श्रीग्रामायन/जिल्हा लिहू लागला ! जिल्हा वाचू लागला !


जिल्हा लिहू लागला !
जिल्हा वाचू लागला !


साऱ्या महाराष्ट्रात यंदाची शिवजयंती मोठ्या उत्साहाने साजरी झाली हे खरे; पण प्रतापगडावर १७ एप्रिलला (१९६१) उत्सवाचा जो समारंभ साजरा झाला, तो अनेक दृष्टींनी वैशिष्ट्यपूर्ण असाच म्हणावा लागेल. या समारंभात केवळ शिवरायांची पोकळ स्तुतिस्तोत्रे गाऊन वेळ भागवून नेण्याची दृष्टी नव्हती; तसेच उत्सवापुरत्या जाग्या होणा-या पुढारी मंडळींचा हा काही एक उरूस नव्हता. सारा सातारा जिल्हा साक्षर करण्याच्या पवित्र उद्देशाने जे कार्यकर्ते गेले २-४ महिने अहोरात्र परिश्रम घेत होते, त्यांनी आपल्या कामाची प्रत्यक्ष वानगी येथे थोडीबहुत दाखविली, हे या समारंभाचे विशेष महत्त्व होते. झालेले काम अपेक्षेच्या मानाने फार अपुरे आहे, याची जाणीव ठेवून नव्या उद्दिष्टांच्या प्रतिज्ञाही महाराष्ट्राच्या या तीर्थक्षेत्रावर अनेकांनी घेतल्या, यामुळेही या समारंभाच्या वैशिष्ट्यात अधिक भर पडली. थोडक्यात म्हणजे हा प्रामाणिक कार्यकर्त्यांचा व कर्तव्यदक्ष सरकारी अधिका-यांचा एक मेळावा होता. शिवरायांच्या क्रियाशील जीवनापासून नव्या काळाला अनुरूप असा बोध घेणा-या शिवभक्ताची ही एक कामकाजाची बैठक होती.
 सकाळपासून गडावर उत्सवासाठी मंडळी जमू लागली होती. आसपासच्या सुमारे पन्नास पाऊणशे गावातून तरी लोकांची रीघ लागलेली होती. सकाळीच सनईवादन, भवानी देवीची पूजा, शिवप्रतिमेचे पूजन इत्यादी कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले होते. दुपारी चारच्या सुमारास राज्यपाल श्री. श्रीप्रकाश यांचे आगमन झाले व एकेका वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमाने सभेच्या कामास सुरुवात झाली. सर्वच सभा नवसाक्षरांनी गाजवली. टेकवली येथील नवसाक्षर भगिनी बाबीबाई कोळगणे यांनी अध्यक्षीय सूचना मांडली, तर जावळीचे नवसाक्षर प्रौढ श्री. मोरे यांनी तिला अनुमोदन दिले. स्वागतपर भाषण, अहवालवाचन हे कार्यक्रमही नवसाक्षर मंडळींनीच पार पाडले. महाबळेश्वर कलापथकाचे 'जिल्हा लिहू लागला; जिल्हा वाचू लागला' हे अभिनयगीत तर राज्यपालांनाही फार आवडले. पुढे शेती, अस्पृश्यता, बालसंगोपन, कुटुंब-नियोजन इत्यादी विषयांवर नवसाक्षर भगिनींची भाषणे ठेवण्यात आली होती, तीही ठीक वठली. यानंतर समूहगीतांचा कार्यक्रम. दोन-तीन गीतांपैकी एका गीताने तर सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. अक्षरओळख नसल्याने किती अडचणी उभ्या राहतात याचे वर्णन करताना एक बाई म्हणते-

 ‘पत्र आलं बंधवाचं वाचायला येईना।
 नेऊ कुठे वाचायला वाचनार भेटना ।
 गावाला मी जाते कुण्या मोटारीच समजंना |
 पाटी हाय तिच्यावर वाचायला येईना ।
 साताऱ्या ग शहरामंदि पेट मला घावना ।
 खोलीचा ग नंबरय वाचायला येईना ।

 रात्रीच्या ग शाळा सुरू झाल्या आता गावाला ।'...
समूहगीतांच्या या कार्यक्रमानंतर राज्यपालांच्या शुभहस्ते साक्षरतेची ज्ञानज्योत प्रज्ज्वलित करण्यात आली व शिक्षणाची ही ज्योत जिल्ह्यातील सर्व भागात पोहोचविण्यासाठी उपस्थित अधिकारीवर्गानेही आपापल्या ज्योती ह्यावर प्रदीप्त करून घेतल्या. थेट गावापर्यंत या ज्योतीचा प्रकाश पोहोचावा यासाठी, खेड्यापाड्यांतून आलेल्या असंख्य नवसाक्षर बंधु-भगिनींनी आपापल्या ज्योती प्रज्वलित करून हाती घेतल्या आणि भवानीचे नामस्मरण करून सर्वच उपस्थितांनी 'शिक्षणाची ही पवित्र ज्योत आम्ही अशीच अखंड तेवत ठेवू' अशा अर्थाच्या प्रतिज्ञा घेऊन समारंभाला एक आगळेच गांभीर्य प्राप्त करून दिले. शिक्षणाधिकाऱ्यांनी घेतलेला कामाचा आढावा, राज्यपालांचे समयोचित भाषण, नवसाक्षर प्रौढाने केलेला समारोप, वंदेमातरम् वगैरे नेहमीच कार्यक्रम यापुढे थोडक्यात आटोपल्याने सभेच्या अखेरपर्यंत या गंभीर वातावरणाचा परिणाम कमी झाला नाही. प्रतापगडाच्या पराक्रमी परंपरेला साजेसाच हा नवमहाराष्ट्रातील विधायक कार्यकर्त्यांचा समारंभ होता, एवढे यासंबंधी सांगितले म्हणजे पुरे आहे.

पूर्वीची लादलेली साक्षरता

तसे पाहिले तर साक्षरतेची चळवळ सातारा जिल्ह्यात नवीन नाही. गेली बरीच वर्षे साक्षरतेचे वर्ग तुरळकपणे खेड्यापाड्यांतून चालू होते. पण या वर्गाचे अनुभव फारच निराशाजनक होते. वर्ग भरविण्याची जबाबदारी एकट्या प्राथमिक शिक्षकावर पडलेली होती. बिचारा प्राथमिक शिक्षक 'वर्गास या'म्हणून सर्वांना विनंत्या करून थकून जात असे. मोठ्या कष्टाने जमवलेल्या काही मंडळींना पदरचे रॉकेल तेल जाळून ' ग, म, भ, न' शिकवीत असे. ग्रामस्थांना माणसे जमविणे हे मास्तरांचे कामच आहे असे वाटे, तर जमलेले प्रौढ आपण शिकतो म्हणजे मास्तरावर मोठे उपकारच करतो या भावनेने वर्गातील वागणूक ठेवीत असत. या वर्गाना सामूहिक असे कुठलेच स्वरूप नव्हते. शिक्षणखात्यामार्फत वर्ग चालविण्याबद्दल प्रत्येक नवसाक्षरामागे शिक्षकाला चार रुपये वेतन मिळत असे म्हणून तो काम करीत असे; तर 'मास्तर मागे लागला आहे; अधूनमधून जाऊ या झालं ! बिचाऱ्याचे चार रुपये कशाला बुडवा !' अशा पोक्त विचाराने गावकरीही कधीकधी एकत्र जमत असत. शिक्षकाच्या उत्पन्नवाढीचा एक खाजगी मार्ग, एवढेच या चळवळीचे अखेरचे रूप शिल्लक राहिले होते. म्हणून सर्वत्र निराशा होती; अनास्था होती; चालढकल होती; खोट्या नोंदी होत्या; चळवळ बंदच करून टाकावी अशी मनःस्थिती होती

