सप्तशती (मोरोपंत)/प्रथम चरित्र - अध्याय पहिला
<poem>
श्रीमान् चैत्रकुलोद्भव सुरथ स्वरोचिषांतरी होता; तो सार्वभौम पोषी आत्मयशा, हंसखग जसा पोता. १
औरस पुत्रांसि जसा तात, तसा तो प्रजांसि परिपाळी;
दैवें द्यावी लागे कुदशेची त्या तशाहि परि पाळी. २
रिपु कोलाविध्वंसी, ते होउनि हीनबळहि एकवट,
भंगिति; परसैन्यार्णव, वाटे तद्देश त्यांत एक वट. ३
आक्रमिला त्या अरिनीं जेथें तो सुरथ, विढिलें पुर तें,
क्रूरत्व प्रकट असें केलें दैवें तया नृपीं पुरतें. ४
दुर्बळ होतां, फ़िरतां विधि, हरिलें कोशबळ अमात्याहीं;
पतिकुदशा दुष्टाहीं, जे तस्कर इछिजे अमा त्याहीं. ५
स्वामित्व सेवकांहीं हरितां, अश्वीं चढोनि एकाकी
मृगयामिषें निघे, कीं श्रीहंसी स्पष्ट होय ते काकी. ६
नृप आश्रमासि गेला, जेथ वसे, मूर्त योग मेधा, त्या;
ज्ञानतप:सामर्थेंकरुनि स्वसमान जो गमे धात्या. ७
मेधा बहु सत्कारी; गहनवनीं आश्रमीं वसे साधी,
जह्रि तो सुरथ श्रीमुनिचरण श्रितकल्पतरु - तसे साधी. ८
त्या आश्रमीं फ़िरे तो, चित्तीं चिंता करी, म्हणे, ‘ हाय !
न कळे, मत्पूर्वजपरिपाळितपुरगति असे कसी काय ? ९
दुर्वृत्त भृत्य माझे; पावावें स्वास्थ्य काय मन्नगरें ?
झालें मजही राज्य त्याज्य खळजनें, जसेंचि अन्न गरें. १०
सुगुण, सदामद, माझा हस्ती, जो मुख्य संगरसहाय,
कैसा असेल ? न कळे; मज त्याचा म्हणवि संगर्स ‘ हाय ! ’ ११
मत्सचिव करित असतिल अनुवृत्ति मदीयशत्रुभूपाची,
हाय ! कसी आवडली सेवा मानसखगांसि कूपाची ? १२
कोश क्षय पावेलचि, जो अतिकष्टें जपोनि सांचविला,
म्याम आपणासि समयीं कार्या येइल, म्हणोनि वांचविला. १३
नित्य बहु व्यय करितिल, त्यांचें ठावें असे मना शील,
सम्यग्व्ययस्वभाव न जो, तो निधि नवहि कां न नाशील ? ’ १४
ममताकृष्टमति नृपति चिंता नानाविधा असी वाहे;
तों एका वैश्यातें भ्रमतां त्या आश्रमींच तो पाहे. १५
त्यासि पुसे तो नृप ‘ तूं कोण ? दिससि दुर्मना सशोक मला,
येथें कां आलासि ? स्वजनगृहवियोग कार्य कां गमला ? ’ १६
वैश्य म्हणे, ‘ धनिक कुलज मीं वैश्य असेसं समाधि या नावें,
आलों वनास दु:खें, स्वमुखें काय स्वदैन्य सांगावें ? १७
सर्वस्व हरुनि मजला स्त्रीपुत्रांही वनासि पाठविलें;
केलें म्यां परिपालन जें कांहीं, तें तिहीं न आठविलें ? १८
स्त्रीपुत्रस्वजनांची कुशलाकुशलप्रवृत्ति मीं नेणे,
या आश्रमासि बापा ! अतिदु:खित जाहलों असें तेणें. ’ १९
भूप म्हणे, ‘ केलें ज्या लुब्धांहीं, त्यजुनि धर्म, अत्याग,
