सार्थ लघुवाक्यवृत्ती/ओव्या १००१ ते ११००
<poem> हें जागर सुप्तीचें मध्यस्थान । गाढ झोंप ना नव्हे जागरण । ते समयीं वासनेसी अविर्भवणें । निजात्मसुख ॥१॥तयासी म्हणावे वासनानंद । गाढ सुप्तींत ब्रह्मानंद । हे उभय सांगितलें विशद । दोहीं ठायीं ॥२॥जागें असतांही उगेपणाचा । भाव जो कां असे साचा । तोचि ठाव मध्य स्थानाचा । उभयां भेद नाहीं ॥३॥आरंभी झोंपेचे जागर नसतां । सुख अविर्भवे तत्त्वतां । पुढें गाढ झोंप जेव्हां लागतां । केवळ ब्रह्मानंद उरे ॥४॥म्हणोनि वासनेचा परिणाम । तो ब्रह्मानंदचि परम । तैसा कोठें म्हणसी आराम । जागरीं उगेपणा ॥५॥तरी अभ्यासें उदासवृत्ति । चिरकाळ राहे स्थिरत्व गति । तरी लीनत्त्वें जें सुख सुप्तीं । तेंच होय येथें ॥६॥तस्मात् परिणाम उदासवृत्तीचा । ब्रह्मानंदचि असे साचा । येथें भेदभाव कल्पनेचा । सहासा न करावा ॥७॥येथेंही तू शंका करिसी । कीं जैसा परिणाम उदासवृत्तीसी । तैसाचि भाव शांतवृत्तीसी । कां न म्हणावा ॥८॥शांतवृत्तीचा ब्रह्मानंद । परिणाम नव्हे परि विशद । उदासवृत्ति होऊन पुढें शुद्ध । मुख्य निजसुख उरे ॥९॥तरी हे परंपरेने सुखातें पावे । यासी नाहीं म्हणे कोण बरवें । परी मुख्य ब्रह्मानंद तो नव्हे । परिणाम शांतवृत्तीचा ॥१०॥ऐसाचि परंपराद्वारा । घोरवृत्तीसी होय थारा । मा शांतवृत्तीसी तो खरा । विवेक असे ॥११॥काम हे घोरवृत्ती रजाची । जे इच्छा होणें अप्राप्त विषयाची । तो जरी विषय प्राप्त होतांची । सुखचि उफाळे ॥१२॥काय हो केव्हढा लाभ जाला । न होणें तेंचि मजला । ऐसा उद्गार जो वृत्तीनें घेतला । आरंभी हर्षाचा ॥१३॥तोचि हर्ष उद्गारतत्त्वतां । जिरे हळूहळू चिरकाल होतां । विषय असे परी उगेपणा आंतौता । परिणाम पावे ॥१४॥उद्रार नसतांही वासनेसी । सुखाकारता अनयासी । विषयानंद म्हणावें तयासी । वासनानंद नव्हे ॥१५॥एवं सुप्तिकाळींचा ब्रह्मानंद । उदासवृत्तींत वासनानंद । तिसरा जाणिजे विषयानंद । हे तीनच सर्व जगीं ॥१६॥चौथा आनंद तिहीं लोकीं । जालाचि नाहीं नानात्व अनेकीं । येथें आशंका करिसी निकी । कीं असती सुखें बहु ॥१७॥अद्वैतानंद आत्मानंद । निजानंद परमानंद । सहजानंद विद्यानंद । ऐसे प्रकार बहु ॥१८॥परी अद्वैत आत्मा निजानंद । परमानंदादि नामभेद । तस्मात् एकचि ब्रह्मानंद । जो सुप्तिकालाचा ॥१९॥सहजानंद तोचि विशद । जया बोलिजे वासनानंद । जो उदासवृत्तीचा स्वाद । जागृतीमाजीं ॥१०२०॥विद्यानंद राज्यानंद । आदिकरून विरंचिपद । तो एकचि जाणिजे विषयानंद । बहु नामभेद जरी ॥