श्रीगणेशाय नमः ॥

सदाशिव अक्षरें चारी ॥ सदा उच्चारी ज्याची वैखरी ॥ जो नित्य शिवार्चन करी ॥ तो उद्धरी बहुतां जीवा ॥१॥

बहुत प्रायश्चित्तांचे निर्धार ॥ शास्त्रवक्ते करिती विचार ॥ परी जे शिवनामें शुद्ध साचार ॥ कासया इतर साधनें त्यां ॥२॥

नामाचा महिमा परमाद्गत ॥ त्यावरी प्रदोषव्रत आचरत ॥ त्यासी सर्वसिध्दि प्राप्त होत ॥ सत्य सत्य त्रिवाचा ॥३॥

तुष्टि पुष्टि धृति आयुष्यवर्धन ॥ संतति संपत्ति दिव्यज्ञान ॥ पाहिजे तिंहीं प्रदोषव्रत पूर्ण ॥ यथासांग करावें ॥४॥

प्रदोषव्रत भावें आचरितां ॥ या जन्मीं प्रचीत पहावी तत्वतां ॥ दारिद्र्य आणि महद्य्वथा ॥ निःशेष पळती षण्मासांत ॥५॥

एकसंवत्सरें होय ज्ञान ॥ द्वादशवर्षी महद्भाग्य पूर्ण ॥ हें जो असत्य मानील व्यासवचन ॥ त्यासी बंधन कल्पांतवरी ॥६॥

त्याचा गुरु लटिकाच जाण ॥ त्याची दांभिक भक्ति लटिकेंच ज्ञान ॥ उमावल्लभचरणीं ज्याचे मन ॥ त्याहुनि पावन कोणी नाहीं ॥७॥

मृत्यु गंडांतरे दारूण ॥ प्रदोषव्रतें जाती निरसोन ॥ येविषयीं इतिहास जाण ॥ सूत सांगे शौनकां ॥८॥

विदर्भदेशींचा भूभुज ॥ सत्यरथ नामें तेजःपुंज ॥ सर्वधर्मरत पराक्रमी सहज ॥ बंदीजन वर्णिती सदा ॥९॥

बहु दिवस राज्य करीत ॥ परी शिवभजनीं नाहीं रत ॥ त्यावरी शाल्वदेशींचा नृपनाथ ॥ बळें आला चालूनियां ॥१०॥

आणीक त्याचे आप्त ॥ क्षोणीपाल साह्य झाले बहुत ॥ सप्त दिवसपर्यंत ॥ युद्ध अद्भुत जाहलें ॥११॥

हा एकला ते बहुत ॥ समरभूमीसी सत्यरत ॥ धारातीर्थी पावला मृत्यु ॥ शत्रु नगरांत प्रवेशले ॥१२॥

राजपत्नी गरोदर राजस ॥ पूर्ण झाले नव मास ॥ एकलीच पायीं पळतां वनास ॥ थोर अनर्थ ओढवला ॥१३॥

परम सुकुमार लावण्यहरिणी ॥ कंटक सरांटे रूतती चरणीं ॥ मुर्च्छना येऊनि पडे धरणीं ॥ उठोनि पाहे मागें पुढें ॥१४॥

शत्रु धरितील अकस्मात ॥ म्हणोनि पुढती उठोनि पळत ॥ किंवा ते विद्युल्लता फिरत ॥ अवनीवरी वाटतसे ॥१५॥

वस्त्रें अलंकारमंडित ॥ हिर्याऐसे दंत झळकत ॥ जिचा मुखेंदु देखतां रतिकांत ॥ तन्मय होवोनि नृत्य करी ॥१६॥

पहा कर्माची गती गहन ॥ जिच्या अंगुष्ठी न पडे सूर्यकिरण ॥ ते गरोदर हिंडे विपिन ॥ मृगनेत्री गजगामिनी ॥१७॥

वनीं हिंडे महासती ॥ जेवीं नैषरायाची दमयंती ॥ कीं भिल्लीरूपें हैमवती ॥ दुस्तरवनी तैसी हिंडे ॥१८॥

कर्मनदीच्या प्रवाही जाण ॥ पडली तीस काढील कोण ॥ असो एका वृक्षाखाली येऊन ॥ परम व्याकुळ पडियेली ॥१९॥

शतांचीं शतें दासी ॥ ओळंगती सदैव जियेपासीं ॥ इंदुमती नाम जियेसी ॥ ते भूमीवरी लोळत ॥२०॥

