शेतकऱ्याचा असूड/पान १९
असो. आतां आपल्या सरकारास अक्षरशुन्य अज्ञानी शूद्र शेतकर्यांचे निकस झालेल्या शेतांची सुधारणा करण्याविषय़ीं उपाय सुचवितों ते -- आमच्या दयाळू सरकारनें एकंदर सर्व शेतकर्यांस युरोपियन शेतकर्यांसारखें विद्याज्ञान देऊन, त्यांस त्यांसारखीं यंत्नद्वारें शेतीं कामें करण्यापुरती समज येईतोंपावेतों एकंदर सर्व गोर्या लोकांसह मुसलमान वगैरे लोकांनीं हिंदुस्थानांतील तूर्त गायार्बलांसह त्यांचीं वासरें कापून खाण्याचें ऐवजीं, त्यांनीं येथील शेळयाबकरीं मारून खावींत; अथवा परमुलखांतील गायाबैल वगैरे खरेदी करून येथें आणून मारून खावे, म्हणून कायदा करून अमलांत आणल्याशिवाय,येशील शूद्र शेतकर्यांजवळ बैलांचा पुरवठा होऊन त्यांना आपल्या शेतांची मशागत भरपूर करतां येणार नाहीं व त्यांजवळ शेणखताचा पुरवठा होऊन त्यांचा व सरकारचा फायदा होणें नाहीं. एकंदर डोंगरपर्वतावरील गवतझाडाच्या पान फुलांचें व मेलेल्या कीटक श्वापदांचे, मांसहाडांचें कुजलेलें सत्व, वळवाच्या पावसानें धुपून पाण्याच्या पुराबरोबर बाहन ओढयाखोडयांत वायां जाऊं नये, म्हणून आमच्या उद्योगी सरकारनें सोयीसोयीनें काळयागोर्या लष्करासह पोलीसखात्यांतील फालतु शिपायांकडून जागोजाग तालीवजा बंधारे अशा रितीनें बांधावे कीं, वळवाचें पाणी एकंदर शेतांतून मुरून नंतर नदीनाल्यास मिळावें, असें केल्यानें शेतें फार सुपीक होऊन एकंदर सर्व लष्करी शिपायांस हवाशीर जाग्यांत उद्योग करण्याची संवय लागल्याबरोबर त्यांस रोगराईची बाधा न होतां बळकट होतील. त्यांनीं दररोज एक आणा किंमतीचें जरी इमानेंइतबारें काम केलें, तरी सालदरसाल पंचवीस लक्षांचे वर सरकारजवळ स्थावरमत्तेंत भर पडणार आहे. कारण हल्लीं आमचे खबरदार सरकारजवळ पोलीसखात्यासह पलटणी शिपाई सुमारें दोन लक्ष आहेत. त्याचप्रमाणें आमच्या दयाळ सरकारनें एकंदर सर्व डोंगरटेकडयांमधील दर्याखोर्यांनीं तलावतळीं, जितकीं होतील तितकीं सोयीसोयीनें बांधून काढावींत. म्हणजे त्यांच्या खालच्या प्रदेशांत ओढयाखोडयांनी भर उन्हाळयांत पाणी असल्यामुळें जागोजाग लहानमोठीं धरणें चालून एकंदर सर्व विहिरींस पाण्याचा पुरवठा होऊन, त्यांजपासून सर्व ठिकाणीं बागाइती होऊन शेतकर्यांसहित सरकारचा फायदा होणार आहे. एकंदर सर्व शेतें धूपुन त्यामध्यें खोंगळया पडूं नयेत, म्हणून सरकारनें शेतकर्यांपासून पाणलोटाच्या बाजुनें शेतांच्या बांधांनीं वरचेवर ताली दुरुस्त ठेवाव्यात. आमचे दयाळू सरकारनें आपल्या राज्यांतील एकंदर सर्व शेतांच्या पहाण्या, पाणाडयांकडून करवून, ज्या ज्या ठिकाणीं दोनग्या मोटांचे वर पाण्याचे झ्ररे सांपडतील, असा अदमास निघेल, त्या सर्व जाग्यांच्या खुणा त्या त्या गांवच्या