सौंदर्यरस/हरिभाऊंचा ध्येयदर्शी वास्तववाद


हरिभाऊंचा ध्येयदर्शी
वास्तववाद



 पौराणिक कालापासून हरिभाऊंच्या काळापर्यंतचे वाङ्मय आपण पाहिले, त्या वाङ्मयाचे विषय काय होते याचा विचार केला, त्या कथांत कोणाच्या जीवनाचे वर्णन केले आहे हे तपासले तर हरिभाऊंनी साहित्यात कोणती क्रांती घडवून आणली ते आपल्या सहज ध्यानात येईल. आणि मग वास्तववाद म्हणजे काय हेही कळून येईल.

 पुराणकालात सर्व कथा देवदेवतांच्या किंवा फार तर तत्सम राजांच्या किंवा वीर पुरुषांच्या असत. श्रीकृष्ण, विष्णू, रामचंद्र, शंकर, गणपती, या देवतांच्या व हरिचंद्र, ध्रुव, ऋकमांगद, नल, यांसारख्या राजांच्या कथांनीच सर्व पुराणे भरलेली आहेत. त्यांतही आणखी गोष्ट अशी की या कथांत प्राधान्याने या पुरुषांच्या जीवनातील अद्भुत चमत्कार वर्णिलेले असतात. मागल्या काळातच चंद्रगुप्त, अशोक, समुद्रगुप्त, कुमारगुप्त, हर्ष असे अनेक पराक्रमी राजे होऊन गेले, पण त्यांच्या चरित्रात अद्भुत चमत्कार नसल्यामुळे त्यांच्या कथा कोणी लिहिल्याच नाहीत. देवदेवता व पुण्यश्लोक राजे याशिवाय साधुसंतांच्या कथा मागल्या काळात लिहिल्या गेल्या. पण त्याही प्राधान्याने चमत्कार कथाच आहेत. महीपतीने भक्तविजय, संतविजय इत्यादी ग्रंथ लिहून अनेक संतांची चरित्रे सांगितली. पण ज्यात चमत्कार नाही अशी एकही कथा त्याने सांगितलेली नाही. जुन्या मराठी वाङ्मयात स्वतंत्रपणे रचलेल्या कथा नाहीतच. जी आख्यानकाव्ये आहेत त्यांत रामायण महाभारत, भागवत व इतर पुराणे यांतल्याच कथा वर्णिलेल्या आहेत. आणि त्यात मूळचे अद्भुत प्रसंग वर्णून शिवाय मराठी कवींनी स्वतःच्या कल्पनेने आणखी तसल्या प्रसंगांची भरही घातलेली आहे. अव्वल इंग्रजी काळात मराठीत काही स्वतंत्र रचना झाली. पण तिचा थाटही पुराणासारखाच आहे. मंजुघोषा, मुक्तामाला, मित्रचंद्र, विश्वासराव इत्यादी कादंबऱ्या या बहुधा राजेरजवाडे यांच्याच कथा आहेत. त्याच्या जोडीला श्रीमंत धनिक सावकार, जहागिरदार किंवा सत्यनारायण कथेतल्यासारखे वणिक्पुत्र हे फार तर येतात. आणि त्यांच्या जीवनातल्या चमत्कृती व अद्भुत घटना याच सर्वत्र वर्ण्यविषय झालेल्या आहेत.

 याचा अर्थ असा की, त्या काळात जनतेला चमत्कृतीची, अद्भुताचीच प्रामुख्याने आवड होती. सामान्य लोकांच्या सामान्य जीवनात वर्णन करून सांगण्याजोगे ते काय असणार, त्यात वाचणाराला, ऐकणाराला गोडी कशी वाटणार, काव्याचा आत्मा जो रस त्याची निष्पत्ती सामान्य प्रसंगांतून करणे कसे शक्य आहे, असेच बहुधा सर्व लोकांना व लेखकांचा त्या काळी वाटत असे. सावकार, जहागिरदार, राजे यांचे जीवन आणि तेही राजकन्येला पळविणे, विष घालणे, नायकाचा खून करणे, त्याला नाहीसा करणे, गुप्त कारस्थाने करून राजाला पदच्युत करणे व शेवटी देवांच्या साधूंच्या प्रसादाने पुन्हा सर्वाला गोड कलाटणी देणे अशा घटनांनी भरलेले हेच लोकांना प्रिय होते. आणि त्यामुळे तशाच प्रकारचे साहित्य हरिभाऊंच्या आधी बव्हंशी निर्माण होत होते.

 हरिभाऊंचे मुख्य कार्य हे की, सामान्य जनांच्या सामान्य जीवनात, त्यांच्या नित्याच्या जीवन रहाटीतही श्रवणीय असे पुष्कळ आहे; त्यांच्या जीवनातल्या नित्याच्या, चमत्कृतिहीन, वास्तव प्रसंगांतूनही उत्तम रसनिष्पत्ती होऊ शकते. त्यांच्या कथाही देवदेवता, राजेमहाराजे, सावकार, जहागिरदार यांच्या कथांइतक्याच आकर्षक होऊ शकतात, त्यांच्या जीवनातल्या घटनांतही ठकसेन राजपुत्रांच्या कथांइतकेच वाचकांना गुंग करून टाकण्याचे सामर्थ्य आहे, हे त्यांनी दाखवून दिले. एका सामान्य कारकुनाची मुलगी यमुना, दळणकांडण करून पोट भरणाऱ्या बाईचा मुलगा यशवंता नवऱ्याने टाकून दिलेल्या बाईचा मुलगा भाऊ, त्याचीच बहीण ताई, शिवरामपंतासारखे शिक्षक, श्रीधरपंतासारखे लेखक, बळवंतरावांच्या सारखे सुधारक यांच्या नित्याच्या जीवनातले हर्षामर्षाचे प्रसंग वाचण्याची गोडी हरिभाऊंनी समाजाला लावली यांत त्यांच्या प्रतिभेचे असामान्यत्व आहे. आपल्यासारख्या जनांच्या सुखदुःखाची वर्णने ऐकावी, वाचावी त्यात मन रमून जावे ही जी अभिरुची हरिभाऊंनी समाजात निर्माण केली तीच वास्तवाची अभिरुची होय. या जीवनात मेलेली माणसे जिवंत होत नाहीत, कोरडी तळी अचानकपणे पाण्याने भरून येत नाहीत, नद्या दुभंगत नाहीत, मांसाची फुले होत नाहीत, देवळांची तोंडे फिरत नाहीत, एका लहानशा तपेलीतला भात हजार माणसांना पुरत नाही, आंधळ्याला दृष्टी येत नाही, गुरुकृपेने रोग बरे होत नाहीत. असले काहीही घडत नाही. हे नित्याचे मागल्या लोकांना रूक्ष वाटणारे, रसशून्य वास्तव जीवन आहे. येथे पैशाची चिंता आहे, रोगराई आहे, सामान्य रूपाच्या स्त्रिया आहेत, अपयशी नायक आहेत, असे हे वास्तवजीवन आहे. पण यातही शृंगार, वीर, करुण, हास्य इत्यादी जे नवरस त्यांची मंदाकिनी पुराणकथा इतक्याच रम्य रूपात वाहत असते हे दाखवून देऊन तिच्यामध्ये अवगाहन करण्यातही तसाच अनिर्वचनीय आनंद असतो हे महाराष्ट्राला हरिभाऊंनी शिकविले. त्यांचा वास्तववाद तो हाच होय.

 नाना प्रकारच्या विचित्र, असंभाव्य, अद्भुत घटना व प्रसंग निर्मून रोमांचकारी कथानके रचण्यामध्ये वाचकांची करमणूक करणे, हा एक मोठा हेतू असतो. मुक्तामाला, मंजुघोषा या कादंबऱ्यांचे लेखक अरबी कथा, ठकसेन कथा, चांदोबातील कथा यांचे लेखक याच हेतूने लिहीत असतात. पण केवळ मनोरंजन हा हेतू नसूनही श्रेष्ठ दर्जाचे लेखक, कवी, ग्रंथकारही अद्भुताचा आश्रय करतात तेव्हा त्यांचा हेतू निराळा असतो. त्यांना समाजाला नीतिपाठ शिकवावयाचे असतात. सत्य, अहिंसा, परोपकार, गुरुभक्ती, श्रद्धा, सदाचरण यांचे धडे द्यावयाचे असतात. आणि त्यांची समजूत अशी असते की सदाचरणाला अंती उत्तम फळ मिळते, परमेश्वर सज्जनांना न्याय देतो. दुर्जनांना शासन करतो, पापाचे परिणाम वाईट होतात, पापी लोक नरकाला जातात, पुण्याचरणी लोक स्वर्गाला जातात असे दाखविल्याखेरीज सदाचरणाकडे, नीतिमत्तेकडे, पुण्याकडे लोकांची प्रवृत्ती होणार नाही. म्हणून हे लेखक, आपल्या सत्प्रवृत्त नायक-नायिकांवर प्रारंभी अनंत संकटे कोसळली, त्यांना नाना यातना भोगाव्या लागल्या, असह्य दुःखे सोसावी लागली तरी त्यांना त्यांच्या नीतिनिष्ठेमुळे अंती सुखाचे दिवस आले, शेवट गोड झाला, असेच दाखवितात. नाही तर लोकांना सत्य, नीती, न्याय, पुण्य, याविषयी उत्साह वाटणार नाही, असे या लेखकांना, वाटते. पुराणातील सर्व कथा, गुरुचरित्र, शिवलीलामृत यांतील कथा त्या त्या लेखकांनी या हेतूनेच लिहिलेल्या आहेत.

