सौंदर्यरस/टीका शास्त्र आणि साहित्य-निर्मिती






टीकाशास्त्र आणि
साहित्य-निर्मिती



 सामान्यतः लोकांत असा एक समज रूढ आहे की, टीकाकार व साहित्यिक यांचे संबंध अही- नकुलवत् असतात. त्या दोघांमध्ये हाडवैर असते व ते असणे साहजिकच आहे असे लोक मानतात. कारण साहित्यिक जे लिहितो त्याची चीरफाड करून त्यातील दोष दाखविणे हेच टीकाकाराचे जर काम आहे, तर त्या दोघांत सौहार्द असणे कसे शक्य आहे ? टोकाकाराची वृत्तीच मुळी शिकाऱ्यासारखी असते. शिकारी सावजाकडे पाहतो तसाच तो ललितकृतीकडे पाहात असतो, आणि तिचे निर्दाळण करून टाकण्यात त्याला शिकाऱ्यासारखाच आनंद प्राप्त होतो.
 लोकांत असा समज असतो आणि अनेक साहित्यिकांनी टीकाकाराची अशाच शब्दांत संभावना केलेली असल्यामुळे तो जास्तच दृढ होतो. या सामन्यात लोक बहुधा साहित्यिकाच्या बाजूचे असतात. कारण त्यांना टीकावाङ्मयाची मुळीच आवड नसते. काव्य, कादंबरी, नाटक यांत त्यांचे मन रमते आणि पुष्कळ वेळा त्यांच्या आवडत्या लेखकांवरही टीकाकार तुटून पडलेले त्यांना दिसतात. साहजिकच त्यांना त्यांचा राग येतो. आणि म्हणून, साहित्यिकांनी टीकाकारांची हेटाळणी केली तर ती त्यांना प्रिय होते. 'मारा, हाणा त्या कुत्र्याला. कारण तो टीकाकार आहे.' हे जर्मन महाकवी गटे याचे वचन अनेक लोकांचे आवडते वचन आहे. अठराव्या शतकातील कवी अलेक्झँडर पोप याने टीकाकारांची केलेली कुत्सित निंदा लोकांना अशीच सुखावह होते.
 तो म्हणतो, 'आपली मते आपल्या घड्याळासारखीच असतात. दोन मतांचा, त्याचप्रमाणे दोन घडयाळांचा कधी मेळ असावयाचा नाही. तरी प्रत्येकाला आपले मत व घड्याळ अगदी बरोबर आहे असे निश्चित वाटत असते. कवींमध्ये जशी प्रतिभा दुर्मिळ असते तशीच टीकाकारांत अभिरुची दुर्मिळ असते.'
 कोठल्याही दोन टीकाकारांचे एकमत कधी होत नाही. तेव्हा टीकेला शास्त्र म्हणणे अशक्य आहे, हा भावार्थ पोपने सूचित केला आहे.
 विख्यात फ्रेंच लेखक व्हॉल्टेअर याने आपल्या 'एसे ऑन एपिक पोएट्री' या निबंधात टीकाशास्त्राचा असाच उपहास केला आहे. तो म्हणतो, 'प्रत्येक कला यमनियमांच्या, शास्त्रांच्या भाराखाली वाकलेली आहे आणि हे नियम व ही शास्त्रे बहुतांशी तर्कदुष्ट व निरुपयोगी असतात. जगात जे जे म्हणून टीकाग्रंथ आहेत ते सर्व भाष्य, व्याख्या व केशविच्छेदन करून अत्यंत साध्या गोष्टी क्लिष्ट व दुर्बोध करून ठेवण्यात पूर्ण यशस्वी झाले आहेत.'
 जर्मन शास्त्रज्ञ हेगेल याने म्हटले आहे की, मनुष्याची प्रतिभा, त्याची कल्पनाशक्ती मंदावली की त्याची विवेचकशक्ती बळावते. यामुळे ज्याला प्रतिभा नाही तोच टीकाकार होतो. प्लेटो व अरिस्टॉटल हे साहित्यशास्त्रज्ञ टीकाकार होते. पण ते ग्रीक वैभवाचा काळ संपल्यावर उदयास आले. हे उदाहरण देऊन एक लेखक म्हणतो की, मालकाचा मृत्यू झाल्यावर त्याच्या रिकाम्या घरात त्याच्या जिंदगीची, त्याच्या पैशा अडक्याची मोजदाद करणारे विश्वस्त म्हणजेच हे टीकाकार होत. एकंदरीत उत्तरक्रिया करणे हे त्यांचे काम. सूर्य मावळल्यावर मग घुबडे संचार करू लागतात. तसेच टीकाकारांचे आहे.
 आपल्याकडे केशवसुतांपासून आजच्या नवकवीपर्यंत प्रत्येक कवीला टीकाकारांशी सामना द्यावा लागला आहे व लागत आहे कविता किंवा लघुकथा लिहिण्यात साहित्यिकांचा वेळ जात नसेल इतका वेळ टीकाकारांशी लढाई करण्यात जातो. बाळकृष्ण अनंत भिडे, पांगारकर इत्यादी पहिल्या पिढीतल्या टीकाकारांनी केशवसुती संप्रदायावर किती झोड उठविली होती हे प्रसिद्धच आहे. उलट त्याच वेळी नव्या पंथाचे लोक संत व पंडितकवींवर तुटून पडत होते. आज नवकवी व नवकथाकार व त्यांचे टीकाकार यांच्यातील द्वंद्व असेच कटुता निर्माण करीत आहे
 या सर्वामुळे या दोन वर्गात कायमचे व जन्मजात वैर असते व ते अपरिहार्य आहे असा लोकांमध्ये दृढ समज झाला तर त्यात आश्चर्य करण्याजोगे काही नाही, असे पुष्कळांना वाटेल.
 पण आपण थोडा जरी विचार केला, वरील दृष्टी टाकून थोडया जरी निराळ्या दृष्टीने पाहू लागलो, तरी हा समज अत्यंत वेडगळ असून तो लोकांत अशा तऱ्हेने दृढ व्हावा याचेच आपल्याला आश्चर्य वाटेल.
