसते. शहाजीराजांच्या जहागिरीची व्यवस्था दादोजी कोंडदेव पूर्वीपासूनच बघत असावेत; परंतु शिवाजी महाराजांच्या जन्माच्या आधीची दहा-बारा वर्षे या जहागिरीतील लोकांनी अतोनात हाल सोसले. शहाजी राजांनी विजापूरकरांशी पुकारलेल्या बंडामुळे आणि सरदार रायाराव यांनी केलेल्या वाताहतीमुळे सुपे व पुणे परगण्यातील या जहागिरीतील रयतेचे अतोनात हाल झाले होते. यापूर्वीही भोसले जरी जहागीरदार असले तरी त्यांचे वास्तव्य जहागिरीत नव्हतेच. शिवाजीराजे आणि जिजाबाई हे प्रथमच स्वत:च्या जहागिरीत राहायला आले. ही त्याकाळी दुर्मिळ घटना होती. जिजाबाईसोबत दादोजी कोंडदेवासारखा प्रशासकही होता. गेल्या दहा-बारा वर्षाच्या हालांच्या पार्श्वभूमीवर प्रजाहितदक्ष राजा रयतेची कशी सुव्यवस्था ठेवू शकतो याचे प्रात्यक्षिकच दादोजीने रयतेला दाखवून दिले. आजूबाजूच्या वतनातील पिचत राहणाऱ्या रयतेला आपल्या नातेवाईकांकडून जिजाबाई व दादोजी कोंडदेव यांनी नव्याने सुरू केलेल्या कामाच्या बातम्याही समजत असतीलच. रयतेच्या दहा- बारा वर्षाच्या वाताहतीच्या आधी निजामशहाचा वजीर मलिकअंबर याने महसुलाची एक व्यवस्था लावून दिली होती. व्यवस्थेचे नियम करणे वेगळे आणि ते प्रत्यक्ष अमलात आणणे वेगळे-कारण महसुलाचे नियम अमलात आणण्याचे काम वतनदारच करत असत. परंतु मलिकअंबरने स्वीकारलेल्या पद्धतीचा 'धारा' शेतकऱ्यांना व त्यातल्यात्यात पुणे आणि सुपे परगण्यातील शेतकऱ्यांना त्याचा जाच नव्हता कदाचित त्याचे श्रेय दादोजी कोंडदेवांनाच द्यावे लागेल. दहा-बारा वर्षाच्या वाताहतीनंतर दादाजी कोंडदेवांना हीच 'धारा' पद्धत जहागिरीत बसवायची होती. परंतु सततच्या दुष्काळामुळे रयतेची स्थिती तेवढा वसूल देण्याइतकि अजिबात नव्हती.
सततच्या स्वाऱ्यांमुळे पुणे प्रांत ओसाड पडला होता. चांगल्या सूपीक जमिनीमध्ये मशागतीच्या अभावी भर शेतात किर्र झाडी माजली होती. वाघ, चित्ते, रानडुक्कर, कोल्हे, तरस, लांडगे हेच माणसांच्या जागी राज्य करीत होते. दादोजींनी ओसाड गावाचे पाटील, देशकुलकर्णी, चौधरी, चौगुले यांना पुण्यात बोलावून घेतले.त्यांची तक्रार ऐकून घेतली, अभय देऊन वसाहत उभी करण्याचे आवाहन केले. गावे वसवा, कुस घाला, देव मांडा, तुमची फिर्याद ऐकावयास धाकटे राजे येथेच आहेत असा दिलासा दिला. दादोजींच्या दिलाशाच्या शब्दांनी हळूहळू गावे उभी राहू लागली. मुक्त हस्ते तगाई कर्ज वाटली. शेतीस उत्तेजन दिले.
जहागिरीची व्यवस्था लावत असताना दादोजींनी केलेल्या विशेष सुधारणा अशा-
१. मावळे लोकांच्या बिन कवायती पायदळ पलटणी त्यांनी तयार केल्या. तिच्यावर हुकमतीचा दर्जा ठरवून दिला. गावेगावच्या चौक्या, पहारे बसवून चोरांची आणि लुटारूंची भीती नाहीशी केली.
२. वाघ आणि लांडगे यांच्यापासून होणाऱ्या त्रासामुळे रयत त्रस्त झाली होती. वाघ आणि लांडगे मारून आणणाऱ्यास बक्षिसी जाहीर केली.
३. शेतीची लागवड जोमाने सुरू व्हावी म्हणून साऱ्याची माफी दिली. एका बिघ्याला पहिल्या वर्षी अर्धा पैसा सारा आणि मग वाढवत वाढवत आठव्या वर्षी बिघ्यात मलिकंबरी धाऱ्याप्रमाणे एक रुपया अशी साऱ्याची व्यवस्था लावून दिली. फळबाग लावायला उत्तेजन दिले. दहा झाडाचे उत्पन्न पूर्णपणे मालकाला आणि इतर नऊ झाडांच्या तपासणी उत्पन्नापैकी १/३ भाग सारा म्हणून देणे अशीही सोय केली.
बाल शिवाजीराजांच्या सामाजिक आयुष्यातील सुरूवात म्हणजे आजकालच्या पुण्याची जमीन सोन्याच्या नांगराने नांगरण्याने झाली हा प्रसंग फद्दत कापून उद्घाटन करण्याच्या किंवा कोनशिला बसवण्याच्या प्रकारचा नव्हता. गाव राबते व्हावे, बलुतेदारांनी व्यवसाय सुरू करावा यासाठी राजांनी रयतेला दिलेले हे अभयदान होते. स्वराज्य उभे करायच्या कित्येक वर्षे आधी शेतकऱ्यांच्या शेतीच्या संरक्षणाचे आणि विकासाचे प्रयोग शहाजी भोसल्यांच्या वतनाच्या मुलखात केले गेले.
इतके दिवस वतनदारांच्या पदरी असलेल्या आणि खून-मारामाऱ्यांच्या सुपाऱ्या घेणाऱ्या रामोशांना दादोजीपंतांनी गावाच्या पांढरीच्या आणि काळीच्या रक्षणासाठी नेमले. त्यांच्या मदतीसाठी हत्यारबंद पायदळ फौज सदैव तयार ठेवली.
शेतीची व्यवस्था लावत असतानाच पंतानी न्यायदानाची व्यवस्था निर्माण करून रयतेमध्ये राजांबद्दल विश्वास निर्माण केला. काझी देईल तोच न्याय अशी व्यवस्था होती. पंतानी काझींना दूर करून पुण्याच्या लाल महालात कज्जेखटले चालू केले. बालशिवाजीला घेऊन पंत स्वत: न्याय करीत.अर्थातच यामुळे शिवाजीराजांवर न्यायाचे संस्कार बालपणीच घडत गेले. पंतांनी दिलेली न्यायाची अनेक उदाहरणे इतिहासात आहेत. खेडेबारे तर्फे तील मौजे रांझे गावच्या मुकादम रामजी चोरघे यांनी दांडगाईने मुकादमाचे वतन पूर्णपणे गिळंकृत करायला प्रारंभ केला. याविरुद्ध गणोजी चोरघे, भणगे पाटील व चव्हाण यांनी महाराजांकडे जाऊन फिर्याद केली. त्यावेळी दादोजींनी उन्मत रामजी चोरघे यांना ठार मारले व वतन जप्त करून तेथे विहीर, बाग केली. पुढे रामजीचा पुत्र विठोजी याला महाराजांनी कौल देऊन परत बोलाविले व वडिलांचे वतन मुलास परत दिले.
आसवलीची पाटीलकी दत्ताजी व त्याचा पुतण्या दमाजी यांच्याकडे निम्म्या हिश्शाने होती. दत्ताजीने पुतण्याचा खून करून त्याच्या हिस्सा बळकाविला. दहशतीमुळे न्याय मागण्यास कोणीच पुढे येईना. दमाजीचा धाकटा मुलगा सूर्याजी बंगलोरला शहाजीराजांकडे गेला. राजांनी दादोजी कोंडदेवास चौकशी करून निवाडा करण्यास सांगितले. दादोजींनी गुन्हेगारांना कैद करून सूर्याजीच्या बाजूस पुन: पाटीलकि मिळवून दिली.
कृष्णाजी नाईक बांदल भोरचे देशमुख जबरदस्तीने परस्पर स्वत:कर वसूल करू लागले. त्याच्या या गुंडगिरीविरुद्ध तक्रारी सुरू झाल्या. प्रथम पंतांनी समज दिली व तसे न करण्याबद्दल सांगितले; परंतु तो इतका आडदांड होता की त्याने पंतांच्याच घोड्याची शेपटी साफ छाटून टाकली. पंतानी बांदल देशमुखास कोंढाणा किल्ल्यावर आणून त्यास पुन्हा समजावून सांगितले. तरी तो ऐकेना. पंतांनी त्यांचे हातपाय कलम केले.
बारा मावळातील पाटील, देशमुख, कुलकर्णी इत्यादी छोट्या वतनदारी रयतेची परस्पर नाडणूक करण्याचे प्रकार पंतांनी अजिबात बंद केले. पूर्वी मलिकंबरचा धारा काहीही असो, रयतेने प्रत्यक्ष दिलेला वसूल हा जास्तच असायचा.पंतांच्या व्यवस्थेमध्ये रयतेची लूट बंद झाली. न्यायाची खात्री निर्माण झाली.
बाबजी भिकाजी गुजर, खेड शिवापूर जवळच्या रांझे गावचा पाटील. बाबजी पाटलाने पाटीलकिच्या मस्तीत गावातील एका स्त्रीवर बदअंमल केला. चौकशीसाठी महाराजांनी पाटलाला बोलावणे धाडलं. "जहागीर शहाजीराजांची आहे, शिवाजीला हुकूम देण्याचा अधिकार काय?" अशा घमेंडीत पाटलाने नकार दिला. पाटलाला मुसक्या बांधून जेरबंद करून आणण्यात आले. महाराजांनी गुन्ह्याची रीतसर चौकशी केली. गुन्हा शाबीत झाला. हुकूम केला. पाटलाचे कोपरापासून दोन्ही हात आणि गुडघ्यापासून दोन्ही पाय तोडून टाकण्यात आले. (२८ जानेवारी १६४५) पाटलाची पिढीजात पाटीलकि जप्त करण्यात आली. हीच पाटीलकि २० होन अनामत घेऊन बाबाजी पाटलांना म्हणजे बाबजीच्याच दुसऱ्या नातेवाईकाला दिली. हातपाय अपंग केलेल्या पाटलाचा सांभाळ करण्याची अट घालून राजांनी आपण स्थापन करीत असलेल्या स्वराज्यामधील न्यायदानाचा अशा अनेक उदाहरणांनी आदर्श घालून दिला.
जहागिरीतील सर्व बारा मावळांवर दहशत बसली. शहाजी महाराजांच्या सारख्या जहागीरदारांचा हामुलगा तत्कालीन इतर जहागिरीरदारांच्या मुलांपेक्षा वेगळा निघाला. याने मित्र सवंगडी जमवून गरीब मावळ्यांची, शेतकऱ्यांची पोरं गोळा करायला सुरूवात केली. तानाजी मालुसरे, सूर्याजी मालूसरे, येसाजी कंक, सूर्याजी काकडे, भीमाजी वाघ, संभाजी काटे, शिवाजी इंगळे, भिकाजी चोर, भैरुजीचोर, कावजी मल्हार, तर वतनदारांचे चिरंजीव बाजी जेधे, सोनोपंत डबीर यांचा मुलगा, बापूजी मुदगल, देशपांड्याची मुले, नारो चिमणाजी, बाळाजी देशपांडे हे सगळे एका वयाचे होते असे नाही, काही लहान काही मोठे. सर्वात वयाने मोठे होते बाजी पासलकर, जवळजवळ महाराजांच्या आजोबांच्या वयाचे. अशा सवंगड्यांना बरोबर घेऊन महाराज स्वराज्याची तयारी करत होते.
□
गावागाडा विरुद्ध लुटारू
गावगाड्याची मुक्तता
सुलतान, त्यांचे सरदार, मनसबदार आणि देशमुख एकमेकांशी शेतकऱ्यांना लुटण्याच्या हक्काकरिता लढाया करीत होते. त्याचवेळी गावगाड्यातील बांधणी परंपरागत रीतीने चालून राहिली. गावगाड्याची रचना चार टप्प्यांची होती. राजातर्फे सत्ता बजावणारी, कारभार चालवणारी, हवालदार, कारकून इत्यादी राज्याधिकारी मंडळी यांचा गावातील अंर्तगत कारभारावर फारसा ताबा नसे. ती सत्ता ग्रामाधिकाऱ्यांकडे किंवा चाकरी वतनदारांकडे असे. गावचा पाटील आणि कुलकर्णी हे सारा वसूल करणे, त्याच्या हिशोब ठेवणे, भरणा करणे, न्यायनिवाडा करणे ही कामे बघत व त्याबद्दल त्यांना 'हकलाजिमा' मिळत असे. वतनदारानंतरचा गावातील प्रमुख वर्ग म्हणजे वंशपरंपरेने जमिनीची मालकि उपभोगणाऱ्या शेतकऱ्यांचा कींवा मिरासदारांचा. ज्यांना गावात जमीन नसे त्यांना कसल्याही प्रकारचे सामाजिक अथवा पंचायतीचे हक्क नसत. त्यांना 'उपरे' म्हणत. शेतावर अथवा गावात मोलमजुरी करून अथवा मुदतीने जमीन कसण्यास घेऊन ते उपजीविका करत.उत्पादनातील शेवटचा आणि महत्त्वाचा घटक म्हणजे सुतार, लोहार, चांभार, महार, मांग, कुंभार, न्हावी, धोबी, गुरव, जोशी, भट, मुलाणी इत्यादी बलुतेदार. बलुतेदारांना मिरासदारांकडून सुगीच्या काळात तयार झालेल्या धान्याचा काही भाग बलुतं म्हणून दिला जात असे. त्यांना पंचायतीच्या कामकाजात पूर्ण हक्काने भाग घेता येई. थोडक्यात, वतनदार, मिरासदार, बलुतेदार आणि उपरे ही गावगाड्याची प्रमुख चाके होती. याखेरीज धर्मसत्ता, ज्ञातिसत्ता आणि व्यापारी सत्ता स्वतंत्रपणे अस्तित्वात होत्या.
गावागाड्यातील या वेगवेगळ्या घटकांनी प्रत्यक्ष उत्पादन करावे वा उत्पादनास हातभार लावावा आणि जागोजागी हत्यारी माणसे पदरी बाळगणाऱ्यांनी त्यांच्या मेहनतीचे फळ लुटून न्यावे हे हजारो वर्षे चालले. मुसलमान आल्याने लुटारूंच्या थरात आणखी एक भर पडली. मोकासदार-बलुतेदार उत्पादन करणार, गावापुरतेप्रशासन चालविण्यासाठी पाटील कुलकर्णीसारखे चाकरी वतनदार त्याला थोडी चोच लावणार व गावाबाहेरील वतनदार जहागीरदार, सरदार आणि प्रदेशातील राजांची शासनसत्ता त्यावर हात मारणार अशी महाराष्ट्रातील परिस्थिती होती. सुलतानापर्यंत दोनशे रुपये पोहोचण्याकरता शेतकऱ्याकडून हजारावर रुपये वसूल होत. अंदाधुंदीच्या काळात संरजामशाही अवस्थेत या मधल्या बांडगुळांचे चांगलेच फावले.
राजे मुरार पंत, शहाजी यासारख्या दरबारातील बड्या प्रस्थांनी बदल घडवून आणायचा प्रयत्न केला तो सरदारांच्या पातळीवर. सरदारांच्या आघाड्या बांधून राजसत्तेत म्हणजे सुलतानाच्या सत्तेत बदल घडवून आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
शिवाजीराजांनी वापरलेली वेगळी रणनीती
गावागाड्यातील सर्व थराची माणसे एकत्र करणे हा त्याच्या रणनीतीचा पाया होता. गावगाड्यातील पुंड आणि नाठाळ पाटील मंडळींवर त्याने कठोरपणे जरब बसवली. याची अनेक उदाहरणे वर दिलेली आहेतच.
'मातबर चहू जागचे मराठे यांसी आप्तपणा करावा; पत्रे लिहावी; त्यास आणून भेट घ्यावी, आपण त्यांजकडे जाऊन आम्हांस अनुकूल असावे असे बोलावे.' या धोरणाने गावोगावची निवडक मंडळी त्याने आपलीशी करून घेतली.
याखेरीज 'मावळे, देशमुख बांधून दस्त करून पुंड होते त्यास मारिले.' बारा मावळांतून अनेक सवंगडी शिवाजीराजास लाभले. नारायण, चिमणाची, बाळाजी मुदगल देशपांडे, तानाजी व सूर्याजी मालुसरे, भिकोजी चोर, सूर्यराव काकडे, बाजी जेधे, त्र्यंबक सोनदेव, दादाजी नरसप्रभू गुप्ते ही त्यांची मित्र मंडळी खरी, पण राजावर त्यांची निष्ठा इतकि की त्याच्या शब्दाखातर प्राण टाकण्यास त्यांनी हयगय केली नसती. पण ही सगळी मंडळी गावगाड्यातली. गावगाड्याबाहेरील कोणीही मंडळी स्वराज्याच्या कामात सहभागी होण्यास राजीखुशीने तयार नव्हती. कान्होजी नाईक जेधे आणि त्यांचे पाहुणे मोसे खोऱ्याचे बाजी पासलकर हे दोघेच काय ते अपवाद. कृष्णाजी बांदलाची पुंडाई मोडून काढल्यानंतर बारा मावळांतील देशमुख मंडळी हळूहळू दादोजी कोंडदेव व शिवाजी राजाकडे रुजू होऊ लागली. कानंद खोऱ्यातील मरळ खेडेबाऱ्याचे कोंडे, मुठे खोऱ्यातील पायगुडे, कर्यात मावळचे शितोळे, रोहिडे खोऱ्यातील जेधे, खोपडे तसेच गुंजण मावळचे शिळमकर ही सारी देशमुख मंडळी स्वराज्याला जोडली गेली. पण मावळाबाहेरच्या देशमुख सरदारांपैकी सर्वांशी शिवाजीस संघर्षच करावा लागला.
ऐतिहासिक दाखल्यांवरून असे दिसून येते की, शिवाजी व त्याचे सहकारी हे स्वराज्याची उभारणी करताना त्यांना जास्तीत जास्त त्रास दिला, मनस्ताप दिला, तो स्वकियांनीच. अगदी रक्ताच्या नात्याच्या आणि जवळच्या लोकांनीसुद्धा हयगय केली नाही. राजाला स्वराज्यरचनेच्या कामी परकियांविरुद्ध जितके जास्त वेळा लढावे लागले त्यापेक्षा जास्त वेळा त्यांना स्वकियांविरुद्ध हत्यार उपसावे लागले. स्वकियांनी आपले राज्य, स्वराज्य असावे या भावनेपेक्षा आदिलशहाच्या दरबारात निजामशहाकडे किंवा दिल्लीश्वराच्या मोगल तख्तातील एखादी मनसब, जहागिरी, वतनदारी, देशमुखी आपल्याला मिळाली पाहिजे या एका आकांक्षेपोटी स्वराज्याशी सतत बेईमानी केली. सनदांच्या तुकड्यासाठी स्वजनांचा विरोध अन् परकियांपुढे लाचारी व लांगूलचालन केले. स्वकीयांच्या, आप्तांच्या, स्वजातिधर्माच्या या लोकांमुळे राजाचे उभे आयुष्य स्वराज्याची उभारणी करीत असताना स्वकियांशी लढून त्यांच्या बंदोबस्त करण्यातच गेले. यासाठी प्रसंगी त्याला अतिशय कठोर व्हावे लागले. त्यातून त्याचे मामा, सुपे परगण्याचे वतनदार संभाजीमामा मोहिते हेसुद्धा सुटले नाहीत. सुपे परगणा शहाजीराजांची जहागिरी होती. ती राजांनी व्यवस्थेसाठी संभाजी मामा मोहितेकडे सोपविली होती. संभाजी मोहिते सुप्याच्या गढीवरूनच जहागिरीचा कारभार चालवत. चिमाजी गुंडो कुलकर्णी नावाच्या माणसाचे वतन विसाजी व रामजी पणदरकर नावाच्या भावांना दांडगाईने, अन्याय्यमार्गाने मिळवून देण्याकरिता विसाजी व रामजी यांनी या मोहितेमामांना एक घोडी व १५७/- रुपये लाच दिली होती. मोहितेमामांनी चिमाजी गुंडो कुलकर्णी हा आपले वतन आपण सांगेल तसे बदलून देत नाही म्हणून त्यास तीन महिने तुरुंगात डांबून ठेवले. तुरुंगात छळ करून जबरदस्तीने वतनाची सोडचिठ्ठी लिहून घेतली. चिमाजी सुटकेनंतर सरळ गेला तो कर्नाटकात शहाजीराजांकडे. शहाजीराजांनी राजाच्या नावाने पत्र लिहून चिमाजीच्या फिर्यादीची चौकशी व्हावी असे लिहिले. पण शहाजीराजांचे हे पत्र येण्याआधीच शिवाजी आपल्या निवडक सहकाऱ्यांना घेऊन सुप्यास पोहोचला होता. राजाने मामांना सरळे सांगितले, "सुपे ठाणे परगणा आमच्या स्वाधीन करा." मामांनी साफ इन्कार केला. "आमचे मालक शहाजीराजे. आपण कोण हुकूम करणार?" आपल्या मामाचा बेत सुभ्याचा ताबा देण्याचा नाही असे दिसताच राजाने मावळ्यांना हुकूम केला आणि मामा कैद झाले. सुप्याच्या गढीचा ताबा घेतला (२४ सप्टेंबर १६५६).