 पण काही विचारवंतांना हा दृष्टिकोन मान्य नाही. जगाचे सत्य-स्वरूप आहे तसेच, कोणत्याही इतर गोष्टींचा विचार न करता, चित्रिले पाहिजे असे त्याचे मत आहे. सत्य हे अनेक वेळा रूढ धर्म, नीती, पावित्र्य यांच्याविषयीच्या कल्पनांना मारक असते. ईश्वरावरील श्रद्धेला ते हादरून टाकते. पातिव्रत्य विवाहसंस्था, राजसंस्था, चातुर्वर्ण्यासारख्या समाजसंस्था, यांच्या प्रतिष्ठेला ते विघातक असते. पण असे असले तरी सत्याचा अपलाप करू नये, भावनावश होऊन मूळ वस्तूला अद्भुत कळा चढवू नये, कशाची भीड पूर्ववत धरू नये आणि जगाचे यथार्थ दर्शन घडविण्यास कचरू नये, असे त्यांचे मत आहे. व्यास, वाल्मीकी, हे महाकवी या मताचे आहेत हे सर्वमान्य आहे. या महापुरुषांना धर्म-नीती यांची पर्वा नाही, असे नाही. पण सत्यदर्शनानेच त्यांची खरी प्रतिष्ठा राहील, या कसोटीला टिकतील तीच खरी धर्मतत्त्वे, असे त्यांना वाटते. वास्तववाद यालाच म्हणतात. बनार्ड शॉ याने म्हटले आहे की, मनुष्य आपल्या प्रगतीसाठी धर्म, विवाह, कुटुंब, इत्यादी संस्था निर्माण करतो. कालांतराने त्या परमेश्वरकृत आहेत असा भ्रम निर्माण होतो. असल्या संस्थांची चिकित्सा करून त्यांचे सत्य स्वरूप जगाला दाखविणारा, त्या दैवकृत नाहीत, नैसर्गिक नाहीत, त्यांची उपयुक्तता संपली की त्या नष्ट केल्या पाहिजेत असे भावनावश न होता सांगणारा तो खरा वास्तववादी होय. हरिभाऊंचा वास्तववाद काहीसा या स्वरूपाचा आहे.

 प्रारंभी त्यांनी 'मधली स्थिती' ही कादंबरी लिहिली त्या वेळी त्यांचे मन काहीसे अपक्व होते. त्यांची कलाही परिणत झाली नव्हती. त्यामुळे ती कादंबरी काहीशी पुराणरूपाची झाली आहे. तीत सज्जनांना अंती सुख लाभते व दुर्जनांना शिक्षा होते असे दाखविण्याचेच धोरण आहे. विनायकराव हा गोविंदराव वकिलांच्या नादाने व्यसनी होतो, पैशाची वाटेल तशी उधळपट्टी करतो, आईला दुरुत्तरे करतो, व पत्नीचा- सरस्वतीचा अनन्वित छळ करतो पण शेवटी त्याचे डोळे उघडतात, तो निवळतो व आई व पत्नी यांच्या पाया पडून त्यांची क्षमा मागून सर्वस्वी त्यांच्या आज्ञेत वागू लागतो, अशी ही कथा आहे. शिवराम व दुर्गी यांच्या संसाराचें रूपही असेच वर्णिले आहे. गोविंदराव व इतर दुष्ट स्त्री-पुरुष हे शेवटी आपल्या पापकर्मामुळे तुरुंगात जातात. धर्मामुळे सुख मिळते व अधर्मामुळे नाश होतो, असे चित्रण करण्याचा कादंबरीकाराचा हेतू या कादंबरीत स्पष्ट दिसून येतो. तिमाजी नाईक यांनी अनीतीने अमाप पैसा मिळविला होता. त्यांचे चिरंजीव विनायकराव यांच्या हाती तो येताच त्यांनी कमालीची उधळपट्टी करण्यास प्रारंभ केला. हे सांगून हरिभाऊ म्हणतात, 'अन्यायाने मिळालेल्या पैशाचे हेच होणार.' अशी सिद्धान्तवचने, या कादंबरीत ठायी ठायी सापडतात. विष्णू आणि गणू या अभ्यासू व उनाड अशा दोन मुलांची चित्रे काढून हरिभाऊ म्हणतात, 'वाचकहो, तुमच्यापुढे या दोन तसबिरी ठेविल्या आहेत. त्यातील तुम्हाला कोणती आवडते ? विष्णूचीच ना ? मग घ्या तर ती विष्णूची तसबीर' हा वास्तववादही नाही आणि ही कलाही नाही. या कादंबरीचा हरिभाऊंच्या 'विदग्धवाङ्मया'त कधीच समावेश होणार नाही. कारण त्या वाङ्मयाची रचना कलापूर्ण असली पाहिजे व त्यातील बोध अवगुंठित असला पाहिजे असे हरिभाऊंनीच सांगितले आहे.
 'पण लक्षात कोण घेतो', 'मी', 'यशवंतराव खरे' या कादंबऱ्यांत हरिभाऊंच्या वास्तववादाचे खरे वैभव दृष्टीस पडते. यमुना, दुर्गी, भाऊ, ताई, यशवंत यांच्यावर अनेक आपत्ती आल्या. त्या आपत्तीत त्यांनी आपले सत्त्व कधी सोडले नाही. पण त्या पुण्यामुळे त्यांना अंती सुख मिळाले असे दाखविण्याचा मोह हरिभाऊंना कधीच झाला नाही. सुख पाहता जवापाडे, दुःख पर्वताएवढे, हे जे संसाराचे खरे स्वरूप तेच हरिभाऊंनी दाखविले आहे. यमुनेचा सासरी अंति छळ झाला. तिची आई गेल्यावर माहेरचे सुखही संपले. पतीबरोबर ती मुंबईस राहिली तेवढेच काय ते सुखाचे दिवस. पण पुढील भयानक दुःखाची तीव्रता शतपटीने वाढविण्यासाठीच जणू काय ते सुख तिला मिळाले असे दिसते. दोन-तीन वर्षांतच रघुनाथरावांना मृत्यू आला आणि यमुना दुःखाच्या गर्तेत फेकली गेली ती कायमचीच. जबरीने तिचे केशवपन करण्यात आले व सर्व दृष्टींनी तो पराधीन झाल्यामुळे जिवंत नरकवास तिच्या कपाळी आला. तिचा भाऊ गणपती हा मोठा सालस व सुविचारी होता. पण त्यालाही बिचाऱ्याला पैशाचे, बायकोच्या सहकार्याचे वा इतर कसलेच सुख मिळाले नाही. जी जी म्हणून सालस, सद्गुणी, सदाचारी व्यक्ती या कादंबरीत आहे ती संपूर्ण अपयशी झालेली आहे, तिचा सर्वस्वी निःपात झाला आहे. असेच दृश्य या कादंबरीत दिसते. आणि यशस्वी व सुखी कोण झाले ? तर शंकरमामंजीसारखे नरकासुर ! इतका नीच, अधम, आसुरी वृत्तीचा माणूस. पण त्याच्या वाट्याला दुःख असे फारसे आलेच नाही !