साक्षरता चळवळीत बदल

वैचारिकदृष्ट्या या अपयशाचे मूळ साक्षरतेच्या कल्पनेत आहे, हे काही विचारवंतांनी दाखवून दिल्यानंतर चळवळीच्या स्वरूपात पुढे हळूहळू बदल करण्यात आला. खेड्यातला प्रौढ केवळ अक्षर ओळख करून घेण्यास फारसा उत्सुक नसतो; परंतु त्याला शेती, आरोग्य, नियोजन इत्यादी उपयुक्त विषयांवर जर चौफेर ज्ञान देण्याची व्यवस्था केली, तर तो आजची अनास्था टाकून आपणहून शिक्षण घेण्यास पुढे येईल, अशा कल्पनेने साक्षरताप्रसार चळवळीला प्रथम ‘लोकशिक्षण' व नंतर 'समाजशिक्षण' चळवळीचे स्वरूप देण्यात आले. साक्षरतेमध्ये अक्षरओळख व लिहिणे-वाचणे एवढ्याचाच समावेश होतो. लोकशिक्षणामध्ये अधिक व्यापकता आहे. लिहिणे, वाचणे व त्याबरोबर इतर सामान्यज्ञान लोकशिक्षणात दिले जाते. परंतु लोकशिक्षणामध्ये एकात्मतेची व सामूहिक ध्येयवादाची बीजे नसल्याने हाही पर्याय अपयशी ठरला व त्यातूनच समाजशिक्षणाचा ध्येयवाद उत्क्रांत झाला. समाजशिक्षणामध्ये व्यक्तिविकासापेक्षा समाजविकासाचे ध्येय पुढे ठेवलेले असते. सामाजिक ध्येयवादाच्या आकर्षणामुळे सारा गाव जागा होईल, 'शिक्षण द्या' म्हणून सुशिक्षितांच्या मागे लागेल व त्यामुळे गावच्या आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक विकासाची चक्रेही वेगाने फिरू लागतील, अशा अपेक्षेने समाजशिक्षणाचे काम हाती घेण्यात आले.
परंतु चळवळीच्या वैचारिक कक्षा विस्तृत झाल्या होत्या, तरी प्रत्यक्ष संघटनेत कसलाही मूलगामी बदल त्याबरोबर घडून न आल्याने साक्षरता-प्रसाराचे वर्ग एवढेच तिचे स्वरूप कायम राहिले होते. गावाला ध्येयवादाची मिठी पडत नव्हती व शिक्षणकार्याला अपेक्षित असा नवीन उठाव काही लाभत नव्हता. जुनेच वळण, जुनेच दळण चालू होते. अवचित घडलेला चमत्कार

अशा रडतखडत अवस्थेत साक्षरतेचे वर्ग तुरळक ठिकाणी चालू असता मध्येच एक लहानसा चमत्कार घडला. हा चमत्कार कोणा एका व्यक्तीने जाणूनबुजून योजनापूर्वक केला असे म्हणवत नाही; तसेच तो करण्यामागील हेतु शुद्ध सामाजिक ध्येयवादाचाच होता असेही निश्चितपणे सांगता येत नाही. कोणत्याही हेतूने का असेना, एक गोष्ट अशी घडली की, कोरेगाव तालुक्यातील ल्हासुर्णे या गावच्या प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकांनी, 'सर्व गाव साक्षर होणार असेल, तर शिक्षकांना या कामासाठी मिळणारी सर्व रक्कम शिक्षक आपणहून गावच्या विकासासाठी देण्यास तयार आहेत,' अशी एक घोषणा एका सभेच्या प्रसंगी करून टाकली. जवळ जवळ १६०० रुपयांचा हा प्रश्न होता. गावकऱ्यांनी हे कार्य मनावर घ्यायचे ठरविले आणि शुक्रवार दि. १० जून १९६० या दिवशी नवलाईदेवीच्या चौकात जी सभा झाली, त्यात सारा गाव साक्षर करून दाखविण्याच्या प्रतिज्ञाही घेण्यात आल्या. नारळ फुटला ; दुसऱ्या दिवसापासून लगेच कामाला सुरुवातही झाली.

आदर्श ल्हासुर्णे गाव

ल्हासुर्ण्याच्या गावकऱ्यांनी कामाची पद्धत मात्र फारच व्यवस्थितपणे बसविली होती. प्रथम गावातील झाडून साऱ्या निरक्षरांची संख्या घेण्यात आली. सुमारे ४०० निरक्षर गावात निघाले. या निरक्षरांसाठी सोयीस्कर ठिकाणी एकूण चौदा वर्ग उघडण्यात आले. स्त्री-पुरुषांचे वर्ग अर्थातच वेगवेगळे होते. वर्ग चालविण्याची जबाबदारी शाळा-शिक्षक व काही सुशिक्षित ग्रामस्थ यांचेवर पडली. प्रत्येक वर्गाचा हजेरीपट ठेवण्यात आला व त्यातील सर्व प्रौढांना हजर ठेवण्यासाठी प्रत्येकी चार-चार ग्रामस्थांची एक, याप्रमाणे चौदा तुकड्या करण्यात आल्या. या तुकड्यांचे सभासद घरोघर जाऊन माणसे वर्गात हजर करीत व वर्ग चालू असेपर्यंत कोणी निघन जाऊ नये, कोणी गावगुंडाने वर्गाला त्रास देऊ नये म्हणून दक्षता ठेवीत असत. या चौदा तुकड्यांवर व एकूण सर्वच वर्गावर लक्ष ठेवण्याचे काम दहा जणांची एक गावसमिती करीत असे. कोणी स्त्री-पुरुष वर्गाला गैरहजर रहात असतील, तर त्यांना भेटून त्यांचे शंकानिरसन करणे, आल्यागेलेल्यांना वर्ग हिंडून दाखविणे व एकूण सर्वसाधारण व्यवस्थेची जबाबदारी घेणे इत्यादी कामे या ग्रामसमितीकडे होती. सारी व्यवस्था गावकऱ्यांनी आपल्याच अक्कलहुशारीने आखली होती, कोणताही पुढारी किंवा सरकारी अधिकारी मार्गदर्शनासाठी त्यांनी आणला नव्हता ही यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट ध्यानात घेण्यासारखी आहे. कलेक्टरांना झालेले दर्शन

व्यवस्था आखून झाल्यावर कामासही तेवढ्याच तडफेने सुरुवात झाली. ल्हासुर्णे हे गाव कोरेगाव स्टेशनपासून दोन मैल अंतरावर येते. शाळेतील काही शिक्षक कोरेगावाहून ल्हासुर्ण्यास रोज येत असतात. वर्ग सुरू झाल्यावर त्यांना रोज दोन वेळा यावे-जावे लागत असे व त्यामुळे चार महिने त्यांना असह्य ताण सहन करावा लागला ही वस्तुस्थिती आहे. गावातच राहणाऱ्या शिक्षकांना तर चोवीस तासही अपुरे पडत. कंटाळा हा शब्दच गावकरी त्यांना उच्चारू देत नसत. रात्री दोन दोन वाजेपर्यंत वर्ग चालू रहात होते. वर्गा-वर्गामध्ये स्पर्धा लागून राहिल्या होत्या. भितीभितींवर म्हणी व बोधवचने लिहिली गेली होती. अधिकाऱ्यांच्या खेपा चालू झाल्या, तेव्हा त्यांना सारा गाव गाण्यांनी, कवितांनी व अभंगांनी अक्षरशः घुमत असल्याचे विलक्षण दृश्य पहावयास मिळाले. प्रत्यक्ष कलेक्टरमजकूर दोन तीन वेळा न सांगता एकदम रात्रीच्या वेळी गावात हजर झाले होते म्हणे! वर्गावर्गातून ते हिंडले. कुठे त्यांना गाणी ऐकायला मिळाली, कुठे एखादी नवसाक्षर महिला धार काढण्यावर भाषण देताना पहायला सापडली, तर एका ठिकाणी कलेक्टरांनाच 'आपली ओळख करून द्या' म्हणून सांगणारी खेडवळ पण शिक्षणाचे वारे प्यालेली एक बाई आढळून आली. चार महिने शिक्षणाचा एक प्रचंड डोह गावात उसळत होता. त्याच्या पवित्र निनादाने येणारे-जाणारे लहानमोठे पाहुणे स्तिमित होत होते. त्याच्या उसळणाऱ्या लाटा आसपासच्या पाच-दहा गावातून तर वाहू लागल्याच; पण सारा सातारा जिल्हाच या लाटांवर स्वार होणार की काय, अशी चिन्हेही दिसू लागली.

