श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१० ऑगस्ट
१० ऑगस्ट
अनुसंधानीं चित्त । सर्वांभूतीं भगवंत ।
हाच माझा परमार्थ ॥
<poem>
ज्यास पाहिजे असेल हित । त्याने ऐकावी माझी मात ॥
जो झाला रामभक्त । तेथेच माझा जीव गुंतत ॥
मला रामभक्तावीण काही । सत्य सत्य जगी कोणी नाही ॥
जीवाचे व्हावे हित । हाच मनाचा संकल्प देख ॥
तुम्हास सांगावे काही । ऐसे सत्य माझेजवळ नाही ॥
पण एक सांगावे वाटते चित्ती । रघुपतीवीण शोभा नाही जगती ॥
मुलगी सासरी गेली । तिची काळजी सासरच्याला लागली ।
तैसे तुम्ही माझे झाला । आता काळजी सोपवावी मला ॥
सदा राखा समाधान माझा आशीर्वाद पूर्ण ॥
मी तुमची वेळ साधली । हा ठेवा मनी विश्वास । आनंदाने राहावे जगात ॥
अंतकाळची काळजी । तुम्ही कशाला करावी ? ॥
व्यवहार मी सांभाळला । तरी पण रामाला नाही दूर केला ॥
राम सखा झाला । नामी धन्य मला केला ॥
मी तुम्हास म्हटले आपले । याचे सार्थक करून घेणे आहे भले ॥
नामापरते न माना सुख । हाच माझा आशीर्वाद ॥
मला माझे बोल सत्य । कृपा करील खास भगवंत ॥
मी असो कोठे तरी । मी तुम्हापासून नाही दूर । याला साक्ष रघुवीर ॥
तुमचे आनंदात माझे अस्तित्व जाण । दुःखी होऊन न करावे अप्रमाण ॥
तुम्ही माझे म्हणविता । मग दुःखी कष्टी का होता ? ॥
उपाधीवेगळे झाला । ऐसे ऐकू द्यावे मला ॥
माझे ज्याने व्हावे । त्याने राम जोडून घ्यावे ॥
दृश्य वस्तूचा होतो नाश । याला मीही अपवाद नाही खास ॥
शेवटी मागणे तुम्हा एकच पाही । नामावाचून दूर कधी न राही ॥
अनुसंधानी चित्त । सर्वांभूती भगवंत ।
नामी प्रेम फार । त्याला राम नाही दूर ॥
मी सांगितल्याप्रमाणे वागावे । राम कृपा करील हे निश्चित समजावे ॥
आता आनंदाने द्यावा निरोप । हेच तुम्हा सर्वांस माझे सांगणे देख ॥
सदा राहावे समाधानी । नको सुखदुःख काळजीचा लेश । माझा झाला जगदीश ।
हा भाव ठेवा निरंतर । राम साक्षी, मी तुम्हापासुन नाही दूर ॥
सर्वांचे करावे समाधान । जे माझे प्राणाहून प्राण जाण ॥
सर्वांनी व्हावे रामाचे । हाच माझा आशीर्वाद घेई साचे ॥
जगाचे ओळखावे अंतःकरण । तैसे आपण वागावे जाण ॥
नामापरते दुजे न मानावे । एका प्रभूस शरण जावे ॥
हा करावा उपाय । तोच समाधानाला नेईल खास ॥
विवेक-वैराग्य संपन्न । सदा असो अंतःकरण ॥
अखंड घडो भगवद्भक्ति । आत्मज्ञानप्रतीति ।
ब्रह्मस्वरूपस्थिती । नामी निरंतर जडो वृत्ती ॥
मी आहे तुमच्यापाशी हा ठेवावा निर्धार । न सोडावा आता धीर ॥
सुखाने करा नामस्मरण । कृपा करील रघुनंदन ॥
हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. |