 हरिभाऊ हे सुधारक होते. स्त्रीशिक्षण, प्रौढविवाह, स्त्रीपुरुष समता, विधवाविवाह, रूढिभंजन यांचे ते कट्टे पुरस्कर्ते होते तेव्हा या पक्षाच्या लोकांचा जय होतो, या सुधारणांनी त्यांना सुख मिळते, चांगल्या नोकऱ्या मिळतात, समृद्धी लाभते असे दाखविण्याचा मोह, ते अपक्व, अप्रौढ असते, तर त्यांना निश्चित झाला असता. पण महाराष्ट्राच्या सुदैवाने तसे ते नव्हते. ते खरे वास्तववादी होते. जग त्यांनी खरे जाणले होते. आणि सुधारणावादी लोकांच्या जीवनाचा कादंबरीत गोड शेवट केला म्हणजे त्यामुळे सुधारणावादाची प्रगती होईल, असे त्यांना मुळीच वाटत नव्हते. लोकशिक्षण हाच त्यांच्या लेखनाचा निश्चित हेतू होता. पण भ्रामक संसारचित्रे निर्माण करून, सत्यापलाप करून लोकांना आगरकरपंथाकडे वळवावे हे त्यांना मुळीच मान्य नव्हते. उलट लोकांना सुधारणेच्या मार्गातील भयंकर आपत्ती दाखवाव्या, सुधारकाला कोणत्या अग्निदिव्यातून जावे लागते हे त्यांच्या ध्यानात आणून द्यावे, या मार्गाने गेलात तर अपयशाखेरीज, लोकनिंदेखेरीज दुसरे काही वाट्याला येणार नाही, हे त्यांना बजवावे हाच हेतू होता आणि सुधारकाच्या जीवनाचे असे सत्यदर्शन घडूनही तरुणांनी त्या मार्गाला जावे असा त्यांचा उपदेश होता. भावी सुखाच्या रम्य कल्पना करून, स्वप्नसृष्टीत दंग होऊन तरुणांनी या मार्गात पाऊल टाकावे असे त्यांना मुळीच वाटत नव्हते. महाकवी वाल्मीकींचा आदर्श त्यांनी डोळ्यासमोर ठेवला असावा असे वाटते. सीता ही त्रैलोक्यपावनी होती. रामचंद्राचे सर्व आयुष्य पितृभक्ती, प्रजानुरंजन यांत गेले. पण त्यांना लौकिक अर्थाने लवमात्र सुख मिळाले नाही. वनवास, वियोग, दुःख, लोकापवाद हेच त्यांच्या नशिबाला आले. त्यांचा संसार असा दुःखमय झाला असे चित्रण करण्यास महाकवी मुळीच कचरले नाहीत. ध्येयवादाच्या उपदेशाला स्वप्नभूमीतले जीवनदर्शन अवश्य आहे असे त्यांना कधीच वाटले नाही. उलट त्यासाठी कठोर वास्तवाचाच पाया अवश्य आहे असे त्यांचे मत होते. यमुना- रघुनाथांच्या जीवनाचे हरिभाऊंनी ह्याच धोरणाने चित्रण केले आहे.