ल्हासुर्ण्याने अज्ञानासुर मारला

दि. १० सप्टेंबर या दिवशी या समाजशिक्षण मोहिमेची सांगता झाली. एक हृदयस्पर्शी समारंभ या निमित्ताने गावात घडून आला. गावातील घरांच्या भिंती नव्याने रंगविण्यात आल्या होत्या. रस्ते झाडून स्वच्छ ठेवण्यात आले होते. सडासंमार्जने व रांगोळ्या यामुळे गावाला प्रसन्न शोभेची एक नवीनच झळाळी चढली होती. नवलाई देवीसमोर सभा भरली. शिक्षणाधिकारी श्री. पवार व कमिशनर श्री. मोहिते यांच्यासारखी बड़ी मंडळी पुण्याहून या समारंभासाठी मुद्दाम आली होती. पाहुण्यांना मिरवणुकीने सभास्थानी आणण्यात आले. सर्व सभा नवसाक्षर महिलांनीच चालविली. एकीने अध्यक्षांची सूचना मांडली; दुसरीने तिला अनुमोदन दिले. तिसरीने गाव-शिक्षणाची माहिती दिली. ग्रामपंचायतीच्या कारभाराबद्दल चौथी बोलली. गावाने श्रमदानाने केलेल्या कामाचे निवेदन पाचवीने केले. स्वयंपाकघर कसे असावे हे सहावीने सांगितले. शिक्षणाधिकाऱ्यांनी काहींच्या परीक्षा घेतल्या. तोही कार्यक्रम यथास्थित पार पडला. पुढे ज्ञानदीप प्रज्वलित करून सर्वांनी साक्षरता टिकविण्याबद्दल शपथा घेतल्या आणि पवार-मोहिते यांच्या भाषणांनी सभा संपली. 'कृष्णाने नरकासुर मारला तसा ल्हासुर्ण्याच्या जनताजनार्दनाने अज्ञानासुर मारला! धन्य धन्य ल्हासुर्णे !' हे पवारांचे उद्गार आजही गावकरी येणा-याजाणा-याला मोठ्या अभिमानाने सांगत असतात, एवढा हा समारंभ संस्मरणीय होता, नेत्रांचे पारणे फेडणारा होता.

नव्या मोहिमेची दोन वैशिष्ट्ये

ल्हासुर्ण्याच्या यशामुळे आसपासची कुमठे, शिरढोण, चिमणगाव, पडवळे, सासपडे इत्यादी दहा-पाच गावे भारून गेली व तेथेही समाजशिक्षणाची लाट उसळली हे तर खरेच ; पण या यशाचा मुख्य परिणाम अधिकारीवर्गावर झाला हे विशेष आहे. ल्हासुर्ण्याच्या आदर्शाप्रमाणे साऱ्या जिल्ह्यातच कार्याचा डोंब उसळून टाकण्याचे स्वप्न अधिकाऱ्यांच्या मनःश्क्षुचसमोर तरळू लागले आणि त्याप्रमाणे त्यांनी हालचालींना आरंभही केला. समाजशिक्षणाच्या या नव्या पर्वाची दोन मुख्य लक्षणे होती. यापूर्वी हे कार्य प्रामुख्याने शाळाखात्यामार्फतच जे चालू होते, त्याऐवजी आता सरकारची इतरही खाती आपापला हातभार लावण्यास पुढे सरसावली. शेतकी, पोलीस इत्यादी खात्यांचे सहकार्य जरी अपेक्षित असले तरी वस्तुतः महसूल खात्यानेच शिक्षकांच्या खालोखाल जबाबदारीचा वाटा उचलला हे या पर्वाचे एक वैशिष्टय. तुरळक ठिकाणी समाजशिक्षणाचे वर्ग चालवून जमतील तेवढे निरक्षर साक्षर करण्याचा पूर्वीचा कार्यक्रम बदलून शंभर टक्के साक्षरतेचे, दोन महिन्यात संपूर्ण गावातून निरक्षरतेचे उच्चाटन करण्याचे निश्चित उद्दिष्ट यापुढे डोळ्यांसमोर ठेवण्यात आले, हे या मोहिमेचे दुसरे एक वैशिष्ट्य होते! या उठावाच्या उद्दिष्टामागील प्रेरणा कोणत्या होत्या त्या निश्चित सांगता येत नाहीत. कदाचित् १९६१ च्या जनगणनेच्या वेळी सातारा जिल्हा शिक्षणाच्या दृष्टीने भारतातील सर्व जिल्ह्यात आघाडीवर नोंदला गेला पाहिजे, ही सार्थ प्रादेशिक अभिमानाची प्रेरणा यामागे असेल; किंवा एखाददुसऱ्या अधिका-याच्या वैयक्तिक उन्नतीच्या मर्यादित योजनाही त्याच्या बुडाशी असतील. उद्देश भिन्नभिन्न स्वभावधर्माप्रमाणे भिन्नभिन्न पातळीचे राहणारच. परंतु एक चांगले उद्दिष्ट ठरले व त्याप्रमाणे कामाला आरंभही झाला ही वस्तुस्थिती मात्र स्वच्छ आहे.

गावशिक्षणमोहिमेचा श्रीगणेशा

कवठे या गावी नामदार श्री. मोरारजी देसाई यांच्या हस्ते दि. १ नोव्हेंबर १९६० रोजी गावशिक्षणमोहिमेचा नारळ फुटला. प्रचारसभा हा मोहिमेचा पहिला टप्पा. जवळजवळ सातारा जिह्यातील प्रत्येक गावात सरकारी अधिकारी म्हणा, शिक्षण खात्यातील सेवक म्हणा, एखादा सामाजिक कार्यकर्ता म्हणा, यापैकी कुणीतरी एखादी तरी प्रचारसभा या कालावधीत भरविलेली आढळून येते. सभा घेणाऱ्यांच्या प्रभावी प्रचारतंत्रावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून रहात. शिक्षणाचे सर्वसाधारण महत्त्व, देशाची गरज, इंग्लंड-फ्रान्स-जर्मनीची उदाहरणे या प्रकारच्या मोघम वक्तृत्वाचा काहीही उपयोग होत नसे. पण कोणी जुन्या धार्मिक, ऐतिहासिक स्मृतीचा धागा जोडला, व्यावहारिक दाखले भरपुर दिले, तर असल्या आवाहनांचा चटकन प्रभाव पडे. स्त्रियांच्या एका सभेत प्रचारक सांगतो-'गोकुळअष्टमीचा उत्सव साजरा करता; कृष्णाचा पाळणा सजवता; पाळण्यात नसलेल्या कृष्णासाठी गाणी म्हणता; पण घरातल्या तुमच्या बाळकृष्णाला शिव्याशाप देता, त्याला हिडीसफिडीस करता. शिक्षण घेतले तर खरा बाळकृष्ण घरात आहे, पाळण्यात नाही हे तुम्हाला समजेल व त्याची वाढ कशी करावी हे आपोआप तुमच्या ध्यानात येईल. म्हणून रात्रीच्या शाळेला हजर राहा.' प्रौढ शेतकऱ्यांच्या सभेत हाच प्रचारक म्हणतो, 'वरच्या पांढरपेशा समाजातील मुले चटकन वरच्या वर्गात जातात. त्यांना चांगले गुण मिळतात. तुमचा बाब्या मात्र रखडत राहतो. का? बाब्याजवळ बुद्धी कमी आहे म्हणून नाही; तर शाळा संपल्यावर बाब्याच्या अवतीभवती, घरीदारी शिक्षणाचे वातावरण नाही. त्याला चांगले संस्कार इतर वेळी मिळत नाहीत. पांढरपेशा, सुशिक्षित समाजातील मुलांना या वातावरणाचा फायदा मिळतो म्हणून ती चटकन् पुढे जातात. आपली मुले मागे रहातात. आपल्या मुलांनी पुढे यावे असे वाटत असेल, तर आईबापांनी प्रथम शिकले पाहिजे; घरातील वातावरण सुशिक्षितपणाचे ठेवले पाहिजे. म्हणून शिक्षणाच्या वर्गात सर्वांनी दाखल व्हा. स्वतःसाठी नाही; आपल्या मुलाबाळांसाठी.'

गावसमित्या आणि गृहवर्ग

प्रचार सभेमुळे वातावरण निर्माण झाले की, प्रत्यक्ष कार्याच्या अंमलबजावणीसाठी बहुतेक ठिकाणी ल्हासुर्ण्याच्या वळणावर एखादी गावसमिती नेमण्यात येई. गावची लोकसंख्या, निरक्षरांची संख्या इत्यादी माहिती जमा झाली की, सोयिस्कर पडतील अशा पोटसमित्या स्थापन करण्यात येत. पोटसमित्या व मुख्य समिती यांनी वर्गासाठी जागा निवडणे, दिवाबत्ती, फळे, शिक्षणसाहित्य इत्यादी अवश्य बाबींचा पुरवठा करणे, प्रौढांना वर्गासाठी एकत्र करणे इत्यादी कामे करावीत अशी अपेक्षा होती. वर्ग चालविण्याची जबाबदारी मात्र मुख्यतः शिक्षकांवरच पडलेली होती. ज्या ठिकाणी शिक्षण कमी, निरक्षरता जास्त, तेथे वरच्या वर्गातील मुलांनीही शिक्षणाचे काम केले; शाळेतील मुलांनी घरच्या घरीच वर्ग भरवून घरातील निरक्षरांना शिक्षण देण्यासाठी 'गृहवर्ग' चालविण्याचा प्रयोगही काही ठिकाणी करण्यात आला. साठ दिवसांची हजेरी, जोडाक्षरविरहित अक्षरज्ञान, अंकलिपी एवढी तयारी झाली की, प्रौढ पहिल्या कसोटीला लायक ठरत. परीक्षा घेण्याबद्दल शिक्षकांकडून भाग शिक्षणाधिकाऱ्यांकडे सूचना केली जाई व त्याप्रमाणे अधिकारी गावात जाऊन प्रौढांच्या परीक्षा घेत असत. ज्या ठिकाणी सर्व गावातील निरक्षर स्त्री-पुरुष पहिल्या कसोटीत उत्तीर्ण होत असत, तेथे एखादा, ‘ग्राम गौरव' समारंभ साजरा केला जाऊन त्यात साक्षरता टिकविण्याबद्दल गावर्यांकडून प्रतिज्ञा घेतल्या जात. हा कार्यक्रम म्हणजे गावशिक्षण मोहिमेचा जणू शेवटचा टप्पाच होय.