उभा पश्चिम किनारा व काही भाग यावर हुकमत गाजवत. कोकण व घाटमाथ्यावरील रस्ते मोऱ्यांच्याच ताब्यात होते. १६२७ साली माणकाईने दत्तक घेतलेले कृष्णाजी बाजी निपुत्रिक वारले. चंद्ररावास राजाने जावळीच्या सिंहासनावर बसविले. हिंदवी स्वराज्य स्थापनेत त्यांच्याकडून सहकार्य मिळेल या अपेक्षेने. मावळे संघटित करून स्वराज्याच्या झेंड्याखाली एकत्र आणण्याचे काम सुरू असतानाच मोऱ्यांच्या जावळीच्या सत्तेला नकळत धोका उत्पन्न झाला. यामुळे चंद्रराव मोऱ्यांनी राजाशी सरळ संघर्ष आरंभिला. जावळीच्या गादीवर बसविण्याचे वेळी राजाचे उपकार विसरून चंद्रराव मोऱ्याने इमान जाहीर केले ते विजापूरच्या आदिलशहाशी. बाजी पाटील व मालोजी पाटील यांच्याकडील बिरवाडी व काही गावांचे अधिकार चंद्ररावांनी त्यांना हुसकावून आपल्या ताब्यात घेतले. दुर्बळ पाटील राजाकडे आले. राजाने पाटलांची त्यांच्या वतनावर पुनर्स्थापना केली. त्यामुळे चंद्रराव मोरे चिडला तर नवल नाही. चंद्रराव मोरे दिवसेंदिवस शिरजोर होऊन स्वराज्यावर आक्रमण करू लागला. चिखलीचे रामजी वाडकर यांचे व चंद्ररावाचे वैर. चंद्ररावांनी त्यास ठार मारले. रामजीचा पुत्र लुमाजी हा स्वराज्यातील रोहिड खोऱ्यातील पळसोसी या गावी जीव लपवून बसला. चंद्रराच मोरे पाठलाग करीत रोहिडखोऱ्यावर स्वारी करून आला. व स्वराज्याच्या हद्दीतील रोहिडखोऱ्यात त्याने लुमाजीस ठार मारले. गुंजण मावळची देशमुखी शिळीमकरांकडे. पण चंद्रराव मोऱ्यांनी या गुंजण मावळच्या देशमुखीवर आपला हक्क सांगण्यास सुरूवात केली. राजाने शिळीमकरांनी बाजू उचलून धरली. शिळीमकर शिवाजीच्या बाजूला जाऊन मिळालेले पाहून चंद्ररावांनी 'शिवाजी तुमची जहागिरी बळकावील' अशी शंका शिळीमकराच्या मनात निर्माण करण्यास सुरूवात केली. चंद्रराव हे शिळीमकराचे मामा. शिवाजीला हे वृत्त कळताच त्याने शिळीमकरांना अभयपत्र पाठविले आणि 'लोक काही सांगत असतील तरी त्यावर विश्वास न ठेवता आपण कोणत्याही गोष्टीची चिंता करू नये' असे कळविले. त्याचवेळी मोऱ्यांना मात्र जबरेचे पत्र पाठविले. त्या पत्रात राजा लिहितो.
"तुम्ही मुस्तफद राजे म्हणविता. राजे आम्ही. आम्हा श्री शंभूने राज्य दिधले आहे, तर तुम्ही राजे न म्हणावे. आमचे नौकर होऊन आपला मुलूक खाऊन, हामराह चाकरी करावी नाही तर बदफैल करून फंद कराल, तर जावली मारून तुम्हांस कैद करून ठेवू."
उत्तरादाखल चंद्ररावाने शिवाजीराजास उद्धटपणे लिहिले की, "तुम्ही काल राजे जाहला, तुम्हांस राज्य कोणे दिधले? मुस्तफद राजा आपले घरी म्हटलीयावरकोण मानितो? येता जावली, जाता गोवली. पुढे एक मनुष्य जिवंत जाणार नाही. तुम्हामध्ये पुरुषार्थ असला, तर उदईक याल तर आजच यावे-आम्ही कोकणचे राजे असून आमचा राजा श्रीमहाबळेश्वर, त्याचे कृपेने राज्य करितो. आम्हा श्रीचे कृपेने, बादशहाने राजे किताब, मोरचेल. सिंहासन मेहेरबान होऊन दिधले. आम्ही दाईमदारी दर पिढी राज्य जावलीचे करितो. तुम्ही आम्हांसी खटखट कराल तर स्पष्ट समजून करणे. आणखी वरकड मुलूख तुम्हांस आहे. येथे उपाय कराल तर तो अपाय होईल. यश न घेता अपयशास पात्र होऊन जाल."
संतप्त झालेल्या राजाने मोऱ्यांना अखेरचे पत्र पाठविले,
"जावली खाली करून, राजे न म्हणोन, मोरचेल दूर करून, हात रुमाले बांधून, भेटीस येऊन हुजूरची काही चाकरी करणे. इतकियावर बदफैली केलीया मारले जाल."
अखेर राजाने जावळीवर स्वारी केली. महिनाभर लढाई चालली. युक्तद्द करून मोऱ्यांनी खूद रायगडच काबीज केला. रायगड परत हाती येण्यासाठी राजाला तीन महिने लागले. अखेर १५ जानेवारी १६५६ ला त्याने जावळी ताब्यात घेतली. चंद्ररराव मोरे बायकांमुलांसह जीव घेऊन रायरीला किल्ल्यावर लपून बसला. राजाने रायरी कील्ला ताब्यात घेतला. पण चंद्रराव मोऱ्यांना मदत केली ती त्यांचे भाचे बालाजी नाईक व हैबतराव शिळीमकर यांनी. चंद्रराव मोरे यांचे सर्व गुन्हे पोटात घालून मोजकी शिबंदी ठेवून जावळीचे वैभव भोगावे हे समजावण्यासाठी राजाने मोऱ्यांना चाकणला आणले. मोरे राजाच्या कैदेत होते. वरकरणी चंद्ररावाने राजाचा सल्ला आपण मानतो आहेत असे दाखविले. पण चंद्रराव मोऱ्याने सुटकेसाठी मुघोळकर घोरपड्यांना गुप्त पत्रे लिहिली होती. या फितुरी संबंधीचे कागद राजाच्या हाती पडले. तेव्हा मोरे बेईमान आहे म्हणून चाकण येथे त्याची गर्दन मारली आणि जावळी स्वराज्यात सामील झाली.
मोऱ्याप्रमाणेच घोरपडे हेही त्या काळातील एक मातब्बर वतनदार होते. घोरपडे हे खरे तर भोसल्यांचे सख्खे भाऊबंदच. परंतु भोसल्यांचा त्यांनी आयुष्यभर द्वेषच केला. मानी शहाजी महाराजांविरुद्ध आयुष्यभर विजापूरच्या दरबारात तक्रारी केल्या. तक्रारीसुद्धा अशा की, शहाजीराजे हे दक्षिण भारतातील ऐतद्देशीय राजांशी सहानुभूतीने वागतात या स्वरूपाच्या. शहाजीराजांविरुद्ध विजापूर दरबाराचे मत कलुषित करण्यात आणि शहाजी राजांना गफलतीत, बेसावध असताना कैद करण्यात बाजी घोरपड्यांनी पुढाकार घेतला. घोरपड्यांचे वतन तसे शिवाजीच्या स्वराज्यापासून खूप दूर. मुघोळ आणि कुडाळ या परिसरात. कर्नाटक तळ कोकणात.राजाने ज्यावेळी तळ कोकणावर स्वारी केली तेव्हा सिद्दी खवासखान यास विजापूर दरबाराने शिवाजीशी लढायला पाठविले. खवासखानाच्या सैन्यात घोरपड्यांनी दाखल व्हावे असा विजापूर दरबाराचा हुकूम होता. घोरपडे सैन्यासह मदतीस येण्याआधीच राजाने त्यांच्या जहागिरीवर छापा घातला आणि स्वत: घोरपड्यास ठार केले.
जावळीजवळील हिरडसचा देशमुख असाच शिरजोर झाला होता. त्याच्या ताब्यात रोहिडा नावाचा मजबूत कील्ला होता. त्यावर राजाने एकाएकि हल्ला करून तो हस्तगत केला आणि लढाईत देशमुख मारला गेला.
राजावर वेळोवेळी चाल करून येणाऱ्या विजापूरच्या सैन्यात तर अगणित मराठे सरदार असायचेच. केवळ दरबारात मनसबदारी मिळावी, वतन मिळावे, शेतकऱ्यांना आणि येथील मुलखाला लुटून सजवलेल्या दरबारी श्रीमंतीत आपला वाटा असावा या पलीकडे त्यांची दृष्टी नव्हती. सर्जेराव घाडगे, घोरपडे हे रुस्तुमेज खानाबरोबर राजावर चालून आले तर वाडीकर, सावंत भोसले आणि शिवाजीचे सावत्र भाऊ व्यंकोजीराजे हे खवासखानाबरोबर राजावर चालून आले. सूर्यराव सुर्वे आणि जसवंतराव पालीकर हे कोकणातील सरदार सिद्दी जोहारच्या पन्हाळ्याच्या वेढ्यातून राजा निसटलाच आणि विशाळगडाकडे आला तर त्याला रोखण्यासाठी, पकडण्यासाठी विशाळगडाच्या पायथ्याशी दबा धरून बसले होते. एकिकडे मावळातील ३०० शेतकरी, धारकरी शिवाजीचे प्राण वाचावे, स्वराज्याचे अस्तित्व राहावे म्हणून मरणाची खात्री असताना पावनखिंडीत उभे होते. तर सूर्यराव आणि जसवंतराव स्वराज्याचे अस्तित्व मोडण्यासाठी विशाळगडच्या पायथ्याशी उभे होते. विशाळगडावरून स्वराज्यात परत आल्यानंतर काही दिवसांतच १६६० मध्ये राजा सूर्याजीराव सुर्व्याच्या शृंगारपुरावर चालून गेला. संगमेश्वर परिसर ही सुर्व्याची जहागिरी ताब्यात घेतली. सूर्यराव सुर्वे यांनी जरी अपराध केला असला तरी आपल्या स्वराज्याच्या कार्यात शिवाजीने त्यांना सामावून घेतले. तेथून पुढे राजा जसवंतरावावर चालून गेला. जाताना संगमेश्वराजवळ तानाजी मालुसरे व पिलाजी सरनाईक यांना व्यवस्थेसाठी ठेवून गेला. नव्यानेच ताब्यात घेतलेल्या या जहागिरीतील रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम त्याने तानाजीला सांगितले होते. सुर्व्यानी गद्दारी करून रात्रीच्या वेळी तानाजीच्या सैन्यावर हल्ला केला. यानंतर मात्र सुर्व्याकडे राजाने शृंगारपूरचे वतनसुद्धा ठेवले नाही. सर्व मुलूख खालसा केला. त्याचबरोबरीने बरीच लहान मोठी वतनेही बंद करून टाकली.
ऐन लढाईच्या वेळेला पूर्ण स्वराज्यावर संकट उद्भवले असतानासुद्धा एतद्देशीयआणि मराठेसुद्धा शिवाजीच्या बाजूने उभे राहिले नाहीत. खेळोजी भोसल्यांचे उदाहरण फार महत्त्वाचे आहे. मिर्झा राजांनी आमिष दाखवून काही सरदार फोडण्याचा प्रयत्न सुरू केला. जावळीचे खेळोजी भोसले ५०० पायदळासह मिर्झा राजेंना फितूर झाले. पण राजाचे जवळचे सहकारी कान्होजी नाईक हे खंडोजी खोपड्यांना क्षमा करावी म्हणून शिवाजीकडे आले. कान्होजी नाईकांनी खूप रदबदली केली. खंडोजी खोपड्यांना जिवानिशी मारणार नाही असे वचन राजाने त्या कान्होजीना दिले. पण खंडोजीच्या दगलबाजीचा संताप त्याच्या मनातून यत्किंचितही कमी झाला नव्हता. राजाने खंडोजीचा उजवा हात आणि डावा पाय कलम केला. ज्या पायाने चालत गेला तो पाय आणि ज्या हाताने फितुरी केली तो हात त्यांनी निष्ठुरतेने कलम केला. त्याचवेळी कान्होजी नाईकांना जिवानिशी ठार मारणार नाही हे दिलेले वचनही पाळले.
स्वराज्याविरुद्ध असलेल्या वतनदारांविरुद्ध राजाला नेहमीच संघर्ष करावा लागला. पण त्यावेळी राजाचा द्वेष करणारे लोक किती खालच्या थराला गेले होते याचे उदाहरण म्हणून तुळजाभवानीचे मंदिर अफझलखानाने तोडले त्यावेळी दिसून येते. अफझलखानाबरोबर पिलाजी मोहिते, शंकरजी मोहिते, कल्याणकर यादव, नाईकजी सराटे, नागोजी पांढरे, प्रतापराव मोरे, झुंजारराव घाटगे, काटे, बाजी घोरपडे आणि प्रत्यक्ष राजाचे चुलते संभाजीराव भोसले हे उपस्थित होते. शाइस्तेखान स्वराज्यावर चालून आला. त्याच्याबरोबर औरंगजेबाचे उत्तरेतील इतर हिंदू सरदार असणे हे स्वाभाविकच आहे, पण महाराष्ट्रातील सुखाजी गायकवाड, दिनकरराव काकडे, रंभाजीराव पवार, सर्जेराव घाटगे, कमलोजीराव काकडे, जसवंतराव काकडे, त्र्यंबकराव खंडागळे, कनकोजीराव गाडे, अंताजीराव खंडागळे आणि दत्ताजीराव खंडागळे, हे मराठे सरदारसुद्धा होते. आणि यापेक्षा भयानक गोष्ट म्हणजे त्र्यंबकरावजी भोसले, जिवाजीराव भोसले, बालाजी राजे भोसले, परसोजी भोसले ही मंडळी शिवाजीच्या रक्ताची, नात्याची अगदी सख्खे चुलत-चुलत असेच नातलग होते. यापेक्षा शाइस्तेखानाच्या सरदारांत सिंदखेडचे दत्ताजी राजे जाधव आणि रुस्तुमराव जाधव ही जिजाऊंच्या माहेरची मंडळी स्वराज्याचा नाश करण्यासाठी सर्वस्व पणाला लावून उतरली होती. पुण्याची देशमुखी आपल्याला मिळावी एवढ्या अपेक्षेवर लोणीचे कृष्णाजी काळभोर खानाला सामील झाले. खानाने शितोळ्याची देशमुखी जप्त करून काळभोरांना दिली होती. बाळाजीराव होनप हे पुण्याच्या राजाच्या लाल महालाच्या शेजारीच राहात. शिवाजीचे बालपण हे कदाचित बाळाजींच्या अंगाखांद्यावर, मांडीवर गेलेले असेल. स्वराज्याच्या छत्र-छायेत आणि सावलीत राहूनही बाळाजी होनप देशपांडे याना शिवाजीराजापेक्षाही शाइस्तेखान जवळचा वाटला. असे हे एतद्देशीय !
तत्कालीन राजकिय परिस्थितीनुसार वतनदार आणि देशमुख यांचे राज्य चालत असे. आपल्या वतनातील गावांचा महसूल गोळा करायचा आणि पदरी सैन्य ठेवायचे ते महसूल गोळा करण्यासाठी, दहशत निर्माण करण्यासाठी, आपल्या वतनाचे स्वतंत्र अस्तित्व टिकवण्यासाठी. पण हे स्वतंत्र अस्तित्व कोठल्या तरी वतनदाराची बांधीलकि राखत असे. त्यामुळे हे वतनदार आणि देशमुख फार शिरजोर झाले होते. राजाने त्यांचा फौजफाटा बाळगण्याचा अधिकारही काढून घेऊन त्यांना ताब्यात आणले आणि सैन्य बाळगण्याचा अधिकार हा पहिल्यांदाच स्वराज्याकडे घेतला. सैन्य स्वराज्याचे, घोड्यांच्या पागा स्वराज्याच्या, हत्यारे स्वराज्याची ही कल्पनाच सबंध इतिहासात पहिल्यांदा आली.
राजाला ज्या स्वकियांविरुद्ध लढावे लागले, आपल्याच माणसांविरुद्ध हत्यार उपसावे लागले याची काही निवडक आणि फक्त ठळक उदाहरणे वर दिली आहेत.
याशिवाय राजाच्या चरित्रामध्ये अशी अगणित उदाहरणे स्वकियांविरुद्ध लढावे लागण्याची देता येतील. स्वराज्याच्या निर्मितीसाठी त्याला आपल्याच माणसाविरुद्ध लढावे लागले हे केवढे दुर्दैव!
इ.स.१६४८ च्या सुमारास विजापूरच्या नोकरीतील पाचसातशे पठाण शिवाजीकडे चाकरीस राहण्यास आले. गोमाजी नाईक पानसंबळ यांनी स्पष्ट सल्ला दिला,
"तुमचा लौकीक ऐकून हे लोक आले आहेत त्यांस विन्मुख जाऊ देणे योग्य नाही. हिंदूंचाच संग्रह करू, इतरांची दरकार ठेवणार नाही अशी कल्पना धरली, तर राज्य प्राप्त होणार नाही. ज्यास राज्य करणे त्याने अठरा वर्ण, चारही जाती यांस आपापले धर्माप्रमाणे चालवून त्यांचा संग्रह करून ठेवावे."
शिवाजीने हा सल्ला मानला आणि गोमाजी नाईकास निसबतीस ठेवून घेतले.
या पार्श्वभूमीवर स्वराज्याच्या निर्मितीसाठी परधर्मीयांनी शिवाजीला केलेली मदत किंवा अगदी जीवघेण्या प्रसंगातसुद्धा ज्या खंबीरतेने ते त्याच्या पाठीशी उभे राहिले त्याचा उल्लेख राजाच्या सबंध कर्तुत्वाचा उच्चांक गाठणारा ठरावा. खवासखानाची मोहीम मोडून काढल्यानंतर राजे कुडाळवर चालून गेला. कुडाळचे लखम सावंत १२ हजार हशमांसह ठाण मांडून बसले होते. राजाने त्यांचा दारुण पराभव केला आणि सावंताला तोंड लपवून पोर्तुगीजांच्या आश्रयाला पळून जावे लागले. याचवेळी "फोंडा" या आदिलशहाच्या बळकट किल्ल्याला शिवाजीनेवेढा घातला. महाबतखान या आदिलशहाच्या सरदाराने कील्ला शर्थीने लढविला. पण यात त्याचा पराभव झाला. राजाने मात्र महाबतखनास अभय देऊन त्याच्या इच्छेनुसार विजापुरी जाण्यास परवानगी दिली.पण लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की, या लढाईत राजाच्या लष्करातील हजाऱ्या इब्राहीम याने फार मोठा पराक्रम गाजविला. स्वराज्याचा पहिला सेनापती म्हणून नेताजी पालकर याचे नाव सहजच जिभेवर येते. पण पायदळचा पहिला सरनोबत हा नूरखान बेग होता याची नोंद घेणे अत्यंत आवश्यक आहे. अफजलखानाच्या वधाचा प्रसंग थरारकच. शिवाजीने आपला जीव धोक्यात घातला होता. कोठल्याही क्षणी जिवास दगाफटका होण्याची शक्यता असतानासुद्धा शिवाजीच्या जिवाचे रक्षण करण्यासाठी जे अत्यंत विश्वासातील १० लोक शिवाजीबरोबर होते त्यात सिद्दी इब्राहीम हा मुसलमान त्यांच्या अगदी जवळ होता. अफजलखानाच्या वधानंतरचा सर्व नाट्यपूर्ण रोमांचकारी प्रसंग डोळ्यांपुढे आणला असता अफजलखानासकट त्यांच्याबरोबर आलेले वकिल कृष्णाजी भास्कर यांच्यासह दहा लोक ठार मारले गेले. आणि शिवाजी व त्याचे सर्व सहकारी सुरक्षितपणे प्रतापगडावर परत आले ही इतिहासातील नोंद टाळता येणार नाही. आग्र्याच्या तुरुंगातून राजे सुटेल की नाही अशा चिंतेत स्वराज्य होते, स्वराज्यावर संकट होते. औरंगजेबसारख्या करड्या, धर्मवेड्या मोगल सम्राटाच्या तावडीतून सहिसलामत सुटून बाहेर येणे म्हणजे प्रत्यक्ष मृत्यूच्या दाढेतून परत येणे होय. ही घटना खरेच अतुलनीय आहे. पण अशा प्रसंगी जी जिवाभावाची माणसे प्राणाची बाजी लावून उभी राहतात त्यात त्यांचा धर्म, जातपात काही शिल्लक राहत नाही. राजे औरंगजेबाच्या कैदेतून बाहेर तर पडला खरा, पण बराच काळ तो तेथेच आहे हे नाटक वठवून मोगली पहारेदारांना गाफद्दल ठेवण्याचे काम हिरोजी फर्जंद आणि मदारी मेहतर यांनी केले. मदारी मेहतर हा मुसलमान. परंतु नात्यागोत्याचा, रक्ताचा तर सोडाच पण तेथे धर्माचासुद्धा राजाशी त्याचा संबंध नव्हता. त्याचे इमान होते ते शिवाजीराजाच्या पायाशी, स्वराज्याच्या सिंहासनाशी.
