सन्मणिमाला
सद्योगगुणमणींची, ज्याच्या हृदयीं, सदा सुखनि वृत्ति, तो, मज दीना दासा देवू, दावुनि पदा, सुख निवृत्ति. ॥१॥ जो ज्ञानराज भगवान् श्रवणीं सुज्ञान दे, वदे वाचा; अवतार गमे अकरावा कां सुज्ञा न देवदेवाचा ? ॥२॥ नमन असो त्या, ज्याचीं वचनें वैकुंठसदनसोपानें; सोपानें यश केलें कीं, ज्याच्या, मोहगद नसो, पानें. ॥३॥ जरि शुचिमूर्ति, सुवृत्ता, मान्या श्रवणोचितें गुणें, मुक्ता; विद्धा, जडाहि ती; हे अगुणाही तीस करि उणें मुक्ता. ॥४॥ माझें नमन असावें त्या सिद्धा नित्य चांगदेवातें; यन्नाम यशें, चंदन सुख निववुनि जेंचि आंग दे वातें. ॥५॥ साधु विसोबा खेचर राखे चरणानतासि सुज्ञानें; केला कृतकृत्य क्षणमात्रें ज्या नामदेव सुज्ञानें. ॥६॥ म्यां वंदिला जनार्दनपंतहि; विसरेन अद्य संत कसा ? नतमोहा नच राहों दे हा, देहा दृढाहि अंतक - सा. ॥७॥ नमिला शमिलास्यप्रद, शांतिजलाधि, एकनाथ तो भावें. शोभावें ज्यांचें यश विश्वीं, ज्या देववृंद लोभावें. ॥८॥ मजवरि दया करो तो ब्रह्मज्ञ, ख्यात, केशवस्वामी. मागतसें हरिचरणस्मृतिवर या नमुनि केशवस्वा मीं. ॥९॥ झाले वंद्य शतमखा ते, गेले शरण भानुदासा जे. यासीं साम्य पहातां, न उदारा रत्नसानुदा साजे. ॥१०॥ वंदन विठ्ठलराया, ज्याला म्हणती म्हणोनि बुध आत्या; कीं जे मुमुक्षुचातक, करिती ज्ञानामृतांबुदा ‘ आ ’ त्या. ॥११॥ कर जोडूनि करिन मीं न नृसिंहसरस्वतीस कां नमन ? सज्जन सेविति ज्याचें सद्यश, व्हाया सुतृप्त कान मन. ॥१२॥ जयरामस्वामियशें हृदया ! राहोनि परिस वडगावीं; संसारीं फ़ावेना क्षण तरि, पाहोनि परि सवड, गावीं. ॥१३॥ आनंदमूर्तिस शरण भावें, पसरूनि पदर, जावेंच. बुध म्हणती, ‘ चिंतामणि न गणुनि, गुरुभक्तपदरजा वेंच. ’ ॥१४॥ स्वर्वल्लिसुरभिसुरसरिदधिका, श्रितसर्वकामदा, साची. श्रीरामाची जैसी सत्कीर्ति, तसीच रामदासाची. ॥१५॥ श्रीरामदाससेवारत जो भरतावतार कल्याण दुर्वारकामसिंहीं ज्या वीरें घातलेंचि पल्याण. ॥१६॥ नमिला साष्टांग श्रीपतिभक्तिरसज्ञ वामनस्वामी, रसभवना तत्कवना, मानीं, या तेंवि वाम न स्वा मीं. ॥१७॥ पावे, प्रसन्न होतां देव, सुदामा जिला, असी माते श्रीकीर्तिहि, जह्रि अल्पचि दे वसु दामाजिला, असीमा ते. ॥१८॥ ज्याच्या, हरिनारायण हें, क्षुधिताच्या जसेंचि अन्न, मनें बहु मानिलें अहर्निश; त्यास शताधिक असोत मन्नमनें. ॥१९॥ हृदयें, वचनेंहि, रमावल्लभदासासि नत असों, देहें; प्रभुसि म्हणेल ‘ स्वपदीं ’ दीनाचें चित्त ‘ रत असों दे हें ’. ॥२०॥ मान्य पुरंदरविठ्ठल सुकविकुळीं, पदपराज नाकवनीं; ज्याच्या, प्रेम हरिपदीं, तैसें हरिपदपरा जना, कवनीं. ॥२१॥ वंदन मंद न करु त्या, ज्याचें प्रख्यात नाम, मालो हें; मळ जाया, स्पर्शावें त्या, अजडस्पर्शमणिस या, लोहें. ॥