 वास्तववाद ज्यांना पेलत नाही, ज्यांना त्याचे चित्रण करता येत नाही, अशा लेखकांच्या कादंबऱ्यांशी हरिभाऊंच्या कादंबऱ्यांची तुलना केली तर वास्तववादाचा खरा अर्थ सहज घ्यानात येईल. मराठीतील हरिभाऊंखेरीज बहुतेक सर्व लेखक असेच आहेत. वास्तववाद पेलण्याचे सामर्थ्य बहुतेकांना नाही. डॉ. केतकरांच्या कादंबऱ्या पाहा. 'गोंडवनातील प्रियंवदा' या कादंबरीतील घटना १८९६ च्या सुमाराच्या आहेत. त्या काळी प्रियंवदा लग्नापूर्वीच प्रौढ झाली होती. १७/१८ व्या वर्षी तिचे लग्न झाले. पण मुलगी इतकी मोठी वाढविली म्हणून तिच्या आईबापांना काही त्रास झाला असेल, सामाजिक बहिष्काराची भीती निर्माण झाली असेल, अत्यंत कटू, गलिच्छ निंदा सहन करावी लागली असेल, हे केतकरांच्या गावीही नाही. 'मी' मधील सुंदरीला तिच्या वडिलांनी अशीच वाढविली होती. त्यामुळे आपल्या घरातसुद्धा तिला येऊ देण्यास अनेक बायकांना भीती वाटत असे. पण केतकरांच्या कृपेने प्रियंवदेला किंवा तिच्या आईबापांना तसला काहीच त्रास झाला नाही. त्या काळात ही मुलगी सासरी नवऱ्याशी इतक्या धिटाईनं वागते, इतक्या उघडपणे प्रणयचेष्टा करते की कित्येक घरांत आजही ते खपणार नाही. बिंबाच्या पुनर्विवाहाची कथा अशीच वास्तवापासून दूर आहे. एका मालगुजार घराण्यातील ही स्त्री, एक मुलगा झाल्यावर तिला वैधव्य आले. मग तिने हरिभय्या मोघे यांच्याशी पुनर्विवाह केला. पण त्या विवाहाला विरोध, त्यांची निंदा, वर्तमानपत्रांत त्यांच्यावर अत्यंत गलिच्छ आरोप, तो घडेल न घडेल याची चिंता, यांचे नाव नाही. डॉ. केतकरांना समाजपरिस्थितीची इतकी शून्य कल्पना असेल हे कोणाला खरे तरी वाटेल काय ? पण त्यांच्या सर्व कादंबऱ्या अगदी गंधर्वनगरीतल्या आहेत. 'ब्राह्मणकन्या' या कादंबरीत तर कल्पनारम्यतेची केतकरांनी कमाल केली आहे. कालिंदीही वेश्याकन्या होती. यामुळे आपल्याला कुलीन घराण्यात स्थळ मिळेल हे तिला शक्य वाटेना. म्हणून तिने केले काय ? तर बी. ए. च्या वर्गातली ही मुलगी एका वाण्याच्या घरी रखेली म्हणून राहिली ! पुढे त्याने तिला टाकली. तेव्हा तिला एक मूलही झाले होते. पण अशा स्थितीत पुढे लोकांकडून तिला कसलाही त्रास झाला नाही. तिला उत्तम नोकरी मिळाली. रामरावासारखा कुलीन घराण्यातला नवरा मिळाला, आणि पहिल्या मुलाला संभाळण्यासही तो तयार झाला. जुन्या काळात शंकर-पार्वती प्रसन्न होऊन आणखी काय देत होते ? अकुलीन संततीचा प्रश्न बिकट आहे असा या कादंबरीचा विषय. पण कालिंदीच्या कथेवरून तसा तो मुळीच नाही असे सिद्ध होते. डॉ. केतरांच्या कादंबऱ्यांत प्रौढविवाह, विधवाविवाह, अकुलीन संततीचा विवाह या समस्या म्हणजे समस्या नाहीतच. चंदनाचे सडे घालून, पारिजातकाची वृष्टी करून केतकरांनी सर्वांचे मार्ग सुखद करून टाकले आहेत. विनायकाची मूर्ती करण्याचा मानस असताना वानर रचल्याचे हे उत्तम उदाहरण आहे. राजकीय सुधारणेपेक्षा धार्मिक व सामाजिक सुधारणा- दसपटीने, शतपटीने कठीण असते, कारण स्वसमाजाचाच त्यांना विरोध असतो, हे प्रत्येक समाजाच्या इतिहासात पानोपानी, पावलोपावली, दिसतं असते. पण ज्ञानकोशकारांनी ज्ञान आणि साहित्य यांचे दोन निराळे कप्पेच आपल्या मनात करून टाकले असावे, असे दिसते. साहित्याशी समाजाच्या ज्ञानाचा त्यांनी संबंधच येऊ दिला नाही. असा संबंध आणून साहित्य लिहिणे याचेच नाव वास्तवाद ! हरिभाऊंनी ते केल्यामुळे धार्मिक व सामाजिक सुधारणा करू इच्छिणाऱ्या तरुण स्त्रीपुरुषांना कोणत्या यमयातना भोगाव्या लागतात त्याचे त्यांनी यथार्थ वर्णन केले आहे.
 पण वास्तव म्हणजे केवळ दुःख, केवळ यातना, केवळ अपयश हेही खरे नाही. जगात दु:ख जास्त, सुख कमी खरे. हे अपयश फार वेळा, यश दुर्मिळ हेही खरे. पण एकजात अथपासून इतिपर्यंत हा संसार दुःखमय आहे, यश कोणाच्या वाट्याला येतच नाही, हे खरे नाही. तसे वर्णन हा वास्तवाद कधीच होणार नाही. तसे जीवन वर्णन करावे ही सध्याच्या काळात फार प्रवृत्ती आहे. जगात कोणी यशस्वी होतो, कोणाचा ध्येयवाद सिद्धीस जातो, कोणी अखेरपर्यंत पवित्र राहतो, निष्कलंक राहतो, हे सध्याच्या लेखकांना मान्यच नसावे असे दिसते. पण हाही वास्तववाद नाही. मागल्या भोळ्या लोकांनी स्वर्गाची चित्रे काढली तर हे नवे लोक एकजात नरकाची चित्रे काढीत आहेत. त्यामुळे तेही वास्तवापासून दूरच आहेत. पृथ्वीची चित्रे काढणे याचे नाव वास्तववाद होय. आणि हरिभाऊंना याची पूर्ण जाणीव असल्यामुळे त्यांनी पृथ्वीवरील जीवन हेच आपले लक्ष्य ठेविलेले आहे.
 'पण लक्षात कोण घेतो' यातील जीवन म्हणजे, काही अपवादात्मक हिरवळ सोडली तर, बहुतेक सहारा वाळवंटच आहे. पण 'मी' हे तितके नाही. तेथे थोडी हिरवळ जास्त दिसू लागते. भाऊ बी. ए. झाला. एल्एल्.बी. झाला. आाणि वकिलीत पोटापुरते मिळवून राहिल्या वेळात समाजसेवेचे काम करावे, ते करणे शक्य व्हावे, अशी बरी स्थिती त्याला प्राप्त झाली. त्याची बहीण ताई हिला दारुण यातना सोसाव्या लागल्या, पण वैधव्य आल्यावर तिची स्थिती अगदी यमुनेसारखी झाली नाही. घर तिच्या नावेच राहिले. थोडे पोटापुरतेही राहिले. शिवरामपंतांसारख्यांच्या आधाराने तिच्या शिक्षणाची सोय झाली. आणि विशेष म्हणजे या समाजात विधवेच्या मनोविकासाला अवसर मिळाला, स्त्रीच्या कर्तृत्वाला थोडा वाव मिळाला. जीवनात थोडी आशा आहे, केव्हा केव्हा यश मिळू शकते, केव्हा केव्हा यश आणि सुख दोन्ही मिळू शकतात, असा थोडासा भास 'मी' या कादंबरीवरून होतो.
 हा सुधारणेचा झगडा आहे. रणसंग्राम आहे. यात सनातन समाजाच्या विरुद्ध बंड करण्यास ठाकलेल्या तरुण स्त्री-पुरुषांच्या संसाराचा आरंभी जरी अगदी उन्हाळा झाला तरी त्यांच्याच वीरवृत्तीमुळे, त्यांनी चालविलेल्या अखंड यज्ञामुळे, समाजमतात परिवर्तन होणे अपरिहार्य होते. आणि तसे झाल्यावर सुधारकांचे संसार अगदी पहिल्याइतके अपयशी व दुःखमय राहिले नाहीत हेच वास्तवाला धरून आहे. 'भयंकर दिव्य', 'कर्मयोग' या कादंबऱ्यांतून या परिवर्तनाची चित्रे आपल्याला दिसतात. बळवंतराव आणि द्वारकाबाई यांचा संसार, त्यांनी पुनर्विवाह केला असूनही पुष्कळच सुखाचा झाला. त्यांच्या मुलीच्या- कमलेच्या लग्नाचा प्रश्न बिकट खरा. पण पद्माकरासारखा, थोर सनातन घराण्यातला तरुण आपणहून तिला मागणी घालतो आणि वडिलांच्या तीव्र विरोधाला न जुमानता तिच्याशी लग्न करतो ही प्रगती थोडी नाही. पुढे त्यांचा संसार दुःखाचा झाला हे अगदी निराळे. कारण त्या दुःखाशी त्यांनी केलेल्या पुनर्विवाहाचा, रूढीभंगाचा काही संबंध नाही. पद्माकराचे मन कमलेबद्दल निराळ्याच कारणांनी कलुषित झाले व त्यामुळे त्या दोघांवर अनेक आपत्ती कोसळल्या. पण त्याही शेवटी जाऊन कट्टर, आग्रही, सनातन वृत्तीचे अंध उपासक असे जे पद्माकराचे वडील दादासाहेब यांचेही मतपरिवर्तन होऊन त्यांनी मुलाला व सुनेला आशीर्वाद दिला आणि मग ती दोघे अतिशय सुखी झाली. अशा तऱ्हेने सुख मिळणे ही काही अवास्तव गोष्ट नाही. [या कादंबरीला 'पण लक्षात कोण घेतो' किंवा 'मी' यांच्या इतकी प्रतिष्ठा प्राप्त झाली नाही याचे कारण असे आहे की, विषयाचा एकजिनसीपणा ठेवण्यात हरिभाऊंना या वेळी इतके यश आले नाही. 'विधवा-पुनर्विवाह' ही समस्या त्यांनी घेतली होती. पण पद्माकर व कमला यांच्यात दुरावा निर्माण झाला त्याची कारणे अगदी निराळी आहेत. राजाराम या कारस्थानी गृहस्थाच्या जाळ्यात सापडून पद्माकर देशोधडीला लागतो, वाहावत जातो, भलत्याच आपत्तीत सापडतो, अशी कथेला कलाटणी मिळालेली आहे. त्यामुळे कादंबरीच्या एकरसतेचा भंग होऊन तिला थोडे घटनाप्रधान रूप येऊ लागते. पण आपला प्रस्तुत विषय तो नसल्यामुळे त्याचा प्रपंच येथे करीत नाही.] 'कर्मयोग' कादंबरीत गणपतराव व नानासाहेब या सुधारकांची कुटुंबे अगदी सुखात असल्यासारखी दिसतात. कारण आता काळ पुष्कळच पालटलेला आहे. पण सुधारणेचा झगडा हे संसार दुःखमय होण्याचे एक कारण होय. ते नष्ट झाल्यामुळे दुःख नष्ट झाले असे होत नाही. नव्या पिढीला नव्या विवंचना असतातच. गणपतरावांचा मुलगा चंद्रशेखर एम्. ए. झाला. पण आपण पुढच्या आयुष्यात काय करावे हे त्याला निश्चित करता येत नाही. तशात नास्तिक व जडवादी असूनही अखंडानंद या स्वामींच्या तो नादी लागला. त्यांचे त्यांच्या मनावर जबर वर्चस्व पडले. त्यामुळे आपला मुलगा संन्यासी होऊन घरातून जातो की काय ही एक नवीनच विवंचना त्याच्या आई- बापांना लागली. नानासाहेबांची मुलगी लीलावती हिच्या दुःखाचे असेच काही कारण आहे. आईवडील सुधारक, ती शिकलेली या कारणामुळे तिला आता कसलाही त्रास नाही. पण याहून निराळी अशी तिच्या दुःखाची कारणे आहेत. ती काय ते कादंबरी अपूर्ण राहिल्यामुळे आपल्याला समजत नाहीत. पण कोठल्याही अवस्थेत मनुष्य गेला तरी संसार सर्वस्वी सुखी किंवा दुःखी असा नसतो हे जे सत्य तेच येथे प्रतीत होत आहे असे म्हणण्याइतके या कादंबरीतले जीवनदर्शन वास्तव आहे यात शंकाच नाही.

 लेखकाने स्वपक्ष व विपक्ष यांचे यशापयश व सुखदुःख कसे रंगविले आहे यावरून त्यांच्या वास्तववादाची जशी परीक्षा होते तशीच त्याच्या स्वपक्षविपक्षीयांच्या स्वभावलेखनावरूनही होते. हरिभाऊ हे मराठीतले पहिले वास्तववादी लेखक. त्यामुळे त्यांना सर्वच कादंबरी तंत्राप्रमाणे याही बाबतीत नवी परंपरा निर्मावयाची होती. ती त्यांनी फार उत्तम रीतीने निर्माण केली आहे असे आपल्याला दिसून येईल. जुन्या काळच्या लेखनात स्वपक्षातले सर्व लोक सज्जन, सालस, सदाचरणी, कष्टाळू, हरिभक्त व पुण्यशील आणि विपक्षातील सर्व लोक दुष्ट, नीच, स्वार्थी, देवद्वेषी, पापी व घातक असे असत. महीपतीची संतचरित्रे, श्रीधराचे शिवलीलामृत, सरस्वती गंगाधराचे गुरुचरित्र इत्यादी ग्रंथांत सर्वत्र हेच दिसून येईल. यांच्यातील संघर्षाचा अंती निकाल कसा व्हावयाचा हेही ठरलेलेच असावयाचे. दुष्ट लोकांना परमेश्वराच्या व श्रीगुरूच्या कोपामुळे काही तरी कडक शिक्षा व्हावयाची आणि त्यामुळे पश्चात्तापदग्ध होऊन ते गुरूच्या चरणी लागावयाचे व मग त्यांचाही सज्जनांबरोबर उद्धार व्हावयाचा! खरोखर याइतके असत्य असे जगात काही नाही. सध्याच्या काळात तर असे घडत नाहीच. पण मागल्या काळातही असे घडत नसे. रामायण-महाभारतातील रावण, इंद्रजित, दुर्योधन, दुःशासन, कर्ण हे दुर्जन शिक्षेला भिऊन देवाच्या किंवा गुरूंच्या चरणी कधीच लागले नाहीत. शेवटपर्यंत त्यांनी आपला स्वाभिमान, आपली अहंता, आपला ताठरपणा कधी सोडला नाही. मरणाला ते भ्याले नाहीत. मृत्युसमयीसुद्धा दुर्योधन, दुःशासन यांनी श्रीकृष्ण व पांडव यांच्यावर शिव्याशापांचा भडिमारच केला. आणि आम्हीच खरे यशस्वी, आम्हीच खरे क्षात्रधर्मी असा अहंकार, मृत्यू समोर उभा असताही मिरविला. पण गुरू व देव यांना विरोधी असलेल्या पक्षात असे तेज दर्शविणे पुढल्या काळात लेखकांनी निषिद्ध मानले व अवास्तव चित्रे रंगविली.