२१॥शांतवृत्तीचा जो विवेक । तो विद्यानंदची कौतुक । तयासीच विषयानंद एक । नाम बोलिजे ॥२२॥जरी विवेकें बह्मसुख ग्रहण । परी वृत्ति घेतसे विषय म्हणोन । तस्मात् होय तो विषयानंद पूर्ण । निःसंशयें ॥२३॥तस्मात् ब्रह्मानंद आणि वासना । तिजा विषयानंद जाणा । या तिहीं वेगळा चौथा असेना । आनंद जगीं ॥२४॥या तिन्ही आनंदासी । दृष्टांत देऊ सावध मानसीं । श्रोत्रिय बालानंद तिजयासीं । राज्यानंद नाम ॥२५॥श्रोत्रियाचे सुख ऐसें । सुप्तींत ब्रह्मानंद विलसे । वासनानंद तो बाल जैसें । स्तनांध सान ॥२६॥राज्यानंद तो विषयानंद । हे तो एकचि नसे भेद । आतां हेचि वेगळाले विशद । करूनि दाऊं ॥२७॥श्रोत्रिय म्हणावें ज्ञानियासी । ज्ञान तें ब्रह्मात्मा एकरसीं । कोणतेही अवस्थेंत यासी । सुखाचा लोप नाहीं ॥२८॥जें सुप्त सुप्तीचें वर्णिलें । जें कां त्रिपुटरिहित संचलें । तेंचि निजांग होऊन धालें । पुन्हां वोहटे ना ॥२९॥एवं श्रोत्रियसुख ब्रह्मानंदासी । कीं उपमिला अनंद श्रोत्रियासी । हा दृष्टांत दाष्टर्रांत एकरसी । परी देणें कळावया ॥३०॥अति बाल स्तन पिवूनी । तृप्त होऊन मृदु आस्तणीं । निजविलें जें सुखें शयनीं । तें सहजे हंसे ॥३१॥विधिनिषेध ना हर्ष शोक । क्षुधा तृषा ना वृत्त्यात्मक सहजीं सहजत्वें कौतुक । हांसे स्वानंद ॥३२॥जो तूष्णीभाव जागृतीचा । तोचि सहज हर्ष बालाचा । दृष्टांत दिधला परी साचा । एकरूप असे ॥३३॥महाराजा चक्रवर्ती । निवैंर राज्य सर्व जगतीं । अव्याहताज्ञ तो सुखमूर्ति । तिष्ठे स्वानंदें ॥३४॥अमुक करणें उरलें नाहीं । पावावयाचें पावलें तेंही । तोचि विषयानंद पाहीं । जो राज्यानंद ॥३५॥एवं तिन्ही आनंदा तीन उपमिले । या तीहींतून दोन जाती नासले । ब्रह्मानंदीं परिणाम पावले । वासना आणि विषय चक्रवर्तींचे सुख पाहतां । नाश पावे परें पीडितां । अथवा देवादिकांचें सुख इच्छितां । तुच्छ करी स्वमुख ॥३७॥बालही दिवसेंदिवस वाढे । मनें सुखदुःखीं पवाडे । तेव्हां तें सहज सुख विघडे । वासनानंदरूप ॥३८॥तैसे श्रोत्रियाचें सुख नसे । जें एकदां अभिन्न बाणलें जैसें । तें कालत्रयींही न नासे । भलतेही व्यापारीं ॥३९॥धनाढ्य किंवा निष्कांचन । एकटा किंवा बहू स्वजन । धाला किंवा उपोषण । परी तो आनंदरूप ॥४०॥वस्त्रालंकारी कीं उघडा । मंचकीं किंवा पडे उकरडां । पट्टनीं किंवा वनीं धडफुडा । परी तो आनंदरूप ॥४१॥भलता आश्रम भलता वर्ण । भलता धर्म भलतें आचरण । जागृतीं स्वप्नीं कीं सुषुप्तीं पूर्ण । परी तो आनंदरूप ॥