श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/७ सप्टेंबर
७ सप्टेंबर
पैसा नीतिधर्माने मिळवावा.
काळजीचे काही कारण नसताना काळजीत राहण्याचे काहींना व्यसन असते. व्यवहारात काळजी हा मोठा विकल्प आहे. पैसा असल्यामुळे जर काळजी वाटू लागली, तर तो पैसाच दूर केला तर नाही चालणार ? पैसा टाकून देऊ नका, पण पैशाच्या प्रेमातही राहू नका. जिवापाड श्रम करून जो कमवायचा, तोच जर दुःखाला कारण होऊ लागला तर काय उपयोग ? पैसा काही आयुष्याचे सर्वस्व नव्हे, किंवा सर्वश्रेष्ठ ध्येय नव्हे. व्यवहारामध्ये जीवनाला पैसा आवश्यक आहे; आणि तो नीतीने वागून आपल्या पोटापुरता कमावणे जरूर आहे. पैसा मिळवावा हे व्यवहारदृष्ट्या योग्यच आहे, पण जर तो मिळाला नाही तर आपले जीवन व्यर्थ आहे असे कोणी समजू नये. पैसा आला तर भगवंताच्या इच्छेने आला, आणि यदाकदाचित तो गेला, तर भगवंताच्या इच्छेने गेला, असे म्हणून, आपले समाधान बिघडू देऊ नये. पैसा गेला म्हणून काही अब्रू जात नाही; आपली अब्रू आपल्या आचरणावर अवलंबून असते. अशी म्हण आहे की, ‘पैसा पुरून उरावा इतका मिळावा.’ पण आपल्याला जगात काय आढळते ? जीवनामध्ये पैसा आपल्याला पुरतो आणि आपल्या उरावर नाचतो. हे काही ‘पुरून उरणे’ नव्हे. याच्या उलट, आपण त्याला पुरावे आणि त्याच्या छातीवर नाचावे. मनुष्य नेहमी म्हणतो की, ‘माझ्या मुलाबाळांची तरतूद मला केली पाहिजे; मी काय, आज आहे आणि उद्या नाही.’ पण आपण जसे खात्रीचे नाही, तशी आपली मुलेबाळे तरी कुठे खात्रीची आहेत ? ही गोष्ट माणसाच्या लक्षातच येत नाही.
पैशाबद्दल रामचंद्राला उदासपण आले, असे योगवसिष्ठात वर्णन आहे. तसे ते आपल्यालाही लागू आहे; फरक एवढाच की, रामाचे उदासपण पैसा ‘असणेपणाचे’ होते, आणि आपले उदासपण पैसा ‘नसणेपणाचे’ आहे. पैसा नसल्याबद्दल आपल्याला उदासपण आहे, कारण तो प्रपंचातल्या सुखाचे साधन वाटते. पण त्याबरोबरच भगवंत हवा असेही आपल्याला वाटते. आता, आपण आपल्या पैशाचे बरोबर दोन भाग करू. आपल्याला प्रपंचाला लागेल इतका पैसा प्रामाणिकपणे मिळवून आपण जगावे. जास्तीची हाव करू नये. हा झाला आपला पैसा; अर्थात, राहिलेला सगळा दुसर्याचा. त्याचा लोभ करू नये. श्रीमंत मनुष्य हा पैशासाठी, म्हणजे लक्ष्मीसाठी, सर्व जीवन खर्च करतो. पण ती त्याचा मुळासकट नाश करते. म्हणून नारायणाच्या स्मरणात लक्ष्मी मिळवली, की ती आपला नाश न करता, आपल्या आनंदाला कारण होते.
हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. |