पन्हाळगडावर विजापूरकरांचा सरदार सिद्दी जोहर वेढा घालून बसला होता. वेढा पडून तीन महिने झाले. राजाच्या सुटकेचे काही चिन्ह दिसेना. त्याचा सेनापती नेताजी पालकर याच्या फौजेत सिद्दी हिलाल व त्याच्या तरुण मुलगा सिद्दी वाहवाह हे होते. अफजलखानाच्या वधानंतर सतत सात महिने नेताजी पालकरचे सैन्य स्वराज्याच्या सीमा रुंदावत दौडत होते. प्रचंड थकवा, ताण असतानासुद्धा.पण राजाची सुटका करण्याच्या एकमेव हेतूने नेताजी पालकराने सिद्दी जौहरच्या फौजेवर हल्ला केला. या लढाईत नेताजी पालकराला यश मिळाले नाही, पण सिद्दी हिलालचामुलगा वाहवाह हा मात्र कामी आला. शिवाजीबरोबर सजातीय झगडत असताना, परधर्मीयांनी गाजविलेल्या पराक्रमाची याशिवाय अनेक अगणित नोंद न झालेले, स्वराज्याच्या पायांतील दगड असतील, पण मुद्दा महत्त्वाचा येतो तो हा की, आज राजाच्या नावाचा, धर्माचा, जातीचा वारसा सांगणाऱ्यांनी एकदा तरी अंतर्मुख होऊन विचार करावा. खरोखरीज आपणास राजाच्या रक्ताचा, जातीचा, धर्माचा वारसा सांगण्याचा काडीइतका तरी अधिकार आहे काय? हा पराक्रम गाजविणाऱ्यांची घेतलेली इतिहासातील ही नोंद पूर्ण असेलच असे नाही. राजाच्या नौदलाचे अधिकारी इब्राहीमखान, दौलतखान होते आणि त्यांच्या भरवशावर आणि विश्वासावरच राजाने आपले आरमान उभे केले होते. राजाला परधर्मीयांनी दिलेली ही साथ स्वराज्याच्या निर्मितीत फार मोलाची ठरली.
शिवाजी महाराजांचा धार्मिक दृष्टिकोन
राजाचा स्वत:चा धार्मिक दृष्टिकोन हा अतिशय उदार होता. राजाने उभ्या हयातीत कधीही ती फक्त हिंदुचाच राजा आहे अशी भावना ठेवलेली ऐतिहासिक कागदपत्रात कोठेही दिसत नाही. किंबहुना राजा हा खऱ्या अर्थाने लोककल्याणकारी राजा होता. नि:संशय त्याला स्वत:ला हिंदू धर्माचा जाज्वल्य अभिमान होता. स्वाऱ्यांवर मोहिमांवर असतानासुद्धा तो आपल्याबरोबर एक स्फटिकाचे शिवलिंग बाळगी. शिवलिंगाची पूजा तो नेमाने करी. त्याचे कुलदैवत शंभू महादेव होते. राजा स्वत: हे राज्य आम्हास शिवशंभूने दिले आहे असे मानत असल्याचा उल्लेख कागदपत्रांमध्ये आहे. शिवशंभू हे त्यांचे कुलदैवत. सामर्थ्य आणि शक्तद्दचे दैवत म्हणून तो तुळजाभवानीचाही उपासक होता. परंतु आपल्या धर्मभावनेचा जाच परधर्मीयांना होऊ देत नसे. पुण्याची नवी उभारणी करीत असताना पुण्यातील कसबा गणपतीच्या स्थापनेबरोबरच पुण्याच्या तांबड्या जोगेश्वरीची स्थापना झाली. त्याप्रमाणे पुण्यातील दर्यांची व मशिदींची व्यवस्था पूर्ववत चालू करण्यात आली. काझी मुजावर किंवा परधर्मीय सेवेकऱ्यांना लहानमोठे उत्पन्नाचे साधन करून देण्यात आले. मता नायकीण या मुसलमान कलावंतीणीस शहाजीराजांनी अर्धाचावर जमीन इमान दिली होती. नंतर मातोश्री जिजाऊ आणि दादोजी कोंडदेव जहागिरीदारीचा कारभार पहायला लागल्यांनतरही हे इमान तसेच चालू ठेवण्यात आले होते.
राजाच्या फौजांमध्ये आणि मुलकी अधिकाऱ्यांमध्ये सर्व जातीधर्माचे लोक होते. आपल्या प्रजेला ज्या ज्या देवस्थानाबद्दल, प्रार्थनास्थळाबद्दल, साधू संत, तसेच फकिरांबद्दल आदर वाटत होता व प्रेम वाटत होते त्या सर्वाबद्दल राजाने स्वराज्यात आदरच दाखविलेला आहे.राजाच्या धार्मिक उदारतेची प्रशंसा करताना खाफीखान हा शत्रूपक्षीय इतिहासकार, औरंगजेबाचा चरित्रकर्ता लिहितो, "शिवाजीने आपल्या सैनिकांकरिता असे सक्त नियम घालून दिले होते की, सैनिक ज्या ठिकाणी लुटालूट करण्यासाठी जातील तेथे त्यांनी मशिदी, कुराणग्रंथ किंवा कोणत्याही स्त्रीस त्रास देऊ नये. जर एखादा कुराणाचा ग्रंथ त्याच्या (शिवाजी) हाती आला तर त्याबद्दल पूज्य भाव दाखवून तो (शिवाजी) हाती आपल्या मुसलमान नोकराच्या स्वाधीन करीत असे."
राजाचा असा गौरवपूर्ण उल्लेख औरंगाजेबाच्या चरित्रकारास करावा लागतो. कारण त्याने परधर्मीयांबद्दल दाखविलेली आत्मीयतेची भावना. राजाने आज्ञापत्रे देत असताना मौजे कारी तालुका इंदापूरच्या काझी सैतला खिजमती मशिदीच्या व्यवस्थेबद्दल इनामपत्र दिले आहे. (२५ ऑक्टोबर १६४६) म्हणजे वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षीच राजाने परधर्मीयांकडे बघण्याचा हा दृष्टिकोन स्वीकारला होता हे या पत्रावरून दिसून येते. १६४७ मधील पत्रात भांबुर्डे येथील मुल्लाअली, मुल्ला अब्दुला यांच्या मशिदीच्या दैनंदिन खर्चासाठी भांबुर्डे येथे जमिन इनाम दिलेली आहे. २० नोव्हेंबर १६५३ रोजी इंदापूर येथील मशिदीच्या व्यवस्थेसाठी १ चावर जमीन व तेल स्वराज्याच्या खजिन्यातून देण्यात आले आहे. १६५६ च्या एका पत्रात मशिदीमध्ये खुद्बा वाचणारा काझी इब्राहीम व शरिफ यास त्याच्या वडिलांपासून चालत आलेले इनाम मलिक अंबर खुर्दखत वजिराच्या कारकिर्दीपासून चालत आले होते. हे इनाम मुरारपंतांच्या स्वारीच्या वेळी तुटले. सदर इनाम राजाने पुन्हा सुरू केले. एवढेच नव्हे तर फुरसुंगी येथील मशिदीच्या व्यवस्थेत मुकादम चांदखान हा ढवळाढवळ करतो अशी मशिदीचा काझी कासिम याची तक्रार होती. राजाने आपल्या हवालदारामार्फत चांदखानास ताकिद देऊन अशा पद्धतीने ढवळाढवळ होऊ न देण्याबद्दल फार कठोरपणे बजावले आहे. राजा परधर्मीयांच्या देवस्थानबद्दल कसे वागत याचा हा महत्त्वाचा धावता उल्लेख आहे. राजाचे हिंदू धर्मावर नितांत प्रेम होते याबद्दल शंका असण्याचे कारण नाही. पण दर्गा, मशिदी आणि प्रार्थनास्थळे यांचासुद्धा तो तितकाच आदर करीत असे.
सुरत लुटीच्यावेळी दि. ६ जानेवारी १६६४ ला सायंकाळी रेव्हरंड फादर ॲम्ब्रॉस हा ख्रिश्चन मठाधिपती राजाला भेटायला आला होता. सुरतेतील गरीब ख्रिश्चनांच्या रक्षणाबद्दल तसेच सैन्याच्या हिंसेला बळी पडावे लागू नये अशी विनंती त्याने राजाला केली. राजाने त्याला सर्वतोपरी अभय दिले. सुरतेच्या प्रचंड लुटालुटीत आणि जाळपोळीत ॲम्ब्रॉसच्या मठाला केसाइतकासुद्धा धक्का लागला नाही.सुरतेच्या लुटीत मठालाच नव्हे तर कोणत्याही प्रार्थनास्थळाला स्वराज्याच्या सेनेने धक्का लावला नाही. इग्रंजांनी नेहमीच्या हुशारीप्रमाणे आपल्या वखारीच्या रक्षणासाठी एक मशीद व एक मंदिर आपल्या ताब्यात घेतले. ते बिधास्तपणे आणि अगदी सुरक्षितपणे तेथे राहिले. राजाच्या कोणत्याही सैनिकाने तेथे प्रवेश केला नाही किंवा काडीचाही त्रास दिला नाही. डचांचा एक हेर सुरतेच फिरून आला. प्रत्यक्ष शिवाजीची छावणीसुद्धा न्याहाळून आला. तरी त्याला कोणी हटकले नाही. कारण त्याने फकिराचा वेश धारण केला होता.
स्वराज्यावर आक्रमण करणारे कींवा चालून येणारे सुभेदार व सरदार कसे वागत याचाही विचार केला तर शिवाजीचा हा परधर्मीयाबद्दलचा धार्मिक उदारतेचा दृष्टिकोन त्या काळात अद्भुतच वाटतो. अफजलखान विजापूरहून निघाला तो मंदिर आणि हिंदूंची देवस्थाने फोडतच. तो स्वत:ला बिरुदे लावताना "कातिले मुतमीरंदाने व काफिरान। शिकंदर बुनियादे बुतान ॥" असे संबोधतो. म्हणजे "मी काफिर व बंडखोराची कत्तल करणारा व मूर्तीचा पाया उखडून टाकणारा आहे" असे तो सांगतो. याशिवाय "दीन दार बुतशिकन्" व "दीन दार कुफ्रशिकन्" (म्हणजे धर्माचा सेवक आणि मूर्तीचा विध्वंसक व धर्माचा सेवक आणि काफिराचा विध्वंसक) अशीही विशेषणे तो स्वत:ला लावताना दिसतो. असे विजापुरातील अफजलपुरात कोरलेल्या एका शिलालेखात म्हटले आहे. हा अफजलखान स्वराज्यात आला तो विध्वंस करतच. तुळजापूर, पंढरपूर, माणकेश्वर ही देवळे प्रत्यक्ष विजापूरच्या आदिलशहाच्या अमलाखाली होती. पण तरीसुद्धा ती फोडली. मूर्ती भ्रष्ट केल्या. तुळजाभवानी तर साक्षात शक्तिदेवता. राजाचे कुलदैवत. तुळजाभवानीची मूर्ती अफजलखानाने फोडली म्हणून अफजलखानाचा वध झाल्यानंतर राजाने त्या प्रेताचा सूड घेतला नाही. खानाचे शीर राजगडावर पाठविताना त्याचा योग्य तो मान ठेवला एवढेच नव्हे, तर त्याची पूजाअर्चा व नैवेद्यव्यवस्था नीट चालवली. अफजलखानाचे शीर राजगडाच्या बालेकिल्ल्याच्या दरवाजातील कमानीत बसवले. खानाच्या प्रेताचा सन्मानपूर्वक अंत्यविधी प्रतापगडाच्या पायथ्याशी त्यावेळी केला याची साक्ष आजही तेथे आहे. डॉ. हेलन इ.स. १६७० मध्ये राजापुरात आला होता. तो लिहितो, "शिवाजीची प्रजा त्याच्याप्रमाणे मूर्तिपूजक आहे; परंतु तो सर्व धर्माचा प्रतिपाल करतो. या भागातील अतिशय धोरणी मुत्सद्दी राजकारणी पुरुष म्हणून तो विख्यात आहे."
औरंगजेबाने जेव्हा जिझिया कर लावला तेव्हा शिवाजीने त्याला पत्र लिहिले आहे. त्यातील काही वाक्ये अशी:"...अस्मानी किताब म्हणजे कुराण. ते ईश्वराची वाणी आहे. त्यात आज्ञा केली ती ईश्वर जगाचा व मुसलमानाचा आहे. वाईट अथवा चांगले दोन्ही ईश्वरचे निर्मित आहे. कोठे महेजतीत यवन लोक बांग देतात, कोठे देवालय आहे तेथे घंटा वाजवतात. त्यास कोणाचे धर्मास विरोध करणे हे आपले धर्मापासून सुटणे व ईश्वराचे लिहिले रद्द करून त्याजवर दोष ठेवणे आहे... न्यायाचे मार्गाने पाहता जजिया पट्टीचा कायदा केवळ गैर...ज्यावर जुलूम झाला त्याने हाय हाय म्हणून मुखाने धूर काढल्यास (तळतळाट केल्यास) त्या धुराने जितके लवकर जळेल तितके जलद अग्नीही जाळणार नाही...याजवर हिंदू लोकास पीडा करावयाचे मनात आले तर आधी राजा जयसिंगाकडून जजिया घ्यावा...गरीब अनाथ मुंग्या चिलटासारखे आहे त्यास उपसर्ग करण्यात मोठेपणा नाही..."
शिवाजीने कर लावताना धर्माच्या नावावर कोणताही भेद केलेला नाही. तुलनेत इस्लामी राज्यातील बूत फरोशी जकात हे कर होते. हिंदु मूर्तिपूजक आहेत म्हणून त्यांना बूत फरोशीचा कर भरावा लागे, तर मुसलमानांना २.५% व हिंदूना ५% जकात इस्लामी राज्यामध्ये होती. अशा पद्धतीची स्वतंत्र करव्यवस्था स्वराज्यात नव्हती.
राजा स्वत: तर मौनीबाबा पाटगावकर, केळशीचे बाबा याकूब या मुसलमान संतांच्या दर्शनासाठी गेल्याचा उल्लेखही ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आहे. राजाचे आजोबा मालोजी भोसले हे शंभू भवानीचे नि:स्सीम भक्त होते. कठोर व्रते ते करीत. पूजाअर्चा केल्याशिवाय मुखात अन्नाचा कण वा पाण्याचा थेंब घालीत नसत. श्रीगोंद्याच्या शेख महंमदवर त्यांची निष्ठा होती. त्यांनी शेख महंमदाचा गुरुपदेश घेतला होता. शहाजी राजांच्या जन्माबद्दलही नवसाला पावला अशी श्रद्धा असल्यामुळे मालोजीराजांनी एका मुलांचे नाव शहाजी व दुसऱ्याचे नाव शरीफजी असे ठेवले होते.
स्वराज्यामध्ये सर्व धर्मीयांना अभय असल्यामुळे व सैन्यात पराक्रम गाजवल्यानंतर सन्मान करण्यात शिवाजी कधीही मागेपुढे पाहात नसल्यामुळे सैन्यात भरती होणाऱ्यामध्ये मुस्लिमही बहुसंख्येने हिंदवी स्वराज्याच्या फौजेमध्ये होते. काही अगदी उच्चपदस्थ होते. त्यांच्या नामोल्लेख करता येईल. नूरखान बेग हा पायदळाचा पहिला सरनौबत इब्राहीमखान व दौलतखान कारभारी अधिकारी. काझी हैदर हा वकिल, तर मदारी मेहतर हा शिवाजीच्या अतिशय अंतस्थ गोटातील विश्वासू सहकारी होता. विजापूरला बड्या बेगमेने ज्यावेळेला बेहलूखान वगैरे पठाणी सरदारांना ठार केले त्यावेळी आदिलहाकडील ७०० पठाण राजाकडे नोकरीमागण्यासाठी आले व राजांनी त्यांना आपल्या सैन्यामध्ये दाखल करून घेतले. हे राजांच्या धार्मिक धोरणाचे ठळक वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
राजा धर्माभिमानी होता, विष्ठावंत होता पण अंधश्रद्ध नव्हता. २४ फेब्रुवारी १६७० रोजी राजगडावर राजारामाचा जन्म झाला. मुलगा झाला या वार्तेने गडावर जो आनंद व्हावयास पाहिजे होता तो कोठे दिसत नव्हता कारण मूल पालथे उपजले होते. पालथे उपजणे हा त्याकाळी अपशकुन समजला जाई. राजारामाच्या मागे जन्मापासून अपशकुनाचे वलय चिकटले तर प्रत्येक वाईट गोष्टीचे खापर त्याच्या माथ्यावर फोडले जाईल याची जाणीव राजाला झाली. तो म्हणाला, "पुत्र पालथा उपजला, दिल्लीची पातशाही पालथी घालेल." मग हुजरेपाजरे सर्व म्हणू लागले. "थोर राजा होईल शिवाजी राजियाहून विशेष किर्ती होईल." या प्रागतिक धार्मिक धोरणामुळे बजाजीराव निंबाळकर यांचे शुद्धिकार्य, नेताजी पालकर यांचे शुद्धिकार्य इत्यादी शुद्धीकरण होऊ शकले. मात्र भोंगळ पुरोगामीपणाच्या आहारी जाऊन त्याने स्वराज्यातील जनतेच्या भावना दुखावतील असा अतिरेकि उत्साह मात्र कधी दाखविला नाही. स्वत: स्वधर्मीयांबद्दलसुद्धा तो अतिशय कठोरतेने वागे. धर्मक्षेत्रात पूज्य मानलेल्या सत्पुरुषांनी मर्यादेपलीकडे राजकारणात लुडबूड केलेली त्याला अजिबात आवडत नसे.
चिंचवडकर देवांना त्यांने 'तुमची बिरदे आम्हास द्या व माझी तुम्ही घ्या.' या शब्दात फटकारले आहे. म्हणजे तुम्ही छत्रपती व्हा आणि आम्ही पूजाअर्चा करतो असा याचा अर्थ. हे घडले कोणत्या गोष्टीमुळे? जेजुरीच्या धाडशी व गुरव मंडळीत उत्पन्नाच्या हप्त्याबद्दल भांडण होते. चिंचवडकर देवांना हे समजले. त्यांनी गुरव व धाडशी मंडळींना निवाड्यासाठी बोलाविले. देवांनी धाडशांचे अधिकार गुरवाना देऊन टाकले. विरुद्ध गेलेल्या निकालास भिऊन पळून जाणाऱ्या धाडशांना किल्ल्यात बंदी घातले. चिंचवडकर देवांना वाटले आपण छत्रपतींचे गुरू त्यामुळे हे अधिकार आपोआपच मिळाले आहेत. देवांच्या प्रतिष्ठेमुळे सिंहगडच्या कील्लेदारांनी त्यांच्या आज्ञेचे पालन केले. राजाने सिंहगडच्या गडकऱ्याला फटकारले. परस्पर कोणालाही बंदीत टाकण्याचा तुला अधिकार काय ? चाकर आमचा की देवांचा? पत्र पाहताच धाडशांना सोडून द्यावे लागले. चिंचवडकरांची प्रतिष्ठा व त्यांच्या स्वधर्मियांमधील मान व सन्मान यापेक्षा स्वराज्यातील शिस्त पाळली गेली पाहिजे हा शिवाजीराजांचा दंडक होता.
राजाने वतनदारांचे परस्परवसुलीचे अधिकार काढून घेतले. तसेच देवस्थानांचे घेतले. चिंचवडकर देवांना बादशाहीतसुद्धा कोकणातून पडत्या भावाने भात, मीठइत्यादी खरेदी करण्याचा अधिकार होता. शेतकऱ्यांचे यात नुकसान होते आहे हे ध्यानात घेऊन राजाने देवांचा हक्क तात्काळ काढून घेतला. राजांनी २२ जून १६७६ रोजी देवांना कळविले की की की तुम्ही रयतेपासून कमी भावाने धान्य घेऊ नये. तुम्हाला देवस्थानासाठी लागेल ते सर्व धान्य स्वराज्याच्या खजिन्यामधून दिले जाईल. दैनंदिन खर्च होईल तो लिहून ठेवणे व खर्च खजिन्यातून दिला जाईल. आपले देवस्थान आहे म्हणून त्यांना खास अशी सवलत राजाने दिलेली नाही.
राजाचे धार्मिक धोरण हे स्वधर्माबद्दल प्रेम व आदरभाव दर्शविणारे असे होते. शिवाजी केवळ हिंदू धर्माचा राजा आहे असा स्वार्थी प्रचार काही लोक आपल्या राजकिय स्वार्थासाठी राजाचे खोटे व हीन रूप मांडत आहेत. यातून काही क्षणापुरता कदाचित त्यांच्या राजकिय स्वार्थ साधेलही, परंतु राजाचे असे विकृत रुप मांडणे हा शिवाजीचा घोर अपमान आहे. राजाच्या उत्तुंग व विशाल व्यक्तिमत्वाला हे कमीपणा आणणारे आहे.
शिवाजीराजांचा स्त्रीविषयक दृष्टीकोण
राजाचा परस्त्रीविषयीचा दृष्टीकोन हा तत्कालीन स्थितीत अनन्यसाधारण होता यात काही वाद नाही. सुलतान दरबाराचे सरदार आणि वतनदार यांच्या स्त्रियांवर अत्याचार होत, त्यांना पळवून नेणे, अब्रू लुटणे हा जणू आपला हक्कच आहे असे लुटारू सैन्य माने. स्वराज्याच्या सैन्याची स्त्रियांबाबतची वागणूक अगदी वेगळी असे हे सर्वमान्य आहे. खाफीखान वगैरे अनेक लेखकांनी मराठा सैन्याच्या या गुणाबद्दल व शिवाजीच्या स्त्रियांबद्दलच्या धोरणाबद्दल गौरवोद्गार काढले आहेत. स्वत: मोगल सम्राट औरंगजेब राजाच्या मृत्यूची बातमी कळल्यानंतर म्हणाला, 'आपल्या हातात पडलेल्या शत्रूच्या स्त्रियांच्या अब्रूची कदर करणारा एक महावीर मरण पावला.' राजाच्या चरित्रात स्त्रीयांविषयक उदार धोरणाची अनेक उदाहणे मिळतात.
