श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२९ सप्टेंबर

२९ सप्टेंबर

प्रपंच हे साधन, परमार्थ हे साध्य.



मी प्रपंचासाठी नसून रामाकरता आहे, ही दृढ भावना ठेवावी. 'मी माझ्याकरता जगतो' असे न म्हणता 'रामाकरता जगतो' असे म्हणू या, मग रामाचेच गुण अंगी येतील. आपण प्रपंचाकरता जगतो, म्हणून प्रपंचाचे गुण अंगी येतात. म्हणून भगवंताकरता जगावे. प्रपंच हे साधन आहे, परमार्थ हे साध्य आहे. प्रपंच कुणाला सुटला आहे ? पण साधू त्याचा सदुपयोग करतात; आम्ही तसा करीत नाही, म्हणून परमार्थ साधत नाही. जगात तीन गोष्टी दुर्मिळ आहेत: मनुष्यजन्म, संतसमागम, आणि मुमुक्षत्व. मनुष्यजन्म हा परमार्थाकरताच आहे, विषयभोगासाठी नव्हे. परमार्थाची तळमळ लागली पाहीजे. तळमळ उत्पन्न झाल्यावर, मन शुद्ध झाल्यावर, राम भेटेलच. समई लावली पण तेल बरोबर् न घातले तर ती विझेल. स्मरणरूपी तेल वारंवार घालावे, मग परमार्थ-दिवा कायम राहील. परमार्थ हा मुख्यतः अनुभवाचा आहे. पंढरपूरला जायचे असेल तर वाट चालू लागले पाहिजे. मग वाटेत कुणीतरी वाट दाखवणारा भेटतोच; निदान पाट्या तरी आढळतात. आम्ही परमार्थमार्गावर प्रत्यक्ष चालूच लागत नाही, मग वाटाड्या कसा भेटणार् ? परमार्थमार्गावर गुरू खास भेटेलच. म्हणूनच रामाचे अखंड स्मरण ठेवून परमार्थाला लागू या.

आचार आणि विचार यांची सांगड असावी. पोथीत जे ऐकतो ते थोडेतरी कृतीत येणे जरूर आहे. पोथी वाचल्यानंतर, जेवढे कळले तेवढे तरी आचरणात आणायला काय हरकत आहे ? जे कळणार नाही तेही पुढे हळूहळू कळेल. घरातून बाहेर पडल्यावर एकदम मुक्कामाचे ठिकाण दिसत नाही. प्रथम एक रस्ता, मग दुसरा, मग तिसरा, असे करता करता आपण मुक्कामाला पोहोचतो. त्याप्रमाणे, पोथीतले सगळे कळले नाही, तरी जे कळले तेवढे तरी कृतीत आणू या. दृढ निश्चयाने एकएक मार्ग आक्रमीत गेलो तर मुक्कामाला खास पोहोचू. म्हणुन भगवत्स्मरणाला जपले पाहिजे. त्याला प्राणापेक्षाही जास्त समजून सांभाळावे. संत, सद्‍गुरू आणि शास्त्र यांच्या वचनावर दृढ विश्वास ठेवावा. तेथे बुद्धिभेद होऊ देऊ नये. याप्रमाणे वागले तर प्रपंच परमार्थरूपच होईल. मी रामाचा म्हणणे हाच परमार्थ, अहंबुद्धी ठेवणे हा प्रपंच. परमार्थात अहंकार मिसळला की तो प्रपंचच झाला; उलट्, प्रपंचातला अहंकार दूर झाला की तो परमार्थच. संसाररूपी वृक्षाला अभिमानाचे पाणी आम्ही वारंवार घालतो म्हणून तो इतका फोफावला. हा मूळ अभिमानच नष्ट केला पाहिजे. खरा कर्ता ईश्वर असताना, जीव विनाकारणच 'मी कर्ता' असे मानतो. झाडाचे पान रामावाचून हलत नाही. देहाचा योगक्षेम तोच चालवितो. मी कर्ता नसून राम कर्ता ही भावना वाढविणे हीच खरी उपासना.



हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.