श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१२ ऑगस्ट

१२ ऑगस्ट

शांति परमात्मस्मरणाने मिळते.


नवविधा भक्तीत जशी श्रवण ही पहिली भक्ती, तद्वतच अनेक संतलक्षणात शांती हे पहिले लक्षण आहे. वास्तविक संतांची लक्षणे सांगता येणे कठीण. तरी पण असे म्हणता येईल की शांती हे संतांचे मुख्य लक्षण आहे. पृथ्वी ही क्षमा-शांतिरूप आहे. त्याप्रमाणेच संत असतात. शांती ढळायला बाहेरची परिस्थिती कारण नसून अंतःस्थिती हीच कारण आहे. जिथे स्वार्थ तिथे अशांती. भगवंताहून मी निराळा अशी जिथे द्वैत-भावना, तिथे खरी शांती नाही. अनन्येतेने शांती प्राप्त होते, आणि तीच परमार्थाचा पाया आहे. पैसा आणि लौकिक अशाश्वत आहेत. त्यांच्यात चित्त ठेवल्याने अशांतीच येणार. शांती बिघडायला दोन कारणे आहेत: एक: गत गोष्टींचा शोक, आणि दुसरे: पुढची चिंता. आपल्या बाबतीत घडणारे मागले आणि पुढले हे दोन्ही ईश्वराधीन आहेत अशी दृढ समजूत झाली तर शांती बिघडणार नाही. आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे सदाचरण. सदाचरण नसेल तर शांती कधीही येणार नाही; पश्चाताप करण्याची पाळी येईल. म्हणून प्रत्येक कर्म भगवंताच्या साक्षीने करावे. भगवंताला साक्षी ठेवून कर्म केले तर हातून दुष्कर्म होणार नाही. सदाचरण हा परमार्थाचा पाया आहे.

आपली शांती परिस्थितीवर अवलंबून नसावी. एका साधूला कुणीतरी शेतात झाडाखाली आणून ठेवले. तो तेथे स्वस्थ बसून नामस्मरण करीत असे. तिथे लोक त्याच्या दर्शनाला येऊ लागले. लोकांची ये-जा वाढल्यामुळे त्या शेताच्या मालकाला त्रास वाटू लागला, म्हणून त्याने त्या साधूला उचलून दुसरीकडे ठेवले. साधुची शांती पूर्वीच्या स्थळी होती, तशीच दुसर्‍या ठिकाणीही कायम होती. शेतमालाकाला आश्चर्य वाटले. ज्याचे मन शांत आणि चिंतारहित असते त्याला कुठेही ठेवा, तो शांतच राहणार. म्हणून भगवंतावर विश्वास ठेवून स्वस्थ बसावे. त्याच्यावर भार घालून प्रपंच करावा. कर्तेपण आपल्याकडे घेऊ नये. अकर्तृत्वभाव ठेवावा. अशाने शांती येईल. जगच्चालक राम आहे ही भावना दृढ झाली तर शांती येईल. एकनाथांची शांती अगाध होती. नाथांसारखी शांती यायला परमभाग्य पाहिजे. राजेरजवाडे आले आणि गेले, पण ज्ञानेश्वरांचे नाव टिकले, कारण ते शांतीची मूर्ती होते. ही शांती काय केले असताना मिळेल ? भगवत्स्मरणावाचून अन्य उपायाने ती साधणार नाही. जे जे घडते ते ते भगवद्‌इच्छेने घडते ही दृढ भावना असणे, हेच शांतीचे लक्षण आहे. कर्तृत्वाभिमान शांतीच्या आड येतो. विद्या, वैभव, कला, संपत्ती, संतती, याने शांती येतेच असे नाही. निरपेक्षता हे शांतीचे मूळ आहे. मनाविरूद्ध गोष्ट घडल्यानंतर लगेच भगवंताची आठवण करावी म्हणजे आपोआप शांती येईल. मनातली शांती कायम ठेवून रागावता येते. तसे केल्यास हातून प्रमाद घडत नाही.


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.