श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/११ ऑक्टोबर
११ ऑक्टोबर
भगवंताजवळ 'वास' ठेवल्यावर वासना राहातच नाही.
एखादा मनुष्य दुष्ट निघाला, तर 'मागच्या जन्मी तो कसाब असेल' असे आपण म्हणतो, पण हे बरोबर नाही. मनुष्याला वासनेनेच जन्म येतो, कर्माने नाही. म्हणूनच कर्म टाळायचे नसते, त्याच्यामागची वासना टाळावी लागते. कर्म हे केव्हाही बाधक ठरत नाही, तर कर्माचा हेतू बाधक ठरतो. अधिकार्यापुढे शिपाई चालतो आणि कैद्याच्या पुढेही चालतो. परंतु यामध्ये जो फरक आहे, तोच संताच्या आणि आमच्या वासनेत आहे. आम्ही वासनेचे खत विषयाला घालतो आणि विषयांतच गुंतून राहतो. वासनेचा क्षय सत्संगाशिवाय नाही होणार. संगतीने मनावर परिणाम घडतो. वासना ही दुसर्या कोणत्याही उपायांनी तृप्त होण्यासारखी नसून, आपण भगवंताजवळ 'वास' ठेवला तरच ती नष्ट होते. 'वासना' म्हणजे 'विषयाजवळचा वास ना - म्हणजे नको.' सकाळपासून संध्याकाळपर्यंत म्हणजे रात्रीपर्यंत वासनेमुळे सर्व कर्म एकमेकांत गुंतून गेले आहेत. म्हातारे आणि तरुण या सर्वांना वासना सारखीच आहे. 'मी आता कंटाळलो' असे म्हटले, तरी वासना आपल्याला सोडीत नाही, आणि देह ठेवतानाही आपली वासना आपल्याबरोबर येते. परमात्मा जसा चिरंजीव आहे, तशी वासना पण चिरंजीव आहे.
वासनेच्या म्हणजे हवेपणाच्या तीन अवस्था आहेत, एक आस, दुसरी हव्यास, आणि तिसरी ध्यास. आस म्हणजे वस्तू नुसती हवीशी वाटणे; हव्यास मध्ये वस्तू नेहमीच आपल्या जवळ असावीशी वाटते आणि ध्यासामध्ये त्या वस्तूशिवाय इतर काहीच सुचत नाही. मोठे झाड तोडायचे असेल तर आपण त्याच्या वरच्या फांद्या आधी तोडतो, नंतर बुंधा तोडतो, त्याचप्रमाणे वासनेचे झाड तोडण्यासाठी त्याच्या फांद्या, म्हणजेच आपले हवे-नको पण, आधी तोडाव्या, आणि शेवटी वासना मारावी. आपल्याला जे मागायचे आहे ते भगवंताजवळच मागावे. त्याने ते नाही दिले, तर ते न देणेच आपल्या हिताचे आहे अशी बुद्धी उत्पन्न होईल. त्यानेच वासना मरेल; आणि वासना नष्ट झाल्यावर बुद्धी भगवद्स्वरूप होईल. काहीही न करता मिळावा इतका का परमार्थ सोपा आहे ? त्याच्यासाठी निदान वाईट वासना तरी मारायला नको का ? आणि चांगल्या वासनासुद्धा नीति आणि धर्माला धरून असतील तेवढ्याच भोगाव्या. श्रीमंतांच्या गरजा मरेपर्यंत भागत नाहीत, कारण त्यांना वासना जास्त असते. काळ हा आपल्याला आशेत गुंतवून ठेवतो, आणि शेवटपर्यंत सुख न देता आपले आयुष्य संपवितो. जो जिवंतपणी वासनारहित राहिला त्याला सुखदुःख नाही. आपण आपल्याच घरामध्ये पाहुण्यासारखे वागावे. असे राहण्याने वासना क्षीण होईल.
हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. |