संस्कृती/महाभारत आणि रामायण १

एक

महाभारत आणि रामायण. १

 कालमानाप्रमाणे रामायणातल्या व्यक्ती महाभारतातील व्यक्तींच्या आधी सुमारे शे-सव्वाशे वर्षांच्या (Pradhan, Pargitar). रामायणाची कथावस्तू आधीची व महाभारताची नंतरची. पण महाभारत वाचल्यावर रामायण हातात घेतले की महाभारताच्या मानाने आपल्याला परिचित अशा आधुनिक सृष्टीत आपण वावरतो, असे वाटते.

 रामकथा महाभारतात आली आहे. आणि तिच्यात वाल्मीकि-रामायणातले श्लोकच्या श्लोक आहेत. ह्यावरून म्हणता येईल की, एकतर आपल्याला माहीत आहे त्या स्वरूपात रामायण महाभारतापूर्वी रचिले गेले, किंवा महाभारतात जे जुने रामोपाख्यान होते, त्यात कोणी नव्याने वाल्मीकिरामायणातील श्लोकांची भर घातली. ह्यांतील कोठचे बरोबर, हे सांगणे कठीण. पण असे वाटते की, महाभारत रचायच्या आधीपासून रामकथा लोकांना माहीत होती, व ती लोकांत गाइली जात होती. ह्या लोकगीतांचे वाल्मीकीने आदिकाव्य बनविले असावे; व भारतातल्या रामकथेतील श्लोक हे मागाहून घुसडून दिले असावे. महाभारत-रामायणांतील साम्ये खूपच आहेत; त्याचप्रमाणे त्यांच्यातील फरकसुद्धा फार विचार करायला लावतात. बरीचशी साम्ये बाह्यांगाचीच आहेत. महाभारतातील एकेका मोठ्या विभागाला 'पर्व' हे नाव दिले आहे, तर रामायणात पर्वाचाच अर्थ असलेला 'काण्ड' हा शब्द वापरला आहे. कवीचा स्वतः कथेशी संबंध दोन्ही काव्यांत दाखविला आहे. महाभारत, रामायणांतील साम्याचे एक कारण सर्वस्वी सामाजिक आहेः ते म्हणजे कथाविषय हिंदूंच्या पितृप्रधान, बहुपत्नीक, एकत्र - कुटुंबपद्धतीमुळे निर्माण झाला आहे हे. त्यामुळे कुटुंबाचे एकंदर चित्र व कुटुंबातील व्यक्तींचा संघर्ष ह्यांच्यात खूपच साम्य आहे. दुसरेही साम्य असेच सामाजिक स्वरूपाचे व हिंदूंच्या जुन्या राज्यपद्धतीमुळे उत्पन्न झालेले आहे. महाभारतात ज्याप्रमाणे लाहानलहान ,एका तालुक्याएवढीसुद्धा नाहीत अशी राज्ये, त्या राज्यांतील एकमेव शहर म्हणजे राजधानी व तेथे वंशपरंपरा राज्य करणा-या घराण्यांचे अस्तित्व ही दिसतात. अगदी तशीच रामायणातही आहेत. अयोध्या, मिथिला, अंगदेशाच्या रोमपादाचे राज्य, विशाला नगरीचे राज्य ही सगळी अगदी एकमेकांजवळ आहेत. रथात बसून राज्याच्या सीमेवर राम काय किंवा भरत काय, एका दिवसात पोहोंचतात. फरक हा की, महाभारतातील राज्ये व राजकुले वैवाहिक, कौटुंबिक व राजकीय संबंघांनी बांधिलेली किंवा तुटलेली अशी आहेत. हे संबंध गोष्टीला पोषक असे आहेत. तसा प्रकार रामायणात मुळीच नाही. दोन्ही पुस्तकांत कथानायकावर वनवास ओढवला आहे व दोन्ही पुस्तकांत युद्ध आहे. एका पुस्तकाचे मूळचे रूप ‘एक इतिहासव दुस-याचे ‘एक कथा ' असे असावे: कृष्ण काय किंवा राम काय, ह्यांना अवतार मागाहून ठरविण्यात आले. त्यामुळे अवतार म्हणून येणारी त्यांची वर्णने व त्यांच्यां अंगाने आलेल्या इतर गोष्टी दोन्ही पुस्तकांत मागाहून घुसडत्या आहेत. महाभारतात संभवपर्व ब अंशावतरण म्हणून जो भाग आहे, त्याचीच नक्कल रामायणात आढळते. विशेष गमतीदार साम्य पुढीलप्रमाणे आहे: महाभारतामध्ये भृगुकुलातील कोणा माणसाने जागोजाग, विशेषतः आदिपर्वात कथेशी संबंध नसलेल्या भृगुकुलाचा इतिहास घुसडला आहे. अगदी तोच प्रकार रामायणाच्या बालकांडात विश्वामित्राच्या इतिहासाबाबत झालेला आहे. कौशिक-कुलाचा हा सबंध इतिहास आणि रामायणाची कथा यांचा काडीमात्र संबंध नाही. आणखी एक साम्य म्हणजे महाभारतातील युद्ध आणि त्यावेळी होणारी लोकांची संभाषणे ही सर्वच्यासर्व संजयाला व्यासाने दिलेल्या दिव्यदृष्टीमुळे कळू लागली. तसेच, स्वतः अनुभविले नसताही दिव्यदृष्टीने सर्व रामचरित वाल्मीकीला अवगत झाले. महाभारत आणि रामायण ह्यांतील सर्व कविता अनुष्टुभ् छंदात आहेत. ह्यांखेरीज इतर भाषाविषयक, व्याकरणविषयक वगैरे पुष्कळच साम्ये हिन्दी व विलायती संशोधकांनी दाखविलेली आहेत.