ग्रामगौरवांचे काही आकडे

ग्रामगौरव पदवीस पोहोचलेल्या गावांची संख्या जिल्ह्यात एकूण २००-२५० च्या घरात असावी. सातारा जिल्ह्यात सुमारे १४००-१५०० गावे येतात. याचा अर्थ शेकडा १० ते १५ या प्रमाणात संपूर्ण गाव साक्षर करण्याची मोहीम सध्या यशस्वी झाली आहे असा होतो. क-हाड, पाटण, कोरेगाव इत्यादी पुढारलेल्या तालुक्यात शेकडा २५ ते ३० टक्के यश पदरात पडलेले आहे, तर जावळी, परळी या भागात तुरळक ठिकाणीच ग्रामगौरव अद्यापपर्यंत साजरे होऊ शकलेले आहेत. पण केवळ ग्रामगौरवांचे आकडे फारसे मार्गदर्शक ठरणार नाहीत. जेथे संपूर्ण गाव साक्षर झालेला आहे अशा काही ठिकाणी तरी ग्रामगौरव समारंभ व्यावहारिक अडचणींमुळ साजरे होऊ शकलेले नाहीत, हे एक कारण ; गाव साक्षर झालेले आहे, परंतु परीक्षा घेण्याची सोय होऊ न शकल्याने त्याची नोंद मात्र ‘साक्षर' म्हणून झाली नाही, हे आणखी एक कारण. दुसऱ्या बाजूला घाईघाईने परीक्षेचे नाटक उरकून ग्रामगौरव पदरात पाडून घेतल्याचे प्रकारही झालेले आहेत; तर एका ठिकाणी गावच्या एकूण लोकसंख्येपेक्षा साक्षर मंडळींची संख्याच अधिक दाखविण्याचा विक्रमही करून दाखविण्यात आलेला आहे !!

तवे, काहिली, कोळसे......

ग्रामगौरव समारंभाच्या आकड्यांवरून या मोहिमेचे यशापयश मोजणे म्हणूनच घातुक आहे. जिल्ह्यात २००-२५० गावे साक्षर झालेलीही असतील. पण या देखाव्याला फारसा अर्थ नाही. अर्थ आहे तो याला की, मोहिमेच्या काळात जिल्ह्यातील बहुतेक ठिकाणी निदान दोन महिने तरी समाजशिक्षणाचे वर्ग उघडण्यात आले व असंख्य ग्रामस्थांनी त्यात भाग घेतला. शिक्षणाचे तुफान दोन महिने या जिल्ह्यात उफाळत होते हे एक सत्य आहे. जावळी या डोंगराळ व मागासलेल्या तालुक्यात, जेथे गाव गाठायचा म्हणजे सात-सात, आठ-आठ मैल पायपीट करावी लागते अशा दुर्गम भागात, एकाकी शिक्षक, रात्रीच्या वेळी, दिव्याच्या मिणमिणत्या उजेडात, प्रौढांना अक्षराची ओळख घडवतो याला काही विशेष मोल आहे. पाटया नाहीत, पेन्सिली नाहीत; फळे नाहीत; अशा वेळी गावकऱ्यांनी गुळाच्या काहिलींचा फळ्यासारखा उपयोग करणे व खडूची उणीव कोळशाने भरून काढून आपला शिक्षणाचा वर्ग चालू ठेवणे, यात काहीतरी नवीन आहे. स्त्रियांनी भाकरीच्या तव्यांचा पाट्यासारखा उपयोग करणे, रानात जाणाऱ्या प्रौढ गुराख्यांनी म्हशींच्या पाठीवर अक्षरे लिहून अभ्यास चालू ठेवणे, लहान मुलांनी आपल्या आई-वडिलांजवळ, काका-मामाजवळ 'शिक्षण घ्या, लिहावाचायला शिका' म्हणून हट्ट धरून बसणे, या दृश्यात चैतन्य नाही असे कोण म्हणेल?

वडाची वाडी......

सायंकाळची वेळ होती. सायकवरून एका ग्रामगौरव साजरा झालेल्या गावाकडे निघालो होतो वाटतेच सोसाट्याच्या वाऱ्याने व त्या मागोमाग आलेल्या वळीवाच्या पावसाने झोडपण्यास प्रारंभ केला. पुढे जाणे अगदी अशक्य झाले, म्हणून वाटेतल्या एका लहानशा वाडीकडे वळलो व देवळात आसरा घेतला. दिवसभर काहीच काम झाले नव्हते ; नवीन काहीच पहायला मिळाले नव्हते आणि ठरलेल्या कार्यक्रमात पावसाने हा व्यत्यय आणला ! मन जरा नाराजच झाले. मग विचार आला, हीच वाडी का पाहू नये ! ठरलेले गाव नाही तर नाही, वाटेवर सहज भेटलेल्या गावात जे दिसेल तेच खरे. म्हणून चौकशीला सुरुवात केली. सगळी कर्ती मंडळी लग्नासाठी बाहेरगावी गेली होती असे समजले. मग होती-नव्हती ती जुनी म्हातारी माणसे देवळात बोलावून घेतली. वर्ग या गावात दोन महिने चालू होता. पुढे बंद पडला; पण पुन्हा चालू व्हावा असे गावकऱ्यांना वाटते. कंदिलाची अडचण पडली असे कोणी म्हणाले. ' कंदिल-रॉकेलसाठी पंचवीस रुपयांपर्यंत खर्च करा, सरकार ती रक्कम देईल, असा कलेक्टरांचा ग्रामपंचायतींना हुकूम असताना ही अडचण का भासावी ?' असा मी प्रश्न केला. पंचायत उदासीन, शिक्षकाला ही सोय माहीत नाही, गावकरी अज्ञानात अशी परिस्थिती. तरीही वडाच्या वाडीला दोन महिने वर्ग चालू होता, ही घटना मला खरी अर्थपूर्ण वाटली. इथे जमलेल्या प्रौढांपैकी एकासमोर सहज मी एक कागदाचा तुकडा टाकला. माझे पेन त्याला दिले. लाजत लाजत, आढेवेढे घेत त्याने आपले नाव माझ्यासमोर कागदावर लिहिले. बाकी सारे तो विसरला होता. पण नाव, गाव पत्ता तरी लिहू शकला. जे पहावयाचे ते पावसामुळे हुकले होते, तरी जे पहायला मिळाले ते काही कमी चांगले नव्हते. शिक्षणाचा मंत्र येथे घुमला होता. येथेही ज्ञानदीपाचा प्रकाश काही काळ उजळला होता. मोहिमेच्या फलश्रुतीचा खरा पुरावा हाच. तो या वाडीने मला दाखविला, म्हणून मी संतुष्ट होतो. पावसाचे आभार मानीत होतो.

 वळिवाच्या सरीने शेती पिकली नाही, तरी सृष्टीचा रखरखीतपणा
 कमी होतो. गावशिक्षणाच्या वळिवाने एवढे कार्य साताऱ्यातील
 माण, फलटण इत्यादी भागातील अगदी उजाड माळरानावरदेखील
 करून दाखविले आहे, यातच मला आनंद वाटत होता.

