श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/३० जुलै
३० जुलै
राम कर्ता हे जाणून चित्तीं । जगांत संत ऐसें वर्तती ॥
<poem>
जेथे मीपणाचे ठाणें । तेथें दुःखाचें साम्राज्य असणे । हा आहे नियम । म्हणून मी सांगतो राखावा नेम । सर्वस्वी व्हावें भगवंताचें । 'मी, माझें' सोडून साचें ॥ बाह्य मीपणानें जरी सोडलें । पण अभिमानानें वृत्ति बळावली । तेथें घाताला सुरुवात झाली ॥ बुद्धि करावी स्थिर । नामीं असावें प्रेम अनावर । राम कर्ता जाणूनि चित्तीं । जगांत संत ऐसें वर्तती ॥ साधनीं सावधान जाण । हेंच साधकाचे मुख्य लक्षण ॥ बाह्य वेषानें कसाहि नटला । जगाला भुलविता झाला । तरीं जोंवरी नाहीं चित्त स्थिर । कसा पावेल रघुवीर ? ॥ आजवर केल्या गोष्टी फार । भल्या बुर्या असतील जाण । त्याचा न करावा विचार । पुढें असावें खबरदार ॥ मानावी परस्त्री मातेसमान । दुसर्याचें न पाहावें उणेपण । परनिंदा टाळावी । स्वतःकडे दृष्टी वळवावी ॥ गुणांचे करावें संवर्धन । दोषांचे करावें उच्चाटन । याला एकच उपाय जाण । अखंड असावें अनुसंधान ॥
प्रपंच न मानावा सुखाचा । तो असावा कर्तव्याचा ॥ वृत्ति असावी स्थिर । चित्तीं भजावा रघुवीर ॥ असा करा कांही नेम । जेणें जवळ येईल राम ॥ प्रपंचाची धरितां कांस । दुःखचि पावे खास ॥ प्रपंच हाच आधार । प्रपंचाविण निराधार । ऐशी होई ज्याची वृत्ति । समाधान न ये त्याचे हातीं ॥ तुम्ही सुज्ञ भाविक जाण । एवढें ऐकावें माझें वचन ॥ दुष्ट मतीची उत्पत्ति । ही दुर्जनाची संगति । भावें धरितां रघुपति । सर्व संकटें दूर जाती ॥ वृत्ति असावी खंबीर । ज्याचा आधार रघुवीर ॥ दुर्जनांचे जैसें मन । पाषाणास न फुटे द्रव जाण । तैसें प्रपंची इच्छी जो सुख । जें आजवर कोणास न मिळाले देख ॥ प्रपंचाचे दुःख जाण । तें मीपण असल्याची खूण जाण ॥ जगांत वर्तावें, घरांत असावें । व्यवहारांत व प्रपंचांत वागावे । परि न कोठे गुंतावें ॥ फार दिवसांचा वृक्ष झाला । घरांतील घडामोडी दिसती त्याला । जैसें तो न सोडी आपलें स्थान । तैसें वागावें आतां आपण ॥ ज्याचें घरी रामाचा वास । तेणें न राहावें कधीं उदास ॥ सदा राखावें समाधान । मुखीं भगवंताचें नाम ॥ आतां प्रेम ठेवा नामीं । कृपा करील चक्रपाणी ॥ आतां करा चित्त स्थिर । हृदयीं धरा रघुवीर ॥ रामावांचून न आणावा विचार । हाच माझा आशिर्वाद ॥
हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. |