नकाशांनीं नमूद करून केवळ सरकारच्या मदतीशिवाय पाण्याचा मार्ग दाखविणार्या पाणडयासह विहिरी खोदून, बांधून काढणार्या शूद्र शेतकर्यांस लहानमोठीं बक्षिसे सरकारांतून देण्याची वाहिवाट घालावी व एकंदर सर्व नदीनाले व तलावांतील सांचलेला गाळ पूर्वीप्रमाणें शेतकर्यांस फुकट नेऊं द्यावा व ज्या ज्या गावचीं गावरानें आमचे सरकारनें आपल्या "फरिस्टांत " सामील केलीं असतील, तीं सर्व त्या त्या मांबास परत करून फक्त सरकारी हद्दींतील सरपण व शेतास राब खेरीज करून, विकण्याकरितां इमारती लांकडें मात्न तोडूं न देण्याविषयीं सक्त कायदा करून, जुलमी फारेस्टखात्याची होळी करावी. खुद्द आमचे खासे सरकारनें परिश्रम करून आपल्या खजिन्यांतून थोडेसे पैसे खर्ची घालून, इतर देशांतील नानाप्रकारच्या उत्तर उत्तर शेळयामेंढरांचीं बेणीं खरेदी करून या देशांत आणून त्यांची येथें अवलाद उत्पन्न केल्याबरोबर येथील एकंदर सर्व शेतांस त्यांच्या लेंडयामुतापासून झालेल्या खतांचा महामूर पुरवठा होऊन शेतें सुपीक होतील व त्यांच्या लोंकरींपासून शूद्र शेतकर्यांस फायदा होईल. आमच्या सरकारी जंगलांतील रानटी जनावरांपासून शूद्र शेतकर्यांच्या शेतांचा बच्याव करण्यापुरत्या गांवठी तोडयाच्या कां होईनात, जुन्या डामीस बंदुका शूद्र शेतकर्यांजवळ ठेऊं देण्याची जर आमचे सरकारची छाती होत नाहीं, तर सरकारनें तें काम आपल्या निर्मळ काळया पोलीस खात्याकडे सोंपवून, त्या उपर शेतकर्यांच्या शेतांचें रानडूकरें वगैरे जनावरांनीं खाऊन नुकसान केल्यास तें सर्व नुकसान पोलीसखात्याकडील वरिष्ठ अंमलदरांच्या पगारांतून कापून अथबा सरकारी खजिन्यांतून शेतकर्यांस भरून देण्याविषयीं कायदा केल्याशिवाय, शेतकर्यांस रात्नीं पोटभर झोंपा मिळून त्यांस दिवसा आपल्या शेतीं भरपूर उद्योग करण्याची सवड होणें नाहीं. यांचेंच नांव " मला होईना आणि तुझें साहिना !" आमचे दयाळू सरकारचे मनांतून जर खरोखर अज्ञानी शूद्र शेतकर्यांचें बरें करून आपली पैदास वाढविणें आहे, तर त्यांनीं सालदरसाल श्रावणमासीं प्रदर्शनें करून आश्विनमासीं शेतपिकांच्या व औतें हाकण्याच्या परीक्षा घेऊन उत्तम शेतकर्यांस बक्षिसें देण्याची वहिवात घालून; दर तीन वर्षांच्या अंदाजावरून उत्तम उत्तम शेतकर्यांस पदव्या द्याब्यात व शेतकर्यांच्या विद्वान मुलांनीं एकंदर सर्व आपलीं शेतें उत्तम प्रकारचीं वजवून, त्यांनीं थोडथोडया लोहारी, सुतारी कामात परीक्षा दिल्यास, त्यांस सरकारी खर्चानें विलायतेंतील शेतकीच्या शाळा पाहण्याकरितां पाठवीत गेल्यानें इकडीक शेतकरी ताबडतोब आपल्या शेतकीची सुधारणा करून सुखी होतील. आमचे नीतिमान सरकारनें जोगतिणी, आराधिणी, मुरळया, कोल्हाटिणी व कसबिणींवर बारीक नजर