श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/१९ ऑगस्ट

१९ ऑगस्ट

आपल्याला देवाची नड वाटते का ?


एक मनुष्य प्रवासाला निघाला. त्याने सर्व सामान घेतले. तो पानतंबाखू खाणारा होता, त्याने तेही सर्व साहित्य बरोबर घेतले होते. गाडी सुरू झाल्यावर थोड्या वेळाने त्याने पानाचे साहित्य काढले, तेव्हा त्याच्या ध्यानात आले की आपण चुन्याची डबी विसरलो आहोत. त्याने पुन्हा पुन्हा सामान हुडकले. त्याला मोठी चुटपुट लागली. कुठे काही पडल्याचा आवाज झाला, की त्याला वाटे चुन्याची डबीच पडली. कुणी त्याच्याशी बोलले की त्याला वाटे, आपल्याला हा चुना हवा का म्हणून विचारील. ज्या गोष्टीवर आपले प्रेम असते त्या गोष्टीची आपल्याला नड लागते; ती नसेल तर हळहळ वाटते. तशी आपल्याला देवाची नड कधी लागली आहे का ? आपण आपल्या घरातल्या सर्व वस्तू आपल्या म्हणतो. बायको, मुले आणि घरातल्या इतर वस्तूंची आपल्याला इत्थंभूत माहिती असते; परंतु देवघरातला देव, ज्याची आपण रोज पूजा करतो, तो कधी आपलासा वाटला आहे का ? आपली जर ही स्थिती आहे तर आपल्याला देवाचे प्रेम कसे लागेल ? देवाचे प्रेम लागायला हवे असेल तर जगताची आशा सोडली पाहिजे. व्यवहार न सोडावा, पण विषयाकडे गुंतणारी आपली वृत्ती भगवंताच्या आड येते, म्हणून तिला भगवंताकडे गुंतवावे. भगवंताची खरी आवड उत्पन्न झाली पाहिजे. देवावाचून आपले नडते असे वाटले पाहिजे.

ज्याचा आपण सहवास करतो त्याचेच आपल्याला प्रेम लागते. ज्याचे प्रेम लागते त्याचीच आपल्याला नड भासते. आपण पाहतोच, सहवासात किती प्रेम आहे. प्रवासात आपल्याला कुणी चांगला माणूस भेटला, त्याच्याशी आपण बोललो, बसलो, की त्याचे प्रेम आपल्याला लागते. तो त्याच्या स्टेशनवर उतरून जाताना आपण त्याला म्हणतो, "तुमच्याबरोबर वेळ किती आनंदात गेला ! तुम्ही आणखी बरोबर असता तर बरे झाले असते." थोड्याश्या सहवासाने जर एवढे प्रेम उत्पन्न होते, तर मग भगवंताचा अखंड सहवास ठेवल्यावर त्याचे किती प्रेम मिळेल ! म्हणून त्याच्या नामाचा सतत सहवास ठेवा. भगवंताच्या सहवासात राहायचे म्हणजे अहंपणा विसरून, कर्ता-करविता तो आहे ही भावना दृढ झाली पाहिजे. होणारे कर्म त्याच्या कृपेने होते आहे ही भावना निर्माण झाली पाहिजे. तुमची कळकळीची हाक ऐकून तो तुमच्यापाशी आनंदाने धावत येईल. 'नामाने काय होणार आहे' असे मनात देखील आणू नका. नामात किती शक्ती आहे याचा अनुभव नाम घेऊनच पाहा. ज्याला नामाचे प्रेम आले त्याने भगवंतालाच आपलेसे केले यात शंका नाही.


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.