                                                                      ।। संस्कृती ।। जशी साम्ये लक्षात येतात तशीच, किंबहुना त्यापेक्षा जास्त, भिन्नता

लक्षात भरते. सुरूवातच मुळी हा फरक दाखविते. एका अरण्यात यज्ञविधी करून, मंत्र म्हणून कंटाळलेल्या ऋषींना महाभारतकथा सांगितलेली आहे. सांगणारा सूत आहे. त्याला पौराणिक आणि मुनी म्हटले आहे. वंशपरंपरा इतिहास सांगण्याचा त्याचा धंदा होता. त्याच्या बापाचे नाव होते 'लोमहर्षण. म्हणजे 'रोमांचकारी कथा सांगणारा'. प्रत्यक्ष सांगणा-याचे नाव 'उग्रश्रवस्' म्हणजे ‘भोठ्या आवाजाचा' असे होते. कथा चित्तथरारक असावी व सांगणाऱ्याचा आवाज खणखणीतमोठा असावा, अशी अपेक्षा होती. कथा सांगावयास वीरासन घालून बसत होते की काय. माहीत नाही. पण कथेचा थाट ऐकला, म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील पोवाड्यांची आठवण होते. अगदी ह्याउलट रामायणकथेचा आरंभ आहे. वाल्मीकीने कथा रचिल्यावर ती दोन गायकांना शिकविली. त्यांचे नाव 'कुशीलव. हे तरुण होत; देखणे होते. गाण्याचे त्यांना ज्ञान होते; तालाचेही ज्ञान होते. कदाचित नृत्यही त्यांना माहीत असावे. दोघेजण अयोध्येच्या रस्त्यांतून गात-गात फिरत असताना भरताने त्यांना पाहिले व ऐकिले आणि रामाकडे आणिले. त्यांनी रामायण गायला सुरूवात केली. रामायण ही एक रम्यकथा होती. महाभारताप्रमाणे एका राजवंशाचा चार पिढ्यांचा इतिहास नव्हता. रस्त्याने गायकांनी कथा गात जावे, त्यांना कुणीतरी घरी बोलवावे. किंवा रस्त्यात एखाद्या चौकात उभे राहून त्यांनी कथा मांडावी, भोवती लोक जमावे. हा प्रकार कथा सांगण्याच्या बाबतीत आता शहरांतून दिसत नाही. पण अगदी तेराव्या शतकापर्यंत अशा त-हेचे गायक असत. हे आपल्याला ‘उत्तराध्ययन' सूत्रावरील टीकेमध्ये चित्त आणि संभूत ह्या दोन भावांची जी कथा सांगितली आहे, तीवरून दिसून येते. हा गायनप्रकार पोवाडा नव्हे; लावणीवजा व तमाशावजाही नव्हे; तर पोवाड्यापेक्षा, लळित व लावणी यांपेक्षा भारदस्त असे एक लोकरंजनाचे साधन होते, असे दिसते. ह्या गीताचे गायक कुशीलव म्हणजे कुश आणि लव असे सीतेचे दोन मुलगे होते, असे रामायणात सांगितले आहेपण 'कुशीलव' हा एक स्वतंत्र ।। संस्कृती ।। शब्द आहे. त्याचा अर्थ मनुस्मृती, महाभारत यांमध्ये एक 'हलक्या प्रतीचे नाटक , गाणे करणारे ब्राह्मण’ असा आहे. ज्यांना श्राद्धाला बोलावू नये. अशांच्या यादीत कुशीलव सापडतात. हे कुशीलव जोडीजोडीने आपला धंदा करीत असले पाहिजेत. म्हणून संस्कृतातील ‘कुशीलवौ’ हे द्विवचन रामायणात वापरलेले दिसते; आणि पुढे सीता त्यागाची कथा रचिली, तेव्हा कुशीलवौ चे कुश आणि लव असे दोन मुलगे झाल्याचा संभव आहे. कोशामध्ये दिले आहे की, 'कुशीलव’ हा शब्द हेमचंद्राने ('अनेकार्थसंग्रह') वाल्मीकीसाठी वापरला आहे. मेदिनीकोशात याचा असाच अर्थ आहे ,असे दिसते. त्यामुळे हा घोटाळा आणखी वाढतो. वाल्मीकी स्वतः हे काव्य रचून गाणारा कुशीलव होता की काय, अशी शंका येते. व्यास, वसिष्ठ, विश्वामित्र वगैरे ऋषींच्या कुळांची जशी आपल्याला पुष्कळ माहिती आहे, तशी वाल्मीकीबद्दल नाही. तो एक मोठा ऋषी होऊन गेला, ह्यापलीकडे बाकीच्या मागाहूनच्या कथांत असे सांगितले आहे की, वाल्मीकी हा ब्राह्मणेतर जातीतील एक मनुष्य होता. तो हिंसा करीत असे: पुढे त्याला उपरती झाली, व तो मोठा ऋषी झाला. ही कथा रामायणाच्या संशोधित आवृत्तीत नाही; ती फार उत्तरकालीन आहे. पण वाल्मीकी कुशीलव- जातीतील गायक होता, ह्या समजुतीला काहीतरी आधार असावा, असे वाटते. ऋषीचे कूळ शोधू नये म्हणतात ,तसे कवीचेही शोधू नये. तो कोणी का असेना. त्याच्या तोंडातून बाहेर पडलेले शब्द काव्य असले, म्हणजे झाले. सध्याच्या रामायणाच्या आवृत्तीत वाल्मीकी हा मोठा ऋषी होता, असे दाखविले आहे. तो स्नानाला गेला असताना एका व्याधाने क्रौंचपक्ष्यांच्या जोडीतील एकाला मारलेले त्याने पाहिले. उरलेली पक्षीण जोडीदार गमावल्यामुळे दुःखाने आक्रंदत होती. हे दुःख वाल्मीकीच्या अंतरी उमटले, व त्याच्या तोंडून रागारागाने व्याधाला उद्देशून शापवाणी बाहेर पडली. रागाने बाहेर पडलेले शब्द अनुष्टुभ् छंदात होते. वाल्मीकी घरी गेल्यावर ब्रह्मदेव स्वतः त्यांना भेटायला येऊन 'तुम्ही काय्य करा, असे सांगून गेला. ह्याआधीच