महत्त्वाचा घटक कमकुवत

या मोहिमेत काम करणारे घटक तीन. प्राथमिक शिक्षक, महसूलखात्याचा सेवकवर्ग आणि गावसमिती. यापैकी प्राथमिक शिक्षकाचे आजचे गावातील स्थान, त्याची नोकरपेशा वृत्ती आणि आर्थिक पातळी या सर्वांचा विचार करता त्याच्याकडून फारच मोठ्या कार्याची अपेक्षा या मोहिमेत बाळगली गेली ही वस्तुस्थिती प्रथम ध्यानात घेतली पाहिजे. वास्तविक हे कार्य स्वतंत्र व समृद्ध व्यक्तित्त्व असणाऱ्या एखाद्या समाजसेवकाचे. केवळ आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या प्रभावाने गावची लोकशक्ती जागी करून तिला विवेकाचे व सुसंस्कारांचे इष्ट ते वळण लावायचे, म्हणजे त्यासाठी 'उत्तम गुणी शृंगारला। ज्ञानवैराग्ये शोभला ।' या कोटीतील एखादा ‘श्रीमंत योगीच ' हवा. त्यामानाने आमचा गावातील प्राथमिक शिक्षक आज कोठे आहे ? आवड म्हणून समाजशिक्षणाचे हे कार्य करणारे दहा शिक्षक काही मला या दौऱ्यात पहायला मिळाले नाहीत. पूर्वी चार रुपये दर नवसाक्षर प्रौढामागे मिळत होते, तेही आता मिळत नाहीत, हीच बहुतेकांची तक्रार! पोटासाठी नोकरी पत्करलेला, अधिकारी दडपू म्हणेल तर दडपला जाणारा, पुढाऱ्यांच्या किंवा गावदादांच्या तंत्राप्रमाणे मागेपुढे करणारा, गावातील दुहींच्या रस्सीखेचीत सर्व बाजूंनी खेचला जाणारा, कुणाशीच वैर नको म्हणून डळमळीत व त्रयस्थ वृत्तीनेच गावाशी संबंध ठेवणारा आमचा हा प्राथमिक शिक्षक ! त्याची इच्छा असली, तरी त्याचा परावलंबी नोकरपेशा आणि गावातील त्याचे स्थान त्याला फारसे प्रभावी कार्य करू देणार नाही हे उघड आहे. भरीस भर म्हणून या मोहिमेच्या कालावधीत जनगणनेचे कामही त्याच्याच अंगावर पडले. समाजशिक्षण, जनगणना किंवा इतर नैमित्तिक स्वरूपाची कामे अंगावर पडली तर, शाळा शिकविण्याची किंवा चालविण्याची नित्याची जबाबदारी शिक्षक व्यवस्थितपणे पार पाडू शकत नाही, अशी वस्तुस्थिती आहे. मोहिम आखताना, तिचे उद्दिष्ट व कालावधी निश्चित करताना, मुख्य घटकाची ही कमकुवत तब्येत आम्ही ध्यानात घेतली होती काय ? अनिश्चित अधिकारक्षेत्रे

केवळ शिक्षक आपल्या जोरावर आजच्या परिस्थितीत हे कार्य करण्यास असमर्थ आहे हे ध्यानात आल्यामुळेच की काय, या मोहिमेत महसुलखात्याने आपला नोकरवर्ग गुंतविण्याचा संकल्प केला. मी पाहिलेल्या चार तालुक्यात केवळ एका तालुक्यातील महसूल अधिकाऱ्यांच्या कामाविषयी शिक्षकांनी समाधानाचे उद्गार काढले. मामलेदार, विकास योजनाधिकारी वगैरे मंडळी या ठिकाणी गावात जात असत. सभा बैठका घेत असत. गावकऱ्यांना वर्गाला हजर रहाण्याविषयी सत्तेने सांगत असत. कर्जमंजुरी, तगाई वगैरे प्रकरणी साक्षरतेचा विचार केला जाईल असा व्यवहारिक लाभालाभाचा चिमटाही काढीत असत. जेथे महसूलखात्याने एवढेच क्षेत्र आपल्यासाठी आखून घेतले, तेथे शिक्षकांचे कामही पुष्कळच सोपे झाले व एकूण यशाचे मापही चढते राहिले. पण बहुतेक ठिकाणी विभागणी नीट झाली नाही. मामलेदारसाहेबांनी मोहिमेची सर्व सूत्रे आपल्या हाती घ्यावीत, तलाठ्याप्रमाणे शिक्षकाला दावणीला जुंपण्याचा प्रयत्न करावा, मग खात्यांच्या अधिकारक्षेत्राविषयी वाद निर्माण व्हावा, त्यातून संघर्ष व शेवटी कामाचा खोळंबा हे प्रकार अनेक ठिकाणी ऐकावयास मिळाले. कुठे रस्त्याच्या कडेला असणाऱ्या गावांना जीपमधून ‘व्हिजीट' देऊन काम केल्याचा देखावा उभा केला गेल्याची परिस्थिती पहावयास सापडली. दोन शेजारी शेजारी असणाऱ्या गावांपैकी एका गावात महसूल अधिकारी वरचेवर येऊन शिक्षणाच्या कामाला चालना देतात आणि दुसऱ्या गावात संपूर्ण मोहिमेच्या कालावधीत महसुलखात्याचा एकही अधिकारी डोकावत नाही, हाही प्रकार नवीनच दिसला. शिक्षणखाते व महसूलखाते यांनी प्रथमच विचारविनिमयाने सहकार्याची एखादी योजना निश्चित केली असती, तर असल्या विसंगती व संघर्षाचे प्रसंग सहज टाळता येऊन कामाला अधिक उठाव देता आला असता. ‘सहकार' हा बोलायला सर्वात सोपा व आचरण्यास सर्वात अवघड असा विषय आहे, याची जाणीव यापुढे आम्ही बाळगणे यासाठीच फार अवश्य आहे.
मोहिमेतील शेवटचा घटक म्हणजे गावसमित्या. गाव करील ते राव करू शकणार नाही ही अगदी वस्तुस्थिती आहे. शिक्षक कितीही तळमळीचा असला, महसूलखात्याच्या सेवकवर्गाने सत्तेचे कितीही दडपण गावावर आणले, तरी जोपर्यंत गावातील जनशक्ती जागी होत नाही तोपर्यंत कोणतेच काम गावात उभे राहाणार नाही आणि राहिलेच तरी ते फार काळ टिकणारही नाही. विकासयोजनांजवळ नाही का आज पैसा मुबलक आहे, हाती सत्ता आहे ? पण गावोगाव इमारती उठविण्यापेक्षा अधिक कोणतेही मूलभूत परिवर्तन या योजना करू शकत नाहीत हे दिसतच आहे. तो नमुना या समाजशिक्षण मोहिमेत होऊ नये, म्हणून गावसमित्या स्थापन करण्याची कल्पना निघाली. कल्पना अगदी स्तुत्य. कारण ल्हासुर्ण्यात सर्व कार्य अशा गावसमित्यांनीच घडवून आणले होते. पण गावात शिक्षणाची लाट उसळल्यानंतर तिला योग्य वळण लावण्यासाठी गावाने आपणहून समित्या स्थापन करणे वेगळे आणि तलाठी मामलेदार यांनी घाईघाईने गावाला भेट देऊन सरपंच-पुढारी पाटील यांची एक नाममात्र समिती स्थापन करून त्यांच्यावर समाजशिक्षणकार्याची जबाबदारी टाकणे वेगळे. ल्हासुर्ण्याचा सांगाडा उचलला; त्यातले चैतन्य मात्र सांडून गेले.

स्त्री जागी झाली पाहिजे

अशा प्रकारे स्थापन झालेल्या समित्या कोणतेच कार्य करू शकणार नाहीत हे उघड आहे. विशेषतः सरपंच, पाटील, पुढारी ही मिरासदार मंडळी समित्यांवर असली म्हणजे त्यांचा तोरा व जुना सरंजामशाही अभिमान काही विचारूच नका ! 'कुलवंताच्या स्त्रियांनी चावडीवर येऊन मास्तरासमोर पाटी-पेन्सिल घेऊन बसायचे ! आमच्या घराण्याच्या परंपरेला हे शोभणार नाही,' ही यांची आतला वृत्ती; आणि ‘गाव शंभर टक्के साक्षर झालाच पाहिजे ; सर्वांनी वर्गाला हजर राहिलेच पाहिजे,' हा या मंडळीचा सभेतील पुकारा ! काय अर्थ आहे या विसंगतीत! असल्या दिखाऊ आवाहनाचा गावावर काहीही परिणाम होत नाही आणि समितीचे जनजागरणाचे कामही केवळ कागदावरच रहाते असा सगळीकडचा अनुभव आहे. उलट ज्या ठिकाणी गावात नैतिक वजन असलेली एखादी म्हातारा बाई किंवा आजोबा यांच्याकडे हे कार्य सहजगत्या सोपविले गेले, तेथे कामाचा उठाव जबरदस्त झाला. विशेषतः एखादी म्हातारी बाईच सारा गाव हलवून सोडते असा अनुभव आहे. ती स्वतः वर्गाला येत नाही, पण प्रत्येक घरातील स्त्री तिच्या धाकाने बाहेर पडते ; घरातील पुरुषमंडळींनाही म्हातारीच्या सांगण्यावरून आपली माणसे पाठवायला काही भय व संशय वाटत नाही. एखाद्या पाटील-तलाठयाने बायामाणसांना वर्गासाठी चला म्हणणे वेगळे आणि म्हातारीने स्वयंपाकघरात उभ राहून, वेळ पडल्यास मुलाबाळांना सांभाळण्याची जबाबदारी स्वतःच पत्करून घरातील स्त्रीला वर्गासाठी बाहेर काढणे वेगळे. आणि एकदा स्त्री जागी झाली की, तेथे विचार रुजलाच म्हणून समजावे. कारण स्त्री कोणतीही गोष्ट मनापासून, प्रामाणिकपणे करीत असते. दिखाऊपणा, मिरविण्याची हौस, मोठेपणाचा हव्यास हे पुरुषी गुणविशेष तिच्याजवळ नसतात. तिचे करणे सहज असते ; नैसर्गिक असते; म्हणनच ते समाजाच्या मुळाशी जाऊन भिडते. गावशिक्षण मोहिमेचा अनुभव हेच सांगतो की, जेथे स्त्री शिकली तेथे लहान मुले सुधारली, घर सुधारले आणि शेवटी गावातही हळूहळू बदल घडत गेला. सामाजिक परिस्थिती