चहुंकडे पाहे दीनवदनीं ॥ जिव्हा मुख वाळलें न मिळे पाणी ॥ तों प्रसूत झाली तोचि क्षणीं ॥ दिव्य पुत्र जन्मला ॥२१॥

तृषेनें तळमळी अत्यंत ॥ कोण उदक देईल तेथ ॥ बाळ टाकूनि उठत बसत ॥ गेली एका सरोवरा ॥२२॥

उदकांत प्रवेशली तेच क्षणीं ॥ अंजुळी भरूनि घेततें पाणी ॥ तंव ग्राहें नेली ओढोनि ॥ विदारूनी भक्षिली ॥२३॥

घोर कर्मांचें विंदान ॥ वनीं एकला रडे राजनंदन ॥ तंव उमानामक विप्रपत्नी जाण ॥ विगंतधवा पातली ॥२४॥

माता पिता बंधु पाहीं ॥ तियेलागीं कोणी नाहीं ॥ एका वर्षाचा पुत्र तीसही ॥ कडिये घेवोनि आली तेथें ॥२५॥

तों नाहीं केलें नालच्छेदन ॥ ऐसें बाळ उमा देखोन ॥ म्हणे आहा रे ऐसें पुत्ररत्न ॥ कोणीं टाकिलें दुस्तर वनीं ॥२६॥

म्हणे कोण याती कोण वर्ण ॥ मी कैसें नेऊं उचलून ॥ जावें जरी टाकून ॥ वृक व्याघ्र भक्षितील कीं ॥२७॥

स्तनी दाटूनी फुटला पान्हा ॥ नेत्रीं ढाळीत अश्रुजीवना ॥ बाळ पुढें घेऊनी ते ललना ॥ मुखकमळीं स्तन लावी ॥२८॥

संशयसमुद्रीं पडली वेल्हाळ ॥ म्हणे नेऊ कीं नको बाळ ॥ तंव तो कृपाळु पयःफेनधवल ॥ यतिरूप धरूनि पातला ॥२९॥

उमेलागीं म्हणे त्रिपुरारी ॥ बाळ नेई संशय न धरी ॥ महद्भाग्य तुझें सुंदरी ॥ क्षत्रियराजपुत्र तुज सांपडला ॥३०॥

कोणासी न सांगे हे मात ॥ समान पाळीं दोघे सुत ॥ भणंगासी परीस होय प्राप्त ॥ तैसें तु जाहलें ॥३१॥

अकस्मात निधी जोडत ॥ कीं चिंतामणि पुढें येऊनि पडत ॥ कीं मृताच्या मुखांत ॥ पडे अमृत पूर्वदत्तें ॥३२॥

ऐसें बोलोनि त्रिपुरारी ॥ गुप्त झाला ते अवसरीं ॥ मग दोघे पुत्र घेवोनि ते नारी ॥ देशग्रामांतरीं हिंडत ॥३३॥

ब्रह्मपुत्राचें नाम शुचिव्रत ॥ राजपुत्राचें नाम ठेविले धर्मगुप्त ॥ घरोघरी भिक्षा मागत ॥ कडिये खांदी घेऊनिंया ॥३४॥

लोक पुसतां उमा सांगत ॥ माझे पोटीचे दोघे सुत ॥ ऐसी हिंडत हिंडत ॥ एकचक्रनगरा पातली ॥३५॥

घरोघरी भिक्षा मागत ॥ तों शिवालय देखिलें अकस्मात ॥ आंत द्विज दाटले बहुत ॥ शांडिल्य त्यांत मुख्य ऋषि ॥३६॥

शिवाराधना करिती विधियुक्त ॥ तों उमा आली शिवालयांत ॥ क्षण एक पूजा विलोकीत ॥ तों शांडिल्य ऋषी बोलिला ॥३७॥

अहा कर्म कैसें गहन ॥ हा राजपुत्र हिंडे दीन होऊन ॥ कैसें विचित्र प्राक्तन ॥ उमा वचन ऐकती झाली ॥३८॥

ऋषीचे चरण उमा धरीत ॥ म्हणे याचा सांगा पूर्ववृत्तांत ॥ त्रिकालज्ञानी महासमर्थ ॥ भूतभविष्यज्ञान तुम्हां ॥३९॥

याचीं माता पिता कोण ॥ आहेत कीं पावलीं मरण ॥ यावरी शांडिल्य सांगे वर्तमान ॥ याचा पिता जाण सत्यरथ ॥४०॥