४२॥एवं ब्रह्मानंद तो ऐसा । मायादि तृणांत उमटो ठसा । उद्भवो राहो कीं पावो नाशा । परी तें जैसें तैसें ॥४३॥आतां वासना विषयानंद दोनी । जे नासती परोक्ष म्हणोनी । तेही विचारें पावती मिळणी । अभ्सासें ब्रह्मानंदा ॥४४॥विवेकवैराग्याचेनि बळें । विषय तितुका सर्व निवळे । विवेचनें जरी मीपण गळे । तेव्हां भाग्य भोक्ता आटे ॥४५॥देहाचें सुखदुःख समान । हर्षखेदें भंगे ना मन । मग सहजत्वें वृत्ति उदासीन । मिळे वासनानंदीं ॥४६॥गुणाचे विकार मावळती । सुखरूप राहे सहजगती । या रीतीं विषयानंदाची समाप्ति । उदासवृत्तीमाजीं ॥४७॥तैशीच उदासवृत्ति ही स्वभावें । जे सुखाकारें हेलावे । तेही अभ्यासें ऐक्य पावे । ब्रह्मानंदीं ॥४८॥तो अभ्यास आणि विवेचन । कैसें तें पुढें निरूपण । तेणें रीतीं करावें अभ्यसन । मंदप्रज्ञें मुमुक्षें ॥४९॥येथें सहजगती उगेपण होतां । तें सुख उमटे जागृती आंतौता । सांगितलें अगा रविदत्ता । सहज असे म्हणोनी ॥५०॥ हेंही असो तृष्णी स्थिति । सुख असेंचि असे सहजती । परी व्यापारामाजीं ही सामान्यप्रती । लोप नाहीं ॥५१॥तेंचि कैसें व्यापाराआंत । या सर्वत्रां सामान्य भासवीत । आणि जागरीं तिन्ही अवस्था उमटत । तेंही ध्वनितार्थें बोलूं धीव्यापाराश्चतद्भास्य श्चिदाभासे न संयुताः ॥बुद्धिचे व्यापार अनारिसे । चिदाभासासाहित विलसे । हें चिद्रूपें भासविल्या भासे । धर्म कीं धर्मीं ॥५३॥जें निर्विकारीं चळण । वाउगें जालें न होऊन । जें मागां बोलिलें ज्ञानाज्ञान । विद्याअविद्यात्मक ॥५४॥तेंचि अंतःकरणाची स्फूर्ति । जीव प्रतिबिंबासह वृत्ति । उमटली सगुणा अध्याकृति । हेतु या जगा ॥५५॥तिचेच विभाग जाहले दोन । येक बुद्धि येक मन । तया दोन वृत्तींचें निर्गमन । पांचा द्वारां ॥५६॥हेचि पांच ज्ञानेंद्रिय । येणें ग्रहण कीजे पंचविषय । परी मन बुद्धींत होती उभय । कळणें आणि चळणें ॥५७॥त्यांतून कळणें ज्ञानेंद्रियाद्वारां । निघोनि भोगी पंचतन्मात्रा । चळण तेंचि राहिलें अंतरा । ते पंचप्राण ॥५८॥तेणें स्थूलाचि क्रिया होणें । तेचि पांच कर्मेंद्रियाभिधानें । एवं दशधा व्यापार उद्भवणें एका बुद्धीचे ॥५९॥जीवही ज्ञानाचा आभास । ज्ञानऐसा जो प्रतिभास । विषयापर्यंत सहवास । असे निर्गमाचा ॥१०६०॥असो ऐसे एका वृत्तीचे । जीवासहित विकार साचे । सत्रा प्रकार व्यापार भेदाचे । जितुके होती ॥६१॥तितुके धर्म धर्मीसहित । जो आपुले भासवीत । जीव हा आपणासम प्रतिबिंबित । त्यातेंही प्रकाश करी ॥