श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/६ मार्च

६ मार्च

वासनेचे प्राबल्य.


माझ्या निरूपणाचा तुम्हांस विसर पडतो म्हणूनच बरें आहे. एखादी गोष्ट चांगली आहे आणि ती मिळाली तर सुखप्रद होईल, ह्या गोष्टीची आठवण असूनही आपण ती मिळविण्यासाठी प्रयत्‍न करीत नाही, हे अगदी अयोग्य आहे. हे पापच आहे. जर आपल्याला समजलेच नाही तर ते न करण्यात पाप नाही, परंतु समजूनही न करण्यात अत्यंत पाप आहे. खरे म्हणजे, प्रयत्‍न करणे हे आपल्या हातात आहे. आपण ऐकतो की, अंतकाळी जी मती तीच गती. मृत्यूसमयी जशी वासना धरावी त्याप्रमाणे आपल्याला पुनर्जन्म प्राप्त होतो; तेव्हा वासनेतच आपला जन्म आणि वासनेतच आपला अंत, असे असताना तिला दूर कशी करता येईल ? एखादा मनुष्य काळा असेल तर त्याला आपले काळेपण काही घालवता येत नाही; त्याप्रमाणे, वासना असणे हा मनुष्याचा एक सहजगुण आहे, तो त्याला पालटता येत नाही. तर मग आम्हाला वासनेतून कधीच मुक्त होता येणार नाही का? मनुष्याच्या ठिकाणी इतर प्राणिमात्रापेक्षा जर काही वेगळे असेल तर चांगले काय आणि वाईट काय हे कळण्याची बुद्धी. आपण कळून सवरूनही वासनेला, अहंपणाला आधार देतो, इथेच आपले चुकते. आपला अहंपणा इतका खोल गेलेला आहे की, आपल्याला हे सर्व माझेच वाटते. माझी बायको, माझी मुले, माझे माझे म्हणून किती सांगावे ! त्या माझेपणामुळेच अहंभाव वाढीला लागून, सर्व काही आपल्या मनाजोगते, आपल्याला सुख देणारे, हवेसे वाटू लागते, आणि दुःख अगदी नकोसे वाटते. अर्थात्‌ जगात कोणालाच नुसते सुख मिळत नाही. असे असूनही अहंपणाला बळी पडून सुखाच्या लालचीने मनुष्य मरेपर्यंत बरीवाईट कृत्ये करीत असतो, आणि त्याप्रमाणे त्याची वासना बनत जाते. वासना म्हणजे अभिमान, म्हणजेच मीपणा. अशा रीतीने अहंपणाच जर वासनेचे मूळ अधिष्ठान आहे, तर तो नको का घालवायला ? खरोखरच, मनुष्याचा अहंपणा इतका खोल मुरलेला आहे की, त्याचे निर्मूलन करायला तसेच सूक्ष्म अस्त्र पाहिजे. नामाइतके प्रभावी आणि सूक्ष्म अस्त्र दुसरे कोणतेच नाही. ते परमेश्वराच्या अगदी जवळचे आहे. परंतु एवढे असूनही आपण ते आवडीने, निष्ठेने घेत नाही. आम्हांला सर्व काही समजते, परंतु नामस्मरण करण्याचा आळस आपल्यात भरलेला आहे; भगवंत कर्ता आहे असे अनुसंधान जो रात्रंदिवस ठेवील त्याचाच अहंकार जाईल हे ध्यानात ठेवून आपण भगवंताचे नाम घ्यावे.

मनाने भगवंताचे होणे हे भक्तीचे मर्म आहे. आपल्याला जे पाहिजे ते त्याच्याजवळ मागावे. मागितलेली वस्तू भगवंत देईल किंवा न देईल. वस्तू दिली तर बरेच झाले, पण आपण मागितलेली वस्तू भगवंताने दिली नाही तर ती देणे आपल्या हिताचे नव्हते असे खरे मनापासून वाटावे. ही भावना वाढण्यासाठी, भगवंत दाता आहे असे लक्षात ठेवून शक्य तितके त्याचे नामस्मरण करावे.


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.