  निराळया दृष्टीने पाहू लागताच आपल्या असे ध्यानात येईल की, अनेक ललितलेखक हे स्वतःच अतिशय व्युत्पन्न असे टीकाकार असतात. फडके, खांडेकर, माडखोलकर, माधव ज्युलियन, गंगाधर गाडगीळ, मर्ढेकर ही नामावली प्रसिद्ध आहे. यांपैकी प्रत्येकाने साहित्यलेखनात जितकी कीर्ती मिळवली आहे तितकीच टीकाकार म्हणूनही मिळविली आहे. पुनःप्रत्ययाचा आनंद, लेखनपूर्व, लेखनगर्भ आत्मनिष्ठा, कला व नीती, सत्य, सौजन्य, सौंदर्य यांविषयीचे या टीकाकारांचे सिद्धान्त मराठी टीकाशास्त्रात मान्यता पावलेले आहेत जी गोष्ट आपल्याकडची तीच पाश्चात्य जगाचीही आहे. साहित्यिक लेसिंग, हर्डर, इंग्लिश कवी वर्डस्वर्थ व कोलेरिज, नाटककार बर्नार्ड शॉ, रशियन कादंबरीकार टॉलस्टॉय, फ्रेंच कादंबरीकार बालझॅक्, रोमा रोलां, हे सर्व साहित्य व साहित्यशास्त्र या दोन्ही क्षेत्रांत सारखेच प्रसिद्ध आहेत व विद्वन्मान्य आहेत.
 कवी वर्डस्वर्थ याची 'लिरिकल बॅलडस् ची प्रस्तावना' म्हणजे पाश्चात्य साहित्यशास्त्राच्या विकासातील एक टप्पा मानला जातो. लोक जीवन हाच काव्याचा विषय असला पाहिजे व काव्य हे साध्या नित्याच्या लोकभाषेत लिहिले पाहिजे असा त्याचा आग्रह होता. काव्य म्हणजे मानव व निसर्ग यांचे प्रतिबिंब असून सत्य हे त्याचे ध्येय असते, व ते सत्य भावनांच्या साह्याने मानवी हृदयापर्यंत पोचविणे हे कवीचे कार्य होय. ही वर्डस्वर्थची मते इंग्लिश काव्याच्या विकासाला उपकारक झाली असे साहित्यशास्त्राच्या इतिहासकारांचे मत आहे. कोलेरिज हा कवी खरा. पण 'बाॅयाॅग्राफिया लिटरारिया' हा त्याचा टीकाग्रंथ त्याच्या काव्याइतकाच मोलाचा मानला जातो. 'विविधतेतून एकरूप परिणाम साधण्याची शक्ती अशी त्याने प्रतिभेची व्याख्या केलेली आहे. मॅक्झिम गॉर्की हा रशियन साहित्यिक. 'मदर' हया त्याच्या कादंबरीची अक्षरसाहित्यात गणना होते. पण रशियात एक थोर साहित्यशास्त्रज्ञ म्हणूनही त्याची तितकीच कीर्ती आहे. 'समाजवादी वास्तववादाचा निर्माता' असा त्याचा मोलोटाव्ह याने गौरव केला आहे. रवीन्द्रनाथ ठाकुर यांची काव्यप्रतिभा व त्यांची समीक्षाशक्ती या सारख्याच समर्थ होत्या हे सुप्रसिद्धच आहे. सर्जनशक्ती व समीक्षाशक्ती या परस्पर व्यवच्छेदक आहेत. हा रूढ समज चुकीचा आहे असे मतही रवीन्द्रनाथ आवर्जून मांडीत असत. अशी किती म्हणून उदाहरणे द्यावी ! सर्वत्र उदाहरणेच आहेत. प्रत्येक देशातील थोर साहित्यिक प्रतिभा व समीक्षा या लक्ष्मी-सरस्वतीप्रमाणे निसर्गभिन्नास्पद नाहीत हेच दाखवीत आहेत. या दोन्ही शक्ती एकसंस्थ असणे हा अपवाद नाही. तसाच तो नियम नाही हे खरे; पण नियम आहे असे वाटण्याइतकी विपुल उदाहरणे सापडतील हेही तितकेच खरे आहे. म्हणूनच साहित्यिक व टीकाकार यांच्यात हाडवैर असणे साहजिक आहे, असा समज रूढ व्हावा, याचेच नवल वाटते.

 प्रतिभा व समीक्षा या एकठाय असतात असा नियम नाही असे वर म्हटले आहे. पण ते तितकेसे खरे नाही. एका दृष्टीने पाहता तसा नियम आहे, तसा नियम असल्यावाचून भागणार नाही, असे दाखविणे सहज शक्य आहे. आपण हे ध्यानात घेतले पाहिजे की, प्रत्येक साहित्यिक हा एक अव्वल दर्जाचा टीकाकार असतोच असतो. तसा तो असल्यावाचून त्याला अक्षर-साहित्य निर्माण करता येणारच नाही. तो साहित्यशास्त्रावर ग्रंथ लिहिणार नाही, समीक्षेचा एकही लेख त्याच्या लेखणीतून उतरणार नाही, हे शक्य आहे. पण समीक्षाशक्ती त्याच्या चित्तात प्रतिक्षणी जागृत असल्यावाचून त्याला कलाकृतीची निर्मिती सर्वथा अशक्य आहे. हरिभाऊंचे उदाहरण, आपण घेऊ. त्यांनी पाश्चात्य कादंबऱ्या वाचल्या, काव्य वाचले. स्कॉट डिकन्स, थॅकरे, ड्यूमा यांच्या साहित्याचा अभ्यास केला आणि आपण अशा तऱ्हेचे साहित्य लिहावे असे मनाशी ठरविले. पण अशा म्हणजे कशा तऱ्हेचे, हे त्यांना मनाशी निश्चित करावे लागलेच असणार. आपण आपल्या साहित्यात लोकजीवनाचे दर्शन घडवावयाचे, त्यात पूर्वीच्या हळबे, रिसबूड या कादंबरीकारांप्रमाणे अद्भुत प्रसंग न आणता वास्तव प्रसंग वर्णावयाचे, कथानकापेक्षा व्यक्तिदर्शनाला महत्त्व द्यावयाचे, हे व अशा तऱ्हेचे अनेक सिद्धान्त त्यांनी कळत-नकळत मनाशी निश्चित केले नसते तर मराठी कादंबरीच्या क्षेत्रात त्यांना युगपरिवर्तन करताच आले नसते, आणि हे सिद्धान्त निश्चित करणे म्हणजेच आपले समीक्षाशास्त्र ठरविणे होय चित्रकार चित्र काढीत असतो किंवा मूर्तिकार मूर्ती घडवीत असतो, त्या वेळी मधून मधून थोडे दूर जाऊन आपल्या कृतीचे तो निरीक्षण व समीक्षणही करतो. रंगसंगती साधली आहे की नाही, भावदर्शन झाले आहे की नाही, निम्नोन्नत भाग योग्य आहेत की नाही, हे सर्व त्याचे त्याला जाणता आले नाही तर काय होईल ? दर वेळी तो कलेच्या टीकाकाराला बोलावून विचारणार की काय ? चित्राची वा मूर्तीची समीक्षा त्याची त्याला आली नाही तर त्याच्या हातून उत्तम कलाकृती निर्माण होणे शक्य नाही. तेच साहित्याचे आहे. कथानक रचताना त्यात समरप्रसंग असला पाहिजे, त्यात चढउतार असले पाहिजेत, त्यांनी उत्कंठावर्धन झाले पाहिजे, स्वभावदर्शन व्यक्तींच्या संवादातून करणे जास्त चांगले, अनुलोम पद्धतीपेक्षा निवेदनाची प्रतिलोम पद्धती चांगली, इत्यादी साहित्यशास्त्रातले सिद्धान्त साहित्यिकाला,

अबोधपूर्व का होईना, पण ज्ञात असलेच पाहिजेत. त्यावाचून आपले साहित्य सारखे पाहून, त्याचा परिष्कार करणे त्याला शक्यच होणार नाही. त्याची प्रतिभा लेखनात आविष्कृत होते तशी समीक्षाशक्ती होणार नाही कदाचित. पण ती सतत प्रतिभेच्या साह्याला उभी असल्यावाचून नवनिर्मिती होणे शक्यच नाही.