यंत्रणेचा विचार याप्रमाणे थोडाफार केल्यावर 'सामाजिक परिस्थिती' हा यापुढचा विषय. येथे कोरेगाव तालुक्यातील ल्हासुर्ण्याचे उदाहरण घेऊ. संपूर्ण कोरेगाव तालुक्यातून रेल्वेलाईन गेली असल्यामुळे यातील प्रत्येक गावाचा बाहेरच्या जगाशी फार पूर्वीपासून घनिष्ठ संबंध आलेला आहे. अल्पबचत योजनेपासून बालवीर चळवळीपर्यंत सातारा जिल्ह्यात हा तालुका आजवर नेहमीच आघाडीवर राहिलेला आहे. पोलीस व मिलिटरी खात्यात या तालुक्यातून भरती विशेष प्रमाणात होत असल्याने एक प्रकारचे जोमदार वातावरण या तालुक्यातील गावातून नेहमीच पहावयास सापडते. प्रत्यक्ष ल्हासुर्ण्यात आज दर घरटी एक माणूस या खात्यात होता किंवा आहे असे म्हटले तर त्यात फारशी अतिशयोक्ती होणार नाही. एक दिवसाच्या मुक्कामात जमादार, हवालदार ही मंडळी मला कितीतरी भेटली. कोणी काश्मिरात आपण रस्ते कसे बांधून काढले हे सांगतो, कोणी बडोद्याला गव्हर्नराच्या बंदोबस्तासाठी गेलो असता संस्थानचा कारभार कसा होता याची वर्णने करतो; इटली, फ्रान्स, उत्तर आफ्रिका, ब्रह्मदेश, मलाया येथपर्यंतचा मुलूख पायी तुडवून आलेली ही मंडळी ! मिलिटरीतील शिस्त अंगी पक्की भिनलेली. गाव साक्षर करण्याचे एकदा ठरल्यावर मग आगेमागेची भाषाच नाही. सारे मिलिटरीच्या खाक्यात अखेरपर्यत व्यवस्थित पार पडले. हीच परिस्थिती साताऱ्याजवळच्या अपशिंगे या गावची. तेथील गावशिक्षण मोहिमेच्या यशाचे बरेचसे श्रेय या सैनिकी जोमदारपणाला दिले पाहिजे. पण अशी परिस्थिती फार झाले तर अकरांपैकी एखाद्या तालुक्यात, पाचपन्नास गावात! या गावांच्या जोरकस कामांचा अनुभव प्रमाण मानून जिल्ह्यात सर्व इतर ठिकाणी असाच उठाव व्हावा ही अपेक्षा धरणे कितपत योग्य होते? जावळीसारखा दऱ्याखोऱ्यात किंवा झाडाझुडपात दडलेला तालुका वेगळा; फलटणसारख्या संस्थानिक वातावरणात वाढलेल्या तालुक्याची प्रकृती वेगळी; माणसारख्या धनगरांची फिरती वस्ती ( Floating population ) असणाऱ्या तालुक्याचे स्वरूप वेगळे. ही सामाजिक व प्रादेशिक भिन्नता ध्यानात न घेता आखलेली ढोबळ मोहीम शेकडा १० ते १५ टक्के एवढ्या प्रमाणातच यशस्वी होणार यात नवल ते काय ?

फुलेनगर आणि बावधन

भिन्नभिन्न तालुकेच कशाला ! एकाच तालुक्यातील दोन गावांची भिन्नभिन्न परििस्थती व त्यामुळे कामात पडलेली विलक्षण तफावत पहा. एकूण वाई तालुका मध्यम व सर्वसाधारण प्रगतीचा नमुना म्हणून समजण्यास हरकत नाही. वाईजवळच फुलेनगर ही एक वस्ती या मोहिमेत संपूर्ण साक्षर झाली. एकदिलाने गावातील सर्व स्त्रीपुरुषांनी नेटाने शिक्षणाचे काम पूर्ण केले. लहान मुलांना स्वतः सांभाळून पुरुषांनी घरातल्या स्त्रियांना वर्गांना पाठविले, तर रात्री दोन-दोन वाजेपर्यंत वर्गात शिक्षणाचे पाठ घेऊन स्त्रिया पहाटे पुरुषांबरोबर शेतात काम करायला पुन्हा हजर राहिल्या. 'शिक्षणाची ओढ' म्हणून जी म्हणतात ती येथे मूर्तिमंत पहावयास सापडली. काय होते या ओढीचे कारण! गाव सर्व माळी समाजाचा आहे. महात्मा फुल्यांची प्रेरणा येथे जिवंत आहे. गावात कौटुंबिक एकात्मतेची भावना दृढ आहे. ही अनुकूल सामाजिक पार्श्वभूमी लाभली, म्हणून कार्यकर्त्यांच्या व शिक्षकांच्या प्रयत्नांना चटकन यश लाभले व गाव शिक्षणाच्या मोहिमेत पुढे सरकले. जरा चार मैल पलीकडे असणाऱ्या वावधनला चला. दोन नामवंत घराण्यांच्या वैरामुळे गावची हवा कित्येक वर्षे बिघडून गेलेली. येथे ‘सब घोडे बारा टक्के' या न्यायाने समाजशिक्षणाचे कार्य चालू आहे. यश मुळीच नाही. गावात वर्ग सुरूच होऊ शकले नाहीत अशी परिस्थिती. ढोबळ कार्यपद्धतीऐवजी बिथरलेल्या गावची एखादी बारीकशी गरज नेमकी हेरून तेवढी प्रथम भागविणे व हळूहळू लोकमत आपलेसे करून समाजशिक्षणाचा विचार तेथे रुजविणे, हा धीमा मार्ग अशा ठिकाणी कदाचित जास्त उपयोगी पडला असता. मी काय केले असते !‘आज गावात चांगली शाळा आहे. पण विद्यार्थ्यांच्या संख्येच्या मानाने शिक्षक फार कमी आहेत. जे आहेत त्यांपैकी काहींच्या वरचेवर बदल्या केल्या जातात. त्यामळे शिक्षकांकडून शाळेचे काम नीट होत नाही. मुलांचा अभ्यास मागे पडतो'–ही आहे गावकऱ्यांंची मुख्य तक्रार. 'आमच्या मुलांच्या अभ्यासाचा खेळखंडोबा करून आम्हाला सुशिक्षित करण्याचा उलटा धंदा करू नका' असे गावकऱ्यांनी सांगितले तर त्यात त्यांची चूक काय आहे? ही परिस्थिती गावाने शिक्षण अधिकाऱ्यांच्या कानावर अनेकदा घातली. पण उपयोग नाही. शिक्षणखात्याने गावच्या अडचणीविषयी अशा बेफिकिरी दाखविली; गावानेही शिक्षणखात्याच्या समाजशिक्षण मोहिमेचा बोजवारा उडवून लावला. काय साधले यात समाजकल्याण ? शाळेची गरज भागविण्याचा एक टाका मी वेळच्या वेळी घातला असता, तर पुढे ही मोठी हानी सोसण्याचा प्रसंग माझ्यावर आला नसता.

