श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१६ एप्रिल
१६ एप्रिल
व्यावहारिक वासना तृप्त करण्यासाठी संत नसतात
नोकरी केली पाहिजे असेल तर ते देणारा जिथे असतो तिथे आपण जातो; त्याप्रमाणे भगवंताची भेट घ्यायची असेल तर संत जिथे राहतात तिथे आपण जावे. परमेश्वराचे स्वरूप ओळखण्यासाठी संतांकडे जाणेच जरूर आहे. संतांचे अस्तित्व त्यांच्या देहात नसून त्यांच्या वचनात आहे. संतांजवळ निर्विषय चित्त असते. रात्री सर्वजण झोपल्यावर शिपाई जसे गस्त घालतात, तसे साधुसंत आमच्या गैरसावधतेत जागृत असतात. आपण झोपी गेलो असताना ते आपली वृत्ति तपासतात. एका बाईला मूल झाले. पण त्याला आकडी येऊ लागली. ते पाळण्यात उगीच निपचित पडून असायचे. ते मूल बरोबर वाढेना, चांगले हसेना, खेळेना. मुलाची ती अवस्था पाहून आईला बरे वाटत नसे. अगदी तसेच संतांना वाटते. शिष्य केला खरा, पण साधनांत जर त्याची प्रगती होत नसेल तर संताला वाईट वाटते. शिष्याची प्रगती होत असेल तर संत स्वतःच्या प्रेमापोटीच शिष्याला सजवील आणि त्याचे कौतुक करील. संतांना फारसे कधी कोणी चांगले म्हणत नाही. त्यांनी एकाचे कल्याण केले तर त्या माणसाचे दहा नातेवाईक त्यांना नावे ठेवतात. संतांना ओळखण्याकरिता जे गुण सांगितले आहेत ते त्यांची परिक्षा करण्याकरिता सांगितले नसून, त्यांचा त्या दृष्टीने उपयोगही होत नाही. त्या गुणांचे आपण आचरण करावे म्हणून ते सांगितलेले आहेत.
संतांजवळ राहणार्या लोकांना तीन तोटे आणि तीन फायदे असतात. त्यांपैकी तोटे असे की, एक, वेदान्त बोलायला तेवढा उत्तम येतो; दोन, संतांजवळ राहिल्याने उगीच मान मिळतो; आणि तीन, 'ते, म्हणजे संत, सर्व पाहून घेतील' या खोट्या भावनेने वाटेल हा तसे वागतो. आता फायदे पाहू. पहिला म्हणजे, तो जर खर्या भावनेने संतांजवळ राहील तर तेवढ्यानेच, काही साधन न करतासुद्धा, त्याचा परमार्थ साधेल; दुसरा, त्याला मान मिळेल, पण तो स्वतः मानाच्या अपेक्षेच्या पलीकडे राहील, आणि तिसरा, वेदान्त त्याला बोलायला नाही आला तरी त्याच्या आचरणात येईल. म्हणून संतांजवळ राहणार्याने ते सांगतील तसे वागावे, मानाची अपेक्षा करू नये आणि फारसा वेदान्त बोलू नये. तोंडापर्यंत आले तरी दाबून टाकावे. संतांची आज्ञा प्रमाण मानणे हे प्रचीती येण्याचे साधन आहे. व्यावहारिक वासना तृप्त करण्यासाठी संत नसतात, हे ओळखून आपण त्यांची संगत करावी. तेल आणि वात असल्यावर दिवा लावायला जसा वेळ लागत नाही, त्याचप्रमाणे आपली भूमिका थोडी तयार असल्यावर सत्संगतीचा परिणाम व्हायला वेळ लागत नाही.
हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. |