 हरिभाऊंनी, मागे एके ठिकाणी सांगितल्याप्रमाणे, रामायण- महाभारताचा आणि इंग्रजी महाकवींचा आदर्श समोर ठेविला होता. त्यामुळेच त्यांच्या व्यक्तिरेखा जिवंत झाल्या आहेत. ती स्वर्ग-नरकातील चित्रे न होता इहलोकीची चित्रे झाली आहेत.

 'उषःकाला'तील रंगराव अण्णांचे व्यक्तिचित्र या दृष्टीने पाहण्याजोगे आहे. स्वराज्य स्थापनेचा शिवाजीराजे यांचा जो प्रयत्न चालला होता, त्याला त्यांचा कडवा विरोध होता. विजापूरच्या बादशहाचे ते एकनिष्ठ सेवक होते. स्वामिनिष्ठेमुळे प्रत्यक्ष आपल्या पुत्राला नानासाहेबाला राजद्रोहाच्या आरोपावरून पकडून बादशहाच्या ताब्यात देण्यास ते उद्युक झाले होते. शिवबाराजांना ते अनन्वित शिव्या देत असत असे असूनही त्यांचे कर्तृत्व, त्यांची स्वामिनिष्ठा, त्यांचा करारीपणा यांचे हरिभाऊंनी यथार्थ वर्णन केले आहे. त्यांच्याबद्दल अनादर वाटेल, किळस येईल असे वर्णन कोठेच केले नाही. लेखकाचे जे मत, त्याच्या विरुद्ध पक्षातील सर्व लोक नीतिहीन, कर्तृत्वहीन, दुबळे, पराक्रमशून्य व तिरस्करणीय असतात हे हरिभाऊंना मान्यच नव्हते. त्यांच्या सामाजिक कादंबऱ्यांतही त्यांची हीच वृत्ती दिसून येते. ते सुधारक पक्षाचे होते हे उघड उघड दिसते. प्रौढविवाह, विधवाविवाह, स्त्रीशिक्षण, स्त्री-पुरुष समता यांचा त्यांनी पुरस्कार केला आहे. पण म्हणून सनातनी मताचे ते सर्व नीतिहीन, गलिच्छ, स्वार्थी, आपमतलबी, कर्तृत्वशून्य, लाचार, गुलामी वृत्तीचे असे त्यांनी मुळीच दाखविलेले नाही. तो पराक्रम डॉ. केतकरांनी केलेला आहे. सुधारकांविषयी त्यांचे मत वाईट होते. त्यामुळे 'गोंडवनातील प्रियंवदा', 'ब्राह्मणकन्या' या कादंबऱ्यांत त्यांनी सर्व सुधारक हे एकजात पाजी, हरामखोर, फाशी देण्याजोगे, जोड्याने मारण्याजोगे अशी अत्यंत बेजबाबदार विधाने ज्याच्या त्याच्या तोंडी घालून दिली आहेत. वास्तवसृष्टी जाणण्याचे ज्ञानकोशकारांना सामर्थ्यच दुर्दैवाने नव्हते. सुदैवाने हरिभाऊंना असली एकांगी पक्षदृष्टी नव्हती. 'भयंकर दिव्यं' मधील दादासाहेब हे अगदी कट्टर सनातनी आणि सनातनधर्माला अत्यंत अमंगळ व गलिच्छ रूप आले आहे असाच हरिभाऊंचा प्रतिपाद्य विषय. पंण दादासाहेबांची व्यक्तिरेखा अगदी उमद्या रंगात त्यांनी रंगविली आहे. स्वार्थी नीतिहीन असे वर्तन त्यांनी केव्हाही केलेले नाही. उलट त्यांचा मुलगा पद्माकर हा सुधारक पक्षाचा व स्वतः कर्ता सुधारक असूनही तो उतावळा हलक्या कानाचा, सारासारविवेकशून्य असा त्यांनी दाखविला आहे. कोणताही पक्ष घेतला तरी त्यात सर्वच माणसे सर्वगुणसंपन्न किंवा अगदी गुणहीन असतात हे खरे नाही हे हरिभाऊंनी जाणले होते.

 'यशवंतराव खरे' या कादंबरीतील श्रीधरपंत व यशवंतराव या व्यक्तिरेखा पहा. सुधारक पक्षाची हेटाळणी करणारे, टवाळीतच आनंद मानणारे, टीका करताना जास्तीत जास्त कुत्सितपणे लिहिणारे. बोलणारे- असे हे गुरु-शिष्य होते आधी राजकीय सुधारणा झाली पाहिजे, सामाजिक सुधारणेत काही अर्थ नाही, स्त्रीशिक्षण, पुनर्विवाह हे केवळ थेर आहेत, स्वातंत्र्याचा व या सुधारणांचा काही संबंध नाही, असे म्हणून ते दोघे त्या सुधारणांची भरमसाठ निंदा करीत. हरिभाऊंना हे मुळीच मान्य नव्हते तरी श्रीधरपंतांची विद्वत्ता, त्यांचा व्यासंग त्यांचा दयाळू स्वभाव, यशवंतासारख्या गरीब विद्यार्थ्याविषयी त्यांना वाटणारी आस्था हे त्यांचे गुण हरिभाऊंनी यथार्थपणे वर्णिले आहेत. त्याचप्रमाणे यशवंताचा स्वाभिमान, त्याची अभ्यासू वृत्ती, त्याची देशभक्ती, मॅझिनी, रिएंझी यांच्याविषयीचा त्यांचा आदरभाव या गुणांचा हरिभाऊंनी अपलाप केला नाही 'मी' कादंबरीतील भाऊचे मामा याचे चित्र या दृष्टीने उद्बोधक आहे. हा गृहस्थ अगदी सनातन मताचा. पतीचे घर सोडून 'ताई' ही त्यांची भाची माहेरी भाऊकडे आली हे त्यांना मुळीच पसंत पडले नाही. 'तू परत सासरी जा' असेच त्यांनी प्रथम तिला सांगितले. यामुळे भाऊ फारच संतापला व म्हणाला, 'काय, त्या बदफैली अमंगळ थेरड्याच्या घरी त्यांच्या त्या अवदसांची सेवा करायला जायला तिला सांगता ? मामा, मी भिक्षा मागेन पण ताईला परत पाठविणार नाही.' या वेळी ती दोघे बहीणभावंडे मामांच्यावर अवलंबून होती. या अपमानामुळे ते आता पैसे धाडण्याचे बंद करतील हे उघड होते. तेव्हा शिक्षण सोडून नोकरी धरण्याचे भाऊंनी ठरविलेही होते. पण मामांनी तसे मनातही आणले नाही. 'मी तुम्हाला कधीही अंतर देणार नाही.' असेच आश्वासन त्यांनी त्या भावंडांना दिले. आणि ताईला पूर्वीच्या मायेनेच त्यांनी घरी नेले. 'नवऱ्यापासून बायकोनं दूर राहणं बरं नाही, असं वाटतं, म्हणून तुला तसं बोललो.' असे ते ताईला म्हणाले. म्हणजे मत सनातनी असूनही नवऱ्याचे घर सोडून आलेल्या भाचीला त्यांनी प्रेमाने संभाळले. ताईच्यां मामींना आजीला हे मुळीच पसंत नव्हते. त्यांनी तिला घरी फार त्रास दिला. तिला त्या फार बोलत. तो सर्व त्रास सोसून मामांनी तिला अंतर दिले नाही. कारण त्यांनी माणुसकीला अंतर दिला नव्हता. आणि हरिभाऊंना तोच सर्वात श्रेष्ठ धर्मं वाटत होता. सनातन धर्माला अमंगळ रूप आले होते ते त्यातील माणुसकी गेल्यामुळेच, सुधारणा हवी होती ती माणुसकीच्या प्रस्थापनेसाठीच. त्यामुळे ती जेथे दिसेल तेथे वास्तववादी हरिभाऊ तिचा आदर करतात यात नवल ते काय ?