घोडा मागे गाडी पुढे असा आहे सारा तपशिलाचा विचार. अर्थात जर राजकीय पक्ष किंवा रा. स्व. संघ राष्ट्र सेवा दल, बालवीर संघटना इत्यादी सामाजिक संस्थांनी या कार्यात लक्ष घातले असते, तर या तपशिलाच्या अडचणी स्थानिक पातळीवर जेथल्या तेथेच दूर होऊ शकल्या असत्या; पण नाव घ्यावे असे कोणत्याच प्रकारचे भरीव कार्य या मोहिमेत राजकीय पक्षांनी केलेले नाही. मोहीम जी काही थोडीबहुत यशस्वी झाली ती सरकारी नोकरशाहीच्या प्रयत्नामुळे. मुळात नोकरशाही यंत्रणेच्या काही मर्यादा असतात ही गोष्ट ध्यानात घेता, केलेल्या कामाबद्दल सातारा जिल्ह्यातील नोकरशाही धन्यवादास जरूर पात्र आहे. कारण हा एक नवा आदर्श तिने निर्माण केलेला आहे. परंतु कोणतीही समाजविकासाची चळवळ यशस्वी होण्यास निरनिराळ्या सामाजिक शक्तींची एक विशिष्ट जोड जमून यावी लागते. राजकीय पक्षांनी मतभेद विसरून, कार्याचे पक्षातीत स्वरूप लक्षात घेऊन प्रचाराची पहिली आघाडी प्रभावीपणे उघडावयास हवी. सामाजिक संस्थांनी ध्येयनिष्ठ व तळमळीच्या कार्यकर्त्यांचा योग्य तो पुरवठा करून मधली फळी मजबूतपणे सांभाळायला हवी. या पुरोगामी सामाजिक शक्तींनी पादाक्रांत केलेला मुलुख बंदोबस्तात ठेवण्याचे, झालेल्या कामावर पाणी न फिरवता त्यावर सरकारी सहीशिक्क्याचे मोर्तब चढविण्याचे अखेरचे कार्य नोकरशाही यंत्रणेने पार पाडावयास हवे. नोकरशाही नेहमीच पिछाडी सांभाळते, कारण ती समाजजीवनातील सर्वात जड व स्थिरप्रकृतीची संघटना असते. सातारा जिल्ह्यात सामाजिक शक्तींची ही व्यवस्था उभी राहू शकली नाही, हे आहे गावशिक्षण मोहिमेच्या अल्पयशाचे महत्त्वाचे कारण. येथे आघाडीवरचे राजकीय तोफखाने निवडणुकीच्या लढाईला अद्याप एक वर्ष अवकाश आहे या स्वार्थी विचाराने मैदानात उतरलेच नाहीत. सामाजिक व सांस्कृतिक संघटना या आपल्याकडे अर्धवट राजकीय व अर्धवट सामाजिक-सांस्कृतिक अशा बेगडी स्वभावाच्या असल्याने त्यांचे नेमके कार्यक्षेत्र त्यांना केव्हाच सापडत नाही, त्यामुळे त्या येथेही गैरहजरच; मग जडप्रकृती नोकरशाही हालचाल करून करून किती करणार ! मुळातच गाडीपुढे घोडा लागण्याऐवजी घोडा मागे, गाडी पुढे अशी स्थिती. अशा वेळी जी काय दोन-चार पावले वाटचाल होईल, तेवढ्यावरच संतोष मानून घेण्याखेरीज दुसरे काय करणार ?

महाराष्ट्राचे विकास-सूत्र

भारतीय विकासाची जवळजवळ अशीच तऱ्हा चालू आहे. त्यामुळे दोन पंचवार्षिक योजना उलटून गेल्या, तरी भारतीय जनता अद्याप जागी झालेली नाही. कारखाने, धरणे, इमारती उभ्या रहात आहेत. परंतु येथला 'माणूस' मात्र मान टाकूनच वावरत आहे. महाराष्ट्रात नाही म्हणायला थोडी वेगळी परिस्थिती दिसते. संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेमुळे येथे एक वेगळेच चैतन्य जागे झालेले आहे. नवा महाराष्ट्र घडवावा अशी उर्मी येथील लोकमानसात उसळलेली दिसत आहे. सातारा जिल्ह्यातील गावशिक्षण मोहीम हा या ऊर्मीचाच एक लहानसा पुरावा आहे. या ऊमीला नीट आकार देण्याचे कार्य मात्र समाजातील जाणकार मंडळींनी यापुढे 'धर्म' म्हणून स्वीकारले पाहिजे. 'लोकजागृतीतून समाजविकास' हे महाराष्ट्राच्या नव्या विकासाचे मुख्य सूत्र असले पाहिजे. या सूत्राचा अवलंब करून आम्ही पुढे गेलो, तर महाराष्ट्राचीच काय, भारताची भाग्यरेखाही ढळढळीतपणे उमटल्याखेरीज रहाणार नाही. मागचा इतिहास याला साक्षी आहे. इतिहासाची ही पुनरावृत्ती होण्याची अट मात्र एक. येथल्या लोकजागृतीत वर सांगितल्याप्रमाणे एक विशिष्ट संयम व व्यवस्था जमली तर महाराष्ट्राच्या इतिहासाची पाने पुन्हा वेगाने फडफडू लागतील यात मुळीच शंका नाही.

*

जून १९६१


परिशिष्ट एक संपादन

 प्रिय श्री. विठ्ठलराव भोईटे

 स. न. वि. वि.

 आपण वाईहून सातारामार्गे फलटणला बैठकीसाठी येण्याचे ठरविले व मी वाईहून परस्परच फलटणला आलो. मला गाडी मिळाल्याने मी वेळेवर फलटण गाठले. पण लग्नसराईमुळे आपल्याला एस. टी. काही मिळाली नाही. बैठकीला तर दुपारी ३ वाजता हजर राहणे जरूरच होते. आपण सायकल घेतलीत. आणि रणरणत्या उन्हातून २० मैल सायकलपीट करून बैठकीला हजर राहिलात. मी थक्कच झालो आपले कष्ट पाहून! चार-पाच दिवस आपल्यासंबंधी जे जे ऐकत होतो ते खरेच असले पाहिजे असा चटकन प्रत्यय आला. आपण दोन-दोन दिवस अन्नपाण्यावाचून काढता; कामाच्या ओढीमुळे दोन-दोन महिने घराच्या बाहेर असता; कधी झोप आहे तर कधी आलोचन जाग्रण अशी स्थिती ! आपली कष्ट करण्याची ताकद खरोखरच अफाट आहे. कष्टाबरोबरच धडाडी हा गुणही आपल्याजववळ भरपूर प्रमाणात आहे. आपल्या जीवनयात्रेची सुरुवात एक प्राथमिक शिक्षक म्हणून झाली. आज आपण 'विशेष भागशिक्षणाधिकारी' हे पद भूषवीत आहात. धडाडीने अनेक कामे अंगावर घेऊन ती पुरी करायची ही आपली जिद्दच आपल्या आजवरच्या प्रगतीला कारण झालेली आहे. वास्तविक ‘लग्नातला हुंडा' व ' आपण' यांचा परस्पर संबंध काय ? पण पांचगणीला हेडमास्तर असताना आपण तरुण कार्यकर्त्याचे एक मंडळ स्थापन करून त्या भागात हुंडा-प्रतिबंधक चळवळ चालू केलीत असे मी एका ठिकाणी वाचले. काम दिसले की उडी ठोकायची हा आपला देहस्वभावच होऊन बसला आहे.

उत्तर सातारा प्राथमिक शिक्षक बँकेचा कारभार तिच्या अत्यंत आणीबाणीच्या काळात आपण १९५० साली हाती घेतलात आणि पाच वर्षात आपल्या चोख धोरणाने व तळमळीच्या कार्याने ती बँक पूर्ण सुस्थिर पायावर उभी करून दाखवलीत. सारे शिक्षक या कार्याबद्दल आपल्याला मनापासून दुवा देत आहेत. लाकूडकाम किंवा सूतकताई यापेक्षा शेती हा मूलोद्योग प्राथमिक शाळेसाठी अधिक उपयुक्त आहे हे मत आता शिक्षणक्षेत्रात सर्वमान्य होत आहे. पण शाळेसाठी एवढ्या जमिनी आणायच्या कोठून, हा प्रश्न प्रत्यक्ष सरकारलाही मोठा अवघड भासत आहे. परंतु आपण 'शाळेसाठी भूदान' ही चळवळ हाती घेतल्यामुळे आज साताऱ्यातील ६०० शाळांना सुमारे १०००-१२०० एकर जमिनी मिळून त्या शेतीबेसिक होण्याच्या मार्गावर आहेत. यातील दोन-तृतीयांश कार्य केवळ आपले एकट्याचे आहे, हा आपल्या कर्तृत्वशक्तीचा केवढा रोकडा पुरावा आहे ? साक्षरताप्रसार चळवळ तर सातारा जिल्ह्यात प्रथम आपणच उचलून धरलीत. चालू गावशिक्षणमोहिमेतील आपले श्रम व कार्य केवळ अमाप आहे. वाईट इतकेच वाटते की, दरखेपेस आपण केवळ श्रमाचे धनी होता ; यशाचे वाटेकरी होण्याचे भाग्य आपल्याला क्वचितच लाभते.