मुरजे येथील रंगो त्रिमल वाकडे कुलकर्णी ब्राह्मण यांच्याकडील लग्नाचे वऱ्हाड
आले. वऱ्हाडात एक विधवा महिला होती.रंगो त्रिमल यांनी त्या विधवेशी बदवर्तन केले. राजांच्या कानावर ही गोष्ट केली. रंगो त्रिमल वाकडे यांच्या पूर्वी एका पाटलाने बदअंमल केला म्हणून त्याचे हातपाय तोडल्याची शिक्षा राजानी केल्याचे त्याला माहीत होते. रंगो कुलकर्णी घाबरला. आता शिवाजीराजे आपल्याला जीवानिशी मारतील या भयाने राजांच्या शत्रुपक्षाकडील चंद्रराव मोरे यांच्याकडे आश्रयाला गेले. चंद्ररावाने त्यांना आश्रय दिला. पण हे फार काळ टिकले नाही, कारण रंगोबा लवकरच मरण पावले. राजे आपल्या सैन्याला हुकूम देताना कोणत्याही परिस्थितीतमहिलांशी वर्तणूक पूर्णपणे सभ्यतेची असली पाहिजे याची काळजी घेई. बेलवाडीच्या देसाईणीची बेअब्रू केल्याच्या आरोपावरून राजाने सखोजी गायकवाड याचे डोळे काढले आणि त्याला जन्मभर अंधारकोठडीत ठेवले हे लक्षात घेतले पाहिजे.
याबाबतीत राजाने संभाजीराजांचीसुद्धा गय केली नाही याचे उदाहरण फार
बोलके आहे. चिटणीसांची बखर हा एकमेव पुरावा असता तर तो ग्राह्य मानता आला नसता. परंतु मुंबईकर इंग्रजांच्या पत्रातही या घटनेस दुजोरा आहे. १६ जानेवारी १६८६ च्या पत्रात इंग्रज लिहितात की, संभाजीने एका ब्राह्मणाच्या मुलीला वाईट मार्गाला लावले होते. रायगडच्या पहारेकऱ्याला शिवाजीराजांनी आज्ञा केली की रोज संध्याकाळनंतर संभाजीने तिच्या भेटीस जाण्याचे सोडले नाही तर त्याचा कडलोट करण्यात यावा. शंभुराजाचे वय त्या वेळी १८ वर्षाचे होते हे विसरता येत नाही. स्वत:च्या पोटच्या मुलाशीसुद्धा राजा किती कठोरपणे वागत होता हे वरील उदाहरणावरुन दिसून येईल. खाफीखान हा राजांबद्दल लिहितो की, शिवाजीच्या सैनिकांसाठी असा नियम होता की लुटीसाठी गेले असता त्यांनी 'मशिदीस, कुराणास किंवा कोणत्याही स्त्रीस त्रास देऊ नये.' त्यावेळच्या युद्धनीतीमध्ये स्त्री-पुरुष लहान मुले यांना पकडून गुलाम म्हणून विकण्याची त्यावेळी सर्वमान्य झालेली प्रथा राजांनी प्रथम धुडकावून लावली.युद्धांतील स्त्री-कैदी उपभोग्य वस्तू म्हणून त्यांनी कधीही सैनिकाला वाटू दिले नाही. युद्धात स्त्री-कैद्यांना उपभोगून आपले सवंग सूडाचे समाधान मानून घेण्याची वृत्ती त्यावेळच्या इतर मोगल सरदारामध्ये दिसून येते. पण राजांनी याबाबतीत अतिशय प्रखर कटाक्ष ठेवला आणि 'परस्त्री ना नीती दृष्टी' असाच लौकीक कायम राखला. पराभवापेक्षा विजयाचा आनंद पचवणे हे अवघड. या आनंदाच्या क्षणीच पाऊल घसरण्याची शक्यता असते पण आपल्या संयमशील वागणुकिने शिवाजीराजे एका आदर्श महापुरुषाच्या रांगेत अगदी उच्चपदी बसले. युद्धकाळातच राजे असे वागत असे नाही तर सर्वसामान्य परिस्थितीतही राजाची वागणूक अशीच होती.
बसत असे. विहीरीवर सावकाराच्या बायका आणि इतर गरीब स्त्रिया पाणी भरण्यासाठी येत असत. त्यांच्या मुलांना तो त्या त्या मोसमातील फळे देत असे. आपण आपल्या आई किंवा बहिणीशी ज्या प्रकारे बोलतो त्या प्रकारे तो त्या बायकांशी बोलत असे.' असे वर्णन खाफीखानाने केलेले आहे. या पार्श्वभूमीवर त्या काळातील बादशहा सुलतानाच्या वागणुकिचे एक ठळक उदाहरण म्हणून अफझलखानाचे देता येईल. फ्रेंच प्रवासी अब्रे कॅरे यानी असे लिहून ठेवले आहे की, शिवाजीवर चालून जाण्यास खान निघाला व आपल्या स्त्रियांचा त्याग करावयाची वेळ आली त्यावेळी त्याचा द्वेषाग्नी एकदा भडकला की त्यास तो आवरता आला नाही व त्या भरातच एक असे अमानुष कृत्य करण्याची प्रेरणा त्याला झाली, जे फक्त उलट्या काळजाचाच मनुष्य करू शकेल. खानाने सात दिवस स्वत:ला जनानखान्यात कोंडून घेतले व हा काळ उपभोग व चैनीत घालवला. पण त्याचा शेवट मात्र करूण झाला. कारण शेवटच्या दिवशी खानाने आपल्या नजरेसमोर त्या दुर्दैवी २०० स्त्रियांना सैनिकांकडून भोसकून ठार मारले. आपल्या माघारी त्या परपुरुषाशी रत होतील या भयाण व काल्पनिक भयाने तो पछाडला गेला होता. त्या बिचाऱ्यांना असा काही प्रसंग घडेल याची कल्पनाही नव्हती.
स्वराज्याचे सैनिक आणि लुटारूंच्या फौजा यांच्या वर्तणुकित हा फरक कसा काय झाला? बहुतेक इतिहासकारांनी याचे सर्व श्रेय शिवाजीच्या व्यक्तिगत नीतिमत्तेला आणि चारित्र्याला दिले आहे. आणि शिवाजीमध्ये ही आदर्श नैतिकता उद्भवली कोठून तर आई जिजाबाई आणि दादोजी कोंडदेव यांच्या सुसंस्कृत, धर्मपरायण शिकवणीमुळे आणि प्रभावामुळे. लहानपणापासूनच्या शिकवणीमुळे, सुसंस्कृत वातावरणामुळे संबंधित व्यक्तद्दच्या चारित्र्यावर दीर्घकाळ प्रभाव राहू शकेल हे शक्य आहे. पण अशा शिकवणुकीच्या अपघाताने स्वराज्याच्या सैनिकांची नीतिमत्ता ठरली असे म्हणणे तर्काला सोडून होईल.
सुलतान वतनदारांच्या लुटारू फौजा व स्वराज्याचे सैनिक यांच्या उद्दिष्टात आणि मूलभूत प्रकृतीतच मोठा फरक होता. स्त्रियांविषयीच्या वागणुकितील फरक हा चमत्कार नाही. अपघात नाही. शिवाजीराजाच्या स्वराज्याच्या थोरवीचा तो मोठा सज्जड पुरावा आहे.
लुटारूंच्या फौजांतील सैनिक कुटुंबवत्सल असू शकत नव्हते. शादीसुदा असणाऱ्यांचेसुद्धा घराशी संबंध जुजबीच असणार. लुटारू फौजा पूर्णवेळ व्यावसायिक सैनिकांच्या असत. साहजिकच लुटीच्या प्रदेशात गेल्यानंतर त्यांची प्रवृत्ती अगदी वेगळी राही. स्वराज्यातला सैनिक हा मुख्यत: अर्धवेळ शेतकरी वअर्धवेळ सैनिक होता. जे पूर्णवेळ सैनिक झाले त्यांचेही शेतीशी आतड्याचे नाते सुटलेले नव्हते, कुटुंबवत्सलता संपलेली नव्हती. जमिनीशी नाते असणारे सैन्यच काय पण दंगेखोरसुद्धा स्त्रियांवर हात उचलीत नाहीत. म. गांधींच्या वधानंतर महाराष्ट्रातील ग्रामीण भागात मोठ्या दंगली उसळल्या. पण अगदी अपवादादाखलदेखील स्त्रियांवर अत्याचार घडले नाहीत. याउलट इंदिरा गांधींच्या हत्येनंतर दिल्लीसारख्या शहरात झालेल्या दंग्यात महिलांवरील अत्याचाराचे अनेक प्रकार घडले. स्वराज्याचे सैन्य म्हणजे सरदारांच्या फौजांची घडवून आणलेली संधिसाधू आघाडी नव्हती. अशा तऱ्हेची आघाडी घडवून आणून त्यातून स्वराज्य संस्थापना करण्याचा प्रयत्न राजाने केला असता तर त्याला यश आले असते किंवा नाही हा मुद्दा अलाहिदा. पण त्या सैन्याची स्त्रियांबद्दलची वागणूक स्वच्छ ठेवणे शिवाजीराजासारख्या चारित्र्यवान नेत्याच्याही आटोक्याबाहेरचे झाले असते. शहाजीराजांनी लुटारू फौजांची आघाडी बांधली. त्यांच्या सैन्याची स्त्रियांविषयी काही धवल कीर्ती नाही, हे लक्षात ठेवले पाहिजे.
स्त्रियांविषयीचा दृष्टिकोन उदार की अनुदार याचा संबंध सैनिक कोणत्या धर्माचे आहेत, कोणत्या जातीचे आहेत, याच्याशी नाही. औरंगजेबालाही ज्याची वाहवा करावी लागली त्या सैन्याच्या स्वरूपात पुढे फरक पडला. पेशवाईच्या काळात ते उत्तरेकडे, पूर्वेकडे स्वाऱ्या करू लागले. त्यावेळी त्यांच्याही प्रकृतीत मोठा फरक पडला. पावसाळ्याच्या आधी घरी पतरण्याची पद्धत कायम राहिल्यामुळे मराठा फौजांचे स्त्रियांवरील अत्याचार हे मुसलमानी नीचांकापर्यंत कधी गेले नाहीत हे खरे, पण उत्तर पेशवाई तमाशे लावण्याच्या फडांना जो ऊत आला तो पुष्कळ काही सांगून जातो.
लुटारु फौजांची भूमिकाच वेगळी असतेक लुटीच्या प्रदेशात ज्या गोष्टीवर हात टाकता येईल त्यावर टाकावा, अन्नधान्य लुटावे, गुरे पळवावीत, कापावीत, पुरुषांच्या कत्तली कराव्यात आणि त्याच्या राहिला साहिला अभिमान धुळीत मिळवून प्रतिकाराची सर्वबुद्धी खलास करण्यासाठी त्यांच्या स्त्रियांवरही अत्याचार करावेत ही लुटारूंची रणनीती असते. लुटीच्या हल्ल्याचा अनुभव घेतलेले समाजचे समाज नपुंसक होऊन जातात आणि लुटारूंच्या सैतानी राज्यापुढे मान तुकवतात. लुटारूंना नेमके हेच अभिप्रेत असते. लोकांकडून प्रेम मिळविण्याची त्यांची इच्छाही नसते आणि अपेक्षाही नसते. हा अनुभव प्रत्येक युद्धात येतो. सुसंस्कृत जर्मन व जपानी सैनिक दुसऱ्या महायुद्धाच्या काळात असेच वागले. अमेरिकन सैनिकांची वर्तणूक व्हिएटनामसारख्या प्रदेशात अशीच राहिली.स्वराज्याच्या सैनिकांची भूमिकाच वेगळी असते. राज्य स्थापण्याकरिता, सैन्याकरिता साधनांची गरज असतेच. ती साधने सर्वसामान्य जनतेकडूनच मिळवायची असतात. पण त्यासाठी अत्याचारांचा वापर त्यांना परवडूच शकत नाही. सर्वसामान्य लोकांतून, गावागावांतून, दऱ्याखोऱ्यातून पाण्यातील माशाप्रमाणे सहज संचार करणे त्यांना आवश्यक असते. धनधान्य मिळविणे हे त्यांचे साधन असते, साध्य नाही. ज्या प्रदेशात त्यांचा संचार त्याच प्रदेशात त्यांना सुव्यवस्थित समाज आणि प्रशासन तयार करायचे असते. आणि शेवटी आसपासची सगळी माणसे ही त्यांची आपली, जवळची, लागेबांध्याची अशी असतात. अशा परिस्थितीत स्त्रियांवरील अत्याचार संभवतच नाहीत.
राजाच्या सैन्याचा स्त्रियांविषयीचा दृष्टिकोन हा कोण्या व्यक्तीच्या महात्म्याचा प्रश्न नाही.असे माहात्म्य आणि चारित्र्य शिवाजीकडे होते म्हणूनच तो अशा स्वातंत्र्यसेनेचा नेता बनू शकला. स्वराज्याच्या सैन्याचा स्त्रियांविषयीचा दृष्टिकोन एवढेच सिद्ध करतो की ही काही लुटारूंची फौज नव्हती; आपल्याच देशातील सर्वसामान्य कुटुंबवत्सल माणसे लुटीचा प्रतिकार करून निर्भयपणे जगता यावे यासाठी हातात तलवार घेऊन लुटारूंच्या विरुद्ध उभी ठाकली होती.
वस्तुनिष्ठ दृष्टीने राजाच्या सर्व चरित्राचा अभ्यास केला तर तो हिंदूंच्या रक्षणासाठी लढला किंवा मुसलमानांना बुडविण्यासाठी लढला असे म्हणण्याला काहीही आधार सापडत नाही. गावगाड्याच्या व्यवस्थेची लूट करणाऱ्या सर्व पुंडांविरुद्ध तो लढला. मग त्यांचा धर्म हिंदू असो का मुसलमान; कॅथॉलिक असो का प्रॉटेस्टंट. त्याच्या सहकाऱ्यांत हिंदू होते, मुसलमान होते. मुसलमानांशी लढायांनी शिवाजीला जितके थकवले तितके भाईबंदांतील लढायांनी त्याला जेरीस आणले. शिवाजीने मांडलेला संघर्ष हा धर्माधर्मातील नव्हता. एका बाजूला गावगाडा आणि दुसऱ्या बाजूला गावगाड्याला लुटणारे अशी संघर्ष रेषा त्याने आखली. राजकारण आणि राज्यसत्ता शेतीच्या लुटारूंच्या हातून काढून काढून घेऊन ती गावगाड्याच्या दृष्टीने कल्याणकारी बनावी असा प्रयत्न केला. शिवकालीन स्वराज्य आणि मोगलाई म्हणजे १७ व्या शतकातील भारत व इंडिया यांचेच रूप होते.
□
शेतकऱ्यांचा राजा
शिवाजीराजांच्या पन्नास वर्षांच्या अत्यंत धकाधकीच्या जीवनाचे अर्थ लावण्याचे काम निरनिराळ्या विचारवंतांनी, इतिहास संशोधकांनी, तत्वचिंतकांनी, धर्माभिमान्यांनी आपापल्या दृष्टिकोनांतून केले आहे; परंतु छत्रपती शिवाजी महाराज हे मावळ्यांचे राजे होते. खऱ्या अर्थाने ते केवळ शेतकऱ्यांचेच राजे होते, इतक्या सुस्पष्टपणे शिवाजी महाराजांच्या जीवनकालाचा अर्थ कोणी लावला नाही. कारण असा खरा अर्थ शेतकऱ्यांपुढे येणे त्यांच्या दृष्टीने सोयीचेही नव्हते व नाही.
त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा राजा कधी मिळालाच नाही. शिवपूर्वकालीन अवस्था ही कोणीही येऊन रयतेस लुटावे आणि राज्य करावे अशी राहिली. पण स्वराज्याची मुहूर्तमेढ करताना व नतरही महाराजांनी प्रसंगी अतिशय कठोरतेने, प्रसंगी मृदुतेने, प्रसंगी सामंजस्याने, गनिमी काव्याने सर्व बुद्धिकौशल्य पणाला लावून पहिल्यांदा शेतकऱ्यांचे राज्य निर्माण केले. वाढवले. हरवलेली सुरक्षितता परत मिळवून दिली.
शिवपूर्व काळात शेतकरी समाज हा वतनदारांच्या लहरीवर जीवन जगत असे. दुष्काळ असो, नापिकी असो की अतिवृष्टीमुळे नासाडी होवो, वसुलीचा रेटा हा वतनदाराच्या मर्जीप्रमाणे आणि लहरीप्रमाणे असे. अगदी नापिकीच्या काळात म्हणजे दुष्काळातसुद्धा वसुलीसाठी वतनदारांची फौज येत आहे असे कळताच शेतकरी प्राणभयाने डोंगरदऱ्यांमध्ये लपून बसत याची नोंद इतिहासात पदोपदी आढळते. वतनदारांना विरोध करणे म्हणजे त्याचे वैर विकत घेणे; वसुली नाकारणे म्हणजे संसाराची राख-रांगोळी करून घेणे, धूळधाण करून घेणे होते. शेतकऱ्यांची लूट करून बादशहाच्या खजिन्यामध्ये पैसा भरणारे वतनदार आणि त्यांचे राजे पातशहा यांना रयतेची फारशी चिंता नसे. त्यामुळे शेती, शेतकरी किंवा गावगाड्याशी राज्यकर्त्यांचा संबंध पूर्णपणे तुटलेला होता. शेतकरी, गावकरी यांच्यावर सत्ता चाले ती गाव-वतनदार, परगणे वतनदार किंवा सुभेदारांची. वतनदारांचे धोरण हे या निमित्ताने जाणून घेणे आवश्यक आहे. देशमुख, देशपांडे, पाटील, कुलकर्णी हेत्या काळचे वतनदार. तत्कालीन व्यवस्थेनुसार गावच्या काळीवर व पांढरीवर म्हणजेच शेतीवर व रयतेवर, तसेच गावचे शिवार अथवा चराऊ पडीत जमिनीवर पाटलांची सत्ता चाले. तर कुलकर्णी हा वतनदार असे. आणि परगण्याची रयत व भूमी यांच्यावर मालकी देशमुखांची असे. त्यांचे सहायक देशपांडे होते. ज्या राज्याशी परगणा जोडलेला असे त्या राज्याच्या राजाला धान्य, रोख रक्कम जी लागेल ती वतनदार पुरवीत असत. अर्थात वसुलीच्या परगण्यासाठी ते राजाला जबाबदार असत. म्हणजे रयतेच्या दृष्टीने परगण्याचा राजा देशमुख. तो आपल्या पदरी 'पेशवा' बाळगे. या देशमुखांना स्वतंत्र मुद्रा मिळत होती. परगण्याच्या दप्तरावर देशमुखाचा शिक्का असणे अत्यंत आवश्यक होते. कोणत्या गावच्या शेतीवर किती महसूल वसूल करायचा, व्यापाऱ्याकडून किती जकात घ्यायची हे निर्णय परगण्याचा देशमुख स्वमर्जीनुसार ठरवी. गाव शिवारातील जमिनीचे बांध कायम राखणे, तंटेबखेडे मिटविणे,गुराढोरांवर, पिकांवर व रयतेवर दुसऱ्याकडून जुलूम न होऊ देण्याची काळजी घेणे, नव्या वसाहती करणे, इनाम देणे हे अधिकार देशमुखाकडे. राजाला द्यायचा महसूल वतनदार राजाशी किंवा सुभेदारांशी परस्पर स्वतंत्रपणे ठरवून घेत. तिजोरीत भरायच्या वसुलापेक्षा कितीतरी पटीने अधिक रक्कम वतनदारांची फौज रयतेकडून वसूल करीत. या संदर्भात सभासदांनी केलेले वर्णन फार बोलके आहे. ते लिहितात,
"आदिलशहा, निजामशहा, मोगलाईतील ज्यांनी देश काबील केला, त्या देशात पाटील, कुलकर्णी व देशमुख यांच्या हाती रयत सोपविली. त्यांनी हवी तेवढी कमाई करावी आणि मोघम रक्कम भरावी. हजार दोन हजार मिरासदाराने जमा करावी आणि त्या गावच्या नावावर मात्र दोनशे ते तीनशे दिवाणखान्यात खंड भरावा. यामुळे मिरासदार श्रीमंत होऊन गावात गढी, वाडे, कोट, बांधून सैन्य बाळगून बळावले.... ज्या दिवाणास भेटणे नाही, दिवाणाने गुंजाईस अधिक सांगितल्याने भांडावयास उभे राहतात, ये जातीने पुंड होऊन देश बळकाविले."
'आज्ञापत्र' काराने वतनदारांबद्दल लिहिताना म्हटले आहे, "राज्यांतील देशमुख आदी करून यांची वतनदारी ही प्राकृत परिभाषा मात्र होती. ते स्वल्पच परंतु स्वतंत्र देशनायक आहेत. हे लोक म्हणजे राजाचे वाटेकरी आहेत." वरील वतनदार म्हणजे बुलंद शक्तद्द होती. या शक्तद्दला सांभाळणे हेच रयतेसाठी काम होऊन बसले होते. जर या वतनदारांना त्यांच्याच राजाकडून थोडा जरी उपद्रव झाला तरी ते शत्रूच्या गोटात सामील होत आणि आपल्याच राज्याच्या विरुद्ध लढायला उभे राहत.
