श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१७ सप्टेंबर

१७ सप्टेंबर

परमेश्वर प्राप्तीची तळमळ हवी.



परमेश्वर आपल्याला खरोखरच हवा आहे का ? आणि तो कशासाठी ? बाकी, एवढे कष्ट करून तुम्ही येथे येता, तेव्हा भगवंत तुम्हाला नको आहे असे कसे होईल ? तुम्हाला खात्रीने तो हवा आहे; पण कशासाठी ? तर आपला प्रपंच नीट चालावा म्हणून ! असे जरी असले तरी त्यात वाईट नाही, त्यातूनच आपल्याला पुढला मार्ग सापडेल. परंतु केवळ परमेश्वरासाठीच परमेश्वर हवा असे ज्याला वाटत असेल तो खरोखर भाग्यवान होय. मोठमोठ्या साधुसंतांना खरोखरच तशी नड भासली; त्यांनी परमेश्वर आपलासा करून घेतला. तुकाराम, रामदास, यांना एका परमेश्वरावाचून दुसरे काहीही हवेसे वाटले नाही. भगवंताची नड फक्त संतांनाच निर्माण होऊ शकते. रामदासांना परमेश्वराच्या उपदेशाची फार गरज भासू लागली. त्यांनी आपल्याला उपदेश करण्यासाठी मोठ्या भावाला विनविले, परंतु भाऊ म्हणाला, ’बाळ, तू अजून लहान आहेस.’ रामदासांची तळमळ शमली नाही. त्यांनी लग्नाच्या आधीच पळ काढला. देवाच्या ध्यासात बारा वर्षे घालविल्यावर परमेश्वराने त्यांना उपदेश दिला, तेव्हाच त्यांची तळमळ शांत झाली. परमेश्वराची प्राप्ती ही वयावर, श्रीमंतीवर, जातिधर्मावर अवलंबून नाही; ती एका तळमळीवर अवलंबून असते. ही तळमळ असणे अत्यंत जरूरीचे आहे. ती तळमळ जर कशाने लागत असेल तर केवळ एका शरणागतीनेच होय. रामदासांनी रामाच्या पायावर डोके ठेवून सांगितले कि, "रामा मी देह अर्पण केला आहे. आता याची मला गरज नाही. तुझ्यावाचून जगणे मला अशक्य आहे." एवढे प्रेम, एवढे आपलेपण, एवढी तळमळ असल्यावर परमेश्वर किती वेळ दूर उभा राहणार !

परमेश्वर अत्यंत अल्पसंतुष्ट आहे. आपण त्याच्याजवळ एक पाऊल पुढे गेलो तर तो दोन पावले आपल्याजवळ येईल. परंतु आपल्याला त्याच्याकडे जायची तळमळच लागत नाही. आपले विकार, आपला अहंपणा, आपली देहबुद्धी, आपल्याला मागे खेचते. या सर्वांचे बंध तोडून जो परमेश्वराकडे जातो तो पुनः मागे फिरत नाही. परमेश्वर मातेसारखा अत्यंत प्रेमळ आहे. कोणत्या आईला आपले मूल जवळ घ्यावेसे वाटणार नाही ? परंतु मध्येच हे विकार आड येतात. खरोखर, भगवंताचे नाम हे मधला आडपडदा दूर सारते, आपली देहबुद्धीची आसक्ती दूर करते, परमेश्वराकडे जायची वाट मोकळी करते, आणि सरळ आपल्या हाताला धरून थेट परमेश्वरापर्यंत नेऊन पोहोचवते. हे नाम तुम्ही आपल्या हृदयात सतत जागृत ठेवा.


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.