 मॅक्झिम गॉर्कीने 'मदर' ही कादंबरी लिहिली. ती लिहून त्याने कादंबरीलेखनाच्या तंत्रात आमूलाग्र क्रांती केली. आता 'मदर' लिहिताना ते जे नवे तंत्र त्याने अवलंबिले त्यातूनच नवे साहित्यशास्त्र निर्माण झाले. साहित्याविषयी काही भिन्न कल्पना निश्चित केल्यावाचून- किंवा सहजगत्या झाल्यावाचून- गॉर्कीला 'मदर' कादंबरी लिहिता आली नसती. मानव हाच सर्व कर्ता-करविता नवसृष्टीचा निर्माता होय, जगातले सर्व सौंदर्य श्रमानेच निर्माण होते, श्रमातूनच उदात्त विचार, उदात्त कल्पना निर्माण होतात. हे त्याचे सिद्धान्त त्याला कादंबरीत सांगावयाचे होते. त्यांना मूर्त रूप द्यावयाचे होते. आता अमूर्ताला मूर्त रूप कसे द्यावयाचे हेच साहित्यशास्त्रात सांगितलेले असते. गॉर्कीने ते शास्त्र स्वतः लिहिले नसले तरी त्याने ते जाणले असलेच पाहिजे. त्यावाचून तो मूर्त रूप देणार कसा? हे मूर्त रूप देताना मानव व्यक्ती ज्या रेखावयाच्या त्याचेही त्याने चिंतन केले होते. 'समाजवादी वास्तववाद' त्यातूनच निर्माण झाला. हा वास्तववाद म्हणजे कलेचे नवे रूप होय, असे त्यांचे मत होते. केवळ जुन्या किंवा सध्याच्या समाजाचे चित्र काढून नव्या कलेचे समाधान होत नाही. आजच्या समाजाने जी क्रांती घडविण्याचे योजिले आहे तिला साह्य करणे आणि भविष्यकाळ कसा उज्ज्वल होणार आहे ते दाखविणे, हे त्याच्या मते, नव्या कलेचे उद्दिष्ट आहे आणि त्यासाठी मानवाची स्थिर अशी व्यक्तिचित्रे न काढता सतत गतिमान परिवर्तनशील, विकासशील अशी व्यक्तिचित्रे काढली पाहिजेत असे समाजवादी वास्तववादाचे मत आहे. हे सिद्धान्त हेच नवे साहित्यशास्त्र होय. आणि ते 'मदर' लिहिणाऱ्या गॉर्कीनेच सांगितलेले आहे.

 शेक्सपीयर काही टीकाकार म्हणून प्रसिद्ध नाही. पण अनेक साहित्यशास्त्रविषयक सिद्धान्त त्यानें आपल्या मनाशी निश्चित केले होते. हे त्याच्या नाटकांवरून दिसून येते. हॅम्लेट हा त्याने बोलाविलेल्या नाटक-मंडळीतल्या नटांना उपदेश करतो, त्यात साहित्यशास्त्र सहज यऊन जाते. तो म्हणतो,-, नैसर्गिक दिसेल तेच करा. त्याच्या पलिकडे जाऊ नका. कारण तसे केल्याने नाट्यकलेचा हेतू साधत नाही. निसर्गाची तंतोतंत आरशातल्याप्रमाणे प्रतिकृती वठविणे हाच प्राचीन काळापासून आजपर्यंत नाट्यकलेचा हेतू आहे.' अमूर्ताचे मूर्त कसे करावे याचे शास्त्र तर शेक्सपीयरने बोधपूर्वक जाणले असले पाहिजे. कारण ते त्याने स्पष्ट करूनच सांगितले आहे. 'जे अमूर्त आहे, अज्ञात आहे ते कवीच्या कल्पनेत प्रथम साकार होते नंतर कवी आपल्या लेखणीने त्याला प्रत्यक्षात आकार देतो आणि जे केवळ भावमय, भासवत् असते त्याला स्थळकाळाने व नामरूपाने बद्ध करतो.' अशी प्रक्रिया त्याने स्वतःच सांगितली आहे.
 महाराष्ट्रातील ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम या संतांनी आपले साहित्य लिहिले ते संस्कृत साहित्याच्या परंपरेहून फार निराळ्या रीतीचे होते. त्यामुळे त्यांना आपले साहित्यशास्त्र मनाशी निश्चित करून मगच लिहावे लागले. काव्यहेतु, काव्यकारण, काव्यगुण या सर्व बाबतीत त्यांचे मत रूढ परंपरेहून निराळे होते. ते सांगण्यासाठी त्यांनी स्वतंत्र साहित्यशास्त्र लिहिले नाही, पण आपल्या काव्यांत मधुनमधून आपले साहित्यविषयक सिद्धान्त त्यांनी सांगून ठेवले आहेत. 'या कथेच्या आईकण्याने श्रवणासि पारणे होते व संसारदुःखाला मोकलता येते' या शब्दात ज्ञानेश्वरांनी आपल्या काव्याचा हेतू सांगितला आहे. त्यांना लोकांना मोक्ष द्यावयाचा होता. गीतार्थाने विश्व भरून टाकून जग हे आनंदाचे आवारू होऊन जाईल असा वाग्विलास विस्तारावयाचा होता. एकनाथांचाही काव्यरचनेचा हाच हेतू होता. 'एकादशा ऐशा ग्रंथांत ठाकठीक परामर्श तुम्हांला सापडेल. सर्व महाकवी असले काव्य रचूनच निजहितार्थ पावले', असे ते सांगतात. काव्यगुणांविषयीही संतांचे मत असेच निश्चित ठरलेले होते. तुकाराम म्हणतात की, 'काव्याला मुख्य अलंकार म्हणजे अनुभव. केवळ शब्दांचे गौरव कामा नये. कारण आम्हाला काही चित्ता रंजवणी करावयाची नाही. ती रमेट कहाणी येरांनी सांगावी. आम्ही पिटू भक्तीचा डांगोरा, कळिकाळासी दरारा. ती भक्ती हा आमच्या काव्याचा मुख्य गुण होय.' रामदासांनी हेच सांगितले आहे. 'भक्तिहीन कवित्व म्हणजे ठोंबे मत असें जाणावें. कामिक, रसिक, शृंगारिक, कौतुक विनोद अनेक' याला रामदास धीटपाठ काव्य म्हणतात. त्यांच्या मते हे काव्यगुण नव्हेतच. प्रतिभा ही ईश्वरदत्त आहे, असे सर्व संत कवींचे मत होतें. 'एकासि अभ्यासिता नये, (खटपट करूनही साधत नाही; पण) एकासि स्वभावेचि ये, ऐसा भगवंताचा महिमा काये, कैसा कळेना.' 'आपुल्या बळाने आम्ही बोलत नाही, आमचा कृपावंत सखा विठ्ठल, त्याची ही वाचा आहे.' अशा प्रकारचे संतांचे उद्गार प्रसिद्धच आहेत. याचा अर्थ असा की, संतांनी साहित्यशास्त्रावर ग्रंथ लिहिले नसले तरी त्यांनी आपले साहित्यशास्त्रीय सिद्धान्त मनाशी निश्चित केलेच होते. त्यांना जुन्या संस्कृत परंपरेप्रमाणे लिहावयाचे नव्हते. अर्थातच नवे टीकाशास्त्र ठरवून ठेवणे त्यांना भागच होते.