ही वतनदारी आली कशी? अगदी शिवपूर्व काळाच्या शेकडो वर्षे आधीपासूनराजाराजांतील लढाया अखंड चालत; परंतु प्रजेला त्याची तोशीस पोचत नसे. युद्धांत भाग न घेतलेल्या प्रजेला लुटणे किंवा ठार मारणे टाळले जात असे. लढाई सुरू असली तरी शेतकरी शांतपणे आपल्या शेतात काम करीत आणि या गोष्टीची नोंद अगदी परकीयांनीसुद्धा करून ठेवली आहे. मुसलमानी आक्रमणापासून लढायांचा आणि फौजेच्या हालचालीचा जाच गावगाड्याला होऊ लागला. शत्रूराष्ट्राला सर्वथैव लुटणे हे मान्यताप्राप्त तत्त्वच झाले. सत्तेच्या लालसेतून प्रचंड सैन्यबळ बाळण्याची गरज निर्माण झाली. सैन्य बाळगण्यासाठी आवश्यक असलेले द्रव्य शत्रूराष्ट्राची लूट करून मिळवावे हा पायंडा पडला. विजापूरचा आदिलशहा तर आपल्या सैन्यासोबत आठ हजार लुटारू सदैव बाळगत असे. याचा उल्लेख मद्रासकार इंग्रजांनी करून ठेवला आहे. त्या काळातील बादशहाची लूट फार भयानक होती. देवस्थाने फोडणे, स्त्री-पुरुष-मुलांना कैद करून गुलाम म्हणून विकणे, स्त्रियांचा भोगार्थ म्हणून उपयोग करणे, उभ्या शेतातील पीक कापून नेता येत नसेल तर त्याचा तुडवून नाश करणे, गावेच्या गावे जाळून बेचिराख करणे ही पद्धत त्या काळी अवलंबिली गेली. यथावकाश मुसलमानी सत्ताधाऱ्यांना स्थानिक लोकांच्या मदतीची आवश्यकता वाटू लागली. ते बारगीर, मनसबदार, सरदार बाळगू लागले. फौजेच्या खर्चाकरता त्यांना वतने तोडून मिळत. या व्यवस्थेतून त्या त्या भागातील शिरजोर पुंड यांच्याकडे आपोआपच वतनदारी चालत आली.
स्वराज्याच्या निर्मितीत या वतनदारांचा प्रश्न अतिशय नाजूक होता. त्यांच्या मदतीने परगण्यांची सुरक्षितता ठेवणे. शेती पिकविणे हे तर करून घ्यायचे पण त्याचबरोबर वतनदार रयतेवर जो जुलूम करीत त्या जुलूमातून रयतेची मुक्तता करून तिचा प्रत्यक्ष संबंध स्वराज्याशी जोडायचा होता. ही अतिशय अवघड, नाजूक कामगिरी शिवाजीराजाने फार कौशल्याने करून दाखविली.
त्याने सर्वप्रथम कूळ, वतने अनामत करून त्यांना नगदी उत्पन्न त्या- त्या गावची परिस्थिती पाहून बांधून दिले. स्वराज्यातील वतनदारांनी बुरुजाचा वाडा बांधून किंवा कोट बांधून किल्ल्यात राहू नये, घर बांधून राहावे असा प्रथम नियम केला. वतनदारांचे कोट पाडून त्यांत स्वराज्याची ठाणी वसवली. रयतेवर जुलूम केल्यास हातपाय तोडण्यापासून प्राणदंडापर्यंत उग्र शिक्षा ठोठावल्या. सुभेदार, मामलेदार, कमाविसदार, हवालदार, मुजूमदार, तरफदार यांसारखे पगारी अधिकारी, सरकारी अधिकारी म्हणून नियुक्त केले आणि रयतेचा संबंध सरळ स्वराज्याशी हळूहळू जोडला. मात्र हे करीत असताना वतनदारांचे पिढ्यानपिढ्यापासून चालत आलेले जमीन मालकिचे हक्क, प्रतिष्ठा, मानसन्मानयांना जराही धक्का लागू दिला नाही. वतनदारी नष्ट करताना महाराजांनी प्रसंगी जी कठोरता दाखविली त्याप्रमाणे मायेची कुंकर घालून, स्वराज्याचे महत्त्व पटवून देऊन स्वाभिमानाला आणि शौर्याला आवाहन करून काही वतनदारांना राज्यकारभारात गुंफून घेतले. जेधे, बांदल, पासलकर या वतनदारांनी स्वराज्य उभारणीसाठी केलेली कामगिरी अतिशय बहुमोल आहे. महसुलाची वसुली आपल्या सरकारी अधिकाऱ्यामार्फत करून स्वराज्याचा खजिना समृद्ध करीत असतानाच वतनदारी मोडून काढण्याचे राजांचे कसब अनन्यसाधारण होय. हे सर्व करीत असतानाच राजा शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संबंध जोडत होता. ही त्या काळात अगदी जगावेगळी घटना. शेतकऱ्यांच्या शेकडो वर्षाच्या लुटीचा कालखंड संपत होता. शेतकऱ्यांच्या नव्या राज्याची स्थापना हळूहळू होत होती.
शिवाजीराजाच्या जीवनातील अनेक प्रसंगावरून असे दाखविता येईल की, तो जनसामान्यांचा म्हणजे शेतकऱ्यांचा राजा होता. व्यक्तिगत मानसन्मानाचा प्रश्न कधी प्रतिष्ठेचा होऊ न देता प्रसंगी शेतकऱ्यांच्या हिताचे व शेतकऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी शिवाजीराजाने माघारसुद्धा घेतली आहे. स्वराज्यात घुसून कोणालाही रयतेस उपद्रव देता येऊ नये याची काळजी त्यांनी क्षणोक्षणी घेतली. इ. स. १६४८ ते १६६६ हा शिवाजी राजाच्या एतद्देशियांच्या राज्याचा परीक्षेचा कठीण काळ होता. १६६८ मध्ये विजापूरकरांचे पहिले आक्रमण झाले त्यावेळी राजाचे सैन्य ते काय? जहागिरीच्या संरक्षणाचे काम करणारे मर्यादित सैन्य आणि कालपर्यंत ज्यांनी किंवा ज्यांच्या बापांनी हाती नांगरच धरला होता आणि आज तलवारी घेतल्या होत्या असे सवंगडी. तरीसुद्धा त्यांनी विजापूरकरांच्या पहिल्या आक्रमणात शत्रूसैन्याला आपल्या रयतेच्या मुलुखात घुसू दिले नाही. त्यावेळच्या स्वराज्याच्या सीमेवरच्या पुरंदर गडाखाली बाजी पासलकर वगळता कोणीही वतनदार म्हणजे वतनदारच्या पदरीचे सैन्य महाराजाबरोबर नव्हते. कान्होजी जेधे त्यावेळी शहाजीराजांबरोबर कर्नाटकातच होते. केवळ यावेळी मावळे शेतकरीधारकरी पोरं त्या युद्धात लढली, विजयी झाली.
एक नवा जोम मावळी मुलूखात पसरला. आपली आपण शेतीभाती तर करू शकतोच, शेतीच्या संरक्षणाची व्यवस्था तर करू शकतोच पण त्याबरोबर बादशाही सैन्याला पराभूत करू शकतो हे रयतेतून उभ्या राहिलेल्या धारकऱ्यांना आणि त्याचबरोबर रयतेला कळून आले.
१६५६ पर्यंतच्या काळात परत रयतेला बटिक समजणाऱ्या चंद्रराव मोरे आणि संभाजी मोहिते यांना याच सैन्याने नेस्तनाबूत केल आणि दुसरीकडे विस्तारलेल्याराज्यात दादोजी कोंडदेवाने घालून दिलेली व्यवस्था लावणे, कोंढवा, शिवापूर येथील धरणे बांधणे अशीही कामे चालू होती.
१६५६ चे अफझलखानाचे आक्रमण, सिद्दी जोहार आणि शाहिस्तेखानाबरोबरची लढाई, मिर्झा राजाचे आक्रमण हा खरे तर रयतेचे अतोनात हाल होण्याचा काळ. कायमच्या लष्करी हालचालीमुळे शिवाजीराजाला रयतेच्या कामात स्वत:लक्ष घालण्याला वेळ मिळालेलाच दिसत नाही.पण स्वत:च्या राज्याचा सुखद अनुभव घेतलेली प्रजा या सर्व काळात स्वराज्याच्या बाजूने खंबीरपणे उभी राहिली. शिवाजीराजाच्या बाजूने लढायलाच काय, मरायची खात्री असताना बलिदानालाही लोक उभे राहिले. अफझलखानाच्या वेळी वतनावर पाणी सोडायची जेध्यांनी तयारी दाखविली. काही खोपड्यांसारखे अपवाद वगळता मावळातील देशमुख उभे राहिले. या राज्यात एक शिक्का दरबारातून उठवून आणून रयतेला लुबाडायची सोय नाही हे माहीत असूनही देशमुख मंडळी राजाच्या बाजूने उभी राहिली. यातीलच काही पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील धारकरी परक्या मुलूखात, कोल्हापूर जिल्ह्यातील अंधाऱ्या राक्षसी पावसात, जळवांचा आणि रानगव्यांचा त्रास असणाऱ्या परिसरात घोडखिंडीत स्वत: मरण्याची खात्री असताना लढायला उभे राहिले, मेले. नवजात स्वराज्याचा नाश होऊ नये म्हणून; शेतकऱ्यांचा राजा जिवंत राहावा म्हणून.
अफझलखानाची स्वारी ही अनेक दृष्टीने महत्त्वाची आहे. एकतर प्रथमच प्रचंड मोठी बावीस हजारांची फौज चालून येणार होती. अफझलसारखा सेनापती नेमला गेला होता. तो सामान्य सेनापती नव्हता. दिल्लीचा राजपुत्र औरंगजेबाची विजापूरकरांवरची स्वारी त्याने रोखली होती. औरंगजेबाला कैद करण्याइतकी परिस्थिती निर्माण केली होती त्यामुळे अफझलखान चालून येणे हीच मुळी स्वराज्याच्या वाढत्या सामर्थ्याची पावती होती. अफझलखानाची जहागीर सुपीक अशा वाई प्रदेशाची. वाई प्रदेशांत शेतीभाती नीट चालावी आणि वसूल व्यवस्थित गोळा होऊन खानाकडे पोचता व्हावा याची जो काळजी घ्यायचा. या जहागिरीच्या उत्तरेलाच जेधे-बांदल मंडळींचा-राजांच्या अंगद हनुमानाचा प्रदेश. वाई प्रातांच्या पश्चिमेला जावळी, तीही शिवाजीराजाने काबीज केलेली होती. वाई प्रांत आज ना उद्या राजा घेणार ही शक्यता होतीच. खानाला वाई प्रांत हातचा जाऊ द्यावयाचा नसावाच. त्यात भोसल्याबद्दल या खानाला द्वेशबुद्धी होती आणि जावळीवर त्याचा पूर्वीपासूनच डोळा होता. राजानेही हे ओळखले होते. शिवाजीराजा स्वत: सिंहगड, राजगड परिसरात राहता तर बावीस हजार फौजेचा रगाडा स्वराज्याच्या रयतेतघुसणार हेही स्पष्टच होते. पागा आणि त्यातले घोडे जगवायचे म्हणजे धान्य-धुन्य दाणा-वैरण दूध-दुभते खाण्यासाठी गाई-बैल लागणार आणि ती शेतकऱ्यांकडूनच लुटली जाणार हे स्पष्ट दिसत होते. शिवाजीराजा राजगड सोडून प्रतापगडावर तळ देऊन राहिला. खानाने तुळजाभवानी तोड, पंढरपूरवर चालून जा असे प्रकार केले. स्वत:च्या सैन्यात निदान आठदहा मोठे मराठा सरदार असतानाही केले. शिवाजीराजा चिडून डोंगरातून मैदानात यावा म्हणून सर्व हिकमती झाल्या. राजाने संयम राखला. अफझलखानाला सैन्याचा रगाडा स्वत:च्याच जहागिरीतून, वाई प्रांतातून प्रतापगडच्या दिशेने न्यावा लागला.
रयतेने शत्रूला मदत केल्यास रयतेचे हाल करणे हे सुलतानी राज्यात होतेच. पुढे राजाने सिधुदुर्ग बसवायला घेतला तेव्हा भूमीपूजनाचे मंत्र सांगायला येणारा ब्राह्मण सुरूवातीला येईना. तो म्हणाला, आज मंत्र सांगितले आणि उद्या या प्रांती बादशहाचे सुभेदार आले तर शिवाजीला याच बामणानी कील्ला बांधायला मंत्र सांगून मदत केली असे म्हणून पकडतील, मारतील, हाल करतील. ही बादशही रीत होती.
अशा प्रकारचा रयतेवर सूड उगवला जाण्याचा प्रसंग राजाने टाळला. अफझल- सैन्याच्या रसदीसाठी स्वराज्याला तोशीस झाली नाही. तोशीस पडली असेल तर अफझलच्याच वाई प्रांताच्या रयतेला. कदाचित त्यांनी शिव्याशाप घातले असतील आणि नंतर खानाला मारल्यावर राजाने वाई प्रांत हस्तगत केल्यावर तिकडच्या शेतकऱ्यांनी शिवाजीराजाचे स्वागतच केले असेल.
दिल्लीश्वर औरंगजेबाचा पराभव करणाऱ्या अफझलखानाचा वध केल्यानंतर साहजिकच राजाला अखिल भारतीय महत्त्व प्राप्त झाले. त्या काळीही देशातल्या कानाकोपऱ्यात अशा बातम्या जात होत्याच. शाहिस्तेखान महाराष्ट्रातून अपमानित होऊन आसाम-बंगालच्या सुभेदारीवर गेला तेव्हा तेथील स्थानिक राजाने "शाहिस्तेखान म्हणजे शिवाजीने ज्याची बोटे तोडली तो तूच काय" असे त्याला विचारल्याचा उल्लेख-आसामी बखरीत-बुरंजीत आहे. त्यामुळे अफझलवधानंतर दिल्लीश्वरांची स्वारी महाराष्ट्रावर येणे अटळ होते. ती वेळ साधून आली. राजा सिद्दी जौहरच्या पन्हाळा वेढ्यात अडकला असताना आली. बरोबर जवळजवळ एक लाखाचा फौजफाटा घेऊन आली. ही फौज मार्च १६६० ते एप्रिल १६६३ एवढा प्रदीर्घ काळ स्वराज्यात पुणे प्रांतात होती. हा सर्व काळ आणि पुढे जयसिंग-दिलेरखान स्वारीचा काळ हा रयतेने राजासाठी जे-जे सोसले त्याचा साक्षी आहे.
स्वराज्यात घुसताच त्याने सुपे काबीज करून जाधवराव या सरदाराला तेथे ठेवले आणि स्वत: पुण्याला गेला. जाधवरावावर जबाबदारी होती ती खानाने पुण्यात टाकलेल्या प्रचंड तळाला धान्यधुन्य, दाणा वैरण आणि गाई गुरे पुरवण्याची. राजाच्या रयतेवर सैन्याचा रगाडा सुरू झाला पण रयत खचलेली दिसत नाही जागोजाग कोणत्याही प्रमुख सेनानायकाच्या आज्ञेविना आणि अनुपस्थितीत खानच्या सैन्यावर गनिमी हल्ले झाले. गनिमी काव्याला अनुकूल असलेला समाज-सर्वसामान्य रयत जमेल तेवढी लढू लागली. जमेल तेव्हा असहकारही रयतेने खानाविरुद्ध पुकारलेला दिसतो. खान पुण्यात पोहोचेपर्यंत त्याला तीनचार ठिकाणी मराठ्यांच्या हल्ल्याची चुणूक अनुभवावी लागली. तर पुण्याला पोहोचताच बातमी आली की पुण्याच्या उत्तरेच्या भागातील सर्व धान्याचे साठे, वैरण लोकांनी जाळून टाकली आहे. राजावर चालून येणाऱ्या सैन्याचे आमचे धान्यधुन्य लुटून नेण्यापेक्षा आम्हीच ते जाळून टाकू अशी भावना लोकांनी दाखविली. एकिकडे "लोकयुद्धाची” चुणूक मावळे मोगलांना दाखवत होते तर दुसरीकडे राजाच्या आजोळचा माणूस जाधवराव सुपे कऱ्हे पठारातील शेतकऱ्यांना लुटून खानाच्या छावणीला रसद पाठवत होता.
यातच एक चाकणच्या परिसरात घडलेला छोटा प्रसंग आहे. शाहिस्तखानाने चाकणाचा किल्ला काबीज करायचे ठरविले. खानाचे सैन्य चाकणला पोहोचण्याच्या आतच चाकण-चौऱ्याऐंशीतील शेतकरी जमेल तेवढे धान्य-धुन्य घेऊन उरले सुरले जाळून खाक करून निघून गेले.
लोणीचे काळभोर खानाला जाऊन मिळाल्याचा आणि घरदार वाचवल्याचे सांगितले असेल बरेच काही झाले असेल, पण एक नक्कि. सगळ्यांनी मिळून ठरवले असेल की लढायला येतंय, हत्यारं-पात्यारं आहेत त्यांनी किल्ल्यात जायचं, जमेल तेवढा दाणागोटा किल्यातल्या लढणाऱ्या लोकांना ठेवायचा, जमेल तेवढा घेऊन डोंगरात भीमाशंकराकडे निघून जायचं. पण मागं काही शिल्लक ठेवायचं नाही, जाळून टाकायचं. आपल्या मुलखावर, आपल्यावर चालून येणाऱ्याला मदत करायची नाही
शिवाजीराजाने पन्हाळ्यातून निसटून परत आल्यावरही गनिमी काव्यानेच शाहिस्तेखानाशी लढा चालू ठेवला. अगदी मोजक्या माणसांनिशी प्रचंड फौजेने वेढलेल्या खानावरच घातलेला यशस्वी छापा अनेक गोष्टी सांगतो. मोगलांचा बेशिस्त अनागोंदी कारभार, त्याचा अचूक फायदा उठवून नियोजनबद्ध साहस करण्याचे राजाचे धैर्य, बरोबरीच्या माणसांची निष्ठा, बलिदानाची तयारी तर सांगतोच, पण खानाच्या मोठ्या डेऱ्यामध्ये काम करणाऱ्या पुणे प्रांतातल्या सामान्य माणसांची सहानुभूती, मदत कदाचित नियोजनातील साहाय्य याही गोष्टी सांगतो.
शाहिस्तेखानाच्या आक्रमणाच्या धामधुमीतही शिवाजीराजास गोरगरीब शेतकऱ्यांची, रयतेची चिंता किती होती हे एका पत्रावरून समजते. मोगल सैनिक जेध्यांच्या भागात हिरडस मावळात घुसून जाळपोळ, लुटालूट करतील अशी शक्यता दिसताच राजाने हे पत्र बाजी सर्जेराव जेध्यांच्या लिहिलेले आहे. शाहिस्तेखानाच्या छाप्याच्या सुमारे सहा महिने आधी हे पत्र लिहिले आहे. पत्रात शिवाजीराजा लिहिता, "पत्र मिळताच गावागावात ताकिद करून लेकरेबाळे तमाम रयत घाटाखाली शत्रूचा त्रास होणार नाही अशा ठिकाणी पाठवावी. हयगय करू नये. असे न केल्यास मोगलांनी माणसे धरुन नेल्यास, त्रास दिल्यास त्याचे पाप तुमच्या डोक्यावर बसेल म्हणून रात्रीचा दिवस करून माणसे हलवा. तुम्ही आपल्या माणसांसह हुशारीत राहा. शेतीवाडीचे राखण करायला जी माणसं राहतील त्यांनाही हुशार राहायला सांगा, डोंगरावर अवघड जागी आसरा घेऊन रहा. गनिम दुरून नजरेस येताच त्याच्या वाटा चुकवून पळून जा असे सांगा. तुम्ही तुमच्या जागी तयारीत राहा."
शेतकऱ्यांची शेतीची अशी ससेहोलपट होत असतानाच याच शेतकऱ्याच्या घरची माणसे महाराजांच्या सैन्यात असल्याने व सैन्याची मुलूखगिरी चालू असल्याने शेतकऱ्यांचे घरी तगून राहता येईल एवढे धान्य नक्कद्दच पोहोचत असावे.
मिर्झाराजे जयसिंगाच्या आक्रमणात स्वराज्याच्या रयतेचे असेच हाल झाले.मिर्झा राजाच्या सैन्याने जुन्नर, जुन्नरखालचे कोकण या भागात धुमाकूळ घालणे, राजगड म्हणजे राजाच्या राजधानीच्या परिसरातील ५० खेडी आणि त्यांची शेती-भाती उद्ध्वस्त करणे, शिवापूर सिंहगड परिसरातील खेड्यात जाळपोळ लुटलूट, कोरीगडाच्या लोहगडाच्या आसपासची लागवड जाळून टाकणे, गुरेढोरे पळविणे असे अनेक पराक्रम केले. १६६५ च्या एप्रिल-मे या दोन महिन्यात स्वराज्याची रयत नागवण्याचे हे उपद्व्याप चालू होते. पुरंदर किल्ल्याला वेढा चालू होता.
