श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१४ मे
१४ मे
विषयाची व लौकिकाची आस सोडावी.
आपण रामाचे झालो म्हणजे आपली काळजी त्याला लागते. आपण रामाचे व्हायला अडचण आमचीच. आवडच मुळी आपण विषयाची आणि लौकिकाची ठेवतो. साहजिकच, एकाची आसक्ति ठेवल्याने दुसर्याची विरक्ति येते. नोकरीच्या वेळेस आम्ही बायकामुलांना बाजूला सारून कामावर जातो ना ? मग साधनेच्या वेळी बायकोमुले आड येतात हे कारण का सांगावे ? बायको आणि पैका या दोन गोष्टी आमच्या आड येत असतात; असे आजवर अनेक संतांनी सांगितले. मग या निर्माण तरी का केल्या असे कोणी विचारतील. त्याला उत्तर म्हणजे, काड्याच्या पेटीने विस्तवही पेटविता येतो आणि घरही जाळता येते; त्याचा जसा आपण उपयोग करावा तसा तो होतो. खरे म्हणजे आम्हाला भगवंताची तळमळच लागत नाही. एकजण मला म्हणाला की, "मला प्रपंच टाकावासा वाटतो." मी त्याला म्हटले, "नुसता प्रपंच टाकण्याने तुला वैराग्य कसे येईल ? वैराग्याला नेहमी विवेकाची जोड लागते. तू आपला मीपणा टाकलास तरी खूप झाले. "
चांगले कर्म आड येत नाही असे थोडेच आहे ? वाईट कर्म कुणाला सांगण्याची तरी आपल्याला लाज वाटते, पण सत्कर्म अभिमानाने ज्याला त्याला सांगत सुटतो. 'मागील जन्मी पाप केले होते म्हणून या जन्मी हे भोगतो' असे म्हणतो; आणि 'आता चांगले कर्मे करतो म्हणजे पुढल्या जन्मी सुख लागेल' असे म्हणतो. म्हणजे जन्ममरण्याच्या फेर्यातून सुटण्याऐवजी त्याच्यात गुंडाळले जाण्यासारखेच झाले ! दुष्कर्मामुळे पश्चात्ताप होऊन एकदा तरी भगवंताची आठवण होईल; परंतु सत्कर्माचा अहंकार चांगल्या माणसालाही कुठे नेऊन सोडील याचा पत्ता लागणार नाही.
राजासुद्धा योग्य मार्ग दाखविण्यासाठी आपल्या संगतीला चांगला माणूस ठेवतो. भगवंताने उद्धवालाही 'सत्समागम कर' म्हणून सांगावे, याहून अधिक काय पाहिजे ? कडू कारले खाल्ले तर कडूपणाचीच प्रचीती होते मग विषयाच्या प्राप्तीने जीवन गोड कसे होईल ? 'प्रेम येईल तेव्हा भगवंताची भक्ति करीन' असे म्हणू नये. विषयासाठी आपण मरमर काम करतो आणि तेवढे करूनही सुख लाभत नाही' मग भगवंताचे नाव न घेता, प्रेम येत नाही हे म्हणणे किती वेडेपणाचे आहे ! लग्नाआधी मुलीला दहापाच जणांना दाखविली तरी, लग्न झाल्यावर ज्याप्रमाणे त्यांतला एकच नवरा असतो आणि बाकीच्यांची तिला आठवणही राहात नाही, त्याप्रमाणे, आम्ही एकदा रामाचे झालो, म्हणजे त्याच्याशी लग्न लावले, म्हणजे मग विषयांचे प्रेम कुठे आले ?
हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. |