 प्रत्येक थोर लेखक हा साहित्यशास्त्रज्ञ असतोच, त्याने टीकाग्रंथ लिहिले नाहीत तरी त्याच्या मनात टीकाशास्त्र सिद्ध असते व त्याअन्वये तो आपल्या व इतरांच्या साहित्याची सारखी समीक्षा करीत असतो, हा विचार वरील उदाहरणांवरून सहज पटेल असे वाटते. आणखी एक-दोन उदाहरणे देऊन त्याचे विवेचन पुरे करू. रवीन्द्रनाथ ठाकुरजींनी अनेक साहित्य विषयक सिद्धान्त सांगितले आहेत हे सुप्रसिद्धच आहे. कला ही स्वार्थ आहे की परार्थ, हा अलिकडे मोठा वाद आहे. रवीन्द्रांचे त्यावर निश्चित उत्तर आहे. केवळ स्वतःच्या आनंदासाठी लिहिलेले ते साहित्य नव्हे. वाचक, श्रोते हेच कवीचे उद्दिष्ट असते; असले पाहिजे. आईचे दूध हे मुलासाठी असते, आणि त्यात अनैसर्गिक असे काही नाही. जे लाकूड जळत नाही त्याला अग्नी कसे म्हणावे? लाकडाच्या अंगी अग्नी सुप्त असतो, पण त्याला कोणी अग्नी म्हणत नाही. तसेच कवीचे आहे. आविष्कार, प्रकटीकरण हेच काव्य होय. मानवी मनाची, रवीन्द्रांच्या मते, प्रवृत्तीच अशी की अनेकांमध्ये स्वतःचे अस्तित्व अनुभवावे. सर्व कलांचा जन्म या प्रेरणेने होतो. मी अमर व्हावे, मी इतरांच्या मनात वसावे ही इच्छाच कलाविष्काराच्या मागे असते. आणि इतरांच्या मनात प्रवेश करण्याचे साधन म्हणजे भावना. त्यांना अमरत्व असते. ज्ञानाचे एकदा आकलन झाले की ते शिळे होते. भावना शिळ्या होत नाहीत. रामायण, शाकुंतल ही काव्ये आजही रम्य वाटतात त्याचे हे कारण आहे. अशा भावना प्रथम आपल्याशा करून मग त्या सर्वांच्या करणे हेच साहित्याचे कार्य. रवीन्द्रांनी जे जे साहित्य लिहिले त्याचे शास्त्र या रीतीने त्यांनीच सांगितले आहे.
 शरच्चंद्र चतर्जी यांनीही आपल्या साहित्याचे शास्त्र मनाशी निश्चित केले होते. त्यांच्या ठायीचा टीकाकार अखंड जागृत होता म्हणूनच त्यांची साहित्यनिर्मिती अगदी आगळी अशी झाली. हीन, पतित अशा जीवनाचे नुसते यथार्थ चित्र हे शरदबाबूंच्या मते साहित्य नव्हे. तर त्या पातित्याचा मानवी जीवनाशी संबंध दाखवणे ही कला होय, हे साहित्य होय. सत्य, सौंदर्य यांविषयीही त्यांचे मत असे निश्चित झालेले होते. ते म्हणतात,- 'जगात घडणाऱ्या घटना मुळात सुंदर नसतील, किंवा जगातल्या सुंदर वस्तु कादंबरीच्या दृष्टीने सत्य नसतील. सत्याला मी मूर्त करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा प्रथम ते कुरूप दिसते. पण लौकिक सत्याचा होम करताच त्यातून सौंदर्य निर्माण होते. जगातली कुरूपता ज्याने पाहिली नाही, दुःखाचे आघात ज्याने सोसले नाहीत, यातना, निराशा ज्याने भोगल्या नाहीत, त्याला जीवनाचे खरे प्रेम असण शक्य नाही व ते असल्यावाचून मनुष्याच्या हातून खरे मानवदर्शन घडावयाचे नाही.' असे शरदबाबूंचे मत होते. शरदबाबू हें तंत्राविषयी फार जागरूक असत. खरा मानव दाखविण्यासाठी तंत्राची फार आवश्यकता असते, असे त्यांना वाटे. म्हणून वाक्यरचना, शब्दयोजना यांचा छापण्यापूर्वी ते अनेक वेळा परिष्कार करीत. लेखक असा परिष्कार करतो याचा अर्थच हा की, टीकाशास्त्राचे सिद्धान्त त्याच्या मनात निश्चित झालेले असतात. त्यावाचून परिष्करण शक्यच होणार नाही. व्यक्तिरेखा आधी निश्चित करून मग त्यातून कथानक निर्मावे, कथानकात व्यक्ती भरू नयेत, हा स्वतःचा साहित्य सिद्धान्त त्यांनी प्रत्येक कादंबरीत प्रत्यक्षात आणला हे सर्वविश्रुत आहे.
 टीकाशास्त्र आणि साहित्यनिर्मिती यांचा विरोध तर नाहीच. पण प्रतिभा व समीक्षा या शक्ती परस्परांना साहाय्यकच आहेत, हे आतापर्यंतच्या विवेचनावरून ध्यानात येईल असे वाटते. पण समीक्षा ही शक्ती अप्रत्यक्षपणे साहित्याला उपकारक ठरते. प्रत्यक्ष नव्हे, असे वरील उदाहरणांवरून वाटण्याचा संभव आहे. म्हणून समीक्षा ही प्रत्यक्षच साहित्यनिर्मितीला कशी पोषक आहे, हे दाखविणे अवश्य आहे. तो विचार आता पाहू.