केवळ दीड कील्ला मोगलांनी घेतलेला होता. लष्करीदृष्ट्या जास्त नुकसान झालेले नव्हते. लोक लढायला तयार होते, पण नागवल्या जाणाऱ्या प्रजेसाठी राजाने जून महिन्यात तह केला स्वत: शरण आले, पण रयतेची छळवणूक थांबवली. जून महिन्यात हा पुरंदरचा तह झाला. त्यामुळे दोन महिने नुकसान झाले तरी शेतकऱ्यांना परत पावसाळ्यात शेतीची लागवड करता आली असावी. गावखेडी वसवता आली असावीत. कोणताही शक्तद्दचा मुद्दा उपस्थित न करता अजून खूप कील्ले स्वत:च्या ताब्यात असतानाही आपल्यासाठी हाल सोसून उभे राहणाऱ्या शेतकऱ्यांची, त्यांच्या मुला माणसांची, गावच्या कारुनारुची वाताहत होते हे पाहून राजाने अवघ्या तीन महिन्यात शरणागती पत्करली. प्रजा तीन वर्षांचे हाल सहन करू शकते हे तिने आधीच्या शाहिस्तेखानाच्या आक्रमणात दाखवून दिले होते. पण राजाला प्रजेच्या या वाताहतीची कल्पना सहन होईना, त्याने शरणगती पत्करली.
स्वराज्यात घुसून धुमाकूळ घालण्यात यश मिळाले ते मिर्झा राजे जससिंग यालाच. मिर्झाराजे जयसिंग आणि दिलेरखानाची फौज स्वराज्याच्या हदयात तळ ठोकून बसली होती. या स्वराज्याची पूर्ण सफाई करूनच परत जायचे असा संकल्प सोडून मिर्झाराजे आणि त्यांच्या मदतीला शिवाजीराजाबद्दल अत्यंत द्वेष असलेला दिलेरखान हे दोन्ही सरदार आले होते. मिर्झाराजे जयसिंगाने याच काळात सैन्यसत्तेचे सर्व अधिकार औरंगजेबाकडून आपणास मिळविले होते. औरंगजेबाने हे अधिकार देताना अतिशय महत्त्वपूर्ण वाक्य वापरले, "तुमच्या मुत्सद्देगिरीवर माझा पूर्णपणे विश्वास आहे. शिवाजीचा संपूर्ण नायनाट करण्यासाठी तुम्हाला जे जे योग्य वाटेल ते ते सर्व करा."<
३१ मार्च १६६५ रोजी दिलेरखानने पुरंदर चहू बाजूंनी वेढला. मिर्झाराजे जयसिंग हे अतिशय हुशार सेनापती होते. पुरंदरची एकंदर भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता पुरंदरच्या समोर असलेला वज्रगड ताब्यात घेतल्याशिवाय पुरंदरवर तोफा डागता येणार नाहीत हे मिर्झाराजा जससिंग याने बरोबर ताडले. जयसिंग १ एप्रिल रोजी पुरंदरच्या पायथ्याशी आला आणि तेथेच तळ ठोकून बसला. १२ एप्रिल१६६५ रोजी वज्जगड पडला. मोगलांच्या तोफा आता वज्जगडावरून पुरंदरवर आग ओकू लागल्या. ही घनघोर लढाई ३० मे पर्यंत म्हणजे तब्बल ४९ दिवस सुरू होती. पुरंदरच्या बुरुजाच्या उंचीएवढे दमदमे उभे करण्याचे काम सुरू होते. हे काम अगदी सफेद बुरुजाच्या समोर सुरू होते. अर्थातच हा दमदमा उभा न करू देण्याची कोशीस पुरंदरावरील सैन्य करीत होते. प्रथम ३० मे १६६५ रोजी एक घनघोर लढाई झाली. मराठ्यांच्या माऱ्यामुळे मोगलांचे अतोनात नुकसान झाले. मिर्झाराजाच्या भूपतसिंह नावाच्या सरदाराबरोबरच असंख्य सैनिक ठार झाले. दिलेरखानाच्या हाताखालील एक सरदारही कामी आला. परंतु पुरंदरावरील सैन्याचे दुर्दैव आडवे आले आणि सफेद बुरुजावरील दारूचा स्फोट होऊन अपघात झाला आणि सफेद बुरुज पडला (२ जून १६६५).
शिवाजीराजाची नस कोणी ओळखली असेल तर फक्त मिर्झाराजा जयसिंगानेच. अफझलखान, शाइस्तेखान, दक्षिणेचा सुभेदार असताना औरंगजेब, विजापूरचा आदिलशहा, रणतुल्लाखान असे किती किती शत्रू राजाने अंगावर घेतले. अद्भुत विजय मिळवले, पराभव पचवले. परंतु यांच्यातील एकालाही जो शिवाजी समजला नाही तो मिर्झाराजा जयसिंगांला कळला. जयसिंग अतिशय हुशार, शूर आणि मुत्सद्दी सेनापती होता. ३१ मार्च १६६५ रोजी पुरंदरला वेढा घातल्यानंतर तब्बल ७० दिवसांनंतरही पुरंदरच्या तटाच्या वाळूचा कणसुद्धा बाहेर पडू शकत नाही हे त्याच्या लक्षात आले. त्याचवेळी राजगडावर बसलेल्या राजाला पुरंदरावर हातघाईची लढाई सुरू असताना विशेष चिंता वाटत नाही याची जाणीवही जयसिंगाला झाली. त्याच्या लक्षात आले की राजाचा जीव किल्ल्याच्या बुरुजामध्ये किंवा राजगडच्या राजधानीत अडकलेला नाही. गड, किल्ले जिंकून राजा शरण येणार नाही, त्याचे प्राण आहेत ते रयतेमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये. जोपर्यंत ही रयत त्यांच्या राजाच्या बाजूने आहे तोपर्यंत किल्ले बुरुजावर मराठ्यांच्या सैन्याचा पराभव करता येऊ शकेल, पण स्वराज्याचा बीमोड करता येऊ शकणार नाही, याबद्दल जयसिंगाची खातरी पटली. त्याने एका नव्या रणनीतीचा अवलंब सुरू केला.
मोगलांच्या फौजांना जुन्नर व तळकोकणात धुमाकूळ घालण्याचे आदेश देण्यात आले. २७ एप्रिल रोजी दाऊदखान रोहिडे किल्ल्याजवळ पोहोचला. मोगली धुमाकुळाला चहूबाजूंनी ऊत आला. रोहिडे ते राजगड या परिसरातील किमान ५० खेडी मोगलांनी जाळून उद्ध्वस्त करून टाकली. उभ्या पिकाची नासाडी केली. चाऱ्याच्या गंजी पेटविल्या. या भागातील शेतकरी डोंगरातील दऱ्याखोऱ्याच्याआधाराने चार खेड्यात गोळा झाले. मोगलांच्या एका तुकडीबरोबर त्यांच्या संघर्ष झाला. जबर झुंज झाली. मोगलांच्या मदतीला दाऊदखानाची कुमक आली. राजे रायसिंह, अचलसिंह कछवाह यांच्या फौजा मोगलांच्या मदतीला आल्या. चार खेड्यांत गोळा झालेले शेतकरी, मराठे जीव वाचवून डोंगरात पळून गेले. मोगलांनी तेथील चारही खेडी जाळून खाक केली. गरीब प्रजा, गुरेढोरे, मालमत्ता मोगलांच्या हाती लागली. अनेक माणसे कैद झाली. २८ एप्रिलला मोगली सैन्याने याच भागात ठाण मांडले. ३० एप्रिलला राजगडच्या रोखाने हे सैन्य निघाले, पायथ्याशी पोहोचले. राजगडावरील तुफानी माऱ्यासमोर दाऊदखानाच्या प्रचंड फौजेचा टिकाव लागला नाही. दाऊदखान माघारी वळला. गुंजणखोऱ्यामार्गे तो शिवापूरला आला व तेथून कोंढाण्याच्या दिशेने नासधूस करीत जाऊ लागला. (२ मे १६६५). मिर्झाराजेला हे वृत्त कळताच त्याने दाऊदखान व कुतुबुद्दीन यांना लोहगडाकडे जाण्यास आज्ञा केली. मोगली पथक लोहगडच्या परिसरात घुसले. अकस्मात मराठे त्यांच्यावर तुटून पडले. या धुमश्चक्रीत मराठ्यांची मोठ्या प्रमाणावर प्राणहानी झाली. मोगलांच्या फौजांनी लोहगडच्या पायथ्याची सर्व लागवड जाळून टाकली. गरीब प्रजा, गुरेढोरे कैद झाली. दुसऱ्या दिवशी लोहगड, विजापूर, तिकोणा, तुंग या किल्ल्यांच्या डोंगरालगतची खेडी जाळून नष्ट करण्यात आली. या सर्व लढाईचा परिणाम म्हणजे कुतुबुद्दीनखानाच्या हातात ३०० स्त्री-पुरुष व ३००० गुरे-ढोरे सापडली. या सर्व लढाईत जागोजागी मराठे आणि मोगल यांचा संघर्ष होत होता. स्वराज्याचे सैन्य डोंगर किल्ल्यावर सुरक्षित होते, पण प्रजानन मोगलांकडून कैद होत होते. त्यांचा अनन्वित छळ सुरू होता. कैद केलेल्यांना नगर -परांड्यांच्या किल्ल्यात ठेवले जाऊ लागले. राजाची रयतेकडूनची ही अशी नाकेबंदी मिर्झाराजे जयसिंगाने अतिशय कौशल्यपूर्ण रणनीती व दबावतंत्राचा वापर करून केली होती.
या सर्वांना परिणाम म्हणून स्वराज्याची खरोखरी कोंडी झाली.
मिर्झाराजेच्या या रणनीतीमुळे निराश्रित झालेल्या रयतेच्या, त्यांच्या अनन्वित छळाच्या, मोगल फौजांकडून झालेल्या अत्याचाराच्या लुटीच्या खबरी राजापर्यंत तातडीने पोहोचत ज्या रयतेसाठी आपण यास्वारीची संकल्पना केली, ज्या प्रजाजनांच्या कल्याणासाठी आपण या स्वराज्याची मुहूर्तमेढ केली त्याचीच मोगलांच्या फौजांनी केलेली दैना पाहून पुरंदरच्या खबरीनी विचलित न झालेला राजा चिंतेत पडला. स्वराज्याचे गड कील्ले खूप होते. एका गडावरून दुसऱ्या गडावर मोगलांशी संघर्ष करायचा म्हटले तरी अनेक वर्षे निकराची झुंज देता आली असती. जयसिंगाचे त्यावेळचे वय लक्षात घेता त्याच्या हयातीत तरी शिवाजीराजाचा पूर्णपराभव त्याला करता आला नसता. (मिर्झराजेचा मृत्यू २८ ऑगस्ट १६६७). या किल्ल्यावरून त्या किल्ल्यावर राजा कायम झुंजत राहू शकला असता. पण राजाचा जीव किल्ल्यांच्या भिंतीमध्ये, बुरुजामध्ये अडकला नव्हता. किल्ल्यांच्या संख्येत नाही तर किल्ल्यांच्या पायथ्याशी राहून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या सुखी संसारत त्याचे सुख सामावलेले होते. त्यामुळेच अखेरीस १२ जून १६६५ रोजी राजाने शरणागती पत्करली. अहंकार, प्रतिष्ठा ही गौण ठरली व रयतेची सुरक्षितता ही श्रेष्ठ ठरली. राजाच्या शरणागतीचा एवढाच तर्कशुद्ध अर्थ लागू शकतो. ३१ मार्च ते १२ जून हा ७३ दिवसांचा काळ मिर्झाराजेला गड जिंकण्यासाठी लागला. यावरून अगदी प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा राजाचे सैन्य चिवटपणे झुंज देत होते हे कळते. रणभूमीतील परिस्थिती पाहता शरणागतीची आवश्यकता नव्हती. १२ जून ही तारीखही महत्वाची आहे. हे आगोठीचे दिवस. मृग नक्षत्र सुरू झाल्यानंतर पुढे शेतीच्या पेरणीचे दिवस येतात. धुमश्चक्री थांबली नाही आणि शेतकऱ्यांची सबंध शेती जर तशीच पडून राहिली तर थोरल्या दुष्काळाप्रमाणे (सन.१६२८-३०) रयतेची अन्नानदशा होईल ही भीती आ वासून उभी राहिली असणार. नंतरच्या पुरंदरच्या तहानंतर त्या परिसरात शेतकरी आपल्या कामास लागले व शांतता निर्माण झाली. म्हणजे राजाचा हेतू साध्य झाला. त्याला शेती व शेतकरी यांच्याबद्दल वाटणाऱ्या आस्थेचे हे अत्यंत जिवंत आणि बोलके उदाहरण आहे.
अफझलस्वारी ते पुरंदरचा तह या काळाचा लष्करी अर्थ देशातील इतर सत्तांना एक नवे राज्य उभे रहते आहे याची जाणीव होणे आणि ते नेस्तनाबूत करण्याचा त्यांनी प्रयत्न करणे. तर शेतकरी रयतेच्या दृष्टीने अर्थ असा की, त्यांना हवे असलेले राजकीय स्थित्यंतर घडून येणे. हा बदल प्रजेला हवासा वाटत होता हे प्रजेने आणि सामान्य माणसातून उभ्या राहिलेल्या स्वराज्याच्या शिपायांनी दाखवून दिले. शाहिस्तेखानाविरुद्धच्या गनिमी युद्धात दाखवून दिले. शिवाजीराजा आग्ऱ्याला गेला असता तिथे अडकून पडला असताना राज्य सुरक्षित राखून दाखवून दिले.
हे रणांगणावर घडलेले उदाहरण म्हणजे काही अखेरचा पुरावा नाही. पण युद्धप्रसंग सोडून अगदी रोजमुऱ्याच्या जीवनात राजा शेतीची व शेतकऱ्यांची जातीने काळजी घेत होता.
या संदर्भात राजाने प्रभावळीचे रामाजी अनंत सुभेदार यांना लिहिलेले पत्र आताच्या तथाकथित राज्यकर्त्याच्यासुद्धा डोळ्यांत अंजन घालेल इतके स्पष्ट आणि स्वच्छ आहे.
"साहेब मेहरबान होऊन सुभात फर्माविला आहे. ऐसियास चोरी न करावी, इमाने इतबारे साहेब काम करावे, ऐसी तू क्रियाच केलीच आहेस. तेणेप्रमाणे एक भाजीच्या देठास तेही मन न दाखविता रास व दुरुस वर्तणे. या उपरि कमाविस कारभारास बरे दरतूरोज लावणी संचणी उगवणी जैसी जैसी जे जे करीत जाणे. हर भातेने साहेबाचा वतु (अधिक)... होये ते करीत जाणे. मुलकात बटाईचा तह चालला आहे परंतु रयतीवर जाल (न पडता-शब्द सुटले) रयेतीचा वाटा रयेतीस पावे आणि राजभाग आपणास येई ते करणे. रयेतीवर काडीचे जाल व गैर केलिया साहेब तुजवर राजी नाहीत ऐसे बरे समजणे. दुसरी गोष्टी की, रयेतीपासून ऐन जिनसाचे नख्त घ्यावे येसा एकंदर हुकूम नाही. सर्वथा ऐन जिनसाचे नख्त घेत घेत नव जाणे ऐन जिनसाचे ऐन जिनसच उसूल घेऊन जमा करीत जाणे आणि, मग वेलचे वेलेस विकित जाणे, की ज्या ज्या हुनेरेने माहाग विकेल आणि विकरा यैसा करावा की, कोण्हे वेलेस कोण जिनसच विकावा हे हंगामी तो जिनस विकावा. जिनस तरी पडोन जाया नव्हे आणि विकरा तरी महाग ऐसे हुनेरेने नारळ खोबरे सुपारी मिरे विकित जाणे. महाग धारणे जरी दाहा बाजार ऐन जिनस विकले तर तो फायेदा जाहलियाचा मजरा तुझाच आहे येसे समजणे. त्या उपरि रयेतीस तवाना करावे आणि कीर्द करवावी हे गोष्टीस इलाज साहेबी तूज येसा फर्माविला आहे की, कष्ट करून गावाचा गाव फिरावे. ज्या गावात जावे तेथील कुलबी किती आहेती ते गोळा करावे. त्यात ज्याला जे सेत करावया कुवत माणुसबल आसेली त्या माफद्दक त्यापासी बैल दाणे सच आसीला तर बरेच जाले. त्याचा तो कीर्द करील. ज्याला सेत करावयास कुवत आहे माणूस आहे आणि त्याला जोतास बैल नांगर, पोटास दाणे नाही, त्यावीण तो आडोन निकामी झाला असेल, तरी त्या रोख पैके हाती घेऊन दोचौ बैलाचे पैके द्यावे, बैल घेवावे व पोटास खंडि दोन खंडि दाणे द्यावे. जे सेत त्याच्याने करवेल तितके करवावे. पेस्तर त्यापासून बैलाचे व गल्याचे पैके वाढी दिडी न करता मुदलच उसनेच हळूहळू याचे तबानगी माफद्दक घेत उसूल घ्यावा. जोवरी त्याला तवानगी येई तोवरी वागवावे. या कलमास जरी दोन लाख लारी पावतो खर्च करिसील आणि कुणबिया कुनब्याची खबर घेऊन त्याला तवानगी येतो करून कीर्द करिसील आणि पडजमीन लाऊन दस्त जागती करून देसील, तरी साहेब कबूल असतील. तसेच कुलबी तरी आहे पुढे कष्ट करावया उमेद धरतो आणि मागील बाकिचे जलित त्यावरी केले आहे ते त्यापासून घ्यावया मवसर तरी काही नाही. ते बाकिचे खडवे तो कुलबी मोडोन निकाम जाला या उपरी जाऊन पाहातो. येसी जे बाकि रयतेतीवरी आसेल ते कुलाचे कुल माफ करावया खडवे तोकूब करून पेस्तर साहेबास समजावणे की, ये रवेसीने कीर्द करऊन साहेबाचाफायेदा केला आहे आणि आमकि एक बाकि गैर उसकि मफलिस कुलास माफ केली, येसे समजावणे. साहेब ते माफद्दची सनद देतील जे बाकि नफर निसबत आसली ते हिसेबीच उसूल घेत जाणे बाकिदार माहाल न करणे . ये रवेसीने तुजला पदनसी येत तपसिले करून हा रोखा लिहून दिधला आसे. आकलेने व तजवजीने समजोन याप्रमाणे कारबार करीत जाणे की, तुझा कामगारपणाचा मजरा होये आणि साहेब तुजवरी मेहेरबान होत ते करणे..."
या पत्रात शिवाजीराजाची शेतीबद्दलची दृष्टी फार स्पष्ट आणि स्वच्छपणे मांडलेली आहे. महाराष्ट्राच्या आतापर्यंतच्या सबंध इतिहासात शेतकऱ्यांच्या बाजूने खंबीरपणे उभे राहिलेला शिवाजी राजा याच्याशिवाय दुसरा कोणताही राजा नव्हता. यासाठी वेगळा पुरावा देण्याची काही वेगळी आवश्यकता रहात नाही. रामाजी अनंत यांना पत्र लिहिताना राजाने काही गोष्टी अत्यंत स्वच्छपणे सांगितलेल्या आहेत. शेतीचे व्यवहार कसे असावेत? नियोजन कसे असावे? महत्त्वाचे काम काय? हे सांगताना राजा काय म्हणतो, "सरकारी अधिकाऱ्यांनी स्वत: जातीने गावोगाव दौरे करून तेथील कुणबी (शेतकरी) गोळा करावेत. त्यांच्या अडचणी स्वतः समजावून घ्याव्यात व शेतकऱ्यांच्या कुवतीनुसार त्याला जमीन द्यावी. त्याची कुवत असेल तर त्यास बैल, नांगर आणि उदरनिर्वाहासाठी ज्याच्याकडे धान्य नाही अशांना रोख पैसे द्यावेत. बैल घेऊन द्यावेत. खंडी दोन खंडी धान्य उदरनिर्वाहासाठी द्या व शेतकऱ्यांच्या कुवतीनुसार त्याला शेती द्यावी.
"अशा शेतकऱ्याला दिलेल्या कर्जाचे व्याज न आकारता फक्त मुद्दल हळूहळू त्याच्या कुवतीनुसार व परिस्थितीनुसार वसूल करून घ्यावे. यासाठी स्वराज्याच्या खजिन्यातून लाख दोन लाख लारीपर्यंत परस्पर खर्च करण्याची परवानगी सुभेदाराला मुक्तपणे देण्यात आली होती. एखादा शेतकरी शेती करण्याची उमेद बाळगून असेल पण त्याच्या दुर्दैवाने दुष्काळी परिस्थितीमुळे अस्मानी संकटामुळे किंवा अन्य काही कारणांमुळे (सुलतानी संकटामुळे) जर तो कर्ज फेडू शकला नाही व त्याची अडचण खरी असल्याचे अधिकाऱ्याने राजाना पटवून दिले तर अशा शेतकऱ्याला मागील कर्जाची माफी दिली जाईल.
३५० वर्षांपूर्वी शिवाजी राजाला शेतकऱ्यांबद्दल जी स्वच्छ व स्पष्ट दृष्टी प्राप्त झाली होती त्याचा लवलेश तरी आज क्षणोक्षणी शिवाजी राजाचे नाव घेणाऱ्या राज्यकर्त्याच्या वर्तणुकीत त येतो काय हा खरा महत्त्वाचा प्रश्न आहे.
महाराष्ट्राच्या आत्तापर्यंतच्या इतिहासात शेतकऱ्यांची सर्वतोपरी काळजी घेणारा असा दुसरा दस्तऐवज सापडणे केवळ अशक्य कोटीतील गोष्ट आहे. शेतकऱ्याच्याजीवनातील दैनंदिन घडणाऱ्या घटनांचे इतक्या बारकाव्याने निरीक्षण केले व कृतीत उतरविले याचा अर्थ असा की शेतकऱ्याच्या जीवनाशी राजा किती समरस झाला होता हे या पत्रावरून फार चांगल्या प्रकारे ध्यानात येते.
