श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२८ मार्च

२८ मार्च

भगवंताची स्मृति आणि कर्तव्याची जागृति.


प्रत्येक मनुष्य बोलताना 'मी' आणि 'माझे' अशा भाषेत बोलत असतो; म्हणजे प्रत्येक व्यक्तीला ह्या दोन्ही बाबतींत काही कर्तव्ये असतात. 'माझे' या शब्दात शरीर आणि तत्संबंधी सर्व गोष्टी येतात. आयुष्यात 'मी' चे कर्तव्य परमेश्वरप्राप्ती हे आहे; आणि देहाचे कर्तव्य देहाशी संबंधित असलेल्या प्रत्येक व्यक्तीबद्दलचे असते. देहाच्या कर्तव्यात धर्म, शास्त्र आणि नीति यांना धरून, संबंधित व्यक्तीशी करण्याच्या आचरणाचा समावेश होतो; म्हणजेच, ज्याच्याशी जसा आपला संबंध असेल त्याप्रमाणे त्याच्या बाबतीत आपले कर्तव्य चोख पार पाडणे. 'कर्तव्य' याचा अर्थ मोबदल्याची अपेक्षा न ठेवता ज्या ज्या बाबतीत जे करणे योग्य असेल ते करणे, असा आहे. मनुष्याने 'मी' आणि देह या दोहोंच्या बाबतींतली कर्तव्ये समान चालीने करीत राहिले पाहिजे. 'मी' चे कर्तव्य करीन पण देहाने कसाही वागेन, असे म्हणून चालणार नाही. याचे कारण असे आहे की, समजा, एखादा मनुष्य नोकरी करीत आहे; तो ती नोकरी कशाकरिता करतो याचा विचार केला तर असे दिसते की, ती नोकरी करायला दुसरे कोणी नव्हते म्हणून तो ती नोकरी करीत नसतो, तर त्या नोकरीतून मिळणारा पैसा कुटुंबरक्षणाकरिता उपयोगी पडेल म्हणून तो ती नोकरी करीत असतो. समजा, त्याने नोकरी केली पण मिळणारा पैसा घरात दिला नाही, तर त्या नोकरीचा काही उपयोग नाही. तसे, 'मी' चे कर्तव्य, म्हणजे भगवंताचे अनुसंधान केले, पण देहाचे कर्तव्य, म्हणजे सदाचरण आणि संबंधित व्यक्तीशी असलेली कर्तव्ये न केली, तर नोकरी करून पैसे घरी न दिल्यासारखे होईल. म्हणून प्रत्येक व्यक्तीने भगवंताची स्मृती आणि कर्तव्याची जागृती ठेवावी; आणि या दृष्टीने आपले कुठे चुकते आहे याचा शोध दर वाढदिवसाच्या निमित्ताने घेऊन, प्रत्येकाने आपली उन्नति करून घ्यावी. जेवताना भोवती उदबत्तीचा सुंदर वास आणि तोंडात गोड घास जसा असावा, त्याप्रमाणे आपण बाहेर गोड बोलावे आणि आत भगवंताचे गोड नाम घ्यावे; म्हणजेच, आपण आतबाहेर गोड असावे.

ज्याप्रमाणे एखादा गवई पुष्कळ ताना मारतो, पण शेवटी समेवर येतो, त्याचप्रमाणे भगवंताजवळ लक्ष ठेवून मग आपण काहीही केले तरी हरकत नाही. समेला विसरून मात्र उपयोग नाही. इथे तबला वाजविणारा भगवंतच आहे; म्हणून त्याचा ठेका बरोबर चालतो. ठेक्याप्रमाणे, म्हणजे भगवंताच्या ठेक्याला अनुसरून, म्हणजेच त्याच्या स्मरणात, जो गवई गाईल तो बरोबर मार्गावर राहील आणि शेवटी समेवर येईल.


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.