 साहित्यशास्त्र वाचून कोणी साहित्य लिहावयास बसत नाही, असे नेहमी म्हटले जाते, आणि ते खरेही आहे. पण यातून टीकाशास्त्राचा जो अधिक्षेप केला जातो तो खरा नाही. टीकाशास्त्राचे दोन विभाग असतात त्यातील एखाद्या विशिष्ट ललितकृतीचे परीक्षण हा जो भाग तोच प्राधान्याने लोकांच्या डोळ्यांसमोर असतो. वरील उद्गार टीकाशास्त्राच्या या विभागाला उद्देशून असले तर एखादे वेळी सार्थ असतील. तेही खरे नव्हे. अशा परीक्षणांचेही अतिशय महत्त्व असते. पण कित्येक वेळा या परीक्षणांची उपेक्षा करणे साहित्यिकाला शक्य होईल. पण टीकाशास्त्राचा साहित्याच्या मूलतत्त्वांचे विवेचन, साहित्याच्या प्रेरणांचा अभ्यास, साहित्याच्या सामर्थ्याचे मापन, हा जो दुसरा भाग, त्याची उपेक्षा कोणाला कधीच करता येणार नाही. ती केली की साहित्याला अवकळा आलीच म्हणून समजावे. नव्या प्रेरणांतूनच नवे साहित्य निर्माण होत असते. आणि या नव्या प्रेरणा समाज जीवनाचा अभ्यास करून टीकाकार निर्माण करीत असतो. म्हणजे साहित्य- क्षेत्रात युगपालट करावा, मन्वंतर घडवावे, हा टीकाकाराचा अधिकार आहे.

 टीका म्हणजे स्तुती नव्हे आणि निंदाही नव्हे. तर एक नवे तत्त्व. नव्या काळाला उपयोगी, जीर्ण साहित्याचा उद्धार करणारे तत्त्व. जर्मन टीकाकार लेसिंग (१७२९- १७८१) याला अर्वाचीन युरोपीय टीकाशास्त्राचा जनक म्हणतात. साहित्य हा राष्ट्रीय प्रतिभेचा आविष्कार आहे असा सिद्धान्त त्याने सांगितला व त्याचे फार दूरगामी परिणाम होऊन पाश्चात्त्य जगात साहित्यक्षेत्रात मन्वंतरच झाले. लेसिंगच्या काळात जर्मनीत फ्रेंच भाषेचे फार वर्चस्व होते. महाराणा फ्रेडरिक याने जर्मन राष्ट्राभिमान जागृत केला, पण त्याला जर्मन भाषेचा तिटकारा असून फ्रेंच प्रिय होती. आणि सर्व जर्मन साहित्यिकांची तशीच भावना असून ते फ्रेंचांचे अनुकरण करण्यात धन्यता मानीत. अशा वेळी साहित्य हा राष्ट्रीय अस्मितेचा आविष्कार असून तो मातृभाषतच होऊ शकतो, हा सिद्धान्त लेसिंग याने सांगितला. त्यामुळे जर्मनीत एकदम नवचैतन्य निर्माण झाले व जोमदार आणि सकस जर्मन साहित्य निर्माण होऊ लागले. या सिद्धान्ताप्रमाणेच साहित्यात लोकजीवनाचे दर्शन घडले पाहिजे व ते बहुजनांच्या भाषेतून, लोकभाषेतून घडले पाहिजे असा दुसरा सिद्धान्त लेसिंगने सांगितला. स्वतः लेसिंग हा जसा टीकाकार तसाच मोठा साहित्यिक होता. 'मिना व्हॉन बॅनहेल्म' हे त्याचे सर्वश्रेष्ठ नाटक होय. त्यात प्रथमच लोकजीवनाचे दर्शन घडले. जनतेला साहित्यात स्वतःचेच दर्शन घडल्यामुळे फार आनंद झाला. स्वतःचे दर्शन वाङ्मयात झाले की, लोकांना नव्या प्रेरणा मिळतात.

 लेसिंगचा 'ला ओकून' हा साहित्यशास्त्रीय ग्रंथ फार प्रसिद्ध आहे. मन्वंतर घडवून आणले ते यानेच. आधीच्या काळी साहित्य हे नियमबद्ध करून टाकण्याकडे प्रवृत्ती होती. त्यामुळे नियमावली रचणे, व ती अन्वये निवाडा देणे हेच टीकाकाराचे कार्य, असे मानले जात असे. यामुळे साहित्य निर्जीव झाले होते. त्याला मृतकळा आली होती. त्यातील जिवंतपणा, सहजस्फूर्ती, भावनांचा जिव्हाळा, सर्व सर्व नष्ट झाले होते. लेसिंगच्या या ग्रंथाने लोकांना नवी दृष्टी दिली. सेंटस्बरी हा पाश्चात्त्य साहित्यशास्त्राचा इतिहासकार लेसिंगविषयी म्हणतो की, जर्मनीत महाकवी गटे निर्माण झाला याचे श्रेय लेसिंगला आहे. इंग्लंडमध्ये कोलरिज निर्माण झाला हाही त्याच्याचमुळे. केवळ सेंटस्बरीचे हे मत आहे असे नव्हे; तर खुद्द गटेने हीच भावना व्यक्त केली आहे. विद्युल्लतेप्रमाणे त्याने आमचा मार्ग उजळून टाकला. जुने शास्त्र रद्द करून नवे साहित्यशास्त्र निर्माण केले, म्हणून (लेसिंग) ही अर्वाचीन युरोपीय साहित्याची गंगोत्री आहे, असे तो म्हणतो. ॲरिस्टॉटलनंतर लेसिंग हाच मोठा साहित्यशास्त्रज्ञ झाला, असे पाश्चात्त्य टीकाकार मानतात व त्याची योग्यता डार्विन, सिग्मंड फ्रॉइड यांच्यासारखीच आहे असे समजतात. 'नवे साहित्य निर्माण होण्याआधी नवे साहित्यशास्त्र निर्माण व्हावे लागते' या म्हणण्याचा अर्थ आता आपल्याला समजेल. अमेरिकन साहित्यशास्त्रज्ञ लोवेल याने असा अभिप्राय दिला आहे. साहित्य उदयाला येण्यापूर्वी साहित्यशास्त्र उदयास येणे अवश्य असते असे तो म्हणतो. आणि अमेरिकेने साहित्य हे अमेरिकन समीक्षेमुळे जन्माला आले असे विधान करतो. टीका म्हणजे केवळ गुणदोषपरीक्षण इतकाच अर्थ घेतला तर हे विधान विचित्र- नव्हे, हास्यास्पदही वाटेल. पण लोकजीवनातून साहित्य निर्माण व्हावे, त्यात राष्ट्रीय अस्मितेचा आविष्कार झाला पाहिजे, ते यम-नियमांच्या कैचीत बसविता कामा नये, जीवनदर्शन, जीवनभाष्य हा त्याचा हेतू असावा, कवीच्या जगाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाला त्यात प्राधान्य असावे, ही जी मूलतत्वे, त्यांची चिकित्सा, त्यांचे विवरण हा टीकाशास्त्र याचा अर्थ घेतला तर वरील विधानात आक्षेपार्ह असे काही नाही हे सहज ध्यानात येईल, कवी हा साहित्य- शास्त्र वाचून काव्य लिहीत नाही यात वाद नाही. तसे त्याने लिहू नये हेच योग्य. पण हा सर्व समाजाच्या मनःक्रान्तीचा प्रश्न आहे. एका व्यक्तीचा नव्हे आणि त्या दृष्टीने पाहता सर्व समाजाची जी अभिरुचीची एक विशिष्ट पातळी, ती तयार करण्यात समीक्षाशास्त्राला निःसंशय महत्त्व आहे. आणि यांतूनच कवीच्या मनाची तयारी होत असते. त्याने प्रत्यक्ष साहित्यशास्त्र व्यक्तिशः वाचलेले असो की नसो, साहित्यविषयक सिद्धान्त त्याच्या मनात निश्चित ठरलेले असतात आणि त्याअन्वयेच तो लिहीत असतो. या सिद्धान्तावाचून स्वतःच्या साहित्यातील बरेवाईट त्याचे त्यालाच कळणार नाही.

