सप्तशती गुरूचरित्र/अध्याय पहिला
नमः श्रीदत्तगुरवे हृद्वासोधौतिकारवे । स्वात्मज्योतिःप्रकाशाय सुखायानर्थशांतये ॥१॥
भूतं भव्यं भवच्चास्माज्जांयते येन जीवति । लीयते यत्र तद्ब्रह्म श्रीदत्ताख्यं त्र्यधीश्वरम् ॥२॥
भक्तिगम्यस्य तस्येदं चरितं चित्तशुद्धये । संक्षेपेण स्फुंट वक्ति वासुदेवानंदसरस्वती ॥३॥
ग्रंथीं वासुदेव निमित्त । कर्ता करविता दत्त । तत्पदीं ठेवोनि चित्त । चरित ऐकोत संत हे ॥४॥
हें मानुनि जे वाचिती । किंवा भक्तिनें ऐकती । तेचि भवाब्धि तरती । उद्धरति निजकुळा ॥५॥
मनावाचा अगोचर । तो स्वच्छंदें हो गोचर । कलियुगीं यतीश्वर । नरसिंहसरस्वती ॥६॥
त्याचें चरित्र ऐकून । नामधारक ब्राह्मण । गाणगापुरीं दर्शन । घ्यावें म्हणून पातला ॥७॥
प्राणी ऊष्मानें तापून । इच्छिती छाया जीवन । तैसा त्रितापें तापून । ये लक्षून निजजीवना ॥८॥
जो ऊर्ध्व खालीं भरल । आंत बाहेर सांचला । नामधारक म्हणे त्याला । दत्ता मला भेट देई ॥९॥
तूंचि मूर्तिमंत ब्रह्म । त्रिमूर्ति तूं गुरु परम । कलियुगीं मंगलधाम । भक्तकामपूरक ॥१०॥
विशाल तव सत्कीर्ती । परिसोनि केली विनंती । तव कर्णावरी न ये ती । वाटे खंती सर्वज्ञा हे ॥११॥
जरी मज तूं नेणसी । तरी सर्वज्ञ कीं होसी । किंवा मातें उपेक्षिसी । दयाळूसी साजे हें कीं ॥१२॥
मी अधःपाता जाईन । जरी देसी उपेक्षून । सेवा इच्छी कीं तव मन । तेणें होसी कीं दाता ॥१३॥
सेवा शान ठेवून । मेघापरी दे जीवन । पूर्वी जेवी दिल्हें दान । विभीषणध्रुवादिकां ॥१४॥
किं मुख पसरितां । बाळपाशीं मागें माता । जरी बाळ मारी लाथा । तया माता टाकून दे कीं ॥१५॥
तूंची मम माता पिता । तूंची एक कुळदेवता । भिन्नभाव येथें नसतां । कोण दाता मज दुजा ॥१६॥
नरेश्वर सेवकवंशा । रक्षी न धरितां आशा । तूं अस्मत्पूर्वजेशा । सर्वेशा कीं उपेक्षिसी ॥१७॥
मी इत्यंभूत सर्व । कथितां ही नये द्रव । जेणे पाषाणा ये द्रव । तूं निर्द्रव होसी कैसा ॥१८॥
अशी प्रार्थना करुन । हो मूर्छित हें जाणून । दत्त चित्तीं प्रगटून । आश्वासन देयी स्वप्नी ॥१९॥
इति श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्यश्रीमद्वासुदेवानंदसरस्वतिविरचिते प्रथमोऽध्यायः
हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. |
[[]]