तो पूर्वी होता नृप जाण ॥ प्रदोषसमयीं करी शिवार्चन ॥ तों शत्रु आले चहूंकडोन ॥ नगर त्याचें वेढिलें ॥४१॥

शत्रूची गजबज ऐकून ॥ उठिला तैसीच पूजा सांडोन ॥ तंव प्रधान आला पुढें धांवोन ॥ शत्रु धरोनि आणिले ॥४२॥

त्यांचा शिरच्छेद करून ॥ पूजा पूर्ण न करितां उन्मत्तपणें ॥ तैसाच जाऊनि करी भोजन ॥ नाहीं स्मरण विषयांधा ॥४३॥

त्याकरितां या जन्मीं जाण ॥ सत्यरथ अल्पायुषी होऊन ॥ अल्पवयांत गेला मरोन ॥ म्हणोनि पूजन न सोडावें ॥४४॥

याच्या मातेनें सवत मारिली ॥ ती जळीं विवशी झाली ॥ पूर्ववैरें वोढोनि नेली ॥ क्रोधे भक्षिली विदारूनी ॥४५॥

हा राजपुत्र धर्मगुप्त ॥ यानें कांहीच केलें नाहीं शिवव्रत ॥ म्हणोनि मातापितारहित ॥ अरण्यांत पडियेला ॥४६॥

याकरितां प्रदोषकाळीं ॥ अव्यग्र पूजावा इंदुमौळी ॥ पूजन सांडुनि कदाकाळीं ॥ सर्वथाही न उठावें ॥४७॥

भवानीसी बैसवूनि कैलासनाथ ॥ प्रदोषकाळी पुढें नृत्य करीत ॥ वाग्देवी वीणा वाजवीत ॥ वेणु पुरुहूत वाजवीतसे ॥४८॥

अंबुजसंभवताल सांवरी ॥ भार्गवी गातसे मधुरस्वरीं ॥ मृदंग वाजवी मधुकैटभारी ॥ नृत्यगती पाहूनियां ॥४९॥

यक्षपति शिवप्राणमित्र ॥ हस्त जोडोनि उभा समोर ॥ यक्षगण गंधर्व किन्नर ॥ सुरासुर उभे असती ॥५०॥

ऐसा प्रदोषकाळींचा महिमा ॥ अगोचर निगमागमां ॥ मग काय बोले उमा ॥ मम पुत्र दरिद्री कां झाला ॥५१॥

तुझ्या पुत्रें प्रतिग्रह बहुत ॥ पूर्वी घेतले दुष्ट अमित ॥ दान केलें नाहीं किंचित ॥ शिवार्चन न करी कदा ॥५२॥

परान्नें जिव्हा दग्ध यथार्थ ॥ दुष्ट प्रतिग्रहें दग्ध हस्त ॥ स्त्रीअभिलाषें नेत्र दग्ध होत ॥ मंत्रासी सामर्थ्य मग कैचें ॥५३॥

मग उमेनें पुत्र दोन्ही ॥ घातले ऋषीचे चरणीं ॥ तेणें पंचाक्षर मंत्र उपदेशुनी ॥ प्रदोषव्रत उपदेशिलें ॥५४॥

पक्षप्रदोष शनिप्रदोष ॥ महिमा वर्णिला अतिविशेष ॥ निराहार असावें त्रयोदशीस ॥ दिवसा सत्कर्म आचरावें ॥५५॥

तीन घटिका झालिया रजनी ॥ प्रदोषपूजा आरंभावी प्रीतीकरूनी ॥ गोमयें भूमी सारवूनी ॥ दिव्यमंडप उभारिजे ॥५६॥

चित्रविचित्र वितान ॥ कर्दळीस्तंभ इक्षुदंडेकरून ॥ मंडप कीजे शोभायमान ॥ रंगमाळा नानापरी ॥५७॥

शुभ वस्त्र नेसावें आपण ॥ शुभ गंध सुवाससुमन ॥ मग शिवलिंग स्थापून ॥ पूजा करावी विधियुक्त ॥५८॥

प्राणायाम करून देखा ॥ अंतर्बाह्य न्यास मातृका ॥ दक्षिणभागीं पूजावें मुरांतका ॥ सव्यभागीं अग्नि तो ॥५९॥

वीरभद्र गजानन ॥ अष्टमहासिध्दि अष्टभैरव पूर्ण ॥ अष्टदिक्पालपूजन ॥ सप्तावरणीं शिवपूजा ॥६०॥