                                                                      ।। संस्कृती ।। काही काल नारदमुनीने येऊन पृथ्वीमधील उत्तमपुरूष हा अयोध्यावासी राम

कसा आहे, त्याचे वर्णन केंले होते. ब्रह्मदेवाने सांगितले की, रामचरित्रातील कोठलीही गोष्ट वाल्मीकीला अज्ञात राहणार नाही. सांगितल्याप्रमाणे वाल्मीकीने आपला तरूण समकालीन जो राम, त्याच्यावर काव्य केले. युद्धाची हकीकत महाभारतात संजय सबंधच्या सबंध सांगत असे. पण तो स्वतः युद्धभूमीवर जात असे, असे दिसते. वाल्मीकी आपल्या आश्रमातून बाहेर गेले नाहीत. फक्त सीतात्यागानंतर रामाच्या दरबारी गेले तेवढेच. सर्व काव्य त्यांनी आपल्या आश्रमात बसून लिहीले. रामायण म्हणजे एका कवीला स्फूर्ती होऊन झालेले काव्य; 'शोकापासून उत्पन्न झालेले श्लोक' , ह्या सर्व गोष्टींचा विचार केला, म्हणजे असे वाटते की, रामकथा कदाचित एखादी सीता नावाच्या साध्वीची कथा असावी. अशा कथा लोकांमध्ये प्रसिद्ध होत्या. त्यांतील एखादीतरी कथा शोकान्त असावी, असे क्रौंचवधापासून केलेल्या सुरूवातीमुळे वाटते. ह्या लोककथा ऐकून वाल्मीकींनी एक मोठीच कथा रचून तीत तिची गुंफण केली, असे दिसते. महाभारत हे राजघराण्याच्या चार व जास्त पिढ्यांचा बखरीवजा इतिहास व काही जुने चरित्र असे आहे; तर रामायण म्हणजे काही लोककथा व काही अदभुत कथा यांचे मिश्रण आहे. हा एक मोठा फरक रामायण- महाभारतांत आढळतो. रामायणावर फ्रेंच व जर्मन पंडितांनी पुष्कळ काम केले आहे. त्यातला काही भाग, कै. डॉ. सुखटणकरांचा लेख व रामायणाच्या संशोधित आवृत्तीत संपादकांची निरनिराळ्या कांडांवरील प्रस्तावना व माझे स्वतःचे वाचन ह्या आधारावर हे लेख लिहीले आहेत. कै. भास्करराव जाधव ह्यांनी कित्येक वर्षांपूर्वी रामायणावर फार विचारप्रवर्तक लेख लिहिले होते. तेही मी वाचले आहेत. पण आता मात्र ते लेख माझ्यापुढे नाहीत

                                                                         -१९७०

। संस्कृती ।।