 सेंटस्बरी व लोवेल यांची वचने वर दिली आहेत. त्यांनी टीकाशास्त्राचा महिमा सिद्ध होतो हे खरे. प्रतिभेचे युग संपले म्हणजे मग टीकेचे युग सुरू होते, हा सिद्धान्त किती एकांतिक आहे हे त्यावरून दिसते. पण आपापल्या परी तेही सिद्धान्त एकांतिक आहेत असे वाटते, जर्मनी किंवा अमेरिका या देशातील त्या कालखंडात तसे घडले असेल. टीकाशास्त्राने युग पालटून समाजाला नवी दृष्टी दिल्यामुळे तेथे नवसाहित्याचा उदय झाला हे खरे असेल. पण त्यामुळे हा सिद्धान्त सार्वत्रिक मानता येईल, असे वाटत नाही. प्राचीन संस्कृत वा ग्रीक साहित्याचा विचार केला तर 'रामायण', महाभारत', 'इलियड' या महाकाव्यांच्या पूर्वकाळी भारतात किंवा ग्रीसमध्ये साहित्यशास्त्र परिणत अवस्थेस गेले होते आणि या महाकाव्यांमागे तशा तऱ्हेची प्रेरणा होती असे म्हणता येत नाही. सामान्यतः लोकव्यवहार व भौतिक शास्त्रे यांचा जो संबंध आहे तोच साहित्य व साहित्यशास्त्र यांचा असतो असे वाटते. पाण्यावर पदार्थ कसे तरंगतात याविषयी शास्त्र तयार होण्याच्या आधी अनुभवाच्या जोरावर हजारो वर्षे मानव नाव चालवीतच होता. वैद्यकशास्त्राच्या उदयाच्या आधी झाडपाल्याचे औषध तो वापरीतच होता. आणि स्थापत्यशास्त्र सिद्ध होण्यापूर्वी घरे बांधून राहातच होता. शास्त्रे सिद्ध झाल्यामुळे मूळच्या अनुभवाच्या ज्ञानात अनेक पटींनी भर पडली व जलवाहतुकीचे, औषधांचे व घरांचे रूप कल्पनातीत पालटून गेले व बहुजनांना ती सुखे मिळू लागली, हा शास्त्राचा महिमा होय. हाच प्रकार साहित्याचा आहे असे वाटते. साहित्यशास्त्राच्या काधी मानव काव्ये लिहीत होता. त्यांच्या अवलोकनानेच त्याला पुढे साहित्यशास्त्र रचता आले आणि मग त्या शास्त्राने साहित्याच्या प्रगतीला फार मोठे साह्य केले, असा हा क्रम आहे असे वाटते. जेथे भौतिक शास्त्रे निर्माण झाली नाहीत तेथे नावांच्या किंवा घरांच्या बांधणीत कसलाही फरक झाला नाही हे जसे खरे, त्याचप्रमाणे जेथे साहित्यशास्त्र निर्माण झाले नाही तेथे साहित्यांतही प्रगती झाली नाही हेही खरे आहे. अर्थात मानवी जीवनाची शास्त्रे भौतिक शास्त्राइतकी काटेकोर कधीच नसतात. जलतरणशास्त्र सिद्ध झाले नाही तर नावेची प्रगती होणे शक्य नाही हे अगदी खरे; पण इतक्या निश्चयाने साहित्याबद्दल विधान करता येईल असे वाटत नाही. या दृष्टीने प्राचीन संस्कृत व प्राचीन मराठी साहित्याचा इतिहास पाहणे जरा उद्बोधक होईल.

 'रामायण' व 'महाभारत' ही संस्कृतांतली महाकाव्ये म्हणजे कविप्रतिभेचा उत्तुंग विलास होय, हे सर्वमान्य आहे. पण दुर्दैव असे की, संस्कृतात त्यांचे सौंदर्य विशद करणारा एकही टीकाग्रंथ नाही. संस्कृत साहित्यशास्त्राचा इतिहास मोठा उज्ज्वल आहे. पण त्यातील कोणत्याही साहित्यशास्त्रज्ञाने 'रामायण' व 'महाभारत' यातील कथानकरचना, व्यक्तिदर्शन, ध्येयवाद, वास्तववाद, संवादरचना, मनोविश्लेषण, निसर्गवर्णन, रसपरिपोष यांतील सौंदर्य उकलून दाखविले नाही. या महाकाव्यांत लोकजीवनाचे खरेखुरे दर्शन घडते. त्या काळच्या समाजस्थितीचे पूर्ण प्रतिबिंब त्यात आपणास पहावयास सापडते. पण या महाकाव्यांवर टीकाग्रंथ लिहून लोकजीवनदर्शनाचा महिमा कोणाही शास्त्रज्ञाने त्या काळी लोकांना पटवून दिला नाही. पुढच्या काळात साधारणतः इसवी सनाच्या पहिल्या हजार वर्षांत 'मृच्छकटिक', 'कुमारसंभव', 'रघुवंश', 'शाकुंतल', 'उत्तरराम-चरित', 'मुद्राराक्षस' 'किरातार्जुनीय' इत्यादी काही अलौकिक अशी काव्यनाटके निर्माण झाली. पण त्यांत भोवतालच्या समाजाचे, तत्कालीन लोकजीवनाचे दर्शन अपवादात्मकच आहे. कवींना तशी प्रेरणा मिळाली नाही आणि साहित्यशास्त्रज्ञांनीही तसा आग्रह धरला नाही. उलट साहित्यशास्त्रज्ञ त्याविषयी उदासीनच होते.