२२॥ दासोपंतीं केला गीतार्णव मानवा ! सवालाख; ग्रंथ परम दुस्तर तो न तयाचि, जसें न वासवाला ख. ॥२३॥ वंदन नंदनसा मीं करितों भावे मुकुंदराज्याला, वश झाल्या सद्विद्या, सत्कीर्ति, सुमुक्ति, सुंदरा, ज्याला. ॥२४॥ सद्भक्त शंकराजीबावा, त्याला असो न कां नमन ? तेणें श्रीविठ्ठलपर कवण न केला, असोन कान, मन ? ॥२५॥ नमनेंचि जना सत्पथदर्शक ज्याला भला निळोबा हो; मज तों प्रसाद त्याचा, प्रणता ज्या लाभला, मिळो, बाहो. ॥२६॥ वंदाया मजला, तो ब्राह्मण बहिरा, तथा पिसा, मान्य. जह्रि उकिरड्यांत पडला, मळला, न हिरा, तथापि, सामान्य. ॥२७॥ भव्य कथाकल्पतरु, क्षितिवरि, सर्वत्र सुलभ, जो लावी; डोलावी देवसभा, तद्बहुमतता असीच बोलावी. ॥२८॥ प्रह्लादें, बळकाउनि नवघननिभकाय गड, बडवयानें कळि न गणिला. करावी तेथें मग काय गडबड वयानें ? ॥२९॥ ‘ परिसा भागवत ’ म्हणे. तेंचि वदति नाम परिसते ज्याचें, तम पुनरपि न उरों दे, बळ मिरवी, भानुपरिस, तेज्याचें. ॥३०॥ हरिविजयग्रंथातें मग, आधीं श्रीधरसि वंदीन. शिववंदनकामाहीं लंघावा प्रथम देवनंदी न. ॥३१॥ श्रीमुक्तेश्वर कविवर यातें कोण न शुभेच्छु वंदील ? बंदी लक्ष जयाचे, ज्याचें यश भव्य जेंवि मंदील. ॥३२॥ श्रीलीलाविश्वंभरपदनति हेतु ध्रुवाचि यागाला. स्पर्शे शिष्या यत्कर, जेंवि हरिदर ध्रुवाचिया गाला. ॥३३॥ ज्यातें जनीं जनार्दन ऐसें बहु साधु जाणते म्हणती; त्याकारणें असोत, श्रीकृष्णाकारणें जशा, प्रणती. ॥३४॥ कृष्णदयार्णव कृष्णचि, करिन तया कां न दास मीं नमनें ? संतासि मुमुक्षुमनें न विसंबावें, नदास मीनमनें. ॥३५॥ त्या नमन, वर्णुनि रघुप - पदयुगळीला, स्वभक्तवशगेला, जो रामदास, तनुसह, वैकुंठातें, करूनि यश, गेला. ॥३६॥ उद्धव - चिद्धन केवळ, मीं मोर, तयासमोर हर्षानें तांडव करितों, होउनि गतताप, तदीयसूक्तिवर्षानें. ॥३७॥ श्रीदामोदर देवीं धरिसि मना ! मनुजभाव कां ? टाकीं. जो, भूतसुहृत्, काढी व्याघ्र्याचा, कळवलोनि, कांटा कीं. ॥३८॥ करुणासागर, नागर नरसिंह, क्रोधलोभकामहता मज, रक्षील न शरणागर जाणुनि, कीर्तिशोभ कां महता ? ॥३९॥ नमिला यमिलाभावह पददर्शन योगिराज रुद्राजी. जेथें तीच ऋषभजडभरतादिसुयोगियांत मुद्रा, जी. ॥४०॥ झालों, त्या ऋषिभट्टस्वामीतें, धन्य धन्य मीं, नमुनीं. जो पाहतां गमे, ते ऐसेचि, ब्रह्मसिंधुमेनमुनी. ॥४१॥ आठवला, आठवितां, तोहि जगन्नाथ, मज, बरा, बावा. नांदे सत्प्रनतिश्री, तेथें गुण कोण मग न राबावा ? ॥४२॥ मध्वमुनीश्वर चित्तीं आणुनि, जाणुनि हरीच तो, भावें नमिला; नारदयशसेसं, ज्याचें यश सज्जनांत शोभावें. ॥४३॥ कीर्तनसुखार्थ, झाला अवतारचि अमृतराय जीवाचा; भलत्या मुखांतुनि असी, सुरसखनि, निघेल काय जी वाचा ? ॥४४॥ म्हणती निरंजन श्रुति ज्या, त्याचि समान, हा निरंजन हो. कीं जो म्हणे, ‘ परांचें, होउनि निजमानहानि, रंजन हो. ’ ॥४५॥ भक्तिसुखाधिक मानुनि, मुक्तिसुख कदापि याचिना; म्यां, तें अत्यद्भुत आयकिलें सद्वृंदीं, नमुनि याचि नाम्यतें. ॥४६॥ कर जोडितों, सुटाया तनुरूपा, तापहेतु, कारा, मीं. कीं सतनु मुक्त झाला, योगाची सिद्धि हे तुकारामीं. ॥४७॥ जें, सांवता, करुनि दे, उदर, श्रीमंदिरा भवन, माळी, त्यातें, प्रेमें वसउनि, मानी श्रीमंदिराभ वनमाळी. ॥४८॥ गोरा ज्या म्हणती, त्या स्मरूनि, सुखी तूं, मना ! कुलाला, हो. घे भक्तिचा, जयाची मति संसारीं अनाकुला, लाहो. ॥४९॥ हरिहरिजनपदभजनें, प्रकटी अद्भुत रुचिप्रभाव जनी. स्पष्ट महासत्याधिका भरलीच इची शुचिप्रभा वजनीं. ॥५०॥ पुण्यश्लोकशिखामणि, विठ्ठलपदभक्त, बोधला, गावा. ऐशा प्रेमळ साधुस्मरणें, निजवस्तुशोध लागावा. ॥५१॥ नरसोजी रणखांब स्मर, कृत्यें त्यजुनि लक्ष; बा ! हुरडा भक्षुनि, तदरींस म्हणे दत्त, नतोद्धारदक्षबाहु, ‘ रडा. ’ ॥५२॥ जो भक्तिसरित्पूरीं षडरींची सर्व वाहवी सेना; रुचला मनास बहुतचि, तो, भगवद्भक्त, नाहवी सेना. ॥५३॥ सजणा नाम जयाचें, ज्या, गाती साधुजन, कसायास, भगवान् पळहि न विसरे ज्यातें, विसरेन मीं कसा यास ? ॥५४॥ ‘ पिंजारी ’ न म्हण मना, स्मर, जाया सर्व ताप, दादुस रे; मत भक्तिच्या न, अधरीकृतकांचनपर्वता, पदा, दुसरे. ॥५५॥ बहु हरिहरिभक्तांच्या जपला आराधना धना जाट. मोटे मोटे वर्णिति याचें यश, नृपतिचें जसे भाट. ॥५६॥ धन्या, मीराबाई, भगवज्जनवृदवर्ण्यकुलशीला; प्रबला विभागिनी जी झाली श्रीला, तसीच तुलशीला. ॥५७॥ देवकिनें ओगरिल्या ताटीं नानाविधान्न जो विचडी; तो, कर्माबाईची, मिटक्या देवूनि, भक्षितो खिचडी. ॥५८॥ भक्तांत भवांत, पुह्नां भेटि न व्हाया कदापि, वैरा गी ज्याची निर्मी; ऐसा रामानंद प्रसिद्ध बैरागी. ॥५९॥ माया हे संसृतिची, जाळूनि सशोक तोक, बी, रमला रामपदाब्जीं अलिसा; बहुमत सुमुदोक तो कबीर मला. ॥६०॥ कष्टें जोडुनि, देतो जेंवि सुता वल्लभा जनक माल; भजन करी कबीर, न करुनि उणा वल्ल, भाजन, कमाल. ॥६१॥ जो संतत हरिहरिजनपदभजनामृत यथेष्ट पी, पाजी; कोण असा जन, ज्याच्या हृदया तो मानला न पीपाजी ? ॥६२॥ साधु म्हणावे, म्हणती नर माधवदास साधु याला जे. अतिसारीं ज्याचे पट न रमाधव दाससा धुया लाजे. ॥६३॥ सिजल्यात भक्षुनियां, मग उगळी जो सजीव मीनातें; त्या नानकसिद्धसीं लाविन गुरुभक्त हेंचि मीं नातें. ॥६४॥ ताठो न मदें म्हणउनि, जो विनयमहीतळांत मान पुरी. विष्णुपदीं विष्णुपदें जरि वाहे रसपदेंहि मानपुरी. ॥६५॥ ‘ बहु सुप्रसन्न ’ म्हणतों, सुकवि म्हणुनि, ‘ सूरदास मजला हो. ’ प्रभु अल्पतुष्ट रत्नद शिव मुद्रमसूरदा समजला हो. ॥६६॥ भ्रमलें चित्त परस्त्रीसौंदर्यें बहु; पुह्नांहि अनय न हो; या भावें, योगीश्वर चर्पट झाला स्वयेंचि अनयन हो. ॥६७॥ प्रभुदर्शनार्थचि नयनलोभ धरी बद्धपाद लोंबकळे; कीर्तिभवन यवनहि मुनि, शालिगुण, विलोकितांचि लोंब, कळे. ॥६८॥ केशवदास महाकविसम, ‘ हा कविता सलक्षणा करितो, ’ ऐसें म्हणोनि कोणी दाविल ज्या, तदवतार बा ! तरि तो. ॥६९॥ साधु बिहारीलाल ख्यात करी ग्रंथ सप्तशत दोहा; ज्या सुरभि म्हणति ‘ अर्थक्षीररस यथेष्ट रसिक हो ! दोहा. ’ ॥७०॥ सुविरक्तें बाजीदें प्रभुतें चिंतूनि संतत पठाणें वैकुंठीं बैसविलें, करुनि जगीं धन्य संत तप, ठाणें. ॥७१॥ श्रीरुक्माण्णापंतें ज्या उत्तममध्यमाधमा त्रात्या भवगदशमनार्थ दिल्या जोडुनि बहु कीर्तिवित्त मात्रा त्या. ॥७२॥ आनंदतनय अरणीकर शोभवि फ़ार कवन यमकांहीं. तत्सूक्ति पाठ ज्याला, त्याचें पाहे न भवन यम कांहीं. ॥७३॥ विठ्ठलकविच्या भलता लंघूं न शकेचि चित्र - कूटातें. प्रबळतरहि पर जेंवि श्रीरामनिवास - चित्रकूटातें. ॥७४॥ जडभरताहूनि उणें वैराग्यगुणांत न मनसारामीं. त्याच्या अदेहभाना करितों ध्यानाहि नमन सारा मीं. ॥७५॥ नरहरिनामा पावे संत न सोनार दास - मान कसा ? तरला, करुनि भवाचा अंत; नसो नारदासमान कसा. ॥७६॥ कान्होपात्र श्रीमद्विठ्ठलरूपीं समानता पावे. तापत्रयें जन, यशा या पिवुनि अमृतसमा, न तापावे. ॥७७॥ बहु मानिती न कोई जे रोहिदास चर्मका मानें. ते न पहावे; पाहुनि तपन पहावाचि धर्मकामानें. ॥७८॥ गावा, नच मानावा चोखामेळा महार सामान्य; ज्याच्या करि साधूंचा चोखा मेळा महा - रसा मान्य. ॥७९॥ तारिति न कीर्तिच्या, जो न लवे, त्या मुसल - मानवा, नावा. हर्षें सेखमहांमद भगवज्जन मुसलमान वानावा. ॥८०॥ गावें, नतपद्मांतें जो दे नि:सीम शिव, दिनकरा या. पटु हित उपासकांचें, श्रीशिवदिन तेंवि, शिवदिन कराया. ॥८१॥ जो आत्मसुखसमुद्रीं मीन, जया म्हणति देवताबावा; प्रेमा तत्पदपद्मीं, गुरुसद्मीं शिष्य तेंवि, राबावा. ॥८२॥ दावी, जसा प्रपंचीं, परमार्थींही प्रभाव संताजी. वंश, जया पावुनि, घे ती आराम प्रभा वसंता जी. ॥८३॥ मोटा साक्षात्कारी मोराबा देव चिंचवडगांवीं. सुरतरु कवींस म्हणतिल कीं, ‘ स्वयशें निंब, चिंच, वड, गावीं. ’ ॥८४॥ असती जरि जन पंडित, तरि, जनपंडित - समान ते नसती. सौभाग्यें वैदर्भी अधिका, इतरांसमा न ते न सती. ॥८५॥ श्रीचक्रपाणिदत्तें क्षिप्र निवे जेंवि गज गदी शातें. तेंवि निवाला शरणागत कोण स्मरुनि न जगदीशातें ? ॥८६॥ बहु शोभला शिवाजीबावा सद्वृत्तशुद्धलेण्यांत. महिमहिलेच्या नाकीं मौक्तिकमणि साधुरूप लेण्यांत. ॥८७॥ निपतनिरंजनसूक्तिप्रति रंभा काय ? उर्वशी लाजे. केले रक्त विरक्तहि, उरुशीला पात्र उर्वशीला जे. ॥८८॥ द्वारावती त्यजुनी, ये रात्रींतचि वरदराज डांकीरा. भक्त गुरुहि अगुरु खळां, लिखितहि कागद जसा जडां कोरा. ॥८९॥ गावा त्रिलोचनाभिध, अखिलशुभगुणार्थिकल्पनग, वाणी. हरिजनयशींच रमशिल तरि काय मना ! सुखासि मग वाणी ? ॥९०॥ कैलास शिवें, तैसा धन्य अचळचिद्धनें गड पनाळा. या गा, यम, कंठाच्या तोडून करावया गडप, नाळा. ॥९१॥ जयरामस्वामीतें तारुनि, जो कृष्णदास संत तरे. चित्ता ! वित्ता जैसा कृपण, स्मर तत्पदास संतत, रे ! ॥९२॥ देवू पुढें, बहु दिवस आपण मात्रा खलू, कदा साजे ? ते शोभले, स्वपरगदहर नर भजले मलूकदासा जे. ॥९३॥ बा ! तुळसीदास न जरि बाल्मीकीसमान मानवा ! तुळसी तरि, राम दूर कीं ती, ही उक्ति समा न मान वातुळसी. ॥९४॥ नेउनि भवजलधीच्या तो सत्तीरा मला, वितानातें उभउ यशाच्या, प्रभुसीं जो हत्तीराम लाविता नातें. ॥९५॥ ‘ अंतर जितुकें इछाभोजनदा आणि अग्रदा ’ साधु ‘ ज्या, अन्या ’ म्हणति; मना ! निजमळ, त्या स्मरुनि अग्रदासा, धु. ॥९६॥ ख्यात, तुकारामस्तुत, साधुसभाप्राणवल्लभ, लतीबा, हृदया ! स्मर त्यासि; असो श्रीभगवद्भक्तजाति भलती बा ! ॥९७॥ गातां रंका बंका, होय क्षय सर्वथा महापंका; लंकासंसृति, हरिजन हनुमान् म्हणतां, धरूं नये शंका. ॥९८॥ ताप न हरी, दिसे परि केवळ न वलक्षसा, लयाला जो पावे, त्या चंद्रासम म्हणतां, नवलक्ष सालया, लाजो. ॥९९॥ बोले मधुर, मनोहर, मृदु, शाहसुसेननामक फ़कीर. तेंवि न वाणीचाही, कंठीं नसतांहि लेश कफ़, कीर. ॥१००॥ बहु मानिला, स्वगुरुसा, संतत जसवंत संत संतानीं. भगवज्जनीं जसें यश, औदार्यगुणें तसें न संतानीं. ॥१०१॥ शंभुसखीं धनदींहि न तें, जें निजवित्तज यश शिवरामीं. भुललों यातें, जाणुनि निर्मळता, चित्तजय, शशिवरा मीं. ॥१०२॥ जें हृदय न द्रवेचि, श्रवण करुनि सुयश कूर्मदासाचें; तें वश, दुर्दैवबळें, झालें कलिमंत्रिदुर्मदा साचें. ॥१०३॥ लाजविलेचि निजयशें दुग्धाब्धितरंग रंगनाथानें. भक्ति ज्ञानें ज्याची मति पोषी, जेंवि अंगना थानें. ॥१०४॥ रामप्रसाद, ज्याचें ऋण हरि हरि; तत्सुकीर्तिं आलिकडे आलि, कडे लंघुनि, मज गंगेची घ्यावयासि आलि कडे. ॥१०५॥ श्रीचित्रकूटवासी, स्तुत, मनसुकदास, पुण्यकथ नाकीं; ज्याच्या स्त्रीच्या घाली, वारुनि ऋण, रामराज नथ नाकीं. ॥१०६॥ नमिला सद्भक्तिमय श्रीमदनंताख्य जो उपाध्याय. मूर्त श्रीगीतेच्या अकराव्याचाचि तो उपाध्याय. ॥१०७॥ नमिले यमिलेखर्षभ अद्वैतानंदनामक स्वामी. स्वामीव - क्षय होइल, येणें पावेन मामकस्वा मीं. ॥१०८॥ प्रह्लादप्रमुखाखिलहरिजनगुरुवर मुनींद्र नारद या श्रीसन्मणिमालेचा मेरु, जयाच्या मनांत फ़ार दया. ॥१०९॥ भक्तप्रियवैकुंठप्रभुकंठीं रामनंदनें मोरें हे श्रीसन्मणिमाला वाहिलि, वंदूनि, उत्सवें थोरें. ॥११०॥
हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. |