ठेऊन, त्यांच्याकरितां तालुका-नीहाय लॉक इस्पितळें ठेऊन, मुरळया, कोल्हाटिणी, कसबिणी, तमासगीर, नाटककार, कथाडे वगैरे लोकांनीं कुनीतिपर गाणीं गाऊं नयेत, म्हणून त्यांजवर सक्त देखरेख ठेवून त्यांजला वरचेवर शिक्षा केल्यावाचून अज्ञानी शूद्र शेतकर्यांच्या नीतीसह शरीरप्रकृत्यांमध्यें पालट होणें नाहीं. एकंदर सर्व इलाख्यांतील लष्करी व पोळीसखात्यांनीं शूद्रदि अतिशूद्र शेतकर्यांचा मोठा भरणा असून ते " इजिष्ट " व " काबुलांतील " हिरवट लोकांबरोबर सामना करितांना गोर्या शिपायांच्या पायांवर पाय देऊन मोठया शौर्यानें टकरा देऊं लागतात. एकंदर सर्व शूद्रादि अतिशूद्र शेतकरी आपल्या मुलांमाणसांसह रात्नंदिवस ऊर पिकेतों शेतीं कष्ट करून, सरकारास कर, पट्टया, फंड वगैरे जकातीद्वारें सालदरसाल कोटयाबधि रुपयांचा भरणा करीत आहेत. तथापि शूद्र शेतकर्यांच्या मुलांस शेतकीसंबंधीं ग्रंथ अथवा नेटिव्ह वर्तमानपत्नांतींल शेतकीसंबंधीं सूचनासुद्धां वाचविण्यापुरतें ज्ञान आमच्या धर्मंशील सरकारच्यानें देबबत नाहीं. व शेतकर्यांपैकीं लक्षाधिण कुटुंबास वेळच्या वेळीं पोटभर भाकर व आंगभर वस्त्न मिळण्याची मारामार पडली असून,त्यांच्या सुखसंरक्षणाच्या निमित्यानें मात्न आमचे न्यायाशील सरकार लष्करी, पोलीस, न्याय, जमाबंदी वगैरे खात्यांनीं चाकरीस ठेविलेल्या कामगारांस मोठमोठाले जाडे पगार व पेनशनी देऊन अतोनात दव्या उधळतें, याला म्हणावें तरी काय ! ! ! कित्येक आमचे सरकारचे नाकाचे बाल, काळे गोरे सरकारी कामगारांनीं, हजारों रुपये दरमहा पगार खाऊन तीसपस्तीस वर्षे सरकारी हुद्दे चालविले कीं, त्यांस आमचें सरकार दरमहाचे दरमहा शेंकडों रुपये पेनशने देतें. बहुतेक काळे वगैरे सरकारी कामगार. सरकारी कचेर्यांनीं कामें करण्यापुरते अशक्त, आंधळे बनून खंगल्याचीं सोंगें आणून भल्या भल्या युरोपियन डॉक्टर लोकांच्या डोळयात माती टाकून पेन्शनी उपटून, गोरे पेन्शनर विलायतेस पोबारा करितात व काळे पेनशनरांपैकीं कित्येक, जसे काय आतांच येशू खिरस्त योगी महाराजांनीं मेलेल्यामधून उठविंल्यासारखे तरूण पठ्ठे बनून, मिशांवर कलपाची काळी जिल्हई देऊन म्युनिसिपल व व्यापार्यांच्या कचेर्यांनीं मोठमोठया पगारांच्या चाकर्या पतकरून हजारों रुपयांच्या कमाया करून आपल्या तुंबडया भरीत आहेत. आमचे खबरदार सरकारनें एकंदर सर्व सरकारी खात्यांतील काळे गोरे शिपायांसहित लष्करी डोलीवाले, बांधकामाकडील लोहार, सुतार बिगारी वगैरे हलके पगारी चाकरांच्या पगारांत काडीमात्न फेरफार न करितां बाकी सर्व मोठमोठया काळया व गोर्या कामगारांचे वाजवीपेक्षां जास्ती केलेले पगार व पेन्शनी देण्याचें हळूहळू कमी करावें. सदरीं लिहिलेल्या गोष्टीचा विचार केल्याविना आमचे