 स्त्री-शिक्षणाचे हरिभाऊ कट्टे पुरस्कर्ते शिक्षणामुळे मनाचा विकास होतो असा त्यांचा पक्का विश्वास. पण म्हणून जुन्या काळच्या अशिक्षित स्त्रियांची त्यांनी एकजात विद्रूप चित्रे काढली नाहीत. अगदी आदर्श व वंदनीय अशा किती तरी अशिक्षित स्त्रियांच्या व्यक्तिरेखा त्यांच्या कादंबऱ्यांतून दिसतात. यमूची आई व आजी (पण लक्षात कोण घेतो), विनायकाची बायको सरस्वती व आई जानकीबाई (मधली स्थिती), यशवंताची आई (यशवंतराव खरे), या स्त्रियांची चित्रे मोठी उदार लेखणीने काढलेली आहेत गणपतराव, नानासाहेब हे सुधारक पण त्यांच्या स्त्रिया बव्हंशी अशिक्षितच होत्या. तरी हेकट, दुराग्रही अशा त्या नव्हत्या. यमूची सावत्र आई, तिच्या बनुवन्सं, तिची भावजय, सदूनानाची बायको, भाऊची आई, त्याची मामी, त्याची आजी या स्त्रिया अंध आहेत, अडाणी बोलभांड आहेत, दिमाखी, गर्विष्ठ आहेत. पण याचा अर्थ असा की सर्व प्रकारचे स्त्री-स्वभाव हरिभाऊंनी रंगविले आहेत. पक्षीय दृष्टिकोनातून काही लिहिले नाही.

 वास्तववाद हा बहुधा रूढिभंजन, मूर्तिभंजन यासाठीच अवतरलेला असतो. युरोपात औद्योगिक क्रान्तीनंतर विज्ञानाची अपरिमित वाढ झाली. आणि त्यामुळे समाजातील विचारवंत बुद्धिप्रामाण्यवादी बनले. त्या बुद्धिवादांतून वास्तववादाचा जन्म झालेला आहे. शब्दप्रामाण्यवादी लोक रूढ धर्मसंस्थांना, श्रुतीस्मृतीप्रणीत आचार-विचारांना अवमानू शकत नाहीत. त्यांच्या मनाला ते सामर्थ्यच नसते. हे सामर्थ्य विज्ञानाने मानवाला दिलेले आहे. पाश्चात्त्य विद्येच्या प्रसारामुळे दीर्घ कालानंतर ही विज्ञानप्रणीत, बुद्धिवादी दृष्टी भारतीयांना प्राप्त झाली. आणि त्यामुळेच येथले लेखक वास्तवादी होऊ शकले. या लेखकांचे हरिभाऊ हे अग्रणी होत. जुन्या रूढी, जुना धर्म, जुने आचार-विचार यांच्यावर त्यांच्या कादंबऱ्यांत सतत टीकास्त्र चालविलेले दिसते. हिंदू धर्माला त्या काळी अत्यंत अमंगळ रूप आले होते. कमालीची अवकळा आली होती. लोकहितवादी, रानडे, विष्णुशास्त्री, आगरकर यांनी त्याचे हे अमंगळ रूप आपल्या निबंधांतून स्पष्टपणे दाखवले होते. हरिभाऊंनी तेच रूप ललितसाहित्याच्या माध्यमांतून समाजाला दाखविले. जुन्या धर्माचे अभिमानी कर्मकांड, व्रतवैकल्ये, टिळाटोपी, गंधभस्म, ब्राह्मणभोजने यालाच धर्म मानीत. नीती, सदाचरण, स्वार्थत्याग, जनसेवा, माणुसकी यांची त्यांना मुळीच पर्वा नसे. या धर्माचे हे रूप शंकरमामंजी, काकासाहेब, सदूनाना, भिकंभट, गोपाळशास्त्री इत्यादी गृहस्थ व भटभिक्षुक या व्यक्तींच्या द्वारे उभे करून गणपतराव, भावानंद, शिवरामपंत, रघुनाथराव इत्यादी सुशिक्षितांच्या व्यक्तिरेखांकरवी हरिभाऊंनी त्यांचा निषेष केला आहे. मानवतेचे सुखसंवर्धन हा आगरकरप्रणीत धर्म या सर्व नव्या पिढीच्या लोकांना वेद्य आहे. 'माझे घर म्हणजे निराश्रितांना आश्रय, भुकेल्यास अन्न, तान्हेल्यास पाणी, वस्त्रहीनास वस्त्र, विद्यार्थ्यास विद्या इत्यादी मिळण्याचे ठिकाण असावे,' असे भावानंदाचे स्वप्न आहे. या तरुणांच्या मते हा खरा धर्म होय. अशी दृष्टी असल्यामुळे जुन्या कर्मकांडात्मक नीतिहीन धर्मावर त्यांनी ठायी भडिमार केलेला दिसतो. दिगंबरपुर या क्षेत्राचे वर्णन करताना हरिभाऊंनी बनार्ड शॉ सारखेच विचार प्रगट केले आहेत. बहुतेक सर्व क्षेत्रे प्रथम कोणी तरी थोर विभूतीमुळे उदयास येतात. पण पुढे ते विभूतिमत्त्व नाहीसे होते. पण त्याचा अभिमान मात्र कायम राहतो. किंबहुना तो व्यस्त प्रमाणात वाढत जातो. आणि मग त्या क्षेत्राचे माहात्म्य हे एक उदरंभरणाचे साधन होऊन बसते. क्षेत्रातली विद्वत्ता व पुण्याई नष्ट झालेली असते. पण त्या मूळच्या विभूतीचे वारस आपल्याला शंकराचार्य समजत असतात. अशांचे खरे स्वरूप दाखविण्याचे कार्य हरिभाऊंनी आपल्या कादंबऱ्यांतून केलेले आहे.

 विवाहसंस्था, स्त्रीचे पातिव्रत्य मातापित्यांचा अधिकार एकत्र कुटुंबपद्धती यांना जे अत्यंत विपरीत रूप त्या काळी प्राप्त झाले होते त्याचीही हरिभाऊंनी अशीच चीरफाड करून दाखविली आहे. आणि त्या काली अत्यंत क्रान्तिकारक, अधर्म्य व नास्तिक्य बुद्धीचे असे वाटणारे विचार निरनिराळ्या व्यक्तिरेखांच्याद्वारा सांगून रूढीवर घणाघात केले आहेत. भाऊंची बहीण, ताई हिचा नवरा अत्यंत व्यसनी बदफैली व आतताई असा होता. घरात राजरोस रखेल्या ठेवून त्यांचे पाय चेपण्याचे, लुगडी धुण्याचे काम तो ताईला करावयास लावीत असे व तिला भयंकर मारहाण करीत असे. ते सर्व असह्य होऊन ताई वर एके ठिकाणी सांगितल्याप्रमाणे नवऱ्याचे घर सोडून माहेरी आली. त्यामुळे शेजारीपाजारी. नातेवाईक तिची निंदा करू लागले. ती कुलटा आहे. समाजातून उठली आहे. बाजार- बसवी आहे, असे गलिच्छ आरोप तिच्याकर होऊ लागले. ती बाटून ख्रिस्ती होऊन साहेबांशी लग्न लावणार, असे प्रत्यक्ष तिची आजी म्हणू लागली. अशा स्थितीतही त्या बहीण-भावंडांनी धीर सोडला नाही. तिचा नवरा तिला परत न्यायला आला व अद्वातद्वा बोलू लागला तेव्हा भाऊने त्याला स्पष्ट सांगितले की, 'तुमच्यासारखा नवरा असला म्हणजे तो सोडलाच पाहिजे. तुमच्या बाजारी बायकांचे पाय चेपून तुमच्या घरी मुकाट्याने राहावे इतकी कुलीनता तिच्या अंगी नाही तेच चांगले आहे. मला आज तिचा अभिमान वाटतो. तुम्ही चालते व्हा !' मूर्तिभंजन याचा हाच अर्थ आहे. कुलीनता, पतिभक्ती या मूळच्या मंगल कल्पनांना हीन, स्वार्थी, अरेरावी लोकांनी अत्यंत अमंगल रूप आणलेले असते. त्या अमंगलाची ओढणी फाडून काढून त्याचे अमंगलत्व समाजाला दाखविणे हेच वास्तववादी लेखकाचे काम, हेच मूर्तिभंजन.