६२॥स्फूर्ति आणि स्फूर्तीचें चळण । हेचि धर्म आणि धर्मी दोन । संकल्पासहित उद्भवलें मन । त्यातेंही प्रकाश करी ॥६४॥श्रोत्र ऐकणें त्वचा स्पर्शणें । चक्षू देखणें जिव्हा रस घेणें । घ्राण आणि सुगंध घेणें । त्यातेंही प्रकाश करी ॥६५॥एवं धर्मधर्मीसहित । सत्रा प्रकार हे उमटत । जीवही त्यांत प्रतिबिंबत । त्यातेंही प्रकाश करी ॥६६॥हे असो देहविषय । जडत्वेंहि जो समुदाय । सन्निध दूर व्यष्टिसमाष्टिमय । त्यातेंही प्रकाश करी ॥६७॥अंतःकरणवृत्ति वायूच्या चळणें । पंचज्ञानेंद्रियद्वारां विषय घेणें पंचक्रियेसहित जे जागृती म्हणणें त्यातेंही प्रकाशकरी प्रत्यक्ष स्थूलविषय त्यागून । अंतरीं वृत्तीचें सध्यास मनन । तया कल्पनेसी नांव स्वप्न । त्यातेंही प्रकाश करी ॥६९॥कांहीही व्यापारन व्हावे । उगेंचि स्तब्धपणें असावें । सुषुष्ति बोलिजे याचि नावें । त्यातेंही प्रकाश करी ॥१०७०॥उगाचि प्रकाश मात्र करावा । त्याचा विकार न घ्यावा । अथवा हें प्रकाशिलें म्यां सर्वां । हा हेतुही नसे ॥७१॥हेंचि स्वप्रकाश चिद्रूप । तें सविकल्पना निर्विकल्प । जें जें महान अथवा अल्प । प्रकाशवावें ॥७२॥दशधा व्यापार ते जागृती । नुसती कल्पना ते स्वप्नस्थिति । उगेपणा नेणीव ते सुप्ति । एवं जागरीं तिन्ही अवस्था ॥७३॥ऐसिया कोणत्याही व्यापारा । जीवासहित या आभासमात्रा । प्रकाश करीतसे निर्धारा । येकले ज्ञान सामान्य ॥७४॥येथें आशंका करिसी ऐशी । किंचित्प्रभा प्रकाशी सर्वांशी । तरी जीवें कीजे कोण कार्यासी । वृत्तींत प्रतिबिंबोनी ॥७५॥तरी येके दृष्टांतयुक्त । बोलिजे जीवाचें जें कृत । आणि पराचे प्रकाशें वर्तत । तेंही स्पष्ट कळे ॥७६॥वन्हितप्तं जलं तापयुक्त देहस्य तापकं । चिद्भास्याधस्तिदाभास युक्तान्यान्भासयेत्तथा ॥वन्हीनें जे जळ तापलें । तं उष्णयुक्त देहा तापक जाहलें । तैसें चिद्भास्या बुद्धीनें भासविलें । आनान आभासयुक्तें ॥चिद्रूप सामान्य ज्ञानेकडून । सर्व पदार्थ होती प्रकाशमान । परी अन्यथा अमुक अमुक म्हणून । कल्पनेविण न दिसती जैसा अग्निसन्निधीं देह पोळे । परी ओला नोव्हे विना जळें । तेवीं प्रकाशिलें परी न निवळे । आनान कल्पनेविण ॥म्हणून कल्पनारूप जे वृत्ती । मन बुद्धि नाम जयेप्रती । संशयात्मक मन निश्चिती ं निश्चयात्म बुद्धि ॥१०८०॥हे उभयरूपें एक कल्पना । अमुक अमुक कल्पी नाना । अन्यथा विपरीतपणें आनाना । नामरूपा कल्पी ॥८१॥परी ते जड प्रकाशरहित । प्रकाशीना कवणा किंचित् । जळ जैसें शीतळ अत्यंत । कवणा पोळवीना ॥