श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१८ जानेवारी
१८ जानेवारी
नाम निष्ठेने घ्यावे.
नाम श्रध्देने घेणे म्हणजे काय ? तर आपल्या गुरूने किंवा ज्याच्याबद्दल आपली पूज्य भावना असते अशा व्यक्तीने सांगितले म्हणून घेणे. अशा श्रद्धेने नाम घेणार्याच्या मनात शंका येत नाही. ही स्थिती फार भाग्याची पण तितकीच दुर्मिळ. निष्ठेने नाम घेणे म्हणजे शंकारहित नाम घेणे. शंका अनेक तर्हेच्या असतात. नाम घेताना भगवंताकडे लक्ष नसले तर त्या नामाचा उपयोग आहे की नाही, नाम घेताना बैठक कोणती असावी, दृष्टि कशी असावी, शुचिर्भूतपणेच नाम घ्यावे किंवा कसे, अशा तर्हेच्या अनेक शंका मनात येतात. थोडक्यात असे म्हणता येईल की, आपण जे नाम घेतो ते भगवंतापर्यंत पोहोचते की नाही, ह्या एका शंकेत सर्व शंकांचा समावेश होतो. भगवंत आणि त्याचे नाम एकरूपच असल्याने त्या दोहोंच्या आड काहीच येऊ शकत नाही. एखाद्या व्यक्तीच्या पाठीमागून आपण चाललो असताना आपल्या तोंडून त्याचे नाव उच्चारले गेले तर तो लगेच मागे वळून बघतो. ही जर मनुष्याची स्थिती तर भगवंताच्या बाबतीत त्याचे नाव त्याच्यापर्यंत पोहोचत नाही हे कसे शक्य आहे? खरे पाहिले तर भगवंताचे नाव त्याच्याच कृपेने आपल्या मुखात येते; म्हणजे त्याचे नाव तोच घेत असतो; मग नाम भगवंतापर्यंत पोहोचते की नाही ह्या शंकेला वावच कोठे राहिला ? समजा दोन माणसे जेवायला बसली. त्यांतल्या एकाच्या मनात काही विचार घोळत असून त्याचे जेवणाकडे लक्ष नव्हते, पण हाताने तोंडात एकेक घास घालण्याचे काम चालू होते. दुसरा इसम मात्र लक्षपूर्वक जेवण जेवीत होता. दोघेही जेवून उठले. ह्यात उपाशी कोण राहिला ? दोघांचीही पोटे भरलीच ! तसे नाम घेतल्यानंतर त्याचा उपयोग झाला नाही असे कसे होईल ?
समजा आपण परगावच्या एका अनोळखी इसमाला पत्र लिहून त्याला बोलाविले; तो आला आणि त्याने सांगितले की, 'तुम्ही ज्याला पत्र पाठविले तोच मी', तर त्याच्या वचनावर विश्वास ठेवून आपण त्याला जवळ करतो. तसे, भगवंताने सांगितले आहे की 'जेथे माझे नाम तेथे मी पुरूषोत्तम'; तर मग या वचनावर विश्वास ठेवून नाम घ्यावे आणि त्यातच त्याला पहावे, असे का करता येऊ नये ? हीच श्रध्दा. आपण ज्याचे पोटी जन्माला आलो त्याचेच नाव आपल्या पुढे लावतो तसे भगवंताच्या बाबतीत करावे. त्याचेच नावाने जगावे; म्हणजे माझा सर्व कर्ता, रक्षिता तो एकच असून त्याच्याशिवाय माझे या जगात दुसरे कोणीही नाही, या भावनेने राहावे. असा जो भगवंताचा होतो त्याचे महत्व भगवंत स्वत:पेक्षाही वाढवतो.
हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. |