 यशवंताची आई गंगाबाई हिचा सासरी असाच भयंकर छळ होत असे. तिची सासू म्हणजे तिची मागल्या जन्मीची वैरीणच होती. मुलाने बायकोशी संबंध ठेवू नये, बाहेर जावे, अशीच तिची इच्छा होती. आणि तो मुलगा, गंगाबाईचा नवरा तर दिवटाच होता. व्यसनाधीन होऊन तो तरुण वयातच मेला. तेव्हाची हकीगत सांगताना हरिभाऊ म्हणतात, 'हिंदू स्त्रियांचे वैधव्य म्हणजे जिवंतपणी नरकयातना ही तर गोष्ट निःसंशय. पण ते वैधव्याचे दुःखही कमी वाटावे अशी गंगाबाईची (नवरा असताना) स्थिती होती. खरोखर पाहता नवरा मेल्याने तिच्या पाठीमागला एक दैत्यच नाहीसा झाला, असेच ज्याला त्याला वाटू लागले. आणि कोणाही दयाळू माणसास तसेच वाटणार आहे. नवरा मेला तर बरे झाले, असे म्हणणे अत्यंत विपरीत दिसेल. हा पवित्र अशा विवाहसंस्थेचा अवमान आहे असे वाटेल. पण ताई, गंगाबाई यांच्या नवऱ्यांसारखा पुरुषांनी व त्यांच्या आयांनी आधीच त्या संस्थेचा अवमान केलेला असतो. त्या संस्थेच्या पवित्र्याचे त्यांनीच विडंबन केलेले असते. लेखक फक्त त्याचे समाजाला दर्शन घडवितो इतकेच. गणपतराव हे हरिभाऊंच्या आरंभीचे कादंबरीतील एक प्रखर बुद्धिवादी सुधारक. बालपणीच मुलीचे लग्न करून टाकणे म्हणजे तिला कायमची गुलाम करून टाकण्यासारखे आहे, मुलीचे लग्न झालेच पाहिजे. हीही कल्पना खुळचटपणाची आहे, अविवाहित राहून तिने आजन्म लोकसेवेत आयुष्य घालविले तर मुळीच आक्षेप नाही, अशा तऱ्हेचे अधर्म्य (?) विचार त्याच्या तोंडून हरिभाऊंनी वारंवार वदविले आहेत. 'भयंकर दिव्य' या कादंबरीत पुनर्विवाहाचे समर्थन करून हरिभाऊंनी असेच रूढ धर्माचे भंजन केले आहे. द्वारकाबाई ही बळवंतरावांची पुनरूढा स्त्री. कमला तिची मुलगी. दादासाहेब हे कट्टर सनातनी गृहस्थ. त्यांचा मुलगा पद्माकर हा कट्टा सुधारक. त्याने वडिलाने ठरविलेले लग्न मोडून कमलेशी विवाह केला. तेव्हा संतापाने भडकून जाऊन 'माझा कारटा मेला' असे दादासाहेब म्हणू लागले. पण पुढे हेच दादासाहेब रेल्वे अपघातात सापडले व जखमी झाले. तेव्हा कमलेने त्यांची इतक्या भक्तिभावाने शुश्रूषा केली की, ते अगदी संतुष्ट झाले व माझी सून म्हणजे एक रत्न आहे' असे म्हणून त्यांनी 'तुमचा संसार सुखाचा होवो !' असा मुलाला व सुनेला आशीर्वाद दिला.

 हरिभाऊ मूर्तिभंजक असले तरी, 'मूर्ति फोडूनिया, देऊ जोडोनिया परी विकूनिया, टाकू न त्या । विकूनि टाकिती, तेचि हरामखोर, तेचि खरे चोर आम्ही नव्हो ॥ अशी केशवसुतांसारखी त्यांची विधायक वृत्ती होती. आणि जुन्यांचा विध्वंस, जुन्याचे भजन करताना नवे काय हवे ते सांगितल्याखेरीज वास्तववाद पुरा होतच नाही. किंबहुना नवे विधायक असे काही दिसल्यामुळेच मनुष्याच्या मनात जुन्याचा विध्वंस करण्याची प्रवृत्ती जागृत होते. वास्तववाद व ध्येयवाद अविभाज्य आहेत असे म्हणतात, ते याच अर्थाने हरिभाऊ जितके वास्तववादी होते तितकेंच ते कट्टर ध्येयवादी होते. लोकशिक्षण हा विदग्ध वाङ्मयाचा प्रधान हेतू होय असे त्यांचे मत होते. ध्येयवादावाचून त्याला अर्थच होणार नाही. प्रा. ना. सी. फडके यांनी एका लेखात याचे उत्तम विवेचन केले आहे. मुलगी मॅट्रिक झाली तेव्हा वडिलांनी तिला सांगितले की तुला पुढे शिकवावे खरे, पण सामर्थ्य नाही. तेव्हा तुझ्या लग्नाचा विचार करू. वडिलांना सामर्थ्य नाही हे मुलीला मान्य होते. पण तिला शिकून डॉक्टर होऊन लोकसेवा करावयाची होती. म्हणून तिनें शिकवण्या धरल्या, नोकरी धरली. यात तिला फार त्रास होऊ लागला, आता मध्यमवर्गीयांच्या या दारिद्र्याचे वर्णन, त्या त्रासाचे, त्या हालअपेष्टांचे वर्णन हे वास्तववर्णन झाले, पण तो त्रास मुलीला कशामुळे झाला? तिच्या ध्येयामुळे आणि हेच प्रत्येक मनुष्याचे असते. डॉक्टर होणें, न्यायाधीश होणे हे प्रत्येकाचे ध्येय नसेल. पण उद्या आजच्यापेक्षा काही बरी, काही वरची स्थिती प्राप्त करून घ्यावी अशी आकांक्षा प्रत्येक माणसाच्या, चित्तांत आहोरात्र बसत असते. यालाच ध्येयवाद म्हणतात. मनुष्य हा मनुष्य ठरतो तो या ध्येयवादामुळेच होय. तो त्याच्या आयुष्यातून वजा केला तर तो पशूच होईल. तेव्हा वास्तव आणि ध्येय यात विरोधी तर काही नाहीच. तर ते अविभाज्य असते. आणि आजचे ध्येय ते उद्याचे वास्तव असे हरघडीस प्रत्ययास येत असते. आणि त्या उद्याच्या वास्तवावर परवाचे ध्येय उभे असलेले दाखविणे हीच खरी वास्तववादी दृष्टी होय. अगदी सत्य तेच वर्णन इतका काटेकोर जरी 'वास्तवाद' या शब्दाचा अर्थ घेतला तरी त्या कक्षेतही या ध्येयवादाचा समावेश अवश्य करावा लागेल. कारण प्रत्येक मानवाच्या चित्तात अत्यंत अल्प का होईना पण ध्येयवाद असतोच. म्हणजे ही वस्तुस्थितीच आहे. तिचे चित्रण वास्तवदर्शनात आलेच पाहिजे. न आले तर ते वास्तवदर्शन होणारच नाही. हरिभाऊंचा वास्तववाद असा ध्येयदर्शी आहे. मूर्ती फोडल्यावर ती जोडून पुन्हा तिची प्रस्थापना करणे ही जबाबदारी आहे असे ते मानतात.
 या दृष्टीने त्यांच्या व्यक्तिरेखांच्या विचारांचा व आचारांचा अभ्यास करणे उद्बोधक ठरेल. म्हणजे हरिभाऊ हे केवळ बेजबाबदार, पिसाट विध्वंसक टीकाकार नसून अत्यंत तळमळीचे समाजहितचिंतक आहेत, तत्त्ववेत्ते आहेत, हे आपल्या ध्यानात येईल. 'मी' मधील शिवराम पंतांनी आपली मुलगी मिशनऱ्यांच्या शाळेत पाठविली तेव्हा तिला कळकळीने त्यांनी उपदेश केला की, 'परधर्मीयांच्या शाळेत तू जात आहेस. तेथे शिक्षक ख्रिस्ती धर्माची महती गातील व हिंदुधर्माची निंदा-नालस्ती करतील. त्याने विचलित होऊ नको. ध्यानात ठेव की, हिंदुधर्मासारखा श्रेष्ठ धर्म नाही. आपला धर्म बरा असो वाईट असो. आपल्या धर्मात राहूनच आपल्याला कार्य करावयाचे आहे.' यावरून आपल्या हे ध्यानात येईल की, हरिभाऊंना धर्म नष्ट करावयाचा नव्हता तर त्यात परिवर्तन फक्त घडवावयाचे होते आणि तेही अशा हेतूने की या धर्माने मानवतेचे सुसंवर्धन व्हावे. त्यांनी कुटुंबसंस्थेची चित्रे काढली आहेत त्यावरूनही त्यांची विधायक वृत्ती स्पष्ट होईल. भाऊची बहीण ताई ही सासरी छळ असह्य झाला म्हणून ते घर सोडून माहेरी आली. पण पुढे पती अर्धांगाने आजारी आहेत, व आता त्यांची सेवा-शुश्रूषा करायला कोणी नाही, हे कळताच ती पूर्वीचे काहीही मनात न आणता धावत घरी गेली व अहोरात्र जागून तिने त्यांची शुश्रूषा केली. माझे ते मान्य झाले. शंकर मामंजी, सदूनाना, काकासाहेब, विठ्ठलभट, भाऊसाहेब यांच्या ओंगळ संसाराची चित्रे हरिभाऊंनी दाखविली तशीच शिवरामपंत, रघुनाथराव, गणपतराव, नानासाहेब, बळवंतराव, यांच्या संसाराची चित्रे दाखवून त्यांनी फोडलेल्या मूर्ती जोडून दाखविल्या आहेत. पातिव्रत्य, पितृभक्ती, गुरुजनांविषयी आदर, बहीण- भावंडांचे प्रेम, अपत्यवात्सल्य हे कुटुंबसंस्थेचे सर्व गुणवैभव हरिभाऊंना सनातन्यांइतकेच विलोभनीय वाटते. जुन्या रूढीमुळे, धर्माविषयीच्या विपरीत कल्पनामुळे, स्त्रीच्या अज्ञानामुळे हे वैभव नष्ट झाले आहे व रूढीचे भंजन करून ते पुन्हा समाजाला प्राप्त करून दिले पाहिजे हे तर त्याचे प्रतिपादन आहे. मुली शिकल्या, म्हणजे त्यांच्या अंगची सर्व शालीनता नष्ट होते, त्या कर्तव्यच्युत होतात, उद्धट होतात, देव-धर्म मानीत नाहीत हे विपरीत समज हरिभाऊंना नष्ट करावयाचे होते. म्हणून अनेक मुलींची, तरुण स्त्रियांची चित्रे रेखाटून त्यांनी कुटुंबसंस्थेचे रम्य व विलोभनीय चित्र समाजापुढे उभे केले. कमला ही पुनर्विवाहित दांपत्याची मुलगी, पण तिला आपल्या मातापित्यांविषयी निस्सीम भक्ती आहे, तिची पतिनिष्ठाही जुन्या काळच्या कसाला उतरणारी आहे. आणि दादासाहेबांची- आपल्या मामंजींची शुश्रूषा करून तिने त्यांचे मन जिंकले, हे दाखवून या नव्या मुली सासरच्या माणसांचाही पूर्वीइतकाच आदर ठेवतात, हे हरिभाऊंनी दाखविले आहे. भाऊ आणि ताई या बहीण- भावंडांचे प्रेम किती उत्कट होते ते 'मी' या कादंबरीत आपल्याला दिसते. बहीण-भावंडांच्या प्रेमाचे तितकेच हृदयंगम असे चित्र हरिभाऊंनी 'कर्मयोग' या कादंबरीत रेखाटले आहे. चंद्रशेखराची छोटी बहीण चंद्री हिच्या निर्व्याज बालभावाचे आपल्या तात्यावरील तिच्या भक्तीचे हरिभाऊंनी जे वर्णन केले आहे त्याला खरोखरच तोड नाही. 'मातृदेवो भव' या सुभाषिताला तर हरिभाऊंनी अनेक कादंबऱ्यांत मूर्तरूप दिले आहे. भाऊ व ताई यांची आई फार कजाग होती. संसारातील दुर्दैवामुळे ती निष्ठुर झाली होती. त्यामुळे तिने या दोघांना फार कठोरपणे वागविले. पण त्याच्या चित्तातली तिच्या विषयीची भक्ती अणुमात्र कमी झाली नाही. यमुना, सुंदरी, कमला, चंद्रशेखर, या सर्वांनी 'नमातुः परदैवतम् !' असेच आचरण ठेविले होते. ही संसारचित्रे दाखवून आपल्याला विवाहसंस्था, कुटुंबसंस्था मोडावयाची नसून ती जास्त दृढ करावयाची आहे हेच हरिभाऊंनी सिद्ध केले आहे.