सरकारचे राज्याचा पाया या देशांत मुस्तकीम होऊन, अक्षरशून्य शेतकर्यांच्या कपाळच्या लंगोटया जाऊन त्यांचे हल्लींचे उपास काढण्याचे दिवस कधींच जाणें नाहींत. सारांश एकंदर सर्व आसूडाच्या प्रकरणांत शूद्रांपैकीं बडे बडे राजेरजवाडे व लहान-सहान अज्ञानी संस्थानिकांच्या व अतिशूद्रांच्या लाजीरवाण्या स्थितीविषयीं बिलकुल वर्णन केलें नाहीं. याचें कारण, पहिले आपल्या पोकळ वैभवामुळें व दुसरे आपल्या दुर्दैवामुळें शूद्र शेतकर्यांपासून ते दुरावले आहेत. याकरिता फक्त येथें मध्यम व कनिष्ठ प्रतीच्या शूद्र शेतकर्यांच्या दैनवाण्या स्थितीविषयीं ठोकळ ठोकळ मुद्यांचें ओबडघोबड वर्णन करून येथील गव्हरनरसाहेबांचे रहाते शहरांत अ गव्हरनर जनरलसाहेबांचें अमलांत, आमचे समुद्राचे पलीकडील खासे विलायती सरकारास कळविलें आहे. याउपर आमचे सरकारांस ब्राह्यणांच्या मुलांनीं शेवटचे पाणी पाजून मुक्त करावें, अशी जर त्यांची इच्छाच असेल, तर त्यांनीं शूद्र शेतकर्यांचीं हाडें गोळा करीत आलेल्या रायलफंडातून सालदरसाल मोठमोठया रकमा खर्ची घालून ब्राह्यणांचे मुलांस विद्वान करण्याची वहिवाट कायम ठेवावी. त्याविरुद्ध तूर्त माझें कांहीं म्हणणें नाहीं. परंतु त्यांनीं फक्त शेतकर्यांच्या मुलांस विद्या देण्याची थाप देऊन वसूल करीत आलेला एकंदर सर्व लोकल फंड तेवढा तरी निदान शेतकर्यांच्या मुलांस मात्न इमानेइतबारें विद्या देण्याचे कामीं खर्ची घालू लागल्यास मी इतके दिवस श्रम केल्याचें फळ मिळालें, असें समजून मोठा आनंद मानीन. परंतु त्यांनीं तसें जर नाहीं केलें, तर ते देवाजीजवळ जबाबदार होतील. आतां प्रथम मी लहान असतांना, माझे आसपासचे शेजारी मुसलमान खेळगडी यांच्या संगतीनें मतलबी हिंदुधर्माविषय़ीं व त्यांतील जातिभेद वगैरे कित्येक खोटया मतांविषय़ीं माझ्या मनांत खरे विचार येऊं लागले, त्याबद्दल त्यांचे उपकार स्मरतों. नंतर पुण्यांतील स्कॉच मिशनचे व सरकारी इन्स्टीटयूशनचे-ज्यांच्या योगानें मला थोडेबहुत ज्ञान प्राप्त होऊन मनुष्यमात्नाचे अधिकार कोणते हें समजलें व ज्या ज्या युरोपियन धार्मिक गृहस्थांनीं त्यांस द्रव्यद्वारें मद्त केली असेल, त्यांचे अ तसेच ज्या इंग्रज सरकारच्या स्वतंत्न राज्यपद्धतीमुळें हे विचार मला निर्भयपणें बाहेर काढितां आले, त्या सरकारचे आभार मानून व या सर्वांच्या आपल्या पुत्नपौत्नांसह बढती होण्याविषयीं आपल्या दधाळू सृष्टीचालक शक्तीची प्रार्थना करून, ती या माझ्या अज्ञानी, अभागी शूद्र शेतकर्यांचे डोळे उघडून शुद्धीवर येण्याविषय़ी त्यांच्या मनांत प्रेरणा करील. अशा उमेदीनें धीर धरून, तूर्त या माझ्या आसुडाचा फटका लागल्यामुळें पाठीमागें वळून कोण कोण पहातो, हें बघत स्वस्थ बसतों.