श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/३ फेब्रुवारी

३ फेब्रुवारी

नाम घेतल्याने आपले अवगुण कळून येतील.




जगातली अनेक साधने जरी पाहिली तरी त्या सर्व साधनांची पहिली पायरी ही, की मनुष्याला त्याचे अवगुण दिसू लागणे. जसजसे साधन वाढत जाईल तसतसे आपल्यातले अवगुण प्रखररूपाने दिसू लागतात, आणि त्या अवगुणांचा पुढे डोंगरच वाटू लागतो. 'हे परमेश्वरा ! इतक्या अवगुणांनी मी भरलेला असताना, तुझे दर्शन व्हावे अशी मी कशी अपेक्षा करू ? एवढया पर्वतप्राय अवगुणांच्या राशीतून मला तुझे दर्शन होईल हे कालत्रयी तरी शक्य आहे का ?' असे वाटू लागते. साधन करण्यापूर्वी, रागीट माणूस कधी त्या रागाची खंत बाळगत नाही; किंबहूना, तो अवगुण आहे हे मुळी त्याला पटतच नाही. तो म्हणतो, 'व्यवहारात असा दरारा पाहिजेच; त्याशिवाय कसे चालेल ?' एक साधक मला म्हणाला की, 'अलीकडे मला फार राग येऊ लागला आहे.' वास्तविक, तो राग आताच येऊ लागला असे नसून पूर्वीपासूनच त्याच्याजवळ होता, परंतु साधन करू लागल्यापासून त्याला जाणीव होऊ लागली आहे, किंवा क्रोध वाईट आहे हे आता त्याला कळू लागले आहे, इतकेच !


एक लग्नाचा मुलगा होता. त्याने बऱ्याच मुली पाहिल्या, पण एकही त्याच्या मनास येईना. त्याचे आईवडील कंटाळून त्याला म्हणाले, ' तुला मुलगी पसंत पडू दे, मग आम्ही पुढचे काय ते ठरवू.' ते काही मुलगी पाहायला बरोबर जात नसत. त्या मुलाची मोठी बहीण होती तीच त्याच्याबरोबर जात असे. एका ठिकाणाहून मुलगी पाहून आल्यावर मोठया बहिणीने त्याला विचारले, 'कशी वाटली रे तुला ?' त्यावर तो म्हणाला, 'नाही बुवा आपल्याला पसंत.' मोठी बहीण चाणाक्ष होती; तिने फक्त त्याच्या तोंडासमोर आरसा धरला आणि विचारले, 'या प्रतिबिंबापुढे कशी काय वाटते ?' तेव्हा स्वतःचे आणि मुलीचे रूप त्याच्या ध्यानी आले, आणि तो म्हणाला, 'पुष्कळ बरी आहे.' सारांश, जिथपर्यंत आपल्याला स्वतःचे खरे दर्शन होऊ शकत नाही, तिथपर्यंत दुसऱ्यांचे अवगुणच आपल्याला दिसतात. आपल्याला दुसऱ्यांचे जे काही अवगुण दिसतात, त्यांचे बीज आपल्यातच आहे, हे माणसाने ठाम ओळखले पाहिजे. तेव्हा, दुसऱ्याचे अवगुण पाहण्याची वृत्ती आपण प्रथम टाकून दिली पाहिजे. दुसऱ्याचे अवगुण पाहणे हा साधा नेहमीचा व्यवहार आहे, तो परमार्थ नव्हे. खरा परमार्थी जो असतो तो सतत आत्मपरीक्षण करीत असतो. त्याला दुसऱ्याचे अवगुण दिसतच नाहीत; त्याला आपल्याच अवगुणांचे इतके दर्शन होते की, त्या मानाने इतर सर्वजण त्याला परमेश्वररूपच भासतात; आणि हाच खरा परमार्थ.



हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.