यथासांग शिवध्यान ॥ मग करावें पूजन ॥ राजोपचारें सर्व समर्पून ॥ करावें स्तवन शिवाचें ॥६१॥

जयजय गौरीनाथ निर्मळ ॥ जय जय कोटिचंद्र सुशीतळ ॥ सच्चिदानंदघन अढळ ॥ पूर्णब्रह्म सनातन ॥६२॥

ऐसें प्रदोषव्रत ऐकवून ॥ बाळ उपदेशिले दोघेजण ॥ मग ते एकमनेंकरून ॥ राहते झाले एकचक्रीं ॥६३॥

चार महिनेपर्यंत ॥ दोघेही आचरतीप्रदोषव्रत ॥ गुरुवचने यथार्थ ॥ शिवपूजन करिती पै ॥६४॥

शिवपूजा न द्यावी सर्वथा ॥ न द्यावे प्रसादतीर्था ॥ शतब्रह्महत्यांचें पाप माथां ॥ होय सांगता शांडिल्य ॥६५॥

सर्व पापांहूनि पाप थोर ॥ शिवपूजेचा अपहार ॥ असो ते दोघे किशोर ॥ सदा सादर ॥ शिवभजनीं ॥६६॥

ब्रह्मपुत्र शुचिव्रत ॥ एकला नदीतीरीं क्रीडत ॥ दरडी ढांसळतां अकस्मात ॥ द्रव्यघट सांपडला ॥६७॥

घरासी आला घेऊन ॥ माता संतोषली देखोन ॥ म्हणे प्रदोषव्रताचा महिमा जाण ॥ ऐश्वर्य चढत चालिलें ॥६८॥

राजपुत्रास म्हणे ते समयीं ॥ अर्ध द्रव्यविभाग घेई ॥ थेरू म्हणे सहसाही ॥ विभाग न घेई अग्रजा ॥६९॥

या अवनींतील धन ॥ आमुचेंचि आहे संपूर्ण ॥ असो ते दोघे शिवध्यान शिवस्मरण ॥ न विसरती कदाही ॥७०॥

यावरी एकदां दोघेजण ॥ गेले वनविहारालागून ॥ तों गंधर्वकन्या येऊन ॥ क्रीडतां दृष्टीं देखिल्या ॥७१॥

दोघेपाहती दुरूनी ॥ परम सुंदर लावण्यखाणी ॥ शुचिव्रत म्हणे राजपुत्रालागुनी ॥ परदारा नयनी न पहाव्या ॥७२॥

दर्शने हरती चित्त ॥ स्पर्शनें बळ वीर्य हरीत ॥ कौटिल्यदंभसयुक्त ॥ महाअनर्थकारिणी ॥७३॥

ब्रह्मसुतासी तेथें ठेऊन ॥ राजपुत्र चालिला सुलक्षण ॥ स्वरूप सुंदर मन्मथाहून ॥ आकर्णनयन कोमलांग ॥७४॥

जवळी येवोनि पाहात ॥ तंव मुख्य नायिका विराजित ॥ अंशुमती नामें विख्यात ॥ गंधर्वकन्या पद्मिनी ॥७५॥

कोद्रविणनामा गंधर्वपती ॥ त्याची कन्या अंशुमती ॥ पिता पुसे महेषाप्रती ॥ हे कन्या अर्पू कोणातें ॥७६॥

मग बोले हिमनगजामात ॥ धर्मगुप्त सत्यरथाचा सुत ॥ तो माझा परम भक्त ॥ त्यासी देई अंशुमती ॥७७॥

हे पूर्वीचें शिववचन ॥ असो यावरी अंशुमती पाहे दुरोन ॥ न्याहाळीत राजनंदन ॥ वाटे पंचबाण दुसरा ॥७८॥

क्षीरसिंधूंत रोहिणीरमण ॥ काय आला कलंक धुवोन ॥ तैसें राजपुत्राचें वदन ॥ अंशुमती न्याहाळी ॥७९॥

बत्तिसलक्षण संयुक्त ॥ अजानुबाहू चापशरमंडित ॥ विशाळ वक्षःस्थळ चालत ॥ करिनायक ॥ ज्यापरी ॥८०॥

ऐसा तो गुणाढ्य देखूनि त्वरित ॥ अंशुमती सखयांप्रति सांगत ॥ तुम्ही दुज्या वनाप्रति जाऊनि समस्त ॥ सुमनें आणावी सुवासें ॥८१॥