८२॥स्वतां चंचळ परी प्रकाशहीन । ते कल्पना जेव्हां ज्ञानसंपन्न । तेचि जाणिजे भासमान । परप्रकाशें ॥८३॥जैसें शीतळ जळ पोळूं लागे । तरी तें तप्त जालें अग्निसंगें । तैशी बुद्धि जाणे नानात्वा प्रसंगें । तरी हे चिद्रुपें भासविली ऐशी बुद्धि चिद्रुपेंकडून । भासली तें चिद्भास्या लक्षण । ते कल्पना आभासयुक्त होऊन । नानात्व कल्पी ॥८५॥बुद्धिमाजीं ज्ञानासमान । ज्ञान उमटलें भासमान । तयासींच कल्पित नामाभिधान । बोधाभास जीव ॥८६॥तापरूप अग्नि जैसा । जळही पोळवीत असे सहसा । तो उष्णभास जल सहवासा । तेवीं जीव कल्पनेआंत ॥८७॥असो ऐसिया चिदाभासासहित । युक्त होऊनि बुद्धि विख्यात । नामारूपात्मक वस्तु समस्त । अन्यथात्वें भासवी ॥८८॥जल तप्त पोळवी देहासी । फोड येती जाळी अवयवांसी । आभासयुक्त बुद्धिहि तैशी । नामरूपें कल्पी ॥८९॥ अग्नि तैसा प्रकाशक आत्मा । पाणियापरी बुद्धि या नामा । उष्णभास तैसा आभास या जीवात्मा । हे तिन्ही स्पष्ट जाले परप्रकाशबुद्धि कळली । चित्प्रभा स्वप्रकाशें संचलीं आभास मिथ्या हे प्रतिति आली । यया दृष्टांतें ॥१०९१॥परी याचें कल्पना करिसी । किं अन्यथा भासवणें शक्ति जीवासी । तापल्या जळीं प्रभा तैशी । कोठें अन्या प्रकाशक ॥९२॥तरी याचें उत्तर ऐकावें । सूर्यकिरणें जळ तप्त व्हावें । आणि जळीं प्रतिबिंबही पडावें । तेणें झळझळिती भिंती ॥९३॥अग्नि सूर्य तो एकरूप । तया भेद न कीजे अल्प । तैसा आत्मा स्वप्रकाश चिद्रूप । असावादित्योब्रह्म ॥९४॥यया आत्मसूर्याचे प्रकाशीं । ठेविलें स्थूलदेहघटासी । बुद्धि पाणी आभासतस जीवासी । प्रतिबिंबत्वें आली ॥९५॥तया प्रतिबिंबरूप जीवानें । नानात्व अन्यथा भासवणें । जळीं उमटलें जें मिथ्यापणें । तेणें भिंती झळझळिती ॥९६॥सूर्य तैसा आत्मा प्रकाशक । सामान्यत्वें भासवी सकळिक । आभासयुक्त बुद्धि हे अनेक । भासवी जळ प्रभा जेवीं एवं आत्मा सच्चिद्धन । बुद्धि आभास हे मिथ्या दोन । हे तिन्हीही स्पष्टत्वें भिन्नभिन्न । दृष्टांतयुक्त सांगितले ॥९८॥आतां बुद्धीनें कोणती कल्पना । करून दाखविली असे नाना । आणि त्या विकल्पीं आत्मा देखणा । असे तेंही बोलूंरुपदौ गुणदोषादि विकल्पाबुद्धिगाः क्रिया ॥ ॥ ताःक्रियाविषयैःसार्धे भासयंती चितिर्मता ॥रूपरसादि दोषगुण । विकल्प हे बुद्धीचे विकार होणें । त्या क्रिया आणि विषय संपूर्ण । ज्ञान चित्प्रभा भासवी ॥११००॥
हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. |