संस्कृती/महाभारत आणि रामायण २
दोन
महाभारत आणि रामायण. २
महाभारत हा 'इतिहास' व रामायण हे 'काव्य’ म्हटले, यात दुसरे फरक
ओघानेच आले आहेत. महाभारत हे रामायणापेक्षा कितीतरी मोठे आहे. पण
‘शांती’ आणि 'अनुशासन ' ही पर्वे वगळल्यास कथेचा धागा तुटल्यासारखा
चाटत नाही. रामायणाचे तसे होत नाही. बालकांड बरेचसे प्रक्षिप्त आहे.
अयोध्याकांडात कथा वेगाने चालते; पण पुढच्या कांडांतून कथेला रंग
चढत नाही, काव्याला चढतो; व चमत्कृतीला भरती येते. महाभारतात
पहिल्यापासून शेवटपर्यंत संघर्ष मानवी पातळीवरील व कौटुंबिक असा
आहे. रामायणातही सुरूवात अशाच त-हेच्या संघर्षाने झालेली आहे. पण
राम व भरत यांच्या कृत्यांमुळे कथेला कलाटणी मिळाली. बापाने आईला
दिलेले वचन पाळण्यासाठी रामाने वनवास पतकरिला. भरताला राज्यावर
बसवावे, हा त्या वचनाचा एक भाग होता. पण भरत मुळी राज्यावर
बसायला तयारच नव्हता. त्यानंतर स्वतःला जाळून घ्यायची तयारी केली.
भरत राज्यावर बसेना, राम राज्य घेईना, असा मोठा विचित्र पेच निर्माण
झाला. शेवटी रामाच्या पादूका सिंहासनावर बसवून, कोठच्याही त-हेचा
राज्योपभोग न घेता, व्रती राहून भरताने राम परत येईपर्यंत राज्यकारभार
पहावा, अशी तोड निघाली. संघर्ष मिटला. दोन लोकोत्तर पुरूष केवळ
प्रतिज्ञापालन करीत राहिले. म्हणजे अयोध्याकांडात कथेचा आरंभ ज्या
संघर्षातून होतो. तो संघर्ष मुळी संपतोच. गोष्ट ही खरोखर संघर्षाबरोबरच
संपलेली असते.
पण काहीतरी द्वंद्व, काहीतरी पेच असल्याशिवाय कथा लांबू शकत नाही.
म्हणून रामायणात अरण्यकांडापासून एक नवीनच कथा निर्माण झाली, असे
म्हणावे लागते व सीतेला पळवून नेण्याच्या घटनेमध्ये एक अगदी नवीनच
पेच निर्माण झाला.
।। संस्कृती ।। किष्किंधाकांडात वाली-सुग्रीवांच्या गोष्टीत एक संघर्ष दाखविला आहे;
व त्यात सुग्रीवाशी सख्य करण्याच्या इच्छेने राम गोवला गेला आहे. ही उपकथा व पेच त्या कांडातच संपतात. अरण्यकांडात आणिलेला पेच युद्धकांडाच्या शेवटी सुटतो. परत एकदा कथा संपते. पुढे वाचायला काही राहतच नाही. महाभारतात सांगितलेली रामकथा येथेच संपते. पण रामायणामध्ये आणखी एक कांड आहे. त्यात सीतात्यागाचा एक नवीनच पेच निर्माण केलेला आहे. हा सबंध भाग प्रक्षिप्त आहे, हे मागेच सांगितलेले आहे. रामायणाचा पहिला भाग सर्वस्वी मानवी पातळीवरील आहे; दुसरा भाग वृक्ष व वानर ह्यांच्यासंबंधी आहे; तर तिस-या भागात सर्व मायावी राक्षस, वृक्ष व वानर असून रामलक्ष्मण व सीता एवढीच माणसे त्यात आहेत. रामायणातील अरण्यकांड म्हणजे तर ऋषींच्या आश्रमांचे एखादे प्रवासी गाईड असावेसे वाटते. ह्या कांडात ज्या त-हेने एकदोनदा इंद्र आलेला आहे, ती त-हा सर्वस्वी बौद्ध वाङ्मयासारखी वाटते. ह्याच प्रदेशाच्या शेजारी बौद्ध व जैन संप्रदायांचा जन्म झाला. त्यांची छाया वाल्मीकिरामायणावर पडलेली आहे. अहिंसेबद्दलचे महाभारतातील व रामायणातील उल्लेख फार निरनिराळे आहेत. महाभारतात अहिंसा म्हणजे पशूना बेताने मारणे, ते नष्ट न होतील अशी खबरदारी घेणे, एवढाच होता. रामायणातही रामलक्ष्मण रोज शिकार करीत असत. युद्धात