श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/८ ऑक्टोबर
८ ऑक्टोबर
प्रयत्न आणि परमेश्वर यांची सांगड घालावी.
जगात कुणीही सुखी नाही असे समर्थ सांगतात. पण एखादा राजाच्या पोटी जन्माला आला म्हणून सुखी झाला, असे आपण मानतो ! खाण्यापिण्याची अडचण नसली म्हणजे त्याला इतर काही काळज्याच नाहीत असे म्हणून कसे चालेल ? ' मागच्या जन्मी मी कुणाचा तरी घात केला म्हणून आज हे दुःख वाट्याला आले आहे, ' असे आपण म्हणतो, आणि त्याबरोबरच फलाशेने कर्म करून पुढील जन्माची तयारी आजच करू लागतो. पण त्यातून सुटण्याचा काही मार्ग दिसत नाही. कर्मामध्ये आजवर मोठेमोठे लोक गुंतून राहिले आहेत. जन्माला आलो तो जन्माचे सार्थक करून घेण्याकरिता; पण या फेर्यातच आपण अडकून पडलो तर काय उपयोग ? आपण एखाद्या कापडाच्या गिरणीत गेलो तर म्हणतो, 'काय धोटे फिरतात !' परंतु फिरवणारा तर दुसरीकडेच असतो, त्याप्रमाणे, देहाचे देहपण जीव असेल तोपर्यंत; त्यामधून तो जीवात्मा नाहीसा झाला की, देहाचे देहपणही नाहीसे होते. आत्म्याच्या संयोगाने सर्व काही चालते.
एका गृहस्थाला फार काम असे, जेवायलाही फुरसत मिळत नसे. त्याच्या आईने त्याच्या खिशात बदाम, खडीसाखर, वड्या अशा जिनसा टाकल्या आणि सांगितले की, "येताजाता, काम करता करता, एक एक तोंडात टाकीत जा." त्याप्रमाणे, संतांनी आम्हाला नामरूपी खाऊ दिला आणि सांगितले की, "येताजाता, काम करता करता, हा तोंडात टाकीत जा, म्हणजे लोभाची भूक लागणारच नाही, फार सुख होईल."
एका गृहस्थाचे त्याच्या भावाशी भांडण होते. त्याने जेव्हा आपले मृत्युपत्र केले तेव्हा त्यामध्ये लिहिले की, "माझ्या शवाला माझ्या भावाचा हात लागू नये." काय ही देहबुद्धीची पराकाष्ठा ! आज आपल्याला जे करणे योग्य आहे ते करायचे सोडून, मनुष्य कालचे आणि उद्याचे पाहात बसतो. पुष्कळ लोकांना 'उद्या काय होणार ' हे कळायला पाहिजे असते. पण आपला पुढचा काळ चांगला यावा म्हणून आपण आज चांगले वागणे जरूर आहे; तसे न करता मागच्याचा किंवा पुढच्याचा विचार करीत बसणे म्हणजे जे करू नये ते करणे, हे मायेचे लक्षण होय. मायेच्या तावडीत जे सापडलेले आहेत ते लोक करू नये ते करतील, आणि उद्याची काळजी करतील. मनुष्याची एक स्थिती कधीच कायम राहात नाही. आजची वाईट स्थिती जाऊन चांगली स्थिती उद्या ना परवा येणारच असते. पण आपला प्रयत्न आपण कधी सोडू नये. व्यवहारात नेहमी प्रयत्न आणि परमेश्वर यांची सांगड घालावी. कर्माचा हेतू जाळून टाकावा ही पुढची पायरी. रामाच्या इच्छेने सर्व काही होते ही दृढ भावना ठेवून, मरणाची भिती बाळगू नये आणि जाण्याची काळजी करू नये. नेहमी नामस्मरणात राहण्याचा प्रयत्न करावा.
हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. |