श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/११ मार्च

११ मार्च

अहंपणा टाकल्यास प्रपंचातील लाभहानी झेलता येईल.



प्रपंच हा परमेश्वरप्राप्तीच्या आड कधीही येऊ शकत नाही. आपण पाहतोच की प्रपंचात आपला कितीतरी लोकांशी निरनिराळया स्वरूपांत संबंध येतो. आईवडील, बायकोमुले, बहीणभाऊ, इतर सगेसोयरे, मित्र आणि इतर जन, या सर्वांचा उत्तम उपयोग करायचा असेल तर या सर्वांशी व्यवहार करताना आपण आपली सर्व कर्मे एका हरिस्मरणाच्या धाग्यात जोडून करावीत, म्हणजे सर्वांशी संबंध सलोख्याचे राहून प्रपंच फारच सुखकर होईल; निदान तो तापदायक तरी खचित होणार नाही. या सर्वांशी संबंध बिघडायला आपला अभिमान, अहंपणा, विशेषकरून कारणीभूत होत असतो. हा अभिमान श्रीमंतालाच असतो असे नव्हे तर गरिबालाही तो सोडत नाही. आपण पुराणात वाचले आहेच की, हिरण्यकश्यपूला जेव्हा भगवंतांनी मांडीवर घेऊन पोट फाडायला सुरूवात केली, तेव्हा त्याचा हात अभिमानाने तलवारीकडे गेला, प्रत्यक्ष भगवंत समोर असूनही त्याने काही हात जोडले नाहीत. केवढा हा अभिमानाचा जोर. गरीब लोकसुद्धा या अभिमानाच्या आहारी किती गेलेले असतात. एकदा एक भिकारी एकाच्या दाराशी येऊन भिक्षा मागू लागला, तेव्हा तो गृहस्थ त्या भिकाऱ्याला म्हणाला, 'अरे. तुला काही काळवेळ समजते की नाही ?' त्यावर तो भिकारी म्हणाला, 'जा जा. मला काही तुमचे एकटयाचेच घर नाही, गावात अशी शंभर घरे आहेत.' पाहा, अभिमानाचे तण किती खोल गेलेले असते. अभिमान हा शेतात उगवणाऱ्या हरळीसारखा आहे. ही हरळी समूळ नाहीशी केल्याशिवाय चांगले पीक हाती लागत नाही, त्याप्रमाणे, अभिमान संपूर्णपणे नाहीसा झाल्याशिवाय परमेश्वरी कृपेचे पीक येणे शक्य नाही. फणस चिरताना एक काळजी घ्यावी लागते; हाताला तेल लावून तो कापावा लागतो आणि त्यातले गरे काढावे लागतात, म्हणजे हाताला चिकाचा त्रास न होता गरे चटकन्‌ निघतात. त्याप्रमाणे, नाम घेऊन प्रपंचात व्यवहार केला, तर अभिमानाचा किंवा विषयवासनांचा चीक न लागता परमेश्वरी कृपेचे गरे हस्तगत करता येतात. हा अहंपणा, हा देहाभिमान टाकला तर प्रपंचातली लाभहानी हसतखेळत झेलता येईल. लहान मुले पावसाळयात कागदाच्या लहान लहान होडया करून पाण्यात सोडतात, त्यांतली होडी तरली तरी हसतात, बुडाली तरी हसतात; त्याप्रमाणे प्रपंचातली सुखदुःखे हसतखेळत झेलावीत; आणि हे एका नामानेच साधते.


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.