अवश्य म्हणोनि त्या ललना ॥ जात्या झाल्या आणिका वना ॥ अंशुमती एकली जाणा ॥ राजपुत्रा खुणावीत ॥८२॥

भूरुहपल्लव पसरून ॥ एकांती घातलें आसन ॥ वरी वृक्षडाहाळिया भेदून ॥ भूमीवरी पसरिल्या ॥८३॥

असो तेथें बैसला येऊन ॥ राजपुत्र सुहास्यवदन ॥ विशाळ भाळ आकर्णनयन ॥ आरक्त ओष्ठ सुकुमार ॥८४॥

मंजुळभाषिणी नेत्रकटाक्षबाणीं ॥ विंधिली ते लावण्यहरिणी ॥ मनोजमूर्च्छना सांवरूनी ॥ वर्तमान पुसे तयातें ॥८५॥

श्रुंगारसहोवरा तुजपासीं ॥ मी वास करीन राजहंसी ॥ देखतां तव वदन दिव्यशशी ॥ मम मानसचकोर नृत्य करी ॥८६॥

तव मुखाब्ज देखतां आनंद ॥ झेंपावती मम नेत्रमिलिंद ॥ कीं तव वचन गर्जता अंबुद ॥ मम चित्तशिखी नृत्य करी ॥८७॥

कविगुरूंहुनि तेज विशाळ ॥ आत्मकंठीची काढिली मुक्ताफळमाळ ॥ कंठी सूदली तत्काळ ॥ चरणीं भाळ ठेवीत ॥८८॥

म्हणे मी कायावाचामनेंकरून ॥ तुझी ललना झालें पूर्ण ॥ यावरी धर्मगुप्त वचन ॥ काय बोलता जाहला ॥८९॥

मी जनकजननीविरहित ॥ राज्यभ्रष्ठ दरिद्री अत्यंत ॥ तव पित्यासी कळतां मात ॥ घडे कैसें वरानने ॥९०॥

यावरी म्हणे अंशुमती ॥ तीन दिवसां येईन या स्थळाप्रती ॥ तुम्हीं यावें शीघ्रगती ॥ लग्नसिध्दि साधावया ॥९१॥

ऐसें बोलून ते चातुर्यराशी ॥ वेगें आली पितयापाशीं ॥ झालें वर्तमान सांगे त्यासी ॥ तो परम मानसी संतोषला ॥९२॥

राजपुत्र गेला परतोन ॥ बंधुप्रती सांगे सर्व वर्तमान ॥ शांडिल्यगुरूचें वचन स्मरून ॥ म्हणती प्रसाद पूर्ण त्याचा हा ॥९३॥

गुरुचरणीं ज्याचें मन ॥ त्यासी ऐश्वर्यासी काय न्यून ॥ काळमृत्युभयापासून ॥ सर्वदा रक्षी देशिक तो ॥९४॥

यावरी ते दोघे बंधु येऊन ॥ मातेसी सांगती वर्तमान ॥ येरी म्हणे धन्य धन्य शिवभजन ॥ फळ देते चालिलें ॥९५॥

यावरी तिसरे दिवशीं ॥ दोघेही गेले त्या वनासी ॥ गंधर्वराज सहपरिवारेंसी ॥ सर्व सामग्री घेऊनि आला ॥९६॥

दृष्टी देखतां जामात ॥ गंधर्व आनंदसमुद्रीं पोहत ॥ छत्र सेना सुखासन त्वरित ॥ धाडूनि उमा आणविली ॥९७॥

यावरी यथासांग लग्न ॥ चारी दिवस पूर्ण ॥ कोणी एक पदार्थ न्यून ॥ पडिला नाहीं तेधवां ॥९८॥

स्वर्गीच्या दिव्य वस्तु अमोलिक सतेज ॥ विहिणीस देत गंधर्वराज ॥ लक्ष रथ दहा सहस्त्र गज ॥ तेजःपुंज एक लक्ष वाजी ॥९९॥

एक लक्ष दास दासी ॥ अक्षय कोश रत्नराशी ॥ अक्षय भाते देत शक्तिसी ॥ दिव्य चाप बहुसाल ॥१००॥

अपार सेना संगे देत ॥ एक सेनापतिगंधर्व बळिवंत ॥ उमा दोघां पुत्रांसववेत ॥ मान देवोनि बोलविली ॥१॥