त्यांच्याही स्नेहाचा का रुचला त्वन्मनासि अत्याग ? ’ २०
‘ काय करूं ? हृदय नव्हे निष्ठुर, येतें ’ म्हणे समाधि, ‘ रडें,
जरि लाजे त्द्वाक्शरविद्धा या चालनीसमा धिरडें. २१
मज गांजिलें निजानीं, अरिनीं भंगूनि जेंवि गांजावें;
न कळे, प्रेम, सुतस्त्रीस्वजनातें त्यजुनि, हें न कां जावें ? ’ २२
ऐसें बहु वैश्य वदे, त्या समदु:खासह स्वयें राजा
जाउनि मेध्यासि नमी, प्रणतांच्या सिद्ध जो सदा काजा. २३
भूप म्हणे, ‘ गुरुजी ! जें कांहीं पुसतों, द्रवोनि सांगा तें,
गेलें राज्य, तरिहि मन ‘ माजें, माजें, ’ म्हणोनि कां गातें ? २४
युक्तचि अज्ञजनाचें विषयीं असतें सदैवही बा ! जें;
जाणें मीं दोष, तरिहि गतराज्यपदीं ममत्व कां माजें ? २५
सुतदारानीं लुटिला, तच्चिंताकुल सदा परि समाधी
हा वैश्यहि, मींहि पहा, दोघे आम्ही महीवरि समाधी. २६
ज्ञान्यांसहि मोह असा कां आहे ? काय हें ? वदा, स्वामी !
आम्ही दोघे आलों शरण, पुरे अर्थिकाम या धामीं. ’ २७
मेधा मुनिराज म्हणे, ‘ देवी श्रीविष्णुची महामाया,
बा ! या संसाराचा स्थितिकर्ता सत्प्रभाव हा राया ! २८
ज्ञान्यांचेंही ओढुनि करि मोहाच्या अधीन हें मन गा !
उडविल, नाचविल नृपा ! त्याहि, चलन ज्या कधीं न, हेमनगा. २९
हे विश्वहेतु देवी जगदंबा, बंधहेतु हेचि, नृपा !
जीवांतें मुक्त करी जी विद्या काय, ती इचीच कृपा. ’ ३०
सुरथ म्हणे, ‘ मुनिनाथा ! जीतें म्हणतोसि तूं महामाया,
झाली उत्पन्न कसी ? कर्म तिचें काय ! सांग हें बा ! या. ’ ३१
मेधा म्हणे, " कराया देवांची सर्वकामनापूर्ती,
प्रकते, तेंचि उपजणें, परि बा ! नित्याचि ती जगन्मूर्ती. ३२
एकार्णव करुनि अखिल जग, जगदीश्वर फ़णींद्रतनुतल्पीं
भजला स्वयोगनिद्रेप्रति पति सकळाहि शक्तिचा कल्पीं. ३३
प्रभुकर्णमळापासुनि मधुकैटभ असुर जन्मले दोघे,
ते खाया येति, तैं भय भगवन्नाभिपद्मभव तो घे. ३४
असुर स्ववधोद्यत, निजजनक प्रभुहि प्रसुप्त पाहोनी,
चतुरास्य योगनिद्रास्तुति करि नाभ्यंबुजींच राहोनी. ३५
द्रुहिण म्हणे, ‘ परमेश्वरि ! तूं स्वाहा, तूं स्वधा, सुधा, शांति,
श्री, सावित्री, सृष्टि, स्थिति, संहृति, तुष्टि, पुष्टि, धी, क्षांति. ३६
सृष्टिस्थितिलयकरही केला निद्रेसि वश तुवां व्यक्त,
सर्वेश्वरेश्वरि ! तुतें आहे कोण स्ववावया शक्त ? ३७
हरि, हर, विधि, देही हे कोणाहि तुझी न वर्णवे लीला,
त्रिभुवन अवलंबुनि तुज, जैसें फ़ल, पुष्प, पर्ण, वेलीला. ३८
भगवति ! करुनि दया त्वाम मधुकैतभ असुर शीघ्र मोहावे,