 याप्रमाणे सनातन धर्म, विवाहसंस्था, कुटुंबसंस्था, व सामाजिक नीती यांना जी अवकळा आली होती, यांना जे विपरीत व अमंगळ रूप आले होते त्याचे स्वरूप समाजाला दाखवून हरिभाऊंनी प्रथम मूर्तिभंजन केले, नंतर अनेक प्रसंग, व्यक्तिरेखा व कथा यांच्या द्वारा या संस्थांच्या शुद्ध स्वरूपाचे दर्शन घडविले आणि शेवटी भविष्यकाळाच्या प्रगतीसाठी तरुणांना कर्मयोगाचा संदेश दिला. निःस्वार्थीपणे, निर्भयपणे, आपल्या विवेकाला साक्ष ठेवून आपल्या देशाच्या उन्नतीसाठी, समाजाच्या उत्कर्षासाठी अहोरात्र तनमनधन झिजवणे हाच कर्मयोग होय. पाश्चात्त्य मिशनऱ्यांनी ज्याप्रमाणे धर्मसेवा केली त्याप्रमाणे आपल्या तरुणांनी देशामध्ये अनेक मठांची स्थापना करून तेथे अनाथ, अपंग, दीन, पतित यांना आश्रय द्यावा व त्यांच्या उन्नतीच्या कार्यासाठी आजन्म ब्रह्मचारी राहून त्याची व समाजाची सेवा करावी अशी हरिभाऊंची इच्छा होती. भावानंद व ताई यांनी स्थापिलेल्या मठाचे वर्णन करून आपल्या या कल्पनेचे मूर्तरूप त्यांनी 'मी' कादंबरीमध्ये दाखविले. 'भयंकर दिव्य' या कादंबरीत दादासाहेब व कमला यांच्या प्रसंगाने त्यांच्या कार्याचे स्वरूप थोडे विशद केले. आणि 'कर्मयोग' या कादंबरीत चंद्रशेखर या तरुणाला, ताईच्या सहवासांतून असल्या कार्याला आपण वाहून घ्यावे, अशी स्फूर्ती देऊन, अखिल महाराष्ट्राच्या तरुणांना ध्येयवाद शिकविला. या कादंबऱ्यांत हरिभाऊंनी जी मनीषा व्यक्त केली ती 'सेवासदन,' 'सर्व्हंटस् ऑफ इंडिया सोसायटी' या संस्थांच्या रूपाने लवकर प्रत्ययात अवतरली हे महाराष्ट्राला माहीतच आहे. आजचे ध्येय ते उद्याचे वास्तव, असे वर म्हटले आहे ते याच अर्थाने. वास्तवाचे अवलोकन करून, त्याचा खोल अभ्यास करून जी ध्येये उभारली जातात तीच अशी नजीकच्या काळात प्रत्यक्षात अवतरतात. केवळ कल्पनेच्या बळावर जी स्वप्ने रचलेली त्यांना मूर्त होण्याचे भाग्य लाभत नाही. आणि अशी स्वप्ने रचणाऱ्या लेखकांना वास्तववादी असे कोणी म्हणतही नाही. ते केवळ स्वप्नवादी किंवा सौंदर्यवादी होत. हरिभाऊ असल्या स्वप्नवादापासून फार दूर होते.

अज्ञानतिमिरांधस्थ लोकस्त तु विचेष्टत:
ज्ञानांजन शलाकाभिर्नेत्रोन्मीलन कारणम् ।

 महाभारत लिहिण्याचा व्यासांनी हा हेतू सांगितला आहे. अज्ञान-तिमिराने लोक अंध होऊन चाचपडत असतात. त्यांच्या डोळ्यांत ज्ञानांजन घालून ते उघडावे हे व्यासांचे उद्दिष्ट होते. हरिभाऊंचे उद्दिष्टही तेच होते. वास्तवाचे ज्ञान समाजाला त्यांनी करून दिले ते त्याचे डोळे उघडावे व त्याला ध्येयाचे दर्शन घडवावे यासाठी. त्यांचा वास्तववाद असा ध्येयदर्शी होता. केवळ सत्यदर्शी नव्हता. जगातले अक्षरसाहित्य ज्याने वाचले आहे त्याला हाच वास्तववाद श्रेष्ठ होय हे सांगावयास नकोच.