श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१८ जून

१८ जून

परमार्थात गुप्ततेची जरूरी असते.


वासनेच्या तावडीतून सुटणे फार कठीण आहे. कारण वासनेच्या पोटीच प्राणी जन्माला येत असतो. त्या वासनेला जिंकणे, म्हणजे आपण मरून जाण्या‍इतके कठीण आहे. वासनेच्या पोटी जन्म, आणि जन्मानंतर अहंकार, ह्या जोडप्यापोटी कामक्रोधादि विकार जन्माला येतात. या जोडप्याचे वैशिष्ट्य असे की, त्यामध्ये बायको नवर्‍यापेक्षा वडील असते; कारण आधी वासना, आणि त्यातून पुढे अहंकार. भगवंताजवळ 'वास' ठेवला तरच वासना नष्ट होते. प्रपंच मुळात चांगलाही नाही आणि वाईटही नाही. प्रपंचातली वासना बाहेर काढणे, याचेच नाव परमार्थ. प्रपंचात प्रसिद्धीची जरूरी वाटते. त्याच्या उलट परमार्थात गुप्ततेची जरूरी लागते. समजा, एखाद्या बाईने दागिने हवेत म्हणून नवर्‍याजवळ हट्ट धरला, आणि नवर्‍याने तिला हवे असलेले सर्व दागिने देण्याचे कबूल केले; पण अट अशी घातली की, जेव्हा दागिने अंगावर घालायचे असतील त्या वेळी ते घालून खोलीची दार-खिडक्या बंद करून आत बसले पाहिजे. अशी अट पाळून कोणती बाई दागिने घालायला कबूल होईल ? कारण दागिने लोकांनी पाहण्यातच तिला समाधान आहे. ही झाली प्रपंचातली रीत. परमार्थात याच्या उलट गुप्ततेची गरज आहे. आपली साधना कोणाच्याही नजरेत न येईल अशी खबरदारी घ्यावी; कारण परमार्थाला दृष्ट फार लवकर लागते. ती केवळ इतर लोकांचीच लागते असे नसून, आपली स्वतःचीसुद्धा लागण्याचा फार संभव असतो. म्हणून परमार्थात गुप्तता असावी; आणि आपल्या हातून जे साधन होते आहे, ते सद्‍गुरू किंवा परमात्मा यांच्या कृपेनेच माझ्याकडून करवून घेतले जात आहे, ही जाणीव ठेवावी.

आजारी माणसाने नुसते पडून राहावे, पण औषध मात्र नियमाने घ्यावे. बाकीच्या गोष्टी इतर लोक करतात; औषध मात्र आपण स्वतःच घेतले पाहिजे. एखादा मोठा राजा जरी झाला तरी कडू औषध दासीला देऊन काही त्याचा रोग बरा होत नाही. त्याचप्रमाणे, परमार्थात भगवंताचे स्मरण ठेवण्याचे काम आपल्या स्वतःलाच करायला पाहिजे. उगीच कुणाच्या नादी लागू नये. परमार्थ म्हणजे काय करायला पाहिजे हे नीट समजावून घ्या आणि मग त्या मार्गाने जा. कोणाला फसू नका, कारण स्वतः फसणे हे जगाला फसविण्या‍इतकेच पाप आहे. ज्याच्या प्रपंचात पाठीराखा परमात्मा आहे, त्याचा तो प्रपंचच परमार्थ होतो. उलट ज्याचा पाठिराखा अभिमान आहे, त्याचा परमार्थदेखील प्रपंचच म्हटला पाहिजे.



हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.