ही हिंसा कशी करू, असा प्रश्न रामापुढे आला नाही. पण अधून मधून उगीचच अहिंसेबद्दल श्लोक आले आहेत. वनात शिरल्याबरोबर सीतेच्या तोंडी अहिंसेबद्दल श्लोक घातले आहेत. त्यानंतर ती रामाला धनुष्य बाजूला ठेव, म्हणून सांगते. हा वेडा उपदेश सीतेने बालबुद्धीने केला, का बायकांच्या कोत्या बुद्धीने केला. असे कवीला दाखवावयाचे होते, न कळे! तसेच, ह्या ग्रंथाचे ब्राह्मणीकरणसुद्धा बरेच झालेले आहे. सकाळी व संध्याकाळी राम संध्या करीत असे व जागोजाग त्याने अशी संध्या केल्याबद्दल श्लोक- अर्धा-श्लोक आहे. संध्येबद्दल एवढी आस्था पांडवांना, कौरवांना व यादवांना नव्हती, असे दिसते. रामायणात काही कोडी उत्पन्न झालेली आहेत. त्यांचे उत्तर पुराणांनी दिलेले नाही. महाभारतात पांडव हस्तिनापुराचे राजे झाले. त्यांच्यानंतर परीक्षित गादीवर आला; त्यानंतर जनमेजय आला. हस्तिनापुर ही कुरूवंशाची ।। संस्कृती ।। पिढीजाद राजधानी, सर्व भांडण होते ते त्या राज्याबद्दलच होते. काही शतकांनी हस्तिनापुरावर काही संकट कोसळले व त्या वेळच्या कुरुराजाला राजधानीं सोडून जावे लागले. त्याने कौशांबी ही आपली राजधानी केली. अयोध्या हीसुद्धा इक्ष्वाकूंची पिढीजाद राजधानी होती. मनूपासून कित्येक मोठमोठ्या राजांनी तेथे राज्य केलेले होते. ही परंपरागत राजधानी रामानंतर नष्ट झाली. एवढेच नव्हे, तर पूर्वी कधी न ऐकिलेल्या 'साकेत’ अशा नवीनच नावाने ती ओळखू जाऊ लागली. राम,लक्ष्मण, भरत व शत्रुघ्न ह्यांच्या मुलांनी निरनिराळ्या ठिकाणी राज्ये स्थापिली, असा वृत्तांत आहे. रामाची मुले बापाच्या गादीवर का बसली नाहीत? रामाच्या मागे अयोध्या ओस पडली होती, असे वर्णन आहे. रामाच्याबरोबर सर्व प्रजाजन स्वर्गात गेले, म्हणून अशी अवस्था झाली का? हे वर्णन प्रक्षिप्त वाटते. पण अयोध्या ओस पडली आणि तिच्याऐवजी 'साकेत' हे एक नवीनच शहर उदयाला आले, एवढे मात्र खरे दिसते. पण त्याचे कारण मात्र कोठेही रामायणात व इतरत्र दिलेले आढळत नाही. रामाने आपल्या जिवंतपणीच आपल्या मुलांना दुसरीकडे राज्ये दिली, असे वर्णन आहे. असे का ? हेही कोडेच आहे. कृष्णाची द्वारका कृष्णाबरोबर गेली. कृष्णाखेरीज दुस-या कोणाचे नाव द्वारकेशी निगडीत नाही तसे अयोध्येचे नाही. अतिशय पराक्रमी, पुण्यवान अशा वंशाची ती राजधानी होती. ती नाहीशी का झाली? कशी झाली? हा एक शोध घेण्यासारखा प्रश्न आहे. महाभारताचे नुसते कथासूत्रच एक आहे असे नव्हे, तर स्वभावदर्शनही अशा त-हेचे आहे की, त्यामुळे गोष्टीला एक विशिष्ट दिशा मिळते. दोन मुले थोरला अंधळा म्हणून बाजूला ठेविलेला. धाकट्याला गादी मिळाली. पण तो ती उपभोगू शकला नाही. थोरल्याचे व धाकट्याचे मुलगे एकाच राजवाड्यात त्याच वडील माणसांच्या हाताखाली राजपुत्र म्हणून वाढले. सामाजिक व कौटुंबिक परिस्थितीने ती चुलतभावंडे एकमेकांची स्पर्धक होती. त्या भावंडांचे व त्यांच्या बरोबरीच्या मित्रमंडळींचे, नातेवाइकांचे व वडील मंडळींचेही स्वभाव, स्पर्धा शिगेला पोहोचावी असेच होते. कथेला
।। संस्कृती ।। एका प्रसंगाने कलाटणी मिळाल्यासारखी वाटते. लहानपणची भांडणे व
