श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२२ मे

२२ मे

गुरूवर अत्यंत श्रद्धा ठेवावी.


कुस्त्या खेळून, झगडून, शरीरबळ वाढते; अवघड उदाहरणे सोडवून बुद्धिबळ वाढते; तसेच, आलेल्या परिस्थितीला तोंड देऊन समाधानाने राहण्याने आत्मिक बळ वाढते. आत्मिक बळ वाढणे म्हणजे देहबुद्धी कमी होणे; आणि ते करण्याकरिताच परमेश्वर संकटे धाडतो; पण तुम्ही त्यांना भिता याला काय करावे ? अशा परिस्थितीत, संकटे परत घेणे म्हणजे तुमचे अनहित करणे होय. त्याला तुमचे हित कशात आहे हे उत्तम कळते. भोग समाधानाने भोगण्यात पुरुषार्थ आहे. दुखणे आले असता औषध घ्यावे. पण औषधात गुण तरी परमात्म्यानेच ठेवला ना ? औषधाने तरी गुण हमखास येतोच असे थोडेच आहे ? एकाला येतो, एकाला नाही. ज्याचे ज्यात हित होणे असेल तसे तो परमात्मा करतो हे लक्षात ठेवावे. तुम्ही एकच करावे, परमात्म्याला शरण जाऊन, "हा भोग भोगण्याची मला ताकद दे, समाधान भंगू देऊ नकोस, तुझे सतत स्मरण व्हावे." असे मागावे. दुखणे भोगायचे आहे तर ते समाधानाने का नाही भोगू ? प्रारब्धाचे तुमच्या डोक्यावरचे ओझे, कर्ज, तेवढ्या प्रमाणात कमी नाही का होणार ? दुखणे आले असता त्याची उपेक्षाच करावी, म्हणजे आपोआप ते कमी होईल.

मी म्हणजे अमुक एक, अशी आपल्या अस्तित्वाविषयी जशी खात्री असते, तशी देव आहे अशी खात्री पाहिजे. आपले सद्‌गुरू देवच आहेत अशी आपली खात्री झाली, म्हणजे आपल्या सद्‍गुरूंच्या ठिकाणी भाव आहे असे म्हणता येईल. माझी सेवा तुम्ही जी करता ती तुम्ही आपल्या देहबुद्धीची केली, तुम्हाला जे पसंत तसे तुम्ही केले. वास्तविक, माझी सेवा म्हणजे मला जे आवडते ते करणे, माझ्या आज्ञेत राहणे, नामस्मरण करणे, सर्वांभूती भगवद्‍भाव ठेवून कुणाचे मन न दुखवणे, परमात्माच सर्व करतो अशी भावना ठेवणे, माझ्या सांगण्याचा परिणाम न होण्याची दोन कारणे असतील. एक कारण असे की, तुमच्या मनामध्ये परिवर्तन घडवून आणण्याची शक्तीच माझ्यामध्ये नसेल; किंवा दुसरे कारण असे की, तुम्ही अभ्यास करीत नसाल. पण परमार्थात एकदम फरक होणे बरे नव्हे. समजा, एखाद्याला आज १०५ ताप आहे आणि उद्या तो एकदम ९५ झाला, तर ते बरे नाही. तसेच, मनुष्य आज रागीट आणि उद्या एकदम शांत झाला तरे तेही बरे नव्हे. आपल्यामधे हळूहळू परिवर्तन व्हावे, आणि ते विवेकाने घडवून आणावे.



हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.