 पण याहीपेक्षा एक खेदजनक गोष्ट आहे. व्यक्तिदर्शन, मनोविश्लेषण, ध्येयवाद, वास्तववाद इत्यादी. साहित्यगुणांच्या दृष्टीने या पुढल्या काव्य नाटकांची समीक्षा तर कोणी केली नाहीच. या गुणांचा विचारही संस्कृत साहित्यशास्त्रात झालेला नाही. पण रस, ध्वनी, औचित्य इत्यादी ज्या गुणांची चर्चा संस्कृत साहित्यशास्त्राने केली आहे, त्यांच्या दृष्टीनेही वरील काव्यनाटकांची समीक्षा कोणा संस्कृत पंडिताने केली नाही. मल्लीनाथ, राघवभट्ट यांनी या काव्यांवर टीका लिहिल्या; पण सामान्य अर्थ सांगण्यापलिकडे त्यांनी फारसे काही केले नाही. त्या समीक्षा नव्हेतच. त्यांनीच म्हटल्याप्रमाणे त्या केवळ अर्थद्योतनिका होत. जीवनाचे सारखे अवलोकन करीत राहिल्याने जसे शास्त्र वाढीस लागते त्याचप्रमाणे साहित्याची सतत समीक्षा करीत राहिल्याने साहित्यशास्त्र वाढीस लागते. संस्कृतात ते कोणी केलेच नाही. संस्कृत टीकाकार 'मृच्छकटिक', 'शाकुंतल', यांसारख्या ललितकृतींची समीक्षा करीत राहिले असते तर व्यक्तिदर्शनादी साहित्यगुणांची आज पाश्चात्त्य साहित्यशास्त्राच्या अभ्यासामुळे जी आपणास या नाटकात प्रतीती होते ती त्या काळीच झाली असती आणि संस्कृत साहित्याचे संपूर्ण सौंदर्यदर्शन घडविण्यास संस्कृत साहित्यशास्त्र समर्थ झाले असते. पण स्वकालीन साहित्याचे सौंदर्यसुद्धा सर्वांगांनी विशद करण्याची ऐपत त्या शास्त्राला लाभली नाही. कारण अर्थापलिकडचे सौंदर्य पाहण्याचा प्रयत्नच टीकाकारांनी केला नाही.

 तसा त्यांनी केला असता तर त्या वेळच्या काव्यनाटकांचे सौंदर्य त्यांना आविष्कृत करता आले असतेच, पण त्याहून एक महत्त्वाची गोष्ट घडली असती. वरील काव्यनाटके कितीही अलौकिक असली तरी काही परंपरा, काही चकारी सोडून ती बाहेर पडतच नाहीत. ती सर्व अद्भुत पौराणिक आदर्शवादातच रमतात. कठोर वास्तव जीवनाकडे पाहण्याचे सामर्थ्य त्यांना नाही. काही दण्डक प्रमाण मानल्यामुळे ते कवी शोककाव्य लिहू शकले नाहीत. 'सर्व दुःखमय जगत ।' हा तत्त्वज्ञानाचा सिद्धान्त. पण काव्यात त्याची प्रतीती मुळीच नाही ! डॉ. वाटवे यांनी म्हटल्याप्रमाणे नायक, नायिका, विट, कंचुकी, विदूषक ह्या पात्रांना पुढे संस्कृत साहित्यात ठरीव साच्याचे रूप आले. कारण तोच साचा सर्वांनी गिरवावा असा दण्डक होता. त्यामुळे नवीनपणाला वाव राहिला नाही. साहित्यशास्त्रज्ञानीच हे दण्डक उधळून दिले असते तर लेसिंगप्रमाणे त्यांना साहित्याला नव्या प्रेरणा देता आल्या असत्या. त्या काळात चंद्रगुप्त, समुद्रगुप्त, विक्रमादित्य, पुलकेशी यांसारखे महापराक्रमी सम्राट झाले. सातवाहन, वाकाटक, गुप्त, राष्ट्रकूट, चालुक्य या घराण्यांची साम्राज्ये उदयास येत होती, विलयास जात होती. शक-यवनाची आक्रमणे होती, ती मारून काढली जात होती. शैव, वैष्णव, नाथपंथी, बौद्ध, जैन यांच्या अनेकविध धार्मिक चळवळी चालू होत्या. आणि त्यामुळे समाजजीवन ढवळून निघत होते. पण याचा संस्कृत काव्यांत मागमूसही लागत नाही संस्कृत साहित्यशास्त्रज्ञांनी याचे चिंतन करून मार्गदर्शन केले असते तर कदाचित् कवी इकडे वळले असते आणि मग 'कविः क्रान्तदर्शी' हे वचन खरे ठरून भारताच्या संस्कृतीला जडावस्था प्राप्त झाली नसती. पण टीकाकारांनी हे तर काही केले नाहीच; उलट अत्यंत जाचक असे दण्डक मात्र घालून ठेवले. टीकाशास्त्राचा साहित्यावर कसा प्रभाव असतो त्याचे हे फार भेदक उदाहरण आहे.

 काही मर्यादांत का होईना, पण संस्कृत साहित्यशास्त्राचा उदय आणि विकास तरी झाला. पण मराठी साहित्यशास्त्र निर्माणच झाले नाही. वर सांगितले आहे की, संतांनी आपल्या साहित्याविषयी काही सिद्धान्त मनाशी निश्चित केले होते. पण आपल्या वेदान्ती काव्यात त्यांचा क्वचित् कोठे उल्लेख करण्यापलीकडे त्यांनी त्या विषयात लक्ष घातले नाही. कारण त्यांचा तो प्रांतच नव्हता. पण प्रारंभापासून पाश्चात्त्य विद्या येथे येईपर्यंतच्या काळात, म्हणजे सहा-सातशे वर्षांत मराठीत साहित्याचे शास्त्रीय विवेचन वा समीक्षा आणि रसग्रहण असे झालेच नाही ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. प्रारंभी पाश्चात्त्य लेखक व साहित्यशास्त्रज्ञ यांच्याविषयी जे विवेचन केले आहे त्यावरून हे ध्यानात येईल की साहित्यशास्त्रज्ञ हा समाजजीवनाचा चांगला गाढ अभ्यासक असणे अवश्य आहे. साहित्य हे मानवी जीवनाचे चित्रण असते. तेव्हा त्या जीवनाला वळण लावणान्या, त्यावर वर्चस्व गाजविणाऱ्या धर्म, तत्त्वज्ञान, इतिहास, अर्थव्यवहार, समाजरचना, राज्य शास्त्र इत्यादी शास्त्रांचा, समाजजीवनामागल्या या प्रेरणांचा अभ्यास केल्यावाचून नवसाहित्याला प्रेरणा देण्यास, नवयुग निर्माण करण्यास समर्थ असे शास्त्र साहित्यशास्त्रज्ञाला निर्माण करता येणार नाही. पण मराठीच्या प्रारंभीच्या काळापासून वरील शास्त्रांचा अभ्यास महाराष्ट्रात झालाच नाही. त्याविषयी सर्व समाजनेते उदासीन होते. धर्म व तत्त्वज्ञान यांतील पारंपरिक मते प्रसूत करणारे वाङ्मय येथे निर्माण झाले; पण ती काही शास्त्रचिकित्सा नव्हे. आणि शास्त्रचिकित्सा न झाल्यामुळे मराठीचे साहित्यशास्त्र निर्माणच झाले नाही. डॉ. केतकरांनी म्हटल्याप्रमाणे गुरुपरंपरा, शब्दप्रामाण्य, यामुळे येथल्या लेखकांची परीक्षणशक्ती क्षीण होऊन गेली होती. आधी होऊन गेलेल्या कवींना भक्तिभावाने वंदन करण्यापलिकड काही करण्याचे सामर्थ्यच त्यांच्या बुद्धीला नव्हते.
