श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२४ डिसेंबर

२४ डिसेंबर

अनन्यतेशिवाय भगवंताची प्राप्ती नाही.


सत्पुरुषाजवळ राहून मनुष्य जर आज्ञापालन शिकला नाही तर तो काहीच शिकला नाही. जो आज्ञापालन करील त्यालाही भोग भोगावे लागतील हे खरे, परंतु ते आपल्या सोयीने भोगण्याची व्यवस्था होईल. प्रारब्धाचा जोर मोठा विलक्षण आहे. भोग येण्याचा समय आला म्हणजे बुद्धीवर परिणाम करतो. तिथे आपण सावध राहून सत्पुरुषाच्या सांगण्याप्रमाणेच वागलो तर प्रारब्धाचा जोर मंदावल्यावाचून राहणार नाही. प्रारब्धाने बुद्धीमध्ये काहीही विचार उत्पन्न झाले तरी त्याप्रमाणे वागणे अथवा न वागणे हे आपल्या हातामध्ये आहे; आणि म्हणून तर मनुष्य हा श्रेष्ठ आहे. बुद्धीला आवरण्याची युक्ती साधायला आज्ञापालन हे सर्वोत्कृष्ट साधन समजावे.

विकार हे काही मुळात टाकाऊ नाहीत. ते भगवंतानेच दिले आहेत. म्हणून जीवनात त्यांना योग्य स्थान असेलच असेल. किंबहुना, व्यवहारामध्ये विकारांची जरूर आहे. मात्र विकारांना आपण सत्ता गाजवून वापरायला शिकले पाहिजे, विकारांनी आपल्यावर सत्ता गाजवता कामा नये. विकारांना आपण वापरावे, विकारांनी आपल्याला वापरू नये.

पहिल्याने, प्रपंचातली वस्तू हवी म्हणून भगवंतावर प्रेम करायला लागावे. चिकाटीने ते प्रेम वाढवावे, म्हणजे नंतर वस्तूंचे महत्त्व निघून जाते आणि भगवंत तेवढा शिल्लक उरतो. भगवंताला एकदा धरला की कोणत्याही परिस्थितीमधे त्याला सोडून नये. त्याचे नाम घेतल्याने हे साधते, म्हणून नाम घेत जा असे मी सतत सांगत असतो. प्रपंचात आपणे किती कष्ट करतो ! तितका मोबदलाही मिळत नाही. परमार्थात तसे नाही. परमार्थ जितका करावा तितके तितके समाधान अधिकाधिक असते.

ज्ञानमार्ग असो किंवा भक्तीमार्ग असो, खरा 'मी' कोण हे ओळखण्यासाठीच सर्व साधने असतात. आज आपल्यापाशी खोट्या 'मी' चे प्राबल्य आहे, ते नाहीसे करणे जरूर आहे. खोटा 'मी' गेला की खऱ्या 'मी' ला कुठून आणायची जरूरी नाही. तो प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये स्वतःसिद्ध आहेच. म्हणून खोट्या 'मी' ला मारण्यासाठी भगवंताचे दास्यत्व पत्करणे फार आवश्यक असते. अनन्यतेशिवाय भगवंताची प्राप्ती नाही; त्यातच भक्ती जन्म पावते. नामस्मरण हे भक्तीमार्गाचे मुख्य साधन आहे. नामस्मरणाने भगवंताचे प्रेम अनायासे उत्पन्न होते. ते नाम तुम्ही निष्ठेने आणि आनंदाने घ्या, हेच माझे सांगणे आहे.



हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.