श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१६ फेब्रुवारी

१६ फेब्रुवारी

संत सांगतील तसे वागावे.



ज्या स्थितीत परमात्मा ठेवतो त्यात आनंद मानावा. प्रपंचातल्या दुःखाबद्दल वाईट वाटून घेऊ नये. आपण जगात वागताना सर्व 'माझे, माझे,' म्हणतो, पण प्रत्यक्ष आपल्या वाटणीला किती येते याचा कधी आपण विचार करतो का ? मिळण्याची आणि मिळविण्याची हाव वाढल्यामुळेच आपल्याला खरे दुःख होते. ही हाव नाहीशी व्हायला भगवंताच्या स्मरणात राहणे हा एकच उपाय आहे. मी भगवंताचा आहे ही जाणीव ठेवून वागावे. भगवंताकडे चित्त गुंतवून ठेवणे हाच खरा धर्म मानावा. जगाला फसवू नये आणि जगाकडून फसले जाऊ नये.


नामात जो राहिला तो सत्संगात राहिला. व्यवसाय आणि हौस याप्रमाणे आपण संगत धरतो. मनाची आणि नामाची संगत जोडून द्यावी. मालकाच्या बरोबर असलेला कुत्रा ज्याप्रमाणे धीट होऊन दुसऱ्यावर भुंकतो, त्याप्रमाणे आपण भगवंताच्या आधाराने राहावे; भुंकू मात्र नये, नेहमी लीनता ठेवावी. 'मी' साधन करतो हे विसरून जावे; त्याबद्दल अभिमान धरणे म्हणजे साधनाला कमीपणाच आणणे आहे. आपल्या कामात लक्ष ठेवून सर्वांशी प्रेमाने वागावे. स्त्री दीराचा किंवा सासू-सासऱ्यांचा मान ठेवते, ते नवऱ्याला खूश करण्याकरिता; तसे, भगवंताला ज्या रीतीने समाधान होईल, त्याप्रमाणे आपण वागावे. डॉक्टरला जर आपण 'त्या काळया बाटलीतले औषध मला का देत नाही ?' असे म्हटले तर तो ज्याप्रमाणे 'तुला तो रोग नाही' असे उत्तर देतो, त्याप्रमाणे संत ज्याची त्याची वृत्ति ओळखून मार्ग सांगत असतात. याकरिताच संतांची संगत धरून, ते 'सांगतील' तसे वागावे; ते 'वागतात' तसे नाही वागू. आपल्या पतंगाची दोरी आपण संतांच्या हातात द्यावी आणि खुशाल निश्चिंत रहावे. आपण गुरूने सांगितलेले साधन करीत जावे, म्हणजे साधनात पुढे वाट दाखवायला तो उभाच असतो. जिथे दोन वाटा फुटतात तिथे एक पंढरपूरची आणि एक गोंदवल्याची पाटी असते, तसे साधनात राहून, जिथे त्या दोन वाटा फुटतात, तिथपर्यंत या म्हणजे तिथे गुरू उभाच आहे. पण उगीच काही न करता 'पुढे काय आहे ?' हे विचारण्याने काय होणार ?


संतांनाच वेदांचा खरा अर्थ कळला. त्यांचे केवढे उपकार सांगावेत, की त्यांनी तो अर्थ आपल्याला सांगितला. म्हणून आपण वेद वाचण्याचे कारण नाही; आपण फक्त संत आपल्याला सांगतील त्याप्रमाणे वागावे. त्यात आपलेच घुसडू नये. आपले काम खात्रीने झालेच पाहिजे. पाणी गोठून बर्फ बनते, बर्फाच्या आत-बाहेर जसे पाणीच असते, तसे जो आत-बाहेर भगवंताच्या प्रेमाने ओथंबलेला असतो त्याला संत म्हणतात. असे संत फक्त नामस्मरणाने जोडता येतात.


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.