 आणि नवे साहित्यशास्त्र निर्माण न झाल्यामुळे नवे साहित्यही महाराष्ट्रात निर्माण झाले नाही. कादंबरी, नाटक, लघुकथा, निबंध, विनोद यांपैकी कोणताही वाङ्मयप्रकार येथे अस्तित्वातच आला नाही. इतकेच नव्हे, तर संस्कृतातील तशा श्रेष्ठ काव्याविषयी अत्यंत विपरीत व हीन अभिरुचिदर्शक अशी मते समाजात व पंडितवर्गात रूढ झाली होती. कालिदास, भवभूती, भारवी यांच्यापेक्षा त्या पंडितांना माघ, श्रीहर्ष हे कवी श्रेष्ठ वाटत. शब्दचमत्कृती, शाब्दिक कसरती यांनाच ते काव्य समजत. 'विद्वत्व आणि कवित्व' या आपल्या निबंधात विष्णुशास्त्री म्हणतात,- 'आपल्या लोकांत तर या काव्यशास्त्रविवेचनाचा अलिकडे मुळीच लय झाला आहे असे म्हटल्यास हरकत नाही. आपल्या जुन्या पंडितांस काव्याभिरुची कितपत असते हे त्यांच्या संस्कृत कवितेवरून, त्यांच्या टीकांवरून व संभाषणांवरून अगदी स्पष्ट दिसून येते. युरोपातील सामान्य पंडितास आमचे काव्यग्रंथ जसे समजतात तसे इकडील मोठमोठ्या शास्त्र्यांसही अगदीच समजत नाहीत. व त्यांतील अप्रतिम रसाचा आस्वाद घेण्यास जर हे परस्थ लोक आम्हांस न शिकविते तर तो आम्हास कधीही समजता ना, यातही अगदी संशय नाही.'
 काव्यशास्त्रविवेचन थांबल्यामुळे येथे अनेकविध जिवंत वाङ्मयप्रकार तर निर्माण झाले नाहीतच; पण जुन्या संस्कृत काव्याचे सौंदर्य जाणण्याचे सामर्थ्यही समाजाच्या बुद्धीला राहिले नाही. यासाठीच आपण इंग्रजी टीकाशास्त्र वाचले पाहिजे असे शास्त्रीबुवांनी सांगितले आहे. त्यामुळे काव्याचे मर्म जाणण्याची उत्कृष्ट शक्ती आपल्याला प्राप्त होईल व आनंदाचे एक अक्षय साधन लाभेल असे ते म्हणतात. अर्थात शास्त्रीबुवांच्या आधीच्या पिढीपासूनच पाश्चात्त्य टीकाशास्त्राचा व साहित्याचा अभ्यास येथे सुरू झाला होता शास्त्रीबुवांनी त्याला विशेष चालना दिली इतकेच. या अभ्यासामुळे आणि इतर पाश्चात्त्य विद्यांच्या प्रसारामुळेच महाराष्ट्र समाजाची अभिरुची सर्वथा पालटून गेली. साहित्याविषयी एक नवा दृष्टिकोन त्याला प्राप्त झाला व त्यामुळेच हरिभाऊ, केशवसुत, देवल, खाडिलकर, कोल्हटकर ही साहित्यलेखकांची नवी परंपरा येथे निर्माण झाली.

 साहित्यशास्त्र व साहित्य यांचा परस्पसंबंध काय ते वरील विवेचनावरून ध्यानात येईल. साहित्यक्षेत्रातील एखादी व्यक्ती किंवा एखादी ललितकृती एवढ्यापुरताच विचार केला, तर साहित्यशास्त्राचा साहित्यनिर्मितीशी प्रत्यक्ष असा फारसा संबंध नाही असे फार तर म्हणता येईल. तेथेही त्या साहित्यिकाच्या मनात, अबोधपूर्व का होईना, पण त्याचे स्वतःचे साहित्यशास्त्र निश्चित झालेले असले पाहिजे हे वर सांगितलेच आहे. पण हा साहित्यशास्त्राचा फार संकुचित अर्थ झाला. ज्या वेळी सर्व समाजाच्या साहित्याचा, त्यातील भिन्न युगांचा, तत्कालीन परिस्थितीचा, मानवी संस्कृतीचा आपण विचार करतो आणि भिन्न देशांतील साहित्यांच्या उत्कर्षापकर्षाची काही मीमांसा करतो तेव्हा साहित्यशास्त्राचा फार व्यापक अर्थ घ्यावा लागतो. त्या दृष्टीने पाहता साहित्याचा व साहित्यशास्त्राचा मग घनिष्ठ संबंध आहे हे आपल्या ध्यानात येईल. आधी साहित्यशास्त्र व मग साहित्य हा सिद्धान्त अगदी एकांतिक म्हणून सोडून दिला (तसा जन्य-जनक संबंधही काही ठिकाणी असलेला दिसतो) तरी साहित्याच्या विकासाला वैयक्तिक व सामाजिक अशा दोन्ही दृष्टींनी साहित्यशास्त्र हे अत्यंत अवश्य आहे हे आपणास मान्य करावे लागेल. प्रतिभा आणि समीक्षा या शक्ती परस्परविघातक तर नाहीतच, पण परस्परांना अत्यंत पोषक आहेत हेही आपल्या ध्यानात येईल. आणि मग टीकाकार व साहित्यिक यांचे संबंध अहीनकुलवत् आहेत, साहित्यात अपयशी ठरलेला मनुष्य टीकाकार होतो, टीकाकार म्हणजे मालक गेल्यावर घरात येणाऱ्या विश्वस्थासारखा आहे, इत्यादी भ्रान्त कल्पनांना आपल्या मनात थारा मिळणार नाही.