केवळ आपल्याच राज्यातील शेतकऱ्यांची राजा काळजी घेत होता असे नाही. तर परमुलुखात जात असतानाही शेतकऱ्यांच्या पिकाची तो अतिशय काटेकोरपणे काळजी घेत असे. गोवळकोंड्याच्या कुतुबशहाकडे शिवाजी राजा निघाले असतांना आपल्या सैन्याला त्याने ताकिद दिली की, "एक काडी रयतेची घेऊ नये, आवश्यक त्या वस्तू बाजारातून विकत घ्याव्यात. कोणीही लुट करू नये. या आज्ञेचे काटेकोरपणे पालन करावे." ऐतिहासिक दाखल्यावरून असे दिसून येते की, या आज्ञेचे उल्लंघन झाले तर राजाने शिरच्छेदाची शिक्षा करून जबर बसविली. परमुलुखात राहणाऱ्या शेतकऱ्यांची काळजी घेणारा शिवाजी राजा हा सबंध भारतवर्षाच्या इतिहासामध्ये एकमेव आहे.
जसवंतराव पालवणकर यांची जहागिरी शिवाजीराजाने ताब्यात घेतली. राजाने या मुलखाची नीट व्यवस्था लावताना स्वाऱ्यांमुळे घाबरून त्या प्रांतातून पळून गेलेल्या प्रजेला परत बोलावले. सर्वांना विश्वासपूर्वक कौल दिला. पाहता पाहता ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य ब शूद्र, कासार, सोनार, न्हावी, तमासगीर, माळी, कुंभार, कारवार, कोष्टी, शिंपी, रंगारी, डोंबारी, तेली, परीट इत्यादी अठरा पगड जातीचे लोक पुन्हा नांदते केले आणि स्वराज्याच्या सुरक्षिततेच्या छायेखाली लोक नांदू लागले आणि दिवसेंदिवस होणारी भरभराट पाहून राजा आनंदीत झाला. याचा दाखला शिवभारतकार कवी परमानंद यांनी दिला आहे.
शिवाजी राजे आपल्या सैनिकांना एका आज्ञापत्रात आदेश देताना म्हणतो, आपल्या वागणुकिने रयतेला त्रास होता कामा नये. या गोष्टीची कडक शब्दात राजा ताकिद ते देतो, तो येणेप्रमाणे:-
"कसबे चिपळूणी साहेबी लष्कराची बिले केली आणि याउपरी घाटावरी कटक जावे ऐसा मान नाही. म्हणून एव्हा छावणीस रवाना केले. ऐसियास चिपळूणी कटकाचा मुक्काम होता याकरिता दाभोळच्या सुबेयांत पावसाळ्याकारणे पागेस सामा व दाणा व वरकड केला होता. तो कितेक खर्च होऊन गेला व चिपळून आसपास विलातीत लष्कराची तसवीस व गवताची व वरकड हरएक बाब लागली. त्याकरिता हाल काही उरला नाही. ऐसे असता वैशाखाचे वीस दिवस, उनाळा, हेही पागेस अधिक बैठी पडली. परंतु जरूर झाले, त्याकरिता कारकुनाकडून व गडोकडी गल्ला असेल तो देववून जैसी तैसी पागेची बेगमी केली आहे. त्यास तुम्ही मनास (माने) ऐसा दाणा, रतीब गवत मागाल, असेल तोवरी धुंदी करून चाराल. नाहीसे जाले म्हणजे मग काही पडत्या पावसांत मिळणार नाही, उपासपडतील. घोडी मारायास लागील. म्हणजे घोडी तुम्हीच मारिली ऐसे होईल व रयतेस तसवीस देऊ लागाल. ऐशास लोक जातील, कोणी कुणीब्याचेथील दाणे आणील, कोण्ही भाकर, कोण्ही गवत, कोण्ही फाटे, कोणी भाजी, कोण्ही पाले ऐसे करू लागलेत म्हणजे जे कुणबी घर धरून जीव मात्र घेऊन राहिले आहेत तेहि जाऊ लागतील, कितेक उपाशी मराया लागतील. म्हणजे त्याला ऐसे होईल की मोगल मुनकांत आले त्याहूनही अधिक तुम्ही. ऐसा तळतळाट होईल. तेव्हा रयतेची व घोडियांची सारी बदमानी तुम्हावरी येईल. हे तुम्ही बरे जाणून सिपाही हो अगर पावखलक हो बहुत यादी धरून वर्तणुक करणे, कोण्ही पागेस अगर मुलकात गावोगाव राहिले असाल त्यांनी रयतेस कडीचा आजार द्यावया गरज नाही. आपल्या राहिला जागाहून बाहीर पाय घालाया गरज नाही. साहेबी खजानांतून वाटणिया पदरी घातलिया आहेती. ज्याला जे पाहिजे, दाणा हो अगर गुरेढोरे वागवीत असाल त्यास गवत हो अगर फाटे, भाजीपाले व वरकड विकावया येईल ते रास घ्यावे, बाजारास जावे, रास विकत आणावे. कोण्हावरी जुलूम अगर ज्याजती अगर कोण्हाही कलागती करावयाची गरज नाही व पागेस सामा केला आहे तो पावसाळा पुरला पाहिजे . ऐसे तजविजीने दाणा रतीब कारकून देत जातील तेणेप्रमाणेच घेत जाणे, की उपास न पडता राजेबरोज खायाला सापडे आणि होत होत घोडी तवाना होत ऐसे करणे. नसतीच कारकुनासी धसफस कराया. अगर अमकेच द्या तमकेक द्या ऐसे म्हणाया, धुंदी करून खासदारकोठीत, कोठारात शिरुन लुटाया गरज नाही व हाली उन्हाळ्याला आहे तईसे खलक पागेचे आहेत, खण धरून राहिले असतील व राहातील, कोण्ही आगट्या करीतील, कोण्ही भलतेच जागा चुली, रंधनाळा करितील, कोण्ही तंबाकू ला आगी घेतील, गवत पडिले आहे ऐसे अगर वारे लागले आहे ऐसे मनास न अणिता म्हणजे अविस्त्राव एखादा दगा होईल. एका खणास आगी लागली म्हणजे सारे खण जळोन जातील. गवताच्या लहळ्यास कोणीकडून तरी विस्तो जाऊन पडला म्हणजे सारे गवत व लहळ्या आहेत तितक्या एके एक जाळी जातील. तेव्हा मग काही कुणबियांच्या गर्दना मारल्या अगर कारकुनास ताकिद करावी तैसी केली तऱ्ही काही खण कराया एक लाकूड मिळणार नाही, एक खण होणार नाही. हे तो अवघियाला कळते. या करणे, बरी ताकिद करून खाते असाल ते हमेशा फिरत जाऊन रंधने करिता आगट्या लाविता, अगर रात्रीस दिवा घरात असेल, अविस्त्राच उंदीर वात नेईल. ते गोष्टी न हो. आगीचा दगा न हो. खण, गवत वांचेलते करणे म्हणजे पावसाळा घोडी वाचली. नाही तर मग घोडी बांधावी न लगेच. खायास घालावे, न लागे, पागाच, बुडाली. तुम्ही निसूर जालेत, ऐसे होईल. या कारणे तपशिले तुम्हास लिहिले असे. जितके खासे खासे जुमलेदार, हवालदार, कारकून आहा तितके हा रोख तपशिले ऐकणे. आण हुशार राहाणे. वरचेवरी, रोजचा रोज खबर घेऊन, ताकिद करून येणेप्रमाणे वर्तणूक करिता ज्यापासून अंतर पडेल ज्याचा गुन्हा होईल. बदनामी ज्यावर येईल. त्यात मराठियाची तो इज्जत वाचणार नाही, मग रोजगार कैसा?..."
"घोडी वाटेल तशी चारू नका, आता चारा संपवलात तर पावसाळ्यात मिळणार नाही. मग घोडी तुम्हीच मारली असे होईल. अशा परिस्थितीत लोक जातील कोणी शेतकऱ्याचे दाणे आणतील, कोणी भाकरी, कोणी गवत, कोणी जळण, कोणी भाजीपाला, असे जर तुम्ही वागू लागलात जे बिचारे शेतकरी कष्ट करून जीव सांभाळून राहिलेत ते जाऊ लागतील. कित्येक बिचारे उपाशी मरतील आणि त्यांना असे वाटले आपल्या मुलखात मुघल आला त्यापेक्षा तुम्ही जास्त त्रासदायक आहात. त्यांचा तळतळाट होईल तेव्हा रयतेची आणि घोड्यांची सारी बदनामी तुमच्या माथी येईल. हे तुम्ही जाणून असावे. घोडेस्वार असो अगदी पायदळ असो ही गोष्ट विसरता कामा नये."
रयतेच्या रक्षणात शिवाजी राजा किती सावध होता याचे अतिशय बोलके उदाहरण या पत्रावरून दिसून येते.
आग्ऱ्याहून परत आल्यानंतर कोणतीही मोहीम हाती न घेता शिवाजीराजाने स्वराज्याची व्यवस्था लावण्यात लक्ष घातले. या शांततेच्या काळात महसुलाच्या उत्पन्नाची साधने त्याने ठरविले आणि एकदंर सर्व परिस्थितीचा विचार करता राजाने शेतजमिनीच्या साऱ्याच्या वसुलीसाठी एक आदर्श पद्धत घालून दिली. शेतकऱ्यांची सारा आकारणी त्या काळी दोन प्रकारात केली जाई. नगदी आणि धान्य. सारा म्हणून धान्य रूपाने गोळा केलेले धान्य कोठ्यामध्ये साठवून अडचणीच्या दिवसात विक्रीला बाहेर काढले जाई. दुष्काळी परिस्थितीला तोंड देताना या धान्याचा उपयोग केला जात असे. शिवपूर्व काळात जमिनीची मोजणी करण्याची पद्धत नव्हती. नजरेने अंदाज करून वतनदार साऱ्याची रक्कम ठरवीत. स्वराज्य स्थापनेनंतर मात्र या कार्याला शिस्त लागली. उदा. अंजनवेल तालुका १६७६ पर्यत आदिलशहाकडे होता. जमिनीची मोजणी झाली नव्हती. केवळ नजरेने साऱ्याची रक्कम ठरविली होती. असा उल्लेख आढळतो. हा प्रांत १६७६ मध्ये शिवाजी राजा येताच लगेच जमिनीची मोजणी झाली व जमिनीची प्रतवारी ठरविण्यात आली.जमिनीमापाचे प्रमाण हे हात आणि मूठ यावर होत असे.
"काठी मोजणीने" जमीन मापली जाई. ५ हात ५ मुठी = १ काठी. १ काठी ८२ तसू. २०+२० काठ्या =१ बिघा. १२० बिघे =१ चावर. (शके १८३८ च्या भा. इ. सं. म. च्या अहवालात थोडे वेगळे कोष्टक दिलेले आढळते. ते असे-२० काठ्या लांब व १ काठी रुंद = १ पांड, २० पांड = १ बिघा. ६० बिघे =१ पाव. ४ पाव =१ चाहूर. १ चाहूर =६४ कुरगी. ८ नवटाक =१ चाहूर. यातील बिघ्यास आदिलशाही बिघा संबोधले जाई.)
जमिनीच्या १२ प्रती केलेल्या आढळतात:
१) अव्वल, २)दूम, ३) सीम, ४) चारसीम, ५) बावील. (खडकात) ६) खारवट (समुद्रकाठची), ७) रहु, ८) खारी (खाडीजवळची), ९) खुड्याळ किंवा खरियत (दगडाळ), १०) राजपाल (झुडपांची), ११) खुरवटे (व्दिदल झाडांची), १२) मनूत ( झाडांची मुळे असलेली व साफ न केलेली) नापीक व वरकस हेही प्रकार करण्यात आले. त्यास वजत म्हणून. जमिनीच्या प्रतवारीवरून सारा ठरविला गेला.
जमिनीच्या प्रतवारीवरून तिची सारा आकारणी केली जाई. दर बिघ्याला अव्वल- १२ मण, दुय्यम १२ मण, सीम ८ मण, राजपाळ ८ मण, खारवट ७.५, बावल ६.५ मण, खुरी ६। मण, खुड्याळ ६। मण, रहु ५ मण, तुरवटे व मनूतही ५ मण. वजत व वरकस जमिनीवरील आकारणी बिघ्याऐवजी नांगराप्रमाणे केली जाई. १ नांगर = साधारणत: ६-७ बिघे. एवढ्या जमिनीला एक बिघा समजून आकार घेतला जाई. हा साराही नजरमान = ५ लोकांनी जमीन तपासून खडीच्या पिकावरून स्थळ नजरेस येईल. त्याप्रमाणे सारा वसुली ठरे. कोरडवाहू जमिनीला जिराईत तर ओलिताच्या जमिनीस बागाईत म्हणत. बागाईत जमिनीतही मोटस्थळ, पाटस्थळ, बागमळा व राई असे पोटविभाग पाडले जात.
जमिनीची पाहणी करणारा अमीन, कारकून असे. मोजणी करणारा काटकर. त्यांच्या वतनदारांशी असलेला संबंध तुटला व त्याला सरकारी अधिकारी म्हणून पगार सरकारातून मिळू लागला. बिघे, चावर, सीमा ठरल्या. जमिनीची काटेकोर मोजणी झाली. प्रतवारी ठरली. मिराजदार, कूळ शेतकरी यांना सनदा दिल्या गेल्या. गाववार जमीन झाडा तयार केला जाऊ लागला. या कामी अण्णाजीपंत दत्तो सुरनीस (त्यावेळचे महसूलमंत्री) हे स्वत: जातीने तपासणी करीत. जमीन मोजणी. पीक पाहणी, प्रतवारी व सारा वसुली याबाबतीत अण्णाजी पंत अतिशय हुशार होते. स्वराज्याचे "पेशवे" मोरोपंत हेही या कामी लक्ष घालत होते. शिरवळपरगण्याची साराबंदी स्वत: स्वराज्याच्या पेशव्यांनी केली, असा ऐतिहासिक कागदपत्रात उल्लेख आढळतो. स्वराज्यातील साऱ्याचे दर मोघल साऱ्यापेक्षा कमी होते. मोघल १/२ सारा वसूल करीत असत. म्हणजेच शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोघलांचा वाटा अर्धा होता. १/२ सारा वसूल करणे हा दरबारी नियम. प्रत्यक्षात वसुली वतनदारांमार्फत म्हणजे अर्थातच बेहिशेबी होत असे. शिवाजीराजाचे हे प्रमाण उत्पन्नाचे पाच हिस्से करून दोन सरकारकडे आणि तीन शेतकऱ्याकडे असे ठरविले. वतनदारांकडून हे काम सरकारी अधिकाऱ्यांकडे आले आणि राजा अतिशय काटेकोर लक्ष घालत असल्यामुळे सरकारी अधिकाऱ्यांनी गोळा केलेला हा वसूल सरळ स्वराज्याच्या खजिन्यात जाऊ लागला. कोकणात नारळ, सुपारी हे महत्त्वाचे उत्पन्नाचे साधन. या वस्तूंचे भाव सरकारातून ठरविले जात. आणि या वस्तू व्यापाऱ्यांना विकताना सरकारी अधिकाऱ्याला उपस्थित राहणे हे त्याच्यावर बंधनकारक होते. गावाची रचना करतानासुद्धा अत्यंत आदर्श पद्धती ठेवली. वसवलेल्या गावात बाजारपेठेचा कारभार त्या गावापेक्षा पूर्णत: वेगळा केला. पेठाची वस्ती वेगळी केली. गावाचे दोन भाग केले. मुजेरी म्हणजे शेतकऱ्यांची वसाहत व मोहोवाकि म्हणजे बारा बलुतेदारांची वस्ती.
स्वराज्याची स्थापना करताना शिवाजीराजाने घेतलेल्या शेतकऱ्यांच्या काळजीची ठळक उदाहरणे फक्त वर नमूद केलेली आहेत. सबंध चरित्रातील अशी अनेक घटनास्थळे दाखविता येतील की ज्या धोरणांचा शेतकऱ्यांच्या जीवनाशी संबंध आहे. त्यात धर्माचीबाबसुद्धा ही दुय्यम मानली. शिवाजी राजा आपल्या स्वराज्याच्या रक्षणासाठी आदिलशहा, कुतूबशहा आणि मोघलांकडून फौजेच्या बळावर चवथाई वसूल करी. सुरत, नंदूरबार, धरणगाव, चोपडा, मलकापूर, कारंजे इत्यादी गावांत राजांनी चवथाई वसूल केल्याचा उल्लेख इतिहासात आहे. आपल्या मुलखाचे व रयतेचे रक्षण करण्यासाठी आपल्याला फौज बाळगावी लागते तिच्या खर्चासाठी ही वसुली करणे भाग आहे असे रास्त समर्थन राजाने या संदर्भात केले आहे.
आर्थिक, सामाजिक, राजकिय अशा सर्व जाचातून महाराष्ट्रातील शेतकरी मुक्त होत असतानाच मोगल राजधानीच्या परिसरातील शेतकरीही या सर्व जाचांनी पिळून निघत होता. ज्यावेळेला स्वराज्यात शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेची हमी दिली जात होती आणि शेतकऱ्यांचे राज्य स्थापन करण्याचे काम सुरू होते, बरोबर त्याचवेळेला उत्तरेतील जाट शेतकऱ्यांनी दिल्ली तक्ताविरुद्ध बंडाचा उठाव केला होता. रयतेतील शेतकऱ्यांमधील हा धगधगणारा असंतोष संघटित होऊ लागला. अंसतोषाचा पहिलाभडका पेटला तो मथुरेला. तेथील जमीनदार गोकला यांच्या नेतृत्वाखाली जाट शेतकऱ्यांनी बंडाचा झेंडा उभारला. मथुरेच्या आसपासची सर्व खेडी एकत्र झाली. हा शेतकऱ्यांच्या अंसतोषाचा वणवा विझविण्यासाठी अब्दुल नबी हा औरंगजेबाचा सरदार चालून गेला. त्या ठिकाणी झालेल्या झुंजीत दि.१० मे १६६९ रोजी चिडलेल्या लोकांनी अब्दुल नबीला नेमके टिपले. गोकलाच्या विजयी सैन्याने सदाबाद हा औरंगजेबाजा परगणा लुटून फस्त केला. पहिल्याच संघर्षात यश मिळाल्यामुळे मथुरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या असंतोषाच्या वणव्याची झळ आग्ऱ्यापर्यंत पोहोचली. मोघलांच्या राजधानीभोवतालच्या प्रदेशातील शेकडो खेड्यातील हजारो जाट व अन्य शेतकरी यांनी औरंगजेबाची शाही सत्ता उधळून लावली. अव्यवस्था, धुमाकूळ आणि कत्तली बेसुमार झाल्या.
जाटांपाठोपाठच सतनामी लोकांनीही औरंगजेबाच्या सत्तेविरुद्ध उठाव केला. दिल्लीच्या ईशान्येस ७५ मैलांवरील नरनौळ जिल्ह्यात सतनामांचा जबर जोर होता. हा भाग तर त्यांचा बालेकिल्लाच झाला. चारित्र्यसंपन्न प्रामाणिक बंधुत्ववादी सतनामी फकिरासारखी वेशभूषा करून अगदी किरकोळ भांडवलावर शेती आणि व्यापार करीत, गैरमार्गाने धनसंपत्ती गोळा करणे यास ते पाप समजत. जाटांबरोबरच सतनामी औरंगजेबाच्या लुटारू सत्तेविरुद्ध दंड थोपटून उभे राहिले. संतनाम्यांचे नेतृत्व एका वृद्ध महंतणीकडे होते. पाहता पाहता ही चळवळ प्रचंड फोफावली. औरंगजेबाचे धाबे दणाणले . बादशाही सैन्याची लांडगेतोड होऊ लागली. या चळवळीचा बंदोबस्त करण्यासाठी आलेल्या औरंगजेबाच्या छोट्या-छोट्या पथकांची अन्यायाविरुद्ध कंबर कसून उभा राहिलेल्या शेतकऱ्यांनी लूट आणि दारुण परावभ केला. औरंगजेबाच्या अमर्यादित सत्तेवर धार्मिक छळाचा डाग पण होता. साहजिकच सतनाम्यांमध्ये महंतिणीच्या मंत्रसामर्थ्यामुळे आपण औरंगजेबाच्या शाही फौजेचा पराभव करू शकू ही भावना निर्माण झाली. नारनौळच्या लढाईत पराभव होऊन संपूर्ण शहर चवळवकर्त्यांच्या ताब्यात आले.
लूट, अत्याचार, बेबंदशाही, जुलूम याविरुद्ध उभा राहिलेला हा संघर्ष महाराष्ट्रातातील छत्रपती शिवाजीराजाच्या स्वराज्याप्रमाणे मूर्तरूप घेऊशकला नाही. याची तत्कालीन कारणे अनेक असतीलही. तरी पण अशा उठावापूर्वी कींवा संघर्षापूर्वी रयतेमध्ये राजकर्त्याबद्दल जो विश्वास निर्माण व्हायला हवा होता तो या उठावकर्त्यांना करता आला नाही, हे निश्चित. नेमकि हीच गोष्ट शिवाजीराजाने स्वराज्याची निर्मिती करीत असताना बरोबर हेरली आणि सुरुवातीपासूनच धर्माचा, जातीचा क्षुद्र विचार न करता जो जो स्वराज्यासाठी उभा राहणार आहे त्यास बरोबरघेतले. रयतेमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण केली आणि म्हणूनच हातामध्ये रुमणे घेणारा शेतकरी आपल्या शेतीच्या रक्षणासाठी सुगीचे दिवस संपताच तलवार घेऊन उभा राहिला.
