श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१० सप्टेंबर

१० सप्टेंबर

रामापायीं ठेवा मन । नाम घ्यावें रात्रंदिन ॥

<poem>

राम हा तारक मंत्र निराकार । जपा वारंवार हेचि एक ॥

हेचि एक करा राम दृढ धरा । पुनरपि संसारा येणे नाही ॥

येणे नाही पुन्हा सांगितली मात । जानकीचा कांत आळवावा ॥

पार्वतीरमण जपे रामनाम । विषयाचे दहन तेणे झाले ॥

दीनदास म्हणे वाल्मीक तरला । पापी उद्धरीला अजामेळ ।

जयासी लागला रामनामचाळा । आठवी गोपाळा सर्वकाळ ॥

सर्वकाळ मति संतांचे संगती । जोडिला श्रीपति येणे पंथे ॥

तिन्ही लोकी श्रेष्ठ रामनाम एक । धरूनि विवेक जपे सदा ॥

हनुमंते केले लंकेसी उड्डाण । रामनाम ठाण हृदयामाझी ।

दीनदास म्हणे वानर तरले । नामी कोटि कुळे उद्धरती ॥

रामनामाविणे साधन हे जनी । बरळती प्राणी स्वप्नामाजी ॥

स्वप्नीचा विचार तैसा हा संसार । सोडुनि असार, राम ध्यावा ॥

रामनामध्वनी उच्चारिता वाणी । पापाची ते धुनी होय तेणे ॥

सिंधूचे मंथन रत्‍नांची खाण । तैसे हे साधन रामनाम ॥

वेदाचेही खंड योगाचे ते बंड । त्याचे काळे तोंड, दास म्हणे ॥

मन हेचि राम देही आत्माराम । जनी मेघश्याम पाहे डोळा ॥

पाहूनिया डोळा स्वरूपी मुरावे । वाचेसि असावे रामनाम ॥

नारायणनामे प्रल्हाद तरला । अजामिळ झाला एकरूप ॥

एकरूप झाले वसिष्ठ महामुनि । तया चापपाणि वश झाला ॥

दीनदास म्हणे स्मरे । संसाराची चिंता त्यासी नसे ॥

जनी जनार्दन रामाचे चिंतन । सत्याची ही खाण रामनाम ॥

गाईचे रक्षण भूतदया जाण । अतिथीसी अन्न घाला तुम्ही ॥

संताचा संग विषयाचा त्याग । रामनामी दंग होऊनिया राहे ॥

राम कृष्ण हरि एकचि स्वरूप । अवताराची लीला वेगळाली ॥

दिनदास सांगे लावूनिया ध्यान । तुम्ही आत्मज्ञान जतन करा ॥

यत्न परोपरी साधनाचे भरी । आवळे घेता करी तैसे होय ॥

तैसे होय, म्हणुनी करा, त्याग । साधावा तो योग रामनामे॥

रामनामी आस ठेवूनिया खास । वृथा न जाय श्वास ऐसे करा ॥

ऐसे करा तुम्ही संसारा असता । वाया आणिकपंथा जाऊ नका तुम्ही । येतो आता आम्ही, कृपा करा ॥

शेवटची विनवणी ऐका तुम्ही कानी । संसारजाचणी पडू नका ॥

रामपाठ तुम्हा सांगितला आज । आणिकाचे काज नाही आता ॥

नित्यपाठ करी माणगंगातीरी । होसी अधिकरी मोक्षाचा तू ॥

ब्रम्हचैतन्य नाम सद्गुरूचे कृपे । दीनदास जपे राम सदा ॥



हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.