म्हणसि जसी तूं, न म्हणे सुरभी, ‘ इछार्थ सर्व दोहावे. ’ ३९
मद्वधकाम असुर हे मधुकैटभ खळ करावया चूर्ण
प्रभुला प्रबोध द्यावा त्वं जगदीश्वरि ! दयानिधे ! तूर्ण. ’ ४०
ऐसी स्तविली भावें पद्मभवें हस्तपद्म जोडूनी;
देवी निघे प्रभूत्तमनेत्रमुखादि स्थळांसि सोडूनी. ४१
प्रकटे यापरि, दर्शन दे, ये कार्या; परासु धात्यातें -
होवूं न देचि; झाली देवी आर्या परा सुधा त्यातें. ४२
प्रकटुनि म्हणे भगवती, ‘ हूं, विधिस त्यजुनि, असुरभी ! जा, गे ! ’
त्या वत्सा तों चिंता, जों निजली माय न सुरभी जागे. ४३
श्रुतिगुरु म्हणति, ‘ जयातें, न कळे, जडजीव हो ! परि सजा, गा; ’
करूणार्णव दासहृदयलोहांचा होय तो परिस जागा. ४४
मत्त प्रभुतें देखति ते, कां भिडतील मग न बाहूंनीं ?
बाहूनी रण करिती, भरिती क्रोधांध गगन बा ! ‘ हूं ’ नीं. ४५
उत्साह नव्हेचि उणा, न म्हणे कोणीहि ‘ हाय ’ नव, देहें,
श्रीमुनि युद्ध प्रभुसीं तें पंचसहस्त्रहायन वदे हें. ४६
यत्पदरजासि लाजति चिंतामणि, कामधेनु, परमाग,
त्या मायामोहित ते म्हणती, ‘ झालों सुतुष्ट, वर माग. ’ ४७
भगवान् म्हणे, ‘ असुर हो ! देता होउनि सुतुष्ट आजिवर,
व्हा वध्य, काय अन्यें ? वरिला म्यां इष्ट हाचि आजि वर. ’ ४८
ते वंचित असुर म्हणति, ‘ जेथें उदकें परिप्लुता न मही,
तेथें आम्हांसि वधीं, हो विजयी तूंचि समप्राक्रमही. ’ ४९
ऐसें असुर ठकविले घालिति त्या ईश्वरेश्वरा कोडें,
इतरासि समुद्र, परि प्रभुला गोष्पद - तसेंचि तें थोडें. ५०
केले हरिनें, अरिनें ते तोडुनि मस्तकांसि, असु - रहित;
न सुरहि तद्रतिभाजन; केलें वंचुनिहि फ़ार असुर - हित. ५१
ब्रह्मायानें संस्तविली ती पूर्वीं प्रकटली असी देवी;
परिस प्रभाव अणिकहि, अमृतरसा तेंवि रसिक या सेवी. " ५२
यावरि महिषासुरवध, मग शुंभनिशुंभवधहि, आयकवी;
तींकर्षीं श्रीभेटे, न करिल, निश्चय करूनि, काय कवी ? ५३
गतराज्य सुरथ पावे, होय मनुहि, तदभिधान सावर्णी,
जगदीश्वरीप्रभाव श्रीमार्कंडेयमुनि असा वर्णी. ५४
होय समाधिहि युक्त श्रीजगदंबेसि भजुनि सुज्ञानें,
व्हावें कृतकृत्य श्रीहरिमायेतेंहि यजुनि सुज्ञानें. ५५
प्रथमचरित्र मयूरें लिहिलें हें किमपि सुरसिकां गाया;
अमृतप्राशनकामा सकरुण कवि म्हणते, ‘ झुरसि कां ? गा ! या. ५६
माया तुझी, मुकुंदा ! पावो तच्चरित वर्णिलें तुज, तें
रुजतें तुजमाजि, स्थिति करितें, तैसेंहि सेवटीं बुजतें.
हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. |