मारून टाकायचे बेत ह्यांतून पांडव वाचल्यावर धृतराष्ट्राने त्यांना. भीष्म व विदुर वगैरेंच्या सांगण्याने इंद्रप्रस्थाचे राज्य दिले. आता भावाभावांची लढाई लागायचे कारण मिटले होते. पण एकमेकांशी स्पर्धा करायची व वैर साधायचे, असे बाळकडूच त्यांना मिळाल्यामुळे वैर शमले नाही. इंद्रप्रस्थाचे राज्य वाढवून व मोठा थोरला यज्ञ करून कौरवांचा पाणउतारा करण्याची संधी पांडवांनी साधली. जुने वैर नव्या जोमाने पेट घेवून उठले. वनपर्वानंतर कृष्णाची शिष्टाई, समजा, जरी यशस्वी झाली असती, तरी इंद्रप्रस्थासारखाच प्रसंग पुन्हा ओढवला असता. हे भांडणच असे होते की, एका बाजूचा समूळ नायनाट झाल्याखेरीज ते तुटणारे नव्हते; आणि प्रत्येकजण आपल्या परीने ते वैर प्रज्वलित ठेवण्याचा प्रयत्न करीत होता. ज्यांना वैर नको होते, अशी माणसे निर्बल होती. कथेचा भयंकर शेवट व त्याची बीजे कथेच्या प्रारंभापासूनच आढळतात. संघर्ष तीव्रतर होत जातो व आपल्या ठरलेल्या परिणामाप्रत पोहोंचतो; आणि माणसेही आपापल्या ठरलेल्या परिणामाने अंत पावतात. महाभारतात चटका लावते. ती हीच अप्रतिहतता. ह्याउलट रामायणाची गोष्ट आहे. सुरुवात महाभारताप्रमाणेच कौटुंबिक संघर्षांत आहे. भरत रामाला भेटायला येत असताना 'हा रामाला मारायला तर येत नाही ना?’ अशी शंका लक्ष्मण बोलून दाखवितो. 'राम वनवासात का असेना, पण तो जिवंत असेपर्यंत निष्कंटक राज्य भोगता यावयाचे नाही, म्हणून तर भरत रामाचा घातपात करायला आला नसेल ना,’ असे लक्ष्मणाला वाटते. ह्या सर्व गोष्टींचा उच्चार करूनही वाचणा-याच्या मनावर ताण उत्पन्न होत नाही. कारण भरताने आपले चरित्र आधीच प्रकट केलेले आहे. भरत आल्यावर दोघेही भाऊ निरनिराळ्या प्रतिज्ञा करीतात. त्यांतील कठीण प्रतिज्ञा बायकोसह वनवासात राहणा-या रामाची, का दुस-याची ठेव म्हणून काहीही उपभोग न घेता राज्य पाहणा-या भरताची, हे ज्याचे-त्याने ठरवावे. पितृप्रधान, बहुपत्नीक कुटुंब पद्धतीत जे संघर्ष व दोष उत्पन्न होतात, त्यांचा अशा पद्धतीने निकाल लाविता येतो, हे रामकथेत दिसते. ।। संस्कृती ।। | भावाभावांनी एकमेकांचे गळे कापण्याऐवजी त्यांना एकमेकांच्या गळ्यांतही पडता येते, हे रामायणाने दाखविले. संघर्ष निर्माण करून त्या संघर्षाच्या अनुरोधाने इतर बनाव रचणे हा महाभारताचा मार्ग, व संघर्ष निर्माण करून | भावाभावांच्या उदारपणामुळे व प्रेमामुळे कथेला एक अनपेक्षित कलाटणी देणे व संघर्ष संपवून टाकणे हा रामायणाचा मार्ग. रामकथा येथपर्यंत रंगत जाते, हे पूर्वी सांगितलेच आहे. पण पुढे मात्र मूळ कथेचे प्रयोजनच उरलेले नाही. ह्यामुळे रामायणाचा एक भाग दुस-याशी जोडलेला नाही. महाभारत व रामायण ह्यांच्या कथांतील मुख्य फरक हे दोन आहेत. एकीत मानवी संघर्ष व त्याचे भयंकर परिणाम, तर दुसरीत तसाच संघर्ष व उदात्ततेमुळे त्याचे निवारण, हा एक फरक. संघर्ष तीव्रतर होत गेल्यामुळे महाभारताची गोष्ट एकसंध व जिवंत वाटते; रामायणाची गोष्ट पुन्हा-पुन्हा एकमेकांशी संबंध नसलेले नवीन संघर्ष आणावे लागल्यामुळे विस्कळीत वाटते, हा दुसरा फरक.
-१९७१
१० | || संस्कृती ।।