श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२९ नोव्हेंबर

२९ नोव्हेंबर

वेळीच जागे होऊन योग्य रस्त्याला लागा.


कोणत्याही कर्माची सुरुवात हेतूपासून म्हणजे वासनेपासून होत असते. जन्म हा देखील वासनेतून निर्माण होतो. गंगेचा उगम अत्यंत पवित्र आणि लहान असला तरी स्वच्छ असतो. त्याप्रमाणे, आपला जन्म वासनेत झाला असला तरी सुरुवातीला मूळ स्वरूप निर्मळ असते. याच वेळी आई लहान मुलाला शिकवते, ’ देवा चांगली बुद्धी दे, ’ पुढे या निर्मळ मनावर निरनिराळ्या बर्‍यावाईट वासनांचे पगडे बसू लागतात. गंगेचे पाणी पुढे पुढे वाहात गेल्याने गढूळ होते. आणि ते स्वच्छ करण्यासाठी आपण ज्याप्रमाणे तुरटी लावतो, त्याप्रमाणे वासनेचा गढूळपणा घालविण्यासाठी ’राम कर्ता’ ही भावना दृढ करायला पाहिजे. भगवंताच्या नामाची तुरटी फिरल्याने वासनेचा साका खाली राहून शुद्ध अंतःकरण प्रकट होईल. ’ गेल्या जन्मात मी जी काही पापे केली असतील ती आता भोगतो आहे, ’ असे नुसते म्हणून जगण्यात अर्थ नाही, कारण त्यामुळे आपण पुढच्या जन्माची तयारीच करीत असतो. जर पुढचा जन्म चुकवायचा असेल तर या जन्मीच त्यासाठी कार्य करायला पाहिजे; म्हणजे ती वासना नष्ट केली पाहिजे.

सत्तावान्, श्रीमंत, वैभववान् माणसे सुखी असतात, हा नुसता भ्रम आहे. जोपर्यंत यांना भगवंताचा आधार नसतो तोपर्यंत या सर्व गोष्टी कुचकामाच्या आहेत. आपले प्रापंचिक सुख आहे ते दिसायला वरवर बाळसेदार दिसते, परंतु ती सूज आहे, हे काही खरे बाळसे नव्हे. म्हणून आपल्याला प्रपंचात सुख लागत नाही. आपले वय जसजसे वाढत जाते, तसतसे आपले व्याप वाढतात आणि परमेश्वराकडे दुर्लक्ष होते. वासना कमी होण्याऐवजी वाढत जाते, आणि तीच पुढल्या जन्माची अधिष्ठात्री ठरते. तेव्हा यातून काहीतरी मार्ग वेळेलाच काढणे आवश्यक आहे. हा मार्ग अगदी सरळ आणि सोपा आहे. संतांनी तो अनेक वेळा दाखवून दिला आहे. त्या मार्गाने पावले टाका, भगवंत पुढला मार्ग दाखवायला उत्सुक आहे. तुम्हाला हे सर्व पटले असे म्हणता, परंतु पटले असून करीत नाही. बरे, पटले नाही म्हणावे, तर का पटले नाही तेही सांगत नाही, याला काय करावे ? मनुष्याच्या ठिकाणी इतर प्राणीमात्रापेक्षा जर काही जास्त असेल तर ते म्हणजे चांगलेवाईट कळण्याची बुद्धी. तेव्हा तुमच्या बुद्धीला पटूनही जर तुम्ही तसे वागला नाही किंवा नुसता प्रयत्नही केला नाही, तर तो दोष सर्वस्वी तुमचाच नव्हे का ? म्हणून मला पुनः सांगावेसे वाटते की, वेळेलाच जागे होऊन योग्य रस्त्याला लागा. भगवंताच्या नामात राहून सर्व काय ते करा, हेच माझे शेवटचे सांगणे आहे.



हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.