सुखासनारूढ अंशुमती ॥ पतीसवें चालली शीघ्रगती ॥ कनकवेत्रपाणी पुढें धांवती ॥ वाहनासवें जियेच्या ॥२॥

चतुर्विध वाद्यांचे गजर ॥ चतुरंग चालिला दळभार ॥ येऊनि वेढिलें विदर्भनगर ॥ सत्यरथ पितयांचें ॥३॥

नगरदुर्गावरूनि अपार ॥ उल्हाटयंत्राचा होत भडिगार ॥ परीगंधर्वाचें बळ फार ॥ घेतलें नगर क्षणार्धे ॥४॥

जेणें पूर्वी पिता मारिला जाण ॥ त्याचें नाम दुर्मर्षण ॥ तो जिताचि धरूनि जाण ॥ आपला करून सोडिला ॥५॥

देशोदेशींचे प्रजाजन ॥ धांवती करभार घेऊन ॥ उत्तम मुहूर्त पाहू ॥ सिंहासनारूढ जाहला ॥६॥

माता उमा बंधौ शुचिव्रत ॥ त्यांसमवेत राज्य करीत ॥ दहा सहस्त्र वर्षेपर्यंत ॥ यशवंत राज्य केलें ॥७॥

शांडिल्य गुरु आणून ॥ शतपद्म अर्पिलें धन ॥ रत्नाभिषेक करून ॥ अलंकार वस्त्रे दीधलीं ॥८॥

दुर्भिक्ष जळशोष अवर्षण ॥ आधि व्याधि वैवध्य मरण ॥ दुःख शोक कलह विघ्न ॥ राज्यांतूनि पळालीं ॥९॥

प्रजा भूदेव दायाद ॥ देती रायासी आशिर्वाद ॥ कोणासही नाहीं खेद ॥ सदा आनंद घरोघरी ॥१०॥

ऐसा अंशुमती समवेत ॥ धर्मगुप्त राज्य करीत ॥ यौवराज्य शुचिव्रतातें देत ॥ पारिपत्य सर्व करी ॥११॥

ऐसें दहा सहस्त्र वर्षे राज्य करून ॥ सुदत्तपुत्रासी राज्य देऊन ॥ चिंतितां मनीं उमाधवचरण ॥ दिव्य विमान धाडिलें ॥१२॥

दिव्य देह पावोनि नृपती ॥ माताबंधुसमवेत अंशुमती ॥ शिवाविमानीं बैसती ॥ करीत स्तुति शिवाची ॥१३॥

कैलासपदासी जाऊन ॥ जगदात्मा शिव विलोकून ॥ जयजयकार करून ॥ लोटांगणे घालिती ॥१४॥

दीनबंधु जगन्नाथ ॥ पतितपावन कृपावंत ॥ हृदयीं धरूनी समस्त ॥ अक्षयपदीं स्थापिलीं ॥१५॥

हें धर्मगुप्तांचें आख्यान ॥ करिती श्रवण पठण ॥ लेखन रक्षण अनुमोदन ॥ तरी पंचवदन रक्षी तयां ॥१६॥

सकळ पापां होय क्षय ॥ जेथें जाय तेथें विजय ॥ धनधान्यवृध्दि होय ॥ ऋण जाय निरसुनी ॥१७॥

प्रदोषमहिमा अद्भुत ॥ जे आचरती ऐकूनि ग्रंथ ॥ तेथें कैचें दारिद्र मृत्य ॥ सत्यसत्य त्रिवाचा ॥१८॥

ज्याच्या घरीं शिवलीलामृत ग्रंथ ॥ त्याची शिव पाठी राखीत ॥ सदा हिंडे उमाकांत ॥ अंती शिवपद प्राप्त तया ॥१९॥

हा ग्रंथ आम्रवृक्ष सुरस ॥ पद्मरचनाफळें आलीं पाडास ॥ कुतर्कवादी जे वायस ॥ मुखरोग त्यांस नावडे ॥१२०॥

जयजय ब्रह्मानंदा विरूपक्षा ॥ श्रीधरवरद सर्वसाक्षा ॥ दुष्टकर्ममोचका कर्माध्यक्षा ॥ न येसी लक्षा निगमागमा ॥२१॥

शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड ॥ स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड ॥ परिसोत सज्जन अखंड ॥ पंचमोध्याय गोड हा ॥१२२॥

इति पंचमोऽध्यायः ॥५॥

॥श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥

हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.