कदाचित या कटु वस्तुस्थितीची खंत आपल्याला वाटत असेल वा नसेलही. पण माझ्यासारख्या आपल्या दूरच्या मित्राला ती जरूर वाटते. माझ्या मते याचे कारण एकच आहे ; ते म्हणजे आपण अनेक व्याप मागे लावून घेता हेच. शिक्षक बँक, बालवीर चळवळ, साक्षरता प्रसार, शाळेसाठी भूदान, मध्येच काँग्रेसचे राजकारण, भाग-शिक्षणाधिकाऱ्याची नोकरी, शिवाय किरकोळ कामे एवढ्या गोष्टी एकाच माणसाने हाताळणे चूकच आहे. यामुळे सगळीकडे आहे आणि कुठेच नाही अशी आपली अवस्था होऊन बसते. प्राथमिक कष्टाचे कामच आपल्या वाट्यास येते ते याचमुळे. यापेक्षा एखादे क्षेत्र निश्चित करून

ग्रा...२ आपण आपल्या बहुमोल शक्ती या एका क्षेत्रातच वेचल्या असल्या तर केवढे भरीव कार्य आपल्यामागे उभे राहिले असते ? कर्मवीर भाऊराव पाटील, महर्षी कर्वे यांचे आदर्श आपल्यासारखा हाडाच्या सामाजिक कार्यकर्त्याने नजरेसमोर ठेवायचे याचा अर्थ नेमका हाच आहे. राजकारणी माणूस उथळ कामात रस घेणारा असतो. सामाजिक कार्यकर्त्याने 'सखोल कार्य' हेच आपल्या सर्व हालचालींचे मुख्य सूत्र ठेवले पाहिजे. आज सामाजिक कार्यकर्त्यांना समाजात स्थान नाही, राजकारण्यांच्या हातातील खेळणी म्हणून बहुतेक ठिकाणी त्यांचा वापर होतो याचे कारण काय ? मला वाटते आपण सखोल कार्याचे आपले आदर्श विसरलो म्हणून ही पाळी आपल्यावर आली. आपले समाजातील नेमके स्थान आपण सोडले म्हणून मानही गमावून बसलो. पहा पटतो का हा विचार आपल्याला !

पत्र फारच लांबले. जरा मोकळेपणाने लिहिले. राग नाही ना आला ?

कळावे.
आपला
श्री. ग. मा.


परिशिष्ट दोन

प्राथमिक शाळेच्या इमारतीत माझी व एकनाथ भोसले यांची मुलाखत चालू होती. सुविद्य घरंदाजाला लाजवील इतक्या सभ्य शालीनतेने एकनाथराव मी विचारलेल्या प्रश्नांची नेमकी उत्तरे हळू आवाजात देत होते. मिशीला ताव देऊन बोलावे असे केवढे प्रचंड कार्य या अबोल माणसाने नागझरी गावात करून ठेवले आहे ? परंतु आत्मप्रौढीचा लवलेश नाही. मुलाखत संपायच्या वेळी मी विचारले ‘एकनाथराव! आपला फोटो हवा आहे. तो मासिकात मला छापायचा आहे.' गोड शब्दात एकनाथराव उत्तरले, ' द्यायला हरकत नाही ; पण माझा एकट्याचा फोटो छापून आला तर गावाला काय वाटेल ? मी एकट्यानेच मोठेपणा घेतला असे होईल. वास्तविक सगळ्या गावानेच कामे केलेली आहेत.' मी अवाक् झालो. एकनाथरावांचे म्हणणे अगदी अचूक होते! सामुदायिक नेतृत्वाची कला या माणसाजवळ आहे याची साक्षच पटली. दिल्लीतल्या थोर नेत्यांना जे जमत नाही ते या नागझरीतल्या एकनाथला सहज जमून गेले.

नागझरी कोरेगाव तालुक्यात येते. भोसले घराण्यातील मंडळींचा भरणाच गावात विशेष. लोकसंख्या आहे दीड हजार. दहा वर्षांपूर्वी गावात बैलगाडी काही सरळ येऊ शकत नव्हती, इतके गाव आडवळणाचे व डोंगराळ मुलखातले. पण ज्यांची पैशात किंमत एक लाख रुपयापर्यंत जाईल इतकी श्रमदाने गावकऱ्यांनी एकनाथरावांच्या मार्गदर्शनाखाली अद्यापपर्यंत पार पाडलेली आहेत. या श्रमदान कार्याचा तपशील असा :

श्रमदानाची किंमत रु.   कार्य
९,०००      शाळा
७,५००      तालीम
९,०००      समाजमंदिर
१७,५००      दोन पूल
२२,०००      आर्वी-पुसेसावळी ६ मैल रस्ता
९,५००      रस्ते
९,०००      रोड डेम्स.
__________
१,०३,५००

ही कामे वर्गण्या जमवून केलेली नाहीत. खुद्द एकनाथराव ८-८ तास गावकऱ्यांबरोबर कुदळ-खोरे घेऊन प्रत्यक्ष कामाला लागले होते. रस्त्यासाठी गावकऱ्यांनी जमिनी दिल्या, त्याही स्वखुशीने देणग्या म्हणून. त्यांचा सरकारी साराही अद्याप मालकच भरतात. गाव शिक्षण मोहिमेत सर्व गाव साक्षर झाले. निर्मलाराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामगौरव समारंभही साजरा झाला. गावात वाचनालय आहे. दुसऱ्या कसोटीला बसण्याची गावकऱ्यांची तयारी आहे.

एकनाथरावांनी आता एका नवीन जबाबदारी शिरावर घेतली आहे. गावात सहकारी शेती यशस्वी करून दाखविण्याचा त्यांचा मानस आहे. २६ गावकऱ्यांची १२० एकर जमीन एकत्र करून एक जॉईंट फामिंग सोसायटी त्यांनी नुकतीच रजिस्टर केलेली आहे. जमीन सामान्य दर्जाच्याच आहेत. सर्व शेतकरी २-४ एकरवालेच आहेत. एकनाथरावांनी आपल्या ११ एकर जमिनीपैकी ३-४ एकर जमीनी यात गुंतवली आहे.

अंतराने जवळ, पण गुणाने फार फार दूर असणारे शेजारचे आर्वी गाव पाहिले म्हणजे एकनाथरावांची खरी योग्यता ध्यानात येते. पानमळ्यासाठी साऱ्या महाराष्ट्रात महशूर असणारे आर्वी गाव. पैशाने समृद्ध. पण शिक्षण नाही; श्रमदान नाही; सहकार नाही. नागझरीसारखे काहीही नाही. आहेत फक्त भांडणे, व्यसने आणि स्वार्थ. पार मागासलेले. नागझरी सामाजिकदृष्ट्या फार पुढे गेले; आणि पैशाने पुढारलेले आर्वी अद्याप जुन्या वातावरणातच खितपत आहे.

एकनाथरावांचे आदर्श कोणी गांधी नेहरू नाहीत. ते आहेत त्यांच्याच चुलत घराण्यातील एक दिवंगत दानशूर पूर्वज, नागझरीतले कै. धोंडीराम पाटलोजी भोसले. यांनी फार वर्षांपूर्वी नागझरी सोडले व मुंबईत फोर्टमध्ये खोक्याचा एक कारखाना काढला. सुदैवाने धंद्यात बरकत आली. पण कै. धोंडीराम नागझरीला विसरले नाहीत. आपल्या गावातील अनेक माणसांना त्यांनी कारखान्यात उद्योग तर दिलाच, पण हळू हळू त्यांचेमार्फत गावच्या विकासाच्या एकेक गरजाही पूर्ण करण्याचा क्रम ठेवला. रयत शिक्षण संस्थेस कै. धोंडीराम भोसले यांच्याकडून अनेक देणग्या मिळालेल्या आहेत. हा घराण्याचा वारसा घेऊन आमचे नाथ भोसले ५०-५१ पासून गावच्या विकासासाठी उभे राहिले आणि गेल्या दहा-बारा वर्षात त्यांनी स्वार्थ आणि परार्थ यांचा योग्य मेळ घालून विकासाचा एक नवा आदर्श सर्वांसमोर ठवला.

*