समाजाच्या प्रगतीची बीजे रोवली
शिवाजीराजाच्या राज्यात रयतेच्या "स्वराज्यात" रयतेला सुरक्षितता प्राप्त झाली. सन्मानाची वागणूक मिळू लागली. या सर्वांबरोबरच समाजाच्या प्रत्येक घटकाला स्वत:च्या विकासाची दिशाही स्वराज्यात दिसू लागली हे नि:संशय. स्वराज्याचा मूळ मुलूख हा काही समृद्ध शेतीचा प्रदेश नाही. आजचा विदर्भ आणि मराठवाडा हे दोन प्रदेश सपाटीचे, जास्त शेतजमीन असलेले आणि म्हणूनच शेतीच्या जास्त उत्पन्नाचे प्रदेश.हे स्वराज्यात नव्हतेच. त्यामुळे शेतीच्या बरोबरीने इतर जोडधंदे निर्माण होणे, ते रयतेला उपलब्ध होणे यातूनच रयतेची आर्थिक परिस्थिती अधिक सुधारू शकत होती. शेतीतून राज्यव्यवस्थेने नेलेला महसूल काही थोड्याच लोकांनी वापरले यापेक्षा त्या महसुलातही रयतेचा पुरेपूर वाटा असणे हे राजाच्या आणि शेतकऱ्यांच्या निरोगी देवघेवीचे लक्षण आहे.
महाराष्ट्राच्या भूमीत सैनिकि पेशा हा तसा शेतीचा जोडधंदाच होता. दसऱ्यापर्यंत शेती करायची नंतर मुलूखगिरीला बाहेर पडायचे. अक्षयतृतीयेला परत येऊन शेतीच्या कामाला लागायचं ही पद्धत. मुलूखगिरीतून सैन्याला पगार होते. रणागंणात कामी आले तर मान होता. अशा वीरमृत्यूनंतर घरच्यांची काळजी घ्यायला राजा होता. मावळातल्या रयतेतीलच लोक या सैन्यात होते आणि किनारपट्टीवरच्या आगरी, कोळी, भंडारी, आणि मुसलमान या दर्यावर्दी जमातींना आरमारात स्थान होते. एरवी समुद्रावरच्या सर्व हालचाली हबशी आणि इंगजांनी ताब्यात घेतलेल्या होत्या. आरमारातील सर्व प्रकारच्या नोकऱ्या रयतेला उपलब्ध झाल्या. त्याचबरोबर किनारपट्टीवरच अनेक ठिकाणी जहाजे आणि अनेक प्रकारच्या छोट्या नौका करण्याचे कारखाने होते. एकशेसाठ आणि अनेक इतर अनेक प्रकारच्या छोट्या नौका आरमात होत्या. जहाजे तयारकरायला कोणी टोपीकर इंग्रज वगैरे बाहेरच्यामाणसांना नोकरीला ठेवले होते की नाही माहीत नाही. कदाचित काही काळ असतीलही. आरमार आणि जहाजे तयार करणे, तेलपाणी करून व्यवस्थित ठेवणे एक मोठे क्षेत्र किनारपट्टीवरच्या जातीजमातींना राजाने खुले केले यात संशय नाही.
तीच गोष्ट गावोगावच्या लोहारांची , चाभारांची, सुतारांची आणि गवंडी यांची म्हणता येईल. स्वराज्याच्या सुरुवातीपासूनच तोरणा दुरुस्ती, राजगड उभारणी,प्रतापगड उभारणी, मोहनगड दुरुस्ती व उभारणी, रायगडाचे प्रचंड बांधकाम, भूपाळगडासारखा कित्येक किल्ल्यांची डागडूजी व उभारणी, सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग (कासा) अलिबाग(कुलाबा), खांदेरी उंदेरी यासारख्या किल्ल्यांची उभारणी ही व काही धरणांची इत्यादी कामे झालेली दिसतात. शिवाजीराजांच्या १६४६ ते १६८० या कारकीर्दीत झालेली एवढी अभियांत्रिकि क्षेत्रातील कामे निदान महाराष्ट्रात तरी इतर कोणत्या काळात झालेली नाहीत.
निरनिराळ्या अठरापगड जातीजमातींना त्यांचे पिढीजात धंदे किंवा नोकऱ्या करता येऊ लागल्या. सुलतानीत हे सर्वच दडपले गेले होते. वसुलीचा हक्क वतनदार जहागीरदारांच होता. त्यांचे प्राबल्य. बळजोरी आणि आपसातील मारामाऱ्या यांनाच ऊत आला होता. महारांना एरवी वतनदारांच्याकडे नोकऱ्या मिळाल्या तर ठीकच एरवी हालच कारण शेतीचेच हाल चालू. जवळजवळ प्रत्येक किल्ल्यावर देवडीवरचे राखणीचे काम, स्वराज्यातील अनेक ठाण्यांवरचे, मेट्यांवरचे राखणीचे काम महार-रामोशांकडे होते. त्यांना "नाईक" या सन्मानदर्शक संबोधनाने बोलावले जायचे. पाटील, कुलकर्णी या गावकामगारांना त्याचे परंपरागत कामच दिलेले पण वसुलीचे हक्क काढून घेऊन त्यांच्यावर नियंत्रण ठेवलेले होते.
स्वराज्यात मुलकि अधिकाऱ्यांची संख्याही बरीच होती. हे सर्व पगारी नोकरच होते. यात लेखणीचे काम जास्त असल्यामुळे ब्राह्मण, प्रभू इ. जातीचे लोक होते.रयतेतील लोक मुलखगिरीवर जाणे व मुलूखगिरीवर न जाणारे रयतेच्या व्यवस्थेला लागणे ही व्यवस्था होती. दोन्ही कामांना राजांनी महत्त्व दिले.
इ.स. १६७० च्या सुमारास जेव्हा औरंगजेबाविरुद्धचा तह मोडून पुन: मोगली सत्ता स्वराज्यातून उचकटून काढायचे काम चालू होते तेव्हा शिवाजीराजाने निळोपंत मुजुमदारांनी गड घेणे इत्यादी मुलूखगिरीच्या कामातून काढून मुलकिचा कारभार करण्याकडे बदली केली. "एकाने सिद्ध संरक्षण करावे, एकाने साध्य करावे. दोन्ही कामे साहेब बरोबरी मानताती" तरीपण शिवाजीराजांनी मुलकि अधिकाऱ्यांना शिरजोर होऊ दिले नाही. प्रभावळीच्या सुभेदाराला एका कामात चुकारपणा केल्यावर त्यांनी खलिता पाठवला होता आणि "ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा करतो?" या शब्दात समज दिली होती.
भूमिचे संरक्षण, भूमिसेवक शेतकऱ्यांचे आणि त्यांच्या शेतीभातीचे संरक्षण, शेतकऱ्यांचाच संरक्षणामध्ये संवर्धनामध्ये सहभाग, शेतकऱ्यांच्या शेतीतून आणि बलुतेदारांच्या उत्पादनातून मिळणाऱ्या वसुलीचा संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी होणारा वापर या सर्व गोष्टींना रयत साक्षीदार होती.त्या काळात सर्व कला, विद्या, तंत्रज्ञान या पुस्तकि किंवा बिगरपुस्तकि ज्ञानाचे हस्तांतर पारंपरिक पद्धतीने वडील पिढीने नवीन पिढीला घरोघरी देणे या पद्धतीनेच होत होते. या ज्ञानाचा वापर सर्वांसाठी होणे यात सुलतानशाहीचा व वतनदारीचा राजकिय व आर्थिक अडसर मोठा होताच. त्यामुळे कला विज्ञान, व्यावसायिकांना त्यांचे धंदे सुरळीत सुरू करण्याच्या विरोधातले अडसर दूर होणे ही विकासाची मूलभूत पायरी व त्यानंतर कला विज्ञान तंत्रमानाचे विकसन, नवीन गोष्टी विकसित करणे परत त्यांचा सर्वसामान्यांसाठी वापर होणे ही दुसरी पायरी ठरावी.
महाराष्ट्रात उभ्या राहिलेल्या राज्यात ही पहिली पायरी समाजाने ओलांडली हे निश्चित. त्या धकाधकिच्या काळात दुसऱ्या पायरीकडे जाण्याइतका वेळ, स्थिरस्थावरता स्वराज्याच्या धुरीणांना मिळाली नाही. पण या दुयऱ्या पायरीची बीजे पुरंदर किल्ल्यावरचा तोफाचा कारखाना, आरमारी व व्यापारी हालचालींसाठी लागणाऱ्या नौकांचे कारखाने इ. अनेक गोष्टीत दिसतात.
□
इडा पिडा टळो| 'शिवा'चे राज्य येवो ||
शिवाजीराजांच्या इतिहासातील कामगिरीवर या पुस्तिकेत एका वेगळ्या दृष्टीने पाहिले आहे. देशाकरिता लढणारे राजे त्या काळात किंवा त्या आधीही काही कमी नव्हते. परकियांनी बळकावलेल्या स्वदेशास स्वतंत्र करण्यासाठी धडपडणारे वीरही इतिहासात कमी नाहीत. शिवाजीराजे स्वराज्य संस्थापक होते तसेच महाराष्ट्राच्या तख्ताचीही स्थापना करणारे होते. त्यांची सगळ्यात मोठी कामगिरी महाराष्ट्रात एका मर्यादित भूखंडात का होईना एक नवीन पद्धतीचे राष्ट्र तयार करणे ही होती. या राष्ट्रातील लोकांचे एकमेकातील संबंध लुटणारे आणि लुटले जाणारे असे नव्हते. सर्व लोकांना आपला पोटापाण्याचा व्यवसाय निर्धास्तपणे करता यावा, त्या व्यवसायाचा विकास करण्याची संधी मिळावी, हे राष्ट्राचे स्वरूप होते.
भरत खंडातील इतिहास जेव्हापासून उपलब्ध आहे तेव्हापासून तो राजाराजांतील लढायांचा आहे. या राजांची धनसंपदाही रयतेच्या शोषणातून मिळवलेली असणार हे उघड आहे. अगदी मुसलमानी अक्रमणापर्यंत येथील परिस्थितीत फरक असा पडला नव्हता. छोटी छोटी राज्ये, राजाने प्रजेला लुटायचे आणि आसपासच्या राजांशी लढाया करायच्या. दोघांचाही परिणाम एकच प्रत्येकवेळी जुलूम व्हायचा तो शेतकऱ्यांवर. सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीने राजकिय परिस्थितीचा अर्थ काय होता तर राजवाड्यांनी म्हटल्याप्रमाणे, "हिंदुस्थानात जी देशी व परदेशी सरकारे होऊन गेली ती सर्व एक प्रकारच्या पोटभरू चोरांची झाली व सरकार म्हणजे उपटसुंभ चोरांची टोळी आहे, अशी हिंदू गावकऱ्यांची अंतस्थ प्रामाणिक समजूत" झाली.
शिवाजीराजांनी आपल्या आयुष्याच्या अखेरपर्यंत एक नव्या प्रकारचे स्वराज्य उभे केले. त्याची उभारणी कोण्या लुटारू मनसबदारांच्या हातमिळवणीतून झाली नाही. स्वराज्य सैनिक उभे राहिले ते गावागावातील शेतीवर जगणाऱ्या शेतकऱ्यातून. स्वराज्यातील शेतकऱ्यांच्या अडचणींची, दुःखाची थेट राजाला खबर होती आणि चिंताही होती. शेतकरी आणि राजा यांच्यातले आडपडदा घालणारे मध्यस्थ जरबेखाली आले. गावगन्ना गढ्या बुरूज बांधून आपण जणू सार्वभौम राजेच आहोत अशाथाटात बेबंद जुलूम आणि अत्याचार करणे त्यांना सोपे राहिले नाही. शिवाजीराजांनी जागवलेल्या महाराष्ट्र धर्माचे खरे स्वरूप हे असे.
पण या महाराष्ट्र धर्माची ज्योत राजानंतर फार काळ तेवत राहिली नाही. औरंगजेबाच्या स्वारीस तोंड देण्यासाठी शिवाजीराजांनी घालून दिलेल्या अनेक शिस्ती आपद्धर्म म्हणून का होईना सोडून द्याव्या लागल्या. मराठा राज्यात पुन्हा वतनदार निर्माण झाले. सरदार आपापल्या प्रदेशात सत्ता गाजवू लागले. पेशवाईच्या काळापर्यंत महाराष्ट्राची स्थिती पुन्हा एकदा रामदेवरायाच्या काळापेक्षा काही मूलत: वेगळी राहिली नाही. छिन्नभिन्न झालेल्या राष्ट्रावर परकिय सत्ता प्रस्थापित होणे हे क्रमप्राप्तच आहे. रामदेवरायाचा धडा शिकला गेला नाही. म्हणून पुन्हा एकदा परकियांनी देशावर सत्ता बसविली. रामदेवरायच्या काळी आलाउद्दीन उत्तरेतून आला. पेशव्यांच्या काळी इंग्रज सातासमुद्रापलीकडून आला.
इंग्रजांनी आपला अंमल बसवण्याच्या सुमारास देशांत लढाया, लुटालुटी इतकि माजली होती की इंग्रजांचे राज्य म्हणजे परमेश्वरी देणे आहे अशीच सर्वसामान्य लोकांची समजूत झाली. देशातील सरंजामशाही व्सवस्था या ना त्या मार्गे फोडून काढण्याचा प्रयत्न इंग्रजानीही केला; परंतु १८५७ च्या बंडानंतर इंग्रजांनी धास्ती खाऊन सर्वसामान्य प्रजाजनांना सुखावह होणारी राज्यव्यवस्था तयार करण्याऐवजी धर्मव्यवस्थेत व सामाजिक रचनेत ढवळाढवळ न करण्याचे व्रत घेतलेली व्यवस्था तयार केली. संस्थानिक बनलेले जुने राजे महाराजे, त्यांच्या दरबारी पोसलेले मंत्रीगण, कारकून आणि इतर पांढरपेशे यांनी नवीन अमलात नवीन व्यवस्थेप्रमाणे स्वत:चा उत्कर्ष साधण्याचा खटाटोप चालू केला. इंग्रज येण्यापूर्वी ही दरबारी मंडळी ज्या रयतेला लुटत होती त्या रयतेच्या परिस्थितीत मात्र काहीच बदल झाला नाही. सरदार दरकदार गेले त्या ऐवजी मामलेदार, तलाठी आले. एवढाच काय तो फरक. इंग्रज येण्यापूर्वी दररोजच्या व्यवहारात लिखापढीला फारसे महत्त्व नव्हते. आता कागदोपत्री जे लिहिले असेल तेच सत्य आणि त्याप्रमाणेच न्याय होणार अशी व्यवस्था. लेखणीची मक्तेदारी जुन्या सरदार, पुरोहित, मनसबदारांच्या वंशजाकडे आली. इंग्रजी व्यवस्थित लेखणी ही पूर्वकालीन तलवारीपेक्षाही शेतकऱ्यांच्या दृष्टीने अधिक भयानक हत्यार ठरले.
फिरुन एकदा स्वातंत्र्याचा प्रश्न सुरू झाला. त्यात रयतेला असे काही स्थान नव्हते, इंग्रजी अमलात संपत्ती, विद्या आणि प्रतिष्ठा मिळवलेल्या समाजास देशातील साधन सामग्रीचा लाभ घेण्याची आकांक्षा होती. इंग्रज लूट करीत असताना त्यांच्या हातातोंडातून सांडलेल्या उष्ट्यामाष्ट्यावर त्यांचे समाधान होण्यासारखे नव्हते.स्वातंत्र्याच्या लढाईची बांधणी शहाजीराजांच्या स्वराज्य संस्थापनेसारखी होती. आर्थिक, सामाजिकदृष्ट्या भाग्याशाली असलेल्या समाजाने स्वातंत्र्याचे आंदोलन आपल्या हातात घेतले आणि त्यामुळे इंग्रज निघून गेल्यावर सर्व देशाची राजकीय व आर्थिक सत्ता याच समाजाच्या हाती आली.
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर चाळीस वर्षांत आपण फिरून एकदा रामदेवरायाच्या किंवा सुलतानीच्या अवस्थेत जाऊन पोचलो आहोत. दिल्लीच्या पातहाला पंतप्रधान म्हणतात. राज्याराज्यातील त्यांच्या सुभेदारांना मुख्यमंत्री म्हणतात. जिल्ह्याजिल्ह्यात त्यांचे आमदार, अध्यक्ष, सभापती, संचालक आपापली सत्ता गाजवत आहेत. या सगळ्यांच्या राजकारणाचे सूत्र एकच. दरबारातील मंडळीस आणि जवळपासच्या कील्लेदारास खुश ठेवायचे म्हणजे सार्वभौम राजाप्रमाणे रयतेवर लुटीचा हात मारता येतो. गावपातळीच्या नेतृत्वाचे कसब हे तालुक्यातील सत्ताधाऱ्यांशी बांधिलकि ठेवणे, त्यात बदल होऊ लागला तर जी बाजू जिंकेल त्या बाजूस राहणे, या हिशेबात चूक झाली तर चपळाईने बाजू बदलून घेणे हे ज्याला जमत नाही तो आयुष्यातून उठू शकतो.
तालुक्याचे राजकारण म्हणजे जिल्ह्याच्या पुढाऱ्यांविषयी अटकळ बांधणे, जिल्ह्याचे राजकारण म्हणजे मुख्यमंत्र्याचा अंदाज बरोबर घेणे आणि राज्य पातळीवर यशस्वी होणे म्हणजे दिल्लीत कुणाची सत्ता चालेल याचे वेध अचूकपणे घेणे. वरच्या लाथा झेलायची तयारी ठेवली की खाली लाथा मारण्याची आपोआपच मुभा मिळते. अशा व्यवस्थेत दिल्लीच्या पातशहाचा होरा बरोबरा मांडणारा पुढारीसुद्धा सहज प्रतिछत्रपती म्हणून निवडून जातो.
फिरून एकदा रयतेची स्थिती केविलवाणी झाली आहे. लुटारूंच्या फौजा त्यांच्यावर चालून येत नाहीत, त्यांची चिजवस्तू हत्याराच्या बळाने लुटून नेत नाहीत, बायकांची अब्रू डोळ्यादेखत घेत नाहीत आणि सरसहा कत्तल करत नाहीत हे खरे! पण आधुनिक युगातील दीड दांडीचा तराजू हा मध्ययुगातील तलवारीपेक्षा जास्त प्रभावीपणे लुटीचे साधन बनतो. शेतकऱ्यांची लूट होतेच आहे. ते कर्जबाजारी बनतच आहेत. दैन्याने जगतच आहेत. चेअरमन, आमदार लोकांच्या समोर गावागावात पोरीबाळींची अब्रूही काही सुरक्षित नाही. थोडक्यात १८८३ साली हिंदुस्थानात 'एकमय लोक' या अर्थाने राष्ट्र अस्तित्वात नाही असा टाहो जोतिबा फुल्यांनी फोडला होता. ते 'एकमय लोकराष्ट्र' अजूनही तयार झाले नाही.
रामदेवरायाच्या आधी लुटारू देशी होते नंतर ते यावनी झाले. मग ब्राह्मणी झाले त्यानंतर फिरंगी झाले. विलायती टोपीवाले गेले आणि खादीटोपीवाले आले. राज्यकर्त्यांचे चोरांची टोळी हे स्वरूप मात्र कायमच राहिले.शेतकऱ्यांच्या प्रश्नाचा रोख हा इतका जूना आहे. तळागाळाशी जाऊन शेतकऱ्यांतून सैनिक तयार करून स्वराज्य तयार करण्याचा प्रयत्न एक शिवाजीराजांनी तयार केला. तो प्रयत्न अल्पजीवी ठरला. कारण शेतकऱ्यांचा असा काळ अजून आलेला नसावा. आज चारशे वर्षांनंरतही शिवाजीराजांनी जो प्रश्न सोडण्याचा प्रयत्न केला तोच प्रश्न आ वासून उभा आहे. तो सोडविण्याचा मार्ग शिवाजी राजांनी दाखवून दिला. अशी राज्यव्यवस्था तयार करायची की जिचा मुख्य हेतूच रयतेचे सुख हा आहे, जी व्यवस्था शेतीच्या विकासाला मदत करेल आणि त्यातून पूरक व्यापार उद्योगधंदे यांची वाढ घडवून आणेल. राज्यकर्ते इतिहासात सदैव रयतेला लुटणाऱ्यांचे नायक राहिले. रयतेचा पहिला नायक शिवाजीराजा.
आजही पुन्हा तळागाळात जाऊन नवे येसाजी कंक, तानाजी मालुसरे एकत्र करण्याची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांच्या लुटारूंवर जरब सवून 'एकमय लोकराष्ट्र' उभे करायचे आहे. सामान्य रयतेच्या सुखाचा महाराष्ट्र धर्म देशभर न्यायचा आहे. हे काम करण्याकरिता पुन्हा एकदा शिवाजी राजांसारख्या अवतारसदृश पुरुषाचीच गरज आहे. नव्या स्वराज्य संस्थापनेची पूर्वतयारी 'शेतकरी संघटना' करीत आहे. कलियुगात संघटना हीच शक्ती असते. सतराव्या शतकातील धीरोदात्त नायकाचे काम आज शेतकऱ्यांच्या संघटनांकडे आल्याची चिन्हे जागोजाग दिसत आहेत. या वेळी शिवाजी राजे नीट समजून घेतले तर तीन शतकांच्या अवधीनंतर तरी त्यांचे स्वप्न साकार होण्याची शक्यता तयार होईल नाहीतर फिरून एकदा शेतकऱ्यांच्या स्वराज्याची आशा मालवून जाण्याचा धोका आहे.