श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/२ मार्च

२ मार्च

मनुष्याने प्रपंचात कसे वागावे ?



खरोखर जगात माझे हित अगर अनहित करणारा जर कोणी असेल तर तो माझा मीच. 'मी कर्ता' ही भावना ठेवली की फळ भोगण्याची इच्छा राहते. मनुष्याला वाटत असते की, आपल्याला दुःख होऊ नये, आजारपण येऊ नये. पण तरीसुद्धा आजारपण आणि दुःख तो टाळू शकत नाही. म्हणजे 'मी कर्ता' ही जी आपली भावना असते ती निखालस खोटी ठरते. मालकी नसताना घराची मालकी गाजविण्याचा आपण प्रयत्‍न करतो याला काय करावे? तेव्हा प्रापंचिकांत आणि संतांत फरक हाच की, ते कर्तेपण रामाकडे देतात, आणि प्रापंचिक ते आपल्याकडे घेतात. ' राम कर्ता ' म्हणावे की सुख, कल्याण, सर्व काही आलेच. त्याच्याकडे सर्व सोपवा आणि आनंदात राहा. त्यातच खरे हित आहे. गोड खायला देऊ नका असे डॉक्टरने बजावून सांगितले असताही रोग्याच्या इच्छेप्रमाणे गोड पदार्थ त्याला खायला घातला तर आपण त्याचे अनहितच करतो; तसे विषयाच्या लालचीने विषयाला बळी पडून आपले अनहित आपणच करून घेत असतो. आजारी माणसाला तीन गोष्टी कराव्या लागतात; एक, कुपथ्य टाळणे; दुसरी, पथ्य सांभाळणे; आणि तिसरी, औषध घेणे. तसेच भवरोग्यालाही तीन गोष्टी कराव्या लागतात. एक, दुःसंगती, अनाचार, मिथ्याभाषण, द्वेष, मत्सर, वगैरे अवगुणांचा त्याग करणे; दुसरी, सत्संगती, सद्‍ग्रंथसेवन, सद्‍विचार आणि सदाचार असणे; आणि तिसरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट, म्हणजे नामस्मरण करणे; हेच औषधसेवन होय.

साधन हे वयावर अवलंबून नाही. मी केव्हा जाणार हे माहीत नाही, तेव्हा वयाने मी मला मोठाच म्हटले पाहिजे. आपण आपल्या जिभेला नामाचा चाळाच लावून घ्यावा. पहिल्यापहिल्याने विसरेल, पण सवयीने आपोआप आठवेल, आणि मग भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव होईल. साधनात थोडी बळजबरी पाहिजेच. नियम थोडा असावा, पण तो प्राणापलीकडे सांभाळावा. नियम जास्त केला तर तो चुकविता कसा येईल याचा मार्ग मन शोधायला लागते. नाम घेणे हेच भगवंताकडे चालणे होय. साधनेत पुढे आलेले आपण मागे जात नाही ना, याकडे लक्ष पाहिजे. नामाबद्दलची तळमळ कमी व्हायला बाहेरच्या कितीतरी गोष्टी कारण आहेत; रोजचा प्रपंच आहे, व्यवहार आहे, मागच्या आठवणी आहेत, पुढची काळजी आहे. अशात आपले नामस्मरण हट्टाने चालू ठेवले पाहिजे. नामात गोडी उत्पन्न व्हायला नामच घेतले पाहिजे. देवाला अत्यंत प्रिय जर काही असेल तर ते म्हणजे त्याचे नाम. ते घेतल्याने तो आपलासा होईल. देव तुम्हाला खात्रीने भेटेल. जसे पाणी गोठल्यावर बर्फ होते, तसे नाम घेतल्याने श्रद्धा घट्ट होते. श्रद्धेमुळे देवाला तुम्हाला भेटावेच लागेल. त्रिवेणीचा संगम जर कोणता असेल तर तो म्हणजे देव, भक्त, आणि नाम. जिथे देव असेल तिथे भक्त आणि नाम असते, आणि जिथे भक्त असतो तिथे नाम आणि देव असतो.



हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.